शागिर्द ---------- कथा ( काल्पनीक )
दुरवर बघावे तिकडे विस्तीर्ण वाळवंट पसरले होते . दिवस वर सरकू लागला तशी उन्हाची तलखीही वाढत चालली होती . सुर्य वाळुला अक्षरशः भाजुन काढत होता . वाळुमधुन उष्ण वाफा निघत होत्या .
अशा वाढत्या उन्हात त्या वाळवंटामधुन एक घोडा संथपणे चालत होता . घोडयाच्या पाठिमागे एक चार चाके असणारी लाकडी पेटी बांधलेली होती . घोडयाच्या मागे मागे त्या पेटीचाही प्रवास चालु होता . त्या पेटीमध्ये घोड्याचा मालक पहुडलेला होता . उन्हाचा त्रास नको आणी तोंडावर माशा घोंघावू नयेत म्हणुन त्याने आपला चेहरा हॅटने झाकलेला होता . अधुन मधुन आपले जड झालेले डोळे मोठ्या कष्टाने उघडुन , हॅट बाजुला करुन तो आपण कुठे आलेलो आहोत त्याचा अंदाज घेत असे . आपले पोचण्याचे ठिकाण अजुन लांब आहे हे समजल्यावर परत डोळे मिटुन पेंगायला लागत असे .
असाच काहि वेळ प्रवास चालु असताना अचानक घोड्याच्या खिंकाळण्याने त्याला जाग आली . तो सावध होउन उठला आणी पेटीबाहेर उतरला . घोडयाला चार फाटक्या अंगाच्या गुंडछाप इसमांनी घेरले होते . अर्थात त्याला याची पर्वा नव्हती . आजपर्यंत अशा अनेक गुंड पुंडांना तो पुरुन उरला होता . तो स्वत:च त्याच्या भागातला एक महागुंड होता . त्याच्या चेहरयावरील अनेक जखमांच्या खुणाच त्याने आजपर्यंत केलेल्या पुंडाइची साक्ष देत होत्या .
"कायरे ? कोण तुम्ही ? आणी घोडा का अडवला ? " त्याने जोरात दरडावुन विचारले . ते चार गुंड इसमही त्याच्याकडे बघत होते . त्याला जोखत होते . मधेच एकमेकांकडे पाहुन खाणाखुणा करत होते . अखेर त्यांच्यातला एकजण पुढे होत म्हणाला .
"आम्ही इथल्या धुलिया गावचे रखवालदार आहोत . या गावचा चुंगीनाका आम्ही सांभाळतो . इथुन पुढे जाणारा प्रत्येक प्रवासी आम्हाला चुंगीचे पैसे देउन मगच पुढे जातो . तुलाही आम्हाला पैसे द्यावे लागतील . त्याशिवाय तुला पुढे जाता येणार नाही . "
ते केस विस्कटलेले , डोळे पिंजारलेले आणी मळकट कपडे घातलेले गुंड स्वतःला गावचे रखवालदार म्हणवत आहेत हे ऐकल्यावर त्याला दोन मिनीटे हसायलाच आले. मोठ्या कष्टाने कसेबसे आपले हसु दाबत त्याने विचारले .
"पैसे ? कसले पैसे ? माझ्याकडे तर कसलंच सामान नाही . आजपर्यंत मी इतक्या गावांमधुन फिरलो तेव्हा कुणीच माझ्याकडे पैसे मागीतले नाहीत . तेव्हा तुम्हाला कसले पैसे द्यायचे ? "
"जास्त शहाणपणा करु नको . तुला इथुन पुढे सुखरुप जाउ देण्याचे पैसे द्यायचेस . समजलं ? नाहितर मग तुझा घोडा आणी अंगावरचे कपडे काढुन घेउ . आणी मग फटके मारुन तुला वाळवंटात हाकलुन देउ ." दुसरा गुंड धमकीच्या सुरात म्हणाला .
" ए बाबांनो , अरे तुम्ही असे किरकोळ . उगाच कशाला माझ्याशी पंगा घेताय ? धमक्या , खंडणी , लुटालुट या सगळ्या बाबतींत तुम्ही अजुन नवे दिसताय . या सगळ्यांमध्ये मी तुमचा उस्ताद आहे . त्यापेक्षा मी तुम्हाला माझा पत्ता देतो . एकदा सवड काढुन माझ्या घरी या . माझे शागिर्द बना . मग बघा मी तुम्हाला कसा एकदम रुस्तुम बनवतो ." तो समजुतीच्या सुरात म्हणाला . जणु काही तो त्यांना एक संधी देत होता . पण ते गुंड हे ऐकुन अजुन चिडले .
"ए उस्ताद , हे बघितलं का आमच्या हातात काय आहे ते ? " तिसरा गुंड त्याला आपल्या हातातला सुरा दाखवत म्हणाला . बाकिच्या साथीदारांनीही आपापली हत्यारे बाहेर काढली . एकाकडे लोखंडी साखळी होती , एकाकडे रॉड तर एकाच्या हातात हॉकीस्टीक . तो गुंड परत खदाखदा हसत हसत म्हणाला .
"दोन फटके दिले तर तुझी सगळी उस्तादी बाहेर निघेल . काढ सगळे पैसे गपगुमान "
"हो ..काढतो ..काढतो . दया करा .. मला मारु नका.." घोड्याचा मालक घाबरल्या सुरात म्हणाला आणी आपल्या कडील पैसे काढु लागला . पैसे काढताना मध्येच त्याने आपल्या कपड्यांवर लागलेली वाळु झटकली . वाळु झटकताना अचानक त्याने आपल्या कंबरेला अडकवलेले पिस्तुल कधी बाहेर काढले हे कुणालाच कळले नाही .
पुढल्याच क्षणी चार गोळ्या वेगाने झाडल्या गेल्या . ते चारही गुंड आपली दुखरी बोटे आणी त्यांतुन वाहणारे रक्त पाहुन किंचाळु लागले . त्यांच्या हातातली हत्यारे कधीच गळुन पडली होती . घोडयाचा मालक त्यांना परत शांतपणे म्हणाला .
"दोस्तांनो ..तरी मी तुम्हाला सांगत होतो .. माझ्याशी .. या राखालशी पंगा घेउ नका . पण तुम्ही ऐकलं नाही ."
"राखाल .. हे नाव ऐकल्यासारखं वाटतय ." एक गुंड कण्हत कण्हत कसाबसा म्हणाला .
"हो .. मीच तो राखाल .. डाकु सरदार दुर्जनसिंगचा भाउ . तोच दुर्जनसिंग ज्याने आपल्या कारनाम्यांनी एकेकाळी सारा राजस्थान हादरवुन सोडला होता " राखाल गर्वाने म्हणाला . दुसरा गुंड त्यात भर घालत म्हणाला .
"हो..तो दुर्जनसिंग याद आहे .. ज्याचे नाव घेतले की तमाम आबालवॄद्ध , बायाबापडे थराथरा कापत असत ."
"पण आम्ही तर ऐकलं आहे की त्या दुर्जनसिंगला सामच्या दारा बुलंदनी कायमचं संपवलं " त्यांचा तिसरा साथिदार अजुन काही आठवुन म्हणाला .
"खामोश .." राखाल दार बुलंदचे नाव ऐकुन संतापाने कडाडला . "दाराने माझ्या भावाला मारले ..पण तेव्हा दुर्जन बेसावध होता . निहत्ता होता . आणी मी तेव्हा तिथे माझ्या भावाजवळ नव्हतो . नाहितर दाराची काय मजाल आहे माझ्या भावाला हातही लावण्याची . मी किशनगढच्या लुटीच्या मोहिमेवर गेलो होतो . तेव्हा दाराने संधी साधली ."
"हो तर ..तुझा भाउ बेसावध होता ." चौथा गुंड त्याला वेडावुन दाखवत म्हणाला . "दारानी दुर्जनला शरण येण्याची एक संधी दिली होती . पण तुझ्या भावालाच आपल्या ताकदीची फार घमेंड . तो ती संधी न जुमानता दाराशी टक्कर घ्यायला गेला . आणी मग दाराकडुन कायमचा आडवा झाला. तुझं नशीब चांगलं की तु तिथं नव्हतास .. नाही तर तुही.. हाहाहा.. " सगळेच गुंड आता एक होउन हसु लागले . वाळुमधे हसत हसत जोरजोरात लोळु लागले .
"तुम्हाला इतका वेळ जिवंत ठेवलं हिच चुक झाली ." राखाल संतापुन म्हणाला . पुढल्याच क्षणी गोळीबाराचे आवाज झाले . ते चारही गुंड वाळुत कायमचे कोसळले . आपले पिस्तुल लोड करुन काही घडलंच नाही अशा थाटात राखालने सामच्या दिशेने आपला सुडाचा प्रवास परत चालु केला . पेटीत खुप वेळ बसुन कंटाळल्याने या वेळी तो घोड्यावर बसला . दाराला संपवुन आपली सुडाची शपथ पुर्ण करायला तो अधीर झाला होता . सामही आता फारसे लांब राहिले नव्हते .
तासाभरात राखाल साममध्ये पोचला . गावच्या वेशीमधुन आत शिरुन तो दाराचा शोध घेउ लागला . थोडे पुढे गेल्यावर एका चौकामध्ये त्याला दोन तीन तरुण गप्पा मारताना दिसले . त्यांतल्या एका हसतमुख तरुणाला त्याने दाराचा पत्ता विचारला .
"इथे दारा बुलंदचे घर कुठे आहे ? मला त्याला भेटायचे आहे ." त्या तरुणाने हसतमुखाने समोरील एका घराकडे बोट केले . राखाल त्वरेने त्या घरामध्ये शिरला . त्याचे काम खुप सहज पार पडले होते . त्याला कुणीही " दाराला का भेटायचे आहे ? तुम्ही कुठुन आलात ? काय काम आहे ?" असे विचारले नाही . तसेच घरापाशी काही सुरक्षा व्यवस्थाही दिसत नव्हती . आपले पिस्तुल सज्ज करुन त्याने घरातील खोल्या तपासल्या . पण घरामध्ये एक दोन ज्येष्ठ म्हातारी बाया माणसे आणी लहान मुले सोडली तर कोणच दिसले नाही . घरामध्ये परत त्याने दाराबद्दल विचारले तर त्यांनी बाहेर बोट दाखवले . राखाल चिडुन घराबाहेर आला .
"त्या पोराने जर आपली मजा उडवली असेल , तर त्याला ती महागात पडेल ." तो पुटपुटला .
" पण आधी दाराचा खातमा करु मग त्या पोराकडे बघु . " त्याने परत स्वतःला समजावले .
यावेळेला त्याने आणखी एका तरुणाला दाराच्या घराचा पत्ता विचारला . त्या तरुणाने एका वेगळ्याच घरा़कडे बोट केले.
राखाल धावत त्या घरामध्ये शिरला . पण आतमध्ये एकतर म्हातारी माणसे नाहीतर लहान मुले होती . राखाल परत बाहेर आला . असा प्रकार आणी दोन तीनदा घडला . शेवटी कंटाळुन त्याने एका लहान मुलाला दाराचा पत्ता विचारला .
"दालाभाउ त्या पलिकडच्या घलात लहातो " त्या बारक्याने बोबड्या आवाजात परत एका वेगळयाच घराकडे हात दाखवुन सांगितले . राखालने त्या घरामध्येही शोध घेतला पण परत तोच प्रकार घडला . राखाल या प्रकारामुळे चांगलाच वैतागुन गेला . दिवसभर झालेला प्रवास , आणी आता दोन तीन तास झालेल्या दमणुकीमुळे तो आता कंटाळुन गेला होता . या कंटाळ्याची जागा संतापाने घेतली . रागाने दात ओठ खात तो गरजला .
"एकट्या दाराचाच नाही तर सगळ्या साम गावाचा मी हिसाब किताब करीन ."
तिरिमिरीने धावत तो परत सुरुवातीच्या चौकापाशी आला . तो हसतमुख तरुण अजुन तिथेच उभा होता . राखालने डायरेक्ट त्या तरुणाची कॉलरच पकडली आणी तो ओरडला.
"कायरे , तुम्हा गाववाल्यांचा काय गेम चाललाय ? तुम्हाला दाराच्या घराचा पत्ता नीट सांगता येत नाही ? मला गावभर सगळ्या घरांमध्ये फिरवताय काय ? माझ्याशी वाकडयात जाल तर दारासकट हे पुर्ण साम गाव बेचिराख करीन . राखरांगोळी करतो म्हणुन राखाल म्हणतात मला ..राखाल ..तुमचीही राख करीन राख.. "
"राखाल , पण तुला कुणी चुकीचं काय सांगितलं ? " तो हसतमुख तरुण त्याला शांतपणे म्हणाला .
"इथल्या .. साममधल्या प्रत्येक घरातल्या तरुणाच्या मनात दारा आहे . प्रत्येक घरामध्ये दाराला आदर्श मानलं जातं . आपणही दारासारखंच ताकदवान असावं .. आपली ताकद दारासारखीच अन्यायाविरुद्ध आजमावी हिच प्रत्येकाची इच्छा असते . इथल्या प्रत्येक घराच्या श्वासात दाराच राहतो . पण जाउदे ..तुला हे काही समजणार नाही . तुला सुरुवातीला बघितलं तेव्हाच तुझ्या हेतुची शंका आली होती .म्हणुन आम्ही सगळ्या सामच्या रहिवाशांनी तुला खेळवलं"
"तुझी भाषणबाजी बंद कर. तुला या राखालचा हिसकाच दाखवतो.." राखाल ओरडला आणी त्याने दोन तीन जोरदार ठोसे त्या तरुणाला मारले . तो तरुण थोडा लांब फेकला गेला . पण परत उठुन हसतमुखाने म्हणाला .
"वा राखाल .. बरेच दिवस झाले . कुठे काही अॅक्शन नाही.. शरीर पार आखडुन गेलं होतं. तुमच्यामुळे जरा हाडं मोकळी झाली . अजुन येउ दे..एवढ्यात थांबु नका.. "
राखालने परत चेव चढुन त्याला अजुन दोन तीन फटके लगावले . पण त्या तरूणावर काहिच परिणाम होत नव्हता . हा खेळ बघणारे सामचे इतर रहिवासी मजेने हसत होते . राखाल चकीत झाला होता . एरवी त्याच्या दोन तीन फटक्यांनीच समोरचा जायबंदी होत असे . पण इथे हा तरुण त्याच्या माराला ढिम्म दाद देत नव्हता .
राखालला त्याच्या लहानपणी त्यांच्या कबिल्यातल्या दाईमांने सांगीतलेली महाभारतातली भीम आणी बकासुराची गोष्ट आठवली . भीम सुरुवातीला बकासुराचा मार हसत हसत सहन करतो आणी नंतर बकासुर दमल्यावर त्या माराचे उट्टे काढतो. तेव्हा हि गोष्ट ऐकुन राखाल मनमुराद हसला होता . पण आज साममध्ये बकासुराचा रोल त्याच्याच गळ्यात पडला होता . तो सर्वांच्या चेष्टेचा विषय झाला होता. आणी समोरचा तरुण भीमाच्या रोलमध्ये भाव खात होता . सर्वांची वाहवा मिळवत होता .
"थांब .. आता बस झालं..तुझा किस्साच खतम करतो ." असे म्हणत राखालने आपले पिस्तुल काढले आणी त्या तरुणाच्या दिशेने सटासट गोळ्या झाडल्या . पण त्या तरुणाने कौशल्याने हवेतल्या हवेत उलट सुलट उड्या घेत ते सर्व नेम चुकवले . आपले पिस्तुल खाली झाल्याचे राखालच्या लक्षात आले . पुढच्याच क्षणी तो तरूण राखालसमोर आला . त्याचे दोन तीन जोरदार ठोसे राखालला बसले . राखाल कळवळुन खाली पडला . त्याला उठताच येइना . त्याच्या डोळ्यांसमोर अंधेरी पसरली . त्या तरुणाच्या ठोशांमध्ये चांगलाच दम होता . जोर होता .
"तु .. तुच दारा बुलंद आहेस..खरं ना ..खरं सांग. " राखाल वेदना सहन करत कसाबसा म्हणाला .
"नाही राखाल . मी या साम गावचा एक साधा रहिवासी आहे . दारा आम्हाला मित्र मानतो .. भाउ मानतो . आम्ही सगळेजण दाराच्याच तालमीत तयार झालेले दाराचे शागिर्द आहोत . साममधला दाराचा एक साधा शागिर्द जर तुला भारी पडत असेल , चारचौघांत तुझी ताकदीची गुर्मी उतरवत असेल तर दाराशी सामना करण्याचा तु विचारही करु नकोस . मग तुझी काय दशा होइल हे कोणच सांगु शकणार नाही ." तो तरुण पुढे शांतपणे बोलु लागला .
"आज दाराचा वाढदिवस आहे . म्हणुन तो , शीतल , बादल , मधुर आणी सलोनीदी जेसलमेरमधल्या एका अनाथाश्रमामध्ये गेले आहेत . आजचा दिवस ते तेथील मुलांबरोबर साजरा करणार आहेत . तुझं नशीब चांगलं कि आजच्या दिवशी आम्ही सामवासी शत्रुवरही दया दाखवतो . म्हणुन आज आम्ही तुला जिवंत सोडत आहेत. "
शरमेने खजील झालेला राखाल कसाबसा आपल्या घोड्यावर बसला . घाईघाईने तो सामच्या बाहेर पडला तेव्हा त्याला संकटातुन सुटका झाल्याचा आनंद झाला . मनामध्ये तो आता परत सुडाचे बेत आखु लागला .
"आपण परत आपल्या टोळीतील लोकांना एकत्र करुन सर्व शक्तीनिशी दारावर हमला करु . राखाल काय चीज आहे हे त्याला आणी सामच्या लोकांना दाखवुन देउ ."
पण त्याचे हे बेत मनातच राहिले . समोर वाळवंटामध्ये धुळीचे लोट दिसत होते . आठ दहा घोडेस्वार दौडत येत होते. आपल्या भावंडांच्या हत्येमुळे संतापलेले धुलिया गावचे ते तरुण राखालचाच शोध घेत येत होते .
------------ समाप्त------ काल्पनीक -------------------------------------------
प्रख्यात लेखक सु.शी. ( सुहास शिरवळकर ) यांचा दारा बुलंद हा गाजलेला कथा नायक सर्वांचाच आवडता आहे . या कथेमधुन ( फॅन फिक्शन ) सु.शी. यांना विनम्र आदरांजली .
प्रतिक्रिया
3 Jul 2016 - 11:06 pm | एस
भन्नाट!
3 Jul 2016 - 11:36 pm | किसन शिंदे
जबर
3 Jul 2016 - 11:48 pm | जव्हेरगंज
जबरदस्त!!!
4 Jul 2016 - 9:16 am | प्रचेतस
'बुलंद' कथांना उजाळा मिळाला.
4 Jul 2016 - 2:43 pm | अभ्या..
छान,
सुरेख आदरांजली. सुरवातीच्या चार ओळीतच अंदाज आलेला. खरा ठरला.
छान लिहिलेय. संवाद जरासे खटकेबाज असते तर सुशिच.
4 Jul 2016 - 3:23 pm | सस्नेह
सुशि स्टाईल छान जमलीय.
4 Jul 2016 - 4:12 pm | नाखु
तुम्ही मिपाचे नाव "राखाल"
मिपा वेचक रोचक कथा वाचक महासंघ
4 Jul 2016 - 8:11 pm | मुक्त विहारि
जबरदस्त..
5 Jul 2016 - 6:08 pm | सिरुसेरि
सर्वांचे खुप आभार .