जलसाक्षरता : पाण्याच्या देशात!

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 May 2016 - 3:42 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

मला एका संपादक मित्राने विचारलं, ‘लोकसंस्कृतीतील ओव्यांमध्ये वा लोकगीतांमध्ये पाणी वाचवण्यासंदर्भात काही मौखिक परंपरा असतील तर त्या उपयोजित करत लेख लिहाल का?’
मी म्हणालो, ‘नाही.’
मी पटकन दिलेल्या ‘नाही’ उत्तराने त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, ‘का?’ ‘कारण आपल्या लोकसंस्कृतीच्या परंपरेत इथं पाणीच पाणी आहे. भारत हा पर्वतांचा आणि नद्यांचा देश आहे. पूर्वीपार नदीच्या काठांवरच गावं वसलेली होती. इथं भरपूर जंगलं होती. म्हणून पाऊसही भरपूर कोसळायचा. पावसाच्या झड्या लागायच्या. पाण्याचे महत्व कळण्याचे दिवस नव्हतेच पूर्वी. उलट ‘पाण्यासारखा पैसा खर्च करणे’ हा वाक्‍प्रचार आपल्याकडे सुरू झाला. म्हणजे पाण्याला किमंत शून्य. पूर्वी पाणी फुकट आणि जिकडे तिकडे मुबलक उपलब्‍ध असल्याने पाण्याची महात्मता वा काटकसर मौखिक वाड्‍.मयात दिसून येत नाही. मात्र लोकसंख्येच्या प्रचंड स्फोटाने आणि जंगल तोड- वृक्ष तोड झाल्याने पाण्याची निकड आता उत्पन्न होत आहे.’
संपादक महाशयांचे शंका निरसन झाले. पण पाणी हा आज सगळीकडे चिंतनाचा विषय झाला याचं कारण काय? पश्चिम आशिया खंडातल्या देशांत वाळवंट आहे. पाण्याची कमतरता पूर्वीपार आहे. म्हणून तिथले लोक आठवड्यातून एक दिवस अंघोळ करतात. त्या मानाने भारतासारख्या देशात पाण्याची उपलब्‍धता परंपरेने विपुल असल्याने आपण रोज अंघोळ करतो. (आणि आपल्या वाहनांनाही- गाड्यांनाही रोज अंघोळ घालतो. रोज घराच्या फरश्या धुतो. अर्धा ग्लास पाणी पिऊन अर्धा ग्लास फेकतो. गल्लीतून- गटारातून पाणी वाहू देतो, पण आपण नळाच्या तोट्या बंद करत नाही. बोअरवेल स्वत:च्या पैशांनी केली असली तरी त्यातून येणारे पाणी हे नैसर्गिक आणि सामाजिक आहे याचे भान आपण ठेवत नाही.) पाणी वाचवण्याचे दाखले भारतात मिळत नाहीत. भरपूर पाऊस आणि दु्‍थड्या भरून वाहणार्‍या नद्या आपण टिकवून ठेवल्या नाहीत. तात्पुरत्या स्वार्थाने त्या प्रदुषित केल्या आणि जंगलेही गरजेपेक्षा झपाटयाने नष्ट केलीत. ब्रिटीश राजवटीत दूरदृष्टीने काही नद्यांवर धरणं बांधली गेलीत. त्याचे फायदे आपल्या लक्षात आल्याने आपणही स्वतंत्र भारतात धरणं बांधू लागलो. धरणांचे फायदे आता आता आपल्याला दिसू लागली आहेत.
पाणी, पाऊस, भूजल पातळी म्हणजे जमिनीतली पाणी पातळी यांचा खूप जवळचा संबध झाडांशी आहे, डोंगरांशी- पर्वतांशी आहे आणि त्यांच्यावर उभ्या असलेल्या जंगलावरही पाण्याचा संबंध आहे. म्हणून जलसाक्षरता राबवतानाच्या प्रचारात झाडांना विसरून चालणार नाही. फुकट मिळणारा अमर्याद प्राणवायू झाडांपासून मिळतो आणि आपल्याला प्रदुषणापासून वाचवते ते ही झाडच. म्हणून फळ न देणारी झाडं असलीत तरी ती आपण जपली पाहिजेत! आपल्याला झाडं लावता येत नसतील तर किमान तोडू तरी नये वा तोडायला कोणी उद्युक्‍त होईल अशी कृती टाळायला हवी. झाडांपासून म्हणजे लाकडांपासून बनवलेल्या वस्तू वापरण्याचं थांबवायला हवं. आपल्या प्रत्येक वाढ दिवशी आपण एकेक झाडं लावून ते वाढवायला हवं- जगवायला हवं.
आतापर्यंत आपण पाण्यासारखा पैसा खर्च करतो, असं फुशारकीने म्हणत होतो. यापुढे मात्र आपल्याला पैशांसारखे पाणी खर्च करता येणार नाही. पैसे छापता येतात, म्हणून कमवता येतात! पाणी छापता येत नाही. म्हणून कमवताही येणार नाही! हे लक्षात घेऊन यापुढे आपण पाणी अडवलं पाहिजे. साचवलं पाहिजे. जिरवलं पाहिजे. पाण्याची काटकसर करणार्‍या कोणालाच कंजुष म्हणता येणार नाही. या पारंपरिक पाण्याच्या देशात पाणी वाचवायचं कसं? जलसाक्षरता आपल्या समाजात रूजता रूजत नाही. पाणी आपण स्वत: वाचवावंच पण कसं वाचवावं याबाबत दुसर्‍यालाही सुचना कराव्यात. मार्गदर्शन करावं. जशी आपण गावपातळीवर वर्गण्या काढून आतापर्यंत सार्वजनिक मंदिरे बांधत आलो, तशी पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना गावागावात श्रमदान करून सामुहीक पध्दतीने राबवायला हवी. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रातल्या काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळ आहे. अशा वातावरणात ओठांवर गाणं आलंच तर ते असं येतं:
पानी रे पानी तेरा रंग कैसा ।
सुखे मे मिला हुआ घडा जैसा ।।

(महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळावर शुक्रवार, दिनांक २९ एप्रिल, २०१६ ला प्रकाशित झालेला माझा लेख. या लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

15 May 2016 - 4:16 pm | विवेकपटाईत

लेख आवडला. तूर्त कित्येक महिन्यांपासून आमच्या इथे पाणी येत नाही. कारण १०० मीटरची पाईप लाईन बदलायची आहे. शिवाय तसेही इलाक्यात उन्हाळा सुरु झाल्यापासून पाणी कधी काळी येत आहे. हीच स्थिती अधिकांश बाह्य दिल्लीची आहे. पण काय करणार पाण्याएवजी डिग्रीचा प्रश्न मोठा आहे.

एक एकटा एकटाच's picture

15 May 2016 - 4:39 pm | एक एकटा एकटाच

चांगला लेख आहे

पैसा's picture

15 May 2016 - 8:35 pm | पैसा

लेख आवडला.

वपाडाव's picture

16 May 2016 - 11:46 am | वपाडाव

मी ऑफिसात पाणीप्रबोधन करण्याचे ठरविलेले आहे.
लोक चेहरा/हात्/कप धुताना सदा सर्वकाळ बेसिनचा नळ सुरु ठेवतात.
हे पाहुन मला खुप वाईट वाटते. म्हणुन मी त्यांना २ शब्द सुनावतो.
कितीही आक्षेपार्ह वाटले तरी सांगत राहणार.

लेख आवडला पण काही भाग पटला नाही. धरणांचे 'फायदे' कमी आणि तोटेच जास्त आहेत. धरणांची गरजच मुळी आपल्या बदललेल्या तांत्रिक (technology based), शहरी जीवनशैलीमुळे निर्माण झाली आहे. ती नैसर्गिक नसून निसर्गावर मोठ्या प्रमाणावर आघात करणारी आहे.
एक दुवा: https://www.internationalrivers.org/environmental-impacts-of-dams

माहितगार's picture

16 May 2016 - 2:49 pm | माहितगार

आतापर्यंत आपण पाण्यासारखा पैसा खर्च करतो, असं फुशारकीने म्हणत होतो. यापुढे मात्र आपल्याला पैशांसारखे पाणी खर्च करता येणार नाही. पैसे छापता येतात, म्हणून कमवता येतात! पाणी छापता येत नाही. म्हणून कमवताही येणार नाही!

हे वाक्य आवडलं

पाण्याची उपलब्धता आणि लोकसंख्येचे व्यस्त प्रमाण चिंतेची बाब आहेच. बाकी वाक्प्रचार आणि म्हणितून सर म्हणतात तसे पाणि वाचवण्या विषयी उल्लेख कमी असतील. तरी सुद्धा 'आडात नसेल तर पाणी पोहर्‍यात येणार नाही,' 'पाण्याचे तळे थेंबा थेंबाने साठते' आणि 'जावई न्हाला वाफा पाणी प्याला' अशा तुरळक मराठी म्हणी असाव्यात.

'जावई न्हाला वाफा पाणी प्याला' याचा अर्थ जावयाला नहाण्यासाठी पाणी तर मुबलक द्यावे लागते म्हणुन जावयाला अशा ठिकाणि नाहू घाला की नाहण्यासाठी वापरलेले पाणी भाजीच्या वाफ्यात वापरले जाईल. संदर्भ

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 May 2016 - 4:20 pm | डॉ. सुधीर राजार...

सर्वांना धन्यवाद