ते दूसऱ्या महायुद्धाचे दिवस होते.आपला देश पण त्याने पोळून गेला होता.खायला अन्न नाही तांदूळ, गहू,साखर, केरोसीन सर्व आवश्यक वस्तू रेशनींगवर मिळायच्या आणि जादा हवा असल्यास काळ्या बाजारात मिळायचं.त्याला "ब्लॅक" मधे म्हणण्याचा जास्त प्रघात होता.
वेगुर्ला मार्केटच्या समोर एक किराण्या मालाचं दुकान होतं.वखार वजा किराण्या मालाचं ते दुकान होतं.त्या दुकानाच्या मालकाचं नाव होतं दादा कुळकर.आपण त्याना दादा म्हणुया.
दादा एक ठुसक्या उंचीची, काळी कुट्ट रंगाची, बेळगावला अशा वर्णनाच्याव्यक्तीला"वड्डर" म्हणून संभोधतील,अशी, आणि कर्कश आवाजाची व्यक्ती होती.
दुकानाच्या गल्ल्यावर बसल्यावर पैशाच्या पेटीतल्या मोडीला मुठीत घेऊन त्या भांड्यात वाळू सोडतात तशी सोडून आवाज करीत रहाण्याची त्यांना संवय होती.
कदाचीत त्यांचा तो नादच होता.आलेल्या गिऱ्हाईकाला आगदी आदराने संभोधून
"काय होयां तुमका?"
म्हणून नेहमीचा प्रश्न विचारून चौकशी करायचे.
दादांना जरा कमी ऐकायला येतं असा इतरांचा (गैर) समज होता.आणि खरंच दादा सुद्धा मुद्दाम, का कुणास ठाऊक, एकदा सांगितल्यावर पुन्हा रिपीट करायला लावायचे.दादांच्या ह्या दुर्गुणाचा (का गुणाचा) त्यांना पुढे कसा फायदा होत असे ते ओघानेच येणार आहे.
ब्लॅक मधे वस्तू विकण्यात दादांचा हातखंडा.पण ह्या कानाचं त्या कानाला सुद्धा कुणाला माहीत नसायचं. त्यावेळी केरोसीनची फार चणचण असायची.घरो घरी वीज नसल्याने कमीत कमी रात्री घरात दिवे लावण्यासाठी त्याची फार जरुरी भासायची. आणि त्यामुळे चणचण भासणं स्वाभावीकच होतं.केरोसीनला पुर्वी तिकडे घासलेट (ग्यासोलीनचा अपभ्रंश असावा)म्हणायचे काही घास्त्याल पण म्हणायचे. तांबड्या रंगाचे घासलेट आणखी स्वस्त असायचं. रेशनिंगवर घरामागे आठवड्याला एक बाटली मिळायचं. पुरत नाही म्हणून, त्या दिवसात लोक रात्रीची जेवणं आटोपून लवकर झोपायचे.
अशा परिस्थीत ह्या वस्तूचा काळा बाजार न होणं नवलच.दादाना हा मोका बरा साधला होता.
एरव्ही कमी ऐकू येणाऱ्या दादांना मोठ्याने बोललेलं ऐकू येत नसताना
"दादा घास्त्याल आसां?"
असं अगदी हळू आवाजात कानाकडे येऊन बोलल्यावर
ऐकू यायचं.
"किती बाटल्यो होयोत?"
म्हणून पटकन विचारायाचे.आणि सौदा ठरतो असं पहाताच
"रे ह्यांका काय होया तां बघ "
म्हणून खूषीने नोकराला ओरडून सांगायचे.
बाटली मागे डबल पैसे मिळाल्यावर खूष कोण नाही होणार?.
वेंगुर्ल्याच्या कॅंपात दादाने बंगले वजा एक घर पण बांधलं होतं.होतं म्हणण्याचं कारण नंतर तो बंगला त्यांच्या मुलाला विकावा लागला.
त्याचं असं झालं.दादांच्या पश्चात कारभार त्यांच्या एकुलत्या एक मुलाकडे आला होता.आता गल्ल्यावर तोच बसायचा.वृतीने दादा "सलोमालो"तर त्यांचा मुलगा "तुकारामाचा"अवतार. "ब्लॅक मधे घासलेट विकतो"म्हणून कुणी पोलीसात तक्रार केली आणि बिचाऱ्याच्या दुकानाला कुलपे लागली.चार वर्षे खडी फोडायला गेला म्हणून स्थाईक लोक सांगायचे.दादा कुळकाराचा कॅंपमधला बंगला डॉक्टर तांडेलानी विकत घेतला.तो त्यानी चांगला सजवून पुर्वी पेक्षा जास्त सुशोभीत केला.
मुंबईहून कोणही पाहूणे मंडळी वेंगुर्ल्याला सुट्टीत आली की कॅंपात फिरायला जायची आणि रस्त्यावरून जाताना अनेक बंगले पहाताना ह्या बंगल्याचा इतिहास स्थाईक लोक न चुकता सांगायचे
"दादा कुळकाराचो हो बंगलो.तांबडा घासलेट विकून ब्लॅक मधे पैसो कमवून दादान हो बंगलो बांधलो.मुलाक तां काम जमला नाय.तो गेलो शेवटी तुरगांत खडी फोडूक, आणि डॉ.तांडेलान बंगलो विकत घेतलो.शेवटी काय?
"हपापाचो माल गपापा."
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
20 Sep 2008 - 7:57 am | प्रकाश घाटपांडे
आमच्या शेजारी वाण्याचे दुकान होते. झुंबर व दीपा अशा बंधुंच्या या दुकानात घासलेट आल्यावर पिपातुन डब्यात घेतान नळीने शोषुन डब्यात सोडण्याचा कार्यक्रम मला पाहायला फार आवडे. मला ती जादुच वाटे.
प्रकाश घाटपांडे