एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते? हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला.... एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा. हा! हा! हा!, आजी किती ग!खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड. बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात. आजी ग, खोट्ट बोलणार्याला गाॅड, पनीशमेंट देतो. एक विचारू आजी, गाॅडने तुझे दात तोडले का? म्हणत सोनुटली तिथून पसार झाली. काहीही म्हणा, आमची सोनुटली भारी खोडकर, भारी हुशार. तिला मूर्ख बनविणे सौपे नाही, आजी मनातल्या मनात पुटपुटली.
आजीने डोळे बंद केले. गावातले घर.. सोनुटली, आजीच्या मांडीवर बसलेली, चिव-चिव करीत आंगणात चिवताई आल्या, दाणे टिपू लागल्या. चिवताई ये दाणा खा, म्हणत सोनुटलीने हात उघडला, एक चिवताई आली, तिने सोनुटलीच्या तळहातावरचा दाणा टिपला आणि भुर्रर्र उडाली. आजी-आजी, चिवताईने दाणा टिपला म्हणत सोनुटलीने उडड्या मारीत जोरात टाळ्या वाजविल्या, आंगणातल्या चिमण्या चिव-चिव करीत उडाल्या. घाबरट कुठल्या, सोनुटली जोरात हसली.
आजीने डोळे उघडले. ACवाल्या फ्लेटचे दार-खिडक्या सदैव बंद असतात. आंगणच नाही, तर चिवताई कुठून येणार... गोष्ट अर्धवटच राहिली.
एक होती चिव, एक होता काऊ. चिवचे घर होते मेणाचे, काऊचे घर होते शेणाचे, (असे फक्त गोष्टीतच असते). एकदा काय झाSSले... जोरात पाऊस आला. काऊचे घरटे वाहून गेले .... मोठ्या शहरात वाहून गेली,... चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट ....
प्रतिक्रिया
17 Oct 2016 - 8:58 pm | कंजूस
कोल्ह्या करकोच्याची खिरीची गोष्ट्ट खर्री होती ना आजोबा? खय्रा खय्रा गोष्टी सांगा मला .छ्छान झोप येते.आणि कावळा मडक्यात दगड टाकन पाणी पितो तीपण मी उद्या उठेपर्यंत खर्रीच ठेवा.डेन्ग्यु होतात म्हणून मडके उलटे करून ठेवू नका.
17 Oct 2016 - 9:37 pm | विवेकपटाईत
कन्जूस साहेब गोष्ट पुन्हा एकदा वाचा. शहरात चिमण्या दिसत नाही, सोनुटलीला चिवताईची गोष्ट कशी खरी वाटणार. पण गावात तिच्या हातातला दाणा सुद्धा चिवताई टिपते. ३-४ वर्षांपूर्वी गच्चीवर चिवताई दिसायच्या. आता दिसत नाही. येत्या पिढीला चिवताईची गोष्ट कशी सांगणार. बाकी खरी गोष्ट ऐकून झोप जाते, येत नाही.
17 Oct 2016 - 10:20 pm | कऊ
आमच्याकडे तर रोज येतात चिऊ पण आणि काऊ आणि खारुताई पण...हल्ली पोपट देखील येतात...
18 Oct 2016 - 5:41 pm | कंजूस
तो दोष बिल्डरचा आहे.छपरांची वळचण काढून टाकली.चिमण्या काही झाडांवर घर बांधत नाहीत.त्यांना आडोसा लागतो॥डास होऊ नये म्हणून फवारे मारता त्यांनी इतर किटक,कोळीही मरतात. कचरा दूर नेऊन जाळता अथवा त्यावर कोणी खाऊ नये म्हणून डिडिटी मारता॥ संडास बाथरुममध्ये निर्जतुंक करायचे फिनेल टाकता ते मैला कुजवणारे जंतूही मारता. कोणी इमारतींचे डिजाइन बदलायचा कायदा करवला का? सगळं शहर कसं ओपरेशन थिएटरसारखं व्हायला पाहिजे.
18 Oct 2016 - 7:04 pm | विवेकपटाईत
प्रतिसाद साठी धन्यवाद. बाकी काही काळाने कोल्हा आणि करकोच्याची गोष्ट हि कालबाह्य होऊ शकते.
19 Oct 2016 - 1:25 pm | वटवट
खरंतर ह्या धाग्याच्या तसा संबंध नाही पण हा माझाच धागा आठवला...
19 Oct 2016 - 1:26 pm | वटवट
चिऊ गं चिऊ गं दार उघड...!