एवढे दिवस आमच्यातल्या वीक पाँइण्टचा आप्पांनी अभ्यास करून प्रत्येकाला वेगवेगळे व्यायामप्रकार सांगितले. जेणेकरून शारीरिक क्षमतेत आम्ही कुठे कमी पडायला नको. प्रत्येकाच्या खुबींचा आणि शारीरिक ठेवणीचा विचार करून ते व्यायाम सांगितले कारण त्यांना काहीच्या पोटऱ्याचे स्नायू जास्त ताकदवान हवे होते तर काहींचे मांड्यांचे स्नायू.. लाथ किंवा बैठी मारताना आपल्या सगळ्या शरीराचे वजन तोलून धरत त्याच अवस्थेतून अत्यंत चपळपणे शरीराला धावण्याच्या अवस्थेत आणणे तसेच कव्हरच्या वेळी चपळाइने पाठलाग करणे, अचूक ठिकाणी डँश देणे, खेळाडूला ब्लॉक करताना आपल्याबरोबरच समोरच्या खेळाडूचा फोर्स एका क्षणात कसा थांबवायचा किंवा ते जमले नाही तर त्याची दिशा कशी बदलायची त्यासाठी कुठे जोर लावायचा, आणीबाणीच्या क्षणी आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा जसे की ताकद, चपळता याचा पुरेपूर वापर कसा करावा किंवा काही डावपेचावर मात करण्यासाठी कशी रणनीती आखावी, ती आखताना मैदानातल्या ७ खेळाडूंच्या कौशल्याचा कसा वापर करून घ्यावा हे शिकण्यासाठी म्हणून हि जास्तीची मेहनत होती ... आणि आम्हीही ती मनापासून करत होतो. कारण नुसता खेळ खेळता येणे महत्वाचे नसून समोरच्याची चाल ओळखून आणि आपले प्लस आणि मायनस पाँइण्ट विचारात घेऊन त्या चालीला उत्तर देणे किंवा आपली चाल बदलता येणे हे ही तितकेच महत्वाचे असते. शेवटी खेळ चांगला झाला तर संघ पुढे जाणार होता आणि त्यामुळेच सिलेक्शनच्या वेळी जास्त टुर्नामेंट जिंकलेल्या संघाच्या जास्त मुलींचे सिलेक्शन होणार होते . त्यामुळे तिथे वर्चस्व ठेवायचे असेल तर वैयक्तिक मेहनत आणि टीम वर्कला पर्याय नाही हे आम्हीही जाणून होतो.
दुसर्या दिवशी दीप्ती आली. खांद्याला बँडेज होत पण ती खेळू शकणार होती. अप्पांनी खांद्याची चौकशी केली. साधारण ती काय काय करू शकते ह्याचा त्यांना अंदाज घ्यायचा होता. ती टर्न उत्तम प्रकारे लावू शकते हे तिने आप्पांना ठासून सांगितले. आप्पा स्वत: खेळाडू असल्यामुळे त्यांना माहित होत की खेळाडू कधीच हार मानणारा नसतो आणि अशा वेळी जेव्हा संघाला त्याची गरज असेल तेव्हा तर नाहीच नाही. तो जीवाचे नाव शिवा करेल पण मैदानात उतरेल... ते हसले. त्यांनी फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला वाँर्मअप करून कव्हर फिरवायला सांगितले. सकाळची प्रँक्टीस झाल्यावर अप्पांनी दीप्तीला संध्याकाळी परत प्रँक्टीसला न येता घरी विश्रांती घ्यायला सांगितली.
त्या दिवशी संध्याकाळी पण आप्पा आले.. आप्पांना बघून चेंजरूम मध्ये खळबळ उडाली. आज पासून संध्याकाळी पण घासून घेणार म्हणून आत्ता पासूनच अंग दुखायला लागलं. पण सुदैवाने तसं झाल नाही आप्पा शांतपणे बाजूला बसून आमची कव्हर, रेड बघत होते आणि बरोबरीने काही तरी लिहून घेत होते.
मग ते दादांजवळ गेले त्यांच्याशी बराच वेळ काही तरी बोलत होते. तो पर्यंत आम्ही यथेच्छ मस्ती करून घेतली आणि ते दोघ जवळ आल्यावर साळसूदपणाचा आव आणला. आप्पांनी काही प्लेस बदलयाला लावल्या आणि त्या बदलेल्या प्लेसनुसार ३ सेशन कव्हर लावायची होती. उद्या पासून सकाळच्या सेशनला पण प्रँक्टीस असणार होती. तसेच प्रत्येक सेशनला प्रत्येक मुलीला कमीत कमी १० रेड कंपल्सरी केल्या. आम्ही त्यांचा न कळत डोक्याला हात लावला. १७ मुली आणि प्रत्येकाच्या १० रेड… + वाँर्मअपचा वेळ + चेंग करणे, ग्राउंड तयार करणे, असा सगळा वेळ पकडल्यास आम्हाला ग्राउंडवरच राहावं लागणार होते. हे आम्हाला भारी पडणार होत पण इलाज नव्हता. त्यादिवशी संध्याकाळी मी गोड गोड बोलून बाबांच्या मागे लागून त्यांना नवीन स्पोर्टशूज साठी पटवले. रविवारी आमचा खरेदीचा प्लान होता.
दुसर्या दिवशी सकाळी ग्राउंडवर पोचलो तेव्हा अप्पांबरोबर त्यांचा धाकटा भाऊ आणि व्यायसायिक खेळाडू अजित उर्फ बापू पण आले होते. ते ग्राउंडवर दिसल्यापासून संजू फारच खुशीत होती. आमच्या चेहऱ्यावर मात्र एका ग्राउंडमध्ये २ हिटलर कशाला असा भाव होता आणि तो बापूंनी बरोबर ओळखला आणि आम्हाला म्हणाले कि ते आमच्याबरोबर प्रँक्टीस करणार आहेत आणि शनिवारी संध्याकाळी आमच्याच ग्राउंडमध्ये आमची मँच असणार आहे पण कोणाबरोबर ते नाही सांगितले. आम्ही विचारलं तर म्हणाले "प्रँक्टीस करा… तुम्हाला ती टीम भारीच पडणार आहे." चेहऱ्यावर भलं मोठ प्रश्नचिन्ह घेऊन आम्ही चेंग करायला निघालो. कुठची टीम आमच्याबरोबर खेळणार होती काही कळायला मार्ग नव्हता.
कधी नव्हे ते आमच्या आधी संजू तयार झाली आणि बाहेर जाऊन थांबली. एरवी सकाळच्या प्रँक्टीसला इतर मुली हाफ पँट घालत असून सुद्धा स्किन टँन होते म्हणून ट्रँकपँट घालणारी संजू आज बरोबर हाफ पँट घालून सगळ्यांच्या आधी बाहेर गेली होती. " तुम आ गये हो.... नूर आ गया है... " योग्याने चेंगरूम मध्येच भसाड्या आवाजात सुरुवात केली. मी तिचं गातं मुस्काट दाबलं... आणि म्हंटल "आपण ग्राउंडवर गाऊ ना... इथं कोण ऐकणार तुला.. तिथे बापू आणि संजू ऐकतील ना…" फिदीफिदी दात काढत ती पण तयार झाली. झालं आज सकाळचा टाइमपास योगिता असणार होती. तिथे गेल्यावर खरचं त्या बावळटाने तिथे परत घसा खरवडायला सुरुवात केली. संजूला समजलंच नाही कि नक्की काय चालू आहे... तिची तंद्री भलतीकडे लागली होती ना. योग्यचं गाण ऐकून बापू गोंधळले त्यांना कळेना सकाळी ७ वाजता हि का गळा काढत आहे? आम्ही मात्र सीन एन्जॉय करत होतो. आप्पा जवळ आल्यावर पण योग्याच सुरुच होत फक्त गाडीने ट्रँक बदलला होता, " हमको आज काल है इन्तजार.... कोई आये लेके प्यार… " योग्या संजूकडे बघत गाण म्हणत होती, आप्पा योग्याकडे बघत होते, संजू बापूंकडे बघत होती, बापू मैदान मोजत होते आणि आम्ही ह्या तिघांकडे आळीपाळीने बघत होतो.
क्रमशः
एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
प्रतिक्रिया
2 May 2016 - 3:57 pm | अनुप ढेरे
हा हा! मस्तंच!
2 May 2016 - 4:00 pm | शलभ
मस्तच चाल्लय ..
2 May 2016 - 4:30 pm | एस
:-)
पुभाप्र.
2 May 2016 - 4:46 pm | क्रेझी
भन्नाट :) :)
2 May 2016 - 6:03 pm | मुक्त विहारि
पुभालटा...
5 May 2016 - 2:31 pm | नीलमोहर
मस्त !!