अत्ययिक अवस्थेत वैद्यकीय सेवांचे नियोजन असा आम्हा मंडळींना न आवडत्या विषयाची मांडणी करत असताना तो प्रसंग पुन्हा आठवला.
१३ वर्ष झाली मागिल कुंभमेळ्याला. संघटनेचे पदाधिकारी असल्याने अगदी रामकुंडापर्यंत सहज फिरता यायचं. आम्ही सकाळीच जाऊन बसलो. गर्दी प्रचंड होती. महापौरांच्या जथ्यात सामिल होऊन सर्व परिस्थितिचा आढावा घेवुन (म्हणजे काय केले, त्या बापुड्या महापौरास आणि लस्सीवाल्या पांडेलाच माहित) घाटाच्या पाय-यांवर ठाण मांडला. एक एक आखाड्याचे साधु यायला सुरुवात झाली. गम्मत म्हणजे महापालिकेतर्फे Live Commentary सुरु होती या सगळ्याची. दोन आखाड्यांच्या मधल्या वेळात filler म्हणुन नगरसेवक, आमदार सपत्नीक शाही स्नानाचे पुण्य पदरी पाडुन घेत होते.
दुपारपर्यंत सारं असं आलबेल सुरु होतं. दुतोंड्या मारुती जवळ एक तरुण वाहुन चाललाय असं कोणितरी सांगितल म्हणुन तिकडं गेलो आणि रुममेट्सला घेऊन येण्यासाठी माघारी निघालो. हौस म्हणुन सरदार चौकातुन भर गर्दीतुन उलट्या दिशेने जायला लागलो. छातीला कार्ड लावलेले असल्याने सा-या गर्दीचे नियंत्रण केले पाहिजे असा असामान्य विचार आणि भाबड्या भाविकांना शिव्याशाप देत कसेबसे काळारामाच्या डाव्या दरवाजा पर्यंत पोहोचलो.
अजुन एका आखाड्याची गर्दी वाढली. काहीतरी करायचं म्हणुन लोकं सरळ रस्त्याऐवजी बाजुच्या छोट्या छोट्या बोळांमध्ये शिरली.
शंकराचार्य मठापर्यंचे वळण, रस्त्याचा उतार, बंद बोळातुन पुन्हा माघारी फिरुन गर्दीत मिसळणारी गर्दी ... तितक्यात त्या मुख्य साधुने काहीतरी वर उधळलं . कोणितरी ते उचलायला खाली वाकलं. त्याला अडखळुन कोणीतरी पडलं अन् अनर्थाला सुरुवात झाली. चेंगराचेंगरी, आरडाओरड, गोंधळ. आमच्यापासुन ५० मिटर अंतरावर हे सारं झालं. तिथपर्यंत पोहोचायला २० मिनिट लागली. सुन्न करणारं चित्र होतं समोर. रस्ताभरं आडवे पडलेलें, विव्हळणारे, धुळीने माखलेले, एकमेकांवर पडलेले लोकं. पुढे अॅम्ब्युलन्स आहेत हे माहित होतं, पडलेल्यांची Pulse बघायला लागलो. सोबत स्वयं सेवकांची संख्या वाढायला लागली. कुठुनतरी चादरी आल्या. जे जीवंत आहेत त्यांना पहिले हालवणं आवश्यक होतं. पुन्हा त्यातही गोंधळ सुरु झाला. दोन्ही अॅम्ब्युलन्स Dead bodiesनेच भरल्या. पहाटे अॅम्ब्युलन्स लावल्या तेव्हा रस्ता मोकळा होता. दिवसभरात अतिविशिष्ठ लोकांच्या गाड्या लागून अॅम्ब्युलन्सचा परतीचा मार्गच बंद झाला होता. पुढच्या अॅम्ब्युलन्स यायला तासभरापेक्षा जास्त वेळ गेला. मधल्या वेळात मिडीयाचे कॅमेरे पोहोचले. मग चमकेश गर्दी, स्वयंघोषित पुढारी..... सारे काही पद्धतशीर झालं.
First Responder, Basic Life support, Disaster Management, Crowd control, Civic sense, Primary Care या सहज शिकवता येण्यासारख्या अतिशय प्राथमिक बाबी आहेत असं त्या दिवशीही तितक्याच कळकळीनं वाटलं होतं...
प्रतिक्रिया
30 Jul 2016 - 7:22 pm | कविता१९७८
छान लेखन, disaster management वर आणखी वाचायला आवडेल
30 Jul 2016 - 8:38 pm | एस
कळकळीने लिहिलंय. पोचलं.
30 Jul 2016 - 8:53 pm | मुक्त विहारि
मानसपूजा हीच खरी पूजा.
त्यामुळे आम्ही तरी तीर्थक्षेत्री जात नाही.
1 Aug 2016 - 7:59 am | संजय पाटिल
सहमत!!!
31 Jul 2016 - 1:19 am | पद्मावति
..सहमत!
1 Aug 2016 - 8:40 am | संदीप डांगे
आणि म्हणून यावर्षी करकचून मुस्कटदाबी करण्याचे कारण प्रशासनास मिळाले, लोकांनी गोदावरीला पोहोचूच नये असा काही चंग पोलिसांनी बांधला,लहान थोरांचे दहा दहा किमी पायपीट करून हाल हाल होण्यामागे हा प्रसंग कारणीभूत ठरला याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला,
असो,
1 Aug 2016 - 9:12 am | नाखु
तळमळीने लिहिला आहे हे जाणवते आणि हे.
सत्यकथन आहे जे मिडीया कधीही लोकांपुढे आणणार नाही हे नक्की.
1 Aug 2016 - 3:14 pm | जगप्रवासी
सरकारचा कसा हलगर्जीपणा चालू आहे हे सांगणार. बाकी लेखामागची भावना पोहोचली.
4 Oct 2017 - 5:01 pm | vcdatrange
मुम्बई च्या घ ट ने निमित्त पुन्हा एकदा सारा प्रसन्ग आथवला