सरदार दिठेरीकरांची गढी ----- भाग २ ----- कथा ------ काल्पनीक

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
22 May 2016 - 12:52 am

सरदार दिठेरीकरांची गढी ---- भाग १ ---- कथा ---- काल्पनीक

सरदार दिठेरीकरांची गढी - भाग २ ----- कथा ------ काल्पनीक -- पुढे चालु ---

एक झोकदार वळण घेउन बस गढीच्या मुख्य दारापाशी येउन थांबली . बाहेरुन दिसणारी गढीची भव्य तटबंदी पाहुन सर्व प्रवाशांची उत्सुकता चाळवली गेली . गढीचा मुख्य दरवाजाही चांगलाच भव्य , बुलंद दिसत होता .

"चला मंडळी . आपले मुक्कामाचे ठिकाण आले . सरदार दिठेरीकरांची गढी ." कारेकरांनी सुचना दिली .

सर्व प्रवासी लगबगीने खाली उतरले . खाली कारेकरांचे दोन मदतनीस प्रवाशांचे सामान बसमधुन उतरवुन घेत होते .

"मंडळी , तुमचे बॅगेज तुमच्या रुम्समध्ये पोचवण्यात येईल . तुम्ही आता माझ्याबरोबर आतमधील हॉलमध्ये चला."

कारेकरांच्या सुचनेप्रमाणे सर्वजणांनी गढीमधे प्रवेश केला . गढीच्या प्रवेशद्वारापासुन आतमधील हॉलकडे जाणारा एक दगडी फरसबंद रस्ता होता. रस्त्याला दर थोड्या अंतराने काही पाय-रया बसवलेल्या होत्या . रस्त्याच्या दोन्ही बाजुला व्यवस्थित निगा राखलेला बगिचा होता . या रस्त्यावरुन गढीच्या तटबंदीची आतली बाजु दिसत होती . मधेच काही ठिकाणी गढीच्या बुरुजांवर जाण्यासाठी असलेल्या पाय-रया दिसत होत्या .

हि गढीची रचना बघत , मनात साठवुन घेत प्रवासी मंडळी हॉलमध्ये पोचली . हा हॉल म्ह्णजे एक भव्य जुन्या पद्धतीचा दिवाणखाना होता . जुना असला तरी अजुनही हा दिवाणखाना आणी आतली आसने यांची व्यवस्थित काळजी घेतलेली होती . छतावर भव्य झुंबरे लखलखत होती . भिंतींवर अनेक ऐतिहासीक काळातील तसबिरी होत्या .

बाजुलाच एका मोठ्या टेबलावर प्रवाशांच्या श्रमपरिहारासाठी चहा , कॉफी , सरबत , खाद्यपदार्थ मांडुन ठेवले होते . स्वता कारेकर व त्यांचे मदतनीस सर्वांना काय हवे काय नको त्याप्रमाणे सरबराई करु लागले . सर्वजण चांगलेच खुश झाले . कारेकरांनी परत सर्वांचे आभार मानले . मग सर्वांना पुढचा दिनक्रम सांगितला .

"मंडळी , हे दिठेरी गाव व येथील ऐतिहासीक गढी आजपर्यंत फारशी ऐकीवात नव्हती . आमच्या जीवनराज ट्रॅव्हल्सने या वर्षीपासुन मुद्दामुनच या कमी गर्दीच्या ठिकाणी टुर सुरु केली . येथील गढीचे जुने , ऐतिहासिक स्वरुप कायम ठेवुन , त्यामध्ये नवीन आधुनीक सुविधांचा मिलाफ केला आहे . या गढीचे एका हेरिटेज स्थळामधे रुपांतर केले आहे . तुम्ही सर्वांनी आम्हाला जो उत्साही प्रतीसाद दिला त्याबद्दल आमच्या जीवनराज ट्रॅव्हल्सतर्फे मी आपणा सर्वांचे मनापासुन आभार मानतो . "

"तुम्ही सगळेच प्रवासाने दमला असाल .तर आता आपापल्या रुम्समध्ये जाउन चांगली विश्रांती घ्या . आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत . तुम्ही फ्रेश झाल्यावर ठिक रात्री आठ वाजता या हॉलमध्ये जमा . या ऐतिहासीक गढीची माहिती देण्यासाठी मी एक खास माणुस बोलावला आहे . तो तुम्हाला खुप चांगली माहिती देईल . मग नऊ वाजता डिनर होईल . तेव्हा मी तुम्हाला उद्याच्या कार्यक्रमाची माहिती देईन . आता पुढचे चार दिवस आपण या गढीमधे राहणार आहोत . आणी आजुबाजुची ऐतिहासीक स्थळे पाहणार आहोत ."

सर्व प्रवासी आपापल्या रुम्समधे गेले . सर्वांनी आपल्या प्रवासामुळे झालेल्या दमणुकीची भरपाई केली . सर्वांच्या मनात आठ वाजता येत असलेल्या खास माणसाच्या भेटीची उत्सुकता होती . त्यामुळे सगळेजण तयार होऊन पावणे आठ वाजताच हॉलमध्ये आले . तेथील आसनांवर बसुन कारेकरांची आणी त्या माहितगाराची वाट पाहु लागले .

पण दहा मिनीटे झाली तरी कारेकर किंवा तो माहितगार यांपैकी कोणच दिसेना . कारेकरांचे मदतनीसही कुठे दिसत नव्हते . सगळेच प्रवासी संचित झाले . एकमेकांकडे चौकशी करु लागली . पण कुणालाच काहि माहित नव्हते .

अचानक त्यांना हॉलच्या आतील भागातुन पावलांचा आवाज ऐकु आला . हॉलच्या आतील दरवाजापुढे वरच्या मजल्यावर जाणारा एक जिना होता . कोणीतरी तो जिना उतरुन येत होते . सर्व़जण उत्सुकतेने हॉलच्या आतील दरवाजाकडे पाहु लागले .

एक उंच रुबाबदार व्यक्ती दरवाजामधुन आत आली . त्या व्यक्तीचे वय साधारण साठीच्या आसपासचे होते . त्या व्यक्तीचे कपडेही अत्यंत उंची होते . त्या व्यक्तीने आपल्या खांद्यावर एक तलम शाल पांघरली होती .

"सर्वांना नमस्कार " असे म्हणत त्या व्यक्तीने नम्रपणाने सर्वांना नमस्कार केला . त्या नमस्कारात , नम्रपणातही एक घरंदाज रुबाब होता . एक खानदानी अदब होती .त्या व्यक्तीने सर्वांना आपली ओळख करुन दिली .

"आम्ही रविकांतराव दिठेरीकर . या सरदार दिठेरीकर घराण्याचे आम्ही वंशज आहोत . "

रविकांतराव दिठेरीकर यांच्या नावाने , त्यांच्या रुबाबाने सर्व प्रवासी भारावुन गेले . आपल्याला आज प्रत्यक्ष सरदार दिठेरीकर घराण्यातील वंशजाकडुन या गढीची आणी या गावाची माहिती मिळणार म्ह्णुन ते खुश झाले . सर्वांनी रविकांतराव यांना आपापली ओळख करुन दिली .

"आज शहरातुन काही पाहुणे मंडळी येणार आहेत असे आमच्या कानावर आले होते . म्हणुन आमच्या विश्राम कक्षातुन आम्ही मुद्दामहुन आपणांस भेटण्यास आलो . आपणा सर्वांना भेटुन खुप आनंद झाला"

रविकांतराव यांच्या अदबशीर बोलण्याने सर्वांची भीड चेपली . प्रवाशांपैकी एकाने तेवढ्यात उत्सुकतेने विचारले .

"सरदारसाहेब , माफ करा . पण आजपर्यंत कधी कुठल्या इतिहासविषयक पुस्तकात आम्ही आपल्या सरदार दिठेरीकर घराण्याचा किंवा या दिठेरी गावचा उल्लेख कधी वाचला नाही . यामागे काय कारण असावे ?"

या अचानक आलेल्या अपमानकारक प्रश्नाने रविकांतराव दिठेरीकर जरा रागावलेच . रागारागानेच त्यांनी उत्तर दिले .

"इतिहासविषयक पुस्तकात उल्लेख नाही म्हणुन एखाद्याचा पराक्रम मातीमोल होतो असे थोडेच आहे . सरदार दिठेरीकर घराण्यातील लोकांनी वेळोवेळी आपले शौर्य गाजवले आहे . हि भव्य गढीच आमच्या घराण्याच्या पराक्रमाची साक्ष द्यायला पुरेशी आहे . बाकी आमचे कुठल्या पुस्तकात नाव आहे वा नाही , आणी कोणास काय वाटते याची आम्ही पत्रास बाळगत नाही ."

प्रश्न विचारणारा प्रवासी चांगलाच खजील झाला . पण रविकांतराव यांचा राग अजुन पुर्ण ओसरला नव्हता . त्या हॉलमधील भिंतींवर सरदार दिठेरीकर घराण्यातील व्यक्तींच्या तसबिरी लावलेल्या होत्या . आपली भेदक नजर सर्वांवर रोखत रविकांतराव सर्वांना त्यांमधील काही महत्वाच्या तसबिरी दाखवु लागले व सोबत त्या व्यक्तींच्या पराक्रमाची माहिती देऊ लागले .

"हे सिधोजीराव दिठेरीकर , थोरल्या पेशव्यांच्या सैन्यात हे एक ढालाईत होते . पुढे त्यांचा अनेक मोहिमांतला पराक्रम बघुन यांना दिठेरी गाव आणी आसपासच्या मुलुखाची जहागिरी मिळाली . "

"हे गणोजीराव दिठेरीकर , वसईच्या लढाईत यांनी शौर्याने लढुन आपले प्राण अर्पण केले "

"हे गोविंदराव दिठेरीकर , उदगीर , कुंजपुरा , दिल्ली आणी पानिपत येथील लढायांमध्ये यांनी तलवार गाजवली . पानीपतच्या लढाईत यांना वीरमरण आले ."

"हे रघुजीराव दिठेरीकर , निजामावरच्या मोहिमेत यांनी मोठा पराक्रम गाजवला "

हि सर्व माहिती सारे प्रवासी थक्क होऊन ऐकत होते . आजपर्यंत ज्या ऐतिहासिक घटना त्यांनी केवळ ऐकल्या होत्या नाही तर पुस्तकांमध्ये वाचल्या होत्या , त्या घटनांमध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेल्या व्यक्ती त्या गढीमध्ये एकेकाळी वावरल्या होत्या या विचारांनीच सारे भारावुन गेले . सर्वजण परत परत त्या ऐतिहासिक तसबिरींकडे पाहु लागले .

या सर्व तसबिरींपैकी एका तसबिरीचा रंग थोडाफार विटला होता . त्यामुळे आतले चित्र खुप धुसर झाले होते . त्या तसबिरीविषयी रविकांतराव यांना विचारावे असे काहिंच्या मनात आले . पण त्यांना रविकांतराव यांचा चिडलेला पारा आठवला . शेवटी त्यांनी तो बेत रहित केला .

रविकांतराव यांनी त्या हॉलच्या टोकाला असलेल्या एका उंच आसनावरील बैठकीकडे निर्देश केला आणी ते पुढील माहिती सांगु लागले .

"या दिवाणखान्यामधे एकेकाळी न्यायदानाचे काम चालत असे . दिठेरी गाव आणी बाजुचा मुलुख इथल्या जनतेचे न्याय निवाडे इथे होत असत . खुद्द सरदार दिठेरीकर हे न्याय निवाड्याचे काम बघत असत . "

----------- क्रमशः --------------------- काल्पनीक ------------------

कथालेख

प्रतिक्रिया

बाबौ! कारेकर मंडळी कुठे गेली?

बाबौ! कारेकर मंडळी कुठे गेली?

जव्हेरगंज's picture

22 May 2016 - 8:39 am | जव्हेरगंज

बाबौ! कारेकर मंडळी कुठे गेली?

भारीये. तसबीरीतून उतरून दस्तुरखुद्द दिठोरीकर माहिती देताहेत की काय.

पुभाप्र.