रात्रभर तुझ्या आठवणीनी शिणलो. पहाटे पहाटे मी पारीजातकाचे झाड झालो.
बरसत राहीलो तुझ्या अंगणात एकेका फुलातून.तुझी पावलं लालसर दिसतायेत ती प्राजक्ताची फुलं तू तुडवून गेलीस म्हणून.
माझ्याशी न बोलता निघून गेलीस .मला माहीती आहे तू असशील त्या बटबटीत भडक कर्दळीच्या फुलाशी बोलत परसदारी.
मग मी सकाळच्या कोवळ्या उन्हात मिसळून उंबरा ओलांडून घरात आलो.तू कुठे दिसलीच नाहीस.
जुन्या घड्याळाच्या हलणार्या टोल्यासोबत माझा जीव पुढे पाठी होत राहीला.
हातात वाढलेले पान घेऊन तू अंगणात आलीस तेव्हा मी मोठा ढग झालो आणि माझ्या सावलीत मी तुझ्याकडे बघत राहीलो.
कुठूनतरी एका अगाऊ कावळ्याने तुझ्या हातावर झडप घातली आणि तू घाबरून घरात गेलीस.मी पुन्हा रागाने ऊन झालो.
तू आरशासमोर उभी राहून कुंकू लावलस तेव्हा थोडसं सांडलं तुझ्या नाकाच्या शेंड्यावर .
त्या सांडलेल्या कुंकवात मी होतोच.
तू जा कुठेही मी असतोच तिथे.
काल दुपारी कशीदा करताना टचकन् लागलेल्या सुईमुळे तुझ्या बोटातून रक्त आले.त्या लालबुंद थेंबातही मी होतो.
तू देवापुढे हात जोडतेस तेव्हा एक हात माझा असतो. दुसरा हात माझ्या हातात आहे असे मी मला समजावतो.
तू भेटत नाहीस मग मी रागावतो आणि भरदुपारी पळ्स होऊन माळावर फुलत राहतो.
क्रमशा
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------हे असं छान छान लिहीलं .एका कागदावर सुंदर हस्ताक्षरात.वाळवलेली फुलं पण आणून ठेवली होती.थोडी हारातली आणि थोडी एक गजरा आणून वाळवळेली होती.एका पाकीटात व्यवस्थीत टाकून केमेस्ट्रीच्या लॅब मध्ये गेलो. निलीमा होती. मनाचा पक्का धीर करून गेले होतो. मला पाहिल्यावर ती हसली.
"इकडे कुठे आज? कवि वगैरे तर कँटीन मध्ये असतात."ती म्हणाली.
"मी तुलाच भेटायला आलो होतो."मी इरादा पटकन सांगून टाकला.
"अय्या , हो? मंडळाची वर्गणी तर मी कधीच दिलेय."
"नाही वर्गणी नाही. मी तुला एक पत्र लिहीलंय." मी आता मरणाला पण तयार झालो होतो.
तिच्या दोन्ही हातात काचेच्या नळ्या होत्या.
'तुमचं आर्टस् वाल्यांच बरं आहे हो. तुम्हाला बरा वेळ मिळतो पत्र लिहायला.आमचं सायन्स वाल्यांच बघा."
म्हणजे प्रकरण या मुलीला काही कळलं नव्हतं.
'बघा ना दोन तास झाले ,हवा तो रंगच येत नाही."
(हा हवा तो रंग येण्यावर एकदा नंतर गजल लिहीण्याचं मी पक्क केलं)
मी ते पत्र दाखवलं." हे वाचून नंतर मला सांग ."
हिचं सगळं लक्ष त्या नळीत.
पत्र ठेवून मी बाहेर पडलो.
आता प्रतीक्षा. प्रतीक्षा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आलं आलं चार दिवसानी उत्तर आलं.
"वाचलं बाई पत्र तुमचं .कित्ती कचरा त्या पाकीटात.मला तर एव्हढी ऍलर्जी आहे . मी शिंकतच बसले.
तंबाखूची फक्की टाकून उरलेली तंबाखू तर नव्हती ना ती?असं माझी पार्टनर म्हणाली.
आपल्या होस्टेलची मुलं महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तंबाखू खातात म्हणे.असं पण ती म्हणाली.
मला तर पत्र कळलंच नाही काही. आमच्या कडे झाडंच नाहीयेत कसली कसली ती.
मी बाबांना पत्र वाचून दाखवलं .त्यांनी तुमची जात विचारली आहे.
होस्टेलला राहून एमे मराठी करताय असं सांगीतल्यावर म्हणाले घरचं बरं दिसतंय.पण जातीचं काय ते कळवा म्हणाले.
आई म्हणाली की "प्रेमं वगैरे प्रकरण दिसतंय हे.तुला आवडला का मुलगा?"
"प्रेमं नंतर करता येतात. लग्न एत्या वैशाखात करणार आहे का?"
नलूमावशीसारखं नको . .
"नलूमावशीला लग्नासाठी चार वेळा प्रेम करावं लागलं.चौथ्यांदा केलं तेव्हा झालं .नस्ता घोर जिवाला."
"बाबा येउ देत का ?"असंही विचारलं आहे.
मला सरळ सरळ सांगा ना.
आपण फक्त प्रेम करायचंय की डायरेक लग्न.?
माझ्या कवितांचे मोहर गळून पडले.
मी काही बोलूच शकलो नाही.आता दुसरं लग्न करायचं कसं?
सेकंड टर्मला लग्नाची प्रत्रीका पण आली.
अशा रीतीने साठापेक्षा जास्तीत जास्त शब्दात पत्र लिहून आणखी लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न फसला.
प्रतिक्रिया
22 Sep 2008 - 11:00 am | आनंदयात्री
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहातोय.
प्रश्न पडलेत, हे ललित लेखन का कथाबीजही आहे ?
रामदास म्हटले की अस्सल असणारच असा या ब्रँडवर गाढ विश्वास आहे मिपाकरांचा.
*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
22 Sep 2008 - 2:18 pm | आनंदयात्री
क्रमशः नंतर एकदम वाघाच्या रुपातुन गाढवच बाहेर आलं की !!
भारीच !
(तरीही फक्त विनोद वाटला नाही .. कारुण्याची झालर आहेच, एकंदरीत आमचे वरच्या प्रतिसादतले शब्द अजुनही एप्लिकेबल आहेत तर.)
*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
22 Sep 2008 - 11:02 am | विसोबा खेचर
रामदासराव,
सुरेख लेखन! (परंतु लेखन इतकं त्रोटक का? आणि तेही क्रमश:? हा प्रकार काही कळला नाय बुवा!)
साला, आमच्या पण आयुष्यात त्या बटबटीत भडक कर्दळीच्या फुलांनी खूपच व्यत्यय आणला! :)
असो,
तू आरशासमोर उभी राहून कुंकू लावलस तेव्हा थोडसं सांडलं तुझ्या नाकाच्या शेंड्यावर .
त्या सांडलेल्या कुंकवात मी होतोच.
तू देवापुढे हात जोडतेस तेव्हा एक हात माझा असतो. दुसरा हात माझ्या हातात आहे असे मी मला समजावतो.
ह्या ओळी बाकी खास!
आपला,
(कुणाच्याही कुंकवात नसलेला!) तात्या.
22 Sep 2008 - 11:09 am | विसोबा खेचर
शीर्षक वाचून 'प्रेम सेवा शरण' या पदासंबंधी काही लेखन आहे किंवा काय असे आम्हाला प्रथम वाटले!
असो,
आम्हाला करीमखसाहेबांचे भीमपलासीतले आणि मास्तर दिनानाथांचे मुलतानीतले, असे दोन्ही रितीने गायलेले 'प्रेम सेवा शरण' हे पद आवडते!
असो, विषयांतराबद्दल क्षमस्व...
आपला,
(दिनानाथरावांच्या थोरल्या लेकीचा चाहता!) तात्या.
22 Sep 2008 - 12:38 pm | रामदास
पण आयत्यावेळी गडबड झाली आणि अर्धवट प्रकाशीत झाला.
आता सुधारून परत लिहीतो आहे.
बाकी त्या पदावर मी काही लिहावे.नाही हो ती उंची गाठायला वेळ लागेल.अजून भिमपलासी आणि मुलतानी काही फरक नाही कळत नाही अजून .तीच गोष्ट भूप आणि देसकाराची.
धन्यवाद.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
22 Sep 2008 - 2:52 pm | घाटावरचे भट
तात्या,
कृपया एकदा भूप आणि देसकार यांची तुलना करणारा लेख होऊन जाऊ देत...
जरा 'जबसे तुमसन लागली' आणि 'हूं तो तोरे कारन जागी' मधल्या फरकावर करा की विस्तृत विवेचन...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
23 Sep 2008 - 11:49 am | विसोबा खेचर
भटसाहेब,
केव्हातरी नक्की लिहितो, अजून माझाही अभ्यास सुरूच आहे...
22 Sep 2008 - 1:56 pm | अनिल हटेला
रामदास जी !!
मस्त च आहे लिखाण !!
( मिपा वर सध्या प्रेमाची हवा जास्तच दिसतीये )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
22 Sep 2008 - 3:33 pm | लिखाळ
हा हा .. मजा आली.
>>"प्रेमं नंतर करता येतात. लग्न एत्या वैशाखात करणार आहे का?"<<
'वैषाख वणवा' काय ते आता थोडे समजले :)
-- लिखाळ.
22 Sep 2008 - 5:37 pm | झंडू बाम
प्रेमिका खूप जुन्या जमान्यातील किंवा अगदीच बावळ्ट दिसते. फार नादाला लागू नका तिच्या.
22 Sep 2008 - 11:28 pm | बिपिन कार्यकर्ते
क्या बात है काका...
सकाळी अर्धवट प्रकाशित वाचला तेव्हाच म्हटले, काहि तरी भानगड आहे. दुपारी बघतो तर अद्ययावत... मस्तच केलंय विडंबन...
मला सरळ सरळ सांगा ना.
आपण फक्त प्रेम करायचंय की डायरेक लग्न.?
हे मस्तंय... दे धडक बेधडक... वेळ फुकट घालवायचा नाही. कसला पोपट...
बिपिन.
23 Sep 2008 - 12:50 am | धनंजय
फर्मास विडंबन.
23 Sep 2008 - 2:26 am | प्राजु
रामदासजी..
सह्ही एकदम. शेवटी एकदम क्लिन बोल्ड..
आवडलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Sep 2008 - 11:42 am | नंदन
आहे, शेवटची फिरकी मस्तच!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
23 Sep 2008 - 8:49 am | चतुरंग
एकदम दत्तूच बनवला! ;)
चतुरंग
23 Sep 2008 - 9:20 am | पिवळा डांबिस
मला सरळ सरळ सांगा ना.
आपण फक्त प्रेम करायचंय की डायरेक लग्न.?
सायन्सच्या मुलामुलींना हेच कळतं हो!!
म्हणुन ते फक्त सायन्सच्याच मुला-मुलींशी जमवतात!!!
म॑ला सांगा, नाहीतर लॅबरॉटरीमध्ये फुकट घालवण्याइतका टाईम आहे कुणाजवळ?
:)
आपला (एका सायंटिस्टला पटवणारा)
पिवळा डांबिस
(स्वगत: अजूनही एखादं प्रेमाचं बोलणं ऐकतांना एकाद्या सेमिनारला बसल्यासारखं वाटणारा, काकूचा अतीव आज्ञाधारक...पिवळा डांबिस!!!!)
23 Sep 2008 - 9:32 am | विजुभाऊ
स्वगत: अजूनही एखादं प्रेमाचं बोलणं ऐकतांना एकाद्या सेमिनारला बसल्यासारखं वाटणारा, काकूचा अतीव आज्ञाधारक...पिवळा डांबिस!!!!)
=)) =))
कॉलेजमध्ये लॅब मध्ये एक्स्प्रीमेन्ट्च्या नावखाली लोक डेमोन्स्ट्रेशनच जास्त बघतात.
म्हणुन नवीन संशोधनासाठी नवनव्या गोष्टी शोधतात
::::: शोधक संशोधक विजुभाऊ
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
23 Sep 2008 - 9:43 am | पिवळा डांबिस
>कॉलेजमध्ये लॅब मध्ये एक्स्प्रीमेन्ट्च्या नावखाली लोक डेमोन्स्ट्रेशनच जास्त बघतात.
नाय हां, असं नाय हां!!! आम्ही एक्सपरिमेंट खूप केले, पण एकच एक्सपरिमेंट जिवाला भावला, मग तोच पुन्हा-पुन्हा केला, आयुष्यभर....
अजूनही साला कंटाळा आलेला नाही...
>डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा .
किंवा बर्फात साखर घाला, शून्याखाली तपमान नेऊ शकाल....
आवडता एक्सपरिमेंट करतांना डोकं शान्त ठेवायची जरूर असते...
:)
23 Sep 2008 - 10:43 am | सखाराम_गटणे™
कॉलेजमध्ये लॅब मध्ये एक्स्प्रीमेन्ट्च्या नावखाली लोक डेमोन्स्ट्रेशनच जास्त बघतात.
म्हणुन नवीन संशोधनासाठी नवनव्या गोष्टी शोधतात
जबरा
बरेच डेमोन्स्ट्रेशन बघितले की जगात काय काय चालु आहे याचा अदांज येतो. आणि हवे ते प्रोडक्ट घेता येते.
-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
23 Sep 2008 - 9:21 am | मन
जमलय लिखाण....
खुमासदार.....
आपलाच,
मनोबा
23 Sep 2008 - 10:52 am | सखाराम_गटणे™
शेवटचा भाग खतरा.
सरळ सरळ यॉर्कर.
उगाच ७ वर्ष घालवायला नकोत.
-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
23 Sep 2008 - 11:36 am | डॉ.प्रसाद दाढे
खतरनाक रामदासजी! तुमची लेखणी 'ते॑व्हा' मला मिळाली असती तर.... ??
(दत्तू) प्रसाद
23 Sep 2008 - 12:01 pm | प्रभाकर पेठकर
मी समजत होतो आजकाल मुलं मुली आमच्या पेक्षा जास्त हुशार झाली आहेत.
हे म्हणजे अगदी 'गाढवीणीपुढे वाचली गीता....असे झाले. ('वाचणाराच गाढव होता' असे म्हणणार नाही.)
माझ्या कवितांचे मोहर गळून पडले.
हे वाक्य कवीच्या ढासळल्या मनाचे यथोचित वर्णन करते. अभिनंदन.
23 Sep 2008 - 3:02 pm | शाल्मली
इतर लेखांप्रमाणेच हा लेखही मस्तच !
वाचताना मजा आली.
--सौ. लिखाळ.
2 Aug 2011 - 5:12 pm | विजुभाऊ
रामदास तुमचे लिखाण .......जुने कपाट उचकायला जावे अन त्यात एखादे हुरहुर लावणारे काही सापडावे तसे काहीसे अचानक सापडते
13 May 2016 - 1:19 pm | मराठी कथालेखक
मजेदार...
13 May 2016 - 1:41 pm | वैभव जाधव
खिक्कक्क!
खतरा हिटविकेट.
13 May 2016 - 4:56 pm | सिरुसेरि
मजेदार लेख . आजच्या जगात असे विशुद्ध प्रेम मिळत नाही .
13 May 2016 - 5:50 pm | मराठी कथालेखक
बरं हे ज्याचं विडंबन आहे तो लेख कुठे आहे ?