एक संघ मैदानातला - भाग १७

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
11 Jul 2016 - 6:14 pm

आम्ही रूमवर पोचलो तेव्हा दोन हरलेल्या संघानी बोजा-बिस्तर आवरला होता. त्यांना हैदराबादची कनेक्टेड टूर असल्यामुळे ते उद्या पहाटे निघणार होते. एकूण काय तर शाळेतली कावकाव जरा कमी होणार होती.
रोज रुमवर आल्यावर झालेल्या जखमा साफ करणे हा एक मोठा प्रोग्राम असायचा. हात पाय स्वच्छ केल्यावर प्रत्येक जण आपापले मेडिकल किट समोर ठेऊन जखमांची रंग-रंगोटी करायचा. तळपायाची निघालेली सालटी, फुटलेले गुढघे, कोपरं, खरचटलेले हात-पाय आणि लागलेलले मुके मार ह्यावर प्रयोग करताना इतर मुलींच्या तोंडाची चक्की अखंड चालू होती. मी आणि रूपा मात्र उद्या काय करावं आणि कस करावं हा विचार करत होतो. त्या कार्ट्याला समोर आणायचं असेल तर किट न घालताच गेलं पाहिजे. किट नाही घातले तर मुली आणि दादांच्या प्रश्नाला तोंड द्यावं लागेल आणि जर घातलं तर प्लॅन फ्लॉप होणार.

काय करावं आणि कसं हाच विचार चालू होता. सगळीकडे औषध चोपडल्यावर आम्ही सगळ्याजणी शक्यतो तासभर चालायचे टाळत असू जेणेकरून लावलेले औषध जखमेवर जास्त वेळ राहावे. आता तर औषध लावून झाले होते बसल्या- बसल्या उगाच टाईमपास सुरू होता. आम्हाला तुप्या आणि जागुला ही गोष्ट सांगायची घाई झाली होती. तसंच सरकत सरकत मी तुप्याजवळ गेले. रूपा तिच्या बाजूलाच बसली होती जागूला खुणेने बोलावून घेतले. तीही सरपटत आली.
" तुम्हाला काहीतरी सांगायचंय..."
" बोल ना मग.. " " ऐ... ही बघा काहीतरी सांगणार आहे... " मी काही म्हणायच्या आधी जागू किंचाळली.
मी कपाळावर हात मारला " च्याआयला... मीच मूर्ख जे तुला सांगतेय ... ऐ बाई... गप ना जरा.."
तो पर्यंत उरलेले ८ साप सरपटत आमच्या दिशेने यायला लागले होते.
" काही नाही ग... ही पकवत आहे... बसा तिकडेच... " रूपाने सगळ्यांना पळवायचा प्रयत्न केला. काहींनी ऐकलं काही जणी आल्याच.
आता आम्ही बोलूच शकणार नव्हतो, उगाच इकडचं-तिकडंच बोलून वेळ काढला आणि तासाभराने बाथरूमच्या निमित्ताने चौघीजणी रूमच्या बाहेर पडलो. बाथरूममध्ये जाऊन दोघीनी चिठया दाखवल्या. त्या पाहिल्यावर ह्या दोघी आम्हालाच चिडवायला लागल्या.
" हॅट... हे एवढंसं मिळाल्यावर फाटली की काय तुमची ?" जागू हात नाचवत विचारायला लागली.
" गप गं.. आम्हाला त्याची फाडायची आहे... आणि त्यासाठी... "
" हा.. हा.. बास बास... उद्या त्याची लावू आपण वाट.. नको टेन्शन घेऊ " तुप्यामधला भाई जागा झाला.
" राणी सरकार ह्या पत्राचे धनी आपल्याला शोधून मग त्यांनीच हे पत्र लिहिले आहे हे त्यांच्या तोंडाने वदवून मग त्यांची पूजा बांधायची आहे... समजलं? "
" काय? म्हणजे काय तुम्हाला माहीत नाही ही चिठ्ठी कोणी लिहिली ते ?"
" नाही ना.. नाहीतर एवढ्या शांततेत परत आलो असतो का ?"
" अरे पण खरंच तुम्ही त्याला आवडला असाल तर? आणि तो खरंच सिरीयस असेल तर ?"
" ते शक्यच नाही.. जर खरंच असं काही असतं तर तो समोर आला असता आणि ही असली फिल्मी भाषा त्याने वापरली नसती... दोघींना सेम चिठ्ठी पण पाठवली नसती.. "
" पॉईंट है बॉस... मग काय करूया ? सगळ्यांना सांगूया का? "
" नको.. अजिबात नाही.. तेच करायचं नाहीये. दीदी सगळ्यात पाय घालत बसेल."
सगळ्या बाजूने बराच विचार केल्यावर आम्ही एक प्लॅन तयार केला. त्याची २-३ वेळा उजळणी केल्यावर त्यात काही गडबड नाहीये ह्याची खात्री पटल्यावर तो ओके केला.
आम्हाला एवढा वेळ का लागतोय बघायला योग्या टपकली. तिने खोदून खोदून चौकशीला सुरुवात केल्यावर आम्ही चद्दर प्रोग्रॅमच ठरवत होतो म्हणून फेकलं. ते ऐकून ती एकदम चार्ज झाली. तसाही ह्या टूरचा 'चद्दर प्रोग्राम' बाकी होता. आम्ही त्याचाही प्लॅन केला आणि रूममध्ये आलो.

काही तरी शिजलंय ह्याचा दीदीला संशय आलाच. तिने तुप्याला तंबी दिली. पण तोपर्यंत आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली होती. रूपाने मुद्दाम संजूच्या बॅगमधला खाऊ मागितला. जशी तिची पाठ वळली. आम्ही मिळेल ती चादर तिच्या अंगावर टाकली आणि अवघ्या काही सेकंदात हाता-पायांनी तिला तुडवून काढलं. ती अंगावरून चादर बाजूला करेपर्यंत प्रत्येक जण नामानिराळा झाला. ती काय समजायचं ते समजली.
" मीच बकरा सापडले काय?.... साल्यांनो बघून घेईन तुम्हाला पण... " म्हणत परत मेडिकल किट काढू लागली. झालेल्या चादर प्रोग्राममुळे तिच्या कोपराच्या जखमेतून परत रक्त यायला लागलं होत. आम्ही काही झालंच नाही अशा चेहऱ्याने तिच्या जवळ जाऊन उगी-उगी करू लागलो.

बराच वेळ टाईमपास झाल्यावर झोप येऊ लागली तसे आडवे झालो. छान झोप लागली असताना उकाड्यामुळे जाग आली. शाळेचे लाईट गेले होते. सगळ्या खिडक्या उघडल्या. छान चंद्रप्रकाश आत आला पण वारा नाही आला. अंकु आणि गीताने दरवाजा उघडला. अजून कोणाचाच दरवाजा उघडला गेला नव्हता. आम्ही उठून बसलो. डोळ्यावर झोप होती पण झोपले की कोणीतरी आपल्याला कुकरमध्ये शिजवून काढत आहे अशी स्वप्न पडायला लागली. मग नाईलाजाने उठून बाहेर आलो. समोरचं अंगण खूपच छान दिसत होते. आम्ही बाहेर येऊन पारावर बसलो. १२ पैकी १० जणी बाहेर आलो त्यामुळे बाहेर गडबडीला सुरुवात झाली. आमच्यासारख्या इतर संघाच्या मुली सुद्धा जाग्या झाल्या होत्या. आमचा आवाज ऐकून त्याही बाहेर येऊन बसू लागल्या. आम्ही सगळ्यात आधी बाहेर पडलो होतो त्यामुळे चिंचेचा पार पटकावता आला. आम्ही त्यावर पसरलो. मी दीदी आणि अंकु तिथेही झोपू लागलो होतो पण बाकीच्या कार्ट्या पोटदुखी लागल्यासारख्या आम्हाला झोपूच देईनात. मग जमेल तिथे बसून पेंगू लागलो. अशी छान पेंग आली असतांनाच मोठयाने हसण्याचा, पळण्याचा आवाज मागच्या बाजूने आला तिथे वाकून बघितले तर दुसऱ्या संघाच्या मुलींची मस्ती सुरू झाली होती.
लाईट गेल्याला आता अर्धा तासावर वेळ झाला होता. त्यामुळे बऱ्याच जणींच्या झोपा उडाल्या होत्या. त्यांच्यापैकीच कोणीतरी कोणालातरी किती वाजले हे विचारले त्याला उत्तर आले सव्वातीन झाले. जसा जसा वेळ जात होता तसा तसा गलका वाढत होता. एक झोप झाल्यामुळे परत लाईट आल्याशिवाय काहींना झोप लागणार नव्हती तर काही मुलींना ह्या लाईट असण्यापेक्षा नसण्याची सवय असल्यामुळे त्यांचे फार काही अडत नव्हते पण झोपेसाठी समोर चाललेली गंमत त्यांना मिस करायची नव्हती.
जरा मोठ्या मुलींचा वेगळाच गप्पांचा अड्डा बनला.. त्यात अशा रात्रीच्या वेळी एकदम कॉमन असलेला असा भुताचा विषय चालू होता. भूत खेताच्या गप्पा मारण्यासाठी मुंबई सोडता बाकीच्या मुली पुढे होत्या. आपापले खरे खोटे अनुभव तिखट मीठ लावून सांगणं चालू होत. तर दुसरीकडे काही उत्साही मुली खाली मैदानात देखील उतरल्या आणि त्या स्वच्छ, शांत चंद्रप्रकाशात पकडा-पकडीला सुरुवात झाली. लवकरच त्या पकडा-पकडीचं रूपांतर विष-अमृत मध्ये झालं. तोही खेळ खेळून बहुतेक कंटाळला असाव्या म्हणून मग अगदी १८-२० जणींनी मिळून हात हाताला लावत डाळ भात देत सुटून डोंगर का पाणी खेळायला सुरुवात केली. हे सगळं बघत असताना बऱ्याच जणी त्यांना जाऊन मिळत होत्या आणि आधी खेळणाऱ्यांपैकी दमून बसत होत्या. खेळाच्या नियमानुसार नवीन येईल त्यावर राज्य अशामुळे कोणालाही आऊट न करता राज्य मात्र सगळीकडे फिरत होत. हाही खेळ मागे पडला आणि साखळी- साखळीला प्रारंभ केला. थोड्यावेळाने उभा खो-खो ही खेळून झाला. मैदानी खेळ खेळून कंटाळल्या तसं लहान मुलींचे खेळ त्यांनी सुरू केले. दोघीजणी हात वर करून तळहात एकमेकींना चिकटवून गाऊ लागल्या.. " कच्चं लिंबू पैश्या पैश्याला शाळेतल्या मुली आल्या खावयाला ... खाऊन खाऊन खोकला झाला... खो.. खो...खो.. पकडलं.. बोल बोरं पाहिजे की चिंच पाहिजे ?" असं विचारात आणि परत गाणं सुरू झालं की बाकीच्या रेल्वेच्या डब्यांप्रमाणे ओळीत त्यांच्या हाताखालून जात होत्या. ज्याची जशी पाळी येईल त्याप्रमाणे त्या खो.. खो.. खो च्या साखळीत अडकत आणि बोरं हवी की चिंच ते सांगत. त्यानुसार गट झाले तसे त्यांचा खेचाखेचीचाही कार्यक्रम पार पडला. हा धुडगूस चालू असताना लाईट आले. मैदानातला झेंडा वंदनासाठी लावलेल्या खांबावरचा लाईट लागला आणि आत्तापर्यंत अंधाराची तमा न बाळगता चाललेल्या खेळाला उजेडाचा अडसर वाटला आणि तो खेळ तिथेच थांबला. काहींनी खेळ ग तुम्ही आम्ही बसतो इथे आता नाही झोप लागणार परत असं सांगत खेळ बघत त्यांना सोबत द्यायची तयारी दर्शवली पण पुढे काही तो खेळ सरकला नाही. काही गोष्टी कृत्रिम प्रकाशात खुलतं नाही हेच खरं... आम्ही हळूहळू एक एक करत आत आलो. पहाटेचे साडेचार होत आले होते. ज्या संघाना लवकर निघायचे होते त्यांनी आवरायला घेतलं. आम्ही मात्र परत झोपी गेलो.

जागरणामुळे अंग जड झालं होत त्यामुळे सकाळी वॉर्मअपला उठलोच नाही. चहा संपायच्या वेळी जेमतेम पोचलो आणि चहा घेऊन परत रूमवर आलो. कासवाच्या गतीने सगळं आवरणं सुरू होत. आंघोळीचे नंबर लागलेले होते. रात्रीच्या गोष्टींची परत नव्याने उजळणी होत होती. कोण काय करत होत कोण कस वागत होत सगळं परत परत सांगणं चालू होत. वेळ झाली तसं जेवायला गेलो. पत्ते खेळत आणि आराम करत दुपार सरत आली.
आता संध्याकाळी त्यांचा बँड वाजवायचा होता. प्लॅन प्रमाणे आम्ही तयारी केली. किट बॅगमध्ये सुरी, नेलकटर, जाडसर लाकडी फुटपट्टी असं ठेवलं. मॅचचा टी- शर्ट मुद्दाम थोडासा उसवून ठेवला. जेणेकरून आम्हाला दुसरा टी- शर्ट घालता यावा. एक बाजूला हळूहळू कोणाच्याही नकळत आमची तयारी सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला ठाण्याला कसं काढायचं ह्यावर चर्चेमध्ये सहभाग घेणं देखील चालू होत. तशी ठाणे काढणं आम्हाला जडच होतं पण अशक्य नव्हतं. आधी ही मॅच की ती मॅच काही पत्ता लागत नव्हता पण दोन्ही मॅचची तयारी आत्ताच करणं गरजेचं होतं. निघायची वेळ जवळ आली तशी आमच्या परीने सगळी जय्यत तयारी करून आम्ही सगळ्यांबरोबर बाहेर पडलो.

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989
एक संघ मैदानातला - भाग ८ http://www.misalpav.com/node/36014
एक संघ मैदानातला - भाग ९ http://www.misalpav.com/node/36071
एक संघ मैदानातला - भाग १० http://www.misalpav.com/node/36205
एक संघ मैदानातला - भाग ११ http://www.misalpav.com/node/36256
एक संघ मैदानातला - भाग १२ http://www.misalpav.com/node/36281
एक संघ मैदानातला - भाग १३ http://www.misalpav.com/node/36300
एक संघ मैदानातला - भाग १४ http://www.misalpav.com/node/36406
एक संघ मैदानातला - भाग १५ http://www.misalpav.com/node/36536
एक संघ मैदानातला - भाग १६ http://www.misalpav.com/node/36579

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

11 Jul 2016 - 6:27 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

पैसा's picture

11 Jul 2016 - 9:53 pm | पैसा

वाचते आहे!

बोका-ए-आझम's picture

11 Jul 2016 - 11:12 pm | बोका-ए-आझम

तुमची भाषेवरची पकड आणि घटना रंगवण्याची हातोटी अफलातून आहे. शाळेत आॅफ पिरियडला तुम्हाला गोष्ट सांगण्यासाठी उभे करत असणार, हो ना?

नाखु's picture

12 Jul 2016 - 8:38 am | नाखु

असेच म्हणतो...
कबड्डीतली खेचाखेची वाक्यात पण जाणवते आणि "पकड" तर अफलातून आहे.

पुभाप्र

नितवाचक नाखु

शि बि आय's picture

11 Jul 2016 - 11:43 pm | शि बि आय

अजिबात नाही हो.. माझं कोणीच एकायचं नाही त्यामुळे मीही सांगायच्या भानगडीत नाही पडले. हया लेखनाच्या निमित्ताने मात्र माझीच मला नविन आेळख होतेय.

धनंजय माने's picture

11 Jul 2016 - 11:59 pm | धनंजय माने

मस्त लिहिताय ओ!
पु भा प्र
(क्वीन चित्रपटानंतर एक लेख लिहिला होता गेल्या जन्मात, तसं तुम्हाला तुमच्यातलि क्वीन सापडत आहे हे उत्तम आहे)

सुधीर कांदळकर's picture

12 Jul 2016 - 7:43 am | सुधीर कांदळकर

आमच्या बालपणींच्या मुली संत्रं लिंबू पैशापैशाला ...... म्हणत. तस्सेच एक इंग्रजी बडबडगीत पण होते.
ऑरेन्जेस अ‍ॅन्ड लेमन्स,
फॉर द बेल्स ऑफ सेन्ट क्लेमन्ट्स ...
वगैरे वगैरे.

दोन्ही गाणे वेगळी आहेत की एक दुसर्‍यावरून घेतले आहे ठाऊक नाही.

काही गोष्टी कृत्रिम प्रकाशात रंगत नाहीत. अगदी खरे.

धन्यवाद

पुभाप्र.

सगळे भाग वाचून काढले. आवडले.
येऊद्या अजून...

असंका's picture

12 Jul 2016 - 8:47 am | असंका

सुरेख लिहित आहात.
आणि लवकर लवकर भाग टाकताय ते पण भारीये..

धन्यवाद.

आतिवास's picture

12 Jul 2016 - 9:54 am | आतिवास

छान चालू आहे लेखमालिका. आवडीने वाचते आहे.

क्रेझी's picture

12 Jul 2016 - 11:23 am | क्रेझी

उत्सुकता लागली आहे त्या गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्याची तुम्ही वरात कशी काढली हे वाचायला :) लवकर येऊ
देत पुढची वरात :)

संजय पाटिल's picture

12 Jul 2016 - 12:24 pm | संजय पाटिल

वाचतोय...
पुभाप्र..

छान चालू आहे लेखमाला. वाचत आहे.

ज्ञ's picture

14 Jul 2016 - 1:23 pm | ज्ञ

भाग १८ कधी येणार???

शि बि आय's picture

14 Jul 2016 - 2:06 pm | शि बि आय

लवकरच.. लिखाण सुरू आहे

पुभाप्र.. खूपच सुंदर चालू आहे लेखमाला..

न कळणारा खेळ पण लिखाणावरची पक्कड खेचत नेतेय रेषेपर्यंत.

प्रीत-मोहर's picture

18 Jul 2016 - 1:11 pm | प्रीत-मोहर

मस्त चाललीय मालिका. काही करणाने प्रतिक्रिया द्यायच्या राहिल्या होत्या मागच्या भागांवर पण वाचतेय आणि पुढल्या भागांची वाट पण पाहतेय!!!
लवकर येउदेत पुढला भाग

चाणक्य's picture

19 Jul 2016 - 3:13 pm | चाणक्य

आत्ता पहिल्यापासून सगळे भाग वाचून काढले. भारी लिहिलंय. पुभाप्र.

चाणक्य's picture

19 Jul 2016 - 3:15 pm | चाणक्य

आत्ता पहिल्यापासून सगळे भाग वाचून काढले. भारी लिहिलंय. पुभाप्र.