उंबरठा!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
23 Oct 2016 - 9:32 pm

उंबरठा!
गंजल्या ओठांस माझ्या, धार वज्राची मिळूदे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे ...
चांगला सिनेमा कोणता ? मनोरंजन हाच एक निकष मानला तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो. तसा तो खिडकीवर मोठा गल्ला जमा करून सिद्ध करत असतोच आणि याच कारणावरून बहुसंख्य सिने-निर्माते अशाच प्रकारचे सिनेमे बनवत असतात . पण म्हणून अशा सिनेमांना आपण हिट सिनेमे म्हणतो, चांगले म्हणतोच असे नाही. चांगला सिनेमा हिट असो नसो एक गोष्ट खरी कि त्याने उत्तम मनोरंजन केलेच पाहिजे. पण मला असं वाटतं कि तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही तो सिनेमा संपवून थेटरातून बाहेर पडताना सिनेमा डोक्यात घेऊन बाहेर पडला पाहिजेत. सिनेमा चांगला कॉमेडी असेल तर नंतर बराच वेळ त्यातल्या गोष्टी आठवून मनातल्यामनात हसू फुटलं पाहिजे. किंवा मर्डर मिस्टरी असेल तर नंतर आपण गुन्ह्याचे धागे दोरे जुळवत बसलो पाहिजे उदाहरणार्थ गुलझारचा अंगूर हा (संजीव कुमार, देवेन वर्मा ने काम केलेला) किंवा "अंदाज अपना अपना"(आमिर खान, सलमान खान चा) हे असे चांगले कॉमेडी सिनेमे होते . तसाच नुकताच येउन गेलेला "दृश्यम " हा असाच उत्तम मर्डर मिस्टरी होता.
श्वास या चित्रपटानंतर मराठी सिनेमा ने कात टाकली आणि एक सो एक दर्जेदार आणि चांगले सिनेमे मराठीमध्ये येऊ लागले(आता दुनियादारी किंवा मितवा सारखे भिकार सिनेमे आणि त्याहून भिकार तो स्वप्नील जोशी किंवा ती सई अन कोण ती उर्मिला कानिटकर यां सारख्या लोकांचे सिनेमे हि चालतात म्हणे पण काय आहे, लोकांची अभिरुची आपण नाही ठरवू शकत आणि जनतेला चांगले सिनेमे बनवून दाखवले तर ती पाहते हे देऊळ,बालक पालक , शाळा, रेगे अशा सिनेमांवरून हेच सिद्ध होते. मधल्या काळात म्हणजे साधारण ८० व ९० च्या दशकात लक्ष्या, सचिन आणि महेश कोठारे यांनी मराठी सिनेमा आणि त्यात जे काही चांगलं होतं त्याचा निर्घृण खून केला. महेश कोठारे तर आता

मराठी TV SERIALS च्या मागे लागला, तुम्ही बघत असालच ती जय मल्हार सीरिअल. हि देवावरची सेरिअल आहे कि दोन बायका फजिती ऐका नावाचा तमाशा आहे कळतच नाही.
सचिन नावाचा ठोकळा कुणावरून ओवाळून टाकला आहे कुणास ठाऊक ? १० दिवस पाण्यात राहिलेल्या गोट्या वर शेवाळ जमते पण इतकी वर्षं इंडस्ट्री त राहुन कोरडा ठाक राहिलेला हा दगड आहे. काही ठिकाणी मनोजकुमार ने अक्टिंग केल्याचा मला भास झाला होता आणि चक्क राजेंद्र कुमार ने धूल का फुल मध्ये बरं काम केलं होतं पण 'हा माझा मार्ग एकला' ह्या पहिल्या सिनेमा नंतर त्याने कधी कुठे अभिनय केल्याचा प्रयत्न केल्याचा सुद्धा आरोप त्याच्यावर करता येणार नाही. राहता राहिला लक्ष्या, पण काय आहे मेलेल्या माणसाबद्दल फार त्वेषाने बोलणे आपण सुसंस्कृतपणाचे मानत नाही म्हणून हा विषय पुरे)
आता श्वास च्या आधी, खरं म्हणजे खूप आधी आलेला उंबरठा हा सिनेमा घ्या. हा माझ्या मते मराठीतल्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. म्हणजे हा तसा चांगलाच गंभीर सिनेमा आहे आणि बऱ्याचदा असे सिनेमे पाहून आलं कि आपण एक मोठं समाजकार्य केल्याच्या भावनेन भारलेले असतो. म्हणजे बघाना आपला मराठी सिनेमा आहे, आपण नाही पाहणार तर कोण पाहणार आणि आताच नाही पहिला तर नंतर कुठून पाहायला मिळणार , कोण दाखवणार ?( देव आनंदचे १९८० नंतरचे सिनेमे पाहताना तर हीच एक भावना माझ्या मनात असायची, पण ते एक असो) पण या सिनेमाचं तसं नाही . हा खरोखरच चांगला सिनेमा आहे. हि कथा सुलभा महाजन नावाच्या सुखवस्तू स्त्री भोवती फ़िरते. तशी बाई शिकली सवरलेली, चांगल्या सुखवस्तू (आम्ही पुणेकर दुसरे श्रीमंत असले कि त्यांना सुखवस्तू म्हणतो)घरातली, एक गोड मुलगी, चांगला कमावता नवरा ( सध्यातरी ) बाहेर काही प्रकरण वगैरे नसलेला , मोठा दीर चांगला डॉक्टर , सासूबाई नावाजलेल्या सामाजिक कार्यकर्त्या, सासरे बुवा वारलेले, थोरली जाऊ प्रेमळ आणि निपुत्रिक त्यामुळे हिच्या एकुलत्या एका मुलीवर आई प्रमाणे किंचित आई पेक्षा जास्तच जीव -- थोडक्यात काय कश्शा कश्शाची कमतरता म्हणून नाही. पण साधे लोक म्हणतात तसं अशावेळी सुख दुखायला लागतं. सुलभाला काहीतरी करावं असं मनापासून वाटायला लागतं. तिच्याकडे असलेल्या समाजशास्त्राच्या पदवीच्या जोरावर तिला दूरच्या एका खेड्यातल्या सरकारी महिला सुधार गृहात अधिक्षिकेच्या जागेवर नेमणूक मिळते. घरचे सगळे काहीशा नाराजीनेच संमती(?) देतात, सासूबाई थांबवायचा एक बारकुसा प्रयत्न वगैरे करून पाहतात. पण ती जातेच.तिथे गेल्यावर सगळे काही इतर सरकारी संस्थाप्रमाणे गचाळ भोंगळ, भ्रष्टाचाराने बरबटलेले, अगदी होपलेस वाटावे असे वातावरण , त्यात तिचा संघर्ष ,संस्थाचालकांचा अमानवीय, तुसडा किंवा निष्काळजी दृष्टीकोण, अशा संस्थामध्ये होणारा गैरकारभार, तिथल्या आधीच समाजाकडून, सासरकडच्यांकडून नागवलेल्या गेलेल्या स्त्रियांचे होणारे शोषण, तिचा ह्या सगळ्यातून मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि बऱ्याचदा त्यात येणारं अपयश, ह्या सगळ्याच अत्यंत वास्तववादी आणि मन विषण्ण करणार चित्रण आहे. हे आज आपल्याला तसं काही नवीन नाही पण त्या काळी ते सनसनाटी होतं आणि जसं ते जब्बार पटेल यांनी दाखवलं आहे That is simply great. एक लहानसा प्रसंग घ्या ज्यात काही कामाने तिथे आलेला सुलभाचा नवरा (गिरीश कर्नाड) तिला भेटायला संस्थेमध्ये येतो तेव्हा सुलभाला झालेला आनंद, त्याला कुठे ठेवू अन कुठे नको असा फक्त नजरेतून दिसणारा भाव तर स्मिताच दाखवू जाणे पण आश्रमातल्या स्त्रियांना वाटणारी रेक्टर बाईच्या नवऱ्याला बघायची उत्सुकता आणि काहीशी असूया देखील ज्या बारकाईने जब्बार दाखवतात ते पाहून ते दिग्दर्शक म्हणून ग्रेट का आहेत ते कळतं. समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल/ शोषणाबद्दल प्रामाणिकपणे वाईट वाटणारे आणि त्याचं यथाशक्ती परिमार्जन करू इच्छिणारे स्त्री पुरुष काही कमी नाहीत पण अन्यायाच परिमार्जन आणि शोषितांचं पुनर्वसन करताना ते आपली पुरुषी मानसिकता सोडू शकत नाहीत. स्त्रिया सुद्धा या पुरुषी, पुरुषप्रधान मानसिकतेच्याच असतात. दया डोंगरे हे एक असं ढोबळ पात्र आहे पण नीट जर पहिलं तर लक्षात येईल कि या मानसिकतेने जखडलेले सगळेच आहेत अगदी सुलभा सुद्धा. कसं ते सांगतो. एक छोटा प्रसंग आहे ज्यात सुलभाचा वकील नवरा आपल्याकडची एक केस आपण कशी जिंकली हे सांगताना विरुद्ध बाजूच्या स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून आपण ती केस सहजगत्या जिंकली हे सांगतो, ते सुलभा ऐकून घेते पण त्यावर ती काही प्रतिक्रिया देत नाही , अगदी नजरेतून सुद्धा ती आपल्याला हे आवडलं नाही असं दाखवत नाही. आता हे दाखवणं स्मिताला जमलं नसेल ह्याच्यावर ब्रह्मदेवाने येऊन सांगितलं तरी मी विश्वास ठेवणार नाही. अन हीच सुलभा जेव्हा तिचा नवरा ती आपल्या जवळ नसताना केवळ शारीरिक गरज म्हणून आणि ती जवळ नसल्यामुळे एका दुसऱ्याच स्त्रीशी कसे संबंध ठेवले याची कबुली देतो, अगदी प्रामाणिक पणे,तेव्हा ती ते सहन करू शकत नाही. विवाहित स्त्रीच शरीर हि जशी नवऱ्याची खाजगी संपत्ती आहे असा पुरुषी मानसिकतेचा भाग आहे तसाच हक्क स्त्रीचा हि तिच्या नवऱ्याच्या शरीरावर असतो, असला पाहिजे हि मानसिकता मग काय आहे? मला माहित आहे कि अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा सहन करतात पण त्यात त्यांचा नाईलाजच जास्त असतो. ( एक क्षणासाठीही कुणी असं समजू नका कि मला विवाहबाह्य संबंध मान्य आहेत. योनीशुचिता किंवा अगदी पर्यायाने येणारी शिश्न शुचिता हा अशा वेळी सर्वच माणसांना एखाद्याचं चारित्र्य ठरवताना किंवा नातेसंबंधात एखादा महत्वाचा निर्णय घेताना निर्णायक भाग वाटतो एवढच मला नोंदवायचय.). सुलभाने असला एखादा मार्ग पत्करला असता तर तो कसा वागला असता हा प्रश्न विचारण्यात अर्थ नाही, उत्तर आपल्याला माहित आहे आणि तो (पात्राच नाव सुभाष आहे) तसा आहे याच आश्चर्य वाटायच कारण नाही. सर्वसाधारण पुरुष असेच असतात . गम्मत वाटते ती सुलभाची. ज्या कारणावरून ती स्वतःची मानखंडणा झाली असे मानून घराबाहेर पडते त्यापेक्षा गंभीर असं कारण सिनेमात आधीच आपल्याला पाहायला मिळतं पण ती घर सोडून बाहेर पडणं सोडा त्याला चार खडे बोल सुद्धा सुनावत नाही. तिला अशा प्रकारे केवळ एक क्षुल्लक केस जिंकण्यासाठी एका स्त्रीच्या चारीत्र्यावर तिच्याच नवऱ्याने उडवलेले शिंतोडे पुरेसे आक्षेपार्ह वाटत नाहीत हीच तर ती शोकांतिका आहे.चांगल्या पगाराची नोकरी, पैसा मानमरातब सोडून समाजकार्य किंवा आपल्या आवडीच्या क्षेत्रात उडी घेणारे पुरुष काही कमी नसतात. आपण सुद्धा त्यांच्याकडे कौतुक मिश्रित आश्चर्यानेच पाहतो पण वर सांगितल्याप्रमाणे, कश्शा कश्शाची कमतरता नसलेल्या, भरल्या घरातून(!) उठून आपल्या आवडीचं कार्यक्षेत्र निवडणाऱ्या स्त्रीकडे आपण काय म्हणून पाहू? जशी एखाद्या पुरुषाची आनंद, सुख, यशाची व्याख्या पैसाअडका, मानमरातब, पद, नसू शकते तशीच एखाद्या स्त्रीची आयुष्याच्या इतिकर्तव्यतेची कक्षा कुटुंब,नवरा, मूल यांच्या पलीकडे असू शकते हे किती जणांना कळेल, पटेल, मान्य होईल? एका पुरुषाने घालून दिलेली लक्ष्मण रेषा ओलाण्डली कि स्त्रीची कशी वाताहत होते हे आपण रामायणापासून पाहतोच आहोत कि.अशा स्त्रीची परवड रावण, राम वगैरे सोडा साधा धोबी सुद्धा करू शकतो, करतोच. स्त्रीने तिच्या घराचा , समाजाच्या बंधनाचा , रूढी परंपरांचा उंबरठा ओलांडून बाहेर पडलं कि उंबऱ्याच्या आतील जगाला ती पारखी होते असा एक ढोबळ समज वर वर पाहता हा चित्रपट पाहून आपला होतो पण हा उंबरठा स्त्रीच्याच मनाला हि पडलेला आहे तो ओलांडणं हे किती अवघड आहे हेच दाखवून तर चित्रपट संपतो . सुलभाची मुक्ती अशा प्रकारे अपूर्णच राहते. कमीत कमी एक उंबरठा तरी ती ओलांडू शकत नाहीच.
--आदित्य
https://www.youtube.com/watch?v=0V9g2UXzhnE

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

24 Oct 2016 - 9:39 am | महासंग्राम

नक्की काय म्हणयच आहे तुम्हाला ते समजलं नाही...
उंबरठा, सचिन, लक्ष्या, उर्मिला , महेश, देऊळ सगळ्यांची मटकी भेळ झालीये.

अनुप ढेरे's picture

24 Oct 2016 - 11:56 am | अनुप ढेरे

उंबरठा सिनेमा छान आहेच. पण लक्ष्या-महेश कोठारे-महागुरू यांना श्या घातलेल्या नाही आवडल्या. मनोरंजन एवढा प्रामाणिक हेतू ठेऊन केलेले त्यांचे चित्रपट अजूनही मजा देतात. टीव्हीवर लागले तर आवर्जून बघतो या कंपूचे सिनेमे.

मृत्युन्जय's picture

24 Oct 2016 - 12:15 pm | मृत्युन्जय

लक्ष्या हा माझ्या मते "भारतातला "एक उत्कृष्ट अभिनेता होता.ज्जेव्ह्या त्याच्या झोळीत चांगल्या भुमिकांचे सोने टाकले तेव्हा त्याने त्याच्या अभिनयाने त्या भूमिकांना हिर्‍यांचे कोंदण करुन दिले. एक चांगला अभिनेता जर तत्कालीन करंट्या दिद्गर्शकांच्या प्रतिभेच्या हलाखीपायी वाया गेला असेल तर ते अभिनेत्याचे अपयश असु शकत नाही.

सचिन हा एक सुमार अभिनेता असला तरी एक कल्पक दिग्दर्शक नक्कीच आहे. काही चित्रपटांमध्ये त्याने उत्तम अभिनय देखील केला आहे. एक व्यक्ती म्हणुन त्याने स्वतःचा जो उदोउदो चालवला आहे तो एक सुमार मार्केटींगचा नमुना म्हणावा लागेल. ती गोष्ट नक्कीच डोक्यात जाते. पण तरीही त्याने दिग्दर्शन केलेले गंमत जंमत सारखे चित्रपट आजही सामान्य प्र्क्षक आवडीने बघतो. अशी ही बनवाबनवी हा तर एक मास्टरपीस आहे. विनोदी चित्रपटांच्या रांगेत हा चित्रपट सर्वोत्तम ५ भारतीय चित्रपटांमध्ये एक नक्कीच गणला जावा.

महेश कोठारे ने एका ठराविक छापाचे चित्रपट बनवले. पण आजही झपाटलेला, थरथराट, धूमधडाका, धडाकेबाज, दे दणादण हे त्याचे आज कदाचित सुमार वाटणारे चित्रपट आपण बघतोच ना. आजही कुठल्याही चॅनेलवर धडाकेबाज किंवा थरथराट लागला तर मी बघतोच. मी कदाचित एक सामान्य वकुबाचा सुमार अभिन्यक्ती असलेला दर्शक असेन पण माझ्यासारखे बरेच आहेत.

त्यामुळेच उंबरठाचे माप उंचावताना इतरांवर उडवलेले शिंतोडे रुचले नाहित.

नाखु's picture

24 Oct 2016 - 12:21 pm | नाखु

सहमत

एकाला चांगलं म्हणताना दुसर्यावर दुगाण्या झाडल्याच पाहिजेत असं नाही.

हे म्हणहे सगळ्यांना माझ्या आव्डीची मिसळच आवडली पाहिजे असा अट्टाहास आहे.

बाकी चालू द्या...

जे बडे, नावाजलेले अभिनेते वगैरे असतात ना, ते दिग्दर्शकाचे अभिनेते असतात. लक्ष्या हा निर्मात्यांचा अभिनेता होता. केवळ माणुसकीसाठी त्याने कित्येक फडतूस चित्रपटांमध्ये कामे केली. तेव्हा तुमचे विधान जरा जास्तच कठोर आहे.