++तुझे टाळतो मी अताशा शहर++
---------------------------------------------------
सुशोभीत केली जुनीशी कबर.!
स्वतः मीच केली स्वतःची कदर.
जसा बोललो आरश्याशी जुन्या
तशी घेतली मी स्वतःची खबर!
किती जीव घेतील शस्त्रे तुझी
कधी ओढणी वा कधी तो पदर
म्हणे फार होती पवित्र अधी
तिची मग बनवलीच नंतर गटर
ठरवताच पार्टी मनाने कधी
तिथे सर्व दु:खे सुखेही हजर
तसा तोच रस्ता जवळचा तरिहि
तुझे टाळतो मी अताशा शहर
दवा बनुनी येताच मृत्यु असा
उतरते तिथे जीवनाचे जहर
कळाली तुझी मज खुशाली जशी
किती छान आला मनाला बहर
तुझे रुप आहे तसे देखणे.
तुझे हास्य त्याहुनि तौबा कहर
+ कानडाऊ योगेशु
प्रतिक्रिया
5 Jun 2016 - 9:59 am | प्रचेतस
लय भारी.
5 Jun 2016 - 3:50 pm | कानडाऊ योगेशु
धन्यवाद वल्लीसेठ!
5 Jun 2016 - 2:29 pm | सांजसंध्या
खयाल सुरेख आहेत.
पहिल्या शेरात जुनीशी हा शब्द बदलता येईल का ? स्वतः मी हे पण खटकते किंचितसे.
सुशोभीत केली जुनी मी कबर.!
स्वतःचीच केली स्वतः मी कदर
साधारण असा शेर चालेल का ?
( वृत्ताचे नाव काय आहे ह्या ? भुजंगप्रयातात एक गा कमी आहे)
5 Jun 2016 - 3:44 pm | कानडाऊ योगेशु
सांजसंध्या,
जुनीशी च्या आधी पुरानी असा शब्द योजला होता. पण मराठीत पुराणी म्हणावे लागले असते आणि पुरानी (हवेली,कोठी इ.इ.) हा हिंदी शब्द इतका रुळला आहे कि तोच (मराठीत) योग्य नसुन योग्य वाटतो म्हणुन जुनीशीच ठेवला.
स्वतः मीच च्या ऐवजी स्वतः चीच हा ही योग्य बदल आहे.
एकुण तुम्ही सुचवलेले बदल चपखल आहेत. आवडेश.
वृत्त ठरवुन निवडले नाही. पण प्रत्येक ओळीत पहील्या ओळीतील मात्रा सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे.
6 Jun 2016 - 1:53 pm | महासंग्राम
वाह खूप सुंदर खयाल