शिक्षण: धोरण, उद्दिष्ट आणि गफलती! भाग २

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
23 Oct 2016 - 9:29 pm

२. समाजाभिमुखता (सामाजिक उद्दिष्ट )
माणूस हा समुहात रमणारा प्राणी असल्यामुळे लहानपणापासून त्याचे सामाजिक शिक्षण सुरु झालेलेच असते. सामाजिक शिक्षण घेण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे समाजात मिसळणे, अधिकाधिक लोकांच्या संपर्कात येणे आणि लहान वयात हे शाळेत सगळ्यात उत्तम तऱ्हेने होते. शाळेतल्या वर्गात काय शिकवतात! हा वादाचा मुद्दा असू शकतो पण तिथे ४०-५० मुलांमध्ये, सदासर्वकाळ आपल्या पाठीशी असणाऱ्या आई वडिलांच्या छत्रछायेशिवाय स्वतःच्या हिम्मतीवर एखादे मूल इतर मुलांशी कसे वागायचे, बोलायचे हे स्वत: ठरवते, शिकते.. आपण लहान मुलांना कितीही निरागस, निष्पाप, देवाघरची फुले वगैरे वगैरे काही-बाही म्हटले तरी त्यांचे एकूण सामजिक आयुष्य चांगलच गुंतागुंतीचे आणि संघर्षमय(त्यांच्या करता) असते. त्यात मग मित्रत्व,शत्रुत्व, राजकारण, गटबाजी, आपल्या गोटातल्यांचे हितसंबंध सांभाळणे, दुसर्या गोटातल्या लोकांवर (पक्षी मुलांवर ) कुरघोडी करणे हे असले उद्योग फार चालतात. यातून काही जण पुढारीपण करताना आढळतात तर काहीजण उत्साही कार्यकर्ते असतात, तर काही(खरेतर बहुतांश) नुसते अनुयायी असतात.मी हे सगळे मोठे मोठे शब्द लहान मुलांच्या, आपल्या दृष्टीने नगण्य असलेल्या त्यांच्या क्रियाकलापांसाठी का वापरतो आहे? असा तुम्हाला प्रश्न पडेल, पण मुलांकरता ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आणि जोपर्यंत मोठी माणसं यात नाक खुपसायला येत नाहीत तो पर्यंत ह्या गोष्टी अशाच बिनबोभाट चालू असतात. जी मुलं लहानसहान गोष्टींच्या तक्रारी घेऊन शिक्षक किंवा आई वडिलांकडे जातात त्यांची एकंदर प्रतिष्ठा आणि मगदूर त्यांच्या गटातल्या मुलांमध्ये काय असतो हे आपण जरा माहिती काढून पहा किंवा आपले लहानपण आठवूनहि आपण हे सहज ठरवू शकतो. एवढच नाही तर जी मुलं असल्या गटबाजी पासून दूर असतात, ‘आपण बरे आपला अभ्यास बरा’ अशा विचारांची असतात, किंवा त्यांना तसे व्हायला भाग पडले जाते ( बहुधा त्यांच्या पालकाकडून आणि नंतर शिक्षकांकडून)त्यांची खरतर गोची झालेली आढळून येते. अशा मुलांना एकटे पडले जाते, अप्रिय ठरवले जाते, मग ती मुलं अधिकाधिक कोषात जातात. अशी मुलं नंतर एकलकोंडी, हेकेखोर, चार लोकाशी जुळवून घ्यायला नालायक, झालेली आढळतात. त्यांचा मित्रपरिवार हि मर्यादित आणि अगदी जुजबी संबंध ठेऊन असलेला आढळतो.अभ्यासात ती कदाचित हुशार असतात. त्यामुळेच शिक्षक आणि पालक त्यांच्या बाबतीत समाधानी असतात पण खरोखर त्या मुलांची प्रगती होत असते का? हा मोठा गंभीर आणि महत्वाचा प्रश्न आहे. ‘अशी मुलं संख्येने कमी असतात, पुढे आयुष्यात अनुभव आले कि सुधारतात’ अशा प्रकारच्या विचारांनी ह्या प्रश्नांचे समाधान व्हायचे नाही. जसा आजकाल मुलांचा IQ- Intelligence Quotient (बुद्ध्यांक) मोजून त्यांची हुशारी आपण ठरवतो तसाच मुलांचा EQ- Emotional Quotient ( भावनांक) हाही महत्वाचा असतो. बऱ्याच शाळांमध्ये(अर्थात खाजगी-इंग्रजी माध्यमाच्या जास्त करून) ह्याची जाणीव आजकाल होऊ लागली आहे आणि मुलांकरिता आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पालकांकरता समुपदेशकाची सोय ह्या शाळांमध्ये असते. आणखी एक, आपण हे सगळे आठवून पाहू आणि मग माझ्याशी बरेच जण सहमत होतील कि आपण शाळेत असताना वर्गातली जी ‘वाह्यात, होपलेस, ज्याचं काहीही होऊ शकत नाही, आयुष्यात ती काही करू शकणार नाहीत’ अशी शेलकी विशेषणं लावून कायम शिक्षकाकडून हिणवली गेलेली मुलं पुढे आयुष्यात जास्त यशस्वी झालेली दिसतात. हुशार मुलं अयशस्वी होतात असे नाही पण चांगले मार्क घेऊन उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी घेतात , नाही असे नाही पण हि नालायक मुलं अनेक वाटा चोखाळत, नाना उद्योग करत चांगलीच पुढे आलेली असतात. मी तर आमच्या वर्गातल्या हुशार क्याटेगीरीतल्या मुलाना अशा वाया गेलल्या मुलांच्या कंपनीत नोकरी अर्थात चांगल्या पगाराची करताना पहिले आहे. आता आम्ही देखील जिथे नोकरी करतो त्या कंपनीचा मालक त्याच्या वर्गातला हुशार मुलगा होता असे थोडेच असणार. असो...
ह्या बाबत आपण पालक लोक काय करू शकतो? तर मुख्य म्हणजे मुलांच्या ह्या छोटेखानी आयुष्यात उगाचच लुडबुड करणे, सतत अवाजवी हस्तक्षेप करणे सोडून देणे. हे अत्यंत महत्वाचे आहे तितकेच नाजूकही. मी हस्तक्षेप करणे सोडून द्या म्हणतो आहे दुर्लक्ष करा असे नाही. गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या किंवा काही गंभीर वळण घेऊ लागल्या कि आपण पालक म्हणून मध्ये पडणे कर्तव्यच आहे आणि त्यासाठी विवेक आणि संयम अंगी असावा लागतो. नसेल तर कमावून अंगी बाळगावा लागतो. शिवाय मुलाकरता वेळ द्यावा लागतो. शाळेतल्या, शिकवणीच्या मास्तरांवर भर टाकून निश्चिंत होणे उपयोगाचे नाही.ती एकतर पैशापासरी माणसं, ४०-५० पोरांची जबाबदारी डोक्यावर असलेली.
आणखी एक बाब म्हणजे बऱ्याचदा मूलच काहीतरी तक्रार घेऊन आपल्याकडे येते.आपल्याला हस्तक्षेप करायची गळ घालते.ते तर लहान मुलच असते आणि आपल्यावर सर्वच बाबतीत अवलंबून असते. आपण त्याचे आई बाप असतो.आणि इथे प्रॉब्लेमला सुरुवात होते.(हा प्रॉब्लेम आया आणि आज्यांच्या बाबतीत जास्त होतो,बाप आणि आजोबांच्या बाबत इतका जास्त होत नाही असे आमचे नम्र निरीक्षण आहे. माझा मुलगा किंवा मुलगी म्हणजे निरागस, सद्गुणांचा पुतळा- सगळे जग(म्हणजे शेजारी आणि त्यांची वाह्यात कार्टी) त्याला छळायचे एकमेव उद्दिष्ट घेऊन जन्माला आले आहेत. असा त्यांचा अभिनिवेश असतो.) त्यावेळी तक्रारीचे स्वरूप नीट समजून घेऊन, गरज नसेल तर हस्तक्षेपाला स्पष्ट नकार दिला पाहिजे आणि नकार देताना मूलाला आपण निराधार आहोत, आपलेच बाप किंवा आई आपल्या पाठीशी नाही असे वाटता कामा नये. नाहीतर काही म्हणता काही व्हायचे. त्याच बरोबर स्वतःच्या लढाया, स्वतः लढायला, स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवायला त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि काही झाले तरी आपण पाठीशी आहोत ह्याचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. हे ऐकायला, बोलायला सोपे आणि करायला खूप अवघड वाटेल. पण नाही, हे करायाला खूप सोपे आहे पण त्याकरता खूप वेळ देणे आणि संयम मात्र आवश्यक आहे ( म्हणूनच तर ते खूप अवघड आहे. नाहीका?)तसेही आपण मुलांचे चांगले पालक व्हायचा प्रयत्न करतो म्हणजे काय करतो. तर सगळ्या गोष्टी त्यांना तयार हातात देतो, रागवत, मारत नाही, कायम त्यांच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो नाहीका! चांगले आई बाबा असेच असतात हो ना?. चूक! हे असे आई बाबा सगळ्यात वाईट आई बाबा असतात आणि अशा लोकांना जे मुल असेल ते त्याच्या कडून काढून घेऊन त्यांना पुन्हा मूल होऊ द्यायला कायद्याने खरेतर बंदी केली पाहिजे- असो... ते काही होणार नाही ( तसे व्हावे अशी माझी इच्छाही नाही )पण असे आई बाबा स्वतःला सुधरवू नक्कीच शकतात. माझ्या पत्नीकडे त्याच्या शाळकरी मुलांचे प्रॉब्लेम घेऊन येणाऱ्या (ती मानसिक समुपदेशक आहे) पालकांपैकी ९०% पालकांमध्येच प्रॉब्लेम असतात, त्यांच्या मुलांमध्य नाही आणि त्यांनाच समुपदेशनाची गरज असते, मुलाना नसते. हि वस्तुस्थिती जवळपास सगळेच समुपदेशक मान्य करतील. मानसशास्त्रात helicopter parenting नावाची एक संज्ञा आहे. म्हणजे मुलांची अति काळजी घेणे, सतत त्यांना मदत वं संरक्षण पुरवणे त्यांनी मागितली नसताना , गरज नसताना. आणि मग मुलं सुद्धा परावलंबी आणि रडी होत जातात.
एक उदाहरण देतो. जवळ पास सर्वजण आपल्या मुलांना सायकल चालवायला शिकवतात.आमच्या कॉलनीतहि हे घरगुती सायकल प्रशिक्षण वर्ग चालतात ज्यात बाबा मास्तर आणि पोरगा किंवा पोरगी विद्यार्थी असतात. नवी छान कोरी ( आणि अतिशय लहान तरीही साईडव्हील लावलेली )सायकल आणली जाते. मुलाला त्यावर बसवून मागून बाप धरतो आणि ढकलतो. तो घामाघूम झालेला असतो धापा टाकत असतो. पण पोराची सायकल काही लवकर सोडत नाही. आता खरतर साईडव्हील असताना मुल पडायची शक्यता कमीच पण तरीहि हे होत असतं.जस काही मुल पडलं तर आकाशच कोसळणार आहे किंवा बाबाच्या सायकल शिकवण्याच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह उमटणार आहे. मुल तर मग पायडल हि मारीत नाही.बाप ढकलतोय तर का मारेल. साईडव्हील पुढे ६-६ महिने राहतात. बाबांचा शिकवण्याचा उत्साह लवकरच मावळतो आणि मुल एकटेच सायकल चालवू लागते. पुढे मोठ्या मुलांचे किंवा भावाचे पाहून आणि त्यांनी चिडवाल्यामुळे ते साईडव्हील काढते आणि सायकल शिकते.हि मुलं साधारण ५ वर्षांची असतात.मी माझ्या मुलीला ती ३ वर्षाची असताना सायकल आणली ती तिच्याकरत बरीच मोठी होती आणि तिला साईडव्हील होती. तिला एकदा फक्त पायडल कसे मारायचे आणि ब्रेक कसा लावायाचा हे सांगितले आणि रस्त्यावर (कॉलनीच्या)सोडले. अक्षरश: ३ तासात तिला सायकल आली. १ आठवड्या नंतर साईडव्हील काढले. ३ रया वर्षीच माझी मुलगी उत्तम सायकल चालवायला लागली साईडव्हील शिवाय. ती ५ वर्षांची झाल्यावर तिला जरा मोठी सायकल आणली आणि सांगितले कि जरा सराव कर आपण रोज पहाटे सायकल चालवायला जाऊ.ते सुद्धा मुख्य हमरस्त्यावर.आता ती आणि मी रोज पहाटे५.१५ लं उठून लांब लांब सायकल चालवत जातो.७.३० च्या शाळे करता ६.३० ला उठायला कटकट करणारी माझी मुलगी ५.०० वाजता बिनबोभाट उठते. पुढे ती खेळाडू म्हणून सायकलिंग करणार आहेका? मला माहित नाही? तिने तसं काही करावं असा माझा अट्टाहास नाही पण ती गोष्टी तिच्या ती करते, माझ्या किंवा इतर कुणाच्याही मदती शिवाय आणि तसं व्हावं हा मात्र माझा अट्टाहास होता आणि आहे. कॉलनीतल्या कुलकर्णी आजोबांची नात आज ६.५ वर्षांची होऊनही सायकल चालवू शकत नाही, पडेल म्हणून तिचे आजी आजोबा तिला सायकल वर बसूच देत नाहीत.
ह्या आजी आजोबांच्या बाबतीत मला काही म्हणणे भाग आहे. थोडे (म्हणजे बरेच) विषयांतर करण्याचा दोष पत्करून सांगतो.आमच्या कॉलोनी मध्ये हे उपरोल्लेखित कुलकर्णी कुटुंब रहते. तसे बऱ्यापैकी सुखी आणि चाकोरी बद्ध जीवन जगणारे, म्हणजे मुलगा सून दोघे नौकरी करतात, दोन छान नाती आहेत. आजी आजोबा रिटायर्ड आहेत ते नातींच सगळ बघतात। तर त्यांची धाकटी नात माझ्या मुलींबरोबर शिकते, ६.५ वर्षांची आहे आताच फुल फ्लेज म्हणतात तशी शाळा सुरु झालेली आहे. पण आजींना माझ्या मुलींबरोबर स्वतःच्या नातीची तुलना केल्याशिवाय राहवत नाही. त्यांचा सगळा कटाक्ष आपली नात सगळ्यात पुढे असावी याकडे असतो, त्यात अनैसर्गिक असा काहीच नाही फक्त मला प्रश्न असा पडतो की हे सर्व त्या मला किंवा माझ्या बायकोला का विचरतात? म्हणजे त्यांचा मुलगा आणि सून कधी यात पडताना दिसत नाहीत. शेवटी न रहवून मी त्यांना एकदा विचारले की तुमचा मुलगा किंवा सून मुलींच काही बघतात की नाहीं. त्यावर त्या म्हणाल्या " छे त्यांना वेळ कुठे असतो? आजकाल करियर वगैरे किती अवघड झालय ! आम्ही आहोत म्हणून नातींकडे बघतो तरी नाहीतर पाळणा घराला हजारो रुपये मोजायचे आणि पुनः ते काय आपल्या पोरांकडे नीट बघणार , ती पडली शेवटी पैशापासरी माणस। "मी म्हटले अहो पण ही तुमची मुल नाहीत ही तुमची नातवंड आहेत. त्यांना वाढवण्याची जबाबदारी तुमची नाही तुमच्या मुलाची आणि सुनेची आहे। तुम्ही थोडिफार मदत करू शकता पण मदतच, संपूर्ण जबाबदारी नाही, तुम्ही तुमचे काम बर वाइट कसही असेल ते केल आहे एकदा ( तस यावरून ही फार बर काम झालाय अस वाटत नाहीं पण ते एक असो)आता त्यांची पाळी आहे नाहीं का? आणि काय हो ह्या वयात तुम्हाला काही दुखत खपत असेल तर ते तुम्ही पहायच की नातिमागे धावयाचे ?पाळणाघरात काय वाइट आहे ? तुमचा विश्वास नसेल तर घरात एक बाई ठेवा। तिच्यावर अधुन मधून तुम्ही लक्ष ठेवा. पैसे घेऊन काम करणारे सगळे काय कामचुकार असतात, तुम्ही पैसे घेऊनच नौकरी करात होतात न? मग!, तुमच्या घरात कोणी डॉक्टर नाही मग बाहेरचे डॉक्टर पैसे घेऊन उपचार करतात ना आणि वाटते ना बरे तुम्हाला? तुमची सून आणि मुलगा कशाला मध्ये लक्ष घालतील ? फुकट सांभाळणारे गड़ी भेटले आहेत न त्यांना ? एकदा जरा मुलींची शाळा इंग्लिश ऐवजी मराठी मध्यमाची करणे किंवा एखादा या सरखा महत्वाचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊन बघा मग कळेल तुम्हाला गम्मत आणि तुमची किंमत। अहो हा तुमचा संसार नाहीं हा त्यांचा संसार आहे आणि तो त्यांना करू दे तुम्ही फक्त सल्ला आणि अडचणीला मदत म्हणून रहा. अर्थात हे काही त्यांना पटले नाही आणि आवडले तर नाहीच नाही....
असो तर सांगायचा मुद्दा असा कि सामजिक भान आणि समाजात वावरताना लागणारी हुशारी अंगी येणे हा सुद्धा मुलांच्या शिक्षणाचा फार महत्वाचा भाग आहे आणि यात शाळे इतकीच महत्वाची जबाबदारी पालकांची ( आई बाबा- आजी आजोबा नव्हे) आहे.
मुलांच्या शिक्षणातल्या सामाजिक शिक्षणावर एवढे विवेचन पुरेसं आहे. आता पुढील उद्दिष्ट – पुढील भागात
क्रमश:
---आदित्य

शिक्षणविचार

प्रतिक्रिया

अनिता's picture

24 Oct 2016 - 7:19 pm | अनिता

एकदा जरा मुलींची शाळा इंग्लिश ऐवजी मराठी मध्यमाची करणे किंवा एखादा या सरखा महत्वाचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊन बघा मग कळेल तुम्हाला गम्मत आणि तुमची किंमत।

वन्दे मातरमच :)

आपल्या कमेंटचा अर्थ समजला नाही. बहुतेक लोक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेंत किंवा मराठी शाळेंत पाठवायचे ह्याचा निर्णय स्वतः घेतात.

आदित्य कोरडे's picture

25 Oct 2016 - 6:15 am | आदित्य कोरडे

प्रश्न निर्णय घेण्याचा नाही, आजी आजोबांचा अतिरिक्त हस्तक्षेप आणि मुलांचा सुद्धा त्यांच्याकडून काम करून घ्यायचा आणि जबाबदारी टाळायचा प्रयत्न हे चूक आहे. आपला संसार आपली मुलं हि आपली जबाबदारी असते. एखाद्याची तात्पुरती प्रासंगिक मदत घेणे आणि संपूर्णपणे त्यांच्यावर जबाबदारी ढकलणे ह्यात फरक आहे. तुम्ही कारण काहीही द्या , नोकरी, वेळ पैसे ह्यामुळे जमणे अवघड आहे म्हणा पण ह्या सगळ्याचा विचार आधी करावा. म्हाताऱ्या आई बापाला परत दावणीला जुंपावे, अन आई बाबानी सुद्धा मुलंसून किंवा मुलगी जावई ह्यांच्या संसारात लुडबुड करू नये.

साहना's picture

25 Oct 2016 - 2:52 am | साहना

आजींना माझ्या मुलींबरोबर स्वतःच्या नातीची तुलना केल्याशिवाय राहवत नाही.

असतात असे काही लोक.

हेच पहा ना-

३ रया वर्षीच माझी मुलगी उत्तम सायकल चालवायला लागली साईडव्हील शिवाय.

कॉलनीतल्या कुलकर्णी आजोबांची नात आज ६.५ वर्षांची होऊनही सायकल चालवू शकत नाही

रच्याकने, आपलं आणि आपल्या मुलीचं अभिनंदन...तिसर्‍याच वर्षी सायकल चालवते म्हणजे फारच जबरदस्त गोष्ट आहे!

संदीप डांगे's picture

26 Oct 2016 - 1:06 pm | संदीप डांगे

=)) =))