प्रिय जी. ए.
पुलंची बरीच पुस्तकं शाळेत असताना वाचली होती. पण गायन, अभिनय, विनोद या साऱ्याने लोकांची मनं रिझवणारा, तासंतास गप्पांच्या मैफिली रंगवणारा, नाटक-सिनेमात रमणारा, एक प्रतिभावंत नट-लेखक-संगीत दिग्दर्शक आयुष्याचा जोडीदार म्हणून जिला लाभला होता... अशा 'सुनीताबाईंचाही' लेखनप्रवास जाणून घ्यायची मग खूप इच्छा झाली. त्यांच्या लेखणीची धार अजून माहीत झाली नव्हती. मग असेच एकदा 'आहे मनोहर तरी' वाचून काढले. तेव्हा, 'पु.ल. देशपांडे यांची पत्नी' या व्यतिरिक्त एक अतिशय 'शिस्तप्रिय, परखड, स्पष्ट स्वभावाच्या, जिद्दी सुनीताबाई 'ही अशी काहीशी त्यांच्या बद्दलची मनात तयार झालेली प्रतिमा. पण त्यांच्याच म्हणण्यानुसार, एखादा लेखक संपूर्णपणे जाणून घ्यायचा असेल तर त्याची सगळी पुस्तकं वाचली पाहिजेत, तरच तो पूर्णत्वाने उलगडतो. मग काय, एका मित्राच्या सांगण्यावरून त्यांचं 'समांतर जीवन', 'सोयरे सकळ', 'मण्यांची माळ' हे वाचले, आणि मग 'प्रिय जी ए' वाचायला सुरु केले. या पुस्तकाचा थोडक्यात सारांश किंवा परीक्षण म्हणूया हवं तर करण्याचा थोडा प्रयत्न केलाय.
या पुस्तकात सुनीताबाईंनी जी ए कुलकर्णी यांना आठ वर्षात (१९७७ ते १९८४) लिहिलेली एकूण ४० पत्रं समाविष्ट केली आहेत. ही एकतर्फी (जीएंनी सुनीताबाईंना लिहिलेली पत्रोत्तरं यात नसल्यानं 'एकतर्फी' असा उल्लेख केला आहे) पत्र वाचताना सुनीताबाईंच्या स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे हळुवार उलगडत जातात. त्यांची बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता, प्रचंड वाचनाने आलेली वैचारिक प्रगल्भता, लोकांबद्दलची त्यांची ठाम मते, प्रसंगी आलेला हळवेपणा आणि या साऱ्याबरोबरच न कुरकुरता जपलेली घरातली सततची माणसांची ऊठबस, आदरातिथ्य, स्वयंपाकातले नैपुण्य या साऱ्या गोष्टी जाणून घेता घेता अगदी स्तिमित व्हायला होते.
पुस्तकाच्या सुरवातीलाच, अरुणा ढेरे यांनी लिहिलेली प्रस्तावना (आपुला ठावो न सांडितां...) अतिशय सुरेख आहे. जणू त्या साऱ्या पत्रांचे एकूण सारच त्यांनी त्यात मांडले आहे. सुनीताबाई आणि जी ए यांच्या तरल मैत्रीच्या संवेदनशील नात्याचा त्या साऱ्या पत्रांतून त्यांनी घेतलेला आढावा खूप सुंदर लिहिला आहे. या मैत्रीची तहान दोघांनाही होती. सुनीताबाईंच्या लेखी तर मैत्री हे एक जीवनमूल्य होते. त्यात अगदी समान पातळीवरची स्त्री-पुरुष मैत्री ज्यात दोघांचंही व्यक्तिमत्व अबाधित राहून सुखदुःखाची सह-अनुभूती घेण्याइतके घनिष्ट संबंध असलेली मैत्री त्यांना अपेक्षित होती.
जीएंच्या 'पिंगळावेळ' या पुस्तकाच्या निमित्ताने या दोघांमधला पत्र व्यवहार सुरु झाला, आणि मग सुनीताबाईंनीच त्यांच्या एका पत्रात म्हटल्याप्रमाणे, 'एक पहिलं पत्रं सोडलं तर त्या नंतरची पत्रं ही पत्रोत्तरचं असतात, जसं मुंग्याच्या रांगेतली प्रत्येक मुंगी समोरून येणाऱ्या दुसऱ्या मुंगीला कानाशी काहीतरी सांगत असते, तसे पत्रोत्तरातले शब्द हे आलेल्या पत्रातल्या शब्दांशी संवाद साधत असतात. एरवी माणसांपासून दूर राहणारे, अलिप्त, लोकांतात पायही ठेवायला तयार नसलेले, अबोल, मितभाषी जीए सुनीताबाईंना सातत्याने दीर्घ अशी पत्रं लिहीत राहिले. अशा दीर्घ पत्रांची त्या अगदी आतुरतेने वाट बघायच्या. एक हळवा, सौजन्यशील, मनस्वी कलावंत जीएंच्या रूपाने पत्रातून त्यांना भेटला. आणि त्यांनीही मग त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर स्नेहाचा, जिव्हाळ्याचा वर्षाव केला. जीएंसारखे मैत्र लाभावे म्हणून अनेक ठिकाणी माघार घेत सुनीताबाईंनी त्यांच्या मूळ स्वभावातला धारदारपणा, कठोरता, आत्मसन्मान या सर्वांवर पाणी सोडल्याचे जाणवते.
'आपापली सुखदुःख, कोणातरी जीवाभावाच्या व्यक्तीला सांगावी ही एक नैसर्गिक गरज असते...त्या शिवाय का मित्र, सखा, सोबती या कल्पना जन्माला आल्या. काही माणसं या बाबतीत फार सुदैवी असतात. त्यांना पोत्यानं मित्र लाभतात. पण काही तुमच्या सारखी जात्याच अबोल असतात, मग ती कोणाचा संपर्क नको म्हणून अगदी कडेकोट बंदोबस्तात स्वतःचं घर उभारतात, वाचन-मनन-चिंतनातून स्वतःचे विचार-विकार घोळवून घोळवून त्यांचा अर्क काढतात, आणि प्रतिभेचं लेणं लाभल्यामुळं त्या अर्काचं अत्तर होऊन साहित्य सुगंधित करतात' एका पत्रात इतक्या तरल शब्दांत सुनीताबाईंनी जीएंच्या साहित्याशीच असलेल्या त्यांच्या मैत्रीची जाणीव करून दिली आहे.
सुनीताबाईंनी पत्रातून वेगवेगळे विषय जीएंसमोर मांडत, त्यावरची त्यांची मते जाणून घ्यायची इच्छा दर्शवत पत्रांचा प्रवास चालू ठेवला. आवडणाऱ्या पुस्तकांबद्दल, लेखक-कवींबद्दल त्यांनी भरभरून लिहिले आहे. बंगाली लेखक शरदबाबू, मामा वरेरकर, खानोलकर, कवी बा.भ. बोरकर, ग्रेस त्यांच्या प्रत्येकाच्या शैलीवर दोघांनी केलेली टिपण्णी आपल्या सारख्या वाचकांना भारावून सोडते. जर्मन कवी Heine चे चरित्र, The Little Prince, Voltaire in Love, Worlds in Collision, The romance of Leonardo da Vinci अशा अनेक पुस्तकांवर अनेक मुद्दे मांडत चर्चा केल्या आहेत, कसलीही भीड न ठेवता आपली आवड-निवड त्यांनी जीएंना कळवली आहे, मोठ्या धिटाईने स्वतःची मतभिन्नता मांडली आहे. माणसांच्या गरजा, The emptiness of existence वैगेरे संदर्भात किंवा अशाच अनेक मुद्द्यांवर जीएंशी वाद घातले आहेत. त्यांच्याच सांजशकून संग्रहातली 'सोयरे' ही कथा तितकीशी रुचली नसल्याचं स्पष्ट मत त्यांनी अगदी प्रांजळपणे एका पत्रात लिहिले आहे. राम-सीतेच्या बाबतीत त्यांनी लिहिलेली मते एक स्त्री म्हणून अगदी विचार करायला लावणारी आहेत. काही गोष्टी अगदी संयमानं लिहीत त्या म्हणतात, "लेखणीच्या जिभेवरही अनेक प्रश्न येतात, पण त्यातलं पत्राला कोणतं विचारावं आणि डायरीसाठी कोणतं राखून ठेवावं याचा विवेक ठेवावाच लागतो ना?
जीए एकदा निराशेच्या स्वरात, हल्ली नवीन काही लिहिण्याची उर्मीच येत नाही अशा अर्थाचं, "आजकाल मी फार असमाधानी आहे, कारण साऱ्या कथा undigested वाटू लागल्या आहेत... त्यातून एखादं सूत्र निर्माण होत आहे असं मला वाटत नाही म्हणजे मी सध्या doldrums मध्ये आहे...." असं पत्राद्वारे कळवतात, त्यावर पत्रोत्तरात सुनीताबाई अतिशय मार्मिकपणे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. त्या लिहितात, "विचारी प्रकृतीच्या प्रगल्भ माणसापुढं हे विचार अपरिहार्यपणे येतातच. दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेला कलावंत स्वतःच्या कुवती प्रमाणे निर्मिती करतो, पण त्या कलाकृतीचे मोल ठरवण्याची क्षमता त्याच्यात असतेच असं नाही. असावी असाही हट्ट नाही. पण विश्वाचा हा पसारा म्हणजे आहे तरी काय या प्रश्नांत डोके खुपसून घेणारा विचारवंत हा मूळचा कलावंत असेल तर मात्र पंचाईत होते, तो स्वतःच्या कलाकृतींना अधिक जड आणि वेगळी मोजमापं लावतो आणि पूर्वी केलेल्या स्वतःच्याच निर्मितीवर अन्याय करतो, मग या चिरजागृत अवस्थेत त्याला नवनिर्मितीची स्वप्न पडेनाशी होणं स्वाभाविक नाही का?"
सुनीता बाईंना आत्मचरित्र लिहायचे एका पत्रात सुचविल्यावर त्याला उत्तर देताना सुनीताबाईच जीएंना आत्मचरित्र लिहायची गळ घालतात, त्या लिहितात, ''कवी तो होता कसा आननी' हे जाणून घ्यायची इच्छा वाचकाला असतेच असते, सर्वसामान्य जीवनापासून अलिप्त असा जाणीवपूर्वक स्वतःचा वेगळा संसार थाटणाऱ्या एखाद्या असामान्य व्यक्तीचं चरित्र जर अगदी तितक्याच पण वेगळ्या अर्थानं असामान्य शैलीनं लिहिलं गेलं तर तो मराठीतला अपूर्व चरित्रग्रंथ होईल.'
जीएंची गांधींजींबद्दलची नाराजी त्यांच्या एका पत्रातून व्यक्त झाल्यावर, त्याबाबत पत्रोत्तरात लिहिताना त्या म्हणतात, 'वयाची सोळा ते वीस ही अतिशय महत्वाची चार वर्ष गांधीवादी प्रवाहात गेली, त्याच काळात हाताला चार-दोन रत्न लागण्याचं भाग्यही लाभलं, त्यांचं हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही.' सुनीता बाईंनी मांडलेलेत्या या साऱ्या बद्दलचे विचार, अर्थात गांधीजींचा शिष्यगण, त्यांची राजकीय मतप्रणाली, त्यांचं राष्ट्र-उभारणीचं कार्य, त्यांचं पूर्वायुष्य हे सारं त्यांची वैचारिक सखोलता स्पष्ट करतात. याबाबत गांधीजींचं भगवं तत्वज्ञान त्यांनाही हास्यास्पद वाटलं खरं...पण त्याचंच स्पष्टीकरण देताना त्या म्हणतात, 'संदर्भ सोडून पाहिली कि प्रत्येक गोष्ट हास्यास्पद वाटते खरं..त्यात आपलेच प्रत्येकाकडे बघायचे चष्मे वेगवेगळ्या नंबराचे आणि रंगाचे असतात आणि हे नंबरही सतत बदलत असतात. शेवटी अंधार काय नि प्रकाश काय, त्यांची intensity प्रमाणाबाहेर वाढली तर दोहोंचा परिणाम एकच होणार- निरर्थकता.'
लोकांचे सुनीताबाईंना आलेले बरे वाईट अनुभव आपल्या या मित्राबरोबर वाटताना त्यांनी लिहिलेली विधाने, खूप मोठं तत्वज्ञान जाता जाता अगदी सहज सांगून जातात. जसे कि, ' ज्ञानामुळे नम्रता न वाढता जर नुसता अहंकारच वाढत असेल, तर ते ज्ञान नव्हेच, तो फक्त माहितीचा साठा. ज्ञान पचलं तर त्याची वृत्ती होते आणि नाही पचलं तर त्याचा अहंकार होतो.', ' आपण ज्याला शिक्षण, संस्कृती, प्रगती वैगेरे म्हणतो, त्यांनी माणसातली माणुसकी कमी होत जाऊन लोभ, स्वार्थ, दुष्टावा यांचीच वाढ होते का? दिलेला शब्द मोडणं आणि मग मोडलेला शब्द कायद्यात बसवणं याचसाठी शिक्षण घ्यायचं का?'
या अशा सोज्वळ पत्रव्यवहाराने तयार होत गेलेल्या आणि दर पत्रागणिक हळुवारपणे उलगडत जाणाऱ्या या दोन दिग्गजांच्या सुरेख मैत्रीचा हा आढावा साहित्याच्या दृष्टीने खूप मोलाचा तर आहेच, पण पानागणिक एक वेगळी विचारधारा वाचकांच्या मनात उमटवणारा वाटला. म्हणून हा लिहिण्याचा खटाटोप.
---अश्विनी वैद्य
प्रतिक्रिया
15 Oct 2016 - 4:04 am | एस
काय सुंदर आढावा घेतला आहे. 'doldrums' वर सुनीताबाईंचे भाष्य फार आवडले. अतिशय छान लिहिलंय.
16 Oct 2016 - 3:54 am | अश्विनी वैद्य
लेखाच्या वाचनाबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल खूप मनापासून आभार. परीक्षण लिहिण्याचा पहिला प्रयत्न होता...!
15 Oct 2016 - 4:07 am | सतरंगी_रे
उत्तम परीक्षण ! हे पुस्तक वाचायचा प्रयत्न केला, जमले नाही
तुम्ही वाचून परीक्षण लिहिलेत
सलाम
16 Oct 2016 - 3:58 am | अश्विनी वैद्य
मनापासून धन्यवाद...एकदा घ्याच परत हातात प्रिय जी ए...या वेळी खाली ठेवायला अगदी जीवावर येईल
15 Oct 2016 - 7:00 am | यशोधरा
सुरेख लिहिलेय. हे माझ्या काही आवडत्या पुस्तकांपैकी आहे.
सुनीताबाई तर अतिशय लाडक्या.
16 Oct 2016 - 3:59 am | अश्विनी वैद्य
लेखाच्या वाचनाबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल खूप मनापासून आभार यशोधराजी. माझ्याही अंत्यंत लाडक्या...!
15 Oct 2016 - 10:04 am | महासंग्राम
उत्तम विवेचन... कधी हे पुस्तक वाचायला मिळेल माहीत नाही.
बाकीशाळेत असताना जि.एं. ची एक कथा होती मराठीच्या पूस्तकात त्याचं नाव आठवत नाही आता कोणी सांगू शकेल का ???
15 Oct 2016 - 6:48 pm | आदूबाळ
फेड?
15 Oct 2016 - 10:15 am | अंतरा आनंद
आम्हाला "भेट" कथा होती जीएंची. अश्वत्स्थामा आणि राजकुमार सिद्धार्थाची "भेट". मराठी आठवीला बहुधा.
15 Oct 2016 - 10:17 am | अंतरा आनंद
छान परिक्षण
15 Oct 2016 - 10:24 am | सस्नेह
सुरेख आढावा !
जी. ए. अतिशय आवडत्या लेखकांपैकी आहेत.
16 Oct 2016 - 4:02 am | अश्विनी वैद्य
धन्यवाद मंदार भालेरावजी, अंतरा-आनंदजी, स्नेहांकिता
15 Oct 2016 - 11:11 am | बोका-ए-आझम
जी.एं.सारखा प्रतिभावंत त्यांच्या पत्रांमधून उलगडत जाताना वाचणं हा अनुभव विलक्षण असणार. तो वाचताना तुम्हाला काय वाटलं हेही आलं असतं तर आवडलं असतं.
15 Oct 2016 - 11:12 am | सिरुसेरि
सुरेख ओळख
15 Oct 2016 - 2:07 pm | वरुण मोहिते
अतिशय वाचण्यासारखं पुस्तक आहे . संग्रही असण्यासारखं. बाकी जी. ए जास्त बोलणाऱ्यातले नव्हते अजून काहि लिहिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. असो बाकी सुनीताबाई ,इरावती कर्वे , शांता शेळके ,दुर्गा भागवत ह्यांचा नाव आला तरी कान पकडावेत आदराने ....
16 Oct 2016 - 4:12 am | अश्विनी वैद्य
अजून लिहायला मलाही नक्की आवडलं असतं... पण शेवटी परीक्षणालाही शब्दांची मर्यादा असावी हे भान पाळन्यायाचा प्रयत्न केला. त्यात पुस्तकातली सारी पत्रं...सुनीता बाईंनी लिहिलेली, त्यामुळं सुनीता बाईंचेच विचार त्या पात्रातून प्रकट झालेत, जीएंचे नव्हेत. त्यामुळे तुमचे 'अजून काही' म्हणजे नक्की काय हे मला कळले नाही.
16 Oct 2016 - 8:18 pm | बोका-ए-आझम
त्यांच्या पत्रव्यवहारात मांडलेल्या विचारांवरचं.
15 Oct 2016 - 3:23 pm | पद्मावति
खूप सुरेख पुस्तक परिचय. वाचणार हे पुस्तक नक्कीच.
15 Oct 2016 - 3:57 pm | भाग्यश्री कुलकर्णी
खुप छान मांडलय. मला पण वाचायचंय हे पुस्तक.
15 Oct 2016 - 4:07 pm | उल्का
खूप छान लिहिलय. :)
16 Oct 2016 - 4:15 am | अश्विनी वैद्य
लेखाच्या वाचनाबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल खूप मनापासून आभार पद्मावती, भाग्यश्री आणि उल्काजी. परीक्षण लिहिण्याचा पहिला प्रयत्न होता.
15 Oct 2016 - 7:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुस्तकाबद्दल छान लिहिलंय. आवडलं. 'आहे मनोहर तरी ' मधे सुनिबाई जितक्या पोहचल्या तितक्याच बाकी, जी.ए. आणि सुनिताबाईंच्या मैत्रीसाठी पुस्तक तपशीलवार वाचलंच पाहिजे.
लिहित राहा. पुलेशु.
-दिलीप बिरुटे
16 Oct 2016 - 4:19 am | अश्विनी वैद्य
खूप मनापासून आभार सर....नक्की लिहिणार.
16 Oct 2016 - 2:00 am | गामा पैलवान
अश्विनी वैद्य,
जीएंची वाट कधीच धुंडाळली नाही किंवा तसे प्रसंग आले नाहीत. मात्र तुमचा लेखाने उत्सुकता वाढली आहे.
आ.न.,
-गा.पै.
16 Oct 2016 - 4:26 am | अश्विनी वैद्य
लेख वाचल्याबद्दल आणि दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद.
परीक्षण किंवा धावता आढावा घ्यायचा उद्देश सफल झाला तर... नक्की वाचा...
16 Oct 2016 - 12:31 pm | अनुप ढेरे
छान लिहिलय.
16 Oct 2016 - 8:27 pm | तिमा
जी. ए.यांचे लेखन वाचून तरुणपणीच भारावून गेलो होतो. त्यानंतर सुनीताबाईंचे हे पुस्तक वाचून तर मन हेलावून गेले होते. या उत्तम पुस्तकाचा परिचय करुन दिल्याबद्दल आभार.
21 Oct 2016 - 2:30 pm | सन्जय गन्धे
या प्रिय जीए पुस्तकाबरोबर "जीए निवडक पत्रे" चा पहिला भाग ज्यात जीएननी सुनीताबाईंना लिहिलेली पत्रे आहेत तो पण समोर घ्यायचा आणि एकेक करत पत्र आणि त्याचे उत्तर असे वाचत जायचे - हा पण एक करण्यासारखा उपक्रम आहे.
21 Oct 2016 - 2:43 pm | सन्जय गन्धे
तुमच्या लेखामुळे परत एकदा दोन्ही पुस्तके वाचावीशी वाटायला लागली आहेत, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद!
4 Jan 2021 - 2:21 pm | अनिता ठाकूर
आज एका ठिकाणी Living Will वर चर्चा वाचली आणि सुनिताबाईंच्या एका पुस्तकाच्या शेवटी अरुणा ढेरे ह्यांनी लिहिलेल्या लेखात सुनिता बाईंनी केलेल्या अशा Will बद्दलचा उल्लेख आठवला.
मला ह्या पुस्तकाचे नाव आता आठवत नाहीये. कोणाला माहित असेल तर कृपया सांगावे.
4 Jan 2021 - 6:12 pm | Jayant Naik
पत्रे लिहिण्याचा काळ आता संपला. हे असे अनमोल वैचारिक धन जपून ठेवले पाहिजे. आपण अतिशय योग्य शब्दात या पुस्तकाची ओळख करून दिली आहे. धन्यवाद .