अमेरिकेतून भारतात परत आल्याला आता ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. इथे येतानाच मनाशी काही गोष्टी ठरवल्या होत्या. ज्या गोष्टी करून फक्त मराठी मंडळातून कौतुक होत होतं .. त्या गोष्टी प्रत्यक्ष मराठी भूमीत राहून करायच्या होत्या. ते म्हणजे लेखन.
नावावर १ पुस्तक, २ ओडिओ अल्बम इतकच काय ते होतं! जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली तेव्हा.. पटकथा लेखन कशाशी खातात हेही माहिती नव्हतं. अर्थात आत्ताही पूर्ण माहिती आहे असा दावा मी करत नाहीच. पण हळू हळू काम करत असताना , एक लक्षात आलं कथेचा गाभा प्रचंड भरीव असणं गरजेच आहे. आणि कथा बीज जर कमकुवत असेल तर पटकथा अतिशय बांधीव असणं फार महत्वाच असतं. अन्यथा त्यावर मालिका उभी राहूच शकत नाही.
जेव्हा एखादी कथा .. म्हणजेच मूळ संकल्पना मनात येते.. त्यावेळी ती फक्त एक वन लाईन स्टोरी असते. उदाहरण द्यायचं झालं तर, एक विधवा आणि एक विधुर .. लग्न करतात.. पण त्यांची मुले एकमेकासोबत व्यवस्थित राहू शकतील का? एकमेकाला समजून घेतील का? मुख्य म्हणजे एकमेकाला भाऊ बहिण मानून राहतील का? .. हि फक्त संकल्पना! या संकल्पने ला एका कथे मध्ये गुंफायच.. मग ते करत असताना मूळ कथानक कुठेही भरकटणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये इतरही पात्र घालावी लागतात. त्या पत्राची प्रत्येकाची एक अशी वेगळी छोटीशी कथा असावी लागते. आणि ती कथा मूळ कथेत कुठेही ढवळाढवळ करणार नाही याची काळजी घ्यावी लागते. असे सगळे मिळून त्या कथेचा.. म्हणजेच broad स्टोरी चा arc तयार होतो. आणि मग त्या broad स्टोरी चे, भाग पाडावे लागतात. महिन्या नुसार! पहिल्या महिन्यात स्टोरी प्रोग्रेशन कसे असेल.. दुसऱ्या महिन्यात कसे असेल.. असे करत करत साधारण ६ महिन्या पर्यंत स्टोरी प्रोग्रेशन आपल्याला दाखवता आले तर channel आपली कथा ऐकते.. अन्यथा कचरा पेटी!
६ महिन्याचे स्टोरी प्रोग्रेशन झाल्यावर, महिन्यानुसार.. जी कथा त्या महिन्यात घडणार आहे.. त्याचे आठवड्यानुसार भाग पाडावे लागतात. पहिल्या आठवड्यात नेमके काय घडेल, दुसऱ्या आठवड्यात नेमके काय घडेल.. असे माईल्स स्टोन्स टाकावे लागतात.. आणि मग एकदा आठवड्याची कथा नक्की झाली.. कि, मग त्याचा स्क्रीन प्ले.. म्हणजेच पटकथा! पटकथा लिहिण्यापूर्वी त्याचा line up नक्की करावा लागतो. तो channel ने aprove केला कि मग त्याप्रमाणे त्याची पटकथा फुलवावी लागते. पटकथा लिहिल्या नंतर त्या मध्ये कुठेच विस्कळीतपणा असता कामा नये. पटकथा लेखाकाने शूटिंग चा सेट पाहून येणे गरजेचे असते. कारण, सेट प्रमाणे पात्रांच्या हालचाली लिहाव्या लागतात.. पटकथा जितकी बांधीव, तितके दिग्दर्शकाचे काम सोपे होते. त्याला पात्रांच्या हालचालींवर जास्ती वेळ घालवावा लागत नाही. प्रत्येक पात्राचा स्वभाव, वागणे.. किंबहुना त्या पात्राचा एकूणच मालिकेतला वावर हा त्याच्या पहिल्याच सीन मध्ये लोकांना समजायला हवा! एखादी आजी प्रेमळ आहे, कि ती खाष्ट आहे.. एखादे वडील, प्रचंड कडक शिस्तीचे आहेत , कि फ्रेंडली आहेत.. हिरोईन धाडसी आहे.. प्रेमळ आहे.. हे तिच्या पहिल्या सीन मध्येच लोकांना समजायला हवं! म्हणजे प्रेक्षकांचा तसा माइंड सेट होउन जातो.. त्यामुळे एखादे पात्र हे अमुक एका सिच्युएशन मध्ये असेच वागणार हे प्रेक्षकाना आधीच समजलेले असले कि, मग धक्का तंत्र वापरता येते. ज्याला पटकथेच्या भाषेत U टर्न किंवा shock treatment म्हणतात.
पटकथा लेखन झाल्या नंतर पुढचा टप्पा असतो संवाद लेखनाचा! पटकथा लेखकाने एखादे पात्र जर अतिशय फटकळ, माजोरडे लिहिले असेल तर त्याला अनुसरून संवाद लेखकाने संवाद लिहायचे. म्हणजे.. ते पात्र त्याच्या संवादातून तसे वाटयाला हवे.
सगळ्यात महत्वाचा भाग असा, कि.. घडणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या जीवनाशी सबंधित आहेत असे प्रत्येक प्रेक्षकाला वाटले तर ती सिरीयल यशस्वी होते. कथे मध्ये येणारी पात्रे हे शक्यतो कथेच्या शेवटापर्यंत न्यावी असा एक नियम असतो.. याच कारण त्या पात्रांशी प्रेक्षक कनेक्टेड झालेले असतात. त्यामुळे ते पत्र उभं करतानाच त्याची स्ट्रेंग्थ , विकनेसेस मांडावे लागतात. “हम आपके ही कौन..” सारखा चित्रपट कथा बीज अतिशय कमकुवत असतानाही फक्त पटकथेच्या आधारावर कित्येक कोटी चा व्यवसाय करू शकतो. लोकांना आवडू शकतो. सगळं गुडीगुडी चालू आहे.. आणि अचानक अपघात होतो आणि कोणी तरी मरतं! या दोन ओळींमध्ये कथा संपते.. पण गुडी गुडी म्हणजे नेमकं काय चालू आहे.. हे दाखवायला पटकथा लिहावी लागते.. सगळे आनंदात कसे आहेत हे दाखवण्यासाठी सीन क्राफ्ट करावे लागतात. आणि ते सीन त्या त्या उभ्या केलेल्या पात्रांच्या स्वभावाला पूरकच असावे लागतात.
एखाद पात्र फुलवताना, त्याच्या पाच गोष्टी सगळ्यात आधी शोधून काढायच्या.. ज्या कथेमध्ये आपल्याला वापरता येतील. म्हणजे त्या पत्राचा स्वभाव, खंत, इच्छा, विक पोइन्ट, आणि सगळ्यात म्हणजे कोणत्या गोष्टीने ते पात्र आनंदी होतं! म्हणजे जर ते पत्र खलनायकी असेल.. तर , त्याचा स्वभाव वाईट म्हणजे नेमका असा आहे.. म्हणजे, सासू सारखा आहे, कि राजकारण्या सारखा! कोणत्या पातळी पर्यंत ते पात्र वाईट वागू शकतं? म्हणजे खून करण्यापर्यंत कि, फक्त कुचाळक्या करण्या पर्यंतच!
जर ते पत्र चांगलं असेल.. तर स्वभाव हळवा आहे, सोशिक आहे.. कि संयमी आहे.! मालिकेतली सगळी पत्र रंगवताना, त्यांना उभे करताना या प्रत्येक बाजूचा विचार करावा लागतो.
पटकथा लेखनामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते सिन्स सुचणे. सिन्स सुचण्यासाठी आजूबाजूला घडणाऱ्या घटना , आजूबाजूला वावराणारी माणसे त्यांच्या लकबी, त्यांच्या बोलण्याच्या सवयी.. हे सगळे निरिक्षण असावे लागते. तेव्हा त्या गोष्टी पात्रे उभी करताना उपयोगी पडतात. खूपदा असे होते. कि आपण आपल्या too the best एपिसोड लिहितो. तो channel कडून aprove होतो. तो production ला जातो आणि अचानक एखादा कलाकार आजारी पडतो.. शूट ला येऊ शकत नाही. किंवा त्याचा अपघात होतो.. दवाखान्यात admit होतो. अशा वेळी फोन येतो आणि सांगितलं जातं कि, आज “काका” नाहीये.. आणि पुढचे ४-५ एपिसोड्स तरी नसेल.. अशा वेळी पटकथा लेखाकाची परिक्षा असते. एक तर “काका” त्या एपिसोड च्या कथेमध्ये फार काही contribute करत नसेल तर त्याच्याशिवाय एपिसोड होऊ शकतो.. पण काही महत्वाचा भाव असेल तर एक तर ती कथा पुढे सरकवावी लागते आणि मध्येच ३-४ एपिसोड्स पुरती छोटीशी उपकथा घालावी लागते. ती उपकथा सुद्धा तेवढ्याच एपिसोड्स मध्ये संपेल.. आणि मूळ कथेला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आणि मुख्य म्हणजे त्या कथेमुळे रेटिंग खाली जाणार नाही हे बघावं लागतं! कारण सगळा खेळ इथेही आकड्यांचा असतो. प्रत्येक एपिसोड मध्ये काहीतरी घटना घडली पाहिजे.. ज्याच्या आजूबाजूला पूर्ण एपिसोड फिरला पाहिजे.
खूपदा बजेट कोलमडतं! एकाच दिवशी बऱ्याच कलाकाराना सेट वर शूट ला बोलावणे शक्य नसते.. त्यामुळे प्रोडुसर च्या बजेट नुसार सिन्स लिहावे लागतात. एका सीन मध्ये ३-४ कलाकार ! पण लग्न, साखरपुडा अशा सारख्या सिन्स साठी बरेच कलाकार लागता त्यामुळे.. त्याच प्लानिंग किमान महिनाभर आधी production देणे गरजेचे असते. कधी एखादा कलाकार दुसरी सिरीयल मिळाली म्हणून हि सोडून जातो. अशा वेळी.. त्याची एक्झिट logically व्हावी लागते. मग एकतर त्याला परदेशी पाठवले जाते.. किंवा ठार मारले जाते. अशा घटनांमुळे मूळ कथा काही भाग पुढे ढकलली जाते.. एखाद्या उपकथानकात बदल केला जातो. एखाद पत्र जर मेलं तर साधारण त्याच स्वभावाचं दुसरं एखादं पत्र घालावं लागतं. पण त्याची एन्ट्री सुद्धा grand असावी लागते. किंवा कधी कधी पात्र तेच राहत पण कलाकार बदलतो.. तेव्हाही नव्या कलाकाराच्या एन्ट्री साठी वेगळा भाग लिहावा लागतो. तरच लोकांच्या पचनी नवीन पात्रे पडतात.
गोष्टी शक्यतो अपूर्ण न ठेवणं .. हा एक महत्वाचा मुद्दा असतो. जी घडी उकलतो.. तिची पुन्हा नीट घडी घालून ठेवता आली पाहिजे. नुसत्या घड्याच उलगडत गेलो तर शेवटी चोंबाळा होतो. “रात्रीस खेळ चाले” हे त्याचे उत्तम उदाहरण! त्याचा शेवट जो केला तो अतिशय विचित्र केला. तो शेवट कुठल्याच पत्राला नीट न्याय देऊ शकला नाही. डोंगर पोखरून उंदीर काढला! अशी गत झाली. असो..
प्रीतीपारी तुजवरी .. जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा तिचे ३० भाग झालेले होते आणि काहीतरी नवीन करायचं आहे, असं सांगितलं होतं. आम्ही प्रीतीला जुळी बहिण आणली.. परी! जी प्रीतीच्या बरोब्बर उलट स्वभावाची.. धाडसी.. ! मग परी आल्यावर तिला एक हिरो आला.. त्या हिरोची family आली. एक खलनायिका आली. प्रीती परीची अपघाताने आदलाबदल होते आणि प्रीती परीच्या घरी जाते.. तिची स्मृती जाते. आणि त्या हिरोच्या प्रेमात पडते. तिला आपले नाव परीच वाटू लागते. आणि जेव्हा प्रीती परीला सामोरा समोर आणायचे ठरले तेव्हा ती भेट grand असणे गरजेचे होते. प्रीती जिची स्मृती गेली आहे.. तिला ते कसे आठवेल.. आणि यासाठी नेहमीच्या पठडीतली कथा न करता काहीतरी twist आणावा असे ठरले. आणि आम्ही प्रीती परीची भेट .. प्रीतीच्या ऑफिस मध्ये, काचेच्या दरवाज्याच्या अल्याड पल्याड घडवून आणली.. आणि त्या नंतर प्रीतीचे परीला घाबरून पळून जाणे.. तिला टाळणे.. ! या एका मुद्द्यावर मी जवळ जवळ १० एपिसोड्स खेळले होते. या मालिकेच रेटिंग वाढलं.. तसा माझा आत्मविश्वासही! त्या वेळच writer of the month च award मला स्टार प्रवाह कडून मिळालं. प्रीती परी.. चे जवळ जवळ २७५ भाग केले.. आणि कुठेतरी प्राजक्ता पटवर्धन हे नाव सिरीयल च्या titles मध्ये झळकू लागले. हि सिरीयल जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं.
सगळ्यात पहिली जी केली.. ती म्हणजे “असावा सुंदर स्वप्नांचा बंगला” पण तेव्हा खूप चुका करायचे. अर्थात आत्ता होत नाही असं नाही. पण प्रमाण मात्र नक्की कमी झाले आहे. असे करत करत आज पर्यंत पाच सिरियल्स नावावर लागल्या आहेत, हीच मिळकत.
जाता जाता.. , बरीचशी मंडळी.. (यात पुरुष महिला सगळेच आले) या सगळ्या डेलीसोप्स नावे ठेवताना दिसतात.. किंबहुना कसल्या रडक्या सिरियल्स बघता असे घराच्या बायकांना किंवा जे कोणी बघतात त्यांना, म्हणताना दिसतात.. पण हे हि तितकेच खरे कि.. हि मंडळी आपण होउन सिरीयल लावत नसले तरी समोर चालू असेल तर मात्र डोळ्याची पापणीही न हलवता बघत बसतात. हेच डेलीसोप्स च्या writers च यश म्हणावं लागेल.
मेहनत खूप आहे.. अर्थात ती कुठे नसते..! पण एकदा पटकथा लेखनात शिरलं कि मग स्काय इज द लिमिट!
- प्राजू
प्रतिक्रिया
4 Dec 2016 - 6:16 pm | रेवती
लेखन आवडलं. नव्या संधीतून खूप शिकायला मिळाल्याचे जाणवते आहे. अभिनंदन प्राजु.
4 Dec 2016 - 6:24 pm | यशोधरा
कोणत्या कोणत्या सीरीजसाठी लिहिलंस? विचारते घरी बघतायत का त्या शिरेली.
4 Dec 2016 - 6:47 pm | स्वीट टॉकर
खूपच नवी माहिती मिळाली. सीरियल्ससाठी इतकं लिहायचं असताना देखील मिपावर लिहायला वेळ काढलात हे कौतुकाचंच आहे.
7 Dec 2016 - 11:26 am | बाजीप्रभू
+11
4 Dec 2016 - 7:08 pm | कंजूस
खास लेखन।
स्वत: डेली सोप पाहात नाही तरी लेखनाची प्रक्रिया काय असते हे मात्र वाचायला फार आवडले.गदिमांच्या चरित्रात शेवटी पटकथा लेखनाविषयी वाचलेले होते.त्यांनी लिहिलेली पटकथा दिग्दर्शकाने शांतपणे वाचली आणि बोलले " अण्णा, नायिका किती सुंदर दिसते ते क्याम्रा दाखवेल. तुम्ही फक्त घटना आणि संवाद लिहा."
4 Dec 2016 - 7:18 pm | आदूबाळ
जबरदस्त!
एक प्रश्न विचारू का? मराठीत इतक्या उत्तमोत्तम कथा-कादंबऱ्या आहेत, त्यावर आधारित मालिकांची संख्या इतकी कमी का असते?
5 Dec 2016 - 9:28 am | ज्ञानोबाचे पैजार
हा मला देखिल आदिम काळापासून पडलेला प्रश्ण आहे. मराठीतच नाही तर एकंदरच कोणत्याही भाषेतल्या बर्याचशा मालिका नावाजलेल्या साहित्यकृतिंवर आधारलेल्या नसतात. या बाबतीत एकंदर सर्व टीव्ही व्यावसायिकांची काहीतरी मोठी समस्या असावी. (अर्थात माझे या क्षेत्रातले ज्ञान अत्यंत मर्यादीत आहे हे मला मान्य आहे)
आपला अनुभव वाचायला आवडला. धन्यवाद.
पैजारबुवा,
7 Dec 2016 - 9:59 am | थॉर माणूस
मराठीमधे खरंच उत्तमोत्तम कथा-कादंबर्या आहेत, त्यावर आधारीत "डेली सोप" मालिका शक्यतो काढत नसल्याबद्दल डेली सोप वाल्यांचे शतशः आभार मानावेसे वाटतात.
7 Dec 2016 - 10:22 am | अनुप ढेरे
आबा, या असल्या मालिकांचे जे प्रेक्षक असतात त्यांना चांगल्या कंंटेंटची अपेक्षा असते असं का वाटतं तुम्हाला?
4 Dec 2016 - 8:09 pm | कंजूस
याचंही उत्तर गदिमांनी दिलय.
4 Dec 2016 - 8:27 pm | पैसा
सुरेख नेटके लिखाण.
4 Dec 2016 - 8:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
एका २४ X ७ डोळ्यासमोर असलेल्या माध्यमाच्या मागच्या, डोळ्याआड असलेल्या, प्रक्रियेची सुंदर ओळख !
एक मिपाकर या क्षेत्रात आपले खास स्थान बनवून आहे हे वाचून मिपाकर म्हणून अभिमान वाटला !
पुढच्या अधिक यशस्वी वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा !!!
4 Dec 2016 - 11:43 pm | प्राजु
मनापासून आभार!
5 Dec 2016 - 11:22 am | भाते
छान लिहिलंय.
कथेची पटकथा लिहित असताना त्यात अजिबात काहीच संवाद नसतात का? प्रत्येक वेळी पटकथा आणि संवाद लेखक/ लेखिका वेगळे असतात का? का पटकथेत लिहिलेल्या संवादात गरजेनुसार संवाद लेखक/ लेखिका बदल करतात?
अवांतर - मिपावर असे मोजके चांगले लेख येत असल्यामुळें इतर ढीगभर फालतु धाग्यांकडे दुर्लक्ष करून मिपावर पुन्हा पुन्हा यावेसे वाटते.
7 Dec 2016 - 1:42 am | सही रे सई
कथेची पटकथा लिहित असताना त्यात अजिबात काहीच संवाद नसतात का? प्रत्येक वेळी पटकथा आणि संवाद लेखक/ लेखिका वेगळे असतात का? का पटकथेत लिहिलेल्या संवादात गरजेनुसार संवाद लेखक/ लेखिका बदल करतात?
मला पण हाच प्रश्न पडला आहे .
5 Dec 2016 - 12:50 pm | आनन्दा
मस्तच.
5 Dec 2016 - 12:51 pm | आनन्दा
तुमच्याकडे टीममध्ये सहभागी होण्यासाठी काही निकष असतात का हो?
5 Dec 2016 - 1:10 pm | पाटीलभाऊ
आवडलं.
5 Dec 2016 - 1:50 pm | रातराणी
छान, प्रेरणादायक प्रवास!
5 Dec 2016 - 4:03 pm | मृत्युन्जय
अभिनंदन
असावा सुंदर स्वप्नांचा बंगला ही सिरीयल काही काळ कंपल्सरी ऐकायला लागली आहे. आता त्या सिरीयलसाठी कुणाला शिव्या द्यायच्या ते कळाले ;)
असो. एखाद्या सिरीयलची पटकथा लिहिणे किती जिकीरीचे काम असु शकते हे लक्षात आले. त्यामुळे एक डाव माफी देउन टाकतो. :)
8 Dec 2016 - 9:03 pm | असंका
:=)) =))
5 Dec 2016 - 4:20 pm | वरुण मोहिते
ह्या वर @ एनी कॉस्ट नावाचं अभिराम भडकमकर यांचा पुस्तक आहे .
बाकी आपल्या कामाबद्दल शुभेच्छा .
7 Dec 2016 - 11:58 am | कपिलमुनी
इथे पण भडकमकर मास्तर होते ते आठवले
7 Dec 2016 - 3:15 am | जयन्त बा शिम्पि
खरं सांगतो, हा लेख वाचेपर्यंत माझा, चित्रपटाची मूळ कथा कशाला म्हणतात आणि पट्कथा कशाला म्हणतात ह्याबाबत गोंधळच होता. आपल्या लेखामुळे बरेच काही,अगदी १०० टक्के जरी नाही, समजले.(' थोडा है,थोडेकी जरुरत है').माझ्या समजूतीनुसार विंग्लिश मध्ये 'Story' and ' Screenplay ' जो फरक असतो , तोच आपल्या लेखात समजावून सांगितला आहे ना ? अधिक खुलासा करावा. माहितीपुर्ण लेखाबद्द्ल मनापासून धन्यवाद.
7 Dec 2016 - 9:52 am | mayu4u
स्वतः सिरीयल्स बघत नाही. मात्र त्यांच्या या महत्वाच्या प्रक्रिये विषयी मौलिक माहिती... आवडेश!
7 Dec 2016 - 10:04 am | थॉर माणूस
निव्वळ वाहिनी आणि निर्मात्यांवरची डिपेंडन्सी आणि डेडलाईन्स चे प्रेशर या कारणास्तव मी डेली सोपच्या लेखकांना शिव्या घालणे टाळतो. त्यांना बोल लावणे म्हणजे दुधवाल्याकडे कामाला असणार्या माणसाला दुधात पाणी जास्त असल्याबद्दल ओरडण्यासारखे आहे. ह्याला पगार मिळतो म्हटल्यावर हा मालक सांगेल तेवढे पाणी घालणार, तुम्ही ह्याला ओरडून काही फायदा नाही आणि मालकापर्यंत पोहोचून शिव्या घालायला वेळ/पोहोच नाही. :)
7 Dec 2016 - 10:32 am | आनन्दा
उपमा भारीच आहे.
7 Dec 2016 - 11:46 am | एस
अगदी बरोबर.
7 Dec 2016 - 11:11 am | अजया
मालिकेची लेखन प्रोसेस इतकी सुसंगत पहिल्यांदाच वाचण्यात आली.
तुमच्याकडून मिपावर अजून वाचायला मिळावे अशी एक हावरट इच्छा आहे!
7 Dec 2016 - 11:29 am | बाजीप्रभू
पडद्या मागच्या सूत्रधाराचे मनोगत वाचायला आवडले. खूप नवीन माहिती मिळाली आज.
7 Dec 2016 - 1:26 pm | बाजीप्रभू
दुसऱ्या कोण कोणत्या सिरियल्स लिहिल्या आहेत प्राजु ताई?... म्हणजे निदान त्या तरी आवडीने बघू. आपलं पोट्ट कसंही खेळलं तरी आवडतंच असा अनुभव आहे.
8 Dec 2016 - 12:11 am | संदीप चित्रे
अमेरिकेतून भारतात परतल्यावर करियर पुन्हा जोरदार सरू केलेल्या माझ्या माहितीतल्या दोघीजणी!
रच्याकने -- माधुरी मला माहितीये पण तिला मी माहिती नाही. :)
8 Dec 2016 - 7:42 pm | टवाळ कार्टा
अमेरिकेतून आल्यावर आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला मिळाले याबद्दल अभिनंदन...पण डेलिसोप भिकार असतात हे सत्य आहे (यात डेलिसोप बनवण्यासाठी केल्या जाणार्या श्रमांना कमी लेखण्याचा अज्जिबात हेतू नाही)
8 Dec 2016 - 8:04 pm | कपिलमुनी
डेलिसोप भिकार असतात हे सत्य आहे !
रोज एक लेख लिहायला सांगितला तर कितीशी क्वाविल्टी असेल ?
आपल्याकडे सीझन्स सुरू होत नाहीत तोवर हे सुधारणार नाही.
8 Dec 2016 - 8:39 pm | अनुप ढेरे
मेबी. पण या मलिकांचे प्रेक्षक कोण आहेत त्यावर ठरते क्वालिटी. लोक काय वाटेल ते बघतात टीव्हीवर नेहेमीच्या वेळेला आहे म्हणून. त्यांना क्वालिटीबद्दल काहीही पडलेलं नसतं. फार कष्ट न करता हक्काचे प्रेक्षक मिळत असतील तर चॅनेलवाले का पैसा वाया घालवतील चांगल्या गोष्टीसाठी.
हे थोडसं सिगारेट सारखं आहे. थोडे दिवसांनी सिगारेट ओढून काहीही मिळत नाही. केवळ सवय म्हणून ओढली जाते. इथेही सिरियलमधून काहीही मिळत नाही. केवळ सवय म्हणून बघितली जाते.
10 Dec 2016 - 11:43 am | प्राजु
आपापली मते! डेलिसोप चांगला की वाईट हा मुद्दा नाहीच. कारण कोणी चांगलं म्हणून तो चांगला होत नाही आणि वाईट म्हणून वाईट अथवा टुकारही होत नाही. हा पूर्णपणे कल्पनाशक्तीचा आणि प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचा भाग आहे. ज्याला जमलं तो राजा!
असे! आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार!
11 Dec 2016 - 10:47 am | अफगाण जलेबी
माझा नवराही एकेकाळी याच क्षेत्रात होता. तो तर सहाय्यक दिग्दर्शक होता आणि साईड बाय साईड लेखन करायचा. त्याच्याकडून ही सगळी सव्यापसव्यं ऐकलेली आहेत. त्यांचा पुनःप्रत्यय आला.