मिपावर गेल्या काही दिवसात आलेले धागे बघता,'जीवन -एक रडगाणे' नामक नवीन दालन सुरु करावे अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो. ह्या दालनात दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांमुळे येणारे फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होईल (मग मिपावर आपण वेगळे काय करतो असा प्रश्न काही दुत्त दुत्त मिपाकरांना पडेलच! त्यांना फाट्यावरून इग्नोर मारावे !). दैनंदिन समस्यांमुळे माणसाच्या मनात उद्भवणारे प्रश्न आणि त्यांची त्याने शोधलेली उत्तरं ह्यावरही उहापोह होईल. सोबतीला मिपातज्ञ आहेतच. तर दालनाच्या बोहनीसाठी आमच्याकडून काही चिल्लर.
प्रश्न १. पावसाळ्यात ट्राफिक जाम मध्ये अडकल्यावर फोर व्हीलऱवाले बाहेर भिजत असलेल्या टू व्हीलऱवाल्यांकडे कुत्सीत नजरेने का बघतात ?
उहापोह: एकंदरीतच,स्वतःच्या चारचाकीत बसल्यावर सगळ्यांना बाकी दुनिया मूर्ख वाटायला लागते असा अस्मादिकांचा अनुभव आहे. प्रत्येक चारचाकीवाल्याची, ड्रायविंगमधले बारकावे केवळ आपल्यालाच कळतात अशी ठाम समजूत असते. शूमाकरच व्हायचे ते चुकून ट्राफिक जॅम मध्ये अडकले असा ह्यांचा अविर्भाव असतो. वरील प्रश्नावर पुढील उपाय सुचवता येईल. पावसाळा संपू द्यावा.हिवाळ्यात एखाद्या दिवशी त्याच्या कारला कट मारून साईड मिरर तोडावा. शक्य झाल्यास वाकुल्या दाखवून पळ काढावा. ट्रॅफिक जॅममुळे कारवाला तुम्हाला पकडू शकणार नाही. हा उपाय अमलात आणल्यास प्रस्तुत शूमाकररावांचे काय होईल ह्याची कल्पना करून बघा.
प्रश्न २. सतत वायफायचा पासवर्ड मागणाऱ्याला धडा कसा शिकवावा ?
उहापोह: अन्न,वस्त्र,निवारा आणि इंटरनेट ह्या मानवाच्या मूलभूत गरज आहेत. पैकी पहिल्या तीन गरजा आजकाल सगळॆच तीर्थरूप पूर्ण करतात. पण नेटवर्क हे मिळवावं लागतं ! 3G -4G च्या मोहमायेत तुम्ही काहीही निवडलं तरी नेटवर्क तुमच्यावर कधी रुसेल हे सांगता येत नाही. वरील प्रश्नावर पुढील उपाय करून पाहावा.एक दिवस मोबाईल बिघडलाय म्हणून सांगावे .आणि एका बाजूला बसून मजा बघावी. अशी माणसं ऑक्सीजनशिवाय जगतील एखाद्यावेळेस पण इंटरनेटशिवाय तडफडतील. आपण एकीकडे फेसबुकवर "feeling entertained " असं स्टेटस टाकावं!
प्रश्न ३: बँकांचे सतत बदलावे लागणारे पासवर्ड कसे लक्षात ठेवावे ?
उहापोह: हा खरोखर गहन प्रश्न असून ह्यावर मिपातज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. कधी कधी तर 'पासवर्ड नको पण सिक्योरिटी आवर' अशी परिस्थिती येते. सगळं सुरळीत सुरु असताना आपल्या मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे One Time Password मिळत नाही. मिळाला तर तोवर सेशन एक्स्पायर होते. नाही झाले तर सर्व्हर डाऊन होते. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न !
प्रश्न ४: आजकाल सगळीकडे आढळणाऱ्या अर्धवटआंग्लभाषिक पिलावळीचे काय करावे ?
उहापोह: ह्यांचा काहीच इलाज नाही. कारण अर्ध्याहून जास्त केसेस मध्ये हा मॅन्युफॅक्चरींग डीफेक्त असतो तर उरलेल्या केसेस हा परदेशी व्हायरल फिव्हर असतो. त्यामुळे भारतीय उपाय उपलब्ध नाही. तरी या पिलावळीला उघडं पाडण्याचे बरेच उपाय आहेत.
१.चेतन भगतछाप पुस्तकं हातात घेऊन फिरणाऱ्यांसमोर जेफ्री आर्चर, इरविंग वॉलेस,आर्थर हॅले वगैरे लेखकांच्या पुस्तकांची चर्चा करावी. थोडावेळ तरी सुन्न होतीलच.
२. हिलरी क्लिंटन दुरून आत्या लागते अश्या आस्थेने अमेरिकेच्या निवडणुकीची चर्चा करणाऱ्यांना इलेक्टॉरेल व्होट म्हणजे काय हे विचारून घ्यावे. अज्ञानाचे इमले रचले जातील. मग हळूच नगरपरिषदेच्या पोटनिवडणूकीचा विषय काढावा.
प्रश्न ५:कंपनीत कमी इन्क्रिमेंट मिळाल्यास काय करावे ?
उहापोह: (मनात: हा मुद्दा शंभरी गाठणार !) इथे गांधीगिरी वगैरे फंडे उपयोगात येत नाहीत.कमी इन्क्रिमेंट मिळालं तरी उगाच जास्त काम करून दाखवायचे आणि बॉसच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू दिसतील ही आशा करायची म्हणजे बावळटपणा आहे.याउलट तुम्ही कमी काम केले तर तुमच्या क्रोधापुढे हात टेकून तुमचा पगार वाढवल्या जाईल अशी अशा करणे म्हणजे आणखी मोठा बावळटपणा आहे. कमी इन्क्रिमेंटवर, दुसरी नोकरी शोधणे हा एकमेव जालीम इलाज आहे. कंपनी लॉयल्टीवगैरे भ्रामक संकल्पना बाळगत असाल तर आहे त्यात समाधान बाळगा. मग तुमच्यासारखा सुखी माणूस कोणीच नाही !
प्रश्न ६: सतत हरवणारे किल्ली आणि चष्मा वगैरे जिन्नस कसे सांभाळावे ?
उहापोह:खोटं नाही सांगत, ऐन लग्नाच्या दिवशी माझा चष्मा हरवला होता. लग्नाचा नर्व्हसनेस चष्मा नसल्याच्या अस्वस्थतेपुढे कुठल्या कुठे पळाला.शिवाय लग्नाच्या फोटोंमध्ये माझा बावळटपणा अधिकच खुलून येत होता.(आता चष्मा घातला तरी लग्न केल्याच्या बावळटपणाची खंत चेहऱ्यावरून लपविली जात नाही हा भाग वेगळा).चष्मा हरवणे ही आपल्याच एखाद्या चुकीसाठी नियतीने केलेली एक तात्कालिक शिक्षा असते असे मानावे आणि शांत राहावे. किल्ली हरवण्यावर जालीम उपाय म्हणजे चोरांपासून ते आप्तेष्टांपर्यंत प्रत्येकाजवळ डुप्लीकेट किल्ली देऊन ठेवावी. अन्यथा सरळ शनी शिंगणापूरला स्थायिक व्हावे.
वरकरणी किरकोळ वाटणारे हे प्रश्न किती सतावतात हे ज्याचे त्यालाच कळते. त्यामुळे दुत्त दुत्त मिपाकरांनो गरजूंची मदत करा.
प्रतिक्रिया
9 Dec 2016 - 2:16 pm | ज्योति अळवणी
नवीन दालन कशाला? तुम्ही अधून मधून धागा काढा की. बास झालं
9 Dec 2016 - 6:01 pm | रातराणी
हा हा ! भारी :)
9 Dec 2016 - 6:47 pm | संदीप डांगे
पासवर्डः पासवर्ड्स चा एक सेट करावा व आलटुन पालटून तेच पासवर्ड वापरावे. किमान पाच पासवर्डचा सेट जे एकमेकांपासून प्रचंड भिन्न असतील असे. नावडत्या गोष्टींचा पासवर्ड बनवण्यासाठी उपयोग करावा. लक्षात राहतो व चोरी जाण्याचा संभव कमी. जुन्या हरवलेल्या नात्यांच्या नावाचा पासवर्ड बनवणे रिस्की असू शकते ह्याची काळजी घ्यावी.
सेशन एक्स्पायर: वायफाय, रेन्ज असलेल्या ठिकाणी राहावे, सतत मोबाइल नवीन अत्याधुनिक घ्यावा =))