'माज' आणि 'मान'!
गाडी सुटतासुटता धावत येऊन त्याने डबा पकडला आणि धापा टाकत एका रिकाम्या सीटवर बसून त्याने आसपास नजर फिरवली.
बहुधा फर्स्टक्लासचा प्रवासी असावा. हातात आयफोन, मनगटावर चकचकीत ब्रेसलेट, गळ्यात जाडजूड 'चैन', बोटात अंगठ्या आणि चेहऱ्यावर चोपडलेला चकचकीतपणा! नजरेत तुच्छ तुटकपणा ओघानेच आला...
गाडीनं वेग घेतला आणि त्यानं हातातली 'मिन्ट'ची घडी उलगडली. बॆग उघडून लहानसा टप्परवेअर बाहेर काढला, आणि मिन्ट वाचत डब्यातला एकएक तुकडा चघळू लागल्या.
जगाला फाट्यावर मारतो, असे इतरांना वाटण्यासाठी जे जे करायचे असते, तसंच करू लागला.
समोरच्या बाकड्यावरचा एक पोरगेलासा साधा, गरीब वाटणारा तरूण काहीसा दडपूनच त्याच्याकडे एकटक पहात होता.
पेपर वाचत खातानाही, आपल्याकडे कुणी पहातय की नाही याचा तो अंदाज घेतोय हे स्पष्ट जाणवत होतं. मधूनच तो फस्टक्लासच्या डब्याकडेही वाकून पहात होता.. तेवढ्यात एक भिकारी समोर हात पसरून उभा राहिला. त्यानं दहा रुपयाची नोट काढून भिकाऱ्याच्या हातावर ठेवली आणि इकडेतिकडे पहात तो स्वतशीच हसला..
अचानक त्याची नजर त्याच्याकडेच पाहणाऱ्या त्या तरुणावर खिळली. तो मुलगाही त्याच्याकडेच पहात होता. मुलाकडे पाहून तो पुन्हा छद्मी हसला. आणि हातातला डबा त्या मुलासमोर धरून डोळ्यांनीच 'घे' अशी खूण करत त्याने आजुबाजूला बघितलं.
मुलगा क्षणभरच गांगरला. दुसऱ्याच क्षणाला, नम्रपणे त्याचा हात बाजूला करून, मानेनच त्यानं त्याला 'नाही' म्हणून सांगितलं. त्या मुलाच्या नजरेत कमालीचा ठामपणा भरला होता.
याने पुन्हा आजूबाजूला पाहिलं. सगळ्यांच्या नजरांमध्येे त्याला धडा शिकवल्याचा आनंद उतरला होता. अपमानित झालेला तो आणखीनच चरफडला...
... 'गरीब आहे, पण किती माज आहे बघा! ' तो माझ्याकडे पाहून रागानंच बोलला.
मग मलाही राहवलं नाही.
'का?.. गरीबानं माज करायचा नसतो?'... मीही रागानेच त्याला विचारलं.
'आणि तो माज नाही. 'स्वाभिमान आहे! '... मी जोरात बोललो.
तो पुरता वरमला होता. गप्पच बसला.
त्यानं पेपर गुंडाळला. माझ्याकडे तिरस्काराने पाहातच तो उठला आणि पुढच्या स्टेशनवर उतरून पळतच त्याने बाजूचा फर्स्टक्लास पकडला.
त्या गर्दीत उभा असतानाही त्याला रिलॆक्स वाटत होते. मधेच एकदा जाळीतून त्याची माझी नजरानजर झाली. आणि तो पुन्हा चरफडला!!
प्रतिक्रिया
28 Jul 2016 - 4:27 pm | तुषार काळभोर
हम्म
28 Jul 2016 - 4:36 pm | एस
तृतीयपुरुषी वरून एकदम प्रथमपुरुषी निवेदनावर उडी घेणे हे धक्कातंत्र दरवेळी जमून येतेच असे नाही. बाकी कथेतला भाव आवडला. पुलेशु.
28 Jul 2016 - 4:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहित राहा. कथा उत्तम पोहोचते.
-दिलीप बिरुटे
28 Jul 2016 - 4:39 pm | अभ्या..
आह्हा, सर म्हणाले.
आम्हीबी तेच म्हणतो
28 Jul 2016 - 7:36 pm | विवेकपटाईत
कथा आवडली. भाव पोहचला.
28 Jul 2016 - 10:07 pm | अभिजीत अवलिया
आवडली
29 Jul 2016 - 12:20 am | ज्योति अळवणी
Perfectly right. आवडलं
29 Jul 2016 - 8:42 am | नाखु
सुटसुटीत आणि योग्य ठिकाणी "टोचणारी"
पुलेशु
मिपा वारकरी नाखु
29 Jul 2016 - 10:19 am | मी-सौरभ
छान!!
29 Jul 2016 - 3:12 pm | राजाभाउ
छान कथा.
29 Jul 2016 - 6:35 pm | पैसा
कथा आवडली.