झिंग झिंग झिंगाट....
१९७३ च्या दुष्काळानंतर एवढा भीषण दुष्काळ बीड जिल्ह्याने पाहिला नव्हता.
राम पोंढेच्या पोरांच्या शाळा केव्हाच सुटल्या. मोठा कुठेतरी बिगारी काम करीत होता तर छोट्याचे कळण्याच वय नव्हते. त्याला बिचाऱ्याला फक्त एवढेच कळत होते की आता भूक लागल्यावर मागच्याप्रमाणे खायला मिळत नव्हतं. जास्त रडारड केल्यावर धपाटं मात्र मिळत होतं.
दररोज एका तरी शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी वर्तमानपत्रातून झळकू लागल्या. राम्याने मनाशी प्रतिज्ञा केली की तो असलं काही करणार नाही.
‘‘वेळ आली तर म्या गाव सोडल, चोऱ्या करल, पण आत्महत्या करणार नाही. ही बी वेळ जाईलच कव्हातरी’’ तो मनाशी म्हणाला.
शेतात मातीची ढेकळे झाली, विहिरींचे पाणी पार आटले. जमिनीत पडलेल्या भेगात पाय भसाभसा आत जाऊ लागले. वरुणदेवाने जितराबांनी रस्ते सजविण्यास सुरुवात केली तसा राम पोंढेचा धीर सुटला. इज्या विज्याच्या जोडीचे काय करावे हे त्याला उमजेना. विचार करुन डोस्क फुटायची वेळ आली. बैलांची तर पार हाडं वर निघाली. दोन वर्षापूर्वी बक्षिस मिळविणारी हीच जोडी आहे हे सांगितले असते तर कोणाचाच विश्र्वास बसणे कठीण होते. अगदी जेव्हा फाके पडायला लागले तेव्हा राम्याने बापाजवळ विषय काढला. इज्या विज्याची वेळ आली हे उमजून राम्याचा बाप ढसा ढसा रडू लागला. ते पाहून राम्याची आठ महिन्याची पोटूशी कारभारीण हुंदके देऊ लागली. राम्याच्या आईने पण हंबरडा फोडला. दोन मुले कावऱ्याबावऱ्या नजरेने इकडे तिकडे पहात उभी राहिली आणि मग धाकटा आपल्या आज्याला जाऊन बिलगला अन् थोरला आज्येला...
शेवटी राम्याचा बाप म्हणाला, ‘‘ अरं पोरा, बैलांना मरू देऊ नकोस रं बाबा. वंझारवाडीला वनवासी आश्रमने गुरांची छावणी उघडली हाय म्हणं..तेथे नेऊन घाल.. वाचतील कदाचित..’’
‘‘ तात्या धामणगावजवळली वंझारवाडी का ?’’
‘‘होय रं बाबा तिच. पाचशे एक रुपये हायती माझ्याकडे. ते देतू तुला खर्चाला. जा आणि लगोलग परत ये... ’’
‘‘ त्यात्या अरे पण नेऊ कशी गुरं ? टेंपोलाबी पैसं लागत्यात.’’
‘‘ तो मम्हद्या आज रात्री गुरं नेणार आहे नव्हं आष्टीला... त्याच्या ट्रकमधी घाल आणि न्हे.. पण तू बी त्याच्या बरोबर जा. मी बोलतूया त्याच्या बापाशी...’ पण आष्टीला गुरं नीट उतरव नाहीतर हरवत्याल... !’’
‘‘हां ह्ये ठीक राहील.’’
असे म्हणून त्याने पोरांना व बायकोला गप्प केलं आणि तिला रात्रीची भाकर बांधण्यास सांगितली. मम्हद्याच्या ट्रकमधे त्याने त्याच्याशी दुष्काळावर चर्चा केली. सरकार काय करणार यावरही तो बोलला. मम्हद्या त्याचा लहानपणीचा मैतर.
‘‘तुझं बर हाय लेका ! दुष्काळात लई गुरं भेटतात तुला कत्तलखान्यात न्यायला. ते ऐकून मम्हद्या म्हणाला,
‘‘ अरं लेका माझ्याकडे गुरं नाहीत व्हय रं? मला काय आनंद होतूय का ही गुरे न्यायला ? खडूक जनावरांची गोष्ट वायली...’’ राम्याच बोलण ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
‘‘ आणि तुम्ही लेको, म्हातारी गुरं आम्हाला विकता तेव्हा रं ! तो कावून बोलला.
‘‘ आरं मनावर घेऊ नकोस ! जरा असच बोललो गड्या !’’
‘‘परत बोलू नकोस राम्या सांगून ठेवतू ! ’’
‘‘ बरं बाबा. आता राग सोड. मला वंझारवाडीला सोडतोस का रं!’’
‘‘सोडतो की ! पण धामणगावला ही गुरं उतरवू. मग पुढे जाऊ ! जमतय का बघ गड्या !’’
रात्री केव्हातरी राम्याने धामणगावला गुरे उतरवली. पहाटं पहाटंच वंझारवाडीला राम्या त्याची गुरं घेऊन खाली उतरला. त्याने मम्हद्याला चहा प्यायला लई मनवल पण त्याने काही ऐकले नाही. बहुदा त्याचा राग अजून गेलेला दिसत नव्हता. पहाटेच्या अंधूक प्रकाशात त्याने छावणीवर नजर टाकली. नजर जाईल तेथे जनावरांच्या आकृत्या दिसत होत्या. मधेच कोणाच्या गळ्यातील घंटा वाजत होती तर मधेच कोणी तरी हंबरत होतं. जनावरांच्या पायाशी त्यांचे मालक हताश होऊन पडले होते. तंबाखू आणि बिड्यांचा वास दरवळत होता. त्यातच शेणाचा व गुरांच्या मुताचा दर्प मिसळत होता. ही सगळी जनावरे त्यांच्या मालकांना घेऊन कालच तेथे पोहचली होती. राम्याने तेथेच आडोशाला आपली पथारी पसरली. उभ्या असलेल्या एका बैलगाडीच्या चाकाला त्याने कासरे अडकविले. इज्या विज्याकडे पाहताना त्याला भडभडून आले.... इज्याच्या गळ्यात हात घाळून त्याने त्याला कवटाळले.,
‘‘लई दिस न्हाई ठेवणार तुम्हाला इथं ! मी घेऊन जानार तुला...’’
सावरुन तोही तेथेच खाली मातीत आडवा झाला. गुरं तर आणली इथं पण आता स्वत:ला व घरच्यांना कुठल्या छावणीत ठेवायचं ? त्याने स्वत:लाच प्रश्र्न विचारला. तो मनात विचार येताच त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. डोळे पुसत त्याने त्याची मळलेली टोपी डोळ्यावर ओढली व डोळे मिटले. डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसता पुसता त्याला केव्हा झोप लागली तेच कळले नाही.
सकाळी ते मैदान एकदम गजबजून गेले. उन्हं चटके देऊ लागली. चहावाले गर्दीतून फिरु लागले. राम्याने शेजारीच पडलेल्या एका शेतकऱ्याला आता पुढे काय करायचे ते विचारले.
‘‘थोड्याच वेळात आफिस उघडंल. तेथे जाऊन नाव नोंदव आणि गुरं त्यांच्या ताब्यात दे. थोड्याच वेळात काही जण या गर्दीत फिरत्यात आपल्याला मदत करण्यासाठी...’’
एवढे बोलून तो निघून गेला. राम्याला आता काय करावं हे कळेना. त्याने तो परत येईपर्यंत तेथेच थांबायचे ठरविले. तेवढ्यात त्याला एक म्हातारा माणूस त्याच्याकडेच येताना दिसला. ‘‘बामणाचं दिसतय जणू’’ राम्या मनात म्हणाला.
‘‘राम राम ! काय नाव तुझं ?’’
‘‘राम पोंढे !’’
‘‘ ही बैलं का ?’’
‘‘हां काका !’’
‘‘बरं हा एक अर्ज तुला भरुन द्यावा लागेल. भरता येत नसेल तर १० वाजता माझ्या त्या तंबूत ये. आपण भरु दोघ मिळून. काळजी करु नकोस. काय ?’’ त्याच्याकडे हसून पहात त्यांनी त्याचा निरोप घेतला.
‘‘त्यांच्या मागे पळत जात राम्याने विचारले, ‘‘काका आपले नाव सांगा की. शोधायच कस तुम्हाला !’’
‘‘पाटकर ! पाटकर काका म्हणूनच सगळेजण ओळखतात मला !’’
त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना राम्याच्या मनात जरा धीर आला.
दहा वाजता अर्ज वगैरे भरुन झाल्यावर पाटकर काकांनी विचारले, ‘‘पोंढे गावाकडे काय परिस्थिती आहे ?’’
‘‘कसली परिस्थिती अन् कसल काय... समदं वाईटच हाय नव्ह ! खायचं काय हेच कळंना आता.’’
‘‘पुण्याला येणार का ?’’
‘‘पुण्याला ? ’’
‘‘काहीतरी काम बघू ! रहाण्याची सोय मात्र तुलाच बघायला लागंल. आमच्या बिल्डिंगमधे वॉचमनची जागा रिकामी हाय. इतके दिवस बीडमधलाच एकजण होता, तो परत गेलाय. बघ विचार कर !’’
‘‘यायला हरकत नाही काका पन बायको गर्भार हाय नव्ह ! शिवाय तात्यांना विचाराव लागल !’’
‘‘ठीक आहे. पण बायकूच बाळंतपण होईल ना पुण्यात ! हा माझा मोबाईल नं. आजच परत जा आणि येणार असल्यास मला उद्यापर्यंत कळव. मी परवा पुण्याला परत जाणार आहे... मग बोलू आपण.’’
राम पोंढे घरी परतला. त्याच्या बापाचे म्हणणे पडले की ‘‘अगोदर तू आणि लक्क्षुमी जा. मग पोरे व आम्ही लातूरला जाऊ मामाकडे.’’ सगळे ठरल्यावर राम पोंढेने पाटकरांना फोन लावला. राम पोंढे पुण्याला आला. पाटकरांकडे पोहोचला. पाटकरांच्या समोरच्या झोपडपट्टीत त्याची रहाण्याची सोय झाली...सोसायटीत काम सुरु झाले. आत्महत्या करण्याची वेळ आली नाही म्हणून राम पोंढेने देवाचे आभार मानले.
‘‘देवा तू होतास म्हनूनशान पाटकर काकांची गाठ पडली रं बाबा !’’
कामही काही विशेष नव्हते. साफसफाई, पंप चालू करणे व इतर अडपझडप कामे करणे... पगारही चांगला दिला. ५००० रुपये. जेवायचाही प्रश्र्न सुटला... सोसायटीमधील मेंबर उरलेले इतके आणून देत की बऱ्याच वेळा काही शिजवायची वेळच येत नसे. राहण्याची जागा झोपडपट्टीत असली तरी माणसे चांगली होती. केशरी, लाल, हिरवे, निळे झेंडे झोपड्यांवर फडकत होते. एकमेकात गुंतत होते पण वाऱ्याने परत सुटत होते. सोसायटीत पार्किगमधे संडास बाथरुम होती ती वापरायला परवानगी होती... राम पोंढेच्या मनात आता येथेच रहावे का हा विचार डोकावू लागला. नव्हे त्याने तो जवळ जवळ पक्काच केला म्हणाना ......
पाटकर काकांजवळ त्याने हा विषय काढला तेव्हा त्यांनी नाराजीने मान हलविली.
‘‘ हे बघ राम, गावाकडे परत जायला हवं तू. शेती, पोरं, म्हाताऱ्यांकडे कोण बघणार आणि इज्या विज्या ?’’
राम पोंढेला ते पटले पण येथेच राहण्याचा विचार काही त्याच्या मनातून जाईना. आणि आता झोपडपट्टीत त्याला मित्रही बरेच झाले होते. दररोज रात्री चौकात ते भेटत, गप्पा मारीत. अडीअडचणीला, दुखलं खुपलं तर एकमेकांना मदत करीत. लक्ष्मीही खुष होती. घर छोटे पण पत्र्याचे होते. सकाळी तापे तर रात्री गार पडे. पण एकच छोटी खोली असल्यामुळे जास्त काम नसे. पाण्याचा नळ दरवाजासमोर होता. एवढे पाणी लक्ष्मीने कित्येक दिवसात पाहिले नव्हते. नळ सोडून त्यातून पडणाऱ्या पाण्याच्या धारेकडे पहात ती गुंगून जात असे. उरलेला वेळ आजुबाजुच्या बायकांबरोबर मजेत जात होता. राम पोंढेने परत न जाण्याचा विचार मांडला आणि ती हरकून गेली. मोबाईलवरुन तिने तिच्या आईवडिलांना खुषखबर दिली. रात्री लक्ष्मीच्या पोटावरुन हात फिरवत राम पोंढे म्हणाला,
‘‘ आपलं पोरगं आता पुण्यात शिकल. लई मोठ्ठ होईल..मग परत त्या गावाकडं मी जाणार नाय... उपाशी मरायला...’’ पोराच नाव विजय ठेवायचही ठरलं..
‘‘आणि मुलगी झाली तर ?’’
‘‘ते तात्या ठरवेल. त्याला भारी हौस हाय मुलीची.’’
‘‘ उद्याच त्यात्यासाठी मम्हद्याकडे निरोप देतुया..’’
पण राम पोंढेला वाटले होते तसं त्याचा बाप काही खुष झाला नाही. त्याने मम्हद्याकडून निरोप पाठविला की त्याने गाव सोडला तर तो त्यांना व त्याला ते मेले... ते ऐकून लक्ष्मीला रडू आले.
‘‘ आगं रडू नको बाई. मी जाऊन ईन गणपतीनंतर काढंल समजूत त्यांची.... आता गप की... गणपतीला किती दिवस राह्यलं आता ? दोनच महिनं..’’
गणपती आले आणि राम पोंढेचे कामातून लक्ष उडाले. नवीन झालेल्या मित्रांसमवेत गणपतीत काय काय करायचे, मांडव कुठे घालायचा, गाणी कुठली वावायची, प्रसाद कोण देणार, वर्गणी किती मागायची अशा अनेक गोष्टींवर चर्चा झडू लागल्या. शेवटी पाटकरांनी त्याला बोलाविणे पाठविले,
‘‘ राम्या तुझे लक्ष नाही बाबा कामात. कालची तिसरी वेळ तू वरच्या टाकीत पाणी चढविले नाहीस. सगळे तक्रार करीत होते माझ्याकडे. आम्ही दुष्क़ाळग्रस्त भागातील माणसांना नोकरी देतो ते यासाठी नाही. नाहीतर येथे नेपाळी माणसे भरपूर मिळतात की आणि तेही कमी पैशात. मला वाटते तू काम सोडावेस हे बरे. आणि काम सोडून गावी जा. आता तिकडे सरकारी मदत चालू झाली आहे. काय ? समजतय का मी काय म्हणतोय ते !’’
‘‘ काका गणपतीपर्यंत सांभाळून घ्या ! मीच सोडतो काम. गावाला जाऊन येतो मग सोडतो.’’
‘‘ठीक आहे.’’ पण कामात लक्ष दे रे बाबा !’’
संध्याकाळी दोस्तांना याची कल्पना दिल्यावर त्यांनी त्याला धीर दिला.
‘‘काळजी करु नकोस ! पुण्यात काही नोकऱ्यांची कमी नाही.’’ चव्हाण म्हणाला.
‘‘ आमच्या कारखान्यात भरती होणार आहे पुढच्या महिन्यात. युनियनला सांगून तुझे काम करतो रे ! कशाला काळजी करतोस ? निकाळजेने खात्री दिली. मग सार्वजनिक गणपतीउत्सव त्यांच्या अंगात भिनला. मंडप शक्यतो निम्मा रस्ता अडवून टाकावा लागेल कारण त्याशिवाय जहिराती रस्त्यावर येणार नाहीत, नगरसेवकाकडून काय घ्यायचे याची उजळणी झाली. कोणी म्हणे कायमस्वरुपी मंडप घालून घ्यावा तर कोणी म्हणाले त्यापेक्षा मोठी पावती फाडावी. वर्गणी गोळा करण्याचे काम जोरात सुरु झाले. प्रसंगी दमदाटीही करावी लागली....राम पोंढे आता पुढाऱ्यासारखे बोलूचालू लागला होता. नगरसेवकाकडून झोपडपट्टीत किती मते आहेत याची खात्री झाल्यावर लाख एक रुपये आले. आणि मंडपाच्या मागे दररोज पत्याचा डाव रंगू लागला. पत्ते खेळतान चर्चा झडू लागल्या. प्रसंगी माफक मद्यपानही होत असे. खर्च अर्थातच गणपतीच्या कृपेने होत असे.
लक्ष्मीलाही या सगळ्याची मजा वाटत होती. गावाकडे जनावराचीही किंमत नसलेल्या नवऱ्याला एवढा मान मिळत असलेला मान पाहून तिचा उर अभिमानाने भरुन आला. शिवाय राम पोंढेचे मित्र तसे चांगले होते. वहिनी वहिनी करीत, तिला काय पाहिजे ते आणून देत. त्यांच्या बायकाही तिची चांगली काळजी घेत. लक्ष्मीचे दिवस आता भरत आले होते. मुळचीच काटक व कणखर असल्यामुळे तसा काही त्रास नव्हता, शिवाय पाटकर काकुंच्या ओळखीने महानगरपालिकेच्या दवाखान्यात नावही नोंदविले होते, त्यामुळे तीही काळजी नव्हती. कोणत्याही दवाखान्यात जावे लागेल अशी वेळ येता येता गणपती दोन दिवसावर आला.
संध्याकाळी पत्ते चांगलेच रंगले. उद्यापासून दारु नाही त्यामुळे बीअरच्या बाटल्यांचा खच पडला. सगळ्या व्यवस्थांवर शेवटचा हात फिरवल्यावर साळुंकेनी कल्पना मांडली,
‘‘राम्या तू स्पिकरची भिंत पाहिली का कधी ल्येका ? फूल आवाज सोडायचा आणि मस्त नाचायचं... काय ?’’ झिंग झिंग झिंगाट...झिंग झिंग झिंगाट... लावायची का भिंत ? बोल...
‘‘ अरे लई पैसे पडात त्याला’’ कोणीतरी
‘‘काय कमी आहे आपल्याला? पहिल्या दिवशी तरी लाऊ... माझ्या ओळखीचा आहे एक स्पिकरवाला. बोलू का ? सांगा. स्वस्तात करतो ...’’
‘‘ अरे मागच्या वेळी तो पाटकर, समोरच्या बिडलिंगमधला रे ! साधा लाऊडस्पिकर लावला तर बोंबलत आला. तो काय भिंत लाऊन देतोय ?’’
‘‘ चायला, लाटकरांचे पहातो रं मी... लाव तू... धमाल करू. ’’ राम्या म्हणाला. त्याला कामावरुन काढणार असल्यामुळे त्याच्या मनात राग होता की काय, कोण जाणे. सगळ्यांनी बाटल्या व कचरा आवरुन टाकला व घरी पोहोचले.
रात्री झोपताना राम्या बायकोला म्हणाला,
‘‘लक्ष्मी, ! ए लक्ष्मीऽऽ मंडळ यावेळी माझ्यासाठी स्पिकरची भिंत लावणार आहे माहितीए का तुला. समदी बायका, पोरी मस्त नाचतात म्हणं. दोन दिसानंतर सकाळी लावणार हाय आम्ही... नारळ मीच फोडणार हाय...भिंतीसमोर...’’
त्याच रात्री लक्ष्मीला कळा सुरु झाल्या आणि बांदलाच्या रिक्षातून राम्याने तिला दवाखान्यात पोहोचवले व सकाळी शेजारच्या बायकांना तेथे बसवून तो घाईघाईने घरी परतला. त्याला सकाळी स्पिकरवाल्याचे पैसे द्यायला जायचे होते. पैसे देऊन तो तडक दवाखान्यात गेला. बाहेरच मुलगी झाल्याचे त्याला कळले. मुलीची स्थिती जरा नाजूक होती पण काळजीचे कारण नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यावर त्याचा जिव भांड्यात पडला. डॉक्टरांनी दवाखान्यातील गर्दीमुळे तिला दोन दिवसांनीच घरी घेऊन जायला लागेल हे सांगितल्यावर तो खुष झाला.
दोन दिवसांनी लक्ष्मी बाळाला घेऊन घरी आली. आजुबाजुच्या बायकांनी घरात गर्दी केली. कोणी तिला काम करु देईना. कोणी मदतीला तेथेच थांबले तर कोणी स्वयंपाक केला. ते सगळे पाहून लक्ष्मी भारावून गेली. रात्री नवऱ्याला म्हणाली,
‘‘ आवो हे समदे किती करतात माझ्यासाठी बघाना... गणपती झाल्यावर त्यांना सगळ्यांना जेवण घालायला लागल बरं का !’’
‘‘हंऽऽऽ घालूकी...त्यात काय.. माझ्या मित्रांनाही बोलवितो...’’
‘‘लक्ष्मे तुला माहिती आहे का ? उद्या सकाळी दहा वाजता आरतीनंतर स्पिकरची गाडी येणार हाय..मग सगळी वस्ती नाचणार हाय म्हण !’’
‘‘ अगो बाय ! खरं की काय ! ’’ रात्री झोपताना राम्या लक्ष्मीला जास्तच खेटून झोपला... ‘‘हळू जरा पतर्ं वाजत्यात..’’
‘‘ मग उद्या भिंत वाजायला लागल्यावर ? तवा तर कसलाच आवाज येणार नाय ना?’’ यावर लक्ष्मी लाजली, ‘‘ चला जावा तकडं. अजून काही नाही...’’
दुसऱ्या दिवशी राम पोंढे पहाटीच उठून बाहेर गेला. सगळे मित्र जमलेच होते. गणपतीची स्थापना होईपर्यंत दहा वाजलेच. तेवढ्यात एकच गलका झाला, ‘‘ गाडी आली... गाडी आली...’’
स्पिकरची गाडी पाहिल्यावर राम पोंढेचे डोळे विस्फारले. गाडीवाल्याने झिंग झिंग झिंगाटची सी डी लावली... ‘‘ बस्स एवढाच आवाज ? राम्या म्हणाला. गाडीवाल्याने बटन पिळले आणि आसमंतात झिंग झिंग झिंगाटचा आवाज घुमू लागला. घरावरचे पत्रे वाजू लागले. बिल्डिंगमधील अनेक पाटकरांनी, लाटकरांनी खिडक्या दारे घट्ट लावून घेतली. तरी सुद्धा तो आवाज थांबणे शक्यच नव्हते... इकडे वस्तीतील तमाम जनता रस्त्यावर जमा झाली. पावले थिरकू लागली. हवेत रुमाल उडू लागले. सैराटिणी मैतर शोधू लागल्या... काही जण मंडपाच्या मागील भागात गोळा झाले. त्यात राम्याही होता... आजसाठी काहीतरी वेगळी दारु आणली होती म्हणं... त्याने बाटली तोंडाला लावली. घसा जाळत ती दारु खाली उतरली आणि राम पोंढेचे विमान आकाशात उडाले. तो सैराट झाला. झिंग झिंग झिंगाटच्या तालावर नाचू लागला.
आवाज ऐकून लक्ष्मी बाहेर आली. समोरच गाडी उभी होती. तिची छाती झिंगाटच्या तालावर उडू लागली. नवऱ्याला नाचताना पाहून तिचे भान हरपले. आसपासच्या बायकाही नाचत होत्या. तिला त्याच्याबरोबर नाचण्याची तीव्र इच्छा झाली. बाळाला पांघरुण घालून मग जावे म्हणून ती आत आली आणि थबकली. बाळाची छाती धडधड उडत होती डोळ्याची बुबुळे मागे काही आधार नसल्यासारखी खाली वर होत होती. झिंगाटच्या लहरी त्या बाळाच्या इवल्याशा कानावर पडत होत्या. त्या लहरी कानात घुसल्या. कानाचे पडदे फाडून त्या लहरींनी ह्रदयावरील दाब वाढवला. गळा आवळला गेला त्या चिमुरडीचा. पत्रे तर असे हादरत होते की पत्र्यावरच्या मातीची धार लागली होती पण त्यातही एक ताल होता.. भांडी एकमेकांवर आपटत, वाजत झांजांसारखा आवाज काढत होती. तिच्या तोंडून शब्द फुटेना. तिने धावत जाऊन बाळाला छातीशी कवटाळले व ती धावत बाहेर आली...मदतीसाठी हाका मारु लागली..किंचाळू लागली, सैराट झाली. पण त्या झिंगेत कोणाला ऐकू येणार ? शेवटी तिने तेथेच बसकण मारली.... फार उशीर झाला होता...
....... दुपारी स्मशानात गेल्यावर पाटकर काका काकू त्याला भेटले. त्यांना पाहिल्यावर मात्र त्याने मान खाली घातली. .
‘‘काका म्यां घरी जाणार हाय !’’ डोळे पुसत राम्या म्हणाला. पाटकरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला व धीर दिला.
मृत्यु घरीच झाल्यामुळे तेथील कारकुनाने एक फॉर्म भरण्यासाठी माहिती विचारण्यास सुरुवात केली....
नाव:
आडणाव: पोंढे
बापाचे नाव : राम पोंढे
आईचे नाव : लक्ष्मी पोंढे
वय : २ दिवस
मृत्युचे कारण : ओक्साबोक्षी रडत राम पोंढे म्हणाला : गणपती.. सायब गणपतीउत्सव.......
पाटकर काका त्याला घरी घेऊन आले. दारातच ही गर्दी जमली होती. एक दोन पोलिसही होते. गर्दीवर किंचाळत त्याने त्यांना हाकलले. समोर ती गाडी अजून उभी होती. गाडीला व झिंगाटला शिव्या घालत त्याने जवळ पडलेला एक मोठा धोंडा उचलला व ती काळी कुळकुळीत स्पिकरची भींत फोडण्यासाठी तिच्यावर पहिला घाव घातला...
समाप्त.
जयंत कुलकर्णी.
या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.
प्रतिक्रिया
31 Aug 2016 - 3:38 pm | संदीप डांगे
विषण्ण!
31 Aug 2016 - 3:42 pm | अनुप ढेरे
पूर्वार्धात छान जमलिये गोष्ट असं वाटलं होतं. नंतर घसरली.
"दिशा" नामक एक सिनेमा आठवला. नाना पाटेकरचा.
31 Aug 2016 - 4:07 pm | नाखु
आणि सशक्त कथा
पुलेशु नाखु
31 Aug 2016 - 5:14 pm | मुक्त विहारि
मस्त...
31 Aug 2016 - 5:27 pm | अभ्या..
माफ करा जयंतराव, हि तुम्ही लिहिलेली गोष्ट वाटत नाही. सशक्त कथाबीजाची गरज होती. हे फारच नवशिके लिखाण वाटतेय. तुमच्या जबरदस्त लेखणीची ओळख आहे आम्हाला. ते हे नाही.
31 Aug 2016 - 5:35 pm | जयंत कुलकर्णी
:-)
31 Aug 2016 - 5:49 pm | संदीप डांगे
मला वाटतं जयंतरावांनी एकटाकी केले आहे हे लिखाण!
1 Sep 2016 - 9:10 am | जयंत कुलकर्णी
बरोबर ! :-)
1 Sep 2016 - 7:31 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
1 Sep 2016 - 8:23 am | मराठमोळा
एकाच सिनेमात खुप सारे विषय हाताळण्याचा प्रयोग एखाद्या दिग्दर्शकाने केल्यास त्या सिनेमाची जी अवस्था होईल तशी या कथेची झाली आहे. कथेतला वास्तवदर्शीपणा आणि संदेश चांगला असला तरी कथावाचनाचा आनंद घेता येत नाही आणि नक्की कोणत्या सामाजिक प्रश्नाशी ती जोडावी ते कळत नाही. वर अभ्या यांच्या शंकेला भरपुर वाव आहे. :)
धन्यवाद.
1 Sep 2016 - 9:10 am | जयंत कुलकर्णी
हं . बरोबर. कथेचे दोन भाग झाले आहेत.... :-) मला खरे तर फक्त शेवटचा भाग लिहायचा होता.... :-)
1 Sep 2016 - 9:12 am | जयंत कुलकर्णी
खरे तर एखाद्या चांगल्या कल्पनेची कशी वाट लावावी हे या कथेतून शिकायला मिळावे... प्रामाणिकपणे लिहिलय ! :-)