सॉफिस्टीकेटेड
ही दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी दादर पश्चिमला कॅमेरा दुरुस्तीसाठी गेलो होतो. तेथे प्लाझा सिनेमासमोर तृप्ती म्हणून एक उत्तम हॉटेल आहे. याचे मालक श्री भागवत हे आमचे तसे दूरचे नातेवाईक आहेत. परंतु ते सर्व कुटुंब आमच्या कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेही आहेत. तृप्ती हॉटेल हे राजेंद्र आणि श्रीरंग हे दोन चुलत भाऊ चालवतात. ती जागा त्यांची वडिलोपार्जित असून त्याचा त्यांनी अतिशय सदुपयोग केला आहे. मी त्या हॉटेलच्या समोरून चाललो असतात श्री राजेंद्र भागवत बाहेर उभे होते.
ते आमच्या कडून पैसे घेते नाहीत आणि कुणाकडून काहीही फुकट घेऊ नये ही आमची घरची शिकवण. त्यातून सरकारी नोकरी तसलं तरी लष्करात नोकरी असल्याने फुकट काहीही घेण्याची मला सवय नव्हती. म्हणून मी आपलं दुसरीकडे पाहत तोंड चोरून चाललो होतो तिचा राजेंद्रने मला पाहिले आणि लगेच आडवा आला.
राजेंद्र --काय् रे कुठे चाललास?
मी -- अरे असाच चाललो होतो
राजेंद्र -- चल आत
मी-- अरे जाऊदे जरा घाईत आहे.
राजेंद्र -- अरे माहिती आहे काय घाई आहे ती
चल चल म्हणून मला तो हात धरून आत घेऊन गेला.
मी आरोग्य विभागात काम केले असल्याने रस घेउन ते हॉटेल अगोदर आतून बाहेरून पूर्ण पाहिलेले होते. स्वयंपाकघर अतिशय स्वच्छ होते सर्व पाईप नळ सर्व गोष्टी स्टेनलेस स्टील च्या होत्या आणि भागवत मंडळी कटाक्षाने ते चमकतील इतके साफ ठेवत असत.
मी राजेंद्र बरोबर स्थानापन्न झालो त्याने थालीपीठ, कोथिंबीर वडी आणि मसाला ताक मागवले ते खात असताना मी त्या टेबलवर ठेवलेले मेनू कार्ड उघडून काय पदार्थ आहेत ते पाहू लागलो. त्यात बटाटे वडा एक प्लेट रुपये ८/-
(२००५-६ ची गोष्ट आहे)
आणि खाली ब्रेड बटर १५ रुपये.
मी राजेंद्रला विचारले काय रे एवढे मोठे दोन बटाटे वडे चटणी आणि मिरच्यांसकट ८ रुपये फक्त कसे ? --
तो म्हणाला - मध्यमवर्गीय माणूस ठाणे डोंबिवली कल्याण हून खरेदी साठी दादरला येतो खरेदी आटोपून घरी जायला तास दीड तास तरी लागतो.
घरच्या बाईला घरी जाऊन स्वयंपाक करून जेवायला अजुनच वेळ लागतो. तेवढ्या वेळात पोटाला आधार म्हणून आणि पटकन खाता येणारा चविष्ट असा पदार्थ. हा कोणताही नफा ना आकारता आम्ही देतो. पाहिजे तर समाजसेवा म्हण किंवा मार्केटिंग म्हण.
मग मी त्याला विचारले की मग हे ब्रेड बटर दोन स्लाइस चे चार त्रिकोणी तुकडे फक्त आणि ते सुद्धा १५ रुपये?
त्यावर तो हसत म्हणाला येथे "सॉफीस्टीकेटेड" लोक येतात आणि सांगतात आमच्या मुलाला "ब्रेड बटरच लागतं".
म्हणून अशा लोकांची ही "सोय" आहे. बाकी किती नफा ते तू विचारू नकोस.
प्रतिक्रिया
5 Jul 2016 - 11:08 am | रेवती
एखाद्या गोष्टीमागील विचार आवडला.
5 Jul 2016 - 11:12 am | कविता१९७८
मस्तच, आता जाउन खावाच लागेल बटाटावडा
5 Jul 2016 - 11:14 am | स्वीट टॉकर
कोणताही नफा ना आकारता आम्ही देतो. पाहिजे तर समाजसेवा म्हण किंवा मार्केटिंग म्हण.
उत्तम कॉम्बिनेश! _____/\_____
5 Jul 2016 - 11:14 am | खटपट्या
सॉफिस्टीकेटेड खाद्य...
5 Jul 2016 - 11:24 am | नाखु
व्यवहार चातुर्य हे फंडे कुठल्याही बिजीनेस स्कूलात शिकवत नाहीत तर फक्त "जीवनशाळा" शिकवते तेही फुकट.
खरे साहेब धन्यवाद अशी माहीती दिल्याबद्दल
5 Jul 2016 - 11:51 am | मुक्त विहारि
+ १
5 Jul 2016 - 11:44 am | सतिश गावडे
मस्त किस्सा :)
5 Jul 2016 - 11:45 am | उल्का
लेख आवडला.
कैक वर्षं झाली तृप्तीला भेट देऊन.
5 Jul 2016 - 1:10 pm | मृत्युन्जय
चांगली स्ट्रेटेजी होती. आता बटाटा वडा ४० रुपये आहे आणी ब्रेड बटर ३८ :(
5 Jul 2016 - 1:33 pm | सुनील
आताशा ठाणे-कल्याणहून दादरला खास खरेदीसाठी म्हणून फारसे कुणी जातही नसावेत!
5 Jul 2016 - 1:39 pm | स्पा
:)
5 Jul 2016 - 1:48 pm | आदूबाळ
+१
5 Jul 2016 - 5:59 pm | गंम्बा
ह्याचा अर्थ आता बटाटेवडा अपमार्केट् आणि ब्रेड बटर डाऊन मार्केट झालेले दिसतय..
5 Jul 2016 - 1:50 pm | आदूबाळ
याला आम्ही पोर्टफोलिओ अप्रोच टु प्रायसिंग म्हणतो. म्हणजे रेझरवर तोटा होऊ द्यायचा, पण ब्लेड्सवर अतिप्रचंड नफा करायचा. अर्थात दोन्हीकडे हेतू वेगवेगळे आहेत.
5 Jul 2016 - 2:06 pm | मोदक
कृपया असल्या मार्केटिंग / अर्थशास्त्रीय फंड्यांची थोडी माहिती एकत्र करून एक धागा काढा. आंम्ही उपकृत राहू.
डॉक्टरांचा किस्सा झकासच.
5 Jul 2016 - 2:52 pm | आदूबाळ
येस सार.
5 Jul 2016 - 3:36 pm | धनंजय माने
मोदकशी सहमत.
6 Jul 2016 - 7:19 pm | प्रदीप
ह्या मार्केटिंगच्या फंड्याच्या माहितीविषयी धागा काढण्याबाबत तसेच डॉक्टरांचा किस्सा झकास आहे, ह्या दोन्हींशी सहमत आहे.
आदूबाळांनी सांगितलेल्या कॅटेगरीतील दुसरे उदाहरण म्हणजे घरगुती वापरासाठीचे प्रिंटर्स. मी घेतलेल्या प्रिंटरच्या किंमतीच्या मानाने त्यातील कार्टरेजच्या किमती भरमसाट आहेत. प्रिंटरची किंमत केव्हाच भरून निघाली आहे!
6 Jul 2016 - 10:35 pm | अन्या दातार
हे आदूबाळाला बहुतेक मागच्या वर्षी सांगितलेलं. हो म्हणालेला, मीही वाटच बघतोय अजून.
7 Jul 2016 - 12:08 am | आदूबाळ
अरारारा. व्हाय गेटिंग अप माय मार्केट?
7 Jul 2016 - 10:05 pm | अन्या दातार
आयाम पुशिंग यु अपमार्केट!
5 Jul 2016 - 8:49 pm | असंका
असं म्हणतात का याला आता ?
शनीवार रविवारचा इकोनोमिक टाइम्स बाकी दिवसांच्या किमतीपेक्षा पाचपट किमतीत मिळायचा तेव्हा आम्ही त्याला क्रॉस सबसिडायझेशन असं म्हणायचो!!
6 Jul 2016 - 1:41 pm | आदूबाळ
तत्त्व तेच आहे, पण थोडा फरक आहे.
क्रॉस सबसिडायझेशन म्हणजे एकच वस्तू वेगवेगळ्या वेळी (उदा. १), वेगवेगळ्या ठिकाणी (उदा. २) किंवा वेगवेगळ्या ग्राहकगटांना (उदा. ३) वेगवेगळ्या किमतीत विकणे.
पोर्टफोलियो अप्रोचमध्ये एकमेकांना पूरक (कॉम्प्लिमेंटरी) अशा दोन किंवा जास्त वस्तू असतात. उदा. रेझर-ब्लेड, मोबाईल-कॅमेरा, इ. त्यात एकात नुकसान सोसून दुसर्यात मोठा नफा कमावणे ही स्ट्रॅटेजी जमून जाते. विशेषतः या वस्तू पॅकेज म्हणून विकतात तेव्हा.
__________________________________
उदा. १: इकॉनॉमिक टाईम्स उदाहरण
उदा. २: मल्टिप्लेक्समध्ये मिळणारी पाण्याची बाटली
उदा. ३: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेभाड्यात मिळणारी सवलत
6 Jul 2016 - 8:17 pm | असंका
लक्षात आलं...! सुरेखच सांगितलंत...!
धन्यवाद..!
5 Jul 2016 - 2:31 pm | सूड
हटके किस्सा!!
5 Jul 2016 - 2:44 pm | प्रियाजी
किस्सा आवडलाच. तुमचे सर्वच लेखन नेहमीच आवडते.
5 Jul 2016 - 2:52 pm | जेपी
किस्सा आवडला..
5 Jul 2016 - 3:26 pm | नंदन
छोटेखानी किस्सा आवडला. मार्मिक आहे.
थोडं अवांतर: काही वर्षांपूर्वी, 'मटा'तल्या एका सुमार मुलाखतीत (द्विरुक्ती!) 'ते (पक्षी: मालिकेतलं काम) माझं ब्रेड आणि बटर आहे', असे एका अभिनेत्रीचे उद्गार वाचले होते; तेव्हा आयात केलेल्या या उपमेचं परकेपण खटकलं होतं, ते आठवलं. (पुलंनीही 'पैशाची ऊब' याबद्दल हे निरीक्षण नोंदवलं आहे. उष्णकटिबंधातल्या देशात, गारवा खरं तर चपखल वाटला असता. असो. 'सूरज कहीं भी जाये, तुम पर ना धूप आये'सारखी एखादी ओळ मग अधिकच अस्सल वाटू लागते.)
5 Jul 2016 - 4:01 pm | एस
सुंदर विचार.
5 Jul 2016 - 4:46 pm | अजया
किस्सा आवडला आणि नंदन यांचे अवांतरही!
5 Jul 2016 - 5:07 pm | चौकटराजा
काही डॉ लोक असेच करतात . माझे पैसे नको पण हॉस्पिटलचे द्या असे कन्सेशन गरीबाला देतात व ......... हा भागवत
तसाच दिसतोय !
5 Jul 2016 - 5:33 pm | गवि
किस्सा आवडला.
पण एक विचार आला की ही माहिती त्यांनी तुम्हाला स्नेही म्हणून / जवळचे म्हणून सांगितली असेल तर ती पब्लिकली लिहीणं अनुचित ठरेल.
ते जर ही व्यावसायिक अंतर्गत माहिती (काही प्रमाणात बिझनेस मॉडेल आणि किंचित ट्रेड सीक्रेटही) कोणत्याही उत्सुकतेने विचारणार्या/ जिज्ञासू पण अनोळखी प्रश्नकर्त्याला खुलेपणाने सांगत असतील तर मग असा जाहीर उल्लेख चालून जावा.
5 Jul 2016 - 5:38 pm | पियू परी
हाच विचार पहिल्यांदा आला मनात किस्सा वाचल्याबरोबर.
5 Jul 2016 - 5:41 pm | गवि
उदा. आता कोणालाही तिथे ब्रेडबटर मागवताना नक्कीच उणेपणा वाटेल. मालक आपणांसारख्यांकडे काहीशा उण्या नजरेने पाहतात आणि नफा ज्यांच्याकडून काढायचा अशांपैकी आपल्याला मानतात असा बायस येणार.
जनरली दुकानदार सर्व गिर्हाईकांना समान वागवतो (आणि शक्यतो आपल्याला इतरांहून खास वागवतो) अशी समजूत सर्व गिर्हाईकांना बरी वाटते. पण आपल्याकडे "लाडावलेल्या मुलांचे पालक" किंवा तत्सम निगेटिव्ह नजरेने पाहिलं जातं / त्यानुसार बिलिंग बदलतं हे फीलिंग ग्राहकाला येणं हे तो ग्राहक आणि व्यवसाय या दोघांसाठी अनिष्ट आहे.
5 Jul 2016 - 5:51 pm | धनंजय माने
गवि, वरचा मृत्युंजय चा प्रतिसाद वाचावा.
बटाटावडा 'आता' महाग आहे. परिस्थिती बदलली आहे. आपण न लाजता ब्रेड बटर खाऊ शकू.
5 Jul 2016 - 5:55 pm | गवि
वाचला प्रतिसाद. भेदभाव मिटला तर.
बरं झालं.
माय सोल फेल इन युटेन्सिल. हॉर्स बेद्ड इन गँजेस.
-(ब्रेड बटर लागणारा) गवि.
5 Jul 2016 - 6:45 pm | सूड
ओक्के!! आता युटेन्सिलमध्ये पडला तो तुमचा सोल होता होय.
5 Jul 2016 - 7:07 pm | सुबोध खरे
गवि साहेब
भागवत मंडळी अतिशय सज्जन आहेत. ते ग्राहकाला कधीही असे जाणवू देणार नाहीत की तुम्ही सॉफीस्टीकेटेड आहेत म्हणून तुम्हाला पैसे जास्त. उलट ते गरिबांचे खाणे म्हणून वडा स्वस्त ठेवला आहे असेच सांगतील.
हा राजेंद्र ज्याबद्दल मी लिहिले आहे हा स्वतः अतिशय हुशार असून निगर्वी आहे. स्वतः व्ही जे टी आय चा मेकॅनिकल इंजिनियर आहे (त्याच्याशी बोलताना तुम्हाला कधीही जाणवणार नाही) महिंद्र आणि महिंद्र मध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता. परंतु वडिलोपार्जित वास्तूचा सदुपयोग करायचा म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.
5 Jul 2016 - 5:40 pm | शि बि आय
आता बटाटेवडा खावाच लागेल...
5 Jul 2016 - 5:46 pm | सिरुसेरि
मस्त किस्सा . काही अमॄततुल्य दुकानांमध्ये लावलेल्या "चहा - १० रु. , नुसते गप्पा मारत बसणे - २० रु. " अशा पाट्या आठवल्या .
5 Jul 2016 - 6:09 pm | सुधांशुनूलकर
आता तृप्तीमध्ये कधी गेलो, तर भागवतांना हा धागा वाचायला नक्की सांगेन.
या रेस्टॉरंटच्या बाहेर केव्हाही दहा-पंधरा माणसं तिष्ठत (waiting) आत जायला मिळतंय याची वाट बघत उभी असतात. इतकं ते प्रसिद्ध आहे.
5 Jul 2016 - 7:42 pm | रातराणी
आवडला किस्सा!
5 Jul 2016 - 8:56 pm | बोका-ए-आझम
प्रकाश आणि आस्वाद यांच्या तोडीचं आहे असं म्हणायला हरकत नाही. नुकतीच त्यांनी मराठी थाळी चालू केलेली आहे आणि दादरसारख्या भागात चांगली मराठी थाळी मिळत नव्हती, ती कमतरता भरून काढली आहे.
5 Jul 2016 - 9:18 pm | माझीही शॅम्पेन
डॉक्टर साहेब , कुठल्याही वास्तुची किंमत ही बर्याच गोष्टीवर ठरते जस की तुलनात्मक बाजार भाव आणि ब्रँड वॅल्यू , त्यामुळे ह्या गोष्टी मागे तुम्ही म्हणता ते लॉजिक आहे अस ठाम पणे सांगता येणार नाही , थोडा अतिशयोक्तीचा प्रकार वाटतोय
6 Jul 2016 - 8:11 pm | सुबोध खरे
@माझीही शॅम्पेन -
समजलं नाही जरा उलगडून सांगाल काय?
6 Jul 2016 - 6:30 pm | विलासराव
माझे आवडीचे ठिकाण आहे तृप्ती.
दादरला कधीही गेलो तर इकडेच खाणे व्हायचे.
पण घाई असेल तर वाट पहाण्यापेक्षा दुसरीकडे जायचो.
पण तृप्तीची सेवाही खासच असायची.
7 Jul 2016 - 10:26 am | प्रकाश घाटपांडे
अशीही माणस अजून आहेत तर! मस्त किस्सा
7 Jul 2016 - 2:29 pm | जागु
किस्सा छानच.
दादरला गेलो आणि व्हेज जेवायच असत तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त तृप्ती हॉटेलमध्येच जेवतो. कधी कधी वेटींगवर राहूनही तिथे जेवतो. कारण जेवणाची चव, दर्जा, स्वच्छता सगळच चांगल आहे. डाळींबीची उसळ, खरवस असे पदार्थही तिथे मिळतात.
7 Jul 2016 - 3:01 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
छान किस्सा रे. गिरगावातले माधवाश्रम,अनंताश्रम.. वाजवी दरात सामिष थाळी मिळायची. आता कदाचित बंद झाली असावीत.
7 Jul 2016 - 6:20 pm | पैसा
मस्त किस्सा! इतर प्रतिसादही आवडले.
7 Jul 2016 - 10:31 pm | सही रे सई
एक चांगला अनुभव सांगितलात. नेहमीप्र्माणेच लेख उत्तम.
मुंबईला गेले की एकदा हजेरी लावलीच पाहिजे तृप्ती मधे अस आता लेखामुळे आणि त्यावरील प्रतिसादामुळे वाटत आहे.
23 Nov 2016 - 9:25 am | Bhagyashri sati...
छान किस्सा, वाचुन वाटले मानुसकी शिल्लक आहे जगात, कारण असे लोक खूप कमी भेटतात जे दुसर्यांचा पण विचार करतात:)
23 Nov 2016 - 9:54 am | निनाद
इतका विचार करणारे आणि त्या तत्त्वावर व्य्वसाय करणारे विरळच. व्यवसाय कल्पना आणि लिखाण दोन्ही आवडलेच!
23 Nov 2016 - 7:09 pm | मराठी कथालेखक
हो ना ..त्याच तत्वार मी एक विडंबन लिहिलं होतं संपादक मंडळींनी उखडून टाकलं..
23 Nov 2016 - 7:10 pm | मराठी कथालेखक
म्हणजे तत्व तेच होतं.. व्यवसाय थोडा वेगळा होता इतकंच :)