सरदार दिठेरीकरांची गढी ---- भाग १ ---- कथा ---- काल्पनीक
सरदार दिठेरीकरांची गढी ----- भाग २ ----- कथा ------ काल्पनीक
सरदार दिठेरीकरांची गढी - भाग ३ ----- कथा ------ काल्पनीक -- पुढे चालु -
रविकांतराव यांनी त्या हॉलच्या टोकाला असलेल्या एका उंच आसनावरील बैठकीकडे निर्देश केला आणी ते पुढील माहिती सांगु लागले .
"या दिवाणखान्यामधे एकेकाळी न्यायदानाचे काम चालत असे . दिठेरी गाव आणी बाजुचा मुलुख इथल्या जनतेचे न्याय निवाडे इथे होत असत . खुद्द सरदार दिठेरीकर हे न्याय निवाड्याचे काम बघत असत . "
सर्वजण कुतुहलाने त्या बैठकीकडे पाहु लागले . रविकांतराव काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष होते . दिवाणखान्यातील एका गवाक्षातुन दिसत असलेली तटबंदी खुणेने दाखवत रविकांतराव म्हणाले .
"या मसनदीवरुन अनेक गुन्हेगारांना कडक शिक्षा केली गेली आहे .वेळप्रसंगी अनेक गुन्हेगारांचा कडेलोटही करण्यात आला आहे . तुम्हाला ती डाव्या हाताला जी तटबंदी दिसते आहे ,तेथील बुरुजावरुन या शिक्षेची अमलबजावणी केली जात असे. "
रात्रीचे आठ वाजुन गेले होते . बाहेर सगळीकडे अंधार पडलेला होता . तरीही फिकट चांदण्यात ती दगडी तटबंदी उठुन दिसत होती . तेथुन होत असलेल्या कडेलोटाच्या नुसत्या कल्पनेनेच सर्व शहरी मंडळींच्या पोटात गोळा आला .
"या तटबंदीच्या पलीकडीस बाजुस खोल दरी आहे . असे म्हणतात की , कडेलोट झालेल्या माणसाच्या किंकाळ्यांचे पडसाद पुढे कितीतरी दिवस आणी रात्री या दरीमधुन उमटत असत . आजही कधी आपण जर शांत वातावरणात त्या बुरुजापाशी रात्री जाउन उभे राहिलो तर आपल्याला ते पडसाद ऐकु येतील . अशा अनेकांच्या रक्त गोठवुन टाकतील अशा किंकाळ्यांचे पडसाद या खोल दरीने आपल्यामध्ये सामावुन घेतले आहेत . ते पडसाद मग असेच कधी कधी भुतकाळाच्या सीमारेखा ओलांडुन बाहेर पडतात ."
"अहो काय सांगताय काय ? " एकजण चाचरत बोलला . सर्वांचेच चेहरे घाबरे झाले होते . त्यांना आता खरोखरच त्या किंकाळ्यांचे पडसाद कानावर येत होते .
"मेलो , मेलो ... वाचवा .. वाचवा .. माफ करा.." असे आवाज त्यांना त्या दुरवरील दरीतुन ऐकु येत होते .
"एवढेच नाही . तर आजही कधी कधी रात्रीच्या वेळी खुप जणांना त्या बुरुजांवर कोणत्यातरी अज्ञात सावल्यांची हालचाल दिसली आहे . जणु काही या सावल्या भुतकाळातुन उतरुन परत त्यांच्या मुळ जागी वावरत आहेत . वर्तमानाशी परत नाते जोडु पाहात आहेत ." रविकांतराव आपल्याच नादात सांगत होते .
हे ऐकुन सर्वजण डोळे फाड्फाडुन त्या बुरुजाकडे पाहु लागले . अचानक त्यांना त्या बुरुजापाशी काही मानवी आकृत्यांची अंधुक हालचाल दिसु लागली . जणु काही तीन चार शिपाई मिळुन कुणा कडेलोटाची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला पोत्यात बांधत होते . नंतर त्या शिपायांनी ते पोते दरीत ढकलुन दिले . प्रवासी मंडळी आ वासुन हा प्रकार पाहातच राहिले.
"मेलो , मेलो ... वाचवा .. वाचवा " परत सर्वांना जीवघेणी किंकाळी ऐकु आली . सर्वांचीच भीतीने वाचा बसली.
आपल्या भीतीदायक बोलण्याने शहरी मंडळी घाबरली आहेत हे रविकांतराव यांच्या लक्षात आले . तेव्हा ते थोड्या मवाळ आवाजात , समजुतीच्या सुरात म्ह्णाले .
"मंडळी तुम्ही सर्व़जण शहरातले , तुम्हाला या सर्व वंदंता , दंतकथा वाटत असतील . आमचे बोलणे तुम्हाला कदाचित अतीरंजीत वाटत असले तरी तुमच्या सुरक्षिततेसाठीच आम्ही सांगु की , तुम्ही या तटबंदीवर रात्रीच्या वेळी शक्यतो जाऊ नका . "
"रात्रीच्याच वेळी काय आम्ही तर आता तिथे दिवसाही जाणार नाही ." शहरी पाहुणे मनात पुटपुटत होते .
अचानक सर्वांना लांबवरुन कसल्यातरी गाण्याचे शब्द ऐकु आले . कोणीतरी अत्यंत विचीत्र , जीवघेण्या आवाजात गाणे म्हणत गढीबाहेरुन कुठेतरी जात होते . त्या किळसवाण्या भीतीदायक आवाजाने रात्रीच्या थंडीतही सर्वांच्या अंगावर काटा आला . कोण गात आहे , का गात आहे हे काहिच समजायला वाव नव्हता .गाण्याचे शब्दही भलतेच अर्थहिन होते .
"नदीच्या पल्याड , दरीच्या अल्याड
काळोख्या अंधारी , लपलं कोन रं
कोन रं कोन रं , कोन रं कोन रं "
" हे .. हे कोण .. कोण गाणं म्हणते आहे ? " एकाने कसाबसा धीर एकवटुन प्रश्न केला .
रविकांतरावांचा चेहरा थोडा गंभीर झाला. सांगावे की न सांगावे असा मिनीटभर विचार करुन ते शेवटी बोलु लागले .
"मंडळी , या गाण्यापाठीमागेही एक घटना , वदंता आहे . सुमारे शंभर वर्षांपुर्वी या गढीमधील सरदार विसाजीराव दिठेरीकर हे एकदा दिठेरीदेवीचे मंदिरातुन दर्शन घेउन गढीकडे येत असताना वाटेतील जंगलामध्ये त्यांच्यावर काही
हितशत्रुंनी हल्ला केला . सरदार विसाजीराव हे त्या हल्ल्यामधे मारले गेले असे म्ह्णतात . पण त्यांचा मृतदेह खुप शोधुनही कधीच सापडला नाही . पुढे काही दिवसांनी ते हितशत्रुही एकामागुन एक असे अचानक मारले गेले ."
"त्यानंतर अनेक वर्षांनी गावातील काही जणांनी सरदार विसाजीराव यांना गढीवरील बाहेरील तटबंदींवर चढताना पाहिले . ते त्या तटबंदींवर खुप विचित्रपणे आपले हात पाय लांब करुन चढत होते . त्यांचे सर्व शरीर , कपडे हे रक्ताने माखलेले होते . चेहरा तर कुठल्याही कोनामध्ये , अंशामध्ये फिरत होता . हा सर्व अमानवी प्रकार पाहुन खुपजणांना धक्काच बसला . ते वेडेच झाले . आजही असे बरेच जण वेड्यासारखे रात्री अपरात्री गढीच्या आजुबाजुला अर्थहिन गाणी म्हणत भटकत असतात . दिवसा हे लोक कुठे तरी रानात , दरी कपारींमध्ये दडलेले असतात . त्यांना आपल्या जीवाचीही पर्वा नसते. "
"आपल्यालाही आज येताना यांतलाच एक वेडा भेटला होता . तरीच त्याने दरीत उडी मारली " पाहुण्यांनी एकमेकांकडे पाहात हळुच सांगितले . त्यांना आता त्या वेड्याच्या वागण्याचा उलगडा झाला होता .
रविकांतरावांनी सर्वांना आता दिवाणखान्यातील दुसरीकडच्या गवाक्षात बोलावले . त्या गवाक्षातुन बाहेरील बगिचा दिसत होता . बागेच्या पुढेच एक प्रशस्त दगडी चौथरा होता . तिकडे बोट दाखवुन रविकांतराव सांगु लागले .
"मंडळी , हा जो दगडी चौथरा आहे . तिथे अनेक गुन्हेगारांना अग्नीदंडाची शिक्षा दिली जात असे . या अपराध्यांना अग्नीमधुन चालत जावे लागत असे . अनेक अपराधी आगीचे चटके सहन न होऊन जोरजोरात आक्रोश करत असत ."
परत सर्व पाहुणे घाबरुन त्या ठिकाणी पाहु लागले . त्यांच्या डोळ्यांसमोर परत आगीच्या ज्वाला नाचु लागल्या . कानावर त्या अपराध्यांचे आक्रोश येऊ लागले . भीतीने सर्वांनी डोळे मिटुन घेतले . कान झाकुन घेतले .
पाहुण्यांची अवस्था ध्यानात येऊन रविकांतरावांनी परत सर्वांना समजुतीच्या सुरात सांगितले .
"मंडळी , कधी कधी भुतकाळातील आवाजांचे , घटनांचे प्रतिध्वनी परत वर्तमानात घडत असल्याचे दिसुन येते . खरे खोटे कोण जाणतो ? तरीही आम्ही तुम्हाला तुमच्या सुरक्षिततेसाठी हेच सांगु की , तुम्ही रात्रीच्या वेळी हा चौथरा टाळावा ."
सर्व मंडळींनी समजुतीने मान डोलावली . नसते धोके पत्करण्याची कुणाचीच तयारी नव्हती .
अचानक गढीबाहेरुन दुरवरुन परत सर्वांच्या कानावर एक अर्थ न समजणारे गाणे ऐकु आले . सर्वांच्या अंगावर भीतीने काटा आला . कुणीतरी अमानवी , भीतीदायक आवाजात गात होते .
" आगीच्या धगीत , वारयाच्या तोरयात
रानच्या चाकोरी , चालतं कोन रं
कोन रं कोन रं , कोन रं कोन रं "
"असाच कोणीतरी वेडा बाहेर दरी कपारीतुन भटकत असेल . तोच गाणे गात आहे ." रविकांतरावांनी खुलासा केला .
"तर मंडळी , आम्ही आता आपला जास्त वेळ घेत नाही . आमचीही तब्येत फारशी बरी नसते . तरीही परत आम्ही तुमच्या भल्यासाठिच सांगु इच्छितो की , या गढीमध्ये अनेक ठिकाणी , अगदी या दिवाणखान्यामध्येही अशा अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत की त्यांचे खरे खोटे आभास आजही घडत राहतात . कुणाला ते जाणवतात तर कुणाला नाही . "
"हो सरदारसाहेब . आलं लक्षात . आम्ही रात्रीच्या वेळी आमची रुम सोडुन गढीमधे कुठेही फिरणार नाही ."
एका प्रवाशाने रविकांतरावांचे वाक्य तत्परतेने पुर्ण केले . वर्गातल्या विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले तर शिक्षकांना जसा आनंद होतो , अगदी तसा आनंद रविकांतरावांच्या मुखावर आला .
"ठिक आहे मंडळी . आपणांस भेटुन बरे वाटले . आता आम्ही आपली रजा घेतो . आम्हाला विश्राम कक्षात गेले पाहिजे "
असे म्हणुन रविकांतराव शांतपणे हॉलच्या आतील भागातील जिना सावकाश चढुन विश्राम कक्षात निघुन गेले .
जाताना सर्व प्रवाशांनी अदबीने ऊठुन त्यांना त्रिवार कुर्नीसात केला . रविकांतरावांच्या व्यक्तीमत्वाने , बोलण्याने सारेच भारावुन गेले होते . त्या भारावलेल्या अवस्थेतच सारेजण दिवाणखान्यात बसुन राहिले .
पाच ते दहा मिनीटांत बाहेर गाडी थांबल्याचा आवाज ऐकु आला . गाडीमधुन उतरुन कारेकर घाईघाईने चालत दिवाणखान्यात आले . पाठीमागे त्यांचे मदतनीस व काही इतरजण उतरले . कारेकरांनी भराभरा खुलासा केला .
"मंडळी , तुम्हाला इथे दिवाणखान्यामध्ये तासभर तिष्ठत राहावे लागले यांबद्दल माफ करा . मी दिठेरी गावातील केटरींग एजन्सीला डिनरची व्यवस्था सोपविली होती . त्यांच्यावर देखरेख करायला मी गावामध्ये गेलो होतो . ज्या माणसाला आज मी इथे आठ वाजता तुम्हाला गढीची माहिती देण्यासाठी बोलावले होते , त्याचा मी गावात असतानाच निरोप आला की तब्येत बरी नसल्याने आज तो येऊ शकत नाही . मी तुम्हाला हे कळवण्यासाठी गावातुन खुपदा फोन केला पण नेटवर्कमधे बिघाड असल्याने फोन लागु शकला नाही . तुमचे डिनर तयार आहे . आम्ही दहा मिनीटात ते सर्व्ह करु . आपण सर्वांनी डायनींग रुममध्ये जमावे . या गढीची माहिती उद्या तो माणुस तुम्हाला देइल . "
सगळे प्रवासी हसत एकमेकांकडे पाहु लागले . एक ज्येष्ठ प्रवासी कारेकरांना हसतमुखाने म्हणाला .
"काय कारेकर , तुम्ही आमची चेष्टा करता काय ? तुमचा तो खास माणुस अगदी ठरलेल्या वेळी आला . त्याची तब्येत बरी नसतानाही त्याने आम्हाला या गढीचा इतिहास ,सरदार दिठेरीकर घराण्याचा ईतिहास अगदी रंगवुन सांगितला . तेही इतके मनापासुन की या घटना जणु समोर घडत आहेत असाच आम्हाला भास झाला . आम्हाला माहिती सांगुन ते वरील मजल्यावर विश्राम कक्षात गेले . आम्हाला तुमचेही आभार मानले पाहिजेत . तुम्ही प्रत्यक्ष सरदार दिठेरीकर घराण्यातील वंशज रवीकांतराव दिठेरीकर यांनाच आमच्यासाठी बोलावले. तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे "
कारेकर हे सर्व बोलणे ऐकुन गोंधळुन गेले . त्यांच्या कपाळावर आठ्या चढल्या . ते सर्वांना म्हणाले .
"पण ..पण हे कसे शक्य आहे ? मी ज्यांना आठ वाजता बोलावले होते त्यांचे नाव प्राध्यापक देशमुख आहे . ते दिठेरी गावात राहतात . आणी दोन वर्षांपुर्वीच जीवनराज ट्रॅव्हल्सने सरदार दिठेरीकर कुटुंबाकडुन सर्व कायदेशीर बाबी पुर्ण करुन हि गढी विकत घेतली . गेली दोन वर्षे इथे रिनोव्हेशनचे काम चालु होते . तेव्हापासुन इथे फक्त वॉचमन आणी जीवनराज ट्रॅव्हल्समधले मदतनीस असतात . बाकी कोणी राहात नाही . सरदार दिठेरीकरांचे वंशज तर दोन वर्षांपुर्वीच हे गाव सोडुन निघुन गेले . आणी सरदार रवीकांतराव दिठेरीकर यांचा तर तीन वर्षांपुर्वीच देहांत झाला . "
आता सगळे प्रवासी गोंधळले . तरीही त्यांना कारेकरांचे सांगणे पटत नव्हते . एकजण परत म्हणाला .
"पण मग आम्हाला ज्यांनी माहिती दिली ते कोण होते ? त्यांनी किती चांगली माहिती दिली . त्या तसबिरीच बघाना . हे सिधोजीराव दिठेरीकर ... यांनी खुप मोहिमा गाजवल्या . ते गणोजीराव .. ते गोविंदराव .. अरेच्चा ..हे काय हा फोटो तर मगाशी दिसत नव्हता ? हा कुठुन आला ?"
त्या भिंतींवरील तसबिरींकडे पाहताना तो एका तसबिरीकडे चकीत होउन बोट दाखवत होता . बाकीचेही सगळेजण ती तसबीर पाहुन आवाक झाले . कुणालाच काहि बोलता येईना .
जी तसबीर तासाभरापुर्वी धुसर दिसत होती . ती आता चांगली स्पष्ट दिसत होती . त्या तसबिरीमध्ये प्रत्यक्ष सरदार रविकांतराव दिठेरीकर रुबाबात उभे होते . त्यांची करारी नजर जशी काही या मंडळींवरच रोखलेली होती .
सर्वजण चकीत होउन तसेच उभे होते . सर्वांच्या हातापायातले बळच या धक्क्याने निघुन गेले होते .
त्याचेवेळी दुरवरुन त्यांना एका गुढरम्य गाण्याचे बोल ऐकु येत होते . कुणीतरी थंड , आसुरी आवाजात गात होते .
"हि कुनाची जादु रं , हि कुनाची माया रं
खेळ ह्यो ठावं ना , खेळतं कोन रं
कोन रं कोन रं , कोन रं कोन रं "
--------------- क्रमशः --------------------- काल्पनीक ------------------
प्रतिक्रिया
22 May 2016 - 8:04 pm | आतिवास
रोचक कथानक आहे. वाचते आहे.
22 May 2016 - 8:52 pm | महामाया
धाराप्रवाही लेखन, सुरवातीपासून मस्त मूड जमलाय...
तो जपला देखील आहे...
पुढील भागाबद्दल मनांत उत्सुकता आहे...
22 May 2016 - 9:19 pm | प्रचेतस
हा भागही आवडला.
22 May 2016 - 9:19 pm | प्रचेतस
हा भागही आवडला.
22 May 2016 - 9:41 pm | पद्मावति
बापरे!!! मस्तं.
22 May 2016 - 10:10 pm | एस
भारी रंगवलंय!
23 May 2016 - 1:15 am | रेवती
मस्त!
23 May 2016 - 8:53 am | आनन्दा
पकड घेत आहे.. आन्दो..
23 May 2016 - 9:07 am | असंका
अत्यंत उत्कंठावर्धक...
पुभाप्र...
23 May 2016 - 10:34 am | नेत्रेश
एकदम खीळउन ठेवणारे लिखाण
पूभाप्र
23 May 2016 - 11:49 am | ब़जरबट्टू
आवडले.. फक्त ते मुधोजी, रघुजीच्या भाऊगर्दीत रवीकांत नाव खटकले... :)
24 May 2016 - 2:16 pm | सिरुसेरि
रविकांतराव हे मुधोजी, रघुजीच्या तुलनेत अलिकडच्या काळातले आहेत . त्यामुळे त्यांचे नावही अलिकडच्या काळातले आहे . धन्यवाद .
23 May 2016 - 12:00 pm | नाखु
सगळं !!
मिपा नितवाचक नाखु
23 May 2016 - 12:03 pm | अजया
वाचतेय.पुभाप्र
23 May 2016 - 2:37 pm | कानडाऊ योगेशु
भन्नाट लिहिताय. पु.भा.प्र!
23 May 2016 - 5:16 pm | सिरुसेरि
सर्वांचे खुप आभार .
23 May 2016 - 5:18 pm | अभ्या..
छान लिहित आहात. आवडतेय
शुभेच्छा.
23 May 2016 - 5:32 pm | स्पा
भारी
येउदे पुढचा भाग
26 May 2016 - 1:03 pm | abhajoshi14
अंगावर काटा आला वाचून...एकदम सु शी ची आठवण झाली. सुहास शिरवळकर
26 May 2016 - 6:37 pm | मराठी कथालेखक
रंजक... :)
10 Jun 2016 - 5:39 pm | स्मिता श्रीपाद
पुढचा भाग कधी ?