जालावर पंढरपूरच्या पांडुरंगाची माहिती शोधत असताना एक इंटरेस्टिंग लेख सापडला.
लेख संजय सोनावणी यांचा आहे,खाली त्यांची लिंक देतोय,
http://m.maharashtratimes.com//articleshow/9165085.cms
लिंक उघडायचा टंकाळा आला असेल तर हा घ्या लेख खाली पेस्टवतोय.
>>>
महाराष्ट्राचे आराध्य श्रीविट्ठल हे आजवर रहस्यच बनून गेले होते. विष्णुच्या २४ अवतारांत आणि विष्णु सहसनामांतही न सापडणारा हा एवढे माहात्म्य पावलेला देव कोणता? कोठून आला? पुराणांतरीही त्याचे कोठे चरित्र का येत नाही? असे असंख्य प्रश्न घेऊन संशोधकांनी श्रीविट्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, आणि कदाचित तो त्यामुळेच अयशस्वी ठरला आहे. खरेतर पांडुरंग, पुंडरिक, पंढरपुर आणि पौंड्रिक क्षेत्र या नामांतच श्रीविट्ठलाचे मूळ चरित्र दडलेले आहे, यावर कोणी विचार केला नव्हता. परंतु श्रीविट्ठल म्हणजे अन्य दुसरे कोणी नसून पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजातीलच एक महान शिवभक्त होता व त्यालाच आज आपण पांडुरंग विट्ठल म्हणून पुजतो आहोत. भजतो आहोत.
खरेतर संशोधकांनी पंढरपूरच्या पांडुरंग विट्ठलाचे मूळ शोधायचे असेल तर पांडुरंग, पंढरपुर, पौन्ड्रिक क्षेत्र आणि पुंडरिक या शब्दांवर, त्यांच्या व्युत्पत्तींवर सर्वप्रथम विचार करायला हवा होता. श्रीविट्ठलाची सर्वमान्य उपाधी आहे ती म्हणजे पांडुरंग. पांडुरंग या शब्दाने कर्पुरगौर शिवाचा निदेर्श होत असला तरी, विट्ठल हा गौर नसून काळासावळा आहे, त्यामुळे ही उपाधी का, हे कोडेही संशोधकांना पडले होते. त्याला आता विष्णु वा कृष्णाचे रुप बहाल केले गेले असले तरी, ते त्याच्या मूळच्या शैव रुपाचे वैष्णव उन्नयन आहे, असे मत डॉ. माणिकराव धनपलवार व डॉ. रा.चिं. ढेरे यांनी व्यक्त केलेले आहे. तो गोपवेषातील रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढायला गोपवेषात आलेला कृष्णच आहे, अशी संत-भक्तांची श्रद्धा आहे. ज्या पुंडरिकासाठी म्हणून विट्ठलाचे आगमन झाले अशा कथा स्थलमाहात्म्यात येतात, त्या पुंडरिकाची म्हणून जी समाधी आज आहे, ते प्रत्यक्षात शिवालय आहे, हेही डॉ. ढेरंेनी सिद्ध केले आहे. स्थलपुराणात पंढरपूरचा निदेर्श पौन्ड्रिक क्षेत्र म्हणून येतो. एवढेच नव्हे तर या स्थलपुराणांचे नाव 'पांडुरग माहात्म्य' असे आहे, 'विट्ठल माहात्म्य' नव्हे, हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.
पौंड्रिक क्षेत्र म्हणून पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेले हे स्थान. पुंडरिक हे शिवालय. पांडुरंग ही विट्ठलाची विशेष उपाधी आणि पंढरपूर हे स्थलनाम यावरून मी शोध घेतला असता एक वेगळेच रहस्य उलगडले गेले, आणि ते असंख्य पुराव्यांवरून सिद्धही होते. 'पांडुरंग' ही उपाधी नसून ते श्री विट्ठलाचे कुलनाम आहे आणि हे क्षेत्र त्याच्याच कुळाने स्थापन केले असल्याने त्याला पौंड्रिक क्षेत्र हे नाव लाभले, एवढेच नव्हे तर पंढरपूर या शब्दाची व्युत्पत्ती पंडरंगे वा पांडरंगपल्ली या कानडी नावात शोधण्याची गरज नसून ती 'पौंड्रिक' या शब्दातच दडली आहे.
पुंडरिक हा शब्द पौंड्रिक या शब्दाचे सुलभीकरण आहे हे उघड आहे. त्यामुळे मुळ 'पौंड्र' कोण होते, या प्रश्नाचा शोध घेणे आवश्यक होते. पौंड्र या एकेकाळच्या पशुपालक, शुद समाजाचे मूळ सापडते ते इसवी सन पूर्व आठव्या शतकातील ऐतरेय ब्राह्माण व महाभारतात. विश्वामित्राच्या १०० मुलांपैकी पौंड्र, औंड्र, शबर, मुतीब इ. मुलांनी दक्षिणेत येऊन राज्ये वसवली, असे ऐतरेय ब्राह्माणावरून दिसते. अन्य आख्यायिकेनुसार पौंड्र, औंड्रादि हे बळीराजाचे पुत्र होते व त्यांनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडिसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. हे परंपरेने शुद मानले गेले असून मुळचे पशुपालक होत. पौंड्रांनीही दक्षिण भारतात आपल्या वसाहती केल्या याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत. महाभारत युद्धात पौंड्र हे दुयोर्धनाच्या बाजूने लढले होते.
पंढरपूर हे पौंड्रपूरचे सुलभीकरण आहे हे तर स्पष्टच आहे. दक्षिणेतील तिरुवारुर, चिदंबरम या शहरांची पर्यायनामे पुंड्रपूर अशी आहेत. बंगालमधील पौंड्रांनी पुंड्रपूर येथून राज्यकारभार चालवला होता, असे ह्यु-एन-त्संगने नांेदवून ठेवले आहे व महास्थानगढ येथे या नगराचे अवशेषही आता सापडले आहेत. महाभारतात विदर्भाबरोबरच पांडुराष्ट्राचाही उल्लेख आहे. हे पांडुराष्ट्र पौंड्रांशी निगडित असणार. पौंड्र समाजाने सर्वप्रथम दक्षिण भारतात वसाहती केल्या हे यावरून सिद्ध होते आणि हा काळ औंड्रांच्या (आंध्र सातवाहनांच्याही) पूवीर्चा, म्हणजे किमान इसवी सन पूर्व पाचव्या शतकापूवीर्चा असावा. म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपूर (मूळ पौंड्रपूर) ही प्राचीन काळातील पौंड्रांची राजधानी होती, हे यावरून स्पष्ट होईल व या क्षेत्राला पौंड्रिक क्षेत्र का म्हटले गेले असावे, हे सहज लक्षात येईल. पौंड्रांच्या स्वामित्वाखालील प्रदेश ते पौंड्रिक क्षेत्र आणि ही पुरातन आठवण स्थलमाहात्म्यांनी स्पष्टपणे जपलेली आहे.
श्रीविट्ठलाची विशेष उपाधी आहे, पांडुरंग. या शब्दाने विद्वानांना चकवा दिला होता. पांडुरंग हे नाव मुळात विट्ठलाची शिव-निदर्शक उपाधी आहे, असाच समज जोपासला गेला असला तरी ते तसे नसून ते त्याचे कुळनाम आहे, हे आता स्पष्ट आहे. महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणून राजा होता. तो 'पौंड्रक वासुदेव' या नावाने ओळखला जात होता. तो कृष्णाचा प्रतिस्पधीर् असून त्याला पुढे कृष्णाने ठार मारले. म्हणजे पौंड्रवंशीय राजे स्वत:ला 'पौंड्रक' अशी उपाधी लावत होते, हे यावरून स्पष्ट होते. 'पौंड्रक' या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे 'पांडुरंग' होय. 'पौंड्रक' विट्ठलाचेच पुढे 'पांडुरंग विट्ठल' असे सुलभ रूप बनले, कारण तोही पौंड्रवंशीय होता.
याचा साधा सरळ अर्थ असा की पौंड्र समाजातील जे पशुपालक, धनगर, कुरुब होते त्या समाजातील विट्ठलनामक आद्य वसाहतकार वा सम्राटाची पशुपालक वेशातील ही मूतीर् आहे. तो स्वत: विष्णुही नाही की कृष्णही नाही, पण त्याचे हे गोपध्यान पाहून यादवकाळात विट्ठलाचे वैष्णवीकरण करताना त्याचे गोपवेषधारी कृष्णाशी तादात्म्य साधले गेले, असे स्पष्ट होते. (प्रत्यक्षात पौंड्रवंशीयांचे कृष्णाच्या यदूवंशाशी हाडवैर होते. महाभारत युद्धात पौंड्र हे दुयोर्धनाच्या बाजूने लढले हे वर लिहिलेच आहे.) मूळच्या अवैदिक देवतास्वरूप मानल्या गेलेल्या शुदवंशीयांचे हे वैदिकीकरण अक्षरश: स्तिमित करणारे आहे. असे असले तरी पांडुरंगाचे मूळ अवैदिक स्वरूप त्यांना बदलता आले नाही, म्हणून आपण आज सत्यापर्यंत पोहोचू तरी शकतो.
पौंड्र, औंड्रादि मंडळी शिवभक्त होती. आंध्रात असंख्य शिवमंदिरे आहेतच. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही, कारण येथील मूळ वसाहतकार पौंड्रच होते. पौंड्र राजांनी आपली राजधानी पंढरपुर (पौंड्रपुर) येथे शिवालय स्थापन करणे स्वाभाविकच होते. या मंदिराला पुंड्रिकेश/ पुंडरिक असे संबोधले जाते. पौंड्रांचे जे आराध्य तो पुंड्रिकेश/पौंड्रिकेश म्हणूनच संबोधला जाणार हे उघड आहे, आणि तो तसा संबोधला गेलेलाही आहे. भक्त पुंडरिकाची कथा कोणाही विद्वानाने मान्य केलेली नाही. विट्ठलाच्या पंढरपुरातील प्रकटीकरणाच्या ज्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात, त्या एकमेकांशी विसंगत आहेत. त्र्यंबकेश्वरचे लघुरुप त्र्यंबक जसे होते, तसेच पौंड्रिकेशाचे संक्षिप्तीकरण पुंडरिक झाले हे स्पष्ट आहे. ते नाम कधीही 'विट्ठलेश्वर' नव्हते, याचा दुसरा अर्थ असा की तो शिव केवळ विट्ठल या व्यक्तीचा इष्ट देव नव्हता तर त्याच्या संपूर्ण पौंड्र समाजाचा अधिदेव होता. स्वत: श्रीविट्ठलही अनन्य शिवभक्त असून त्याच्या माथ्यावर शिवलिंग आहे अशी संतांची श्रद्धा आहे, हेही येथे उल्लेखनीय आहे.
विट्ठल या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांनी अनेक तर्क केले आहेत. बिट्टीदेव या राजाच्या नावापासून वा इटल-ब्रमल या जोडदेवतांतून इटल-विट्ठल नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पण आठव्या शतकातील राष्ट्रकुट राजांच्या कारकिदीर्त पंढरपूरच्या एका 'जयद्विठ्ठ' नामक ब्राह्माणाला जमीन दान केल्याचा ताम्रपट उपलब्ध आहे. म्हणजे तोवर विट्ठ-विट्ठल हे सामान्य नाम बनावे एवढी त्या नामाची प्रसिद्धी आठव्या शतकापर्यंत झालेलीच होती. म्हणजे विट्ठल हा त्याहीपेक्षा पुरातन असून दैवतप्रतिष्ठा प्राप्त करून बसला होता. इटल-ब्रमल हे नंतर कधीतरी त्याच पशुपालक समुदायातून आलेले वीरदेव असावेत. पंढरपुरच्या विट्ठलाशी त्यांचा संबंध दिसत नाही, कारण तो पुरातन आहे. विट्ठलमूतीर् अनादि आहे, अशी संतांची श्रद्धा आहे, आणि ही पुराणता पाहता ती योग्यही आहे. विट्ठल नावाची व्युत्पत्ती अन्यत्र शोधण्यापेक्षा ते आहे तसेच व्यक्तिनाम म्हणून स्वीकारावे लागते. (हे नाव विष्णुच्या २४ अवतारांतही नाही वा विष्णु सहसनामांतही नाही, हेही लक्षात घ्यावे लागते. किंबहुना अन्यत्र कोठेही हे नाव सापडत नाही. पण जेथे जेथे पौंड्रांच्या राजधान्या होत्या, तेथे मात्र विट्ठलाच्या मूर्ती मिळालेल्या आहेत. यावरून विट्ठल या पुराणपुरुषाची महत्ता सिद्ध होते.)
थोडक्यात पौंड्र या महाराष्ट्रातील आद्य पशुपालक समाजाने जी राजधानी केली ती पौंड्रपूर तथा आजचे पंढरपूर. या पौंड्रांचा, जे वर्णव्यवस्थेत पुराणांतरीही शुद मानले गेले, त्या पशुपालक/धनगर/कुरुबांचा सम्राट वा कोणी महान शिवभक्त विट्ठल हा पौंड्रंक (पांडुरंग) विट्ठल. या पौंड्रांचे आराध्य शिवाचे मंदिर ते पौंड्रिकेश तथा पुंडरिक. त्यामुळे पुंडरिक हे शिवालयच पंढरपुरचे मुख्य स्थान असून ११व्या शतकापर्यंत उघड्यावर असलेली विट्ठलाची मूर्ती हे दुय्यम स्थान होते, हे आता लक्षात येईल. शके ११११च्या लेखात विट्ठलदेव नायक या देवगिरीच्या पंढरपूरच्या सामंताने तेथे लहानसे मंदिर बांधले, असे नांेदले आहे. पुंडरिकेश शिवाचे मंदिर त्यापेक्षा पुरातन आहे हे स्पष्ट आहे. आपल्या विस्मृतीत गेलेल्या महानायकाची पूजा तत्पूवीर्ही उघड्यावर होतच होती. त्याच्या मूतीर्साठी मंदिर बनवणारासुद्धा विट्ठलदेवच होता, हेही येथे उल्लेखनीय आहे. दिवंगत महापुरुषांच्या मूर्ती/प्रतिमा बनवण्याची प्रथा औंड्र सातवाहनांनीही पाळली असे दिसते. (नाणेघाटचे प्रतिमागृह.)
थोडक्यात विट्ठलाला वैष्णव मानणे व विट्ठलाला विष्णु-कृष्णरूप मानणे हे अनैतिहासिक आहे, हे यावरून सिद्ध होते. तो पशुपालक समाजाचा पौंड्रवंशीय श्रेष्ठ पुरुष होता आणि महान शिवभक्त होता, हेच काय ते सत्य आहे. परंतु विट्ठलाचे वैदिकीकरण-वैष्णवीकरण करण्याच्या नादात ज्या भाकडकथा निर्माण केल्या गेल्या, त्यामुळे मूळ सत्यावर जळमट पडले होते. पण आता तरी नव्या दृष्टिकानातून त्याकडे पाहावे.
(संजय सोनवणी हे 'विट्ठलाचा नवा शोध' या पुस्तकाचे लेखक आहेत.)
माझी शंका--(मग मला असा प्रश्न पडला आहे,कि संतांनी त्याची कृष्ण म्हणून का भक्ती केली असेल? "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म" असे का म्हटले असेल? संत तर त्रिकालदर्शी असतात तर त्यांना ही गोष्ट का कळाली नसेल?)
प्रतिक्रिया
2 May 2016 - 4:50 pm | mugdhagode
संजय सोनवणींच्या असुरवेद पुस्तकात याचा उल्लेख आहे.
संदर्भ
असुरवेद
हिंदु धर्माचे शैव रहस्य
2 May 2016 - 6:24 pm | चेक आणि मेट
वाचून डोक्याला शाॅटच बसला,लाखो लोक किती भक्तीभावाने पताका नाचवत जातात,
सोनावणींना काही त्यांची फिकिर नाय,डायरेक्ट वस्त्रहरणच करतात.
2 May 2016 - 6:46 pm | कंजूस
"पांडुरंग या शब्दाने कर्पुरगौर शिवाचा निदेर्श होत असला तरी, विट्ठल हा गौर नसून काळासावळा आहे, त्यामुळे ही उपाधी का, हे कोडेही संशोधकांना पडले होते. त्याला आता विष्णु वा कृष्णाचे रुप बहाल केले गेले असले तरी, ते त्याच्या मूळच्या शैव रुपाचे वैष्णव उन्नयन आहे, असे मत डॉ. माणिकराव धनपलवार व डॉ. रा.चिं. ढेरे यांनी व्यक्त केलेले आहे. तो गोपवेषातील रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढायला गोपवेषात आलेला कृष्णच आहे, अशी संत-भक्तांची श्रद्धा आहे. ज्या पुंडरिकासाठी म्हणून विट्ठलाचे आगमन झाले अशा कथा स्थलमाहात्म्यात येतात, त्या पुंडरिकाची म्हणून जी समाधी आज आहे, ते प्रत्यक्षात शिवालय आहे, हेही डॉ. ढेरंेनी सिद्ध केले आहे."
कर्पुरगौर का हा प्रश्न केला आहे आणि देऊळ शिवाचे आहे हे सिद्ध केले आहे.बाकी सर्व मूर्ती लक्षणे कृष्णाच्या गोपालक काळातील आहेत.ती कापडी कानटोपी मुद्दामहून कोरली आहे.
संजय सोनवणींनी संकलन करून ब्लॅागवर टाकले आहे त्यात सिद्धता नाहीये.तसं पाहिलंतर तिरुपती बालाजी अथवा वैष्णवांच्या कपाळावर असलेल्या भस्याच्या ( गंधाच्या ) तीन रेघा शंकराचा त्रिशूळच दाखवतात.
2 May 2016 - 6:48 pm | प्रचेतस
सोनवणींचे बरेच मुद्दे हुकलेले आहेत.
2 May 2016 - 8:00 pm | विजय पुरोहित
+111 कंजूसकाका...
2 May 2016 - 9:20 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
शैव आणि वैष्णव यांमध्ये पूर्वी कलह होता हे आपण वाचलेच असेल,
शैव भस्म कपाळावर आडवे लावतात आणि वैष्णव उभे लावतात,वैष्णवांनी आपले वेगळेपण जपण्यासाठी तसे केले असावे,या भिन्नतेमधून हे लक्षात येईल कि पूर्वी शैव आणि वैष्णवांमध्ये वैमनस्य असावे.
शैव धर्म हा वैष्णव धर्मापेक्षा प्राचीन आहे.पुढे शंकराचार्यांनी सगळं काॅकटेल बनवून टाकून हिंदू धर्म तयार केला.
2 May 2016 - 9:22 pm | विजय पुरोहित
कैतरीच! हिंदु धर्म हा पहिल्यापासूनच बहुदेवतावादी आहे. आणि त्यात पण त्याला एकता गवसलेली आहे. शंकराचार्यांनी काही विशेष नाही केलं.
2 May 2016 - 9:31 pm | विजय पुरोहित
संत तर त्रिकालदर्शी असतात तर त्यांना ही गोष्ट का कळाली नसेल? संतांच्या काय लक्षात आलं नाही हा भाग वेगळा. विठ्ठलाचे कूळमूळ कुठले हा ही भाग वेगळा. या सर्वांत समन्वय साधणेच त्यांना महत्वाचे होते. ते त्यांनी केले. बरं समजा हे जरी खरं मानलं की विठ्ठल ही अवैदिक देवता आहे तरी काय फरक पडतो? अनेक वारकरी संतांनी त्याची उपासना केली आणि त्यांना त्याचे अनुभव चांगलेच आले. अशा वेळीस नको ते मुद्दे घेऊन काय फायदा होणार? व्यर्थ काथ्याकूटच!
पांडुरंग म्हणा की विठ्ठल की गोपाळकृष्ण...
परिणाम चांगलेच आल्याचे संतांनी नमूद केलेय...
मग बिघडतंय काय?
आम्ही तरी ज्ञानोबा तुकोबाचेच अनुभव ग्राह्य धरणार!
रा. चिं. ढेरे यांचे नव्हे. :)
2 May 2016 - 9:42 pm | प्रचेतस
सालवण सुरि ११११ सौम्ये दिव| सुक्रे | समस्तचक्रवर्ति | माहाजनिं | देवपरिवारे | मुद्रहस्ते विठलदेउनायके||
एहि अवघावे लान मडु ऐसा | कोठारिं वाढसि जें | जाभाती वीचारी चंद्रु ||
हे कणवई | न ठावें | सप्त मुष्य संप्रति | कवणु अतिसो देई तेआसी वीठलाची आण
ए काज जो फेडि तो धात्रुद्रोही| कर्म |
2 May 2016 - 9:46 pm | माहितगार
प्रचेतसजी, काही तरी विशेष दिसते आहे, सोबतच आजच्या मराठीतला अनुवादसुद्धा द्यावा हि विनंती.
2 May 2016 - 9:47 pm | विजय पुरोहित
वल्ली सर कृपया मराठी भाषांतर द्या. आणि बॅटमॅनला विनंती की ऋग्वेदातील अनेक देवतांच्या एकात्मकतेचा अगदी प्रसिद्ध जो ऋचा आहे तो कृपया नमूद करावा. कृपया विनंती जेणेकरुन हे धर्मच्छेदी कुभांड विलयास जाईल.
हाच प्रसिद्ध ऋचा अगदी नाईक सुद्धा नमूद करतात.
2 May 2016 - 9:59 pm | प्रचेतस
शालिवाहन शक ११११ सौम्य संवत्सरी, शुक्रवारी, समस्तचक्रवर्ति (पाचवा भिल्लम यादव याचे राजवटीत) महाजन (देवभक्तांचा समुदाय), मुद्रहस्ते विठ्ठलदेवनायक ह्या सर्वांनी हे लहान देऊळ स्थापिले. ते कोठारांतून वाढवावे. चंद्र जात विचारतो हे कोणासही ठावे नाही. सांप्रत ह्या देवळाचे मुख्य सात जण आहेत. ह्या देवळास जो कोणी पीडा देईल त्यास विठ्ठलाची आण, हे कार्य जो फ़ेडील(नष्ट करेल) तो धातृद्रोही (ब्रह्मद्रोही,पितृद्रोही)
2 May 2016 - 8:29 pm | सतिश गावडे
या विषयावर डॉ. रा. चिं ढेरेंचं श्रीविठ्ठलः एक महासमन्वय हे सुंदर पुस्तक आहे.
2 May 2016 - 9:39 pm | माहितगार
१)एका ओळीच्या शंकेसाठी आख्खा लेख कॉपीपेस्ट मारणे कॉपीराईटचे उल्लंघन तर ठरत नाही ना या बद्दल अल्प साशंक आहे
२)
वारकरी संप्रदायात चमत्कार कथा अस्तीत्वात असल्यातरी धागा लेखक म्हणतो त्या अर्थाने वारकरी संप्रदायातील संत स्वतःस कितपत त्रिकालदर्शी समजत असतील या बद्दल साशंकता वाटते. तरीही वारकरी संप्रदायातील सुरवातीची बरीच संत मंडळी नाथ संप्रदायी असावी त्यांना प्रमूख देवता शिव आहे हे माहित असते तर त्यांनी वैष्णवभक्तीपर रचना रचल्या असत्या का असा प्रश्न कुणास पडत असेल तर शंका रास्त म्हणावी लागेल असे वाटते.
2 May 2016 - 9:53 pm | विजय पुरोहित
वारकरी संप्रदायातील संत स्वतःस कितपत त्रिकालदर्शी समजत असतील या बद्दल साशंकता वाटते. अगदी सहमत. श्रेष्ठ वारकरी संतांनी केवळ माणुसकी आणि समता, बंधुता, स्वातंत्र्य या त्रयीवर भर दिलेला दिसतो. अगदी काल कुठैतरी विषय निघाल्याप्रमाणे संत चोखोबांच्या पत्नीने रचलेला अवघा रंग एक जाला हा अभंग हे सर्वश्रेष्ठ उदा. होय.
2 May 2016 - 10:06 pm | विजय पुरोहित
खामुंपाधुं साहेब... मी स्वतः हिंदु असून येशु ख्रिस्ताला अतिशय प्रिय मानतो. कारण माझा धर्म मला तसेच शिकवतो की सर्व मार्ग एकाच परमेश्वराकडे जातात. जर स्वामी रामकृष्ण परमहंसांचे चरित्र वाचलेत तर लक्षात येईल की त्यांनी अनेक धर्ममतांच्या उपासना केल्या आणि त्यात त्यांना एकसारखाच अनुभव आला.
अहो साहेब! ईश्वर एकच आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा.
शेवटी तो परमप्रिय प्राणवल्लभच भैटतो हे जगभरच्या अनेक संतांनी सांगितलेले आहे. आपण त्यात भेद करणारे कोण?
असो. छान विषय घेतलात सर! त्यानिमित्ताने "एकोऽहम् बहुस्याम्" हे तत्वज्ञान तर मांडता आले.
2 May 2016 - 10:14 pm | माहितगार
संजय सोनवणीं स्वतः या चर्चेस उत्तर देण्याची शक्यता कमी असल्यामुळे टिकेची दिशा ठरवताना जरासे जड जाते, संजय सोनवणी आधी ठरवून ठेवलेल्या मुद्यांच्या संदर्भाने तर्क उभे करण्याचे चांगले प्रयत्न करत असतात बर्याचदा जवळ पोहोचतात पण प्रत्यक्ष निष्कर्ष वर एका प्रतिसादात नमुद केल्या गेल्या प्रमाणे हुकताना दिसतात का अशी शंका येते, असो.
रा.चिं. ढेरेंच्या 'श्री विठ्ठल: एक महासमन्वयची बुकगंगा डॉट कॉमवरील सुरवातीची दोन चार पाने चाळली त्यात त्यांनी संस्कृत आणि इतरही स्रोत ग्रंथ आणि दस्तएवज संदर्भांसाठी अभ्यासले जाणे अद्याप बाकी आहे असे नोंदवले आहे. रा.चिं. ढेरेंनी न वापरलेले संस्कृत संदर्भ ग्रंथांचा आढावा संजय सोनवणी घेत असतील, सोबत शब्द व्युत्पत्तींचा पुन्हा नव्याने विचार करत असतील तर त्यात वावगे नाही, परंतु असे शोध घेणारे पहीले आम्ही आणि अमुक निष्कर्ष काढणारे शेवटचे आम्ही हा संजय सोनवणींचा थाट अथवा पुर्वनिश्चित निष्कर्षाच्या आग्रहातून येत आहे का ?
स्थलनामां विषयी लेखात सोनवणी चर्चा करताना दिसतात पण एखाद-दोन स्थळाचाच विचार करून लगेच निष्कर्षावरही पोहोचतात. पंढरपूर हे दक्षीणेत अगदी अल्प प्रमाणात दिसणारे स्थलनाम नाही, सेन्सस ऑफ इंडीयाचा आधार घेऊन नामसाधर्म्य असलेली नावे शोधण्याच्या प्रयत्नाची मिपावर आपण या धाग्यातून नोंद पुर्वी घेतली आहे.
१) वस्तुतः विदर्भ आणि तेलंगाणात पांढर/पंढर या नावाशी साधर्म्य देणारी स्थळे इतरत्रपेक्षा अधिक आहेत.
२) त्या धागा चर्चेतील राहींचा प्रतिसाद अभ्यासल्यास, पांढर/पंढरपूर हा शब्द पांढर म्हणजे मानवी वस्तीसाठी वापरल्या जाणार्या नापिक जमिनीवरुन सुद्धा आले असू शकते. याचा अर्थ पुंडरीक आणि पंढरपूर या दोन्ही विशेषनामांचा (व्युत्पत्ती) प्रवास स्वतंत्रपणे झालेला असू शकतो. म्हणजे पुंडरीक आणि पंढरपूर हि नावे एकाच संदर्भात येण हा निव्वळ योगायोग असण्याची शक्यता असू शकते, तसे झाले तर आधी पुंडरीक आणि त्यावरून पंढरपूर हे गणित सपशेल चूकीच ठरू शकते.
2 May 2016 - 10:20 pm | प्रचेतस
शिवाय त्यांनी सातवाहनांना औंड्र ठरवले आहे जे हास्यास्पद आहे.
2 May 2016 - 11:00 pm | माहितगार
;) ते खोदकाम बरेच करतात अंतीम निष्कर्षांसाठी जराशी घाई करतात असे नेहमी वाटते. ते संदर्भ देत असलेला बांग्लादेशातील महास्थानगढच्या Pundravardhana चा संदर्भ रोचक आहे. Pundravardhana या इंग्रजी विकिपीडियावरील लेखात अशोकवदना या ग्रंथाचा हवाला देऊन बंगालातील पुंड्रवर्धनातील 'अजिवक' संप्रदायींचा अशोकाने वंश संहार घडवल्याचे म्हटले आहे, अशा वंशसंहारामुळे पुंड्रवर्धनातील आजीवक मंडळी तेथून पळून तेलंगाणा आणि विदर्भात आली आणि पंढरपूर नावाने गावे वसवली असे असू शकेल का ही एक अधिकची शक्यता वाटली, सोनवणी म्हणतात तसे महाभारतापासून पौंड्रांचे सावकाश स्थलांतर झाले असते तर नामसाधर्म्य सांगणारी स्थलनामे आणि विठ्ठल/पांडूरंग या देवता बंगाल ते विदर्भाच्या मध्ये येणार्या ओरीसातही दिसावयास हव्यात तसे बहुधा होत नसावे. पण वंशसहांरामुळे पळालेली मंडळी मध्ये काही भाग सोडून दूरवर जाऊन रहातील हे अधिक शक्य वाटते. आजिवक मंडळी मुर्तीपुजक नव्हती आणि त्यांनी मुर्तीपुजेचे महत्व कमी ठेवणारी पांडूरंगाची कथा रचली असेल आणि पंढरपुरच्या मुलस्थानात मंदीर बांधले जाताना वीटेपलिकडे काहीच नसेल हे शक्य असू शकते. अजिवीकांची श्रद्धा शिव किंवा वीष्णू या एकात स्थीर नसेल तर नंतरच्या काळातील मंदिर आणि मुर्ती यात शैव आणि वैष्णव दोन्ही लक्षणेही दिसणे शक्य असू शकेल का ?
जस्ट काही वाईल्ड थॉट्स
2 May 2016 - 11:13 pm | प्रचेतस
ह्याबद्दल मला नेमके सांगता येणार नाही. अशोकाने आजीवकांचा संहार केला असेल असे वाटत नाही. हा संप्रदाय बौद्धमताच्या विरोधी होता. अशोकाने बौद्धधर्माची दीक्षा घेतल्यावर/ घेण्यापूर्वी त्याचे मन हिंसेविषयी विरक्त झाले होते. तस्मात् हे संभवत नाही. पुंड्रवर्धनातिल आजीवकांनी पंढरपूर वसवले किंवा येथील लोक हेच पौंड्र असे म्हणणे धाष्ट्र्याचे आहे. त्याकाळातील इथल्या पौंड्रांबद्दलचा कुठलाही शिलालेख उपलब्ध नाही.
2 May 2016 - 10:20 pm | स्पा
सोनावणे हे कलीयुगातले संतच आहेत
2 May 2016 - 10:21 pm | विजय पुरोहित
खिक्क....
2 May 2016 - 10:37 pm | दिग्विजय भोसले
विट्ठल हा कृष्ण नसला तरी काय फरक पडतो?
वारकरी पंथामध्ये सामाजिक भेदभाव नाही,सगळे सारखेच आहेत,अहंकाराचा नाश व्हावा म्हणून चरणस्पर्शाची प्रथा आहे,मग कोणी लहान असो वा मोठा.तसेच पशूहिंसा हि निषिद्ध आहे.या सगळ्या चांगल्याच गोष्टी आहेत ना!
धनगर समाजामध्येसुद्धा विट्ठल बिरदेव ही देवता प्रसिद्ध आहे,ती देवता सुद्धा पशुपालक असावी,कृष्णही पशुपालक होता,पण गावी बिरदेव यात्रेच्या वेळी मटणाचा नैवेद्य वगैरे लागतो या गोष्टी न पटणार्या आहेत.शेवटी कसं आहे
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा,निराकार तो निर्गुण ईश्वर,
प्रतिक म्हणून कोणत्याही देवाच्या मूर्तीची उपासना केली तरी आपल्या भावना या शेवटी निराकारापर्यंत पोहचतात.
[आणि मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे अज्ञानातच सुख असते.]
2 May 2016 - 10:50 pm | विजय पुरोहित
मस्तच रे सायबा!!!
4 May 2016 - 10:16 am | शाम भागवत
हे खरे महत्वाचे.
पण हे कळले तर अनेक शतकी धागे अंतर्धान पावतील.
-))
5 May 2016 - 4:18 am | अर्धवटराव
एखाद्या देवतेची व्युत्पत्ती मानवी संस्कृतीच्या अनुषंगाने शोधणे हि एक ज्ञानशाखा आहे. त्यातुन मानवाच्या आजवरच्या सांस्कृतीक/सामाजीक/जैवीक प्रवासाचा आढावा घेता येतो. त्या शाखेत फिलॉसॉफी अंगाने स्पष्टीकरण शोधल्या जात नाहि. भाषाशास्त्र अभ्यासाच्या दृष्टीने एखाद्या जुन्या काव्यात्/अभंगात 'काय' म्हटलय त्यापेक्षा 'कसं' म्हटलय हेच बघितलं जातं. तसच हे.
2 May 2016 - 10:45 pm | प्रचेतस
बाकी सोनवणींचे विठ्ठल हे शैव रूपाचे वैष्णव उन्नयन आहे हे बरोबरच आहे. मला वाटतं ढेरे ह्यांनी विठ्ठल हा गोपूजकापासून देवतापदास पोहोचला असाच काहीसा निष्कर्ष काढलेला आहे.
2 May 2016 - 11:12 pm | माहितगार
वैष्णव उन्नयन ज्ञानेश्वरांच्या आधीच झालेले असावयास हवे ? शंकराचार्यांकडून असे झाल्याची शक्यता कमी वाटते, वैष्णव भक्ती संप्रदायाच्या अनामिक प्रचारकांकडून असे काहीसे शक्य नसेलच असे नाही. पणतरीही पुजेत लिंगमुर्ती असेल तर ती काढून विठ्ठल मुर्तीची प्रस्थापना अवघड वाटते.
2 May 2016 - 11:25 pm | प्रचेतस
हो नक्कीच. शंकराचार्यांनीच अद्वैत मत मांडून हे भेदाभेद नष्ट करण्याचे प्रयत्न केले हयात वादच नाही. राष्ट्रकूट, चालुक्यांनी शिवाबरोबरच विष्णूमंदिरेही निर्मिली.
तुम्ही उन्नयन विठ्ठलमूर्तीचे म्हणत असाल तर ज्ञानेश्वरांच्या आधीच झालेले असणार. ११११ चा भिल्लमाच्या काळातला लेख व् तदनंतर ११९६ म्हणजे इस १२७४ रोजीचा रामदेवरायाचा चौऱ्याऐंशीचा लेख (हा मंदिराला ८४) वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व मंदिराच्या विस्तारानंतर कोरला गेला. विठ्ठल देव तेव्हा पूर्ण प्रस्थापित झाला होता. ह्यावरून रामदेवराय व महानुभवांमध्ये खटकेही उडायला लागले होते. चक्रधर हे कृष्णाचे अवतार मानले गेल्याने महानुभवियांचा भागवत धर्माला (पर्यायाने) विठ्ठल भक्तीला विरोध होताच.
2 May 2016 - 11:33 pm | माहितगार
असे का व्हावे, सवडीने यावर थोडी अधिक माहिती द्यावी ही विनंती.
2 May 2016 - 11:40 pm | प्रचेतस
हा स्वतंत्र लेखाचाच विषय आहे.
पण महानुभवीय आणि रामदेवरायाचे वैर अगदी पराकोटीला पोहोचले होते. लीळाचरित्रातील कित्येक ओव्या रामदेवरायविरोधी आहेत. त्याच वेळी त्याचा चुलता महादेव यादवाचे कौतुक कलेचे दिसते.
3 May 2016 - 8:45 am | माहितगार
माहितीसाठी धन्यवाद
2 May 2016 - 11:03 pm | चेक आणि मेट
पाली भाषेत पांडुरंग म्हणजे पांढरे कमळ म्हणे??
अंजिठाच्या बौद्ध मुर्तीशी काही साधर्म्य???
ती मुर्ती बुद्धांची आहे असाही एक मतप्रवाह आहे.
2 May 2016 - 11:08 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
माहितगारजी,
मग वैष्णवांनी बुद्धाला विष्णूचा अवतार का घोषित केले?
याचे उत्तर मिळेल का?
2 May 2016 - 11:12 pm | विजय पुरोहित
अहो साहेब. मी तर येशूला पण कृष्णाचा अवतार समजतो! बिघडतं काय सांगा की राव! ईश्वर सर्वांसाठी एकच आहे!!!
3 May 2016 - 2:06 pm | हर_हुन्नरी
पुरोहित साहेब ,
अहो ! हे लोकांच्या कानीकपाळी ओरडून काही होत नाही ! लोकांना खेळ लागतोच ! ईश्वर एक आहे , असं समजून घेऊन शांततेने जगणारी मंडळी बोरिंग असतात, पुन्हा त्यांच्याशी कोणत्याच प्रकारची देवाणघेवाण, चर्चा वगैरे होऊ शकत नाही. उलट सांस्कृतिक , ऐतिहासिक फरक , त्यातल्या खर्या खोट्या गोष्टी , तर्क - प्रती तर्क लढवणे यात वेळ कसा मजेत जातो , आणि खेळायला मिळतं. काय करता !
4 May 2016 - 10:23 am | शाम भागवत
मात्र आपण फक्त खेळतोय हे कध्धी कध्धी विसरायचे नाही हं.
नाहीतर सगळेच मुसळ केरात.
2 May 2016 - 11:27 pm | माहितगार
वीष्णू भक्तांनी केवळ बुद्धाच्याच अवताराबाबत असे केले आहे का ? कदाचित तसे नसावे, त्यांनी जनमानसात पॉपूलर झालेले सहजपणे जमतील त्या सर्वांना अवतारात घेतले, शीव ब्रह्मा या सहज न जमलेल्या देवता को ऑप्ट केल्या गेल्या.
कारण अद्वैत हा सिद्धांत ठरलेला होता, विष्णू ही वेदात कमीत कमी माहिती असलेली तरी वेदात नमुद असण्याचा मान असलेली देवता म्हणून वेदांनाही मान्य असल्याचे सांगता येते त्याच वेळी व्यक्ती प्रामाण्य वाढवून ग्रंथप्रामाण्य कमी करता येते, चातुर्यकथाकारांना दरबारात पोसणे ही राजे लोकांची गरज किंवा आवड असेल पण इतर चातुर्यकथांप्रमाणे काही चातुर्यकथाही वीष्णू सोबत जोडून या ना त्या पद्धतीने सगळ्यांना एकत्र म्हटले तर गोवून/जोडून घेतले म्हटले तर कल्चरल अॅप्रोप्रीएशन केले गेले जसे गुढी सारखी वैदीकपूर्व काठीपूजा परंपरा आपलीच म्हणून सांगितली गेली. वैष्णवी भक्ती चळवळ केवळ अंधश्रद्धा म्हणून आज आपण पहातो पण स्थानिक देवतांना नवसाखातर प्राणि बळी देण्या विरोधात यांनी अगदीच जोरदार प्रबोधन केले असले पाहिजे. मेसाई सारखी देवतेचे वैष्णव काळानंतर महाराष्ट्रात पुजन कमी होत गेलेले दिसते हे संत एकनाथांच्या साहित्याची दखल घेताना दिसून येते.
2 May 2016 - 11:30 pm | माहितगार
कमीत कमी माहिती असलेल्या देवतेला अधिकाधीक गोष्टी जोडणे सोपे झाले असावे ? एनी वे भक्त मंडळी नंतर प्रोमोशन देत गेली म्हणून मूळ देवता चुकते असे होत नसावे. रामाच्या अथवा कृष्णाच्या चुकांची शिक्षा वीष्णूला देणे तार्कीकदृष्ट्या पटत नाही.
3 May 2016 - 7:39 am | कंजूस
पांढरीची टेकाडे याबद्दल "वरदा"( मायबोली ) संशोधन करतातहेत.त्यांचे लेखही आहेत.संशोधक कधी निर्णयावर उगाच उडी मारत नाहीत आणि आपला विषय सोडून एखादा शेरा मारत नाहीत.
संजय सोनावणी लेखन चांगले करतात परंतू कोणत्याही मुद्दयाचा दावा करत नसून एक संकलीत सौम्य मांडणी आहे.त्या संदर्भात ते चूक करत नाहीत.एक ब्लॅागी किर्तनकार म्हणू.
3 May 2016 - 9:44 am | माहितगार
सोनवणींचे बंगालमधील पुंड्रकवर्धनचे संदर्भ रोचक आहेत जे राहींनी मांडलेल्या पांढरी शब्दापासून पंढरपूर या शब्दास अंशतः खोडू शकतात पण सोनवणी असोत अथवा आपले राही पौंड्र>पुंड्रकवर्धन>पंढरपूर किंवा पांढर जमीनीवरील वस्ती म्हणून पंढरपूर हे दोन्हीही केवळ तर्क आहेत. सुस्पष्ट आधार (प्रूफ्स) नव्हेत. एनी वे वरदांच्या संबंधीत लेखनाचे दुवे सवडीने दिल्यास आभारी असेन.
संजय सोनवणींच्या शैव धर्माचे रहस्यची तटस्थ दखल पुर्वी त्यांच्याशी सरळ संपर्क करुन मी इतरत्र स्वतःहून घेतलेली आहे. अर्थात त्यांच्याशी उपलब्ध संपर्क तुटला त्यांच्या माघारी काँमेट करण्यापेक्षा त्यांच्याशी सरळचर्चा करुन शंका उपस्थीत करणे बरे पडते.
माझ्या दृष्टीने हे तार्कीक उणीवयुक्त एकतर्फी प्रमाणपत्र आणि व्यक्ती प्रामाण्य आधारीत वाक्य आहे. संजय सोनावणींचे लेखन निव्वळ ब्लॉगी किर्तनकार म्हणवण्यापेक्षा बर्यापैकी नवे आधार शोधणारे आणि चिकित्सक असते. त्यांची अडचण इतिहास लेखनासाठीच्या चिकित्सेत तटस्थता बाळगता येते अथवा त्यांना स्वतःस तटस्थता बाळगावयाची आहे ह्यास ते स्वतःच अॅग्री होत नसावेत. पशुपालक समाज आणि त्यांचा स्वतंत्र शैव सिद्धांत त्यांचे सॉफ्टकॉर्नर आहेत त्यामुळे निवडक चिकित्सेची छटा/मर्यादा त्यांच्या लेखनास येऊ शकते का अशी शंका वाटते.
त्यांची मांडणी सौम्य असते हे मान्य पण ते आग्रही दावे करत नाहीत असे त्यांच्या लेखनाकडे पाहून वाटत नाही. आक्षेप आग्रही दावे करण्यास नाही आग्रही दावा करण्यासाठी केलेल्या घाईस आहे की ज्या घाईमुळे आणि तटस्थता न बाळगल्यामुळे काही मुद्दे सुटलेले असू शकतात.
म्हणजे काय सोनवणींच्या लेखनाने रहस्याचा अंतीम पर्दाफाश केला म्हणावयाचे ?
त्यांच्या या वाक्याला काही आधार असेल तर किमान या लेखात कुठे दिसतोय असे आढळत नाही.
यासाठी बरेच पुरावे आहेत असे ते म्हणतात किमान या लेखात त्यांनी विश्वासार्ह संदर्भाचा उल्लेख केलेला दिसत नाही. महाभारतात्तील वासूदेव नावाचे विठ्ठल झाले अशी विठ्ठल शब्दाची व्य्त्पत्ती ते मांडत असतील तर ती निष्कर्ष उडी वाटते.
ऐतरेय ब्राह्मणाचा त्यांनी संदर्भ दिला आहे, त्यांचा पशुपालक समाजाप्रती असलेला सॉफ्टकॉर्नर पाहता नेमक्या श्लोकांचा संदर्भ पडताळण्यासाठी उपलब्ध असणे सयुक्तीक असावे.
वर्तमानात्रीय लेखात लेखन सीमा असेल पण चिकित्सक चर्चेसाठी पुरावे नमुद असणे अभिप्रेत असते म्हणूनच म्हटले संजय सोनवणी चर्चेत नसताना टिका करणे प्रशस्त वाटत नाही.
विदर्भ आणि तेलंगाणात पंढरपूर नावाच्या गावांचे प्राबल्य पाहता विचार पटतोय, महाभारताचा आधार घेऊन कयास उभा करणे साशंकीत करणारे वाटते.
पंढरपूर नावाची अनेक गावे आहेत केवळ मंदिर असलेलेच गाव राजधानी असेल हा कयास झाला आधार नव्हे. आणि सोनवणींचा कयास बरोबर असूही शकेल (किंवा नसूही शकेल) निष्कर्षांवर उड्या मारण्याची घाई होते ती इथे.
अशा पद्धतीने आधार ?
शक्य असेल पण संदर्भ नमुद नेमके कुठे कुठे विठ्ठल मुर्ती मिळाल्या ते ससंदर्भ दाखवून द्यावयास नको काय ?
फारतर सोनवणींनी एक पर्यायी सिद्धांत मांडला असे म्हणता येईल. तो अंतीम सिद्धांत म्हणून स्विकारला जावा असे त्यांना शेवटच्या परिच्छेदातून सुचवायचे असल्यास तटस्थपणे पहावयाचे झाल्यास अंतीम सिद्धांत म्हणून स्विकारले जाण्यासाठी अधिक नेमक्या संदर्भांची आणि मांडणीची आवश्यकता असावी किंवा कसे
3 May 2016 - 10:12 am | खालीमुंडी पाताळधुंडी
छान प्रतिसाद!!
कल्पित कथांवर आपण विश्वास ठेवतो त्यासाठी कोणी संदर्भाची मागणी करताना दिसून येत नाही,
सोनावणींचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे असे कोणी म्हणू शकत नाही,पण शंभर टक्के चूक आहे असेही कोणी म्हणू शकत नाही,एक इतिहास संशोधक म्हणून त्यांचं कार्य वाखाणण्याजोगं आहे,पण काहीजण मुद्देसूद प्रतिसाद देण्याऐवजी व्यक्तिगत सोनावणींना टिकेचे लक्ष करतात.
______________________________________
चमत्कारिक कथांवर विश्वास ठेवायला काही हरकत नसावी,पण ज्यास्वरूपात त्या कथा सांगितल्या जातात त्यावर नक्कीच विचार करायला हवा,
उदा - स्वामी समर्थांनी एका भक्ताच्या कोरड्या सुकलेल्या विहिरीतून पाण्याचा पाझर फुटवला अशी कथा आहे,हीच कथा गजानन महाराजांच्या बाबतीत देखील ऐकायला मिळते,तसेच नामदेवांच्या बाबतीतही ऐकायला मिळते पण वेगळ्या स्वरूपात.
तसेच बाल नामदेवांच्या हट्टापायी विठ्ठलाने साक्षात प्रकट होऊन प्रसाद ग्रहण केला अशी कथा आहे,पण आमच्या एका सरांनी हीच कथा सांगितली फक्त विठ्ठलाच्या ऐवजी हनुमानाला कथेत बसवले.
______________________________________
मुद्दा असा आहे कि अशा कथा ऐकतांना कोणी कथाकार/किर्तनकार यांच्याकडे संदर्भ/आधार मागत नाहीत.
3 May 2016 - 2:39 pm | माहितगार
सहमत आहे, माझी सोनवणींशी बरीच मागे झालेली एक फेसबुक चर्चा आठवते, समाजमान्य प्रेरणास्थळांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष जोडून घेण्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रयत्न सर्वच समुह करत असतात, शिवाजी महाराजांसोबतची स्वामीभक्त कुत्र्याची आख्यायिका खरी असो वा खोटी असो त्या आख्यायिकेने कदाचित पशुपालक समुदाय त्या मुख्यप्रेरणेत आपल्या प्रतीकांचा अप्रत्य़क्ष सहभाग असल्याचे अप्रत्यक्ष समाधान मिळवत असतो, शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक खरोखर होते अथवा नव्हते अजुन एक समुदाय प्रतीकांचा अप्रत्य़क्ष सहभाग असल्याचे अप्रत्यक्ष समाधान मिळवतो. एक समुदाय किल्लेदार आमच्या समुदायाचे होते एखादा समुदाय तोफखान्यावर आमच्या लोकांनी जिव दिला अशा विवीध पद्धतीने जोडून घेतो, जो पर्यंत नकारात्मकता नाही तो पर्यंत विवीध पद्धतीने जोडून घेण्यात वावगे नाही, (या मुद्द्यावर माझी आणि सोनवणींची ढोबळ सहमती किमान त्याचर्चेत तरी होती असे आठवते)
विठ्ठलाशी एक समुदाय स्वतःचे नाते अधिकार सांगत असेल तर त्यात संशोधन कललेले असेल तरीही मला वावगे वाटत नाही अर्थात एवढेच खरे इतर शक्यता परस्पर पुसूयात असेही होऊ नये.
आपल्या लेख आणि प्रतिसादांमुळे लिहिण्याची संधी मिळाली त्या बद्दल आभार
4 May 2016 - 10:42 am | शाम भागवत
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ओनामा
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी:१
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: २
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ३
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ४
3 May 2016 - 8:19 am | तर्राट जोकर
बिनकामाची चर्चा...
3 May 2016 - 9:19 am | प्रचेतस
बरं मग?
3 May 2016 - 1:38 pm | तर्राट जोकर
प्रचेतस सर, प्रतिसादांतली माहिती उत्तम असली तरी अभ्यासकांस उपयुक्त. सोनवणींचे मुद्दे व त्यावर चर्चा देवभोळ्यांना बिनकामाची.
3 May 2016 - 1:42 pm | प्रचेतस
हाहा. ते आहेच.
बाकी सर वगैरे काय म्हणता राव. :)
3 May 2016 - 9:48 am | खालीमुंडी पाताळधुंडी
तुमच्याकडूनच शिकलोय=((
3 May 2016 - 9:55 am | नाखु
गाय मारली म्हणून लगेच दुसर्याने........
3 May 2016 - 10:20 am | खालीमुंडी पाताळधुंडी
अपसेट होऊ नका,हेल्दी डिस्कशन होऊ दे,असे धागे बर्याच जणांना जिलब्याटाईप वाटू शकतात.
धर्म आणि अध्यात्म ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत,अध्यात्म हे स्वतः अनुभवायची गोष्ट आहे,यामध्ये मनःशांती आणि अध्यात्मिक उत्कर्ष महत्वाचा असतो,
पण धर्म ही एक वेगळीच गोष्ट आहे यामध्ये बुवा/बाबा,दोरेगंडे,चमत्कारिक कथा या गोष्टींचा भडिमार असतो.
धर्माची चिकित्सा करणे काही पाप नाही,त्यामुळेच तर धर्म सुधारणार आहे.
3 May 2016 - 1:41 pm | तर्राट जोकर
धाग्याबद्दल प्रतिक्रिया नव्हती माझी, विषयाबद्दल होती. हेल्दी डिस्कशन पाहिजेच. बाकी वर चर्चा धर्म, अध्यात्माबद्दल नसुन इतिहासाबद्दल आहे असे वाटले. इथे शंभर-दिडशेवर्ष जुने सत्यनारायणाला हजारो वर्ष जुने म्हणा की खुळ म्हणा, लोक करायचे थोडीच थांबणार आहेत. त्याअर्थाने बिनकामाची म्हटले. गैस नसावा.
3 May 2016 - 9:32 pm | सतिश गावडे
एका लोकदेवतेचं विठ्ठल या "महादेवतेत" हळूहळू रुपांतर होत गेलं हा सिद्धांत जर खरा असेल तर त्यावरून भक्तीची ताकद लक्षात येते.
ज्ञानदेव चरीत्रांमध्ये ज्ञानदेवाच्या वडीलांनी म्हणजेच विठ्ठलपंतांनी पंढरीची वारी केल्याचे उल्लेख येतात. अर्थात हे चरीत्रकार याचा संदर्भ देत नाहीत.
गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना कृष्णनामाची दिक्षा दिली.
आदिनाथ उमा बीज प्रकटिलें | मच्छिंद्रा लाधले सहजस्थिती ||
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली | पूर्ण कृपा केली गयनिनाथा ||
वैराग्ये तापला सप्रेमें निवाला | ठेवा जो लाधला शांतिसुख ||
निर्द्वंद नि:संग विचरता मही | सुखानंद ह्र्दयी स्थिर जाला ||
विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख | देऊनी सम्यक अनन्यता ||
निवृत्ति गयनी कृपा केली असे पूर्ण | कूळ हे पावन कृष्णनामें ||
नाथसंप्रदाय शैवसंप्रदाय. आदिनाथ शिव हा या संप्रदायाचा मुळ पुरुष. गोरक्षाने विभिन्न शैवपंथियांना एकत्र आणून नाथसंप्रदायाला ज्ञानमार्गात परावर्तीत केले. विविध कर्मकांडांना दूर सारुन कुंडलिनीचा अनुभव हे प्रमाण केले. गोरखबाणीत कुठेही अमुक एका देवतेची पुजा करा असे उल्लेख नाहीत. सारा भर सदाचरणावर आहे. त्यामुळे ज्ञानमार्गी शैवपंथिय गुरूने भक्तीमार्गी वैष्णवपंथीय देवतेची दिक्षा देणे हे परंपरेत न बसणारे होते. कदाचित गहिनीनाथांनी काळाची पावले ओळखली असावीत.
हरिविण न दिसे जनवन आम्हा | नित्य हे पोर्णिमा सोळा कळी ||
चंद्रसूर्यरश्मी न देखों तारांगणें | अवघा हरी होणे हेंचि घेवों ||
न देखों हे पृथ्वी आकाश पोकळी | भरलासे गोपाळी दुमदुमीत ||
निवृत्ति निष्काम सर्व आत्माराम | गयनी हें धाम गुरुगम्य ||
अद्वैतवादाचे सार म्हणता येईल असा हा निवृत्तीनाथांचा अभंग. दुसर्या एका अभंगात जनसामान्यांना उपदेश करताना निवृत्तीनाथ म्हणतात,
एक देव आहे हा भाव पैं सोपा | द्वैतरुपें बापा पडसी नरकीं ||
द्वैत सांडी अद्वैत धरी | एक घरोघरीं हरी नांदे ||
सबाह्य कोंदले परिपूर्ण विश्वीं | तोचि अर्जुनासी दॄष्ट जाला ||
गयनि प्रसादें निवृत्ती बोधु | अवघाचि गोविंदु अवघा रुपीं ||
मात्र या अद्वैतींना चराचराला व्यापून उरलेल्या हरीला मुर्त स्वरुप देण्याची गरज भासली असावी. विठ्ठल ही देवता आधीपासूनच वैष्णव देवता मानली जात असावी. त्यामुळे अद्वैतींनी विठ्ठलभक्ती ही चराचराला व्यापून उरलेल्या हरीची भक्ती आहे हे स्विकारणे साहजिक होते.
रुपाचें रुपस विठ्ठलनामवेष | पंढरीनिवास आत्माराम ||
पुंडलिकभाग्य फळलें संपूर्ण | दिननिशी कीर्तन विठ्ठल हरी ||
त्रैलोक्य उद्धरे ऐसी पव्हे त्वरें | कीर्तन निर्धारे तरणोपाय ||
पुण्य केलें चोख तारीले अशेख | जनी वनी एक रुप वसे ||
वेदादिकमति ज्या रुपा गुंतती | तो आणूनि श्रीपति उभा केला ||
निवृत्तीचा सखा विठ्ठलरुप देखा | निरालंब शिखा गगनोदरीं ||
(या अभंगातील काही शब्दांचे अर्थ लागत नाही.)
विठ्ठलाचे महत्व कमी अधिक प्रमाणात निवृत्ती ज्ञानदेवांच्या आधीही असणार. मात्र आजचे विठ्ठलभक्तीचे जे भव्य दिव्य स्वरुप आहे त्याचे श्रेय नि:संशय गहिनी, निवृत्ती आणि ज्ञानदेव या तीन नाथांना जाते.
3 May 2016 - 9:42 pm | विजय पुरोहित
वा वा वा!
सगामाऊली!!!
दंडवत घ्या...
__/\__
तुमचा अभ्यास प्रचंड आहे हो!!!
3 May 2016 - 9:55 pm | प्रचेतस
कुठले अर्थ लागत नाहित?
3 May 2016 - 9:59 pm | सतिश गावडे
पव्हे, अशेख (पापी?), निरालंब (निराधार? मुळ नसलेली?)
3 May 2016 - 10:07 pm | प्रचेतस
पव्हे म्हणजे पाही असा अर्थ वाटतोय. त्रैलोक्याचा त्वरेने उद्धार करणे हे पाही. अशेखचा अर्थ लागत नाही मात्र निरालंब शिखा म्हणजे स्वतंत्र अथवा एकूटवाणे (उठावलेले) शिखा (शिखर)
जसे आकाशात एकूटवाणे शिखर उठावलेले असते त्याप्रमाणे निवृत्तीचा सखा (इतर देवांच्या मांदीयाळीत) विठ्ठलरूप पाहतो.
3 May 2016 - 10:11 pm | सतिश गावडे
अभंगाच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही म्हणत आहात ते अर्थ घेतले तर लागतोय त्या शब्दांचा अर्थ.
3 May 2016 - 10:11 pm | प्रचेतस
:)
3 May 2016 - 10:53 pm | mugdhagode
शेख म्हणजे शेष
अशेख म्हणजे नि:शेष .. संपूर्ण.
आ.न.
शेखचिल्ली
4 May 2016 - 11:22 am | शाम भागवत
हा अर्थ बरोबर वाटतोय.
काही करायचे शिल्लक न रहाणे (म्हणजेच संपूर्ण) याही अर्थाने काहीवेळेस वापरला जातो.
3 May 2016 - 10:13 pm | विजय पुरोहित
__/\__
वल्ली सर!!!
4 May 2016 - 11:16 am | शाम भागवत
पाणपोईला पव्हे असेही म्हणतात.
3 May 2016 - 10:39 pm | कंजूस
मूर्ती लहान पण वाचन महान.
4 May 2016 - 9:45 am | नाखु
गोंदवलेकर महाराजांचे वचन विविधभारतीवर ऐकले ते असे:
चूक असल्यास दुरुस्ती करावी जाणकारांनी, बाकीच्यांनी वस्सकन अंगावर येऊ नये "हे असेच का म्हणून"
विव्धभारतीवाला नाखु
4 May 2016 - 11:31 am | शाम भागवत
शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणालाच जर खतपाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खतपाणी घालावे.
२ मे चे प्रवचन
4 May 2016 - 11:47 am | सतिश गावडे
परमार्थ शब्दात गोंदवलेकर महाराजांना काय अभिप्रेत आहे हे लिहू शकाल का?
परमार्थ म्हणजे देवाधर्माचे करणे असा एक ढोबळ अर्थ मला माहीती आहे. परमार्थ म्हणजे स्वत:ची ओळख पटणे असाही एक अर्थ वाचला आहे. हे अर्थ बरोबर आहेत का?
4 May 2016 - 2:41 pm | शाम भागवत
मी तज्ञ नाही. माझा तेवढा अभ्यास अथवा अनुभवही नाही. फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय इतकेच म्हणता येईल.
त्यामुळे माझी धारणा काय आहे इतकेच मी सांगू शकेन. ते बरोबर आहे असे मला आजतरी वाटतेय. तसेच ते चूकीचे आहे असे इतरांना वाटू शकते हेही मला मान्य आहे.
पिंडी ते ब्रह्मांडी या तत्वानुसार मला जे काय शोधायचे आहे ते माझ्या मधेच आहे. हा शोध विचारांच्या सहाय्याने करून मग त्याचा अनुभव घ्यायचा असा हा मार्ग असल्याचे मला वाटते. यास्तव सर्व महत्व हे प्रथम मनाला द्यायला लागते. त्यामुळे स्वतःच्या मनाचा अभ्यास मला महत्वाचा वाटतो. इतकेच नव्हे तर अथ्यात्म म्हणजे मला मानसशास्त्रच वाटते.
त्यामुळे आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार प्रथम पहावयाचा (मना पासून वेगळे होऊन) मग तो धरायचा (मनन चिंतन) मग तो (अहित कारक असेल तर) थोपवायचा किंवा थोपवूनही परत परत येत असेल तर तो वळवायचा. हा क्रम मला योग्य वाटतोय.
ह्या सगळ्याला "विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला" असे म्हणतात. हे साधण्यासाठी जे काही केले जाते त्याला मी उपासना म्हणतो अन्यथा ती फक्त एक कवायत असते.
आपली प्रगती होत आहे की नाही हे आपले आपण तपासू शकतो. प्रगती होत असल्याचा अनुभव येत असेल तर जग काय म्हणते याकडे आरामात दुर्लक्ष करता येते. मात्र प्रगती या शब्दाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असल्याने प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.
"कृतज्ञता म्हणजे पुण्य व कृतघ्नता म्हणजे पाप" ही माझी पाप पुण्याची व्याख्या असल्याने माझ्यात वाढलेली कृतज्ञता या एका फूटपट्टीवर मी माझी प्रगती मोजतो. ही कृतज्ञता मला नम्रता देते. अहंकारापासून वाचवते. रागापासून निववते. मोहापासून दूर करते असा माझा अनुभव आहे. मुख्य म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो जो वेळोवेळी उपयोगी पडतो. हे सर्व मी मला येणार्या अनुभवाच्या आधारे लिहित असल्याने माझ्याकडे पुरावा देण्यासाठी काहीही नाही.
जरा वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास,
हिपोकॅम्पस मधील माहिती असो किंवा भावना केंद्रामधील धोक्याचे इशारे या सगळ्याला मी चित्त असे म्हणतो. चित्तात माहिती साठवली जात असताना त्यावर मी व माझे याचे संस्करण झाले की चित्तात अशुध्द माहिती साठवली जातेय असे समजून मी त्याला अशुध्द झालेले चित्त समजतो. याउलट ती माहिती साठवली जात असताना मी व माझे हे मावळून फक्त योग्य्/अयोग्य किंवा चूक्/बरोबर (किंवा सोप्या शब्दात जसे आहे तसे) यापध्दतीने माहिती साठवली जात असेल तर त्याला शुध्द चित्त असे मी म्हणतो. थोडक्यात चित्तशुध्दी हा सर्व उपासनेचा प्राण आहे. त्यासाठी आपल्या मनात येणारे विचारांना खूप महत्व आहे असे मला वाटते. असो.
थोडक्यात विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला ही पहिली पायरी असून अजून मी हीच पायरी पक्की करतोय जेणे करून माझ्या चित्तात साठलेली माहिती शुध्द स्वरूपात राहील व आपोआपच बाहेरून येणार्या संवेदनांना प्रतीसाद म्हणून माझ्याकडून होणारे आचार विचार चांगले राहतील.
अजून खूप मोठा पल्ला गाठायचा मला. त्यानंतर पुढील पायरीवर जाणे जमल्यास.....
म्हणजेच विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला ही कला न राहाता तो माझा स्वभाव झाल्यावर मग परमार्थ या विषयावर मला अधिक बोलता येईल. कोणताही अनुभव नसताना ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात या पध्दतीने चर्चा करण्यात खरच मला रस नाहीय्ये.
4 May 2016 - 2:50 pm | सतिश गावडे
हे बरचसं self awareness बद्दल आहे.
4 May 2016 - 3:11 pm | शाम भागवत
तुम्ही याला जे नाव द्याल ते मला मान्य आहे.
4 May 2016 - 4:59 pm | तर्राट जोकर
ओ काका, असं नाइ करायचं. आध्यात्मिक चर्चेत फाऊल आहे हा मिपावर.
4 May 2016 - 5:04 pm | शाम भागवत
:-))
4 May 2016 - 5:14 pm | नीलमोहर
भागवत सर,
तुमचे प्रतिसाद नेहमीच सुंदर असतात, साध्या सरळ शब्दांत बरेच उपयुक्त तत्वज्ञान सांगून जाणारे.
बाकी परमार्थ म्हणजे, एक तर परम अर्थ = सर्वोच्च, परम तत्व आणि दुसरे म्हणजे परोपकार, असे अर्थ होतात ना ?
4 May 2016 - 9:28 pm | शाम भागवत
हे बरोबर आहे.
पण ते परम तत्व जाणल्यावर त्याची परिणीती परोपकारात होते. येथे परोपकार हा परिणामस्वरूप आहे. अशा माणसाचा स्वार्थ शिल्लकच राहिलेला नसल्याने तो जे काही करेल तो परोपकारच होतो.
"जगाच्या कल्याणा संताच्या विभूती" किंवा "आता उरलो परोपकारापुरता" वगैरे ओव्यांचा तोच अर्थ आहे.
4 May 2016 - 10:16 pm | तर्राट जोकर
स्वार्थ-परमार्थ अशी जोडी लावल्याजाते त्यामुळे जरा गोंधळ होत असेल. 'परार्थ' असा काही शब्द आहे काय स्वार्थ च्या विरोधार्थी?
5 May 2016 - 2:45 am | वैभव जाधव
स्वार्थ शब्द उगाच बदनाम झालाय. स्व अर्थ म्हणजे स्वतः चा फायदा बघणं यात चूक ते काय?
आणि स्वतः चा जास्तीत जास्त फायदा काय तर आपण पुन्हा दुःखी न होणं.
कसं? ते पुढच्या भागात! देखते रहीये.... ;)
5 May 2016 - 10:04 am | शाम भागवत
स्वार्थ म्हणजे, "मी म्हणजे देह" ह्या भावावर आरूढ होऊन प्रत्येक गोष्टीचा अर्थ काढण्याची/लावण्याची/जाणण्याची प्रकिया तर सोहं भावावर आरूढ होऊन सर्व जाणण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ. आणि ही प्रक्रिया जे अमलात आणतात किंवा तशा प्रयत्नात असतात ते स्वार्थी अथवा पारमार्थिक. मला समजलेला अर्थ तरी असा आहे.
पण व्यवहारात इतक्या उच्च दर्जाने हे शब्द वापरले जात नाहीत असे वाटते. "स्वतःचा फायदा", ह्या एकमेव निकषावर स्वार्थ अथवा निस्वार्थ हे शब्द वापरले जातात.
परार्थ असा शब्द आहे की नाही मला माहित नाही.
9 May 2016 - 1:31 pm | राही
माझ्या दृष्टीने self awareness हाच कळीचा मुद्दा आहे. आत्मभान हा शब्दही मला आवडतो.
भागवत यांचा प्रतिसाद अतिशय आवडला.
4 May 2016 - 3:10 pm | शाम भागवत
तुम्ही याला जे नाव द्याल ते मला मान्य आहे.
4 May 2016 - 3:17 pm | इस्पिक राजा
सोनवणी हे बहुजनांचे पु ना ओक आहेत काय? काय ते लॉजिक, पंढरपुर -= पोंड्रपुर वगैरे. एकदम ओक स्टाइल. दंडवत घ्यावा
4 May 2016 - 3:37 pm | श्रीगुरुजी
लोकांना पंढरपूर व विठ्ठलाबद्दल संशोधन करायला आवडतंय असं दिसतंय. अनेक वर्षांपूर्वी 'सकाळ'मध्ये एका बाईंनी एक मोठा लेख लिहून विठ्ठल हा शब्द 'बीत अल्ला' व विठ्ठली हा शब्द 'बीत इल्ली' या इराणी शब्दांवरून आल्याचा दावा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार विठ्ठलाच्या मूर्तीचे इराणमधील एका देवाच्या मूर्तीशी प्रचंड साम्य आहे. हा देव व विठ्ठल हे नाव एका इराणी देवतेवरून आल्याचा त्यांचा दावा होता. विठ्ठल हा पशुपालकांचा देव आहे असा सोनवणींचा दावा आहे. मूळचे बुद्धमंदीर पाडून बुद्धाच्या मूर्तीच्या जागी विठ्ठलाची मूर्ती स्थापन केल्याचा डॉ. आंबेडकरांचा दावा होता कारण पुंडरिक म्हणजे कमळ व कमळाचा संबंध बुद्धाशी आहे.
संशोधन करणार्यांना संशोधन करू देत आणि आपले निष्कर्ष मांडू देत. गेली अनेक शतके अनेक संतांनी ज्या विठ्ठलाची मनोभावे भक्ती केली त्याची भक्तांच्या मनातील प्रतिमा कोणत्याही संशोधनाने विचलीत होणार नाही.
4 May 2016 - 8:24 pm | विजय पुरोहित
गेली अनेक शतके अनेक संतांनी ज्या विठ्ठलाची मनोभावे भक्ती केली त्याची भक्तांच्या मनातील प्रतिमा कोणत्याही संशोधनाने विचलीत होणार नाही. +111
5 May 2016 - 10:22 am | प्रचेतस
सहमत आहे. कारण ते भक्त आहेत.
4 May 2016 - 4:19 pm | सनईचौघडा
प्रा. कोसंबींनी तो धनगर लोकांचा देव आहे व पंढरपूर हे या फिरत्या जमातीचे एकत्र येण्याचे ठिकाण होते. आषाढी आणि कार्तिकीची पंढरपूरची यात्रा धनगरांच्या वेळापत्रकाशी निगडित आहे असा लोकसत्तेतील एक लेख मी वाचलेला आहे.
9 May 2016 - 11:53 am | पामर
आपण विठ्ठलाच्या मुर्तीचा अभ्यास केला असता ही मुर्ती पुर्ण वैष्णव आहे. मुर्तीचे हात नुसते कमरेवर नाहीत तर त्या हातात शंख व कमळ आहेत. मकर कुंडले,उंच किरिट व छातीवर श्रीवत्स चिन्ह स्पष्टपणे ती विष्णुमुर्ती असल्याचे दाखवतात.विठ्ठल हे शैव रूपाचे वैष्णव उन्नयन आहे ह्यावर थोडा अजुन अभ्यास करावा लागेल. रा.चिं. ढेरे आपल्या 'लोकदेवतांच्या विश्वात' मत देतात की तिरुमल्लैचा बालाजी व सबरीमल्लैचा अयप्पा इथे सुद्धा वैष्णव लोकांनी शैवस्थलांवर अतिक्रमण करुन तिथे विष्णुस्थान तयार केली.
इतिहासकार भांडारकर म्हणतात, विठु हे विष्णुच कानडी रुप आहे व ला/बा हा प्रत्यय आदर म्ह्णुन वापरतात.पण तेच नाही तर Richard Maxwell Eaton,Christian Lee Novetzke व G. A. Deleury हे सर्व पंढरपुर हे मुळ शैवस्थळाचे विष्णुस्थानात झालेल रुपांतर मान्य करतात.