राऊ कादंबरीमधील एक प्रसंग

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
12 Sep 2016 - 4:46 pm

राऊ कादंबरी परत एकदा वाचून संपवली. प्रत्येकवेळी ती मनाला वेगवेगळ्या प्रकारे भिडते. अनेकांनी अनेकदा त्यावर लिहिलं आहे. चर्चा देखील झाल्या आहेत. अलीकडे बाजीराव-मस्तानी सिनेमा देखील येऊन गेला. त्या काळात तर पेशवे... मराठा साम्राज्य... प्रेम... बेबंद स्वभावाचे बाजीराव पेशवे... या सगळ्यावर खूप खुप उहापोह झालाच. म्हणून परत एकदा राऊ कादंबरी हातात घेतली होती. त्यातील एक प्रसंग मनात खूप भिडला.. टोचला... जेव्हा मस्तानीला आपा पुणे सोडून जा सांगतात आणि बाजीराव पेशव्यांचा निरोपही न घेता मस्तानी बुंदेलखंडाला रवाना होते. ही बातमी समजताच बाजीराव पेशवे दोन दिवसांची अविरत घोडदौड करत तिला गाठतात. त्यावेळचा हा प्रसंग. मी एकट्या मस्तानीच्या शब्दात मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.

केवळ आणि केवळ राऊ कादंबरीच्या प्रेमाखातर आणि जर कोणालाही लहान ३-५ मिनिटांचा performance करायचा असेल तर या प्रसंगातून मस्तानीचा एक वेगळा पैलू मांडता येईल अस वाटून....

**********

राऊ... राऊ तुम्ही आलात? या यत्किंचित कंचनीसाठी? पाउस-वादळाची पर्वा न करता जो प्रवास या दासीने दोन दिवसात केला तो आपण काही प्रहरात पूर्ण केलात... ओह राऊ! ये क्या हे? पसिनेसे सभ भिग गये! सार शरीर थकलेल दिसतंय. कुठ माझा शोध करीत आलात राऊ?....(ओढणी ठाकठीक करत मस्तानी अवगांठून खाली बसते... बाजूला राऊ असतात) राऊ एकटे धावत इतक्या दूर येतील ही या दासीला कल्पना नव्हती. आंता मात्र काही न बोलता दमलेल्या राऊनी विश्रांती घ्यावी. माझ्या या राहुटीत जे काही असेल ते स्वीकारावं एवढीच विनंती आहे. (समोर राऊ बसलेले असतात. त्यांच्या ओठांवर हात ठेवत मस्तानी म्हणते) असा हट्ट बरा नव्हे. राऊ पेशवे आहेत हे त्यांनी विसरू नये. एका कंचनीसाठी पेशवे पुण्याहून इथपर्यंत दौडत आले, हे पुण्यात समजलं तर केवढा हाहाकार होईल. तिकडे पुण्यामध्ये शोधाशोध सुरु झाली असेल. राऊ इथ आले याची वर्दी तरी पुण्याला पाठवावी. मग आम्ही सांगूच आमची कर्मकहाणी.(काही क्षण थांबून राऊ काही बोलले ते ऐकल्यासारख करत) राऊ आपण रागावू नये. ही दासी आपल्या मनान पुण्यातून बाहेर पडली नाही. राऊच्या सावलीत राहण्याची शपथ घेऊन पुरते चार प्रहरसुद्धा उलटले नाहीत, तोच मस्तानीवर हा प्रसंग आला. आम्ही खुशीनं पुण सोडलं नाही. कोणी जबरदस्ती केली म्हणून का विचारता राऊ? त्यांच नाव समजून देखील काय होणार आहे? याची काही जरुरी आहे का? वाटल्यास असं समजावं की आम्ही आपल्या मनानंच बाहेर पडलो आहोत. आमच्यावर कुणीही जबरदस्ती केली नाही.(नाही नाही अशी मान हलवत नजर खाली वळवत मस्तानी म्हणते) राऊ नका अस भरीस पाडू आम्हाला. आम्हाला हुकुम झाला.... पण यापुढे अजून काहीही सांगण्याअगोदर आम्हाला एक वाचन मिळेल तर सांगू. मी नाव सांगेन पण त्याना अभय मिळालं पाहिजे. आणि मग शब्द फिरवू देणार नाही आम्ही.............(जणू काही राऊचा हात हातात घेतला आहे अशा प्रकारे हात जुळवत) आपास्वामिंच्या कारकुनान सांगितल की मस्तानीन सूर्य उगवायच्या आत पुण्याची वेस ओलांडून बुंदेलखंडाच्या रोखानं निघून जावं. आपास्वामिनी आम्हाला हुकुम केला आणि आम्ही पुण्याच्या बाहेर पडलो. आम्हाला सक्त हुकुम होता की आम्ही कुणाला काही न कळवता ताबडतोब पुण्याची वेस ओलांडून मार्गाला लागलं पाहिजे. सारी तयारी करूनच आम्हाला हुकुम दिलेले होते.(दोन क्षण शांतता. मस्तानी खुरमांडी बदलून पाय समोर घेते आणि गूढघ्यानवर हाताचा विळखा घालत म्हणते)राऊ... तुम्ही दिलेल्या वाचनाची आठवण आहे ना? आपास्वामिनी हुकुम दिला आणि मीही तो मानला. राउनी दु:खी होऊ नये. ज्याचा इलाज माणसाच्या हातात नसतो त्याचं दु:ख करूनही उपयोग नसतो. आपास्वामिंची मर्जी मोडायची नसेल तर मला पुण्यात राहता येत नाही. तुम्ही आलात खरे मला परत पुण्यात नेण्यासाठी परंतु आपास्वामिंची आज्ञा नसतानासुद्धा आम्ही याव? त्यापरीस या चरणांशी एक विनंती आहे. मी पुण्यात राहण आता शहाणपणाच होणार नाही. माझ्याबद्दल आता राऊच्या हवेलीपर्यंत गवगवा झालेला आहे. छोटे समशेरबहाद्दरही यातून सुटले नाहीत. तेव्हा राऊनी आता मला परत पुण्यास ठेवण्याचा हट्ट धरू नये. कारण मी पुण्यात परत येण याचा आता अर्थ एकाच आहे. लोकं अस म्हणतील की राम-लक्ष्मणासारख्या या दोन भावांच्यात मास्तानिमुळे वितुष्ट आलं. या विषारी शब्दांनी लोकं मला टोचून मारतील. राऊ! कुणी तोंडावर म्हंटल नाही तरी मनात म्हणतीलच. मनातले शब्द प्रत्यक्ष बोलण्यापेक्षाही जास्त झरी असतात. तरीही राऊच्या आज्ञेबाहेर ही दासी नाही. (डोळ्यातून वाहणारी आसवं रोखण्याचा प्रयत्न करत मस्तानी पुढे बोलू लागते)एक सांगायचं होत राऊ... आम्हा बायकांना माहेरची वाट जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी प्रिय असते. पण राऊ, त्या दिवशी पुण्याहून आम्ही माहेरच्या या वाटेला लागलो तेव्हा तीच वाट आम्हाला वैरिणीसारखी झाली. आमच माहेर आता तुमच्यामध्येच आहे. ते वेगळ नाही. पण जन्म स्त्रीचा पडला. आम्ही दोन दिवस वाट चालत असताना मनात एक विचार आतून कसा डंख देत होता. सार्यांनी वाऱ्यावर सोडलं तरी स्त्रीला आपल्या माहेरची आशा असते. तो आसरा, ती सावली स्वप्नासारखी असली तरी त्या आधारावर कठीण प्रसंगातही सतीला दिवस काढता येतात. पण राऊ, ही वाट आमच्या माहेरची आहे अस फक्त म्हणायचं. कोण आहे आमच तिथं? अस वाटत की, आपल्याला कुठतरी माहेर असावं. जेव्हा आयुष्यात पराभवाचा क्षण येईल तेव्हा कुशीत दडायला कुठतरी माती असावी. लग्न झालेल्या बाईला माहेरकडून चोळीबांगडी मिळते. आम्हा कलावंतीणीना कोण देणार ही चोळीबांगडी? कुणाच्या कुशीत मान खुपसून आम्ही मनातलं दु:ख सांगाव? इतक्या दूर, एकाकी वारा, वादळ, पावसात माझ्यासारख्या क्षुल्लक कंचनीसाठी येण झाल. माझी समजूत काढून इथून राऊ मला परत पुण्याला घेऊन जात आहेत. राऊना सोडून माहेरच्या दिशेन मी तुडवालेली वाट आता इथेच संपली आहे. आता हातात हात घालून परतीचा प्रवास पुण्यापर्यंत करणार आहोत. ही वाट जिथ संपली तेच गाव चोळीबांगडी म्हणून राऊ या मस्तानीला द्या. अर्थात मनात असेल ते द्यावं. आमचा कशासाठीच हट्ट नाही.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

असो.....

मला वाटले, तुम्ही बाजीरावांच्या शौर्याबद्दल काही सांगाल.

राऊ मंजे ना स ईनामदार का ??
कालच त्यांचे शहेनशहा वाचल आणी त्यांच्या बाकीच्या लिखाणावर काट मारली..
त्यामुळे राऊ वाचणार नाही.
प्रतिसाद देणार नव्हतो पण माजे दोन दिवस गेलो हो शहेनशहा वाचण्यात total west.

चंपाबाई's picture

12 Sep 2016 - 8:47 pm | चंपाबाई

बै बै .... ८८ वर्षाच्या आज्ज्याचे चरित्र २ दिवसात कसे समजेल ?

आम्ही तर अजुन तैमूर आणि बाबरातच अडकलोय.

.... लंगडा चंपूरलंग

फेदरवेट साहेब's picture

12 Sep 2016 - 6:35 pm | फेदरवेट साहेब

कादंबरीतला भाग लिहून प्रकाशित करायसाठी राऊच्या प्रकाशकांची लेखी/ई-मेल द्वारे परवानगी घेतली आहे का?? नसल्यास तो प्रताधिकारांचा भंग म्हणवला जाईल, अश्याने मिसळपावची पत खराब होऊ शकते.

संपादक मंडळ कृपया लक्ष द्यावे ही विनंती

(फक्त मिसळपावास इमानदार)

ढेल्या

चंपाबाई's picture

12 Sep 2016 - 8:44 pm | चंपाबाई

तो प्रसंग त्यानी स्वतःच्या शब्दात मांडला आहे.

ज्योति अळवणी's picture

12 Sep 2016 - 8:48 pm | ज्योति अळवणी

मी तो प्रसंग मस्तानीच्या शब्दात मांडला आहे. एखाद्या एकांकिकेतील लहानसा भाग म्हणू हवं तर. कुठल्याही प्राधिकरणाचा भंग त्यातून होत असेल असं मला वाटत नाही. तरीही जर संपादक मंडळास हा धागा अयोग्य वाटत असेल तर तो त्यांनी काढून टाकावा ही विनंती

चांगलंय. वेगळ्या वातावरणात गेल्यासारखं वाटलं.

धन्यवाद...!!

सिरुसेरि's picture

13 Sep 2016 - 1:51 pm | सिरुसेरि

राऊ , शिकस्त , शहेनशहा पेक्षा ना. सं .इनामदार यांची झेप , झुंज , मंत्रावेगळा , इनामदारी हि पुस्तके जास्त आवडली .

हेमंत लाटकर's picture

14 Sep 2016 - 7:21 am | हेमंत लाटकर

पहिला बाजीराव म्हणले की मस्तानी आठवते, हे पराक्रमी बाजीरावांची शोकांतिका आहे.

चंपाबाई's picture

14 Sep 2016 - 11:39 am | चंपाबाई

पराक्रमी माणसाला प्रेयसी असु नये का ? त्याबद्दल ( देखील) तो प्रसिद्ध झाला तर ते वाइट का ?

कल्याणच्या सुभेदारच्या सुनेचा प्रसन्ग आठंवला.....तुमच्या या प्रश्नावरुन.....

बाबासाहेब पुरंदरेंनी या प्रसंगाचा प्रतिवाद केलाय.

पैसा's picture

14 Sep 2016 - 9:42 am | पैसा

प्रयत्न चांगला आहे, पण बेस चुकीचा निवडलात. मस्तानीवर जिवंत असताना आधीच भरपूर अन्याय झाला. ती दासी, कलावंतीण वगैरे अजिबात नव्हती. राजा छत्रसालाची मुलगी होती. आता इतक्या वर्षानी तरी चुकीच्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवू नये किंवा जाणून बुजून लिहू नये.

हेमंत लाटकर's picture

14 Sep 2016 - 10:57 am | हेमंत लाटकर

मस्तानी महाराज छत्रसाल बुंदेलाची मुलगी होती. काही लोक असेही म्हणतात मस्तानीला महाराज छत्रसालांनी दत्तक घेतले होते. मस्तानीची आई रुहानी बाई हैदराबादच्या निजामाच्या दरबारात नृत्यांगना होती.

हेमंत लाटकर's picture

14 Sep 2016 - 11:10 am | हेमंत लाटकर

मस्तानी वरील हा लेख वाचा

https://lekhsangrah.wordpress.com/2011/03/24/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C...

हेमंत लाटकर's picture

14 Sep 2016 - 11:45 am | हेमंत लाटकर

पहिला बाजीराव वरील "अजिंक्य योद्धा बाजीराव" हे जयराज साळगावकर यांचे पुस्तक छान आहे.