मजबूर मजदूर महासंघ

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
6 Sep 2016 - 6:36 am

मजबूर मजदूर महासंघ
मित्र हो.
आमच्या पुण्यात जरा आणिबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. माझ्या मित्रांच्या बायकांनी ( ऑ करून बघू नका, प्रत्येकाला एकच बायको आहे, आहे तीच पुरेशी आहे !) Great Friends नावाचा एक ग्रुप केला आहे ( माझा एक गरीब बिचारा मित्र त्याला Great Fiends म्हणतो ते सोडा ). व्हॉट्स अप वर जोरजोराने मेसेजेस पाठवले जात आहेत. आता पर्यंत घरातच काढले जाणारे आमचे वाभाडे आता काही सेकंदात पंचवीस घरात पोचत आहेत. प्रत्येकीची नखे निरनिराळी असल्याने प्रत्येकीला रोज दुसरीकडून, आरडाओरडा करावयाला, भांडण काढावयास, निरनिराळी कारणे, नवनवीन आयुधे मिळत आहेत.
"भले मोडली खोडकी" असे म्हणत खिदळू नका. हे लोण तुमच्या शहरात पोचावयाला फार वेळ लागणार नाही. Great Friends व्हायरल होणार आहेच. नंतर पस्तावयाचे नसेल तर मित्र हो, आपण आताच काही तरी करणे अत्यावश्यक आहे.
आणि हो, शहराचे जावू द्या. निदान मिपावरील मित्रांनी तरी लगेच जागरुक होणे गरजेचे आहे. इथल्या वाघिणी मनी माऊचे सोंग घेऊन साळसूदपणे वावरत असल्या तरी त्यांचे खरे रूप न कळत का होईना समोर येतेच. हा धागा पहा.http://misalpav.com/node/21687 येथे प्रतिसादात दोघी म्हणतात मी नवर्‍याला २-४ वाक्ये बोलावयास परवांगी देते तर तिसरी त्यांना सुनावते "हे कसले भलतेच लाड ? मी घरी दोन चार शब्दात त्याला गप्प करते व हेच आमच्या सुखी संसाराचे रह्स्य आहे " तेव्हा सावधान. लवकरात लवकर, एक व्हा.
आम्ही येथे "मजबूर मजदूर महासंघा" ची स्थापना केली आहे. आता मिपावरील प्रत्येक सभासद हे (निदान मनाशी) मान्य करेलच की तो मजदूर तर आहेच पण मजबूर ही आहे. मग वेळ कशाला फुकट घालवत्ता. आपापल्या भागात महासंघाच्या शाखा उघडा. आणि हो, घाबरू नका. आमच्या येथील अनुभवावरून घरची काळजी करावयाचे कारण नाही. प्रत्येक जण म्हणाली "नशीब आमचे. आता तरी, इतक्या वर्षांनी आपली पायरी ओळखलीत. काय नाव काढले आहे ! म म म संघ ? पण मंमंची वेळ झाली म्हणजे काय करंणार आहात ? करा काय वाटेल ते."
मित्र हो. पूर्वी "बालादपि सुभाषितं ग्राह्यम् " असे म्हणत. पण आता बालांची भाषिते फक्त मोबाईलमध्ये काही अडचण आली तर सोडवावयाला उपयोगी पडतात. आता शत्रुपक्षाशी सामना करतांना त्यांची कुत्सित/कडवट वचने काळजीपूर्वक लक्षात ठेवली पाहिजेत. मंमं.. प्रथम करावयाची गोष्ट म्हणजे सर्व हॉटेलमधील मेनुकार्ड घरगुती खानावळी इ. माहिती म.म.म.च्या कार्यालयात सर्वांना उपलब्ध पाहिजे. कार्यालयातच ज्येष्ठ, अनुभवी नवर्‍यांचे नवागतांकरिता अभिनयाचे क्लासेस ठेवावेत. " या ड्रेसमध्ये तू छान दिसतेस," असे महिन्यातून किती वेळ , केव्हा म्हणावयाचे, त्या वेळी चेहर्‍यावर काय भाव ठेवावयाचे, बिघडलेली भाजी खातांना चेहरा हसतमुख कसा राखावयाचा, आपली आई हीच भाजी कशी छान, चवदार करावयाची, हे बोल त्या भिकार भाजीबरोबर न बोलताच कसे गिळावयाचे इत्यादि अनेक बारकावे लग्नानंतर २-४ वर्षांनी अनेकांना उपयोगी पडतात असा आमचा अनुभव आहे. कठीण परिस्थितीत काही चलाख नवरे सहिसलामत सुटतात. त्यांचे अनुभवही कार्यालयात हाताशी असावेत.
मित्रांनो, या संघात सामील व्हावयास कोणतीही वर्गणी नाही. अध्यक्ष, चिटणीस, खजीनदार नाही. लेखी घटना नाही. फक्त घोषणावाक्य आहे "एकमेका सहाय्य करू, पाथ धरू बारचा "
कठीण समय तर सर्वांवरच गुजरतो, तेव्हा आपणच एकमेकांच्या कामी येणे ही काळाची गरज आहे.
संघात अविवाहितांना प्रवेश द्यावयाचा की नाही हे तुम्हाला बिचारड्याची किती कीव आली आहे ह्यावरून ठरवावयास हरकत नाही.
(जास्त माहिती/मदतीसाठी औरंगाबादच्या अध्यक्षांना फोन करा. ते सर्वांना मदत करावयास सदैव तत्पर असतात. आमच्या घरी मिपावर करडी नजर असते, तेव्हा सॉरी.)

शरद
(अर्धशतकानुभवी, संस्थापक, अध्यक्ष)

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

याला करारा जवाब।म्हणून "मजबूत मालकिन महासंघ" स्थापन होऊ शकतो. सावधान!

नाखु's picture

6 Sep 2016 - 2:57 pm | नाखु

मजबूतचा अर्थ महावस्ताद पासून महिषासुरमर्दीनी पर्यंत स्थल-काल-व्यक्ती परत्वे लावावा.

ता.क. आदुबाळ पुण्यात मुक्काम किती दिस.

यशोधरा's picture

6 Sep 2016 - 1:14 pm | यशोधरा

=))

छ्या:! तुम्ही अर्धशतकानुभवी असूनही अशी संघटना काढायची गोष्ट जाहीरपणे करता? या गोष्टी 'सुमडीत कोंबडी' पद्धतीने चालवायच्या असतात. ;-)

आदिजोशी's picture

7 Sep 2016 - 4:45 pm | आदिजोशी

अशा गोष्टी चार चौघात जाहीरात करून करायच्या नसतात. आणि आपली उ.न.क. असताना दुसर्‍या कुठल्या संघटनेची गरज का भासावी? उपेक्षीत नवरे कमिटी नवर्‍यांच्या सगळ्या समस्या सोडवायला समर्थ आहे.
अधिक माहितीसाठी उ.न.क. चे पुण्यातील संचालक श्री श्री डान्रावांशी गुपचुप संपर्क साधावा.

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2016 - 6:02 pm | टवाळ कार्टा

वा वा वा....काय तो विनम्रपणा...सुमडीत स्वतःच स्थापन केलेल्या संस्थेची झैरात...लैच हुच्च =))