चंदेरी : मियाजींचा घरी जेवणाचा किस्सा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
23 Apr 2016 - 12:32 pm

गेल्या वर्षी चंदेरीला गेलो होतो. दुपारच्या वेळी किल्याच्या भिंतीवर पत्रावळ ठेऊन जेवत असताना, खाली दूरवर पसरलेल्या चंदेरी नगरावर नजर केली. दूर कुठून ढोल ताश्यांचा आवाज येत होता, कुठली तरी मिरवणूक निघत होती. आपल्या मेहुणीला विचारल्यास कळले, आज रामापीरची जयंती आहे. रामापीरची शोभायात्रा निघत असेल. हिंदू- मुसलमान दोन्ही धर्माचे लोक रामा पीरला मानतात. हिंद-मुसलमान, सर्वजातीय लोक या शोभा यात्रेत भाग घेतात. चंदेरीची दुकाने हि आज बंद असतात. सकाळी जेवण बरोबर घेऊन अशोकनगरहून का निघालो होतो ते हि कळले.

(किल्याच्या भिंतीवरून दिसणारे चंदेरी शहर)
चंदेरी नगर
जेवत असताना, वडिलांनी सांगितलेला एक जुना किस्सा आठवला. १९६०-६२च्या दरम्यानची गोष्ट. वडील मुंबईच्या एका रंगरसायन कंपनीचे विक्रय प्रतिनिधी म्हणून दिल्लीत कार्यरत होते. चंदेरीच्या साड्या प्रसिद्ध आहेतच. पण तिथे सद्या रंगण्याचे कारखाने हि भरपूर आहेत. १९६०च्या दशकात जुने रंग सोडून नवीन रासायनिक रंगांचा वापर तेथे हि सुरु झाला होता. त्या बरोबर काही समस्या हि निर्माण झाल्या होत्या. कुठलीही नवीन तकनीक वापरताना सुरवातीला समस्या या येतातच. ऑफिसने मुंबई वरून एक तकनीकी व्यक्ती दिल्लीला पाठवला. त्याच्या सोबत वडील चंदेरीला पोहचले. तेथील डीलरच्या दुकानात तेथील रंगारी जमले, त्यांच्या सोबत चर्चा झाली. दुसर्या दिवशी पहाटे एका बुजुर्ग मियांजींच्या कारखान्यात प्रात्यक्षिक दाखवायचे ठरले. मियांजींच्या राहत्या घराच्या एक बाजुला त्यांच्या कपडे रंगण्याचा छोटेखानी कारखाना होता. पाहुणे घरी आले, की त्यांचे यथोचित स्वागत झाले पाहिजे, हि भारतीय परंपरा आहेच. मियांजी म्हणाले, कल आ ही रहे हो तो दुपहर का भोजन हमारे घर हो जाय. वडिलांनी उत्तर दिले, काही हरकत नाही, पण जेवायला शाकाहारी पदार्थ ठेवा, कारण आम्ही शाकाहारी आहोत. मियांजी उद्गारले, काळजी करू नका, मी स्वत: जातीने लक्ष देईन.

त्या दिवशी रात्री, मुंबईहून आलेल्या तकनीशियन ने विचारले, पटाईत साहेब आपण जेवणाचे निमंत्रण स्वीकारले आहे, पण हे लोक तर मांस इत्यादी खाणारे. वडील म्हणाले, फिरतीवर असताना आपण ढाब्यावर जेवतो. अन्न कस आणि कश्यारीतीने बनविले आहे, आपल्याला माहित नसते. केवळ विश्वासावर आपण ढाब्यात जेवतो. इथे तर घर आहे, काळजी कशाला, भांडे चक्क धुऊन-पुसून स्वैपाक करतील हे लोक. कुठला हि अरुचीकर वास येणार नाही याची काळजी घेतील.

दुसर्या दिवशी काम संपल्यावर दुपारी एक दीड वाजता. मियांजींच्या घरी पोहचले. त्या काळच्या हिशोबाने घर कौलारू आणि मातीचे होते. स्वैपाकघरात ताटे मांडली होती. स्वैपाकघर हि व्यवस्थित शेणाने सारवलेले दिसत होते. चंदेरी, शिंद्यांच्या अधिकारात असल्यामुळे मराठी जेवण संस्कृतीचा प्रभाव या भागावर अजूनही आहे. अशोक नगरहून चंदेरी कडे जाताना सकाळच्या वेळी रस्त्यात ठेल्यांवर बटाटा पोहे विकताना दुकानदार दिसले होते. मियांजींच्या घरी हि वडिलांना हा प्रभाव जाणविला. वरण-भात, पापड, लोणचे, बटाट्याची सूखी भाजी आणि सेंवैया खीर हा मेनू होता. चुल्हयावर कढई, ठेवलेली होती, गर्मागर्म पुर्या तळून म्हातारी अम्मी वाढणार होती.

ताटावर बसल्यावर वडिलांना एक जाणवले. पितळेचे ताट, वाटी, पेला, चुल्ह्यावर ठेवलेली पितळी कढई सर्व भांडे नवीन होते. वडिलांनी सहज विचारले, मियांजी, भांडे नवीन विकत घेतलली आहेत का. हां, आप लोक आने वाले थे, इसलिए अम्मीजीने कहा, नए बर्तन ले आओ. मियांजीचे उत्तर ऐकून, वडिलांना कसे-कसे वाटले, काहीवेळ त्याना काय बोलावे काही सुचले नाही. थोड्यावेळ विचार करून ते म्हणाले, अम्मीजी इसकी क्या जरुरत थी. म्हातारी अम्मीने लगेच उत्तर दिले, कैसे जरुरत नहीं थी. बामन आदमी को घर पर खाने को बुलाया है. बर्तन कितना भी मांजो कहीं न कहीं बास रही जाती है. ऐसे बर्तन में खाना खिलाकर आपका धर्मभ्रष्ट थोड़े ना करना है. फिर मुझे भी तो अल्लाताला को जवाब देना है. त्या भोळ्या अशिक्षित म्हातारी अम्मीचे उत्तर ऐकून, वडिलांनी डोळ्यातून ओघळणार्या अश्रुना बामुश्कील थांबविले. दुसर्यांच्या धार्मिक विचारांबाबत किती काळजी होती तिला. त्या दिवशीच्या जेवणाची गोडी काही औरच होती.

२००७ मध्ये, वृद्धावस्था आणि आजारी असताना, वडिलांनी हा किस्सा सांगितला होता. जवळपास पन्नास वर्षानंतर हि त्यांच्या जिभेवर अम्मीच्या हातच्या जेवणाची चव होती. त्या दिवशी रात्री घरी सेंवैया खीर केली हे सांगणे नकोच.

वडील नेहमी म्हणायचे, तो काळ वेगळा होता. लोक ढोंगी नव्हते. त्या काळी लोक, अलग-अलग थाळीत जेवत होते, पिण्याचे पेले हि वेगळे होते. पण एका दुसर्याच्या प्रती प्रेम होत. दुसर्याच्या भावनांचा सम्मान कसा करायचा, हे अडाणी लोकांना हि कळायचे. सांगायचे नको, त्या नंतर २-३ वेळा चंदेरी जाण्याचा वडिलांना योग आला. प्रत्येक वेळी अम्मीच्या हातचे जेवायला, ते हक्काने जात होते.

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

23 Apr 2016 - 12:41 pm | उगा काहितरीच

अगदी मनापासून आवडलं...

जेपी's picture

23 Apr 2016 - 1:24 pm | जेपी

किस्सा आवडला..

यशोधरा's picture

23 Apr 2016 - 1:25 pm | यशोधरा

किती हृद्य प्रसंग आहे पटाईतकाका, लिहिलेयही सुरेख.

सविता००१'s picture

23 Apr 2016 - 2:48 pm | सविता००१

सुंदर प्रसंग तेवढाच सुरेख रंगवला आहे तुम्ही पटाईत काका.
खूप आवडलं लेखन

एस's picture

23 Apr 2016 - 3:50 pm | एस

फारच हृद्य!

अजया's picture

23 Apr 2016 - 3:55 pm | अजया

छान लिहिलंय काका.

mugdhagode's picture

23 Apr 2016 - 4:05 pm | mugdhagode

छान

खूप भावलं.ग्वालिअर/ग्वाल्हेर झाशी, ओरछा मुद्दामहून फिरलो झाशीची राणी सिरिअल लागली होती तेव्हा.चंदेरी राहिलंच.पुन्हा जाऊच पुन्हा.

बोका-ए-आझम's picture

23 Apr 2016 - 7:16 pm | बोका-ए-आझम

फारच छान पटाईतकाका!

गामा पैलवान's picture

23 Apr 2016 - 11:06 pm | गामा पैलवान

विवेकपटाईत,

आले नेते जर सामान्य माणसासारखे वागायला लागले तर खरंच रामराज्य येईल.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2016 - 11:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

हृद्य प्रसंग ! दुर्दैवाने अशी जाण आजकाल फार दुर्मिळ झाली आहे :(

कौशी's picture

23 Apr 2016 - 11:42 pm | कौशी

सगळा प्रसंग डोळ्यासमोर आला....

पिलीयन रायडर's picture

24 Apr 2016 - 12:13 am | पिलीयन रायडर

सुरेख!!!

खूपच छान लिहिले. शिक्षण कमी होते परंतु लोक संवेदनशील होते. एकमेकांप्रति आदर व प्रेम दिसून यायचे.

लेखन आवडले. ती आजीबाई किती गोड असेल.

भंकस बाबा's picture

24 Apr 2016 - 10:02 am | भंकस बाबा

असाच काही अनुभव माझाहि आहे.
फार वर्षापुर्वी अशाच एका मुस्लिम घरात मला ईदच्या दिवशी जेवणाचे आमत्रंण मिळाले होते.
मी जाणार नव्हतो व् त्यांनी पण अपेक्षा केलि नव्हती. कारण माझे घर त्या कुटुंबापासून फार दूर होते.
पण योगायोग असा आला की मला नेमके त्या दिवशी त्या घराच्या आसपास जावे लागले. आता जवळ आहोत तर जाऊन येऊ या हिशोबाने मी गेलो.
चार साडेचारचि वेळ असेल , मला वाटले की यांचे जेवण वैगेरे आटपून झाले असेल पण त्यांची जेवायला बसायची तयारी चालली होती. छोटी मुले ताटातल्या मोठमोठ्या नळया ओरपत होती. मला जरा कसेशेच् झाले. पण त्या घरातील माउलीने त्या चारपाच पोराना धपाटे घालून बाहेर काढले व मला आत घेतले. छोटीशी 10 बाय 15 ची ती खोली त्यात ती माउली व् तिचे दोन मुलगे ,सूना आणि चिल्लीपिलि.आता तिची दोन्ही मुले माझ्याशी गप्पा मारायला लागली. अर्ध्या तासाने जेवायला बसा असा आदेश आला. समोर डाळभात, वाटाण्याची भाजी,पापड़, लोणचे असा साधा मेन्यू होता. माझ्याबरोबर तिची मुले पण जेवायला बसली. मी न रहावुन विचारले की मी मांसाहारी आहे त्यामुळे अगदी डालभात नसला तरी चालले असते. म्हातारी हसली व् काहीच बोलली नाही. नंतर जेवल्यावर तिने सांगितले की हे सर्व बाहेरून मागवले आहे. मला अगदी हडबडून आले. माझ्यासाठी, माझा धर्म जपन्यासाठी त्या माऊलीची धडपड मला फार मोठा धड़ा देऊन गेली.
आणि आता मला गोमांस व्यर्ज नाही. पुष्कळ मुस्लिम मित्रांच्या घरी मी बिनधास्त खातो. आणि ते खाताना माझ्या मित्रांच्या कुटुंबियाच्या डोळ्यातले आश्चर्यमिश्रित कौतूकाचे भाव निरखतो.

रमेश आठवले's picture

24 Apr 2016 - 6:56 pm | रमेश आठवले

हैदराबाद मध्ये मुस्लिम समाजात दुपारचे जेवण ४-४.३० वाजता करण्याची पद्धत असावी .एक दोन वेळा या सुमारास खरेदी करण्यास गेलो असताना त्यांच्या दुकानातील कर्मचारी जेवताना दिसले.

स्वामी संकेतानंद's picture

24 Apr 2016 - 10:16 am | स्वामी संकेतानंद

..... जब मकान कच्चे और लोग सच्चे हुआ करते थे

चिगो's picture

25 Apr 2016 - 11:27 am | चिगो

..... जब मकान कच्चे और लोग सच्चे हुआ करते थे

क्या बात, स्वामीजी..

अत्यंत हृद्य प्रसंग, पटाईतकाका.. पटाईतपणे रंगवलात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Apr 2016 - 12:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

..... जब मकान कच्चे और लोग सच्चे हुआ करते थे और हमारा स्वाम्या २२०० साल का गबरू जवान था!

=))

विजय पुरोहित's picture

24 Apr 2016 - 5:02 pm | विजय पुरोहित

अतिशय छान लेख. वाचून प्रसन्न वाटले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Apr 2016 - 12:20 pm | कैलासवासी सोन्याबापु

हृद्य प्रसंग! खुप आवडला! :)

पैसा's picture

25 Apr 2016 - 12:23 pm | पैसा

कायमची जपून ठेवावी अशी आठवण आहे.

खरंच हृद्य आठवण ! आणि दुर्मिळ वृत्ती.

अप्पा जोगळेकर's picture

25 Apr 2016 - 5:41 pm | अप्पा जोगळेकर

सुंदर. निरर्थक आध्यात्मिक कुंथनपेक्षा अशी एखादीच आठवण सगळ्यांना धडा देऊन जाते.

इशा१२३'s picture

25 Apr 2016 - 9:39 pm | इशा१२३

छान लेख!!

सुंदर. निरर्थक आध्यात्मिक कुंथनपेक्षा अशी एखादीच आठवण सगळ्यांना धडा देऊन जाते.

खरंच हृद्य आठवण ! आणि दुर्मिळ वृत्ती.

धन्यवाद पटाईत काका