प्रत्येकाच्या जीवनात असते, एक चंद्राची कोर,
हृदयाच्या कोपर्यात दडते ती, जणु निरागस पोर ।
कधी नटखट कधी चंचल, कधी लाजाळूचे पान,
तिच्या गालाच्या खळीपुढे, हरपते मनाचे भान ।
हृदय चोरून नेते ती, जाणते मनाचे बोल,
ती आहे माझ्यासाठी, चांदणे अनमोल ।
भारावून टाकते मनास, तिची नखरेल अदा,
तिच्या मनमोहक रूपापुढे झाला, माझा जीव फिदा ।
स्वप्नातील ती परी आता, बनली आहे मनाची आस,
सतत तिचेच विचार असतात, सतत तिचाच लागे ध्यास ।
विचारांच्या या सानुल्या विश्वात ती, जाते मोरपीस फिरवून,
तिच्या त्या कटारी नैनडोहात, माझे डोळे जातात हरवून ।
तिचा मंजुळ आवाज माझ्या, हृदयाला जाऊन छेडतो,
तिचा लाजाळू चेहरा मला, आणखी प्रेमात पाडतो ।
तिच्या मंदहास्यापुढे चुकतो, माझ्या हृदयाचा ठोका,
तिचे ते गोजिरे रूप जणु, नभतारा अनोखा ।
हृदयातील ती अपसरा नेहमी, माझ्या स्वप्नात येते,
हसरी लाजरी चंद्राची कोर ती, मनास भुलवूनी जाते ।
अशी ही चंद्राची कोर, प्रत्येकाच्या जीवनात असते,
कधी हृदयाच्या कोपर्यात दडते, तर कधी स्वप्नात येउन अलगद हसते ।