गावाकडे म्हणजे विदर्भात एक 50ft×96ft एक प्लॉट घेतलाय. आजूबाजूला सध्या तरी उघडे माळ आहे. या प्लॉटवर आईबाबांना विरंगुळा म्हणून आणि त्यांची नातवंडे गावाकडे आली की त्यांच्यासाठी नवल आणि बदल म्हणून एक छोटीशी बाग उभी करायचे योजिले आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ईशान्य कोनावर बोर घेतली. पाणी भरपूर आहे. वीज जोडणी आणि सबमर्सिबल पंप ही दोन्ही महत्वाची कामे झाली आहेत. माळ असल्याने पक्के कुंपण उभारणीचे काम सध्या सुरु आहे. एक 12×12 ची पूर्वाभिमुख खोली, संडासबाथरूम एक कोपऱ्यात असेल. ईशान्येलाच बोअरशेजारी गेट असेल.
बाग नेमकी कशी असावी यावर घरी सध्या भरपूर काथ्या कुटला जात आहे. चार पैसे मिळावे हा उद्देश अजिबात नाही. पहिले प्राधान्य फळझाडांना आहे. जास्तीत जास्त प्रकारची फळझाडे लावायचा विचार आहे. तसेच लहान लहान वाफे करून तिथे घरगुती गरजेपुरते आले, हळद, कांदे, लसूण, मिरची, टोमॅटो, भेंडी, कारले, वांगी, कोबी, पालक, मेथी वगैरे लावायचा पण विचार आहे. बुढाबुढीच्या गरजेपुरता भाजीपाला असणार त्यामुळे रासायनिक खते, कीटकनाशके वगैरे वापरायचा विचार नाही. तसेच नातवंडे होळी-दिवाळीत गावी आली की त्यांनाही कीटकनाशकविरहित ऑरगॅनिक, घरचे खायला मिळेल. फळझाडांमध्येही एका प्रकारचे एक किंवा दोन झाडेच असली तरी हरकत नको. फळांची भरपूर व्हरायटी असेल आणि कुठल्या ना कुठल्या मोसमात कुठले ना कुठले फळ खायला मिळेल.
आमच्यापुढे असलेले मुख्य प्रश्न
1. विदर्भात सगळ्या प्रकारची फळझाडे जगू शकतील का? मला काजू, जाम, फणस सारखी कोंकण पट्टीची झाडे आणि सफरचंद, नासपाती, आलुबुखारा सारखी थंड हवेतली झाडे पण लावून पहायची आहेत. किवी फळ विदर्भात जगवायचा प्रयत्न कोणी केला आहे का? आमच्या शेजाऱ्यांनी रांगेने माड लावले होते. पण आजूबाजूला इतर झाडे असणारे तेव्हढे जगले. थेट उन्हाच्या झावा बसणारी, मोकळ्या जागेतली नारळी तग धरू शकली नाही उन्हाळ्यात. तो अनुभव पाहता नारळ वगैरे प्लॉटच्या आतल्या भागात लावायचा विचार आहे.
2. आंब्यासारखी डेरेदार झाडे कुठे लावावी? भविष्यात ह्या झाडांची सावली एवढी दाट व्हायला नको की, भाजीचे वाफे जगणारच नाहीत. पण बाहेरच्या बाजूने लावले तर लोकच दगड मारतील किंवा कुंपणावरून तोडतील. हासुद्धा विचार करायला पाहिजे. कुंपणाशेजारी कोणती झाडे लावायला पाहिजे?
3. एक विचार असा आला की एक तृतीयांश भाग निव्वळ मोठ्या झाडांना द्यावा. तिकडे झाडे जवळजवळ असतील. उर्वरित दोन तृतीयांश भागात जास्त अंतर ठेवून इतर झाडे, शक्यतो कमी सावलीची, कमी पसरणारी लावावी म्हणजे मध्ये मोकळ्या जागेत वाफे छान तग धरतील. कैसा खयाल है?
4. नेहमीच्या वापरातील काही औषधी झाडे पण लावायचे ठरवले आहे. आवळा, हिरडा बेहळा, अश्वगंधा, सर्पगंधा, अडुळसा, तुळस, जास्वंद, कोरफड वगळता इतरही काही नेहमी कामी येणारी औषधी झाडे सुचतात का?
5. एकूण किती झाडे एवढ्या जागेत बसवता येतील? जागेचा जास्ती जास्त सुयोग्य वापर कसा करता येईल? बागेच्या रचनेच्या अजून काही कल्पना सुचतात का?
6. ठिबक सिंचन यंत्रणा बसवणार आहोत. तेवढीच पाण्याची बचत! टाइमर वगैरे लावायला जास्तीचा किती खर्च येईल? जैन इरिगेशन वगळता दुसरा कोणताही सप्लायर माहीत नाही. तुम्हाला काही नावे माहीत आहेत का?
अजून काही प्रश्न आले डोक्यात तर कमेंटमध्ये विचारणार. सध्या पुरे.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
20 Apr 2016 - 3:17 pm | कंजूस
मुलांसाठी पांढरा जाम,राय आवळे आणि पेरू.बोरचं सांडलेलं पाणी वाहात जाते त्याबाजूला नारळ.उत्तरेला आंबा.
20 Apr 2016 - 4:40 pm | अजया
केळीचं झाड पाणी वाहत्या दिशेला,अळु लावु शकता.
माझ्याकडे चिकूची दोन झाडं कुंडीत छान वाढली आहेत.भरपूर चिकू देतात.पण सावली लागते त्या झाडाला.नारळाखाली असून तगली आहेत.घराच्या पूर्वेला ही झाडं आहेत.लिंबाचे झाड जरुर लावा.
जागा असल्यास कडुलिंब कुंपणाजवळ लावा.शुध्द हवा, निंबोळ्या दोन्ही फायदे! कचरा करणारे झाड आहे मात्र.
कुंपणाजवळ बहावा पण लावु शकता.ते पानगळीचे झाड आहे.कमी पाण्यात जगते चांगले.फुलं येऊन बहरला की भरपूर पक्षी आणि फुलपाखरं येतात!
कुंपणाला सर्व बाजूनी घाणेरी लावल्यास कमी पाण्यावर जगते.फुलपाखरं येतात.
बोगनवेल वेगवेगळ्या रंगाच्या त्याही कमी पाण्यात जगतात.नुसती फांदी लावून झाडं येतात.
बांबूची लहान उंचीची सदाहरित व्हरायटी मिळते.पण पाणी भरपूर लागते.फार छान दिसतात.
धुळ येत असेल घरात तर अशोक, सीता अशोक,पामच्या झाडांनी स्क्रिनिंग करता येईल.
बाजूने मोठी झाडे,समोर फुलझाडे,परस असल्यास केळ आंबा चिकू पेरू आवळा शेवगा सीताफळ लिंबू कढिपत्ता
वाफे नारळाखाली वगैरे येणार नाहीत बघावं.नाहीतर एक झावळी पडली की मिरची कोथिंबीरची चटणी तिथेच!
पुदिना पण उपयोगी आणि औषधी.नुसती काडी टोचून येतो.जरुर लावा.
20 Apr 2016 - 9:15 pm | स्वामी संकेतानंद
तिकडे फक्त एक खोली तेवढी राहील. आमचे राहायचे घर तिथून 1 किमी दूर आहे. बागेकडे धुळीचा, रहदारीचा त्रास नाही. मुख्य रस्त्यापासून आत गल्लीत आहे आणि आजूबाजूला सगळे मोकळे आहे सध्यातरी. गाव वाढल्यावर शेजारीपाजारी घरे येतील पण रहदारीचा, धुळीचा त्रास तेव्हाही नसणार.
तरी कुंपणाबाहेर रस्त्याच्या कडेला सरकारी जागेत रांगेने गुलमोहर लावायचा विचार आहे. कचरा होईल कदचित थोडा. बहाव्याची आयडिया चांगली आहे. बहाव्याची फुले माझी आवडती फुले आहेत. आणि त्या फुलांची भाजी पण चविष्ट लागते. एरवी रानातून भाजीसाठी फुले आणावी लागतात. आता घरीच सोय होईल. :D आळीपाळीने बहावा आणि गुलमोहर लावता येईल रस्त्याच्या कडेला. पिवळे+लाल कॉम्बिनेशन.
20 Apr 2016 - 5:03 pm | sandeepn
टायमर साठी ही लिंक बघा :
http://www.amazon.in/PINOLEX-IRRIGATION-AUTOMATIC-CONTROLLER-APARTMENT/d...
३००० पर्यंत आहे किंमत.
ड्रिप साठी साधारण ३००० लागतिल. लॉन केले तर मोठा स्प्रिंकलर लावावा लागेल.
युट्युब वर व्हिडिओ शोधा जसा : https://www.youtube.com/watch?v=P74YZxqoHIg
तुमचे गार्ड्न तयार झाले कि आम्हाला पण सांगा ;)
20 Apr 2016 - 9:07 pm | स्वामी संकेतानंद
लिंकसाठी धन्यवाद. पाहतो तिकडे.
लॉनचा विचार सध्यातरी नाही. मोविंग करावी लागेल वरचेवर आणि मुख्य म्हणजे उन्हाळ्यात ते खूपच पाणी पिते.
20 Apr 2016 - 5:22 pm | सस्नेह
नारळीची झाडे लावणार असाल तर बॉर्डरवर दहा दहा फुटाच्या अंतराने लावा.
फणस कलमी घ्या. कोरड्या हवेला तग धरतो आणि फळेही चांगली मिळतात.
पारिजातक, मोगरा, जुई अशा वेलींच्या कमानी करा. चाफा एखादा लावा.
बागेचे फोटो टाकायला विसरू नका.
20 Apr 2016 - 5:40 pm | पैसा
आईबाबांची नातवंडे काय! नोटेड.
वरचे सगळे सल्ले बघच. डीडी किसान चॅनेल बघ अधे मधे वेळ असेल तेव्हा. बरीच माहिती मिळते. आवळे, पेरू, कढीपत्ता, नारळ वगैरे लाव. तुमची खासीयत संत्री पण लाव. गावठीच असू देत. ती ऑस्ट्रेलियन का काय ती जाड सालीची मोसंब्यासारखी लागणारी नको.
वेगळा प्रयोग करायचा असेल तर पठारी भागात होणारे सफरचंद विकसित केले आहे. विदर्भात कोणीत्रई त्याची यशस्वी लागवड केल्याचे डीडी किसानवर पाहिले होते. त्याचाही विचार कर. आंबे सुद्धा तुमच्या भागात चांगले होणारेच लाव. पाणी सांडते तिथे आळू, केळी वगैरे हवेच. डाळिंब, लिबू, सीताफळ, रामफळ यापैकी जे होत असेल तेही घे.
बेहड्याचे झाड प्रचंड मोठे होते. म्हणजे उंच. खोडाचा विस्तार असतो पण फांद्या उंच जातात. ते कुंपणाकडेला लावू शकतोस. तसे कडुनिंब वगैरे. बकुळी, सोनचाफा अशी काही फुलांची झाडे लाव.
अजून आठवेल तसे लिहिते.
20 Apr 2016 - 5:51 pm | कैलासवासी सोन्याबापु
आईबाबांची नातवंडे काय! नोटेड.
तै ला +१०००० , स्वाम्या जोमात आहे गो ताय!
20 Apr 2016 - 5:56 pm | पैसा
दिल्ली आणि वर्हाड सोडून पुण्यात काय करतोय!
20 Apr 2016 - 9:01 pm | स्वामी संकेतानंद
एक नातू आहे की आधीच! भविष्यात आणखी होतील, तो विचार करायला नको?
बाकी, फुलझाडे डोक्यात नव्हती. पण चार-पाच लावायला हरकत नसावी. अळू आमचा विक पॉईंट असल्याने भरपूर असणार आहे. आता पण -5 कुंड्यांत अळू आहे.
20 Apr 2016 - 6:05 pm | मानसी१
छोट्या बाल्कनीमधे ड्रम वापरुन पारीजातक कींवा आंनदाच झाड लावता येईल का?
20 Apr 2016 - 6:14 pm | कैलासवासी सोन्याबापु
मधुमालती किंवा रातराणी लावता येईल तुम्हाला किंवा दाट असे निशीगंधाचे कंद, बालकनी बेडरूमला लागून/ हॉल अटॅच टेरेस असल्यास सीजन मधे नैसर्गिक सुगंध दरवळत राहील घरात, हा एक एडिशनल फायदा.
20 Apr 2016 - 6:58 pm | मानसी१
धन्यवाद
20 Apr 2016 - 6:11 pm | कैलासवासी सोन्याबापु
ज्यमीन तवा फोन करजो आपल्या इकल्डल्या हिशोबानं दोनचार ऑप्शन देतो तुले, पॉलीहाउस बनल छोटेसे कमी खर्च करुन बनल एक बारके पॉली हाउस, अकोल्याले लेटर लिहिजो एक पंदेकृवि मधे उद्यानविद्या विभागाले, चांगले लोकं आहेत उत्तर देतात तुला सूट होतील असे फळझाडं सुचवतील ते लोकं , अन हो कटहलची झाडं तगतात आपल्याकडे, काजू नाही जगत, बॉर्डरनं शेवगा लावजो
आंबे गावठी लाव घेर कमी अन बम गोड आंबे भेटतील, कुठले रोपं लावायचे असतील तर गादी वाफे करजो नाही तर साधे वाफे बनव, गादी वाफे maintainance ला भयानक असतात, भाज्या म्हणजे पालेभाज्या लावनं अशीन तर पाण्याचा उतार अन ढाळ असेल अश्या जागी वाफे कर शक्यतो उत्तर दक्षिण ठेव वाफे पूर्व पश्चिम थोड़े उंच होतील असे झाडं लाव म्हणजे वाफ्याना कंट्रोल्ड उन भेटल. वेळुच्या काठ्या लावलेली दताळी घे लोखंडी दताळी हाताळत वाफे काढायला बावाजीना त्रास पडेल कारण ती खुप जड़ असतात, नोकर ठेवणार असला ते ओके, बाकी आठवला तसा सांगतो हो!
20 Apr 2016 - 9:05 pm | स्वामी संकेतानंद
सगळी औजारे शक्यतो अशीच असतील की उभ्याने काम जमेल. आमच्या बुढ्याले आता बसून काम जमे नही. वाफे करायचा दोघाइचा बी जिनगीभराचा अनुभव हाये. पर सुरुवातीले एखादा गडी ठेवतीन. मंग बाग सेट झाली का सोताच करतीन.
20 Apr 2016 - 10:03 pm | उल्का
मस्त धागा आहे. चान्गली माहिती मिळाली.
ही भाषा कोणती आहे? जन्माची मुम्बैकर असल्यामुळे नाही कळत आहे.
20 Apr 2016 - 10:19 pm | स्वामी संकेतानंद
झाडीबोली, वर्हाडी मिक्स आहे.
20 Apr 2016 - 10:52 pm | उगा काहितरीच
काहीशी उध्धट वाटते. माझा रुममेट होता यवतमाळ साईडचा सुरूवातीला साधं बोलतानाही भांडत आहे असा फील येत असे.
21 Apr 2016 - 11:41 am | पैसा
वर्हाडी ऐकताना खूप गोड वाटते. त्यात उलट मराठी प्रमाणभाषेपेक्षा मृदू वर्ण जास्त वापरले जातात.
21 Apr 2016 - 2:41 pm | उल्का
झाडीबोली - प्रथमच ऐकले हे नाव. :)
21 Apr 2016 - 6:49 pm | स्वामी संकेतानंद
मिसळपाव वर झाडीबोलीत एकेक कविता, कथा आणि लेख दिसेल. माझ्या नावाखाली लेखन शोधणे.
20 Apr 2016 - 6:48 pm | कंजूस
भाज्याचे वाफे कसे छान बनवतात ते रत्नांग्री स्टेशनजवळ बीएएसएनएलसमोर अनिरुद्धांचा मठ आहे त्यात पाहता येईल. गोठा, चाय्राचा साठा वगैरे सुबकच.
20 Apr 2016 - 10:22 pm | स्वामी संकेतानंद
रत्नांग्री म्हणजे थेट दुसरे टोक! आमची धाव पुण्यापर्यंत!
21 Apr 2016 - 9:12 am | आनंदी गोपाळ
५० बाय ९६ फूट?? त्यात वनरूम किचनेट वालं घर प्लस हे इतकं सगळं कसं बसावं? स्पेशली मोठी झाडे?
21 Apr 2016 - 9:15 am | पैसा
साडेचार गुंठे म्हणजे तशी भरपूर जागा आहे.
21 Apr 2016 - 10:14 am | स्वामी संकेतानंद
भरपूर जागा होते हो. खोली 12×12 सांगितली आहेच. अजून थोडा जागेचा अपव्यय गृहीत धरला की 16×16 जागा गुंतली समजा. तरी भरपूर जागा उरते. 80 फूट लांब आणि 34 फूट रुंद म्हणजे भरपूर आहे.
21 Apr 2016 - 1:50 pm | राजेंद्र मेहेंदळे
मिपावर शेती, बागकाम असे धागे बघुन मलाही एक छोटी शेतजमीन विकत घ्यावी असे वाटायला लागलेय.
म्हणजे बागकामाची हौस तरी करता येइल. शिवाय कंपोस्ट,सौरउर्जा, पवनउर्जा, ग्रीन हाउस, आले,लसुण्,हळद आणि फुलांमध्ये गुलाब,जरबेरा,डेलिया वगैरे (कोकोपीट वापरुन) प्रयोगही करुन बघता येतील. पैसे जमवायला सुरुवात करतो.