ओळख
तिला पिक्चर खुप आवडतात . विशेषकरुन जर प्रेमकथा असेल तर ती अगदी गुंग होउन जाते . हिरो हिरॉईनच्या सुखात हसते , त्यांच्यावर संकट आले तर तिच्या डोळ्यात पाणी येते . असे पिक्चर पार टायटलपासुन ते दि एंड पर्यंत बघायचेच असा तिचा नेम असतो . असे पिक्चर परत परत बघायलाही ती नेहमीच तयार असते . या रविवारचे प्लॅनिंग तिने आधीच मनाशी ठरवले होते . तो खास दिवस त्याच्याबरोबर पिक्चर पाहुन तिला सेलीब्रेट करायचा होता . त्यासाठी आमीरखानच्या "कयामतसे.."चे बुकिंग ती करणार होती . यामधली एकुण एक गाणी तिला पाठ होती . आमिरखान हा तिचा फेव्हरेट हिरो बनला होता .
तो अगदी उलट आहे . तो पिक्चर फारसे बघत नाही . प्रेमकथा तर त्याला अजिबात आवडत नाहित . अश्रूभरल्या डोळ्यांची पिटपिट करत हिरॉईन जेव्हा " इस दिलमें तुम्हारे प्यारके अलावा...." असले काही बोलु लागते तेव्हा त्याला झोपच येते . हिरो जेव्हा कातर आवाजात "इस जालिम जमानेको दिखाना है..." असले काहि डायलॉग नाही तर गाणे म्हणतो तेव्हा त्याला चक्कर येते . असे "दिल विल प्यार व्यार" वाले पिक्चर बघणे तो नेहमीच टाळतो .
त्याचा भर आहे तो हॉलिवूडच्या अॅक्शन मुव्हीजवर . ब्रुसली , जॅकी चॅन , अर्नॉल्ड , स्टॅलोन हे त्याचे खास आवडते अॅक्शनस्टार . यांचे पिक्चर तो कधीच चुकवत नाही . एंटर द ड्रॅगॉन , प्रोजेक्ट ए , कमांडो , रॅम्बो हे पिक्चर त्याने आवडीने पाहिले आहेत . या रविवारी जॅकी चॅनचा पोलीसस्टोरी बघायला जाण्याचा त्याचा बेत होता . आपल्या काहि मित्रांशी त्याचे बोलणेही झाले होते .
तेवढ्यात त्याला तिचा फोन आला . ती फोनवर खुप खुश होउन उत्साहाने बोलत होती .
"या रविवारच्या खास दिवशी आपण एखादा पिक्चर बघुया . आपण आमीरखानचा "कयामतसे.." बघायला जाउ."
त्याला काय बोलावे तेच सुचेना . तो थोडावेळ विचार करुन बोलु लागला . हा थोडावेळ तिला मात्र जास्तच खटकला .
" या रविवारी माझा जॅकी चॅनचा पोलीसस्टोरी बघायला जाण्याचा बेत आहे . मी एक दोन मित्रांशी बोललोही आहे."
" पण या रविवारी आपण दोघांनी एकत्र पिक्चर बघावा अशी माझी खुप इच्छा आहे . तु पोलीसस्टोरी नंतर कधीतरी बघ ." तिने सुचविले . त्याला प्रेमकथा टाइपचे पिक्चर आवडत नाहित हे ती उत्साहाच्या भरात विसरली होती . तो टाळाटाळ का करत आहे हे आता तिला परत लक्षात येत होते .
"पण मला असले रडके ड्रामेबाज पिक्चर आवडत नाहित . तुला ते चांगलं माहित आहे . आणी एकत्रच पिक्चर बघायचा असेल तर तु माझ्याबरोबर पोलीसस्टोरी बघायला ये . मी मित्रांबरोबर जाण्याचे कॅन्सल करतो . आपण दोघे जाउ पोलीसस्टोरी बघायला . कदाचित तुलाही तो पिक्चर आवडेल. " तो सहज म्ह्णुन म्हणाला .
" बरं .. ठिक आहे ." अखेर ती थोडा वेळ विचार करुन तयार झाली .
"गुड.. मी आजच रविवारच्या शोची तिकिटे बुक करतो . " तो उत्साहाने म्हणाला .
रविवारी उगाच नंतर उशीर नको म्ह्णुन शोच्या अर्धा पाउण तास आधीच ती दोघं थिएटरवर पोचले . सिनेमा हॉलमध्ये पोलीसस्टोरीचा आधीचा शो सुरु होता . तेव्हा थिएटर मध्येच इकडे तिकडे फिरणं असा त्यांचा टाइमपास चालु होता .
तो आज खुप दिवसांनी थिएटरमध्ये पिक्चर पाहायला आला होता . त्याचे लक्ष सिनेमाहॉलच्या बाहेर भिंतीवर लावलेल्या फोटोंकडे गेले . पिक्चरमधले काही महत्वाचे सीन त्या फोटोंमध्ये होते . तो आवडीने ते फोटो पाहु लागला . पुर्वी शाळा , कॉलेजला असताना मित्रांबरोबर पिक्चरला गेले की असे फोटो पाहायचे आणी त्यावरुन स्टोरीचे अंदाज लावायचे हा त्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम होता . सर्व मित्रांचे पिक्चरला जायचे ठरले की सर्वजण सुरक्षिततेसाठी आधी थिएटरपासुन थोडं लांब बाहेर कुठेतरी झाडाखाली नाहितर एखाद्या टपरीपाशी जमत असत . मग त्यांच्यातला एकजण पुढे जाउन तिकीटं काढत असे . त्याने इशारा केला की सगळेजण पळत पळत थिएटरमध्ये शिरत असत .
या मेथडचा फायदा असा की व्हिजुअलाईज होण्याचा धोका खुप कमी असे. त्यामुळे "तुमच्या राजुला काल आम्ही अमुक तमुक टॉकिजपाशी पाहिलं . त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा ." असे हितचिंतकांचे निरोप फारसे घरी येत नसत .
अशा अॅक्शन मुव्हीज पाहिल्या की , शाओलीन टेंपलला जाउन मार्शल आर्ट शिकण्याचे बेत रचले जात असत . तर मित्रांबरोबर बरेचदा वाद विवादही होत असत . "निंजा जास्त भारी का सामुराई ?" , " स्नेक स्टाईल जास्त चांगली का ईगल स्टाईल ?" असे त्या वादाचे मुद्दे असत . बरेचदा या स्नेक स्टाईलचे आणी ईगल स्टाईलचे एकमेकांवर अगदी लाथा बुक्क्यांसकट / किक आणी पंचेससकट प्रयोग होत असत . पुढे मग बरेच दिवस सगळ्यांचेच अंग ठणकत असे .
आज हे सर्व आठवुन त्याला हसु आले . तो का हसतो आहे हे तिला समजेना . तिला हॉलिवूडच्या अॅक्शन मुव्हीजची थोडी माहिती असावी म्ह्णुन तो आठवेल तेवढे आपले ज्ञान पाजळु लागला .
" तु जर ब्रुसलीचे 'बिग बॉस' , 'फिस्ट ऑफ फ्युरी' आणी कुठलेही पिक्चर बघशील तर तुला लक्षात येइल की तो खुप आक्रमक , अॅटॅकिंग असतो . कधीच माघार घेत नाही ."
" जॅकी चॅन हा तसा डिफेन्सिव्ह आहे . तो वेळ प्रसंगी शत्रुचे चार फटके खातो . आणी वेळ बदलली की दहा फटके देउन परतफेड करतो . "
"रोनीन म्ह्णजे मालक नसलेला सामुराई . सामुराईंमध्ये हे खुप अपमानास्पद मानले जाते ."
ती सुन्न होउन त्याचे बोलणे ऐकत होती . त्यातली निम्मी अधिक माहिती तिच्या डोक्यावरुन जात होती . आपल्याला पुढे दोन तास काय दंगा बघावा लागणार आहे याची तिला थोडी फार कल्पना येउ लागली होती . पण आता काही उपयोग नव्हता . हि वेळ तिनेच आपण होउन आणली होती .
पलिकडच्याच सिनेमा हॉलमध्ये "कयामतसे.."चा शो सुरु होता. त्यामधले गाणे तिला पुसटसे ऐकु येत होते .
" अकेले है , तो क्या गम है ....चाहे तो हमारे बसमें क्या नहीं ..
बस इक जरा , साथ हो तेरा ...तेरे तो है हम .. कबसे सनम .."
हे गाणे ऐकुन तिचे मन त्या सिनेमाहॉलकडेच ओढ घेत होते . पण आज तरी ते शक्य नव्हते . इकडे याचे तिला माहिती सांगणे चालुच होते . तो आपल्याच नादात होता .
" अर्नॉल्डचा टर्मिनेटरचा भाग दोन - जजमेंट डे हा पहिल्या भागापेक्षा जास्त क्लासिक आहे ."
तेवढ्यात पोलीसस्टोरीचा आधीचा शो संपला . सिनेमा हॉलचे दार पुढच्या शोच्या प्रेक्षकांसाठी उघडले गेले . आत जाण्यासाठी लोकांची दारापाशी बरीच गर्दी झाली . बरेच जण गडबड करु लागले .
"थोडी गर्दी कमी होउ दे . मग आपण आत जाउ ." तो तिला म्ह्णाला . तिलाही बरे वाटले .
थोड्याच वेळात पलिकडच्या सिनेमा हॉलचेही दार "कयामतसे.." च्या पुढच्या शोच्या प्रेक्षकांसाठी उघडले गेले . प्रेक्षक आत मध्ये जाउ लागले .
"चल ..आपण जाउ आता .." तो तिला म्हणाला . दोघे मिळुन सिनेमा हॉलकडे चालु लागले .
अचानक तिला जाणवले की तो सरळ न जाता पलिकडच्या सिनेमा हॉलकडे जात आहे .
"अरे ,तु या हॉलकडे का जातो आहेस ? इथे तर 'कयामतसे..'चा शो आहे ना ?" तिने त्याला थांबवुन विचारले .
"आपल्याला आज 'कयामतसे..'च बघायचा आहे . मी त्याच शोची तिकिटे बुक केली आहेत." तो हसत म्ह्णाला .
तिचा अजुनही विश्वास बसत नव्हता . तेव्हा त्याने तिला खिशातुन "कयामतसे.."ची तिकिटे काढुन दाखवली .
"आपलं फोनवर बोलणं झालं , तेव्हाच ठरवलं कि तुला जरा सरप्राईज द्यावं .." त्याच्या डोळ्यात खोडसाळ हसु खेळत होतं .
"अच्छा .. म्ह्णजे एवढा वेळ जी बडबड चालली होती ती सगळी बनवाबनवी होती तर..." ती रागाने म्हणाली .
तिला त्याचा खुपच राग आला होता . त्याला एखादी ब्रुसली सारखी सॉलिड किक मारावी किंवा जोरदार ठोसा मारावा असे तिच्या मनात येत होते . पण त्याचा हेतु चांगला होता .. आणी समोर तिचा आवडता पिक्चर सुरु होण्याच्या बेतात होता . त्यामुळे तिने आपला बेत तात्पुरता पुढे ढकलला .
---------------------- समाप्त ---------------------------------
प्रतिक्रिया
29 May 2016 - 8:35 pm | प्रचेतस
साधंसुधंच पण सुंदर लेखन.
30 May 2016 - 6:18 pm | एस
+१.
31 May 2016 - 10:06 am | आतिवास
कथा आवडली.
31 May 2016 - 2:10 pm | नीलमोहर
हलकीफुलकी लवश्टोरी आवडली..
31 May 2016 - 2:45 pm | सस्नेह
हलकीफुलकी स्टोरी.
30 May 2016 - 12:48 am | सुंड्या
सरळ, सहज , मस्त
30 May 2016 - 10:32 am | सिरुसेरि
आपल्या प्रतिक्रियांबदल मनापासुन धन्यवाद .
31 May 2016 - 7:32 am | यशोधरा
मस्त!
31 May 2016 - 9:30 am | नाखु
ऐसी कयामत हमेशा आती रहे.
सुखद सुरेख झुळुक आवडली.
पिटातला नाखु
31 May 2016 - 10:02 am | असंका
सुरेख!
धन्यवाद!
31 May 2016 - 10:54 am | अभ्या..
मस्तच,
दिनबदिन तुमचे लेखन फ्रेश आणि फिनिश होत चाललंय. ग्रेट.
31 May 2016 - 11:54 am | संजय पाटिल
कथा मस्तच आहे.. पण ओळख काय पटली नाय.
28 Apr 2021 - 5:29 pm | चौथा कोनाडा
आम्हाला पटली बुवा ओळख ... त्याच्यातल्या हळूवार प्रेमभावनेची !
31 May 2016 - 1:44 pm | मराठी कथालेखक
अरेरे...म्हणजे इतक्या चांगल्या सरप्राईस नंतर पण त्याला मार पडणारच का ? :)
31 May 2016 - 1:57 pm | वेदांत
मस्त ..
31 May 2016 - 6:13 pm | पद्मावति
:) खूपच मस्तं!
31 May 2016 - 7:20 pm | रमेश भिडे
सैराट आणि सिव्हील वॉर असे बदल करून वाचलं. नायिकेला सिव्हील वॉर आणि नायकाला सैराट... यावेळी नायक जिंकतो आणि तरी पुढचे चार आठ दिवस रदारडी होते....
1 Jun 2016 - 10:00 am | सिरुसेरि
सर्वांचे खुप आभार .
28 Apr 2021 - 4:37 pm | सिरुसेरि
२९ एप्रिल तारखेच्या निमित्ताने हा लेख आठवला .
28 Apr 2021 - 4:47 pm | रंगीला रतन
बोलेतो एकदम झक्कास! वाचुन मज्जा आली शेठ
28 Apr 2021 - 5:28 pm | चौथा कोनाडा
हाऊ रोमॅण्टिक !
त्याचा जॅकी चॅन आणि तिची आमीरवाली कयामत, लव्हली गोष्ट आवडली आपल्याला
💖
सिरुसेरी +१
29 Apr 2021 - 4:39 am | nutanm
29 Apr 2021 - 4:39 am | nutanm
चौथा कोनाडा यांच्या प्रमाणे माझेही मत, शिवाय ब्रुसली सारखी किक मारावी किंवा ठोसा द्यावा वाचून हसू लोटले आयडिया छान.
29 Apr 2021 - 4:46 am | nutanm
ब्रुसली सारखी किक मारावी किंवा ठोसा द्यावा ही आयडिया छान.
29 Apr 2021 - 10:33 am | सिरुसेरि
आपणा सर्वांचे प्रतिक्रियांबद्दल खुप आभार .
2 May 2021 - 4:39 pm | गॉडजिला
एकदम वास्तववादी.