मराठी भाषा एक चिरन्तन जीवनप्रवाह

अनिरुद्धशेटे's picture
अनिरुद्धशेटे in जे न देखे रवी...
18 Sep 2008 - 2:31 pm

काय सान्गु तुम्हाला, मराठीचा बाज
विदर्भाच्या राणीला, कोल्हापुरी साज,
मराठ्वाड्याला ते, कोकणचे पाणी,
देउन उरला आहे, हा महाराष्ट् आज !

मराठीची लव्हाळी, रोजच नव्हाळी,
जशी देते कळी, गन्ध मन्द !

मराठी तर आहे, आताशी तारुण्यात,
जसे गीत गात, रती यौवनाचे !

माझ्या मराठी मायेचा, वाण आहे जोरकस,
इतर आहेती निकस, हिच्यापुढे !

माझ्या मराठी मायेची, लागली दिगन्ताला आस,
त्यानेही मग कास, हिची धरली !

शब्द ते हो आले, भाषेत या माझ्या,
अर्थ देउन सारस्वता, धन्य केले !

कैवल्य ही आहे, माझ्या या भाषेत
ज्ञानियाच्या वेषात, अवतरले !

नामयाच्या भिन्ती, लावल्या नाथानी,
कळ्स तुकयाने, उभविला !

हा भक्तीचा पसारा, आहेच हो न्यारा,
पिउन घ्या हा वारा, तुम्ही श्वासामधे !

या मातीत आता, पुन्हा नाही जन्म,
एवढी आजन्म, केलीत पापे !

आता एकच ती आशा, आहे मरणापाशी,
मिळावी ती कुशी, माय मराठीची !
मिळावी ती कुशी, माय मराठीची !

अनिरुद्ध

कविताअनुभव

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

18 Sep 2008 - 7:26 pm | कलंत्री

कविता छानच आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2008 - 7:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता चांगली आहे पण हे:

इतर आहेती निकस, हिच्यापुढे !

खटकलं!

दुसर्‍याने माझ्या भाषेचा, मातीचा मान ठेवावा अशी माझी अपेक्षा असेल तर मी ही तेवढंतरी केलंच पाहिजे.

अदिती

मनिष's picture

18 Sep 2008 - 7:53 pm | मनिष

कविता चांगली आहे पण हे:

इतर आहेती निकस, हिच्यापुढे !

खटकलं!

दुसर्‍याने माझ्या भाषेचा, मातीचा मान ठेवावा अशी माझी अपेक्षा असेल तर मी ही तेवढंतरी केलंच पाहिजे.

१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००% सहमत!!!!

फटू's picture

19 Sep 2008 - 7:15 am | फटू

जेव्हढा अभिमान आपल्याला माय मराठीचा असतो, तेव्हढाच आदर इतर भाषांबद्दलही असायला हवा...

बाकी कविता छान जमली आहे !!!

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अनिरुद्धशेटे's picture

19 Sep 2008 - 10:14 am | अनिरुद्धशेटे

कुठल्याही भाषेचा अनादराचा अजिबात हेतु नाही.
परन्तु, सागरमाथा (एव्ह्रेस्ट) या शिखराला जर तुम्ही सर्वात उन्च मानत असाल तर बाकीची शिखरे आपोआपच खुजी ठरतात.
आणी चन्द्रावरला डाग हे चन्द्राचे एक प्रकारचे सौन्दर्य आहे.
(मी स्वतच्या कवितेला चन्द्र मानत नाही पण एक उदाहरण)

कविता सम्पुर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद

अनिरुद्ध

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2008 - 12:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> परन्तु, सागरमाथा (एव्ह्रेस्ट) या शिखराला जर तुम्ही सर्वात उन्च मानत असाल तर बाकीची शिखरे आपोआपच खुजी ठरतात.

माऊंट एव्हरेस्ट सर्वोच्च "आहे", त्याला कुणाच्या मान्यतेची गरज नाही. त्यामुळे कोणाला कोणती भाषा महान "वाटत" असेल तर तिची तुलना एखाद्या महान "असणाय्रा" गोष्टीशी करणं चुकीचं वाटतं. Compare like to like असं इंग्लिशमधे त्यासाठीच म्हणतात.

एक (अवांतर) उदाहरण देते: आकाशात टेलिस्कोप लावून पहाताना ढगांचा त्रास होतो असं ऍस्ट्रॉनॉमर्स म्हणतात, पण ढगांच्या अभ्यास करणाय्रांना सूर्य, चंद्राचा त्रास होत असेल! त्यामुळे ढग चांगले (आणि/किंवा महान) का सूर्य-चंद्र असा वाद होऊच शकत नाही.

मी एवढंच म्हणेन, मराठी माझी मातृभाषा आहे, मला माझ्या मातृभाषेबद्दल यथोचित आदर आणि अभिमान आहे, पण म्हणून माझीच तेवढी भाषा एव्हरेस्ट आणि बाकीच्या सगळ्या तिच्या खाली असं मी म्हणणार नाही.

आणि आता एक अवांतर किस्सा: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांकडे एकदा एक ख्रिश्चन मिशनरी आले. त्यांनी न्या. रानड्यांच्या टेबलवर पुस्तकांची चळत पाहिली, त्यात सगळ्यात वर होतं बायबल. मिशनरी म्हणाले, "म्हणजे तुम्हीही मान्य करता का का बायबल या सगळ्या धर्मग्रंथांच्यावर आहे?". न्यायमूर्ती हसले आणि म्हणाले, "हो तर! आणि हे पण मानतो त्या सगळ्यांच्या मुळाशी, चळतीत सगळ्यात खाली असलेली, गीता आहे."

(अनबायस्ड) अदिती
आपल्या आणि माझ्या विचार करण्याच्या पद्धतीमधे फरक असेल, आणि मी म्हणते ते साफ चुकीचंही असेल!

विसोबा खेचर's picture

18 Sep 2008 - 10:53 pm | विसोबा खेचर

कैवल्य ही आहे, माझ्या या भाषेत
ज्ञानियाच्या वेषात, अवतरले !

नामयाच्या भिन्ती, लावल्या नाथानी,
कळ्स तुकयाने, उभविला !

हा भक्तीचा पसारा, आहेच हो न्यारा,
पिउन घ्या हा वारा, तुम्ही श्वासामधे !

वा! केवळ अप्रतीम काव्य! शेवटचं कडवंही सुरेख...

अनिरुद्धा, जियो...!

आपला,
(मराठी) तात्या.

गणा मास्तर's picture

19 Sep 2008 - 7:52 am | गणा मास्तर

आता एकच ती आशा, आहे मरणापाशी,
मिळावी ती कुशी, माय मराठीची !
मिळावी ती कुशी, माय मराठीची !
हे आवडले
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

मदनबाण's picture

19 Sep 2008 - 10:32 am | मदनबाण

छान कविता ..
मराठीची लव्हाळी, रोजच नव्हाळी,
जशी देते कळी, गन्ध मन्द !
व्वा..

मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda