उद्या १ जुन.......गोनिदा जाउन अठरा वर्ष होतिलं. १ जुन १९९८ ला पुण्यात ते अख्ख्या महाराष्ट्राला पोरकं करुन मोठ्या प्रवासाला निघुन गेले...कायामचे! आज जर अप्पा ( गोनिदांना) असते, अर्थातच ते आजही आपल्यातच आहेत...आठवनींच्या रूपात, त्यांच्या लिखाणाच्या रूपात, पण जर हयात असले असते तर येत्या ८ जुलैला १०० वर्षांचे झाले असते..असो. आज सहजच त्यांची आठवण आली आणि लिहीता झालो. अप्पांच्या अठराव्या स्म्रुतिदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्याबद्दल अगदी अल्प अशा आठवणी सांगणारा हा लेख त्यांनाच अर्पण....
==========================================================================================
गोपाळ निळकंठ दांडेकर...नावच भारदस्त वाटत. वयाच्या अवघ्या १२-१३ वर्षापासुन जि भिंगरी या माणसाच्या पायाला चिकटली ती कायमचीच. ८ जुलै १९१६ साली अप्पांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यात झाला. अवघ्या १२-१३ व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होन्यासठी घरही सोडलं. पाय चालु लागले, नव्या दिशा बघु लागले, माणसं न्याहाळु लागले. कालातंरानं गाडगेबाबांच्या संपर्कात आले. त्यांच्या बरोबरसुद्धा खूप हिन्डले. इतकेच नाहीत तर त्यानंतर त्यांनी गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी ते गावोगाव हिंडले.'सोपे लिहिणे व बोलणे ही गाडगेबाबांची देणगी;' असे गोनीदां म्हणत. अप्पांना हळुहळु गड खूणाउ लागले. छत्रपतींचा वारसा दिसु लागला. ते अनेक गड, जागा ज्या राजांच्या पदस्पर्शानं पावन झाल्या होत्या त्या सगळ्या फिरले. आपल्या प्रत्येक वाढदिवसाला कोणत्या ना कोणत्या गडावर असण्याचा त्यांचा कल असे मात्र जेव्हा शेवटी प्रक्रुती मूळं त्यांना हे झेपत नसे याचा प्रचंड त्रास होइ.
१९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला. खरं सांगायच तर मराठीतला हा पहीला असंस्क्रुत लेखक...ज्यानं जगायला शिकवलं. लिहीतना त्यांना आपल्या भटकंतीचा, अनुभवाचा फार उपयोग झाला.
नर्मदेची पायी परिक्रमा हा गोनीदांच्या जीवनातला एक रोमहर्षक भाग होता.'आमचे राष्ट्रगुरू' ही लहान मुलांसाठी पुस्तिका हे त्यांचे पहिले लेखन. 'साभार परत' हा शब्द माहीत नसलेला मी लेखक आहे, असे गोनीदा म्हणत. 'बिंदूची कथा' ही त्यांची पहिली कादंबरी. मग त्यांनी 'माचीवरला बुधा', 'पूर्णामायेची लेकरं' (ही वऱ्हाडी बोलीतील पहिली कादंबरी),'आम्ही भगीरथाचे पुत्र', 'मोगरा फुलला', 'पडघवली', 'शितू', 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'मृण्मयी' अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या.
'मृण्मयी' अप्पांची सर्वात आवडती कादंबरी. 'पडघवली'पासून आपल्याला लेखनशैली सापडली, असे ते म्हणत. 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत' या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. 'पवनाकाठचा धोंडी'ला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. 'शितू', 'कुणा एकाची भ्रमणगाथा', 'पवनाकाठचा धोंडी', 'पडघवली' या कादंबऱ्यांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले.
दूर्गप्रेम-शीवप्रेम त्यांच्या नसानसात भिनलं होतं. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी लिहिले आहे, 'मी मेल्यावर माझी रक्षा सहयाद्रीतील शिवछत्रपतींच्या रायगडावर, बाजीप्रभूंच्या पावनखिंडीत, आणि सिंहगडाच्या तानाजी कडयावर, उधळून टाकावी. हे काम श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी करावे.' या माणसाची शेवटची इच्छाही शिवरायांच्या गड-किल्ल्यात माती बनून कायमचे मिसळून जावे, अशीच होती. यापेक्षा अधिक कोणता पुरावाहवा त्यांच्या उत्कट शिवभक्तीचा?
मृत्यूविषयी त्यांच्या स्वत:च्या कल्पना होत्या. ''माचीवरला बुधा' हे एक माझ्या मरणाचे मी पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपायचे असेल तर ते बुधासारखे संपावे,' असे ते म्हणाले होते.'जोपर्यंत मी राजगडावर जाऊ शकतो, तोपर्यंत दिवा विझलेला बरा. मी विनाकारण भारभूत होऊन जगू इच्छित नाही. माझ्याभोवती भरपूर माणसे आहेत; पण त्यांना भार होऊन बसणे बरे नव्हे.', अशी भावना गोनीदांनी त्यांची ७१ वर्षे पूर्ण झाल्याच्या वेळी 'सकाळ'ला मुलाखत देताना व्यक्त केली होती.
जेवढ प्रेम महराजांवर तेवढच मरठीवर सुद्धा होतं.ते स्वत: सर्व प्रांत हिंडलेले असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यात ती बोलीभाषा उमटे. प्रादेशिक कादंबरीचे दालन गोनीदांनी समृध्द केले, ते त्यांच्या या अंगामुळे. मराठीच्या कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, मावळ, अहिराणी, ठाकरीअशा बोलीभाषांतील लेखन वाचकाला थेट भिडायचे.अप्पांची पंचाहत्तरी १९९० मध्ये उत्साहात साजरी झाली. तेंव्हापासून त्यांनी मराठीतील एका उत्कृष्ट साहित्यकृतीला पाच हजार रूपयांचा 'मृण्मयी पुरस्कार' सुरू केला. शेवटी शेवटी ते 'मराठी मायबोलीला वाचवा. तुकाराम-ज्ञानेश्वरांची मराठी समजणारे वाचक झपाटयाने कमी होत चालले आहेत,' अशी खंत व्यक्त करीत.
अखेर काळ हाच सर्वश्रेष्ठ असतो हे कुणीच नाकारु शकत नाही. अखेर ती वेळ सुद्धा आली जेव्हा तमाम दूर्गप्रेमी पोरके झाले. मृत्यूविषयी त्यांच्या स्वत:च्या कल्पना होत्या. ''माचीवरला बुधा' हे एक माझ्या मरणाचे मी पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपायचे असेल तर ते बुधासारखे संपावे,' असे ते म्हणत. तसं व्हायला हव होतं खरतर पण....असो!
अप्पांना जाउन आज १८ वर्ष होतील, पण अप्पा आजही १८ जुनच्या शिवराज्याभिषेकाला उपस्थीत असतील .....अद्रुष्य स्वरूपात...आपल्याबरोबर... आणि उद्यासुद्धा!!!
प्रतिक्रिया
31 May 2016 - 4:48 pm | विटेकर
गोनीदा, माझे अत्यंत आवडते ! माझे नर्मदा वेड त्याण्चाकडूनच आलेले !
तुमच्या परवानगीने आणि अर्थात तुमच्या नावासह (आय डी) कायप्पावर फिरवू का ?
1 Jun 2016 - 9:41 am | अनिरुद्ध प्रभू
जरुर फिरवा...
1 Jun 2016 - 6:16 pm | हकु
परवानगी बद्दल धन्यवाद !
31 May 2016 - 4:49 pm | विटेकर
अजून ही पुष्क्ळ लिहिता आले असते नाही का ? अजून विस्तार करता येइइल का?
31 May 2016 - 4:51 pm | अभ्या..
आह्ह, छान लिहिलेय अगदी.
माचीवरल्या बुधासारख्या मरणाची अपेक्षा म्हणजे काय बोलावे सुचेच ना. :(
31 May 2016 - 5:17 pm | एस
छान लिहिलेय पण थोडक्यात आटोपलेत.
31 May 2016 - 5:19 pm | सह्यमित्र
छान लिहिले आहे. गोनीदा विषयी काय बोलणार? अफाट व्यक्तिमत्व. सह्याद्रीशी अगदी तादात्म्य पावलेले. लेखनशैली तर फारच अप्रतिम. अगदी प्रेमात पडावे अशी.
31 May 2016 - 5:23 pm | प्रचेतस
त्या तिथे रूखातळी- भीवगडाच्या पार्श्वभमीवरील अप्रतिम कहाणी. अतिशय वेगळं असं कथानक. गोनीदांच्या सर्वोत्तम पुस्तकांमधलं एक.
तांबडफुटी- आगरातली वानरं हुसकवताना अपघातानेच एकाचा मृत्यु होतो ती काहिशी करुण पण सकारात्मक कहाणी
गडदेचा बहिरी- ढाकच्या गुहेतील पशुहत्या बंद करण्यासाठी एका किर्तनकार बुवानं केलेला देवऋषावरोबर केलेला संघर्ष. अंधश्रद्धेवरील ह्या संघर्षात जणू आपणही बुवांसओबत आहोत ह्याची जाणीव करुन देणारी प्रभावी लेखणी
कादंबरीमय शिवकाल - शिवकालावर तरिही शिवाजी महारांजावर नसलेली महाकादंबरी. अगदी थेट शिवकाळात घेऊन जाणारी. ही कादंबरी फक्त गोनीदाच लिहू जाणोत.
जैत रे जैत - नाग्याम चिंंधीचे भावंविश्व थेट कर्नाळ्यातल्या त्या आदीवासींमध्ये राहून चितारलंय गोनीदांनी.
पूर्णामायची लेकरं- निव्वळ भाषासौंदर्यासाठी हे पुस्तक वाचावं. संग्रही ठेवावं.
अजूनही कित्येक अशी..
31 May 2016 - 6:58 pm | महासंग्राम
पूर्णामायची लेकरं- निव्वळ भाषासौंदर्यासाठी हे पुस्तक वाचावं. संग्रही ठेवावं
. खरंय वल्ली, नुकतंच हे पुस्तक हातावेगळ केलं पण याची जादू काय अजूनही उतरली नाही.31 May 2016 - 6:20 pm | अत्रन्गि पाउस
समाधीस्थळी प्रवेश करण्या आधी ज्ञानोबामाउली अन मुक्ताईचा संवाद आणि माउली ने जनांची काढलेली समजूत म्हणजे काळीज पिळवटून टाकणारं वैराग्य आहे ....
'हास गे मुक्ते ...नाहीतर समाधी लावल्यावर आठवेल कि माझ्या मुक्तेच्या गालावरची खळी बघायची राहून गेली..हास गे '
31 May 2016 - 6:21 pm | अत्रन्गि पाउस
वैराग्य कारुण्य
31 May 2016 - 6:35 pm | चौकटराजा
आप्पा दांडेकरांच्या घरात जेवणापासून ( भाजी भाकरी) , त्यांचे बरोबर काही प्रकारच्या छांदिष्ट पणातही ( त्यात सेमी प्रेशस स्टोनचे वेड, फुले भिंगाखाली पहाण्याचे वेड, छायाचित्रण ई आले पण दुरदैवाने मी त्यांच्याबरोबर एकही गडावर गेले नाही. त्यांच्या बरोबर त्यांच्या लहानशा ग्यालरीत गप्पा मारणे ( त्याना योग्य तो मान देत देत ) मी केले आहे. मिशिकिलपणा व बोलण्याची खास धाटणी ही एक अनुभवण्याचीच गोष्ट. ( उदा माझ्याकडे असे न म्हणता मजकडे असा शब्द॑ वापरणे ) शिवाजी राजा असा महाराजांचा लाडका एकेरी उल्लेख ते करीत. त्यातला "जा" जर्मनी शब्दातला ज नसे तर जहाज हा शब्दातला असे . माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल ठेवा म्हणजे त्यानी दाखविलेला चिनार च्या पानाचा फॉसील. ( सुमारे १ सेमी पेक्षाही कमी आकाराचा ) .
31 May 2016 - 6:38 pm | अत्रन्गि पाउस
हा असाच एक शब्द
31 May 2016 - 6:51 pm | हकु
भाग्यवान आहात!
1 Jun 2016 - 10:17 pm | आशु जोग
गोनीदांवर सहजपणे ग्रामीण कोकणी असले काही शिक्के मारून त्यांना एका कप्प्यात बसवण्याचा प्रयत्न होतो. पण माणसांच्या मनात आरपार शिरु शकणारा आणि कुठल्याही स्थितीशी विलक्षण एकरूप होवू शकणारा हा लेखक होता.
शितू, माचीवरला बुधा, जैत रे जैत, पवनाकाठचा धोंडी यापैकी एकच पुस्तक लिहीले असते तरी हा लेखक तेवढाच लोकप्रिय ठरला असता.