आईचं बोट धरून जेव्हा पहिल्यांदा बाहेरच्या जगात पाऊल पडतं ते कदाचित निवृत्तीनंतर घरात परत येतं. नियती नावाची गोष्ट दरक्षणी एक नवा फासा टाकते. साप शिडीवरून चढत-उतरत सोंगटी एका जागी स्थिर होते. डाव पूर्ण होत नाही. आता फक्त शेवटच्या दानाची वाट बघत बाकी सोंगट्याना घरंगळत उठत आपापला मार्ग चालताना पाहावं लागतं . पटावरून खाली बघितलं कि तेव्हाचे अजस्त्र साप आज फक्त एक साधारण दोरी वाटू लागतात. चढलेली शिडी एखाद्या शिखरापेक्षा उत्तुंग वाटू लागते. ज्याला highlights म्हणावे असे आयुष्यातले अनुभव एक survey फॉर्म घेऊन समोर येतात.
१) शिक्षण पूर्ण ? :- होय
२) नोकरी धंदा ? :- होय
३) प्रेम ? :- कदाचित हो पण नक्की सांगता येत नाही,
४) प्रेमभंग? : एकूण एकच .
५) व्यसन ?:- हो / नाही काहीही
६) लग्न ? :- हो
७) लग्नाचा वाढदिवस (पहिला / दहावा / पंचविसावा) ? :- हो / कदाचित / बहुतेक
८) मुलं बाळं ? :- हो
९) त्यांचं शिक्षणपाणी आणि लग्न ? :- होयच मूळी
१०) कुटुंबा सोबत लांबचा प्रवास ? :- hmmmm (म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येईल एव्हढाच)
पन्नास वर्षांत आयुष्याच्या जमाखर्चात हेच १० प्रश्न. मग वहीमध्ये एक नवीन उलटलं जातं. पण या पानावर हिशोब दुसराच कुणीतरी लिहित असतो. आपली कुणाला फारशी गरज उरलेली नाही हि जाणिव सुई सारखी काळजाला टोचून जाते. मग कधीतरी घर परतीची वाट धरली जाते आणी मग सगळंच बदलून जातं. हि वेळ असते दुसऱ्यांचा विचार करण्याची. पूर्वीच्या घटनांचे संदर्भ बदललेले असतात. कदाचित ते आधीच बदलले होते पण कळले उशिरा. कधीतरी वापरलेले शब्द आज तेच संदर्भ घेऊन पण वेगळ्या स्पष्टीकरणा सकट परत आपल्याच अंगावरती आदळतात. जगाला खूष करण्याच्या नादात आपण आपल्याच माणसांची मनं नकळत दुखावलेली असतात. आत्तापर्यंत न जाणवलेलं काहीतरी जाणवायला लागतं.
"हम तो यूँ अपनी जिंदगी से मिले, अजनबी जैसे अजनबी से मिले."
बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने मग जोडीदाराची आठवण होते. पण आत्ता आयुष्याची बसलेली घडी विस्कटण्यात कुणालाच रस नसतो. जुन्या जखमांवर ताजी फुंकर मारून फायदा नसतो हे कळून चुकतं. हो चुकतंच.अश्या वेळेला जुळवून घेणं महत्वाचं. जोडीदाराबरोबर, मुलांबरोबर सगळ्यांबरोबर एक नवीन खेळी खेळायला लागते. या वेळेला दान आपण टाकत नसतो सोंगटी पण आपली नसते. असतो तो फक्तं सहवास. साप येउदे किंवा शिडी, मी बरोबर आहे तुझ्या हा विश्वास द्यावा लागतो समोरच्याला. मग लुडबुड नं करता हि सल्लागाराची post मिळते. अभिमान असतो ६० पावसाळे पाहिल्याचा कुणालाही . पण प्रत्येक पाऊस नवीन पाणी घेऊन येतो हे कळलं कि मग दान कुठलही पडूदे जिंकतो आपणच . आयुष्याच्या पानगळीत अहंची पानं गळून पडतात आणी ममं चे नवीन धुमारे फुटतात . प्रेम,अभिमान,कौतुक, विश्वास या शब्दांना नवीन अर्थं येतो. एकला चलो रे चा ध्यास जाउन हात तुझा हातात असा साद येतो. नाना पाटेकरांचं एक सुंदर वाक्य आहे " माझं माझं म्हणून खूप करतो आपण, खरंतर जे काही तुमचं आहे ते माझंच कि तसंच जे काही माझं तेच तुमचं सुद्धा मग माझं म्हणजे नक्की काय? फक्त माझं म्हणून काही असेल तर सरतेशेवटी मी गेल्यानंतर तुमच्या डोळ्यातून एखादा थेंब जर आला तर तो माझा." आणी त्याच्याही वरती तुकाराम महाराज म्हणूनच गेलेत की ……
"याच साठी केला होता अठःहास शेवटचा दीस गोड व्हावा."
प्रतिक्रिया
2 Jan 2017 - 1:12 pm | वृंदा१
ओ माय गॉड!