प्रस्तावना -
मनातलं ब्लॉग्वर लिहायला लागले तेव्हा दोन महिन्यांपूर्वी हे दोन लेख लिहिले. लेखाचा सूर उपदेशात्मक आहे हे मान्य! पण ते माझे विचार मंथन आहे. सद्य परिस्थितीत काही खटकणार्या गोष्टींमुळे/वागण्यामुळे मनात आलेले विचार लिहिले आहेत म्हणुन तसा सुर त्या तमाम लोकाना उद्देशून आहे. कदाचित तुम्हालाही ह्या गोष्टी खटकत असतील असे वाटले म्हणुन तुमच्या बरोबर शेअर करते आहे. आणि म्हणुनच हे 'जनातलं मनातलं' ह्या सदराखाली लिहित आहे. :)
पहिला लेख - सहज जमेल असे
Kevin Abosch हा एक आइरिश फोटोग्राफर आहे. सध्या त्याचा २०१० सालचा एक फोटो चर्चेत आला आहे. फोटोचे मॉडेल आहे एक बटाटा! हो हो बटाटाच!
एक आइरिश, सेंद्रिय (organic), मातीने माखलेला, पूर्ण काळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा बटाटा केविनच्या कॅमेरामध्ये बंदिस्त झाल्यावर किती मूल्यवान ठरू शकतो हे कळते तेव्हा आपल्यासारख्या सामान्यांना थक्क व्हायला होते. तुम्हाला हा बटाटा बघायचा असेल तर google search करा… potato#345.
एका व्यावसायिकाने अंदाजे १.५ दशलक्ष डॉलर्स देऊन तो फोटो विकत घेतला आहे. काय आ वासला ना तोंडाचा? आपल्या इथे रोजचे खायचे बटाटयाचे भाव कडाडले की जीव कासावीस होणारे आपण… आपल्यासाठी हे अद्भुत आहे.
प्रत्येकाचे स्वतंत्र मत आणि प्रतिक्रिया असु शकतात. पण ह्यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आर्थिक विषमता भारतातच नाही तर जगभर आढळते आहे.
जशा अनेक समस्या आहेत तशीच ही समस्या पण जुनाट जर्जर झालेली आहे. ती समूळ नष्ट होणे कठीण असले तरी त्यासाठी आपणच काही पावले उचलून तिला आणि बळकट होण्यापासून परावृत्त करू शकतो.
समाजाचे जे तीन घटक आहेत त्यातील श्रीमंत आणि गरीब यांच्या मधला वर्ग हे काम नक्की करू शकतो. श्रीमंत त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहेत. आपण मध्यम वर्गाने आपल्याकडून आपल्यासारख्या किंवा आपल्यापेक्षा गरीब लोकांचा फायदा कसा होईल ते फक्त पाहायचे. रोजच्या जीवनात फक्त हे लक्षात ठेवायचे की आपल्याकडून त्यांचे काही नुकसान तर होत नाही ना?
भाजी घेताना क्षुल्लक घासघीस टाळता येते. सुपर मार्केट मधून भाजी घेताना आपण करतो का अशी घासाघीस? नाही ना! तिथे तर प्रत्येक गोष्ट नगद घ्यावी लागते. मग ह्यांना ५-१० रुपये मिळाले जास्त तर मिळू देत की!
आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की अनेक बिलांवर आपल्यायला तत्पर भरणा सवलत (Prompt Payment Discount) मिळते ते? १००० रुपयांच्या बिलावर साधारण १% म्हणजे १० रुपये सवलत मिळू शकत असेल तर आपण तिला महत्व देत नाही. पण प्रत्येकाचे १० रुपये मिळून त्या कंपानीला किती नफा होत असेल? प्रत्येकाने ते सवलतीचे १० रुपये व स्वत:च्या खिशातले आणि १० रुपये असे २० रुपये सत्कारणी लावले तर फायदा कोणाचा होणार? गरीब जनतेचा आर्थिक व आपला मानसिक!
आपल्याकडे एवढा विचार करायला वेळच नसतो. गृहिणी असू दे अथवा नोकरी करणारी स्त्री… बहुतांशी घरी तिचा दिवस आज बनवायच्या डब्या पासून सुरु होउन उद्या डब्यात काय ह्या विचाराने संपत असावा. त्यामुळे समाजाचा उद्धार करायला वेळ कुठून काढणार? पण खरे तर फार काही नाही करायचे. खर्च करताना थोडा विचार करायचा की ह्या पैशाचा फायदा कोणाला होणार आहे? गरिबाला होणार असेल तर सढळ हस्ते खर्च करयचा. श्रीमंत आणि थोडे गब्बर होणार असतील तर आपला हात थोडा आखडता घ्यायचा.
आहे की नाही सहज जमेल असे?
दुसरा लेख - 'सह'
‘सह’ – किती सुंदर शब्द! सतत सोबत करणारा – एकांतात अथवा गोंगाटात!
सहचर, सहचारी, सहचारिणी, सहकारी, सहवास असे अनेक शब्द ही जाणीव सर्वार्थाने करून देणारे.
असाच एक शब्द ‘सहवेदना’ अथवा ‘सहअनुभूती’ ज्याला आपण इंग्रजी मध्ये empathy असे म्हणतो.
अंह! सहानुभूती ज्याला आपण इंग्रजी मध्ये sympathy म्हणतो ती नाही.
सहवेदना अथवा सहअनुभूती म्हणजे इतरांची भावना अथवा वेदना कळणे.
आता दुष्काळ पडला आहे. त्याबद्दल सहानुभूती सगळ्यांना असेल. शंकाच नाही. पण सहअनुभूती आहे का?
जर आहे तर मग ती वागण्यातून दिसत का नाही? आपल्याकडे सर्रास पाण्याचा अपव्यय का होत असतो?
रोजच्या रोज बादलीभर पाण्याने गाड्या धुतल्या जातात. अरे इथे एक कळशी पाण्यासाठी वणवण करावी लागते तिथे तुम्ही अनेक कळशा अश्याच साफसफाईच्या नावाखाली वाया जाऊ देता? घर, अंगण साफ करताना पाणी जपून वापराल तर तुमची जाणीव, कळकळ दिसून येईल. त्यांची वेदना जोपर्यंत तुम्हाला जाणवणार नाही तोपर्यंत हा अपव्यय अटळ आणि क्लेशदायी आहे.
बागेतील/कुंडीतील झाडांना/रोपांना आवश्यकतेनुसार पाणी द्या. उगीच त्यांना न्हाऊ घालून कुडकुडायला लावू नका. दिवसातून अनेक वेळा अशा लोकांची आठवण काढा ज्यांना अतिशय कंमी पाणी मिळतंय किंवा ज्यांचे पाण्यासाठी खूप हाल होत आहेत आणि मग जर तुमचे वागणे बदलले तर तुम्हाला खऱ्या अर्थी ‘सहअनुभूती’चा साक्षात्कार झाला म्हणायचे.
‘सह’ चा खरा अर्थ समजून घ्या, त्याप्रमाणे कृती करा आणि ‘सहकार्य’ करा ही विनंती!
-उल्का कडले
प्रतिक्रिया
6 May 2016 - 5:38 pm | मराठी कथालेखक
पहिल्या लेखाबद्दल :
लेख लिहण्यामागचा तुमचा हेतू चांगला आहे. पण तुम्ही समजता तितके हे साधे सोपे नाही.
माझा अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास नाही, पण MBA मध्ये तोंड ओळख झालेली आहे. हा खरेच खूप रंजक विषय आहे, मी सुचवेन की तुम्ही विषयाचा अधिक अभ्यास करा त्याशिवाय तुम्हाला उत्तरे सापडणार नाहीत.
समाज आणि समाजातील बाजार (की समाज हाच एक बाजार आहे ? असो) हा अर्थशास्त्राच्या नियमांनि चालतो. त्यात कृत्रिम बदल घडवणे कठीण आहे. आणि एका बदलाचे अनेक परिणाम होतात (cascaded effects ला नक्की प्रतिशब्द काय ?). यात खूप गुंतागुंत आहे.
ग्राहक घासाघीस करुन स्वस्तात वस्तू मिळवायला बघणार हे नैसर्गिक आहे. सुपरमार्केट मध्ये घासाघीस होत नाही हे खरे पण तिथे एखादी वस्तू महाग वाटली तर आपण घेतच नाही (म्हणजे गरज पुढे ढकलता आली तर). मग पुढे काही दिवसांनी तीच वस्तू मोठ्या सवलतीसह तिथे विकली जाते.
कल्पना करा की तुम्ही एका मोठ्या सोसायटीत (३००-४०० फ्लॅटची सोसायटी गृहीत धरु) ह्या विषयावर प्रबोधन केलेत. सोसायटितले बहूतेक सगळ्यांची अर्थिक स्थिती चांगली आहे, ते सोसायटीच्या समोर एक भाजीवाला आहे सगळे लोक तिथून भाजी घेतात.
मग तिथल्या अनेकांनी घासाघीस न करता भाजी घ्यायची (सामाजिक बांधिलकीतून) असे ठरवले तर १०० रु ची भाजी पुढच्या महिन्यात नक्कीच ११० रु मोजावे लागेल. आणखी एक-दोन महिन्यांनी १२५ ...आणि असेच पुढे वाढतील. यातून भाजीवाल्याचा फायदा होईल पण शेजारीच एखादी छोटीशी गरीब वस्ती असेल जे पुर्वी ह्या भाजीवाल्यांकडून भाजी घ्यायचे त्यांना आता ही भाजी महाग वाटू लागेल, म्हणजे गरींबाचे नुकसान झाले.
आता याचे अजूनही काही परिणाम होवू शकतील. हा भाजीवाला अधिक श्रीमंत होवू लागला की त्याची कुणकुण थोड्या जवळपासच्या भाजीवाल्यांनाही लागेल मग ते पण त्यांच्या परिसरात वाढिव भावात भाजी विकायचा प्रयत्न करतील, मात्र तेथील लोकांचे अजून प्रबोधन झाले नाही असे गृहित धरु. मग कंटाळून ते पहिल्या सोसायटीच्या जवळपास भाजी विकायचा प्रयत्न करतील. पण इथे एक भाजीवाला आधीच स्थिरावला आहे म्हणून गिर्हाईकांना आकर्षित करण्यासाठी पहिल्या भाजीवाल्यापेक्षा किंचित कमी भावात भाजी विकतील (पहिल्याचा भाव १२५ , दुसर्याचा ११० असे मानू). इकडे पुर्वी भाजीवाल्याने १०० ला सांगितलेली भाजी घासाघीस करुन ९०-९५ ला घेणारे ग्राहक आता १२५ च्या भावामुळे वैतागलेले आहेत पण घासाघीसची सवयही तुटली आहे अशात दुसरा भाजीवाला ११० ला भाजी देत आहे तर त्याच्याकडे जातील. पुन्हा पहिल्याचा धंदा कमी होवू लागेल आणि धंदा वाढवण्याकरिता त्याला पुन्हा भाव उतरवून १०० पर्यंत आणावे लागतील. दरम्यानच्या काळात 'भाजीच्या धंद्यात खूप पैसा आहे' अस दिसू लागल्याने आणखी नव्याने (म्हणजे स्थलांतरित नव्हे) काही भाजीवाले धंद्यात उतरतील. पण वाढलेल्या स्पर्धेमुळे मग गिर्हाईक मिळवण्यासाठी पुन्हा सगळ्यांना भाव कमी करावे लागतील (price war)
या व्यतिरिक्तही अनेक परिणाम होवू शकतात (उदा: दुसरा कोणता तरी कमी नफ्याचा धंदा सोडून लोक भाजीविक्रीकडे वळलेत तर त्या धंद्यातली स्पर्धा कमी होवून त्यांचे दर वाढतील)
हे असे आणि अगदी असेच होईल असे मी म्हणत नाही पण साधारणपणे बाजार कसे चालते हे दाखवायचा मी प्रयत्न केला. यात अनेक त्रुटी असतीलच. धागा चांगला आहे या निमित्ताने काही तज्ञ मंडळी चर्चेसाठी पुढे आलीत तर अर्थशास्त्राच्या ज्ञानात काहीशी भर पडेलच.
धन्यवाद.
6 May 2016 - 6:16 pm | उल्का
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
माझा अर्थशास्त्र अभ्यास शून्य आहे. मी गणित विषयाची विद्यार्थिनी होते.
तुम्ही एक वेगळा पैलू दाखवला ज्याचा विचार मी नव्हता केला.
मागे मी भाजीवालीची मुलाखत लिहिली होती. तिच्याकडे जे इतर लोक अक्षरश: 'काहीही' भाव करतात ते बघून हा भाजीचा मुद्दा लिहिला.
मध्यंतरी fb किंवा whatsapp वर एक विडिओ पण आला होता. खूपच हृदयस्पर्शी होता. मॉल मध्ये भरमसाट खरेदी करून भाजीवल्याला 80 च्या जागी फक्त 50 देते. त्याने आपल्या मुलीला नवीन शाळेची बॅग घेऊन द्यायचे प्रॉमिस केलेले असते. पण ...
आणि हे असे खरेच घडत असते. मी ही बघते. म्हणून मी लिहिले.
रोज सकाळी फिरायला बाहेर पडल्यावर गाड्या धुण्यासाठी आणि इतर साफसफाई साठी पाईप लावून पाणी वाया जाते ते दिसते.
हे अशक्यच आहे पण इथे म्हणूनच शेअर केलं की इतरांचे विचार जाणून घेता येतील. हे काही अभ्यासपूर्वक लिखाण नाही तर रोज एखादी गोष्ट जी खटकते ती दोन्ही लेखात लिहिली आहे.
तज्ज्ञांनी लिहिलं तर खरेच मला आवडेल.
खरे तर मनातले लिहून काढले, इतरांबरोबर चर्चा केली तर मन:शांती मिळतेच आणि कदाचित आपल्या विचाराना वेगळी दिशाही मिळू शकते. :)
6 May 2016 - 7:05 pm | मराठी कथालेखक
तो विडीओ मी पण पाहिला तो उगाच काहीच्याकाही होता. ती बाइ अगदी जबरदस्तीनेच ८० च्या ठिकाणी ५० रुपये त्या भाजीवाल्याच्या हातात टिकवते. असं काही होत नाही. भाजीवाला सरळ म्हणेल "ओ बाई, नका घेवू ..."
दुसरा तुम्ही म्हणता तो मेसेज पण मी वाचलाय अनेकदा की रस्त्यावरचे भाजीवाले (बिच्चारे) पोट भरण्याकरिता धंदा करतात तेव्हा तुम्ही घासाघिस करु नका वगैरे. असं काही नसतं. बाकी आपली गरज बघून भाजीवालेही भारी भाव लावतातच आणि कमवतात (कल्पना करा मुसळधार पाऊस पडतोय घरी गडबड आहे दूर जाणं शक्य नाही, समोरच्या अगदी जवळ अस्णार्या भाजीवाल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, मग भाजीवाला करेल का घासाघीस ?)
अर्थात जेव्हा मी वर म्हंटलं तसं टोकाचं व्याहवारिक आपण नेहमी वागत नाहीच तुम्ही आधी म्हंटलय तस व्यहवारांना थोडी भावूक , हळवी किनार असतेच.
6 May 2016 - 9:46 pm | उल्का
वाट्टेल ते भाव लावले तर ग्राहक नक्कीच घेणार नाहित. तेवढे ते सुज्ञ आहेत. घासाघीस करणार.
मान्य! योग्यच आहे.
पण जेव्हा भाजी घराजवळ मिळायला हवी, ती ताजीही हवी आणि ती मंडईतल्या भावानेदेखील हवी म्हणुन जेव्हा घासाघीस केली जाते तेव्हा मला तरी ती योग्य वाटत नाही.
विडिओ आणि मेसेज हे अतिशयोक्ती वाटत असले तरी त्यात तथ्यान्श आहे हे नक्की. आपण जरी असे वागत नसलो तरी जे काहीजण वागतात तेही सन्ख्येने कमी नसतात असे मला वाटते. :)
6 May 2016 - 9:52 pm | पैसा
छान लिहिलंय. पण दोन लेख एकत्र कशाला? दोन्हीवर स्वतंत्र चर्चा होउ शकतात.
6 May 2016 - 9:57 pm | उल्का
अगं छोटे छोटे होते म्हणुन एकत्र केले.
एक के साथ एक फ्री. :)