विखार - कथा - काल्पनीक
लग्नसमारंभाचा हॉल छान सजवलेला होता . सकाळपासुन पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली . थोड्याच वेळात लग्नाचे विधी सुरु झाले . वधुपक्षाची मंडळी लगबगीने इकडुन तिकडे धावत होती . दोन्ही बाजुंकडील लोकांचे आगत- स्वागत , मानपान कौतुकाने करीत होती . वरपक्षाच्या लोकांना काय हवे नको ते बघुन त्यांच्या मागण्या हसत हसत पुरवीत होती.
पण हळुहळु वरपक्षाची मंडळी पिसाटल्यासारखे करु लागली . त्यांच्या मागण्या अचानक वाढतच जाउ लागल्या .
"मुलाला नवीन घड्याळ हवे " , "मुलाच्या अमक्या तमक्या नातेवाईकांचे आहेर , मानपान नीट झाले नाही ते आधी पार पाडा" अशा एकेक फर्माईशी सुटु लागल्या . या मागण्या पुरविता पुरविता वधुपक्षाची चांगलीच दमछाक झाली . वधुपक्षाच्या डोक्यावरील खर्चाचा आणी कर्जाचा आकडा एकाच वेळी वाढु लागला .
"पुजेसाठी तबक हवे आहे " अशी मागणी झाली . वधुकडील लोकांनी घाईघाईने आपल्या सामानातुन आणलेले पुजेचे तबक काढुन दिले .
"हे काय ? इतके साधे तबक ? तुम्ही सोन्याचे तबक का नाही आणले ? एवढी ऐपत नाही तर द्यावी कशाला आमच्या सारख्या थोरामोठ्यांच्या घरी मुलगी ? " मुलाकडील एकजण करवादला .
"नाहीतर काय ? दळभद्री कुठले . आम्ही काय तुमच्या दाराशी आलो होतो काय मुलगी द्या म्हणुन ?" दुसरा बडबडला .
"अहो , तुमची मुलगी एवढ्या चांगल्या तालेवार , मातब्बर आणी घरंदाज कुळात जात आहे तर कशाला खर्चात हात आखडता घेताय ? हि सोयरीक तोडु नका . होउद्यात खर्च...." मुलाकडचा आणखी एकजण आगीत भर घालत म्हणाला .
या सगळ्या अपमानाने वधुपक्षामधील सर्वजण पार खजील होउन गेले . "मुलीचे लग्न मोडले तर समाज काय म्हणेल ?" या भितीने ते आता चांगलेच अडकले होते . हवालदिल झाले होते . वधुकडील काही मंडळी घाईघाईने बाहेर पडली . बाजारपेठेतल्या एका नामवंत दुकानात जाउन त्यांनी सोन्याचे तबक खरेदी केले आणी ती परत हॉलमध्ये आली . सोन्याचे तबक मिळाल्यावर मग मुलाकडील लोक थोडावेळ जरा शांत झाले .
वधुमुलगी हा चाललेला सर्व अपमानास्पद प्रकार हताशपणे पाहात होती . तिच्या मनात जुन्या आठवणी साठु लागल्या. दोन वर्षांपुर्वी याच ठिकाणी , याच मुलाशी तिच्या ताईचे - मोठ्या बहीणीचे लग्न झाले होते . लग्नानंतर काही दिवसांतच सासरी ताईचा होणारा छळ , जाच या कुरबुरी कानावर येउ लागल्या . काही महिन्यांपुर्वीच या त्रासाला वैतागुन ताईने अखेर आपले जीवन .....
वधुमुलगी दचकुन भानावर आली . ताईच्या या दुर्घटनेनंतर मुलाकडच्या लोकांनी परत वधुच्या माता पित्यांशी गोड बोलायला सुरुवात केली होती . त्यांनी आता या मुलासाठी धाकट्या मुलीची मिनतवारीने मागणी सुरु केली .
"तुमच्या मोठ्या मुलीच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी होते . हा सर्व प्रकार काही गैरसमजातुन घडला . यामध्ये जशी आमची चुक होती तशी तिचीही चुक होती . तिने आम्हाला कधी चुक सुधारण्याची संधीच दिली नाही . पण तुमच्या धाकट्या मुलीच्या बाबत असे काही घडणार नाही याची आम्ही काळजी घेउ हि खात्री बाळगा ." अशी अनेक आर्जवे त्यांनी प्रत्यक्ष भेटुन तर कधी मध्यस्थांतर्फे केली .
ताईच्या या दुर्घटनेमुळे धाकटीचे लग्न ठरवणे तसेही वधुच्या माता पित्यांना अवघड जात होते . त्यामुळे या आर्जवांना ते अखेरिस भुलले . ज्या ठिकाणी आधी कटु अनुभव आला होता , त्याच ठिकाणी नाते संबंध जोडायला ते विरघळुन तयार झाले .
आणी आता ऐन लग्नाच्या दिवशी मुलाकडच्या लोकांनी परत आपले मुळ रंग दाखवायला सुरुवात केली होती . जणु काही इतके दिवस केलेल्या आर्जवांचा अपुर्ण राहिलेला सुड ते आता पुर्ण करत होते . वधुला आपले भवितव्य स्पष्ट दिसत होते . जी वेळ ताईवर आली ती बहुतेक आता आपल्यावरही .....
"पुजेसाठी फुले हवी आहेत ." मुलाकडच्यांनी आता नवीन हुकुम सोडला .
"थोडी थोडकी नाही तर चांगली चारशे पाचशे फुले घेउन या . लवकर ... आणी उगाच कंजुशी करु नका ."
परत वधुकडील मंडळी घाईघाईने बाहेर पडली . अनेक दुकानात जाउन , दुकानदारांच्या हातापाया पडुन त्यांनी कशीबशी
पाचशे फुले मिळवली . हि सर्व फुले एका मोठ्या टोपलीमध्ये भरुन ते सर्वजण परत हॉलमध्ये आले .
वरपित्याने फुलांची टोपली घेतली . तो ओंजळीने पुजेच्या ठिकाणी फुले वाहु लागला .
त्या टोपलीमध्ये , अनेक फुलांच्या खाली एक बारका साप दडलेला होता . ओंजळीने फुले वाहताना अचानक तो साप वरपित्याच्या हातात आला . सासरेबुवांची पार घाबरगुंडी उडाली . डिवचल्या गेलेल्या त्या सापाने वरपित्याला कडकडुन दंश केला . आणी सळसळ करत जशी वाट फुटेल तशी तो हॉलच्या बाहेर निघुन गेला . त्या सापाची ती सळसळ बघुनच अनेकांना घाम फुटला . अनेकांची भीतीने गाळण उडाली .
तो साप जरी बारका असला तरी त्याचा दंश चांगलाच विखारी होता . वरपित्याच्या अंगाची पार लाहीलाही होउ लागली. जीवाची तडफड वाढु लागली . पाच दहा मिनीटांतच सासरेबुवांचा खेळ आटोपला . हॉलमध्ये मुलाकडच्या लोकांची एकच रडारड सुरु झाली . वरपक्षाची मंडळी पार शोकात बुडुन गेली .
लग्न आता मोडल्यातच जमा होते . इतका वेळ हा सर्व प्रकार खालमानेने पाहणारी वधु अचानक उठली . तिच्या अंगात जणु दहा हत्तींचे बळ आले होते . चेहराही करारी झाला होता . तिने भराभरा आपले सारे सामान आवरले . आपल्या लोकांना आपले सर्व सामान , आहेर व मानपानाच्या भेटवस्तु गोळा करुन व-हाडाच्या बसमध्ये ठेवायला लावले. सर्वांना बसमध्ये बसण्याची खुण केली . सर्वजण बसताच बस त्वरेने परतीच्या वाटेने निघाली .
थोड्याच वेळात सर्वजण निवांत झाले . बरेचजण झोपी गेले . वधुही खुप दमली होती . खिडकीतुन बाहेर पाहताना तिचा चेहरा एका त्रासदायक भवितव्यातुन सुटका झाल्याच्या आनंदात होता .
अचानक वधुला आपल्या कानापाशी कसलीतरी सळसळ जाणवली . पण ती घाबरली नाही , दचकली नाही . कारण गेले काही दिवस हि सळसळ तिच्या चांगल्याच ओळखीची झाली होती .
खिडकीतुन अंदाजाने बाहेर कुठेतरी बघत वधु समाधानाने म्हणाली " थँक्स ताई....."
-------- समाप्त -------- काल्पनीक -----------------------------------------------
प्रतिक्रिया
8 May 2016 - 6:15 pm | कानडाऊ योगेशु
ओ मॅन. व्हॉट अ स्टोरी!
अर्ध्या भागापर्यंत वाचली तेव्हा काय टिपिकल अबला मानसिकतेची कथा आहे असा रिप्लाय द्यावे हे मनात आले होते.
पुढेही काय भंकस आहे असे लिहु वाटले. शेवटात सगळी कथा फिरवली आहे.
फार दिवसांनंतर एखादी कथा वाचुन इतक्या टोकाच्या भावना जाणवल्या.
जिंकलत तुम्ही!
8 May 2016 - 6:19 pm | एस
मस्त कलाटणी.
8 May 2016 - 6:19 pm | mugdhagode
छान
8 May 2016 - 6:30 pm | अभ्या..
बाब्बौ.
जम्लीय बरका कथा.
आवडली.
8 May 2016 - 6:40 pm | स्रुजा
काटा आला अंगावर .. छान जमलीये.
8 May 2016 - 6:47 pm | जव्हेरगंज
भारीच फिरवली की राव !!!
8 May 2016 - 8:05 pm | नीळा
मस्तच
पण तो साप त्या बुळ्या नवर्याला चाउक होता
8 May 2016 - 8:39 pm | टवाळ कार्टा
भन्नाट
8 May 2016 - 8:45 pm | एक एकटा एकटाच
कथा आवडली
मला तर वाटत की ते
काल्पनीक
काढुन टाका
बसु दे ज़रा जरब..........
8 May 2016 - 10:09 pm | मानसी१
छान ट्वीस्ट. पण 'नीळा' म्हणाले तसे सापाने नवऱ्याला देखिल चावायला हवे होते.
8 May 2016 - 11:43 pm | हकु
खूपच छान!!
9 May 2016 - 1:44 am | बोका-ए-आझम
अशीच एक आल्फ्रेड हिचकाॅकची कथा आहे. पण त्यात संदर्भ वेगळे आहेत.
9 May 2016 - 1:55 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर कथा. शेवटची कलाटणी मस्तं !
9 May 2016 - 4:05 am | वीणा३
आवडली कथा.
9 May 2016 - 10:00 am | सविता००१
कथा. आवडली
9 May 2016 - 11:05 am | नाखु
पण किमान तीन फलंदाज तरी बाद करायचे होते असे म्हणतो मी...
हे माझे मत आहे आणि ते मान्य असलेच पाहिजे असा अजिबात आग्रह नाही.
10 May 2016 - 4:49 pm | सिरुसेरि
सर्वांचे आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार . हि कथा लिहिताना "लज्जा" या सिनेमामधील वधुपक्षाला सतत "हम उठ जायेंगे" असे धमकावणारा गोविंद नामदेवचा वरपिता आठवत होता. म्हणुन त्या एकाच पण प्रमुख धोकादायक फलंदाजाला बाद केले आहे .
10 May 2016 - 6:18 pm | एकनाथ जाधव
सुन्दर ट्वीस्ट.
जमेश.
11 May 2016 - 7:36 am | अर्धवटराव
काहिही म्हणा.. "मोकलाया"ची सर नाहि =))
11 May 2016 - 9:17 am | बोका-ए-आझम
संदर्भ समजला नाही.
11 May 2016 - 10:44 am | अर्धवटराव
ऑल टाईम फेव्हरेट मोकलाया दाहि दिश्याचा ? मोकलायापेक्षा जास्त विनोदी नाहि वाटली हि कथा.
12 May 2016 - 7:28 pm | अभिजीत अवलिया
आवडली ...
14 May 2016 - 10:11 am | रातराणी
भन्नाट जमलिये!
14 May 2016 - 10:57 am | संजय पाटिल
छान जमलिये..
शेवटचा ट्विस्ट तर भारीच..
16 May 2016 - 8:38 am | सिरुसेरि
@अभिजीत अवलिया , @रातराणी,@संजय पाटिल सर्वांचे आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार .
30 Apr 2021 - 1:21 pm | सिरुसेरि
सध्याच्या स्थितीतील नियमांनुसार , जर लग्न समारंभातील मानपान , देणेघेणे या कार्यक्रमांना आळा बसला तर पुढील कुरबुरींना वाव राहणार नाही .