स्वामींच्या भेटीची वाट पहाणार्या लोकांच्या नजरा सँडल्सचा टॉक टॉक असा आवाज करत दरबारात प्रवेश करणार्या अँजेलिना जोलिकडे वळल्या. स्वामींची अपॉइंटमेंट घेतल्यामूळे तीला स्वामींच्या भेटीसाठी थेट प्रवेश मिळाला. चेहरा वाचन, हस्तरेषा व कुंडलीवरून अचूक भविष्य सांगण्याच्या कौशल्यामूळे त्यांना देश विदेशात यशस्वी जोतिष विशारद म्हणून ओळखले जाते. स्वामींची किर्ती ऐकून जोली आपले भविष्य जाणण्यासाठी वाराणसीत आली होती.
सँडल्स बाहेर काढून जोलि पांढर्याशुभ्र गादीवर मांडी घालून स्वामींसमोर बसली, भारतीय पद्धतीने जोलिने स्वामींना नमस्कार केल्यावर स्वामींच्या चेहर्यावरील तेजात अजुनच भर पडली. जोलिने आपल्याकडील कागदपत्रे स्वामींना देली, ज्यात तिच्या जन्माची अचूक वेळ व जन्म झालेल्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश इ. माहीती होती. स्वामींनी ही सगळी माहीती लॅपटॉपवरील सॉफ्टवेअरला पुरवली. थोड्याच वेळात लॅपटॉपला जोडलेल्या प्रिंटरमधून जोलिची कुंडली छापून बाहेर आली. स्वामींनी कुंडलीकडे ढुंकुनही बघितले नाही.
स्वामींनी जोलिच्या चेहरा वाचनाची सुरुवात कपाळापासून सुरू केली. कपाळ, डोळे व नाकाचे वाचन झाल्यावर स्वामींची नजर जोलिच्या ओठांवर स्थिरावली. स्वामींनी आपल्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून जिभ फिरवली, स्वामींच्या चेहर्यावर हलकेसे स्मित झळकले, जोलिनेही मंद स्मित दिले. जोलिचा चेहरा वाचून झाला तरी स्वामींनी तिच्या चेहर्यावरून नजर न हटवता तीचे भविष्य सांगायला सुरुवात केली.
तुझा स्वभाव धाडसी आहे, तू जिद्दिने आपले इप्सित साध्य करतेस. तुला कलाक्षेत्राची व समाजसेवेची आवड आहे. लहान मुले व त्यातल्या त्यात अनाथ व गरीब मुलांची तुला आवड आहे. हे सर्व जोलि मख्ख चेहरा करून ऐकत होती. स्वामी पुढे काही सांगणार त्यापुर्वीच जोलिने त्यांना रोखले. माफ करा स्वामी, तुम्ही जे काही मला सांगताय ते माझे भूत व वर्तमान आहे. ह्यात माझे भविष्य कुठे आहे. हा प्रश्न ऐकून प्रथम स्वामीं गडबडले, परंतू लगेच स्वतःला सावरत घसा खाकरत म्हणाले, आमच्याकडे ह्यालाच भविष्य म्हणतात. इतके अचूक सांगितल्यावर आतापर्यंत कोणीही तुमच्यासारखा आक्षेप घेतला नाही, स्वामी थोड्या नाराजीने म्हणाले. तुम्ही सांगितलेल्यापेक्षा कदाचीत मलाही माझ्याबद्दल माहीत नसलेल्या अनेक गोष्टी माझ्या देशातील पत्रकारांना माहीत आहेत, मला माझे भविष्य जाणून घ्यायचे आहे, जोलिने ठामपणे सांगितले. ओके ओके! समजलं मला स्वामी हसत हसत म्हणाले. ठिक आहे तुमचा हात पुढे करा. स्वामीनी सवयीप्रमाणे आपल्या स्वच्छ रुमालाने जोलिचा स्वच्छ हात पूसला व हातात भिंग घेवून आळीपाळीने जोलिचा हात व तीची कुंडली अभ्यासू लागले.
बराच वेळ जोलिचा हात व कुंडली अभ्यासल्यावर स्वामींनी हातातले भिंग बाजुला ठेवले. जोलिचा हात न सोडता चेहरा गंभीर करून म्हणाले, तुला भविष्यात गंभीर आजार होण्याची शक्यता आहे व हा आजार तुझ्या जिवावर बेतू शकतो. जोलिने आपला हात स्वामींच्या हातातून अलगद सोडवून निर्विकार चेहरा ठेवून स्वामींना ह्यावर काही तोडगा आहे का विचारले. तुझ्या कुंडलीत 'मातृदोष' असल्यामुळे शांती करावी लागेल, त्यावेळेस तुला यज्ञात मांसाची 'आहूती' द्यावी लागेल कदाचीत त्यामुळे तुझ्यावर येणार्या गंभीर आजाराची तिव्रता कमी होइल. हे ऐकून जोलिने टुनकन उडी मारली, बॅगेतून मोबाइल काढला व आपल्या असिस्टंटला फोन करून आपला भारतातील पर्यटनाचा कार्यक्रम रद्द केल्याचे सांगून मायदेशी जाण्यासाठी विमानाचे बुकिंग करायला सांगितले. बॅगेतून पैसे काढून स्वामींची फी चुकती केली व हसत हसत दरबारातून बाहेर पडली. स्वामी जोलिच्या पाठ्मोर्या आकृतीकडे अवाक होउन बघत राहीले.
क्रमशः
प्रतिक्रिया
25 Apr 2016 - 6:22 pm | अनुप ढेरे
मॅस्टे़क्टमी?
25 Apr 2016 - 6:26 pm | mandarbsnl
क्षमा असावी पण गर्भितार्थ समजला नाही... स्वामी बोगस आहे ते समजलच...पण मातृदोषामुळे आजार आणि यज्ञात मांस ची आहुती आणि तिने दौरा रद्द करून हसत हसत निघून जाणे...नाही समजले...
25 Apr 2016 - 6:47 pm | हकु
मलाही नाही काही समजले.
25 Apr 2016 - 6:53 pm | जव्हेरगंज
येऊद्या म्होरचा भाग !
25 Apr 2016 - 7:15 pm | तर्राट जोकर
जोलीला झालेला स्तनाचा कर्करोग आईकडून वांशिकरित्या आलेला आहे. तिची शस्त्रक्रिया करुन स्तन काढले आहेत. संदर्भ एवढाच लागला वरचं वाचून. मातृदोष आणि मांसाची आहुती.
26 Apr 2016 - 12:45 am | डॉ सुहास म्हात्रे
जोलीला स्तनाचा कर्करोग "झाला नाही".
वांशिकरित्या (फॅमिली हिस्टरीत) तो होण्याची दाट शक्यता असल्याने तिने स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया "प्रतिबंधक उपाय" म्हणून केलेली आहे. म्हणूनच ती कृती बर्यापैकी वादग्रस्त झाली आहे.
26 Apr 2016 - 12:52 am | डॉ सुहास म्हात्रे
बिजांडांच्या (ओव्हरी) कर्करोगाची फॅमिली हिस्टरी असल्याने जोलीने गेल्या वर्षी (२०१५) शल्यक्रियेने ओव्हरीजही काढून टाकल्या आहेत.
26 Apr 2016 - 1:44 am | तर्राट जोकर
ओके धन्यवाद. झाला की नाही हे माहित नव्हतं. पण आईकडून आहे व शस्त्रक्रिया झाली एवढे वाचलेले.
26 Apr 2016 - 12:18 am | रातराणी
पुभाप्र.
26 Apr 2016 - 10:39 am | विजय पुरोहित
वरील प्रतिसाद वाचून आता कथेचे थोडेफार आकलन झाले आहे. कल्पक आहे बाकी!
26 Apr 2016 - 10:47 am | पैसा
लिहा पटापट पुढचा भाग!
26 Apr 2016 - 12:58 pm | मराठी कथालेखक
लय भारी...
26 Apr 2016 - 3:15 pm | कपिलमुनी
जोलीच्या घरी जर हार्ट अॅटॅक ची हिस्टरी असती तर काय केले असते हा प्रश्न पडतो ? :)
26 Apr 2016 - 3:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
हृदयाचं प्लंबींग रिनोव्हेशन ! ;)