कातरवेळ

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
26 May 2016 - 10:20 pm

कातरवेळ,सूर्यास्तानंतर मिट्ट काळोख होईपर्यंतची ही वेळ, तशी जेमतेम पाऊण एक तासाची. पण ही वेळ कशी जीवघेणी असू शकते ह्याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेत असतो.

एकदा सुधागडला गेलो होतो. गडावर जायचा आजचा जो प्रचलित मार्ग आहे तो आहे पाच्छापुराहून. औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर शहेनशहाशी बगावत करून आला होता ते संभाजीराजांचे साह्य घेण्यासाठी तेव्हा राजांनी त्याच्या सोय गडाच्या पायथ्याला असणाऱ्या एका लहानशा वाडीत केली होती. तेव्हापासून अकबराच्या छावणीमुळे ते ओळखलं जाऊ लागलं पाच्छापूर ह्या नावाने. आज ह्या मार्गावर एक भक्कमशी शिडी लावलीय. तेव्हा ती नव्हती. नाडसूरच्या एसटीने उतरलो ते धोडसे गावात. साधारण पाच साडेपाचच्या सुमारास. गडाचा पूर्वीचा राजमार्ग हा धोडसे गावातूनच जातो. गाव कसलं , लहानशी वाडी आहे. वाडीबाहेरचं एक लहानसं मंदिर आहे. रात्रीतून गड सर करायचा टाळून मंदिरातच पथार्‍या टाकायचा विचार केला. जेवायला बराच अवकाश असल्याने मंदिराच्याच ओसरीवर येऊन बसलो. मंदिरासमोरच काही अवशेष आहेत, फार वर्ष झाली असल्याने आता ते नेमके आठवत नाहीत. सूर्यास्त नुकताच होऊन गेला होता. मंदिराच्या डाव्या बाजूने किल्ला तर समोरच घनदाट झाडी. धुकट अंधार पडायला लागला. एक दोघे जण चुलाणासाठी काटक्या गोळा करायला गेले होते. ओसरीवर मी एकटाच. निरव शांतता पसरलेली, अचानक एक रितेपण मनी दाटून आलं. त्या कातरवेळी एकटक समोरच्या काळोख्या दाटीत दिठी लावून बसलो. जसाजसा अंधार गडद होत जावा तसतसा विचारही शुन्यवत होत गेले. पलीकडच्या झाडीतून भेकरांची भूंकणं वर चढायला लागलं. ह्यातच किती वेळ गेला कुणास ठाऊक? इतक्यात सोबतीही परत आले, उत्साहही परत येउ लागला पण कातरवेळेची शांतता काही मनातनं जाईना. दुसरा दिवस होता २६ जानेवारी. चांगलाच आठवतोय. त्या दिवसाची एक कहाणीच आहे. गडावर जायचा रस्ता चुकलो, इतका चुकलो की जवळपास ८ तास त्या बंबाळ्या रानात आम्ही फिरत होतो. एकदा एक डोंगर ओलाडून गेलो तर थेट समोर तैलबैला धडकी भरवत उभा ठाकला, एकदा एक्या मार्गे गेलो तर डोक्यावर थेट सुधागडाचा बोलका कडा, वाट इतकी चुकलो की एकदा गडाच्या राजमार्गाला लागलो अगदी मार्गावर थडी वैगरे होती तरिही वाट सापडेना. पाण्यावाचून अगदी हालहाल झाले. जाऊ दे, नंतर कधीतरी ते.

भर उन्हाळ्यात एकदा जीवधनला निघालो. जुन्नरचा हा प्रदेश माझ्या खूप आवडीचा. जवळपास दोनेकशी लेणी, असंख्य किल्ले, प्राचीन घाटवाटा ह्या परिसरात आहेत. जीवधन किल्ला हा त्यातलाच. नाणेघाटाचा संरक्षक दुर्ग. घाटवाटेच्या संरक्षणासाठी गडाचा हा पुराण पहारेकरी तटाचं पागोटे लेवून, बुरुजांचे बाजूबंद बांधून, छातीपर्यंत उघडा, काळाकभिन्न असा पदरातल्या हिरवीगार झाडीची तुमान नेसून आणि वानरलिंगीरुपी धारदार भाला हाती घेऊन जवळपास २२०० वर्षांपासून उभाच आहे. आजही तुम्ही जीवधन ह्या बाजूने पाहा. तो तुम्हाला अगदी असाच भासेल.
तर तेव्हा मुक्काम केला होता ते घाटघरला. कारण असं संध्याकाळीच तिथे पोचलो होतो. जीवधन रात्रीतून सर करण तसं थोडं फसवं आहे कारण घाटघरची वाट जाते ते ओढ्यातून ती शोधणं रात्रीतून तसं अवघड कारण पायवाट अशी नाही तर दुसरा मार्ग आहे नाणेघाटाच्या बाजूने. पदराच्या दाट झाडीने तो मार्ग जणू गिळलेला आहे. दिवसाही इथनं अचूक वाट सापडणं तसं मुश्किल पण एकदा झाडीतनं ती वाट मिळाली तर पुढे चुकण्याची शक्यता शून्य. गडावरुन उतरताना मात्र ह्या वाटेने अगदी सहजी येता येतं. वाहवत जातो ते म्हणतात ते असं. तर घाटघरला मुक्काम होता. गावाच्या अगदी सुरुवातीलाच ग्रामपंचायतीची एक शाळा आहे. तिथेच मुक्काम करायचं ठरवलं. घाटघर गावात तशी झाडी कमी. शाळेच्या मागेही तसं बरंच मोकळं रान. पथार्‍या टाकून पाय मोकळे करायला जरा बाहेर पडलो. सूर्यास्त होऊन अंधार पडतंच होता. अजनावळे फाट्यावर आलो. घाटघर/अंजनावळे येथे येणारी एसटी इथेच थांबत असते. समोरच्या वर्‍हाड्या डोंगरावर आत्ताआत्तापर्यंत असलेला लालिमा काळोखीत रुपांतरीत होऊ पाहात होता. एक दोन चुकार चांदण्या हळूच उगवू पाहात होत्या. अंजनावळेला जात असलेला रस्ता काळ्याशार सर्पाप्रमाणे वळसे घेत जाताना दिसत होता. हे ही वातावरण विलक्षण शांत. किती वेळ असाच नजर रोखून होतो कुणास ठाऊक. मनात एक खिन्नपण दाटलं होतं. अशा वातावरणात उगाचच एक औदासिन्याची पुसटशी छटा मनावर का चढू लागते समजत नाही. जणू एका स्थिर जलाशयात अवचित काही तरंग पसरावेत तसेच मनात विविध विचारांचे काहूर उठत होते. हे असं का होतं समजत नाही, कधी शून्य विचार असतात तर कधी विचारांच्या लाटांनी मन व्यापून गेलेलं असतं. हा वातावरणाचा परिणाम असेल का?

सगळ्याच कातरवेळा अशाच जीवघेण्या असतात असंही नाही. रायगडावर बाजारपेठेच्या पुढे डावीकडे दरी आहे. टकमकीचा खळगा म्हणतात त्याला. म्हणजे गडांतर्गत खोल खळगा, त्याच्याही पुढे तटबंदी व त्याच्या पुढे गडाचे सरळसोट तुटलेले कडे. रायगडाच्या पठाराची सर्व बाजू निवडुंगाचा खळगा, सातविणीचा खळगा, माडाचा खळगा, बारा टाकीचा खळगा, काळखाईच्या खळगा, महादरवाजाचा खळगा आणि हा टकमक व बाजारपेठेच्या दरम्यान खोलवर असलेला टकमकीचा खळगा अशा विविध खळग्यांनी परिपूर्ण आणि निसर्गत:च संरक्षित केलेली आहे. तर सांगायची गोष्ट म्हणजे बाजारपेठेच्या पुढेच ह्या खळग्याच्या भोवती हलकसं रेलिग लावलंय. बर्‍याच वेळा भवानी टोकावरुन इथे येइस्तोवर आसमंत मावळलेलं असतं. इथे क्षणभर टेकून समोरचे दृश्य बघणं विलक्षण आनंददायक झालेलं असतं. मी इथेच टेकून उभा राहतो. जसंजसं अंधारुन यायला लागतं तसंतसं खाली रायगडवाडीत मिणमिणते दिवे लागायला सुरुवात होत असते. मधूनच घुळघुळते टाळ आणि घणघणत्या घंटा आइकू यायला लागतात. कधी भजनी मंडळाचा सप्ता सुरु झालेला असतो, मधूनच त्यांच्या वाद्यांचे सुर वार्‍यावर हलकेच तरंगत इकडे तिकडे पसरु लागलेले असतात. समोरच्या पहाडांवर चंदेरी प्रकाश हळूहळू झरु लागलेला असतो. आभाळी बघावं तर पश्चिम क्षितिजावर शुक्राची तेजस्वी चांदणी उमलू लागलेली असते. निव्वळ सुख असतं असा अनुभव घेणं म्हणजे. मनातले सर्वच विचार दूर झालेले असतात. हे रितेपण विलक्षण आनंददायी असतं. गडाचं अस्तित्व महाराजांनी भारलेलं आहे. त्या भारीत वातावरणाचा हा परिणाम असेल का?

a
जीवघेण्या कातरवेळी म्हणता मला सर्वाधिक आठवतात त्या माथेरानच्या कातरवेळा.
माथेरानला असंख्य वेळा जाणं झालंय. तिथली गर्द झाडी, लालभडक मातीचे रस्ते, तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून होणारं सह्याद्रीचं आगळंवेगळं दर्शन. प्रेमात आहे मी माथेरानच्या. माथेरानचं एक बरं आहे. वर गाड्यांना मज्जाव आहे. त्यामुळे प्रदुषणमुक्त वातावरण. माथेरानचे विविध पॉइन्ट्स खूप लांब लांब आहेत. त्यामुळे बरीच तंगडतोड करावी लागते. सूर्यास्त पाहून येताना तर अ़क्षरश्: धावतपळत यावे लागते नाहीतर इथल्या काळोखात कुठे हरवून जाऊ अशी भिती असते. इथे अंधार फारच लवकर पडतो. जणू बर्फ उन्हात आणल्यावर वेगाने वितळावा तसा इकडचा प्रकाश वेगाने वितळत जाऊन अंधःकारात विलिन व्हायला आतुर झालेला असतो. ही वेळ मला विलक्षण अस्वस्थ करणारी वाटते. इथे रातकिड्यांचा आवाज भयंकर. अंधार पडला की त्यांची किर्रकिर्र सुरु झालेली असते. मनात पुन्हा पुन्हा ते खिन्नपण दाटून येत असतं. एकदा तर माथेरानच्या भर बाजारपेठेत असताना अशीच एक कातरवेळ झालेली. एकंदर वातावरणातच तसं औदासिन्य दाटून आलेलं. हिंडून फिरुन थकलेले लोक दिसत होते. दुकानदारांचीही लगबग तशी थंडावलेली होती. माझंही मन असंच उदासवाणं होत होतं. एकदा तिथे आमच्या रूमबाहेरच्या सज्जांतल्या खुर्च्यांवर बसून गप्पा मारत बसलेलो. हे असंच मळभ दाटून आलेलं. पावसाचे सुरुवातीचे दिवस होते तेव्हा. उजेड तसाही दिवसभर नव्हताच. अंधारी कुंद वातावरण. हाडं गोठवत जाणारा वारा. मधूनच हलकासा शिडकावा. फारं जीवघेणं वाटतं अशावेळी. अर्थात हा ब्लॉक तात्पुरता असतो.
रात्र जसजशी वर चढत जाते तसातसा गेलेला उत्साहही परत यायला लागलेला असतो. मनावर पसरलेलं निराशेचं मळभ हळूहळू दूर होत जाऊन आनंदाची पुटं मनावर परत चढू लागलेली असतात. मग आळसावलेला मी चालू पडतो त्या गर्द अंधारात बुडून जायला. अंधाराची अनुभूती घ्यायला.

a

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

रमेश भिडे's picture

2 Jun 2016 - 4:33 pm | रमेश भिडे

ही कसली कातरवेळ? ही तर आता कातरी वेळ?

-रमेश कातररे ;)