थायलंड (एक अश्वत्थामा)

Primary tabs

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
24 Aug 2016 - 2:55 pm

व्हिएतनाम युद्ध!, दक्षिणपूर्व आशियात कम्युनिस्ट विचारसरणीचा आणि पर्यायाने रशियाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी अमेरिका, 'व्हिएतनाम' या चिमुकल्या देशाविरुद्ध १९५४ पासून इनडायरेक्ट आणि ६०साली प्रत्यक्ष युद्धात उतरली. २० दिवसांत व्हिएतनामच्या मुसक्या आवळू या वल्गनेसह उतरलेली अमेरिका प्रत्यक्ष २० वर्ष या युद्धात अडकून पडली. हिच २० वर्षे थायलंडच्या तीन महत्वाच्या शहरांच्या अंतर्बाह्य बदलास कारणीभूत ठरली.

अमेरिकेचा आजही मित्र राष्ट्र असलेल्या 'थायलंड' देशात त्याकाळी अमेरिकेने "युद्ध-तळ" बनवला होता. व्हिएतनामच्या निबिड जंगलात लढणाऱ्या सैनिकांना "R&R" (Rest and Recuperation) पॉलिसी अंतर्गत वर्षातून दोनवेळा अशी ५ दिवस सुट्टी मिळायची. रेस्ट करण्यासाठी त्यांना बँकॉक, हवाई, मलेशिया, हाँगकाँग आणि सिंगापोर अशी ऑप्शन्स असायची. त्यात बँकॉकला ९०% टक्के सैनिकांची पंसंती असायची कारण इतर ऑपशन्स मधला प्रवासातील वेळ वाचून एक जास्त दिवस अराम करण्यासाठी मिळायचा. त्यासगळ्या घडामोडीत बँकॉकच्या जवळच समुद्राला लागून असलेल्या "पटाया" या खेडेगावावर सैनिकांची नजर पडली नसती तर नवलच.

१९६० पर्यंत 'पटाया' हे मासेमारीवर उपजीविका करणारे, धुळीत हरवलेले एक शांत 'गाव' होते. अमेरिकनांची नजर पडली आणि या गावात आमूलाग्र बदल घडू लागले. पुरुषांपेक्षा संख्येने जास्त असलेल्या पटायातील स्त्रियांना गोऱ्या कांतीच्या अमेरिकनांच आकर्षण वाटल्यास नवल ते काय? बघता बघता अमेरिकनांच्या आवडीचे, त्यांच्या सोईचे 'बार, पब्स, हॉटेल्स, मॉल्स, गोल्फ क्लब्स' उभे राहू लागले. पटाया सारख्या छोट्याश्या गावाचं शहर, शहराचं महानगर अशी वाढ झपाट्याने होऊ लागली. "R&R" या टर्मचा अमेरिकन सैनिकांनी "I&I" (Intercourse & Intoxication) असं नामकरण करून टाकलं. थाई सरकारही येणाऱ्या डॉलर्सच्या मोहापायी कानाडोळा करू लागले. लोकांचा विरोध असूनही १९६६ मध्ये "The Entertainment Places Act" नावाचा "वेश्या व्यवसायला बंदी आहे (असं नाही)" असा बरेच लूप होल असलेला कायदा बनवून अमेरिकनांना मोकळं रान दिलं. १९७५ साली अमेरिकन सैन्य व्हिएतनाम युद्धात सपशेल माघार घेऊन परत गेलं, पण जाता जाता पटायाचा "वॉकिंग स्ट्रीट", बँकॉकचा "नाना प्लाझा" आणि फुकेतचा "बांग्ला" एरिया. असे तीन प्रॉस्टिट्यूट झोन बनवून गेले. थायलंडची हि ख्याती कर्णोपकर्णी जगभरात पोहोचली मग यूरोपियन्सचा, रशियन्सचा, ओघ इथे वाढू लागला. गेल्या ७-८ वर्षात चिनी आणि भारतीय पर्यटकहि कमालीचे वाढू लागलेत.

हि झाली थायलंडच्या 'नाईट लाईफ' च्या जन्माची कथा. मला उत्सुकता होती या सगळ्या अपकीर्तीबद्दल लोकल आणि इतर थाईवासियांचं काय मत असेल? थाई संस्कृतीच्या श्रीमंत मूल्यांच्या विपरीत गोष्टी डोळ्यासमोर घडत असतांना थाई मंडळी शांत कशी? माझ्या ऑफिसमधील कलिग्स, अपार्टमेंट मधील शेजारी, काही बँकॉक वासिय आणि लोकल न्यूज पेपर मधील या संदर्भातील जुने आर्टिकल्स वाचून एकच सूर जाणवला. "इट वॉज ए बिग मिस्टेक". त्यावेळच्या थाई ऑफिसिअल्सच्या दुर्लक्षामुळे, भ्रष्टाचाराच्या अमंगल युतीमुळे प्रॉस्टिट्यूशन व्यवसायाच्या हातात हाथ घालून येणारे ड्रग्स, जुगार, हिंसा, किलिंग्स, अंडरवर्ल्ड, माफिया, HIV या आतापर्यंत थाई लोकांना माहित नसलेल्या गोष्टी मूळ धरू लागल्या. इतर थाई समाजावर विशेषतः तरुण मुला-मुलींवर विपरीत परिणाम होऊ लागला, लिंगबदलाच्या शस्त्रक्रियांच पेव फुटलं होतं.(आजही आहे)

बुद्धाच्या शांती संदेशाचा खोल प्रभाव असलेल्या थाई भूमीला हि लागलेली किड स्वाभिमानी थाई लोकांना अस्वथ करत होती. उत्तरोत्तर लोकांचा विरोध वाढू लागला. "बूमबूम फॅक्टरी" हि आपल्या देशाची ओळख बदला!! यासाठी रॅलीज निघू लागल्या. (बूमबूम हा शब्द थाई भाषेत सेक्स संदर्भांत वापरला जातो), अग्र लेखांचे रतीब पडू लागले, कित्तेक इलेक्शन्स मधे प्रॉस्टिट्यूशनचा नायनाट करण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. लोक भावनेला झुकून १९९६ मधे "The Prevention and Suppression of Prostitution Act" हा कायदाही बनवला गेला. पण तोही दुबळा ठरला.

२००२ च्या स्वतःच्या वाढदिवसाच्या भाषणात राजे "भूमिबोल" यांनी "वॉर ऑन ड्रग्स"ची घोषणा केली. त्यावेळचे पंतप्रधान 'थकसिन शिनावात्रा' यांनी लागोलाग 'अँटी ड्रग' मोहीम चालू करून एका वर्षात २,५०० ड्रग्समाफिया, स्मग्लर्स, पेडलर्सना यमसदनी धाडले. पुढे ह्यूमन राईट्सच्या दबावामुळे ती मोहीम गुंडाळावी लागली. फाशीच्या शिक्षेच्या धाकाने ड्रग्सच्या व्यवसायाला बऱ्यापैकी निर्बंध आलेत पण व्यक्ती स्वातंत्र्याच्या कायद्यामुळे 'धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं' अशी परिस्थिती प्रॉस्टिट्यूशन बाबतीत झालीय.

माझ्या कलिगच्या म्हणण्याप्रमाणे हा व्हिएतनामने आम्हाला दिलेला शाप आहे. आपल्या महाभारतात जसं अश्वत्थाम्याला त्याने सोडलेले ब्रह्मास्त्र परत घेण्याची कला अवगत नव्हती तीच बिकट अवस्था थाई सरकारची झालेली आहे. अश्वत्थाम्याला जसा कल्पकल्पांतापर्यंत कपाळीची जखम घेऊन, जखमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील असा शाप आहे, अगदी त्याप्रमाणेच थाईवासी "बूमबूम फॅक्टरी" हि ओळख पुसण्यासाठी देशो देशीचे उंबरठे झिजवताहेत. मला तरी थाईवासीयांची हि जखम अश्वत्थामा प्रमाणे कायम भळभळत राहील असं वाटतंय.

ताजा कलम:-
परवाच थायलंडच्या नवनिर्वाचित महिला पर्यटन मंत्री 'कोबकार्न वाटानाव्रागकूल' यांनी सेक्स इंडस्ट्री संपवण्याचा विडा उचललाय.

समाजविचार

प्रतिक्रिया

अमितदादा's picture

24 Aug 2016 - 3:58 pm | अमितदादा

माहितीत भर पडली लेखामुळे...पण खालील वाक्य वस्तुस्थितीला धरून नाहीये अस वाटतंय...

एका पुरुषामागे दोन स्त्रिया, १:२ असं व्यस्त प्रमाण असलेल्या या देशातील

बाजीप्रभू's picture

24 Aug 2016 - 5:39 pm | बाजीप्रभू

'मेल-फिमेल' रेशो मी चुकीचा लिहिलाय. लोकल ऐकीव माहितीप्रमाणे लिहिण्याआधी थोडं गुगल करायला हवं होतं. एनीवे 'मेल-फिमेल' रेशो ९६/१०० फिमेल असा आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद

पोस्ट एडिट कशी करायची?
मला तो भाग खालील प्रमाणे चेंज करायचा आहे,
'पुरुषांपेक्षा संख्येने जास्त असलेल्या पटायातील स्त्रियांना गोऱ्या कांतीच्या अमेरिकनांच आकर्षण वाटल्यास नवल ते काय?'

अमितदादा's picture

24 Aug 2016 - 7:33 pm | अमितदादा

मलाही माहित नाही हो. संपादकांना व्यनि करावा लागत असावा असं मला वाटतंय. मदत पान वर काय आहे का पहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2016 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्हाला हवा असलेला बदल केला आहे.

जागतिक राजकारणात कळत नकळत एखादा देश कसा फरपटून जातो त्याचे हे उदाहरण आहे :(

घाशीराम कोतवाल १.२'s picture

29 Aug 2016 - 2:40 pm | घाशीराम कोतवाल १.२

तुमच्या प्रतिसादाशी सहमत

कपिलमुनी's picture

24 Aug 2016 - 8:10 pm | कपिलमुनी

तो "थाई एक्सपर्ट" आहे म्हणे !

साती's picture

24 Aug 2016 - 9:29 pm | साती

आवडला.
बरिच नवी माहिती मिळाली.

बाजीप्रभू's picture

31 Aug 2016 - 3:06 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!!

झेन's picture

24 Aug 2016 - 9:48 pm | झेन

मला वाटतं धागाकर्त्याने मांडलेला विषय गंभीर आहे , एका राष्ट्राची ओळख सुधारण्याचा प्रयत्न मांडला आहे. आपण शिमगा करण्याचा मोह टाळूया.

चंपाबाई's picture

24 Aug 2016 - 10:43 pm | चंपाबाई

कोण्च्या तरी पुस्तकात हे सगळं लिहिलय.

हे भगवंता , युद्ध होते तेंव्हा पुरुस्ष मरतात , अपंग होतात , स्त्रीया वाममार्गाला लागतात व कुप्रजा जन्माला येते.

एकेकाळी थायलंड हे एच आय व्ही चे मेजर फोकस म्हणुन कार्यरत होते. पण सरकारचे प्रयत्न व जनतेची जागृती यांच्या बळावर एच आय व्ही एपिडेमिक कंट्रोलमध्ये आले.

https://en.m.wikipedia.org/wiki/HIV/AIDS_in_Thailand

बाजीप्रभू's picture

25 Aug 2016 - 7:18 am | बाजीप्रभू

धन्यवाद! म्हात्रे सर, साती, आणि झेन
@कपिलमुनी,
मला 'कॉलींग टका' वाक्य डोक्यावरून गेलं. काय आहे ते?
मी 'थाई एक्सपर्ट' वैगरे नाहीये. मी तसं कधी क्लेम केल्याचं आठवत नाही. गेल्या ८ वर्षांपासून कामानिमित्त थायलंड मधे रहातो. थोडीबहुत थाई भाषाहि येते त्यामुळे लोकल लोकांशी संवाद होतात.

दुर्दैवाने थायलंडचं 'कानफाट्या' नाव पडल्यामुळे इमेज बिल्डिंगचे सगळे प्रयत्न सपशेल फेल होताहेत. थाई टुरिझम कधीही 'नाईट लाईफ' बद्दल जाहिरात करत नाही. इथल्या लोकल लोकांनाही "कोणीही यावं टपल्या" मारून जावं हि इमेज आवडत नाही.
फारफार तर 2 km² एरियात सामावलेले प्रत्येकी वॉकिंग स्ट्रीट, नाना प्लाझा आणि बांग्ला हे 'रेड लाईट' एरिया थायलंडच्या 513,120 km² क्षेत्रफळाच्या तुलनेत अगदीच समुंदर मे खसखस आहेत. पण दुर्दैवाने मेजॉरिटी टुरिस्ट हॉटेल्स हि याच एरियात दाटीवाटीने बांधली गेली आहेत. मोर ऑर लेस सगळ्याच देशांत प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक खुणा, निसर्ग रम्य ठिकाणं असतातच. थाई टूर ऑपरेटर्स ते दाखवतातहि पण जसं मी म्हटलं सगळी हॉटेल्स याच भागात असल्यामुळे जे जवळचं सतत दिसतं तेच लक्षात राहतं. सगळं लीगल आहे हा गैरसमच स्वैराचाराला पोषक ठरतोय. हुल्लडबाजी करून डोक्यात जाणाऱ्या काही टुरिस्टना लोकल पोलीस 'सेक्स ऍक्ट' खाली अटक केल्याच्या बातम्या लोकल न्यूज पेपर येत असतात.

इतिहासात झालेल्या चुकीची थाई लोकांना बोचत असलेली 'सल' मी पोस्टद्वारे मांडायचा प्रयत्न केलाय. टाटांची नॅनो कारला ‘गरिबांची कार’ ही ओळख पुसण्यासाठी कशी दमछाक होतेय याचं थायलंडचं "नाईट लाईफ़" हे मोठं उधाहरण आहे.

आता इतका वेळ मुनी काही बोलले नाहीत म्हणून मीच सांगतो.

त्यांचा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाहीये. टका नामक आयडी ला बोलावत आहेत म्हणून "कॉलींग टका"

ते टकासाहेब एकटे थायलंडला जावून ७ की ८ दिवस फिरून आले आहेत आणि त्यांचे नेमक्या जागा शोधण्याचे कसब आणि अनुभव वाखाणण्याजोगा आहे म्हणून त्यांना सगळेजण थायलंड एक्स्पर्ट म्हणतात.

तुम्ही करत असलेले काम आणि त्याचे मांडलेले अनुभव याबाबत सर्वांना आदरच आहे.

बाजीप्रभू's picture

26 Aug 2016 - 2:26 pm | बाजीप्रभू

म्हणजे "टका' प्रगट झाले कि कमेंट्सच्या 'माळा' लागणार आहेत.
बरंय.... त्यानिमत्ताने धागा जिवंत राहील.

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 9:42 am | संदीप डांगे

थाई सरकारकडे दोन पर्याय आहेत, अर्थात त्यांनी ते हाताळून बघितले असतील म्हणा. मी बापडा इथे बसून काय उपदेश देणार?

१. वेश्याव्यवसाय कायदेशीर करणे व त्यावर भरमसाठ टॅक्स लावणे. अगदी कुठे २००० हजार रुपये फी असेल तर २० हजार करावी, ती रक्कम आधी सरकारकडे भरावी, तिथे आपले सर्व डिटेल्स द्यावे लागतील अशी व्यवस्था करावी. थोडक्यात टोकन सिस्टीम सुरु करावी. सेक्सविलेजेस मधे गेटपास सिस्टीम (हे गेटपास परत दणदणीत पैसे भरुन मिळतील असे करावे) ठेवावी. थोडक्यात काय तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या कुठेही आड न येता प्रिविलेज बेस्ड व्यवस्था असावी. त्याने गर्दी कमी होईल आपसूक. सध्या तिकडे जाणारं पब्लिक स्वस्तात चांगलं मनोरंजन म्हणून जातंय. जर मागणी चांगली आहे तर भाव वाढवणे, दुर्मिळता निर्माण करणे हा चांगला उपाय ठरुन शकतो.

अर्थात तिथे भ्रष्टाचाराचे प्रमाण कसे आहे व लोकल नागरिकांना ही प्रतिमा बदलण्यात कीती रस आहे ह्यावर अवलंबून आहे. ही प्रतिमा बदलावी अशी फक्त उच्चभ्रू, अभिजन वर्गाचीच मागणी असेल तर मात्र कठिण आहे. सर्वांचा बिनशर्त पाठिंबा हवा.

२. अमेरिकन प्रोपागंडा पद्धत वापरणे: खर्‍या थाई संस्कृतीबद्दल अनेक चित्रपट, माहितीपट, जाहिराती, पुस्तके, साहित्य, ब्लॉग्स निर्माण करुन त्याची प्रसिद्धी करणे. हे वेळखाऊ पण परिणामकारक ठरते. प्रतिमाबदल हा भिक मागणे प्रकार नसून आक्रमक प्रकार असतो. चांगली वा वाईट प्रतिमा ही आक्रमकपणेच बदलली जाते. थाई लोकांनी त्यांचे पर्यटनस्थळांव्यतिरिक्त तिथलं सर्वसाधारण जीवन, लोकं, त्यांच्या अपेक्षा, जीवनशैली, स्वप्नं, ह्याबद्दलही दवणीय कन्टेन्ट प्रसारित केलं तर फायदा होऊ शकतो. ह्या सर्व प्रोपागंडा प्रकाराला बराच खर्च येऊ शकतो जो सेक्सविलेजेस्च्या करांमधून उभा करता येईल.

असं काही केलं असेल तर सांगा, मलाही केसस्टडी म्हणून उपयोग होईल.

बाजीप्रभू's picture

25 Aug 2016 - 10:27 am | बाजीप्रभू

मी इथे "फादर रे" फाउंडेशनसाठी विकांतात काम करतो. तिथे बऱ्याच इतर देशीय तसेच गव्हर्मेंट ऑफिसर्सशी संबंध येतो. या चर्चा त्या सर्कल मधेही होतात. तुमचे इनपुट्स कळवीन त्यांना. "Every Idea Is a Good Idea".
एक दोन दिवसांपासून न्यूज येताहेत कि,
ग्रुप बुकिंग्स असलेल्या टूर ऑपरेटर्सना सेंट्रल पटायातल्या बुकिंग्स कॅन्सल करायला लावून साऊथ पटायातल्या हॉटेल्समधे शिफ्ट करायला सांगितल्यात. म्हणजे एखादा "वखवखलेला' असेल तोच तंगडीतोड करून टेम्प्टेशन आयलंडवर जाईल. बाकी कुंपणावरचे गपचूप हॉटेलात बसतील.
केसरी टूर्सच्या आयटीनरी चेंज झाल्याच्या काही येणाऱ्या मित्रांनी कळवल्यात.

नवीन महिला मंत्रीने मनावर घेतलेले दिसतंय. लोकांचा सपोर्ट खूप आहे पण हॉटेल लॉबी खूप मोठी आहे. कशी सामना करेल कळेलच येत्या दिवसांत.

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 10:52 am | संदीप डांगे

ओ हो, दॅट्स ग्रेट! तुम्ही तिथे प्रत्यक्ष काम करत आहात हे ऐकून खूप अभिमान वाटला तुमचा!

आपल्या चर्चेतून काही विधायक घडलं तर मिसळपावचे नाव आंतरराष्टीय स्तरावर गाजेल अशी कल्पना मनात तरळून गेली. (अर्थात हे दिवास्वप्नच) काही का होईना, तिथल्या लोकांना काहीतरी मार्ग सापडू देत हीच प्रार्थना.

चंपाबाई's picture

25 Aug 2016 - 11:56 am | चंपाबाई

एच आय व्ही चा प्रसार निव्वळ टुरिस्ट करत नाहीत , नोकरीसाठी एकटे आलेले मायग्रंटही करतात.... स्वस्त सेक्स उपलब्ध असणं ही त्यांचीही गरज असते

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 12:53 pm | संदीप डांगे

कैच्याकै, तुमच्या प्रतिसादात उल्लेखलेले मी लिहिलं आहे का काही?

बाकी, थायलंड मध्ये बहुसंख्य लोक तेवढ्यासाठी जातात, एवढे लोक नोकरीसाठी थायलंडमध्ये असतील तर धन्य आहे राव तुमचं!

उगा बादरायण संबंध जोडू नका, उद्या पुण्याचं वा मुंबईचं नाव असंच खराब झाले तर चालेल काय?

चंपाबाई's picture

25 Aug 2016 - 3:00 pm | चंपाबाई

मुम्बैमध्ये बाहेरुन येणारे लोक जास्त आहेत. त्याना मायग्रंट असे म्हणतात. ते बहुतांश वेळा एकाकी असतात... अशा वेळी ते स्वस्त सेक्स पर्यायला सहज बळी पडतात... एकाकीपण , कामाचे ताण , भावना शेअर करायला कुणी नसणे , यातून ते बाहेर जातात व क्वचितप्र्संगी एच आय व्हीला बळी पडतात.

पुढे यातून त्यांचेकुटुंबित्य ..पत्नी व पुढची मुले एच आय व्ही बाधितहोतात.

म्हणुन मायग्रंट व लाँग रूट ट्रक ड्रायव्हर हे ब्रिज पॉपुलेशन म्हणुन ओळखले जातात.

मीच्तीन वर्षापूर्वी एच आय व्ही ओपीडी जॉइन केली... आमच्याकडे २००० रुग्ण होते. स ध्या ३५०० आहेत.

एच आय व्ही कसा पसरतो ... हे वाचा...

http://www.naco.gov.in/NACO/National_AIDS_Control_Program/Prevention_Str...

बाजीप्रभू's picture

25 Aug 2016 - 4:14 pm | बाजीप्रभू

चंपाताई!! HIV माहितीबद्दल धन्यवाद!
पण मुद्दा वेश्या व्यवसायाने होणाऱ्या दुष्परिणामांवर नाही तर मुद्दा त्यामुळे एखाद्या शंभर नंबरी राष्ट्राची खराब होत असलेल्या इमेज बद्दल आहे.
तसं पाहिलं तर 'इमेज' खराब होणं हा हि एक दुष्परिणामच म्हणायला हवा पण तो इतर देशांच्याबाबतीत होतांना दिसत नाही, यावर सगळा 'खल' चालला आहे. त्या मुद्दयाला धरून प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

आपल्या चंपाबाइ कडून फारच अपेक्षा....

बादरायण संबंध जोडण्यात चंपाबाई आंतरजालावर फार प्रसिद्ध आहेत.

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 3:33 pm | संदीप डांगे

You are not getting my point :(

ती तुम्ही जी गरज सांगत आहात ती वेगळी आणि एका अख्ख्या देशाची बदनामी होणे वेगळे,

हायवेवर वेश्या असतात आणि नेहमीच्या चालकाला त्या माहिती असतात , म्हणून कोणी इतर गरजवंताने हायवे वर उभ्या असलेल्या कोणत्याही स्त्रीला हटकले तर चालेल काय?

तुम्हाला मुद्दा कळतोय कि नेहमीप्रमाणेच..?

चंपाबाई's picture

25 Aug 2016 - 7:06 pm | चंपाबाई

त्यांची इमेज त्यानीच तयार केलेली असते , काही अंशी तरी.

सेक्स लाइफ एकाच एरियात रेस्ट्रिक्ट करता येइल. पण तेही अवघडच असेल... ब्रॉथेल , रस्ता , हॉटेल- धाबा बेस्ड , लॉज , एजंटचे घर , स्वतःचे घर ..... वेश्यांचे असे सहा प्रकार असतात... एका प्रकारात सापडले की त्या लगेच दुसरा प्रकार पकडतात. एकच स्त्री अनेक प्रकारातही असु शकते.

टुरिझमच्या इतर आकर्षणांवर सरकारने लक्ष द्यायला हवे.

वर्षानुवर्षे धनदांडगे लोक ज्या अपेक्षेने जातात , ते तर त्याच अपेक्षेने जाणार. ते बदलता येणे मुष्किल आहे.

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 7:51 pm | संदीप डांगे

थॅन्क् गॉड, यु आर ऑन ट्रॅक....

त्यांचा कामाचा विषय आहे रोजचा.
चंपाबाई, जर बाकी गरळ ओकणे सोडून जरा ह्या विषयावर माहीतीपुर्ण काहितरी येऊ द्या.

मुक्त विहारि's picture

25 Aug 2016 - 11:42 pm | मुक्त विहारि

बादरायण संबंध जोडण्यात चंपाबाई आंतरजालावर फार प्रसिद्ध आहेत.

बाजीप्रभू's picture

25 Aug 2016 - 10:31 am | बाजीप्रभू

त्या ठिकाणी एक बॉम्ब स्फोट करा असे आततायी सूचना देखील आल्यात लोकल लोकांकडून.

आतिवास's picture

25 Aug 2016 - 10:58 am | आतिवास

थाईलँड हा एक सुंदर देश आहे यात शंकाच नाही. तीन वेळा भेट देण्याची संधी मिळाली आणि प्रत्येक वेळी तिथल्या जनतेची दुखरी नसही जाणवली. त्याबद्दल लिहिलंत म्हणून विशेष आभार. एक लेखमालिकाच लिहा तुमच्या अनुभवांवर अशी विनंती.

बाजीप्रभू's picture

29 Aug 2016 - 10:02 am | बाजीप्रभू

धन्यवाद @अतिवास,
लेख मालिकेचा प्रयत्न नक्की करेन. मला थायलंडमधील टुरिस्ट स्पॉट ऐवजी थायलंडच्या अंतरंगाबद्दल लिहायला आवडेल.

संदीप डांगे's picture

29 Aug 2016 - 10:09 am | संदीप डांगे

टुरिस्ट स्पॉट ऐवजी थायलंडच्या अंतरंगाबद्दल लिहायला आवडेल

आतिवास ताईंचंही हेच म्हणणं असावं..

पण अजून एक कारण म्हणजे थायलंड ड्रग्ज माफियांच्या सुवर्ण त्रिकोणाचा भाग असणं. वेश्याव्यवसाय, ड्रग्ज, बेकायदेशीर शस्त्रं आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद हे एकमेकांशी interlinked घटक आहेत आणि एकमेकांना complementary सुद्धा. तरी थाई सरकारच्या कडक धोरणांमुळे थायलंडचा मेक्सिको किंवा कोलंबिया झालेला नाही हे त्यातल्या त्यात चांगलं आहे.
रच्याकने फादर रे फाऊंडेशन बद्दल उत्सुकता आहे. त्याबद्दल लिहावे ही विनंती.

थायलंडच्या सुंदरतेला या प्रतिमेचा शापच आहे.पर्यटन मंत्रीबाई सुधारणा करणार असतील तर त्यांच्या प्रयत्नांना यश येवो.
तुम्ही बघितलेले थायलंड हे खरे थायलंड नाही हे कळवळुन सांगणारा मित्र आठवला तुमचा लेख वाचून.

पद्मावति's picture

25 Aug 2016 - 4:11 pm | पद्मावति

या लेखामागची तुमची भावना आणि कळकळ पोहोचली. इतक्या सुंदर देशाला असा विचित्र शाप मिळालाय याचं वाईट वाटलं.

यशोधरा's picture

25 Aug 2016 - 7:10 pm | यशोधरा

हेच म्हणते.

शलभ's picture

25 Aug 2016 - 9:19 pm | शलभ

+१

वटवट's picture

25 Aug 2016 - 10:04 pm | वटवट

अगदी

बाजीप्रभू's picture

31 Aug 2016 - 3:08 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!! पद्मावति

बोका-ए-आझम's picture

25 Aug 2016 - 7:46 pm | बोका-ए-आझम

थायलंड सरकारचा बँकाॅक, पट्टाया आणि फुकेत यामुळे आर्थिक फायदा तर झाला असणार आणि होतही असेल. जर ही ओळख त्यांना पुसायची असेल आणि ही sin industry बंद करायची असेल तर त्यातून उद्भवणाऱ्या समस्या - बेकारी, गुन्हेगारी, अर्थव्यवस्था कुंठित (stagnant) होणं - यावर उपाय शोधायला लागेल, या industry मधून बाहेर पडणाऱ्यांना पर्याय द्यावे लागतील आणि ते पर्याय या लोकांना पसंतही पडायला लागतील. त्या अनुषंगाने काही काम चालू आहे का? अफगाणिस्तानचं उदाहरण आहे. तिथे अफूची शेती शेतकऱ्यांनी बंद करावी म्हणून पर्याय दिले गेले पण ते त्यांना पसंत पडले नाहीत.

बाजीप्रभू's picture

25 Aug 2016 - 9:12 pm | बाजीप्रभू

एकूण थाई इकॉनॉमीमधे साधारण १०% काँट्रीब्युशन असलेल्या पर्यटन व्यवसायात सेक्स इंडस्ट्रीचा नेमका वाटा किती याच्या फिगर्स खरंतर अवेलेबल नाहीत. २०१४ च्या UNAIDS च्या रिपोर्टनुसार सव्वा लाख सेक्स वर्कर्स या व्यवसायात आहेत. (लोकल न्यूज पेपर्स ३ लाख सांगताहेत) या सगळ्यांच्या उपजीविकेचं काय या कळीच्या मुद्यावर इथल्या चर्चा सत्रांत कथ्या-कूट चालू असतो. त्यातले काही महत्वाचे मुद्दे आणि थाई सरकार करत असलेले प्रयत्न पुढील प्रमाणे.
१) सर्वप्रथम परदेशी सेक्स वर्कर्सना डिपोर्ट करणे.
२) उत्तरपूर्व प्रोव्हिन्स डेव्हलप करणे ( मेजॉरिटी सेक्स वर्कर्स या प्रांतातून असतात)
३) पोलिसी कारवाई.
४) टूर ऑपरेटर्सचं प्रबोधन
५) जाहिरातींवर भर.

वस्तुस्तिथी:-
१०% तले ५% हि गमवायला थाई सरकारची मानसिकता दिसत नाही.
पोलिसी कारवाई हि आपल्या BMC च्या फेरीवाल्यांवरील कारवाई सारखी असते. पोलिसांची तुकडी आली कि तेवढ्यापुरती पांगा पांग होते. एखाद दुसरी बेसावध असलेलि पकडतात बस्स संपला शो. हे मी बरेचदा डोळ्यांनी पाहिलंय.
एक गाडी भोंगे लावून 'कुटुंबाशी लॉयल्टी बाबत' आवाहन करत दर १ तासाने फिरत असते आणि त्याच रस्त्यावर काही संस्था फ्रि कंडोम वाटत असते. असे विरोधाभास नेहमी दिसत असतात. (भोंगेवाली गाडी सांगते या वाटेल अजिबात जाऊ नका आणि संस्था सांगतात जा पण कंडोम घालून जा)
एनीवे,

प्रथमच महिला मंत्री आल्यामुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्यात. ती यशस्वी व्हावी हि माझी स्वतःची खूप इच्छा आहे. कधी नव्हे ते तिच्यासाठी गणपतीपुढे हाथ जोडलेत.

झेन's picture

25 Aug 2016 - 8:15 pm | झेन

डांगे साहेब अतिशय सकारात्मक प्रतिसाद.
बाजीप्रभू तुमच्यासारख्या प्रत्यक्ष काम करणा-यांबद्दल मनापासून आदर वाटतो.

बाजीप्रभू's picture

25 Aug 2016 - 9:23 pm | बाजीप्रभू

-

लेखामागची कळकळ पोचली.

बाजीप्रभू's picture

31 Aug 2016 - 3:09 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!!

चंपाबाई's picture

25 Aug 2016 - 10:29 pm | चंपाबाई

देशाचं नावच बदलायला हवं... नावातच थाय आणि लं* आहे. दुसरं काय होणार मग ?

गामा पैलवान's picture

25 Aug 2016 - 10:58 pm | गामा पैलवान

जुनं नाव सयाम आहे. तेच परत वापरायला काढा म्हणावं.
-गा.पै.

सुकुमार's picture

25 Aug 2016 - 11:18 pm | सुकुमार

चंपाबाईचि गाडि मगाशि चुकून रुळावर आली होति....:)

बाजीप्रभू's picture

26 Aug 2016 - 8:25 am | बाजीप्रभू

चंपाताई! सहज कुतूहल म्हणून तुमचं नेटीय वर्तन चेक केलं आणि तुमच्या 'दाणे टाकून कोंबडं झुंझवायच्या' सवयीचा उलगडा झाला. गंभीर धाग्यावर तुमचं विचारांचं सोनं लुटता येईल हि आशा जवळ जवळ संपुष्टात आलीय. वक्रदृष्टी का होईना पण या धाग्यावर तुमची नजर पडली हे महदभाग्य म्हणायचं. काही शब्दच्छल विनोद म्हणून ठीक आहेत पण त्याने काही व्हॅल्यू ऍडिशन होतं नसतं.

मुक्त विहारि's picture

26 Aug 2016 - 9:59 am | मुक्त विहारि

त्यांनी ह्या धाग्यावर मोदींना नाही आणले...

मिसळपावावरचे इतर धागे वाचुन पहा... लोक वॅल्यु अ‍ॅडिशनसाठी लिहितात की टवाळक्या करायला , ते समजेल.

इतर लोकांचे माहीत नाही...पण आपण फक्त "मनोरंजक प्रतिसाद" द्यायलाच इथे येता.

निशाचर's picture

25 Aug 2016 - 11:57 pm | निशाचर

लेख माहितीपूर्ण आहे आणि तुम्ही स्वतः तिथे काम करत आहात, याचं विशेष कौतुक वाटतं.
पण लेखातील

पुरुषांपेक्षा संख्येने जास्त असलेल्या पटायातील स्त्रियांना गोऱ्या कांतीच्या अमेरिकनांच आकर्षण वाटल्यास नवल ते काय?

हे वाक्य खटकलं. 'गोर्‍यांच्या आकर्षणाने थाय स्त्रिया वेश्या व्यवसायात आल्या' असा माझ्यामते चुकीचा सूर यातून निघतो. इतर देशांप्रमाणे थायलंड्मधेही वेश्या व्यवसाय पूर्वीपासून अस्तित्वात होत. मध्ययुगात तो लीगल होता आणि त्यावर कर होता, असे वाचल्याचं आठवतय. शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी चीनमधून स्वस्त लेबर थायलंडमधे आलं आणि त्यापाठोपाठ वेश्या व्यवसायही वाढीस लागला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत थायलंडमध्ये पोलिगॅमी होती. 'slave wife' हा पत्नीचा एक प्रकार असे आणि slave wife विकता किंवा विकत घेता येत असे. कायद्याने पोलिगॅमीवर बंदी आल्याचाही परिणाम वेश्या व्यवसाय वाढण्यात झाला असावा. (आजही थाय समाजात पुरुषांसाठी वेश्यागमन विशेष टॅबू नसावं.)
दुसर्‍या महायुद्धावेळच्या जपानी ऑक्युपेशनचाही प्रभाव पडला. अर्थात व्हिएतनाम युद्धामुळे सेक्स टुरिझम सुरु झालं, यात वाद नाही. परंतु केवळ व्हिएतनाम युद्ध आणि अमेरिकन सैनिक हीच दोन कारणे नाहीत, हे सांगावसं वाटलं.

थायलंडची ओळख बाकीच्या जगात तिथल्या नाइटलाइफ आणि सेक्स इंडस्ट्री मुळे आहे. परंतु विकीनुसार सेक्स इंडस्ट्रीमध्ये विदेशी पर्यटकांचा वाटा सुमारे २०% च आहे. ही टक्केवारी खरी असल्यास स्थानिकांचा वाटा ८०% असेल. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर निर्बंध आणण्याने किंवा इतर देशांतील थायलंडची प्रतिमा बदलण्याने सेक्स इंडस्ट्रीला कितपत आळा बसेल याबद्दल शंका वाटते. एक परिणाम हा होवू शकतो, कि इतर कामधंदे उपलब्ध असलेल्या पण विदेशी पर्यटकांकडून मिळणार्‍या पैशांच्या लोभाने वेश्याव्यवसायात येणार्‍यांची संख्या कमी होईल.

बाजीप्रभू's picture

26 Aug 2016 - 10:25 am | बाजीप्रभू

@निशाचर
खूप चांगली माहिती दिलीत, But I still stand on my statement. थोडंसं अवांतर करून तसं मला का वाटतं ते लिहितो.
आवांतर,
माझ्या अमेरिकेत असलेल्या बहिणीच्या घरी एकेदिवशी दरवाजाची बेल वाजली म्हणून उघडायला गेलेल्या भाचीला जेव्हा बहिणीने आतूनच 'कोण आहे गं? असं विचारल्यावर भाची म्हणाली "माहित नाही, कोणीतरी फॉरेनर आहे तूच बोल". त्या लोकल टेक्निशियनला पाहून बहीण भाचीला म्हणाली "अगं आपण फॉरेनर आहोत इकडे तो लोकल कामगार आहे इथला"

हा प्रसंग सांगायचं प्रयोजन यासाठी कि आपल्याकडेही फॉरेनर्सकडे स्पेशिअली अमेरिकन्स आणि युरोपियन्सकडे पहाण्याचा दृष्टीकोन थोडा अदबीचा असतो. मग तो फॉरेनर् त्याच्या देशात पत्रे ठोकत का असेना. इव्हन इमिग्रेशन ऑफिसर्स गोऱ्या लोकांशी कसे अदबीने वागतात यावरूनही लक्षात येईल. थाई जनताही याला अपवाद नाही.

इथे "फरांग" लोकल उच्चार "फलांग" हा शब्द 'फक्त' अमेरिकन आणि युरोपियन फॉरेनर्स बाबतीत वापरला जातो, तर 'कायरक' अर्थात 'गेस्ट' हा शब्द इतर देशीयांसाठी वापरतात. यातील "फलांग" बद्दल नितांत आदर तर बाकी सगळे 'कडके' किंवा 'face in crowd' सदरात मोडतात. इकडे 'फलांग'बरोबर लग्न होणाऱ्या मुली स्वतःला नशीबवान समजतात त्यामुळे अश्या अमेरिकन, युरोपियन फॉरेनर्सना गटवण्यात मुलींमधे अहमिका दिसून येते. मग तो त्यांच्यापेक्षा २० वर्षाने का मोठा असेना. असो,

मी एक जुन्या थाई गाण्याची लिंक देतो. गाण्याचं एकूण सार असं आहे कि एक शेंम्बडी मुलगी होती, शाळेत तिची सगळे टर उडवायचे मग मोठी झाल्यावर एका फलांगशी लग्न झाल्यावर सगळे अचंबित होतात, सोसायटीत तिला मान-मरातब मिळू लागतो वैगरे वैगरे.
https://www.youtube.com/watch?v=7Vxz_LPVt34
सांगण्याचा मुद्दा असा कि थाई देशात अमेरिकन, युरोपियनबद्दल कमालीचं आकर्षण आजही शाबूत आहे जे इकडच्या गाण्यांतून, नाटकांतून, सिनेमांतून दिसत असतं तर ते त्यावेळेसहि होतं. त्यात इकडे पूर्वीपासून स्त्रियांची संख्या जास्त त्यामुळे अविवाहित मुलींचं प्रमाण इकडे खूप आहे(आजही). युद्धकाळी जवळपास ८०,००० अमेरिकन सैन्यांचा राबता इथे असायचा. गोरे, धिप्पाड, आकर्षक, जोडीला पैसा या सगळयांचा परिमाण त्यावेळेस ओव्हरऑल थायलंड मधून थाई मुली पटाया, फुकेत आणि बँकॉक शहरांमध्ये मायग्रेट झाल्या. काही जोडीदाच्या शोधात तर काही पैशांच्या.

मान्य आहे वेश्याव्यवसाय पुर्विपासुन थायलंडमधे आहे इनफॅक्ट प्रत्येक देशात असा कोनाडा असतोच पण इथल्या व्यवसायाचा जगभर बोभाटा झाला तो व्हिएतनाम युद्धानंतर.

इकडे आजही "पेड वाईफ" प्रकार चालतो. रिटायर्ड झालेले त्यांच्या देशात एकाकी असलेले लाखो म्हातारे थायलंडमधे सेटल झालेत. या पेन्शनर्सचा प्रचंड पैसा इकडे रिमीटन्सच्या रूपात येत असतो. त्यांच्या देशात कमीतकमी ~२५०० डॉलर पेन्शन मिळत असलेले 'फरांग' इकडच्या लाखभर थाई करन्सीत लॅव्हिश जीवन जगतात. १५०००बाथ महिना पगार, खाणं-पिणं, कपडेलत्ते अल्लग. परवडणारे कितीतरी यूरोपियन्स "पेड वाईफ" अंडरस्टॅण्डिंग नुसार "टंच" मुलींसोबत रहातांना इकडे संख्येने दिसतात.

बाकी स्थानिकांच्या ८०% वाट्याबद्दल म्हणाल तर माझं ऑब्ज़र्वेशन असं आहे कि त्या एरियातील कॉलगर्लस स्थानिक लोकांबरोबर अजिबात जात नाही. इनफॅक्ट स्थानिक लोक या एरियात फिरतानाही आढळत नाही. कामा निमित्त येणारे मी इथे धरत नाहीये. या कॉलगर्लस भारतीयांबरोबर हि अगदीच नाईलाज म्हणून जातात. "सेल्स क्लिअरन्स" सारखं. जाऊदेत भारतीयांचं इथलं वागणं असा एक "सेंचुरी" मारणारा धागा निघेल नाहीतर.

एनीवे, तुमच्या प्रतिसादबद्दल धन्यवाद!

सविस्तर प्रतिसादबद्दल आभार!

गोर्‍या लोकांविषयी एकंदरच भारतासह आशियात आकर्षण, कुतुहल दिसतं. पण त्याची परिणिती थायलंडसारखी सेक्स इंडस्ट्री प्रस्थापित होण्यात होते असं नाही. थायलंडमध्ये अमेरिकन्सच्या गोर्‍या कांतीपेक्षा त्यांच्या डॉलरचं आकर्षण जास्त असावं का? (भारतातही गोरा पर्यटक म्हणजे पैसेवाला असा समज असतो.) तुम्ही लिंक दिलेल्या गाण्यातही तसं दिसतं. त्यात दाखविल्यासारखं ईशान्य थायलंडमधे अनेक लोकांनी मोठी घरं बांधल्याचं ऐकलं होतं. तुम्ही उल्लेख केलेल्या 'पेड वाइफ' सारखा 'मेल ऑर्डर ब्राइड' प्रकारही आहेच. परंतु हे सगळं निव्वळ स्त्रियांना असलेल्या गोर्‍यांच्या आकर्षणातून सुरू झालं असावं, असं वाटत नाही.

इथे उदाहरण म्हणून फिलिपिन्सचा उल्लेख करवासा वाटतो. तिथे थायलंडपेक्षा खूप जास्त गरिबी आहे. व्हिएतनाम युद्धादरम्यान तिथेही अमेरिकन बेसमुळे 'सिन सिटी' तयार झाली. आजही तिथे सेक्स इंडस्ट्री आणि तदनुषंगाने येणारे प्रश्न आहेत. पण त्यांचं प्रमाण थायलंडएवढं नाही आणि तेवढी कुप्रसिद्धीही नाही.

थायलंड बदनाम होण्यात तिथला प्रॉस्टिट्युशनबद्दलचा दृष्टिकोन, कर्माधारित संस्कृती, स्त्रियांचं स्थान, गरिबी (किंवा सहज मिळणारा पैसा) ते भ्रष्टाचार, सरकारी धोरणं, नपुंसक कायदे (बहुधा ६० च्या दशकातील एका कायद्याने प्रॉस्टिट्युटला गुन्हेगार ठरविले होते, पण गिर्‍हाईकाला नाही!) असे अनेक घटक आहेत. व्हिएतनाम युद्ध संपत आल्यावर वर्ल्ड बँकेने थायलंडसाठी बनविलेल्या डेव्लपमेंट प्लॅनमधे पर्यटनवाढ हा एक मुख्य घटक होता. हा प्लॅन आणण्यात मुख्य भूमिका बजाविणारे तत्कालिन वर्ल्ड बँक प्रेसिडंट हे त्याआधी (युद्धादरम्यान) अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ डिफेन्स असताना थायलंड आणि अमेरिकेची R&R ची काँट्रॅक्ट्स झाली होती. पट्टाया वगैरे डेव्लप होण्यात थाई सैनिकी अधिकारी आणि राजकारणी यांचाही हात असावा. वर्ल्ड बँकेचा प्लॅन आल्यावर सेक्स टुरिझमने तिथे मूळ धरले.

स्थानिकांच्या ८०% चा उल्लेख सेक्स टुरिझम हा सेक्स इंडस्ट्रीचा एक तुलनेने छोटा भाग आहे, हे सांगण्यासाठी केला होता. तुम्ही म्हणता तसं स्थानिक आणि विदेशी असे वेगवेगळे सेगमेंट्स असतील तर फक्त सेक्स टुरिझमवर क्रॅक डाउन fair वाटत नाही. त्याऐवजी प्रभावी कायदे आणि त्यांची कडक अंमलबजावणी हा एकच मार्ग दिसतो. संदीप डांगे यांनी म्हटल्याप्रमाणे प्रोपागांडा शिवाय family destination म्हणून देशाला विकसित व प्रमोट करणे (तिथे पुरुष पर्यटक खूप जास्त येतात, हे तुम्हाला माहित असेलच) असे long term उपाय योजावे लागतील. या सगळ्यासाठी लागणारी राजकिय स्थिरता आणि ईच्छाशक्ती तिथे सध्या आहे का, हाही प्रश्न आहे.

तुमच्या प्रतिसादांतून कळलं कि तुम्ही थायलंडमध्ये राहता. तुमच्या तिथल्या इतर अनुभवांविषयी वाचायला नक्कीच आवडेल. बाकी भारतीयांच्या वागण्याबद्दल अत्यंत सहमत!

शेवटी थाई म्हणतात, तसं स्वस्ति!

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Aug 2016 - 9:10 am | कैलासवासी सोन्याबापु

बाजीप्रभू तुमची कळकळ अतिशय नीट पोचली!! तुमचे कौतुक वाटते, तुमच्या कामाला शुभेच्छा. :)

बाजीप्रभू's picture

26 Aug 2016 - 12:42 pm | बाजीप्रभू

अगोदर फोटो चढवायची आयडिया फ्लॉफ झाली म्हणून हा २nd अटेम्प्ट. 'म्हात्रे' साहेबांचा डोस मिळाला खूप बरं झालं. मेमरी रिस्टोर झाली.

देशपांडे भारी लिव्हलेत कि तुम्ही.
चांगला अभ्यास आणि ऑब्झर्वेशन्स आहेत.
किपीटप.

भ ट क्या खे ड वा ला's picture

26 Aug 2016 - 8:06 pm | भ ट क्या खे ड वा ला

बाजीप्रभू, तुमची कळकळ जाणवली खरच चांगल करतायजीथे राहतो त्या जागेच समाजाचं एक प्रकारे देणं लागतो आपण ते फेडताय तुम्ही .
थोडफार माहीत होत या बाबत पण आपला लेख आणि काही अभ्यासपूर्ण प्रतिकिया वाचून खूपच भर पडली .

भ ट क्या खे ड वा ला's picture

26 Aug 2016 - 8:06 pm | भ ट क्या खे ड वा ला

बाजीप्रभू, तुमची कळकळ जाणवली खरच चांगल करतायजीथे राहतो त्या जागेच समाजाचं एक प्रकारे देणं लागतो आपण ते फेडताय तुम्ही .
थोडफार माहीत होत या बाबत पण आपला लेख आणि काही अभ्यासपूर्ण प्रतिकिया वाचून खूपच भर पडली .

अस्वस्थामा's picture

26 Aug 2016 - 8:54 pm | अस्वस्थामा

हे असंय होय, आम्हाला वाटलं अजून कोणी आमच्यावर लेख पाडून राह्यलंय परत एकदा.

#### ऑन द सिरियस नोट ####

तुम्ही एका महत्त्वाच्या विषयाला हात घातलाय आणि लिहिलंय चांगलंच. पण काही मुद्दे पटलेले नाहीत. अमेरिकन बर्‍याचशा गोष्टींसाठी कारणीभूत असले तरी इथे त्यांच्यावर आरोप लावताना सरसकटीकरण होतेय असं वाटतंय.
त्या त्या लोकांच्या समस्यांसाठी ते ते लोक अथवा त्यांचा समाज/समाजाचा प्रभावशील घटक कारणीभून असतो.
बाकी सगळे कॅटालिस्ट बघा. म्हंजे उदा. अमेरिका सपोर्ट (शस्त्रे, पैसा इ.इ.) इस्राईललापण देते आणि पाकिस्तान इ. ला देखील. कोणी त्याचं काय करतेय त्यावर पण बरंच काही आहे हो.

मयुरा गुप्ते's picture

26 Aug 2016 - 9:15 pm | मयुरा गुप्ते

बाजीप्रभु, तुमची कळकळ तुमच्या लेखातुन व तुम्ही करत असलेल्या कार्यातुन जाणवली. काहि अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया वाचुन ही बरीच माहिती मिळाली.
एक पर्यटक म्हणून वरवर सांगोपांगी थायलंड चांगलं दिसत असलं तरी आतुन अतिशय बिकट परिस्थिती वाटते. एक प्रकारची गुलामगिरीच ती.. काहि लादलेली काहि स्वतःहुन ओढवुन घेतलेली. गुलामगिरीचा विळ्खा म्हणजे टाळी एका हाताने वाजत नाही ह्या प्रकारात येतो.
तुम्ही जसं तुमच्या वरच्या प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे :"गोर्‍या कातडीचे आकर्षण, समाज मान्यता, पैशाचा ओघ" अशा कितीतरी छुप्या गोष्टी आहेतच की, त्यांच्या बद्दल मानसिकता कशी बदलायची. मुळात हे सगळं चुकिचं आहे किंवा वाईट आहे, धोकादायक आहे हेच कोणाकोणाला माहितेय अथवा पटतयं, कारण आपल्यावर काहि अन्याय होतच नाहिये अशी जर धारणा डोक्यात असेल तर पुढे जाणं जिकरीचे आहे.
तुमच्या कार्याला शुभेछ्च!

--मयुरा

बाजीप्रभू's picture

27 Aug 2016 - 8:11 am | बाजीप्रभू

निशाचर, अस्वस्थामा आणि इतर काही प्रतिक्रियांमधे 'अश्वत्थामा' लेखात अमेरिकेला जवाबदार धरू नये असं मत मांडलय. खरंतर हे मत तुमचं, माझं इनफॅक्ट थाईवासियांचं देखील आहे. सदर लेखात तुम्हाला वाटतो तसा अमेरिकाविरोधी सूर दिसत असेल तर ते माझ्या लिखाणातील अपयश आहे म्हणून हा जास्तीचा खुलासा.

थायलंडमधील एकूण 'नाईट लाईफ' ला व्यावसायिक रूप येणाचा ट्रिगर पॉईंट कोणता? यासाठी इतिहातील व्हिएतनाम युद्ध आणि अमेरिकनांचा रेफेरन्स दिलाय. इथल्या न्यूज चॅनल्सच्या चर्चा सत्रांत तसा उल्लेखही होतो. पण त्या चर्चा सत्रांत आणि इतर थाईवासीयांना यात अमेरिकेची चूक आहे असं बिलकुल वाटत नाही. तो सगळा राजीखुषीचा मामला होता हे थाई लोकांनी मान्य केलेले आहे. कुठल्याही रॅलीजमधे अमेरिका विरोधी घोषणा दिसत नाही इनफॅक्ट त्यानिमित्ताने झालेल्या इतर डेव्हलपमेंटबद्दल अमेरिकेचे आभार मानताना दिसतात.

आजची प्रतिमा हि थाई सरकारने त्यावेळेस स्वतःच्या पायावर मारून घेतलेल्या धोंड्याचे परिणाम आहेत हे थाई जनतेने एक्सेप्ट केलेले आहे. जसं आपल्या महाभारतात जेव्हा अर्जुन आणि अश्वत्थामाने एकमेकांवर ब्रम्हास्त्र सोडले पण त्यामुळे सृष्टीचा नाश होईल हे ओळखून श्रीकृष्णाने दोघांनाही आपापली अस्त्रे मागे घेण्याची विनंती केली. अर्जुनाला ते जमलं पण अश्वत्थामाला नाही, त्याप्रमाणेच त्यावेळेसही थायलंड मधील बुद्धिजीवी, द्रष्ट्या लोकांनी आताची 'प्रतिमा' प्रिडीक्ट केली होती. थाई सरकारला विनंती केली होती कि या बजबजपुरीला वेळीच आवर घाला अन्यथा हिच बजबजपुरी भविष्यात थायलंडची ओळख होईल. झालंही तसंच.

थाई सरकारने तेव्हा दुर्लक्ष केलं, १०%-१२% टक्क्यांच्या त्याकाळच्या ग्रोथरेटमुळे सगळ्यांचेच डोळे दिपून गेले होते. अमेरिकन्स म्हणतील ती पूर्व दिशा होती. एक वानगीदाखल उधाहरण देतो. पूर्वी थायलंडचे इलेक्ट्रिकचे ऑन-ऑफ बटनही आपल्यासारखेच होते (खाली केलं कि चालू आणि वर केलं कि बंद) तेहि त्याकाळात उलटे केले गेले, यावरून अमेरिकन्स किती सूक्ष्म प्रभाव पाडून गेले याचा अंदाज येईल. म्हणूनच लेखात अमेरिकेचा उल्लेख प्रामुख्याने येतो.

मिपावरील वैचारिक प्रग्लभता आणि तश्या प्रतिक्रिया पाहून सगळ्यांचेच आभार मानायचा मोह या 'खुलासा पोस्ट' निमित्ताने आवरता येत नाहीये.

देशाबद्दल पण त्याच देशाच्या माहीती नसलेल्या दु:खाबद्दल मिपावर प्रथमच वाचत आहे,या निमित्ताने माणूस की किस्त्रीम मध्ये वाचलेला लेख आठवला.

भारतात एक जिल्हा वजा गाव- आहे तेथून स्त्रीया या व्य्वव्सायासाठी शहरात येतात (अगदी परंपरा असल्यासारखे हे चालू आहे) आणि त्यांच्या उपजीवीकेवर गावाकडे बाप्येही स्वतःचा कुटुंबाची गुजराण करतात. काही संस्था प्रबोधन करून इतर कामात्/शिक्षणात आणित आहेत मुलींना.

आपल्या उपक्रमास शुभेच्छा

मिपा वाचक नाखु

झेन's picture

29 Aug 2016 - 6:59 pm | झेन

नाखु बहुधा तूम्ही म्हणता ते गाव/जिल्हा नेपाळ मधला असावा

अनिंद्य's picture

3 Aug 2019 - 5:25 pm | अनिंद्य

@ बाजीप्रभू,

आज हे वाचले, याविषयी थाई मित्रांशी झालेले संवाद आठवले.

....... मला थायलंडमधील टुरिस्ट स्पॉट ऐवजी थायलंडच्या अंतरंगाबद्दल लिहायला आवडेल.....

प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे तुम्ही हे कराच अशी माझी करबद्ध विनंती _/\_

अनिंद्य

तमराज किल्विष's picture

6 Aug 2019 - 5:54 pm | तमराज किल्विष

मागे थाई लग्नाविषयी फोटोंसकट लेख आपणच लिहिला होता काय. आवडला होता. या विषयावर नंतर लिहितो.

उशिरा वाचनात आलेला चांगला धागा! (काही) प्रतिसादही वाचनीय आहेत.