नमस्कार मंडळी , वसुधैव कुटुंबकम मानणारी आपली भारतीय संस्कृती. अशाच संस्कृती मधून आलेले , आपल्या परंपरेचे आणि भाषेचे जतन करणारे काही मराठमोळे लोकं मेलबर्नच्या वेस्ट भागात राहतात . त्यातल्याच काही उत्साही आणि रसिक लोकांनी एकत्र येऊन २०१६ च्या सुरुवातीपासून आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी , आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीचा , भाषेचा , रितीरिवाजांचा विसर पडू नये म्हणून छोटे मोठे मराठी सांस्कृतीक प्रोग्रॅम करायचे ठरवले. हळू हळू हाच ग्रुप वेस्ट मेलबर्न मराठी WMM या नावाने चालू झाला. लोकांचा मराठी उत्साह आणि आपल्या संस्कृतीची ओढ सगळ्यांनाच ! कारण परदेशात राहून आपल्या पुण्यामुंबईला , महाराष्ट्राला कोणीही विसरू शकत नाही, यात दुमत नाही. म्हणूनच वेस्ट मेलबर्न मराठी WMM ने यंदा २०१६ ला सार्वजनिक गणेशोत्सव करण्याचे ठरवले , आणि सगळे जोमाने तयारीला लागले . सन १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी चालू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव , आज साता समुद्रापार मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे WMM या ग्रुप ने यशस्वी रीत्या पार पाडला .
अहो मंडळी , अगदी पुणे- मुंबई येथे ज्या उत्साहाने हा गणेशोत्सव साजरा होतो अगदी त्याच , किंबहुना त्याहीपेक्षा जास्त उत्साहाने लोकांनी आनंदाने एकत्र येऊन सगळ्या अडचणींवर मात करून गणेशोत्सव साजरा करून मेलबर्नचा पश्चिम भाग दणाणून सोडला . जनगर्जना या ढोल पथकाच्या ढोल आणि ताशांच्या गजरात अतिशय सुंदर व देखण्या गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली . त्या मंगलमय वातावरणाने दाही दिशा उजळून निघाल्या. आपल्या घरट्यांपासून दुरावलेले इथले परदेशातील मराठी अबालवृद्ध, आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाने प्रफुल्लित झाले. सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही . ३ वर्षांच्या लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी विविध कला गूण दर्शनाच्या प्रोग्रॅम मध्ये भाग घेतला ! सर्वांनी दाखवून दिले कि जरी परदेशात राहत असलो , नवीन युगांच्या नवीन प्रवासात जगत असलो तरी , आमची मराठमोळी संस्कृती आणि भाषेचा आम्हाला सर्वात जास्त अभिमान आहे . आमच्या लाडक्या गणपती बाप्पा वर आमचे खूप प्रेम आहे . कार्यक्रमाची सांगता सुद्धा मराठमोळ्या मोदकाच्या चविष्ट जेवणाने झाली .
हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या कमी लोकांपासून चालू झालेला हा ग्रुप आज १५०-२०० मराठी लोकांना एकत्र करून गणेशोत्सव साजरा करतो ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे . शिवाय हा प्रोग्रॅम फक्त कला आणि मनोरंजन एवढ्या पुरता मर्यादित नव्हता तर सामाजिक आणि वैचारिक माध्यमातून मराठी समुदायाला लाभदायक व्हावा हा त्यामागचा एक उद्देश होता. सर्व कार्यकर्त्यांचा उदंड उत्साह , WMM च्या सदस्यांची निष्ठा , वचनबद्धता आणि अतूट सहकार्य ,आणि मेलबर्न मधल्या मराठी समुदायाचा सहभाग यामुळे हा प्रोग्रॅम यशस्वीरीत्या पार पडला . आपला मराठी बाणा असाच निरंतर राहो आणि आपली मराठी संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला आत्मसात करता यावी हाच वेस्ट मेलबर्न मराठी WMM चा उद्देश आहे .
धन्यवाद ,
शलाका . ( फिझा ) !!
प्रतिक्रिया
12 Sep 2016 - 4:27 pm | महासंग्राम
वाह बढिया फोटो टाकायचे असते.
12 Sep 2016 - 4:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्तचं...
12 Sep 2016 - 4:56 pm | अभ्या..
अरेवा फिझा, मस्तच की.
तुमच्या कविता अप्रतिम असतात. काही काव्यवाचनाचा कार्यक्रम केलात की नै?
12 Sep 2016 - 5:03 pm | फिझा
हो, केला ना काव्यवाचन !!
12 Sep 2016 - 5:10 pm | अभ्या..
असे काही कार्यक्रम झाले की फोटोझ, ऑडिओ क्लीप्स काढून ठेवत जा ना. आपल्या इथे प्रकशित करता येईल ते. आम्हीही अनुभवू तो कार्यक्रम.
12 Sep 2016 - 5:16 pm | फिझा
हो हो प्रोफेशनल फोटोग्राफर ने फोटो , व्हिडीओ काढलेत प्रोग्रॅम चे ,,,ते पाठवेन ३-४ दिवसात .
बाकी ,,,, मी स्टेज वर असताना आमच्या अहोंना सुचले नाही ना ,,, कि ....... बायकोचे फोटो वगैरे काढावेत ........ साधारण पुणेरी नवरे असे असतात ..... हा हा हा
12 Sep 2016 - 6:38 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
पुणेरी बायकांची एकूण हौस पाहुन काढता पाय घेत असावेत .. =))
12 Sep 2016 - 4:57 pm | मुक्त विहारि
सजावटीचे आणि कार्यक्रमाचे, फोटो दिले असते तर, लेख अजून मस्त झाला असता.
असे माझे मत.
12 Sep 2016 - 7:53 pm | रेवती
माहिती आवडली.
12 Sep 2016 - 8:18 pm | सतिश गावडे
हे ढोल ताशे आणि दणाणून सोडणं तिकडे परक्या देशातही चालू केले का?
जगाला ॐ शांती शांती शांती सांगणारा हा देश आता हा नवा वारसा जगाला देणार काय?
12 Sep 2016 - 8:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे वा ! फोटो आणि तुमच्या काव्यवाचनाचे व्हिडिओ टाका लवकर.