भाग १ भाग २
मागील तीन दिवसात माझ्या सामान्यज्ञानात बरीच भर पडली होती. वर्गातील विद्यार्थी दिवसभर अभ्यासाव्यतिरीक्त दुसरे काहीही करत नव्ह्ते. डबा खाऊन झाल्यावर उरलेल्या वेळात राजकारणापासून क्रीडा, अर्थ ई. विविध विषयापर्यंत चर्चा करत असत. मीही माझ्या कुवतीप्रमाणे सहभाग घ्यायचो,परंतू ही मुले माझ्यापासून थोडे अंतर ठेवून होती. बहुतेक परवा डबा खाताना झालेला प्रसंग कारणीभूत असावा.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्लास असल्यामुळे मीही दुसर्या दिवशी डबा आणला होता. सगळे विद्यार्थी एकत्र डबा खात असत, त्यामुळे मीही त्यांच्याबरोबर बसलो. शेजारच्या मुलाने डबा उघडला आणि मी 'वॅक' असा आवाज काढला, सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. त्या मुलाच्या डब्यात कोबीची भाजी होती. मला कोबी किंवा फ्लॉवरचा डब्यातील उग्र वास अजिबात आवडत नाही, उलटीची भावना होते. मी त्यांच्यापासून दूर बसून माझा डबा खाल्ला. त्या मुलांचा माझ्याबाबतीत गैरसमज होउ नये म्हणून मी दूर बसण्याचे खरे कारणही सांगितले, परंतू त्यांचे समाधान झाले नसावे.
त्या दोन शिक्षकांनी मला सर्व़़ज्ञ करण्याचा विडाच उचलला होता. हे दोन शिक्षकच अनेक विषय शिकवत असत. मी जितक्या त्यांना अडचणीच्या शंका विचारायचो त्याच्या दहापट ते मला कठिण प्रश्न विचारायचे. सुरुवातीला शरीरावरची कात निघते असे समजून पुन्हा फ्रेश होउन मीही नवीन जोमाने शंका विचारायचो. पुढेपुढे तर माझी चामडीच निघते असे वाटू लागले व मीही चवताळून प्रतिप्रश्न करू लागलो.
एखाद्या पॅरोलवरील गुन्हेगाराला आठवड्यातून ठारावीक दिवशी पो. स्टेशनल हजेरी लावावी लागते, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी क्लास संपला की मला सरांना भेटावे लागे, तसा सरांचा आदेशच होता. मीही न चुकता सरांना भेटत असे. दिवसभरच्या छळछावणीतून बाहेर पडताना माझे डोके भयंकर दुखत असे. डोक्याला घट्ट रुमाल बांधून मी सरांच्या केबिनमध्ये जायचो. सर माझ्या 'प्रगतीचा' आढावा घेत असत. माझ्या तक्रारी सरांच्या कानावर जात असाव्यात, परंतू तसे कधी सरांच्या बोलण्यातून जाणवले नाही. सरांचे बोलणे कायम सकारात्मक व प्रोत्साहनाचे असे. मीही कधी शिक्षकांची तक्रार केली नाही. ५-१० मिनिटात माझी सुटका होत असे.
आज मला क्लासला यायला थोडा उशीर झाला होता. प्रकाशसंश्लेषण शिकवणे चालू होते. मी जागेवर स्थानापन्न होण्यापूर्वीच शिक्षकांनी मला प्रश्न विचारला, वनस्पती आपले अन्न कसे बनवितात. मला उत्तर माहीत होते परंतू अचानकपणे प्रश्न विचारल्यामुळे मी थोडे गांगरून अं..अं..असे केल्याने शिक्षक माझ्यावर् डाफरले एकतर वर्गात उशीरा येतो व शिकवण्याकडे नीट लक्षही देत नाही. कशी जिरवली ह्याची अशा नजरेने वर्गातील मुले माझ्याकडे बघत होती. माझ्या अंगात काय संचारले कोणास ठावूक मी ताडकन उभा राहीलो, व शिक्षकांना म्हणालो, तुम्ही जर माझ्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले तर मी उद्यापासून क्लासला येणार नाही. मी प्रश्न विचारला, बारा तासाच्या कालमापनात वेळ सांगताना AM/PM वापरले जाते. ह्यात AM/PM चे दिर्घरूप काय आहे? वर्गात टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली, ते शिक्षक त्या शांततेचा भंग करू शकले नाही. वर्गात विद्यार्थ्यांची चुळबुळ सूरू झाली. तूच सांग उत्तर शिक्षकांनी माघार घेत म्हटले. नाही हे तुमच्या करता होमवर्क समजा. उद्या सांगितले तरी चालेल.
आज डबा खाऊन झाल्यावर सगळी मुले माझ्याभोवती जमा झाली. प्रत्येकाला मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे होते. सगळ्यांकडे मोबाईल होते परंतू नेट नसल्यामूळे गूगल करता येत नव्हते. मलाही त्यांची उत्कंठा ताणण्यात मजा येत होती. माझ्याकडून उत्तर मिळत नाही म्हटल्यावर शेवटी कंटाळून बाजुला जाऊन बसले,परंतू नेहमीप्रमाणे चर्चा करत नव्ह्ते. AM/PM वर तर्क लढवत होते. त्यांचे तर्क ऐकून माझी चांगलीच करमणुक होत होती.
विज्ञानाच्या शिक्षकांनी वर्गात आल्याआल्या मला उभे केले व स्वतःला शहाणा समजतोस का ? असा मला प्रश्न केला. बहूतेक मागील तासाला केलेल्या माझ्या पराक्रमाची कीर्ती त्यांच्यापर्यंत पोचली होती. शिक्षकांना काहीही मुर्खासारखे प्रश्न विचारतोस? अक्कल आहे का तुला.? मला नाही अक्कल, तुम्हाला असेल तर द्या तुम्ही उत्तर मीही निर्लज्जपणे म्हटले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उत्तर दिले. वर्गातील मुलांनी लावलेल्या तर्कापेक्षा उत्तर वेगळे असल्याने सगळे माझ्याडे बघू लागले. मीही ओके म्हटले. आज माझी भिड चेपली होती. तुम्ही शिकविलेल्या विषयावर मला काही शंका आहेत त्या मी विचारू शकतो का? मी विचारले. शिक्षकांकडून होकार आला. मागील दोन तीन दिवसापसून हे शिक्षक मला पाणी शुद्धीकरण व रक्तगटावरून अनेक कठिण प्रश्न विचारत होते, आज मला त्यांना कोंडीत पकडायची आयती संधी आली होती. माझा पहीला प्रश्न- तुरटी ही जंतुनाशक आहे, तर तुरटीने शुद्ध केलेले पाणी प्यायल्याने पोटातील 'मित्र' जिव नष्ट होत नाही का?
दुसरा प्रश्न- 'O' गटाच्या व्यक्तीचे रक्त A,B व AB ह्या गटाच्या व्यक्तीला चालू शकते तर A,B व AB ह्या गटाच्या व्यक्तीचे रक्त 'O' गटाच्या व्यक्तीला का चालू शकत नाही? शेवटी रक्त एकत्रच होत असते ना? शिक्षक माझ्या ह्या दोन्ही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. आणि तास संपेपर्यंत शिक्षकांनी मला एकदाही प्रश्न विचारला नाही.
सरांच्या केबिनमध्ये मी बसलो होतो. आज डोक्याला रुमाल बांधला नव्हता. सरांच्या ते लक्षात आले होते. मी हा कोर्स करणार नसल्याचे सरांना सांगितले. सरांनी हरएकप्रकारे मला समजावून सांगितले. परंतू मी सरांना माझ्या कुवतीप्रमाणे पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. कदाचीत मी हा कोर्स यशस्वीपणे पुर्ण करेनही,परंतू त्यासाठी मला प्रचंड मेहनत करावी लागेल. मला माझ्या अनेक हौशीं पुर्ण करता येणार नाही. मी हा कोर्स न करताही ज्ञान मिळवीन, हौशी पुर्ण करताना पैसाही कमवीन व लोकांपर्यत पोचण्याचा प्रयत्न करेन. कसे ते सरांना सवीस्तरपणे सांगीतल्यावर सर क्षणभर गप्प बसले व म्हणाले ,खरे आहे सगळे मिळवता येते परंतू तरुणपणीचे दिवस परत नाही मिळवता येत. तो मिळवण्याचा प्रयत्न केला तरी तो हास्यास्पद वाटतो, असे म्हणून सरांनी मला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- त्यानंतर असेच नेटवर भटकत असताना मला 'मिपा' गवसले आणि माझे बरेचसे काम सोपे झाले....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
11 May 2016 - 11:31 pm | असंका
मला अॅन्टे आणि पोस्ट एवढं बरोबर आठवत होतं..पुढचं एक्तर आठवत नवतं किम्वा चुकीचं आठवत होतं..
मस्त मजा केलीत क्लासमध्ये.
आमच्याने कधी एवढं धाडस झालं नाही. उलट एक मित्र असले प्रश्न विचारायचा तर आम्ही त्यालाच गप्प करायचो. चुक्याच जरा...
14 Jun 2016 - 5:33 pm | मार्मिक गोडसे
बर्याच जणांच्या बाबतीत हेच घडते.
रक्तदानाच्याच्या बाबतीत वरील लेखात मी विचारलेली शंका माझ्या मेडिकलच्या मित्रांनाही विचारली होती, फक्त एकालाच बरोबर उत्तर देता आले होते.
आज रक्तगटाचे संशोधक नोबेलविजेते कार्ल लॅन्डस्टेनर (१८६८) ह्यांचा जन्मदिवस. बघुया मिपावरील कोणी ह्याचे बरोबर उत्तर देऊ शकतं का?
11 May 2016 - 11:40 pm | जयन्त बा शिम्पि
अन्टे मेरिडिअन व पोस्ट मेरिडिअन . मेरिडिअन म्हणजे मध्यान्य , दुपार. दुपारचे बारा वाजण्याच्या आत एएम व बारा वाजेच्या नंतर पीएम.