माझ्या बालपणीचा सुगंधित ठेवा... गुलाब

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
5 Oct 2016 - 1:28 pm

तिथे वर कुठे तरी स्वर्ग असतो म्हणे.... त्या स्वर्गात देव रहात असतात म्हणे... तेच आपलं भविष्य एका पुस्तकात लिहीत असतात म्हणे... त्यांचं ते लिखाण आपल्याच कृतीवर अवलंबून असतं म्हणे... त्यालाच प्राक्तन असं संबोधन असतं... म्हणजे आधीच्या जन्मातल्या आपल्या वर्तणुकीवर ते लिखाण ठरतं म्हणे... आणि त्याच लिखाणाच्या अनुषंगाने आपला दुसरा जन्म आणि त्या दुसर्या जगण्याचा मार्गही ठरतो म्हणे... म्हणजे आधीच्या जन्मात जर आपण काही दुष्कृत्ये केली असतील, तर दुसर्या जन्मात आपल्याला खूप त्रास होतो. त्याचबरोबर आधीच्या जन्मात जर आपण काही सत्कार्ये केली असतील तर दुसरा जन्म सुखाचा जातो... उगाच काही आपण बघत नाही कि एक जण आयुष्यभर कसाही वागतो, तरीही त्याला त्रास कोणताच होत नाही... आणि एक जण जो खूप परोपकारी, सज्जन असा असतो, आणि त्यालाच खूप त्रास असतो... ह्यासगळ्यामागे पूर्वजन्मीचं संचित असतं, असं म्हणतात... आणि आजूबाजूची बहुतांश उदाहरणे पाहिली कि ह्यावर विश्वास बसतोच बसतो. कोणाला काय म्हणायचंय ते म्हणू द्या... माझा तरी ह्या सगळ्यावर विश्वास आहे... हे इथं सगळं लिहायचं कारण म्हणजे, अस्मादिकांचं बालपण कदाचित गतजन्मातील पापांचा सरळ सरळ परिणाम होता कि काय? असं मला नुसतं वाटायचंच नाही तर माझा ह्यावर ठाम विश्वास आहे. जन्माला आल्यापासून आजारपणाने आमची जी काही पाठ धरली होती ती अगदी वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत सोडली नव्हती. म्हणजे त्या वयात साधारण जे काही आजार होतात (कावीळ सोडून) ते सर्व आजार अगदी छान पैकी ह्या देहात नांदून गेलेत, मनसोक्त. माझं बालपण म्हटलं कि लगेच माझ्या डोळ्यासमोर माझा पलंग येतो. माझी सदानकदा काळजी घेणारे आई बाबा आणि ताई दिसू लागतात. माझ्या कानाला ते तस्सेच आजारपणात जसे आवाज येतात ना तसे आवाज ऐकू येऊ लागतात.... आणि नाकात तो औषधांचा वास घुमायला सुरुवात होते... खरंतर "बालपणीचा काळ सुखाचा" असं म्हटलं जातं ना... मला तर तो कधीच एव्हढा सुखाचा नव्हता. "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" हे मला कधीच पटलं नव्हतं... मला तर "द्यावी मोठेपणाची झेप, हत्ती गुळाची ढेप" हेच नेहमी वाटायचं... मला जर कोणी खोडरबर दिलं आणि आयुष्यातला एक भाग खोडायला सांगितलं तर सगळ्यात आधी मी माझं बालपण खोडून टाकेन, इतका मला माझ्या बालपणाचा तिटकारा आहे.. अर्थात सर्वच गोष्टी त्रासदायक होत्या असं नाही... सर्वच गोष्टी घाणेरड्या होत्या असं नाही... वास हा औषधाचाच होता असंही नाही... ह्या औषधाच्या वासासोबत अजून एक वास माझ्या बालपणाचा अजोड साथीदार आहे.... आमच्या अंगणातल्या गुलाबाचा...

आधी आम्ही बार्शीतल्या सोमवार पेठेतल्या गुडे वाड्यात राहायचो. साधारण १०० स्क्वेअर-फूट... बहुतेक त्याहीपेक्षा लहान अश्या एसटी डब्याच्या आकारातलं घर हे आमचं निवासस्थान होतं..... खरंतर त्या आमच्या घराबद्दल लिहायचं म्हटलं तर अजून एक विस्तृत लेखंच होईल... पंचवीसेक वर्ष आईबाबा राहिले तिथे.. बाबांचं एक स्वप्न होतं कि भाड्याच्या घरात परत राहायला जायचं नाही. तिथून सरळ स्वतःच्या घरी... हे बाकी अगदी पक्कं. मग ह्यासाठी त्यांनी नाही नाही ते कष्ट उपसले... पेपर वाटणे असेल किंवा रस्तोरस्ती फिरून लॉटरीची तिकिटं विकणे असेल... नंतर तोच बाबांनी व्यवसाय म्हणून पत्करला... आई उन्हातान्हात फिरून स्टेट बॅंकेसाठी कलेक्शन करायची, गरोदर असतानासुद्धा.... तिने लेडीज वेअर पण सुरु केलं. "स्त्री सखी" त्याचं नाव... डोळ्यासमोर एकंच उद्दिष्ट, आपलं आयुष्य छपराविना गेलं बरंच. मुलांच्या डोक्यावर त्यांचं स्वतःचं असं हक्काचं छप्पर असायला हवं. खरंतर माझ्या आईबाबांचं आयुष्यसुद्धा त्यांच्या आईबाबांच्या छपराविना गेलं. बाबांना असून फायदा झाला नाही.. आई त्यापेक्षा दुर्दैवी, लहानपणापासूनच अनाथ. मी आणि माझी ताई खूप सुदैवी कि आम्हाला स्वतःचं असं, हक्काचं, मायेचं छप्पर आहे... जन्मल्यापासून.

आमच्या ह्या दुसर्या छपरासाठी आईबाबांनी एक जागा बघितली. बार्शीतलीच... भगवंत मंदिरामागे... देशपांडे वाड्यात... खूप पडकी होती... जुन्या पद्धतीचे बांधकाम.. जाड जाड भिंती. मोठ्या खिडक्या, अरुंद जिने, वर माळवद. दारात दोन पपईची झाडे होती. खूप रसाळ आणि गोड पपया होत्या ओ त्याच्या, पण आमच्या मिस्त्रीने सांगितलं, कि दारात पपई असू नये म्हणून... ती झाडे कापली. आम्हाला खूप वाईट वाटलं... घरात आल्या आल्या छानपैकी स्वागत व्हायचं त्यानं...... सुरुवातीला राहण्यासारखी डागडुजी केली.. आणि आम्ही आमच्या स्वतःच्या घरात रहायला गेलो. आमच्या डोक्यावर स्वतःचं असं छप्परआलं..

आई खूप हौशी आहे. तिचं बरंच आयुष्य तसं दुसऱ्याच्याच दारात गेलं, आश्रित म्हणून... लहानपणापासूनच आई खूप रसिक. गाण्यापासून टापटिपीत राहण्यापर्यंत तिची आवड विस्तारलेली. दुसर्याची घरं सजवता सजवता स्वतःच्या घराबद्दल तिच्या मनात काही स्वप्ने आकार घेऊ लागली नसती तर नवलंच होतं... आता तिच्या हातात स्वतःचा असा कॅनव्हास होता, हवे तसे रंग भरण्यासाठी... आणि आईने तसे रंग भरायला सुरुवात केली... त्यापैकी एक रंग आकार घेऊ लागला... हिरवा...

आईला बागकामाची खूप हौस आहे. अशात वयामुळे तिला तेव्हढं लक्ष नाही देता येत पण सुरुवातीला खूप धडपड करून तिने आमच्या घराची म्हणजे "स्वेद बिंदू कृपा सिंधू"ची बाग फुलवली. "स्वेद बिंदू कृपा सिंधू" हे तिनंच नाव ठेवलंय. छानै नं?? युनिक म्हणतात तसं?

"घामाचा थेंब, दयेचा सागर"

घामाचा थेंबच दयेचा सागर होऊ शकतो किंवा घामाच्या थेंबाला दयेच्या सागराची जोड असायलाच हवी... काहीही अर्थ घ्या... जुळतोच जुळतो...

आईबाबांनी आतापर्यंत घर मिळवण्यासाठी घाम सांडला. नंतर घर सजवण्यासाठी...

आईला घरात बाग फुलवायची होती. कुंड्या, निरनिराळ्या फुलांची झाडे, शोची झाडे आणून त्याचं छानपैकी संगोपन चालू झालं. आमचं घर कसंय माहिती का? घरात प्रवेश केल्याकेल्या एक थोडासा अरुंद रस्ता आहे. एका बाजूला साधारण १० फुटी भिंत सुरुवाती पासून शेवटपर्यंत... त्याला समांतर साधारण चार फुटी रस्ता सोडून आधी संडास आणि नंतर बाथरूम लागतं. मग छोटंसं अंगण लागतं. डावीकडे भिंत तशीच.. आणि अंगणाच्या उजवीकडे स्वयंपाकघर. आत हॉल. आणि वर तश्याच दोन खोल्या. सगळ्यात वर गच्ची... गच्चीत काहीच अडचण नव्हती. पाण्याचा हौद आहे आणि सूर्यप्रकाश हवा तेव्हढा... उलट जेंव्हा अगदीच प्रखर ऊन असायचं तेंव्हा भर दुपारच्या वेळेस आम्ही त्या कुंड्या खाली घेऊन यायचो. रोपं करपली तर काय घ्या? एव्हढी काळजी जर त्या रोपांची घेतली जात असेल तर कशी सुकतील ती?... आमच्या पाण्यात, आपुलकी आणि प्रेमाचा ओलावा जरा जास्तंच असतो... असो...

गच्ची हिरवीगार होत होती. अंगण एक बाजूने हिरवं होत होतं... आईने ठरवलं कि घरात आल्या आल्या जो काही रस्ता आहे तिथेपण काहीतरी लावू... पण अडचण अशी होती कि तिथे सूर्यप्रकाश फारसा येत नव्हता... कारण एक तर रस्ता अरुंद आणि दोन्ही बाजूने भिंती. आईने कोठूनतरी एक गावरान गुलाबाची कांडी आणली. एका कुंडीत लावली. ती कुंडी काही दिवस गच्चीत ठेवली. ती कांडी रुजली. त्या कांडीचं रोप झालं. अर्थात गावरान गुलाब रुजायला किरकिर करत नाहीच. कोवळी कोवळी पाने फुटू लागली. छानपैकी आमच्या गच्चीतल्या कुंडीत त्या रोपाने बाळसं धरलं. आई खुश... आईनंच जन्माला घातलेलं बाळ होतं ते.. ते रोप खाली आणलं गेलं.. काही दिवस अंगणात विसावलं.. मग पावसाळा संपत आला असताना दक्षिणायनात ते रोप त्या मधल्या अरुंद जागेत लावलं, दक्षिणायनात त्या जागेत जरा ऊन यायचं म्हणून. दिवसात काहीच तास ते यायचं... आईचं आवर्जून लक्ष असायचं तिकडे. नंतर नंतर सरळ सरळ ऊन नं पडता ते समोरच्या भिंतीवरच पडू लागलं. रोप सुकू लागलं... चांगलंच वयात येत होतं... वयात येणारं मूल आणि मूळ ह्याकडे दुर्लक्ष करून चालतं का? सुधरायच्या किंवा अजून बिघडायच्या शक्यता ह्याच वयात विकसित होत असतात. इथे खरी आईची कसोटी होती. आईने एक आरसा आणला आणि समोरच्या भिंतीवर लावला. सूर्यप्रकाश त्यावरून परावर्तित होऊन त्या गुलाबाच्या रोपावर पडत होता. रोप पुन्हा जोमाने वाढू लागलं... ऊन हललं कि लगेच आई पळत पळत जाऊन आरसा हलवायची. दर पंधरा मिनिटांनी वा अर्ध्या तासाने तिचा हा नवीन व्याप सुरू झाला... काही महत्वाचं काम असेल तरीही ती आवर्जून त्याकडे लक्ष द्यायचीच द्यायची. आमचं गुलाबाचं रोप चांगलं पाच फुटी होईपर्यंत आईचा हा व्याप चालू होता. नंतर मात्र सूर्यप्रकाश पोहोचू लागला त्या रोपापर्यंत आणि आईला विश्रांती मिळू लागली.

आपलं मूल स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभं राहीपर्यंत आपल्या आईबाबांचा खरा संघर्ष असतो. नंतर त्यांनी विश्रांती घ्यायची असते. आणि आपल्या मुलाच्या यशाची चढती कमान बघत त्याचा आस्वाद घ्यायचा असतो... आणि त्याचवेळेस मुलानेही आईबाबांना निराश होऊ द्यायचं नसतं. ते कोरिलेटिव्ह ड्युटी म्हणतात ना, ती मुलाने पार पाडायची असते.
आमच्या दारातला गुलाब हे सुद्धा आईचं अपत्यंच होतं. आणि ते आता स्वतःच्या मुळावर व्यवस्थित उभं राहात होतं. आता वेगळ्या अश्या आरश्याची गरज नव्हती. ते स्वतःचा प्रकाश स्वतःच मिळवू शकत होतं. उंचच उंच वाढत होतं. काळजी घेण्याचा वा करण्याचा काळ संपला होता.

साधारण गुलाबाचं झाड वाढून वाढून किती उंच होऊ शकेल? सात फूट? आठ फूट? आमचं गुलाबाचं झाड हे झाड नव्हतं तर तो वृक्ष होऊ पाहात होता. त्याची उंचीच जर मोजायची असेल तर किमान २० फुटाच्या खाली नक्कीच नव्हती.जाडजूड खोड झालं त्याचं. त्याच्या ह्या विकासात अर्थात सूर्यप्रकाशाचंच योगदान होतं कारण प्रकाश मिळवायच्या ओढीने ते वरच्या दिशेने वाढू लागलं आणि विस्मयकारकरीत्या उंच झालं. मग आईने छान पैकी प्रवेश केल्याकेल्या जो काही अरुंद बोळ होता त्यावर वायर्स, तारा लावून त्याचं आच्छादन केले आणि त्यावर ते झाड झोपवलं....

खरंतर अधूनमधून फुलं फुलंत होती. देवाच्या चरणी पडत होती. आईची दिवसेंदिवस निगराणी चालूच होती. एकदा आईनं मला आणि ताईला सकाळी सकाळी हाक मारली. आम्ही वरच्या मजल्यावर गेलो तेव्हा आईने ते बोट मुडपून एक कळी आम्हाला दाखवली. आम्हाला त्यात काहीच नवल वाटलं नाही. पण नंतर आईने सांगितलं कि त्याच नजरेने सर्व झाडाकडे पहा... आणि आमचा आ कधी वासला गेला कळलंच नाही... साधारण पूर्ण झाड त्या कळ्यांनी व्यापलं गेलं होतं. पानागणिक त्याला कळी लगडलेली होती. त्यावेळेस आईचा चेहरा अगदी फोटो काढून ठेवण्यासारखा झाला होता. तेंव्हा आजच्यासारखे मोबाईल नव्हते नाहीतर मी नक्कीच काढून इथे डकवला असता. मग आमचं ते आवर्जून वाट पाहणं सुरु झालं... आमच्या गुलाबाला मोहोर लागला होता तो आमच्यासाठी. कळ्या हळूहळू गुलाबी गुलाबी ओठ दाखवत फुलंत होत्या. आणि तो दिवस आलाच वरून आमचं झाड, आमचा गुलाब वृक्ष पूर्णपणे गुलाबी झाला होता. एकूणएक कळी फुलली होती. ते इतकं भारी वाटत होतं. काय सांगू? वयात आलेल्या पोराने अगदी अनपेक्षित यश टाकलं होतं आईच्या पदरात... आई हरखून गेली होती. त्या दिवशी दोन चार नव्हे तर पूर्ण फुले वापरून बाबांनी गालिचा केला होता देवासाठी... एकूणएक फुल देवाला वाहिलं गेलं... नंतर एकही मौसम आमचा गुलाबवृक्ष फुलला नाही असं झाली नाही. कधीकधी तर सलग आठ पंधरा दिवस दुधाचं पातेलं भरून फुलं द्यायचं ते... बाबा देवाचं पाणी त्यालाच वाहायचे. कदाचित त्याचीच परतफेड करत असेल ते... गुलाब जाणे...

आता तो वृक्ष इतका मोठा झाला होता कि कितीतरी पक्ष्यांचे तो वसतिस्थान झाला. रोज सकाळी चिव चिव, टिवटिव कसले कसले आवाज यायचे. आमच्यासाठी अलार्मच तो. मग त्या पक्ष्यांसाठी बाबा अंगणात अक्षता ठेवू लागले. त्यानादानं अंगणात पक्ष्यांचा मुक्त वावर सुरु झाला. खूप प्रसन्न सकाळ होत होती... दुपारची त्यांची वामकुक्षी पण झाडावरच व्हायची. खाणं पिणं सगळं जिथे होतं ती जागा कोण कशाला सोडेल?? संध्याकाळी अंगणात बसून त्या झाडाला निरखत चहा पिणे हा अत्यंत आवडता कार्यक्रम झाला होता आमच्या सगळ्यांचा.

खूप पानं गळायची त्या झाडाची आणि उन्हाळयात तर दिवसातून तीनचारदा झाडावं लागायचं त्याखालचं... कधी काटेपण टोचायचे... पण वरच्या गुलाबामुळे असेल पण कधीच वैताग आला नाही... कितीही उन्हाळा असो आमचं घर थंड ठेवत होता तो गुलाब. मी बर्याचदा त्या गुलाबवृक्षाच्या सावलीत खेळ खेळायचो... छान वाटायचं.. खालून त्या झाडाच्या मधून आकाश हिरवंगार दिसायचं... येणार जाणारा प्रत्येकजण त्या वृक्षाकडे भान हरपून बघायचा अर्थात तो वृक्ष डोळ्यात मावणारा नव्हताच. एव्हाना फक्त आमच्याच नव्हे तर आमच्या वाड्यातल्या अजून तीन ते चार देवघरातले देव आमचा गुलाब सजवू लागला. कधी चिमुकले हात मामा करत पुढे यायचे त्याच गुलाबासाठी आणि जाताना सुगंधित हसू देऊन जायचे. दर वर्षातून किमान दोनदा तरी बरणीभरून गुलकंद व्हायचा... घरचा. भारी लागायचा... मुळात आम्ही कधी गुलकंद विकत आणून खाल्लाय असं मला एकदाही आठवत नाही.

एकदा तर आमच्या शेजारच्या इनामदार काकू आईला म्हणाल्या, कि तुमचा हा गुलाब आहे ना, तो आपल्या वाड्यातला काश्मीर आहे काश्मीर. आपल्या मुलाचं कोणी अनपेक्षित कौतुक केलं कि आईला कसं वाटेल?? अगदी तस्सेच भाव फुलले होते आईच्या चेहऱ्यावर...

कितीही जोराचा पाऊस पडू दे.. तो स्वतः अंगावर झेलायचा. त्याचा आवाज खूप मंजुळ असा यायचा. किंबहुना त्या आवाजाच्या अनुषंगानेच आम्ही पावसाचा अंदाज लावायचो. अंगणातल्या पावसाचा तडातडा आवाज आणि गुलाबाचा सुळसुळ आवाज.... एकाचवेळेस जुगलबंदी चालायची.

हिवाळ्यात अर्थात थंडी जास्त पडायची. पण त्याचवेळेस त्यालाही बहार आलेला असायचा.. अश्याप्रकारे आमची प्रत्येक थंडी ही अक्षरशः आणि शब्दशः गुलाबीच होती.

आमच्या सर्व ऋतूत तो भरून पावला होता आणि आम्ही त्याच्यामध्ये भरून पावलो होतो.

गेल्यावेळेस मी जेंव्हा घरी गेलो तेंव्हा त्याने अगदी तसेच माझे स्वागत केले. पण जरा सुकलेला वाटला. अर्थात उन्हाळ्याच्या शेवटी सगळीच झाडे तशी होतात. पानगळीमुळे... दुसऱ्यादिवशीची सकाळ अगदी शांत उजाडली... मला जरा चुकचुकल्यासारखं वाटलं... चहा वगैरे घेऊन झाल्यावर मी झाडू हातात घेऊन त्याखालचं झाडू लागलो. आई अंगणात काहीतरी निवडत बसली होती.

"आई... " मी

"काय रे?"

"ह्यावेळेस जरा जास्तच पानगळ झालीये नाही?"

"ह्म्म्म"

"आणि झाड जरा जास्तंच वाळलंय"

"हम्म"

"ओकंबोकं दिसतंय ग फार... एक पाऊस पडून जायला हवा... पुन्हा हिरवंगार दिसेल"

".... पुनर्जन्म.... त्याच.... देहात..... नसतो...... होत... चेतन"

झटकन ४०० वोल्टचा झटका बसावा तसा झाडू माझ्या हातातून खाली पडला

"क्क्काय??" किंचाळणंच बाकी होतं माझं.

"........."

"आई.... हे काय?

"हो रे सोन्या...... ते मेलंय रे" आईचा आवाज खूप जड झाला होता. खूप गदगदल्या स्वरात आई बोलली.

"अगं.... पण.... आयुष्य बरंच असतं ना?? गुलाबाचं??"

"हो रे... "

"मग???"

"...... अरे.... गटार तुंबली होती गेल्या महिन्यात... तेंव्हा गटार उकलली होती.... सगळ्या गटारी वरून ह्या गुलाबाची मुळे पसरली होती... तेंव्हा गटार साफ करताना काही मुळे तुटली गेली. त्यात जीव गेला रे आपल्या गुलाबाचा..."

माझ्यासाठी ती एक दुर्दैवी आणि अनपेक्षित घटना होती.

"आणि.... तसंही.... मिस्त्री म्हणत होते कि तसंही गटारीवरून ती मुळे संडासाच्या हौदाकडे जात होती. संडासाच्या हौदाला धोका होता त्या मुळांमुळे. आणि मिस्त्री विचारंत होते झाड तोडायचं का म्हणून... आणि..... तसंच झालं नंतर.... रोज रोज ह्याचं मरण बघतीये रे मी ह्याचं..." आईचा स्वर अजून कातर झाला.

घरातला एक सदस्य गेल्यावर जशी सुतकी कळा पसरते तशी पसरली होती त्या सकाळी.

"सकाळपासून एकही चिमणी नाही दिसली गं..."

"वठलेल्या झाडाकडे पक्षीसुद्धा पाठ फिरवतात रे"

आईचं ते वाक्य खूप जोरात घुसलं... वठलेल्या झाडाकडे पक्षीसुद्धा पाठ फिरवतात रे... आता त्यांना त्या झाडाकडून काहीच मिळणार नव्हतं ना फुल ना काही किडे जे काही खोडावर असतात ते... ना कोवळी कोवळी पानं.. ना गारवा.... कशाला येतील ती मग??

सुन्न शरीराने आणि भरलेल्या डोळ्याने मी झाडू लागलो. आईमध्ये कसलंच त्राण नव्हतं ते झाड तोडायचं... ते मलाच तोडायचं होतं... मी वर गेलो. पाठोपाठ आई आलीच. आधी ज्या ज्या तारांनी त्याला आधार दिला होता त्या तारा सोडल्या. एखाद्याची उत्तरक्रिया केल्यासारखं मला वाटत होता. झाड मोकळं झालं. खूप ओकंबोकं दिसत होतं ते, मृत शरीरच. नुसती हाडं, मांसाचा पत्ता नाही. मी थोडास्साच हिसका दिला तर चार ठिकाणी काडकन तुटल्याचा आवाज आला.. मला क्षणभर माझीच हाडं तुटल्यासारखं वाटलं.

"जरा हळू रे" आई पुटपुटली... माझा जीव खाली वर.... मी अजून एकदा जोरात ओढलं. सगळं झाड मुळासकट वर आलं. मी चांगलाच ओरबाडून निघालो. हाताला खरचटलं. क्षणभर वाटलं कि ते मला विनवतंय माझा हात धरून, कि नको रे तोडू मला.. पण पर्याय नव्हता. दहा मिनटात मी तो कधीकाळचा वृक्ष आवरला आणि बाहेर दुसऱ्या झाडाखाली ठेवून आलो. मी आत्तापर्यंत बऱ्याचजणांच्या मयतीला जाऊन आलोय... मला अगदी तसाच अनुभव येत होता.... झाड तोडताना बराच पाला खाली पडला होता. तो सावरताना, अखेरचा सावरताना मला अश्रू आवरत नव्हते... शेवटचं झाडत होतो ना मी ते... परत ते झाड, त्याची फुलं, ते पक्षी, तो पालापाचोळा.. काहीच होणार वा येणार नव्हतं तिथे... झाडून झालं सगळं.. कचराकुंडी भरली. ते बाहेर फेकून आलो. हात पाय धुतले. जरा चरचरलं मला... बाहेर आलो. अंगण बघवत नव्हतं. वाळवंटात आल्यासारखं वाटत होतं.. वीस वर्षाच्या गुलाबाचं केवळ वीस मिनटात होत्याचं नव्हतं झालं होतं...

एव्हढ्यात आई समोर आली... खूप म्हातारी वाटली मला ती... आधीच हे असं गुलाबाचं केलं होतं आणि त्यात आई अशी दिसली... त्या वेळी काय मनात आलं ते तेंव्हाही शब्दात नाही सांगु शकलो किंवा आजही नाही सांगू शकत पण लगेच आईच्या गळ्यात पडलो. दोघे मिळून रडलो..... अश्रूंमध्ये भूतकाळ अजून स्वच्छ होत होता, सगळा स्मृतिपट डोळ्यासमोर झरझर उभा रहात होता.

आधीचा तो रस्ता... ते लहान रोप... गच्चीत एक कुंडीतलं त्याचं बालरूप... परत ते खाली आणणे... आरश्यासोबतची धावपळ.... ते बोट मुडपून बोटाच्या पेराने आईचं कळी दाखवणं... तेंव्हा मी आईला ते तसं करण्याचं कारण विचारलं होतं. आई म्हणाली होती कि कळीला कधी नख दाखवू नये. मला आवडलं होतं ते कारण.... मग फुललेला आमचा काश्मीर, तो गुलकंद, ते पक्षी, सुरमयी सकाळ, चिवचिव... टिवटिव.... काय काय नि काय काय...

आठवणींचा आणि अश्रूंचा आवेग ओसरल्यावर मी देवघरासमोर जाऊन बसलो. देवपण मला जरा केविलवाणे दिसले. मला त्यांना गुलाबाशिवाय पाहायची फारशी सवय नव्हती ना... "ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो" अशी प्रार्थना केली आणि उठलो...

माझ्या बालपणावर मनसोक्त पसरलेल्या गुलाबाच्या वृक्षाची मुळे जरी मी माझ्या हाताने उखडलीअसली तरी... माझ्या आयुष्याच्या मुळापर्यंत पोहोचलेली त्याच्या आठवणींची मुळे मीच काय, कोणी काय, काळ पण नाही उखडू शकत.. त्याच्या सुगंधाने माझं बालपण तर सुगंधित झालेलं आहेच पण माझा भविष्यकाळ सुद्धा त्याच्या आठवणी सुगंधित करतील ह्यात काहीच शंका नाही...
.
.
.
पण एव्हढं मात्र नक्की. जेंव्हा जेंव्हा आता मी घरी जाईन तेंव्हा माझा हिरवं स्वागत करणारं कोणीच नसेल... नंतर आम्हीच ठरवलं कि त्याजागी दुसरं कुठलंही झाड लावायचं नाही. ती जागा त्याचीच होती. त्याची तिथली आणि आमच्या आयुष्यातली जागा कोणीच नाही घेऊ शकणार...
.
.
शेवटी त्या वरच्याला एव्हढीच स्वार्थी प्रार्थना करतो...

"जी काही माणसे माझं आयुष्य सुगंधित करत आहेत वा करतील निदान त्यातरी माणसांचा सहवास मला माझ्या शेवटापर्यंत मिळावा ..."

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

कीती सुंदर लेखन आहे.आणी हो मी पयला

पद्मावति's picture

5 Oct 2016 - 2:07 pm | पद्मावति

फार सुरेख लिहिलंय.

फारच सुंदर लिहिलंय...अगदी मनापासून..

नीलमोहर's picture

5 Oct 2016 - 2:15 pm | नीलमोहर

__/\__

सामान्य वाचक's picture

5 Oct 2016 - 2:18 pm | सामान्य वाचक

लिहिलंय

नि३सोलपुरकर's picture

5 Oct 2016 - 2:23 pm | नि३सोलपुरकर

__/\__.

जयंत कुलकर्णी's picture

5 Oct 2016 - 2:44 pm | जयंत कुलकर्णी

चांगलच लिहले आहे.... मस्तच...

प्रभास's picture

5 Oct 2016 - 3:41 pm | प्रभास

अगदी सुरेख लिहिलंय...

सिरुसेरि's picture

5 Oct 2016 - 3:41 pm | सिरुसेरि

सुंदर लेखन आणी आठवणी

खुप सुंदर लिहिलय.

--टुकुल.

अभ्या..'s picture

5 Oct 2016 - 3:52 pm | अभ्या..

मस्तच,
तुमच्या आइवडिलांचं सोसणं अन फुलवणं मी पाहिलंय.
अप्रतिम उतरलंय.

यशोधरा's picture

5 Oct 2016 - 4:17 pm | यशोधरा

अतिशय सुरेख लिहिलं आहे. मनापासून.

झेन's picture

5 Oct 2016 - 9:02 pm | झेन

सुरेखच लिहीलं आहे. सामान्य माणसांच्या भावनाविश्वाचे, संघर्षाचे, घडण्याचे नेमके वर्णन. पण असे शब्दचित्र रेखाटणा-याचे नाव वटवट ..खटकतं.

निःशब्द, अशक्य सुंदर लिहिलय!
वाखुसाआ.

खरच गावठि गुलाबाचा वास फारच सुरेख येतो. मि पण लावला आहे. लेख अप्रतिम लिहिला आहे.
त्याच्या सुगंधा चे वर्णन थोडे यायला हवे होते. त्याच्या पासुन नवे रोप बनवता आले नस्ते का?

पिशी अबोली's picture

6 Oct 2016 - 2:30 am | पिशी अबोली

सुरेख!!!

एस's picture

6 Oct 2016 - 8:15 am | एस

छान.

वटवट's picture

6 Oct 2016 - 7:53 pm | वटवट

सर्वांचा मनापासून आभारी आहे... वरच्या लेखात एक संदर्भ लिहायचा राहिलाय...
"त्या गुलाबाचा गुलकंद आईने एका संक्रान्तिला लुटला होता... सर्वांना खूप अप्रूप वाटलं होतं... कारण गुलकंद लुटणे हे नवीनच किनई??"

नाखु's picture

8 Oct 2016 - 5:11 pm | नाखु

अगदी जबरदस्त...