माझं नशिबच थोर आहे! अमेरिकेत पाऊल ठेवलं आणि न्युयॉर्क कट्ट्याचा धागा! भारतात मी एकाच कट्ट्याला गेले होते, ते ही ३.५ मिनिटं. अनाहितात सुद्धा ऐनवळेस टांगारुपणा करण्यात मी फेमस आहे. हा कलंक धुवुन काढायची नामी संधी आली होती. जायचं हे नक्की होतंच. ते ही सहकुटुंब सहपरिवार!
कट्ट्याच्या दिवशी सकाळी सकाळी नवरा आणि मुलाने भलताच कार्यक्रम काढला आणि फादर्स डे म्हणुन कुठेतरी उंडारायला गेले. टांगारुपणा घरातच आहे. परंपरा राखली बाप लेकांनी!!
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी एकदम "पंछी बनु उडती फिरुं मस्त गगनमे.." च झाले! ;) आणि ११ च्या कट्ट्याला १०.४० लाच जाऊन पोहचले. मग लक्षात आलं की आपल्याकडे कुणाचाही नंबर नाही. म्हणुन धाग्यावर प्रतिसाद देऊन ठेवला. पण कुणी तो वाचेल तरी का हा प्रश्नच होता.
न्युपोर्ट मॉल
मी ठरलेल्या ठिकाणी जाऊन जाणार्या येणार्यांना टक लावुन बघत बसले. कुणी तिथे थांबेचना. जरा कुणी रेंगाळलं की मी त्याच्या मागे मागे जाऊन बघायचे. बरं जाऊन "मिपा का?" असं तरी कसं विचारणार? मला तर सगळ्यांनी एकमेकांना कट्टा कॅन्सल करुन कळवलय आणि आपणंच इथे आलोय असं वाटायला लागलं.
काय झालं होतं की "न्युपोर्ट मॉलचा एन्ट्रन्स" असं साधं ठिकाण ठरलं होतं. पण बारिकसा मुद्दा हा होता की मॉलला किमान १५ तरी एन्ट्रन्स आहेत! आणि स्टेशनसमोर म्हणलं तरी तिथे पाथ आणि लाईटरेल असे दोन स्टेशन आहेत. त्यातली पाथ वायली आणि लाईटरेल वायली हे सगळ्यांनाच माहिती नसेल हे कुणाच्या लक्षात नाही आलं. म्हणुन मग आले तर सगळे.. पण कुणीच कुणाला सापडेना!
पण म्हणलं ना, माझं नशिबच थोर आहे! मला उत्सवमुर्ती काकाच दिसले! मी त्यांच्या मागे मागे निघाले खरी, पण त्यांना थांबवुन विचारावं कसं हे कळेना. शेवटी धीर एकवटुन "एक्काकाका का?" असं एका दमात विचारुन टाकलं. काकांना अर्थातच काहीच समजलं नाही. मग नीट "तुम्ही डॉ. सुहास म्हात्रे ना?" असं शिस्तीत विचारल्यावर काका हो म्हणाले आणि आपला पोपट झालेला नाही हे कळल्यावर बरं वाटलं!
काकांकडे सगळ्यांचे नंबर असल्याने त्यांनी भराभरा फोन लावले आणि दोनच मिनिटात तिथे आम्ही ७-८ जण जमलो!
एक्काकाका आपल्या पत्नी आणि मुलासहित न्युयॉर्कहुन तर राघव आपल्या कुटुंबासहित एडिसनहुन आले होते. damn (काय नाव आहे!) सात तास ड्राइव्ह करुन कट्ट्यासाठी आला होता आणि माझ्यासारखाच टेन्शन मध्ये मॉलमध्ये फिरत होता. =))
कट्ट्यासाठी "सात" तास एकट्याने ड्राइव्ह करुन आलेला मिपाच्या इतिहासातला हा एकमेव माणुस असेल. ह्याचा फोटो
बॅनर म्हणुन ह्या वृतांताच्या वर लावुन द्यावा अशी कलामंडळाला विनंती!!
न्युपोर्ट मॉल जवळच न्युपोर्ट ग्रीन म्हणुन बाग आहे. तिथे जायचे ठरले.
एकमेकांशी ओळख करुन घेत, गप्पा मारत बागेत पोहचलो. लगेच मागुन "येडा अण्णा" (हे ही एक धन्य सदस्यनाम!) आणि मिहिर आले. एक्काकाकांच्या मुलाच्या ऑफिसातली एक कलिग तिच्या सर्व परिवारासहित आली. इथे मग तासभर एकमेकांच्या ओळखी, मिपाविषयक गप्पा, लोकसत्ता, अमेरिकेतील मराठी जनता, अमेरिकेतल्या मराठी मुलांची मराठी भाषा वगैरे अनेक विषयांवर भरपुर गप्पा झाल्या. राघव ह्यांनी बरीच वर्ष ह्याच भागात काढलेली असल्याने त्यांच्याकडुन पुष्कळच माहिती मिळाली.
१२:३० च्या सुमारास मात्र भुका लागल्याने परत सगळी जनता मॉलमध्ये फुडकोर्ट कडे निघाली.
डावीकडुन :-
उभे - समस्त जर्सीमधले खादाडीचे अड्डे माहिती असलेले राघव, उत्सवमुर्ती एक्काकाका, भारतात फारसा न राहुनही उत्तम मराठी बोलणारा एक्काकाकांचा मुलगा सागर, अत्यंत शांत धीरगंभीर व्यक्तिमत्व आणि खोदुन खोदुन विचारल्यावर समजलं की खगोलशास्त्रात डार्क मॅटरवर पीएच्डी करणारा मिहिर, कट्ट्यासाठी सात तास ड्राइव्ह करुन आलेला damn, मिपा म्हणजे काय हे ही माहिती नसलेले पेंडसे काका, सदस्यनामाप्रमाणे अजिबात नसणारे येडा अण्णा
बसलेले :- मिपाला सवत मानणार्या पण अधुन मधुन मिपा वाचक आणि राघव ह्यांच्या पत्नी- वृषाली, मी, काकांच्या पत्नी म्हात्रे काकु, मिपा वाचक पण सदस्य नसणार्या आपटे काकु, मिपा माहिती नसलेल्या पेंडसे काकु, मिपा वाचक पण सदस्य नसणारी-आपटेंची मुलगी-पेंडसेंची सुन-सुपर्णा!
सोबत चिल्ले पिल्लेही होते. पण त्यांचे फोटो टाकत नाही. पोरं भलतीच गोड होती, उगा दृष्टावतील!
मॉलला जाता जाता शिष्ट पुणेकर हा ज्वलंत विषय damn ने छेडला. लोक पुण्यावर फार जळतात हेच खरं. ;)
ही आमची खादाडी!
ह्या इथेच आम्हाला साक्षात्कार झाला की damn हे एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहेत!! आधी त्यांनी तिखट खाणं आरोग्याला हानिकारक असतं ह्यावर लहानसं प्रवचन दिलं. मग आता मॅक्सिकन पोळी भाजी कशी नीट ग्रिल केलेली नाही ह्यावर नाराजी (१३७व्यांदा) व्यक्त केली. मग आता कोणत्या साईडने खायला सुरवात करावी ह्यावर चिंतन केले. मग एक घास खाऊन पाहिला न पाहिला की बदलापुर मध्ये ऑरगॅनिक भाज्या मिळतील किंवा कसे ह्या विषयावर एक्काकाकांसोबत सपट महाचर्चा सुरु केली. काकांकडुन उत्तर मिळेना तर बाजुला पेंडसे काकांना पकडलं. काकांनी चक्क मदत करु शकतील अशा एकांचा पत्ता दिला. "इतकाच आता ह्याही ग्रुहस्थांच्या मागे लागलास तर ते घरी येऊन तुला भाज्या देऊन जातील रोज!" असंही एक्काकाकांनी त्याला टोलवला! मग तो ही मुद्दा संपला म्हणुन "सदस्यनाम" ह्या विषयावर चर्चा उतरली. तेव्हा महाराजांना लक्षात आलं की damn चा अर्थ damn u असा होतो. तोवर त्यांना ही चार रॅण्डम अक्षरं वाटत होती. मग सदस्यनाम कसे बदलायचे ह्यावर पुन्हा सपट महाचर्चा! मग अचानक त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांच जेवुन झालेलं आहे!
"अरे हळु जेवा ना"
"मागची दहा मिनिटं इतर कुणाचा आवाज येतोय का तुला? कमी बोल आणि खा."
मग damn राव जेवायला बसले! तरी जेवता जेवता "उमा जेटली" कोण आहेत हा गहन प्रश्न त्यांना पडला होता! तर लीमाउजेट म्हणजे उमा जेटली नावाची कुणीही बाई नाही हे सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. =)) तरी त्यातुन सावरता सावरता "विपश्यना" हा मुद्दा चर्चेला घेतलाच त्यांनी.
damn ने फायनली संधी दिली म्हणुन मग एक्काकाकांनाही बोलायला चान्स मिळाला ;)
काकांनी त्यांच्या कामाबद्दल थोडक्यात पण फार मस्त माहिती दिली. त्यांचे वेगवेगळे अगदी बीजे मेडिकल पासुन ते डिफेन्स मध्ये अधिकारी म्हणुन आलेले अनुभव ऐकुन कट्ट्याला आल्याचं सार्थक झालं असं वाटलं!
मिपावरच्या टर उडवणार्या प्रतिसादांना घाबरुन न लिहीण्याचा विषय निघाला तेव्हा काकांनी एक फार मस्त गोष्ट सांगितली. काका म्हणाले "मी मॅनेजमेंट्मध्ये काम करताना मला हे माहिती होतं की मी कधीच १००% लोकांना १००% वेळा समाधानी ठेवु शकत नाही. तेव्हा मी तेच करायचो जे मला योग्य वाटायचं. जर तुम्ही करत असलेली गोष्ट अनैतिक, अवैध आणि अस्वच्छ नसेल तर मग इतरांचा विचार करायचा नाही. आपल्याला जे योग्य वाटेल तेच करायचं!"
काकांशी गप्पा मारता मारता असा तर कितीही वेळ गेला असता आणि तरीही गप्पा संपल्या नसत्या. पण अखेर जायची वेळ झालीच. एकमेकांचे नंबर घेऊन पुन्हा भेटु म्हणुन निरोप घेतला. कट्ट्याच्या निमित्ताने आपल्या आजुबाजुला किती लोक मिपा वाचत असतात हे जाणवलं! भारी वाटलं!
असेच कट्टे होत राहोत!
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा!
(सगळ्यांनी आपल्या जवळचे फोटो आणि आपापले अनुभव नक्की अॅडवा! टंकाळा आला म्हणुन अजुनही रोमात राहिलात तर जनता माफ नही करेगी!)
प्रतिक्रिया
21 Jun 2016 - 6:39 pm | श्रीरंग_जोशी
सहा वर्षांनी प्रथमच मिपावर जाहीर धागा टाकून अमेरिकेत झालेला यशस्वी मिपाकट्टा आयोजनाबद्दल डॉ. म्हात्रे व सर्व कट्टेकर्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
वृत्तांत एकदम दिलखुलासपणे लिहिला आहे (अमेरिकेत आल्यावर बुजरे लोकही खुलतात ;-) ). डॉ. म्हात्रे यांचा उपवृत्तांतही आवडला. फोटोजही खास आहेत.
21 Jun 2016 - 6:48 pm | अंतु बर्वा
कट्टा मिस झाल्यामुळे व्यवस्ठित जळजळ झालेली आहे. damn साहेबांच्या चरणकमलांचा फोटो टाकायला हवा होता. :-)
21 Jun 2016 - 6:51 pm | राघवेंद्र
धन्यवाद पिरातै सुंदर वृत्तांत लिहिल्याबद्दल. सकाळी ११ चा कट्टा आम्ही भारतीय वेळा प्रमाणे पोहचलो तर प्रमुख पाहुणे ( एक्का काका कुटुंबीय व पिरातै ) अगोदरच हजर होते. तिथेच लगेच छोटिसी ओळख परेड झाली. damn भाऊंचे १००mph ने कार चालवायचा अनुभव, तसेच सकाळी ३:३० निघुन कट्याला पोहचण्याचा अनुभव, पिरातै यांचा पुण्यातील व अमेरिकेतील वातावरण बदलाचा oxygen चा किस्सा, एक्का काका चे प्रवासाचे अनुभव , त्यांच्या जुन्या अमेरिकेतील सहलीच्या आठवणी, येडा अण्णा यांच्या बरोबर झालेल्या ग्रीन कार्ड व पुण्यातील घराबद्दल च्या चर्चा , मिहीर यांच्याशी ओळख , सोलापूरच्या आपटे मॅडम ची झालेली अचानक भेट तसेच सर्व बालगोपाळांनी बागेतील आम्हाला त्रास न देता खेळणे ही या कट्याची वैशिष्टे. तसेच एक्का काकानी काढलेले फोटो पाहुन न्यूपोर्ट परिसर एवढा सुंदर आहे हे सुद्धा कळले.
21 Jun 2016 - 8:00 pm | सखी
दणदणित कट्टा व खुसखुशित वृत्तांत.
जर तुम्ही करत असलेली गोष्ट अनैतिक, अवैध आणि अस्वच्छ नसेल तर मग इतरांचा विचार करायचा नाही. आपल्याला जे योग्य वाटेल तेच करायचं!" लाखमोलाची गोष्ट.
21 Jun 2016 - 8:35 pm | स्रुजा
काय वृत्तांत ! पिरा लिहिणार म्हणल्यावर मी वाट च पाहात होते :) निराशा केली नाहीस. एक्का काकांचा उपवृत्तांत पण खास च.
चहामधल्या साखरेची चव ___/\___
21 Jun 2016 - 8:43 pm | जुइ
खूपच झक्कास झाला कट्टा!! वृत्तांत आणि सर्व उप वृत्तांतही भारी आहेत.
अवांतरः- मिडवेस्ट कट्टा झालाच पाहिजे! जय मिपा!!
21 Jun 2016 - 8:54 pm | wrushali kulkarni
खूपच छान वर्णन लिहिले आहे पिरा.सगळ्यांना भेटून खूप मस्त वाटले.
आणि सवत (मिपा) माझी लाडकी व्हायला लागली. हा हा हा !!!
काका फोटो आणि वर्णन फारच सुंदर. परत एकदा तो दिवस अनुभवला.
आता मिपावर रोमात न राहता जोमात लेख लिहायचा प्रयन्त करेन.
पिरा धन्यवाद नाव बरोबर लिहिल्याबद्दल !!!
22 Jun 2016 - 10:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
आता मिपावर रोमात न राहता जोमात लेख लिहायचा प्रयन्त करेन.
ये हुई ना बात !
21 Jun 2016 - 9:18 pm | जव्हेरगंज
सचित्र वृत्तांत आणि उपवृत्तांते आवडली!!!
21 Jun 2016 - 11:15 pm | इशा१२३
मस्त वृत्तांत आणि उपवृत्तंात!
21 Jun 2016 - 11:44 pm | भोळा भाबडा
छान दिलखुलास तब्येत आहे सगळ्यांची.
22 Jun 2016 - 12:06 am | खटपट्या
खूप छान व्रुत्तांत आणि फोटो. एकदम नॉस्टॅलजीक का काय म्हणतात ते व्हायला झालं कारण एक्का काकांनी टाकलेल्या पहील्या फोटोतल्या इमारतीत ६ महीने काम केलेय. आणि ही जी मंडळी जेवली तीथे रोज जेवलोय. जरनल स्क्वेअरला रहायला होतो त्यामुळे पानाच्या पिचकार्या रोज पाहील्यात.
एकंदर कट्टा मस्त...
22 Jun 2016 - 12:36 am | चतुरंग
सचित्र वृत्तांत एकदम जबरी आणि एक्काकाकांची पुरवणीदेखील भारी!
जर्सीसिटीत जायचा योग कधी आलेला नाही. पुढल्या भेटीत नक्कीच जाणार.
22 Jun 2016 - 1:13 am | येडा अण्णा
फारच सुंदर वृत्तांत आणि उपवृत्तांत. धन्यवाद पिरा आणि एक्काकाका.
सर्वप्रथम यशस्वी मिपाकट्टा आयोजनाबद्दल एक्काकाका आणि बाकी कट्टेकरी मिपाकर मंडळाचे धन्यवाद !! माझा हा पहीलाच मिपा कट्टा असल्यामुळे मी जरा जास्तच उत्सुक होतो. मनात थोडी भिती ही होती कारण कुणालाही मी पर्सनली ओळखत नसल्यामुळे कट्याला जावुन काय गप्पा मारणार हा ही प्रश्न होताच. पण कट्टेकरी मिपाकर मंडळी एकदमच धमाल निघाली. एकदा तिथे पोहोचल्यावर ज्या गप्पा सुरु झाल्या आणि मी ह्या सगळ्या लोकाना पहिल्यान्दा भेत भेटत आहे हेच विसरलो. गप्पा मारण्यात वेळ कसा गेला कळलेच नाही. खादाडी लाही मजा आली. एक्काकाका, एक्काकाकांचा मुलगा सागर, म्हात्रे काकु, राघव-वृषाली, पिलीयन रायडर, मिहिर, damn राव, सुपर्णा, आपटे काका-काकु, पेंडसे काका-काकु या सगळ्याना भेटुन मजा आली. पुन्हा एकदा असा धमाल कट्टा होऊ द्या.
माझ्या पिल्लूने पण कधी नाही ते मला बराच मोकळा वेळ दिला. नाहीतर माझ्या रविवार च्या दिवसावर फक्त तीचा ह़क्क असतो. अर्थात हे राघव-वृषाली च्या अथर्व मुळे शक्य झाले. धन्यवाद राघव आणि वृषाली.
22 Jun 2016 - 11:12 am | सस्नेह
मत्त मत्त कट्टा ! दुत्त दुत्त उसगावकर !
पण पिरा आणि एक्का काका दोघांचा मिळूनसुद्धा त्रोटकच वाटला.
22 Jun 2016 - 4:13 pm | स्नेहल महेश
मस्त मस्त!
फोटू छान आलेत.
23 Jun 2016 - 12:13 am | जुइ
मॅडीसन विस्कॉन्सिन येथे २ जुलैला श्रीरंग_जोशी आणि जुइ असणार आहोत. जवळपास कुणी मिपाकर असतील तर भेटायला आवडेल.
11 Jul 2016 - 1:08 pm | वेल्लाभट
नमस्कार
माझी एक नातेवाईक शिक्षणानिमित्त पुढील महिन्यात न्यूयॉर्क च्या कॉलेजात येणार आहे. तिला व तिच्या ग्रूप ला न्यू जर्सी मधे भाड्यावर घर शोधायचे आहे. तिला काही अडचण आल्यास मार्गदर्शन हवं असल्यास तुमच्यापैकी कुणाचा संपर्क दिला तर चालेल का? असल्यास सांगा मी व्यनि करतो तुम्हाला.
धन्यवाद.
12 Jul 2016 - 2:38 am | जयन्त बा शिम्पि
अरेरे , आमचे नशिब मात्र , पिलियन रायडर एव्हढे जोरावर असते तर आम्ही सुद्धा , कट्ट्यात , सामिल झालो असतो , पण काय करणार ? आम्ही अमेरिकेच्या भूमीवर , २९ जुन २०१६ ला सायंकाळी पाय ठेवला. असो. तरीही , कट्ट्याचे सविस्तर व्रुत्तांत वाचुन ( आणि 'क्षणचित्रे ' पाहुन ) कट्टा छानच झाला यातच समाधान मानतो.
12 Jul 2016 - 3:15 am | जयन्त बा शिम्पि
अरेरे ,! आमचे नशिब मात्र पिलियन रायडर एव्हढे नक्कीच चांगले नव्हते , कारण आम्ही अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवला तो नेमका २९ जून ला सायंकाळी ! ! त्यामुळे कट्ट्याला हजर रहाण्याची एक संधी गमावली. पण कट्ट्याचा व्रुत्तांत व क्षण चित्रे पाहुन आनंद वाटला.
12 Jul 2016 - 3:16 am | जयन्त बा शिम्पि
अरेरे ,! आमचे नशिब मात्र पिलियन रायडर एव्हढे नक्कीच चांगले नव्हते , कारण आम्ही अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवला तो नेमका २९ जून ला सायंकाळी ! ! त्यामुळे कट्ट्याला हजर रहाण्याची एक संधी गमावली. पण कट्ट्याचा व्रुत्तांत व क्षण चित्रे पाहुन आनंद वाटला.