नमस्कार मंडळी,
माननीय पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर रोजी सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाची घोषणा केली. प्राथमिक प्रतिक्रियांनंतर परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये त्यांच्याजवळ असणाऱ्या ₹५०० व ₹१००० च्या जुन्या नोटांचे काय करावे याची काळजीयुक्त चर्चा सुरू झाली. सरकारने जाहिर केलेल्या माहितीनुसार परदेशात राहणाऱ्यांनी ३० डिसेंबर २०१६ किंवा ३१ मार्च २०१७ पर्यंत प्रत्यक्ष भारतात येऊनच स्वतःजवळच्या जुन्या नोटा बदलून घ्यायचा किंवा स्वतःच्या एनआरओ खात्यात जमा करण्याचा पर्याय उपलब्ध होता. दुसरा पर्याय म्हणजे विश्वासातले कोणी भारतात जात असल्यास त्यांच्याबरोबर जुन्या नोटा पाठवणे (ते पैसे एन आर ओ खात्यात इतर कुणाला भरु देण्याचे परवानगी पत्र सोबत पाठवणे हे इथे अध्याहृत आहे).
काळजी अशासाठी की या काळात भारतात जाणे प्रत्येकालाच जमणारे नाही. तसेच कुणी भारतात जात असेलही तर त्या व्यक्तिला ओळखीतल्या अनेकांकडून त्यांच्या जुन्या नोटा भारतात नेण्याची विनंती वा आग्रह होणे क्रमप्राप्तच होते. भारतात जाताना भारतीय चलन सोबत नेण्याची प्रती व्यक्ती कमाल मर्यादा ₹२५००० इतकी आहे. त्यामुळे कुणीही भारतात जात असल्यास थोड्याच लोकांच्या जुन्या नोटा नेणे शक्य आहे.
अशाच अनेक परदेशस्थ भारतीयांपैकी एक म्हणून याबाबत अधिक सोयीचा पर्याय भारत सरकार व रिझर्व बँकेने उपलब्ध करून द्यावा असे मलाही वाटत होते. जालावरच्या बातम्यांमध्ये विविध देशांतल्या भारतीयांनी भारत सरकारकडे याबाबतीत विनंत्या / मागण्या केल्याचेही वाचायला मिळत होते. माझ्यातर्फे मी खालील पदावरील व्यक्तींना त्यांच्या अधिकृत पत्त्यावर ईमेल पाठवले.
- केंद्रीय परराष्ट्रमंत्री
- परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव
- परराष्ट्र मंत्रालयातले राज्यमंत्री
- अर्थ मंत्रालयाचे सचिव
- भारताचे अमेरिकेतले राजदूत
- रिझर्व बँकेची हेल्पलाइन
पहिले ईमेल १५ नोव्हेंबरला माननीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पाठवले. त्यानंतर काही तासांनी त्या किडनी प्रत्यरोपणासाठी इस्पितळात आहेत असे कळले. त्यामुळे त्यांच्याऐवजी त्यांच्या मंत्रालयातील संयुक्त सचिव व राज्यमंत्र्यांबरोबर ईमेलद्वारे पाठपुरावा केला.रिझर्व बँक वगळता इतर कुणाकडूनही ईमेलची पोच देखील आली नाही हे खेदाने नमूद करतो. रिझर्व बँकेचे उत्तर म्हणजे आमच्या एफ अ क्यू पानावरची माहिती बघा. त्यांना तिथल्या माहितीनुसार सोयीचा पर्याय नसल्यानेच मूळ ईमेल पाठवली आहे असे उत्तर पाठवले तर हेल्पलाइनद्वारे यापेक्षा अधिक माहिती देणे शक्य नाही असे उत्तर मिळाले.
१ डिसेंबरच्या या बातमीनुसार सरकारने परदेशस्थ भारतीयांच्या जुन्या नोटांच्या समस्येबाबत मंत्रीगटाची स्थापना केल्याचे कळले. अजूनही या मंत्रीगटाने काही उपाय सुचवल्याची बातमी आढळली नाही.परदेशस्थ भारतीयांना जुन्या बँकेत नोटा जमा करण्याचा किंवा बदलून घेण्याचा अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध व्हावा ही मागणी भारत सरकार व रिझर्व बँकेपर्यंत अधिक परिणामकारकपणे पोचवण्यासाठी मी चेंज.ऑर्ग या संस्थळावर ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. तसे करण्यापूर्वी इतर कुणी अशी याचिका दाखल केली आहे का हे तपासून पाहिले.
माझ्या मते सोयीचा पर्याय म्हणजे परदेशातल्या करन्सी एक्स्चेंजेसला जुन्या ₹५०० व ₹१००० च्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देणे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या करन्सी एक्सचेंजवर चलन बदलून घ्यायला येणाऱ्या व्यक्तीचे पासपोर्ट डिटेल्स नोंदवून घेतल्यावरच चलन बदलून दिले जाते असा अनुभव आहे. म्हणजे जुन्या नोटा नेमक्या कुणी जमा केल्या त्याची माहिती भारत सरकारपर्यंत अन रिझर्व बँकेपर्यंत पोचू शकेल.
हा मजकूर वाचणाऱ्या प्रत्येकाला नम्रपणे विनंती करतो की या याचिकेवर स्वाक्षरी करून आपला परदेशस्थ भारतीयांच्या मागणीला पाठिंबा द्यावा. तसेच या याचिकेचा दुवा इतरांपर्यंतही पोचवावा.
कृपया आपल्या सूचना व या विषयासंबंधी अधिक माहिती या धाग्यावर प्रतिक्रियांच्या रूपात जरूर मांडा.
संदर्भः ₹२५००० मर्यादा (रिझर्व बँकेचे १९ जून २०१४ चे परिपत्रक; रिझर्व बँकेचे एफ क्यू पान प्रश्न क्र. ४)
प्रतिक्रिया
27 Dec 2016 - 10:11 am | कंजूस
आपलं परराष्ट्र कार्यालय काहीच करत नाही का?
27 Dec 2016 - 7:14 pm | श्रीरंग_जोशी
विविध बातम्यांत वाचल्याप्रमाणे परदेशात राहणार्या अनेक भारतीयांनी ट्विटर व विविध मार्गांनी या समस्येबाबत मदतीची याचना केल्याचे वाचले आहे. प्रत्यक्ष निर्णय अर्थ मंत्रालय अन रिझर्व बँकेने घ्यायचा असल्याने परराष्ट्र मंत्रालय केवळ परदेशस्थ भारतीय व अर्थ मंत्रालय यामधला दुवा म्हणून काम करू शकते.
28 Dec 2016 - 1:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
आज एक नवीन वटहुकुम जाहीर होणार आहे त्यात बहुदा तुम्हाला अपेक्षित असलेल्या तरतूदी असण्याची शक्यता आहे.
28 Dec 2016 - 6:04 pm | श्रीरंग_जोशी
काल याबाबत अंदाज वर्तवणार्या बातम्या वाचल्यावर एक आशा निर्माण झाली होती की बर्याच दिवसांनंतर या विषयावर मोठा धोरणात्मक निर्णय जाहीर होणार आहे. परंतु पुन्हा एकदा परदेशस्थ भारतीयांची निराशाच झाली.
कदाचित नवा वटहुकूम लागू झाल्यावर परदेशस्थ भारतीयांसाठी काही पर्याय घोषित करण्यात येईल अशी आशा आहे. कारण अशी तरतुद आधीच जाहीर केल्यास भारतात राहणारे काही लोक ज्यांचा बेहिशेबी पैसा जुन्या नोटांच्या स्वरुपात अजुनही शिल्लक आहे ते त्या नोटा परदेशात पाठवून परदेशस्थ भारतीयांद्वारे परत आणु शकतात (कमाल मर्यादा प्रती व्यक्ती ₹२५००० एवढीच असल्याने हा पर्याय तसाही फारसा व्यवहार्य नाहीच).
वाट बघण्याखेरीज अन पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करण्याखेरीज परदेशस्थ भारतीयांजवळ पर्याय नाही.
28 Dec 2016 - 6:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझा अंदाज असा आहे की तुम्ही मांडलेला मुद्दा इतर ठिकाणच्या नाही तर गल्फमधील आनि विशेषतः दुबईमधील मनी एक्चेंजर्सच्या अनिर्बंध पैसे बदलीकरणामुळे सहज सुटणारा नाही. केवळ विमानतळावर बघीतले तरी कोणतीही आयडी न देता भारतिय नोटांची अनेक पुडकी लोक परदेशी चलनात सहज बदलून घेताना नेहमी दिसत असत. अर्थात असा भारताबाहेर जाणारे चलन अवैध तर होतेच पण ते बहुदा काळेही असण्याची जास्त शक्यता आहे.
ते मनी एक्सचेंजर्स दिवसाला अनेक कोटी रुपये बदलून देत असत. आता ते अडचणीत आले आहेत. सरसकट पैसे भारतात आणायला दिले तर काळाबाजारी आणि हवालावाल्यांचे आयतेच फावेल. त्यामुळे, नवीन वटहुकुमात सरकार काही इन्नोव्हेटिव्ह उपाय काढू शकेल अशी इच्छा व्यक्त करणेच हातात आहे.
28 Dec 2016 - 6:28 pm | श्रीरंग_जोशी
आखातात कधी गेलो नसल्याने या गोष्टींची काही कल्पना नाही. पण पासपोर्ट डिटेल्स नोंदवून घेतल्याशिवाय परदेशातले करन्सी एक्स्चेंजेस चलन बदलून देत नाहीत असा अनुभव आहे. जर कमाल ₹२५००० एवढेच चलन बदलून देण्याचा नियम लावला अन भारतीय पासपोर्ट / पिआयओ किंवा ओसिआय कार्डचे डिटेल्स नोंदवून घेतले तर या पर्यायाचा कुणी फारसा गैरफायदा घेऊ शकेल असे वाटत नाही.
याबाबतीत १ तारखेनंतर काही जाहीर केले जाईल अशी आशा आहे.
28 Dec 2016 - 6:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
गल्फमधून रोज २०-२५ विमाने (प्रत्येकी २०० ते ४०० प्रवासी) भरून लोक सुट्टीवर येतात. त्यातले प्रत्येकी रु२५,००० वैधरित्या बाहेर घेऊन जाणारे फार कमी असतील, हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो (परतताना टॅक्सीसाठी लागणार्या ५ ते ७.५ हजारांपेक्षा जास्त पैसे घेऊन जाणे मला गरजेचे वाटत नव्हते, आणि त्यामुळे माझे कधी अडलेही नाही).
तर अश्या प्रवाश्यांचा हवाला आणि एक्सचेंजवाल्यांकडून "नोटा बदल हमाल" असा उपयोग होईल. त्यामुळे हा पर्याय दिसतो तितका सोपा किंवा निर्धोक नाही.
यात (गल्फ सोडून) बाकी देश (पाश्चिमात्य देशांतही हवालाने मोठमोठे व्यवहार होत असतातच) पकडले तर मग हे समीकरण अशक्य स्तराला जाईल !
28 Dec 2016 - 7:28 pm | श्रीरंग_जोशी
८ नोव्हेंबर नंतर जुने चलन बदलून घेण्याचा पर्याय केवळ एकदा वापरता येईल असा नियम लागू करता आला असता. म्हणजे खाजगी एक्स्चेंजेसने अधिक वेळा केला तरी त्या व्यक्तिच्या नावे केला त्या व्यक्तिचे पासपोर्ट / ओसिआय / पिआयओ कार्ड डिटेल्स आरबीआयला पाठवणे बंधनकारक केल्यास एकापेक्षा अधिक वेळा केलेले असे व्यवहार पकडणे सहज शक्य होईल. भारतातही जुन्या नोटा वापरायचे पर्याय पहिले जाहिर केलेल्या तीन दिवसांपेक्षा अधिक काळ वाढवले गेले तसेच त्यांची व्याप्ती वाढवली गेली. या गोष्टींचा गैरफायदा अनेकांनी घेतला असेलच.
असो, आता १ तारखेनंतरही परदेशस्थ भारतीयांच्या सोयीसाठी सरकार व रिझर्व बँक काही करू शकतेच.
28 Dec 2016 - 7:53 pm | श्रीरंग_जोशी
हे सर्व केवळ ९ नोव्हेंबरपर्यंत भारतातून बाहेर गेलेले व अजुन भारतात न परतलेल्या लोकांसाठी.
28 Dec 2016 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे केवळ दुबईच्या विमानतळाबद्दल झाले. त्याचे उदाहरण दिले कारण तिथे स्टॉप ओव्हर किंवा विमान बदलायला थांबलेले पर्यटक हवे तेवढे भारतिय चलन बद्लून घेऊ शकतात.
जीसीसीच्या सहाही देशांत दर शहरातल्या बाजापेठांत भाजीच्या दुकानांसारख्या डझनांनी असलेल्या मनी एक्सेंजेसमध्येही हवे तेवढे नकद चलन सहजासहजी बदलून मिळते. तो हिशेब जमेस धरला तर हा व्याप किती (?हजार) कोटींत जाऊ शकेल याचा अंदाज लावणे कठीण आहे !
27 Dec 2016 - 11:02 am | एस
स्वाक्षरी केली आहे.
27 Dec 2016 - 8:21 pm | राघवेंद्र
स्वाक्षरी केली आहे
27 Dec 2016 - 11:38 am | नपा
याचिका दाखल करण्याच्या आपल्या पुढाकाराबद्दल धन्यवाद...
एक update ... कतार tribune मधे प्रसिद्ध झालेली बातमी खालील दुव्यावर वाचता येईल:
http://www.qatar-tribune.com/news-details/id/४०१००
१ जानेवारी पासून currency exchange house ला ५००/१००० च्या नव्या नोटा उपलब्ध होतील, परंतु जुन्या-नव्या नोटांची अदलाबदली करण्याबद्दल माहिती नाही.
आशावादी राहुयात...!!!
आपली याचिका RBI व भारत सरकार पर्यंत पोहचली का? तसेच माननीय परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांना याचिकेची लिंक twitter वर देखील पाठवावी हि विनंती.
27 Dec 2016 - 7:22 pm | श्रीरंग_जोशी
चांगली बातमी आहे. हो आशावादी राहुया.
हो, याचिकेचा दुवा माननीय परराष्ट्रमंत्री, माननीय अर्थमंत्री, व पंतप्रधान कार्यालय यांना ट्विटद्वारे व रिझर्व बँकेला फेसबुक संदेशाद्वारे पाठवला आहे.
28 Dec 2016 - 12:11 am | जयन्त बा शिम्पि
मी सुद्धा इमेल पाठविला होता. १४ नोव्हेम्बर २०१६ रोजी. वित्त मंत्रालयाकडे ईमेल पोहोचलाच नाही. मग पीएमो ऑफिसला दुसरा मेल पाठवीला. त्यावर मला असे उत्तर आलेले आहे.
cpgrams-darpg@nic.in via nic.in
Nov 14
to me
Dear Sir/Madam,
Your Communication has been registered vide Registration number PMOPG/E/2016/0451179 . Please logon to : http://pgportal.gov.in/ for any further details.Please quote the same in your future correspondence.
मी ३० डिसेंबर २०१६ ला अमेरिकेतून निघणार आणि ३१ डिसेंबर २०१६ ला रात्री ११.३० वाजता भारतात पोहोचणार आहे.
तेथे गेल्यावर रिझर्व्ह बॅंकेतल्या कोठल्या शाखेत नोटा बदलून मिळतील , हे कोणास माहित असल्यास क्रुपया येथे कळवावे अगर व्यनी करावा ही विनंती.
31 Dec 2016 - 9:55 am | श्रीरंग_जोशी
संदर्भः केंद्रिय अर्थ मंत्रालयाचे ३० डिसेंबर २०१६ रोजीचे प्रसिद्धीपत्रक
सदर पत्रकामधील परदेशस्थ भारतीयांसाठी असलेला भाग
31 Dec 2016 - 10:59 am | ज्ञान
सहमत आहे तुमच्याशी आपल्या सारखे बरेच लोक आहेत.
1 Jan 2017 - 9:14 am | संग्राम
बातमी
1 Jan 2017 - 9:16 am | संग्राम
30-6-2017
1 Jan 2017 - 1:38 pm | डँबिस००७
अनिवासी भारतीयांना दिलासा; नोटा बदलण्यासाठी ६ महिन्यांची मुदत
http://www.loksatta.com/desh-videsh-news/rbi-says-nris-can-exchange-defu...
2 Jan 2017 - 10:22 am | श्रीरंग_जोशी
धन्यवाद संग्राम व डँबिस००७.
कस्टम्स विभागाचे प्रसिद्धीपत्रक
याच्या शेवटच्या पानावर एक फॉर्म आहे. परदेशस्थ भारतीयांनी ९ नोव्हेंबरनंतर प्रथमच भारतात आगमन झाले असल्यास विमानतळावर जुन्या नोटांचे विवरण या फॉर्मवर लिहायचे आहे.
30 May 2017 - 4:01 am | श्रीरंग_जोशी
कर्मधर्मसंयोगाने अजुनही माझ्याकडे जुन्या ₹५०० व ₹१००० काही नोटा आहेत. ज्या स्वतःच्या खात्यात भरण्यासाठी मला ३० जूनच्या आत भारतात पोचून रिझर्व बँकेच्या ५ पैकी एका शाखेत भरण्याची संधी आहे. मला सध्या भारतात जाणे शक्य नाही.
उत्तर अमेरिकेत राहणारी भारतीय नागरिक असलेली व्यक्ती जर ८ नोव्हेंबरपासून अजुन भारतात गेलेली नसेल अन स्वतःच्या जुन्या नोटा एन आर ओ अकाउंटमध्ये भरण्यासाठी ३० जून २०१७ अगोदर भारतात जाऊन रिझर्व बँकेत जाणार असेल तर मला मदत करु शकते. ही शक्यता तेव्हाच आहे जेव्हा या व्यक्तीची स्वतःची जुन्या नोटांमधली रक्कम ₹२५००० पेक्षा कमी आहे (प्रती व्यक्ती कमाल मर्यादा).
माझ्याकडल्या नोटांचे मुल्य या मर्यादेच्या तुलनेत बरेच कमी आहे.
माझ्याकडे असलेल्या जुन्या नोटा यशस्वीपणे भारतात जमा होऊ शकल्यास ती सर्व रक्कम एखाद्या धर्मदाय संस्थेला देणगी म्हणून द्यायचा मानस आहे.
मी भारतात जाणार असतो अन कमाल मर्यादेपेक्षा कमी रकमेच्या नोटा नेंणार असतो तर इतर कुणाच्या नोटा जरुर जमा करुन दिल्या असत्या.
आशा आहे मला कुणीतरी मदत करणारे नक्की भेटेल. मिपासदस्य नसणार्या मिपावाचकांसाठी माझा इमेल पत्ता.
रिझर्व बँकेत जुन्या नोटा जमा करण्याचा एका परदेशस्थ भारतीय श्री अमेय गोखले यांचा अनुभव - NRIs and Demonetization | My Experience with the RBI Process
7 Jun 2017 - 7:13 pm | श्रीरंग_जोशी
या कामी मदत करु शकेल असे अजुन कुणी भेटलेले नाही. आशा आहे येत्या काही दिवसात कुणी तरी संपर्क साधेल.
7 Jun 2017 - 11:39 pm | मस्तानी
तुम्हाला मदत मिळो अशी अपेक्शा करते