एक दीर्घ कथा....... एकाकी

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
31 Mar 2016 - 10:20 am

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या कथेत चित्रकाराऐवजी दुसरा कुठलाही कलाकार व कलेचे नाव घातले तरीही चालेल. या कथेचा अर्थ हा दोन पातळ्यावर लावता येतो. एक म्हणजे एका सामान्य कलाकाराचे, कितीही अवसान आणले तरीही शेवटी काय होते हा आणि दुसरा म्हणजे कलाकाराला त्याच्या कलेच्या अर्थापलिकडे काहितरी गवसल्यावर काय होते हा....तुम्हीच ठरवा काय ते.....
कथा जरा मोठी अहे पण दोन भाग टाकण्यात मजा येणार नाही असे वाटल्याने एकाच भागात टाकली आहे.

एकाकी....

चित्रकार अजित प्रधानचा दैवावर प्रचंड विश्र्वास. त्याचा दैवावर विश्र्वास असला तरी त्याला दुसऱ्यांच्या धर्माबद्दल, विचारससरणीबद्दल आदरही होता. अर्थात त्याला त्याच्या लायकीपेक्षाही जास्तच मिळणार याबद्दल त्याला खात्री होती. दैवगतीच तशी होती असे त्याचे म्हणणे होते. त्याच्या या दृढ विश्र्वासाची फळे म्हणून त्याच्या पस्तिसाव्या वर्षी त्याच्या कलेचे खरे मुल्य कोणी ओळखले याचे श्रेय घेण्यासाठी अचानक डझनभर टिकाकारांच्यात वाद सुरु झाल्यावर त्याला त्याचे मुळीच आश्चर्य वाटले नाही. ही सगळी नशिबाचीच कृपा आहे असा विश्र्वास असल्यावर आश्चर्य वाटायचे काही कारण उरले नव्हते. मिळालेल्या यशामुळे डोक्यात हवा न जाता तो जास्तच शांत व नम्र झाला. अर्थात काही लोक त्याला हेटाळणीने आत्मसंतुष्ट म्हणत पण तसे विघ्नसंतोषी समाजात असतातच. पण अजित प्रधान सगळ्याचे श्रेय त्याच्या नशिबाला देऊन निवांत होता.

एका चित्रांच्या दलालाने त्याला महिन्याचा पगार चालू करण्याची तयारी दाखविल्यावर त्याला थोडास आश्चर्याचा धक्का बसला खरा पण त्याने तो प्रस्ताव स्वीकारल्यावर तर त्याची काळजीच मिटली. पण त्याच्या शाळकरी मित्राने मात्र कुत्सितपणे शेरा मारला,

‘‘हे पैसे काय पुरणार. बहुतेक तो दलाल तुझ्या चित्रात गुंतवणुकीचा धोका पत्करण्यास तयार नसावा.’’ हा मित्र अजित प्रधानाचा (जो काही झाला होता तो) उत्कर्ष प्रथमपासून पहात होता. याचे नाव होते शरद शिरसाठ. व्यवसायाने वास्तुविशारद.

"ठीक आहे !’’ अजित प्रधान म्हणाला.

‘‘ठीक आहे काय ?’’ शरद जवळजवळ त्याच्यावर ओरडलाच.
‘‘जरा घासाघीस कर ना त्याच्याबरोबर!’’ अर्थात त्याचा काही उपयोग झाला नाही. अजित प्रधानने नेहमीप्रमाणे या प्रस्तावासाठी त्याच्या नशिबाचे आभार मानले व त्या दलालाला म्हणाला,

‘‘आपण म्हणाल तसं करु !’’ एवढेच म्हणून तो थांबला नाही तर सारा वेळ चित्रे काढता यावीत म्हणून त्याने आपल्या पिढीजात प्रकाशनाच्या धंद्यातून कायमची रजा घेतली.

‘‘ नशीब माझे, मला जे आवडते ते करण्यास संधी मिळते आहे !’ तो मनाशी म्हणाला.

मागे वळून पाहताना त्याच्या नशिबाची साथ पदोपदी मिळालेली त्याला आठवू लागली. प्रथम त्याने त्याच्या मातापित्यांचे त्याची हेळसांड केल्याबद्दल विशेष आभार मानले. त्याच्या आईवडिलांनी व्याभिचाराच्या कलमाखाली घटस्फोट घेतला होता. आता हेळसांड म्हणजे सामान्यजनांच्या दृष्टिकोनातून हेळसांड. म्हणजे ते त्याला वळण वैगेरे लावण्याच्या फंदातच पडले नव्हते. त्याच्या वडिलांनी घटस्फोटाचे कारण व्याभिचार असे दिले होते पण तो कसला हे सांगण्यास ते सोयिस्कररित्या विसरले होते. ती बिचारी वंचितांसाठी आपले तन मन धन अर्पण करुन त्यांची सेवा करीत होती पण त्याच्या वडिलांना तिच्यात आता कोणताही भागीदार नको होता. ते जमले नाही म्हणून घटस्फोट.

अर्थात त्यांच्यातील हे गैरसमज अजित प्रधानच्या पथ्यावरच पडले असे म्हणायला हरकत नाही. त्याच्या आईवडिलांनी घटस्फोटितांच्या मुलांबाबत अनेक चमत्कारिक व सुरस हकिकती ऐकल्या होत्या. अशा लित्येक मुलांनी आईवडिलांचे प्रेम न मिळाल्यामुळे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते. क्वचित खूनही. ते ऐकून त्यांच्या अंगावर काटाच येई व आपल्या मुलावर असा प्रसंग येऊ नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत. आपापल्या परीने ते मुलाला खुष ठेवण्याचा प्रयत्न करीत. अर्थात त्यांची त्याबाबतीत तेवढीच जाण होती. तो गप्प बसला की त्यांची काळजी वाढे. त्याच्या मनात काय वादळे उठली असतील याचा ते सतत अंदाज घेत. तो जेवढा शांत बसे तेवढी काळजी त्यांचे काळीज पोखरत असे. जेवढा तो शांत बसत असे तेवढे त्याचे जास्त लाड होत असत. त्याच्या दृष्टीने हा सगळा नशिबाचा भाग होता आणि त्यावर तो खुष होत.

पण या नशिबाला एक गालबोट लागलेच ते एका भावासारख्या मित्राच्या स्वरुपात. बरोबर ! शरद शिरसाठच्या रुपाने. शिरसाठच्या आईवडिलांना त्यांच्या मुलाच्या या छोट्या मित्राची नेहमी काळजी, किंव वाटे. त्यांच्या सांगण्यावरुनच खिलाडूवृत्तीच्या शिरसाठने अजित प्रधानशी मैत्री वाढवली होती. अर्थात अजित प्रधानच्या आजवरच्या यशाचाही त्यात खारीचा वाटा होता हे नाकारण्यात अर्थ नाही म्हणा ! मित्राचे कौतुक, त्याच्या मैत्रीचा आधार व कडवट टिका या तीनही गोष्टींचा अजित प्रधानने नेहमीप्रमाणेच अत्यंत शांतपणाने व साधेपणाने स्वीकार केला. नशीब दुसरे काय !

विशेष काही कष्ट न करता अजित प्रधानने स्वत:चे शिक्षण पूर्ण केले आणि परत एकदा त्याला नशिबाने साथ दिली. त्याला चक्क त्याच्या वडिलांच्या प्रकाशन संस्थेमधे नोकरीची संधी चालून आली आणि ती सुद्धा चित्रकाराची. त्याचे वडील महाराष्ट्रातील एक प्रथितयश प्रकाशक होते आणि त्यांची मते ठाम होती.

ते म्हणत ‘‘ संस्कृतीचा ऱ्हास झाल्यावर आपल्याला पुस्तकेच आपले भवितव्य आहेत हे उमगेल.’’

‘‘हे वारंवार सिद्ध झाले आहे की जेव्हा लोक पुस्तके वाचणे बंद करतात तेव्हाच त्यांची विक्री वाढते.’’

हे वाचायला विचित्र वाटेल पण नीट विचार केल्यावर त्यातील मेख आपल्या लक्षात येईल. आणि ते स्वत:तरी कुठे पुस्तके वाचत? प्रकाशनासाठी आलेल्या हस्तलिखितांकडे ते ढुंकुनही पहात नसत उलट लेखकाच्या व्यक्तिमत्वावर ते त्यांचा निर्णय घेत. त्यांच्या निर्णयामागे व्यावसायिक गणिते असत. ते लोकप्रिय विषयांवर पुस्तके काढण्यास मागे पुढे बघत नसत आणि त्यांच्या व्यवसायाच्या यशाच्या मागे त्यांची कामशास्त्रावरची पुस्तके होती हे उघड गुपीत होते. या नोकरीत त्याला हस्तलिखितांच्या मुद्रण विभागात काम करण्यास मिळाले. हाताशी भरपूर वेळ असल्यामुळे त्याची चित्रकलेशी ओळख झाली व आमच्यावर ही कथा लिहिण्याची वेळ आली.

सुरवातीला अत्यंत उत्साहाने त्याने रंगविण्यास सुरुवात केली व काहीच दिवसात तो दिवस दिवस रंगवू लागला. त्याच्या नशिबाने काहीच काळात त्याने चित्रकलेत व तैलचित्र रंगविण्यामधे सामान्य चित्रकार जी उंची गाठतात ती उंची गाठली. त्याला आता रंगविण्यापलिकडे काही सुचेना. तो या कलेत इतका बुडून गेला की त्याला त्याच्या लग्नासही अवसर मिळेना. लग्नाचा विषय निघाला की त्याच्या चेहऱ्यावर एक गुढ स्मितहास्य अवतारायचे, ज्याचा अर्थ त्याचे मित्र वेगवेगळा काढायचे. अजित प्रधानचे लग्न होण्यासाठी त्याचा आणि शरद शिरसाठचा एक अपघात व्हावा लागला. शरद शिरसाठच्या फटफटीवरुन चक्कर मारताना त्यांचा अपघात झाला आणि अजित प्रधानचा हात प्लास्टरमधे गेला. पण त्यातही त्याला त्याच्या नशिबाने साथ दिली आणि त्याची नजर शरद शिरसाठला भेटायला आलेल्या वीणावर पडली.

शरद शिरसाठच्या मते वीणाकडे लक्ष जाण्यासारखे काहीही नव्हते. तो स्वत: बुटका होता पण त्याला उंच मुली आवडत. त्याने मोठ्या तुच्छतेने अजित प्रधानला विचारले, ‘उत्खननात सापडलेल्या बाहुलीसारख्या दिसणाऱ्या त्या मुलीत तुला काय आवडले हेच समजत नाही. वीणा लहान चणीची, सावळी पण बांधेसुद होती. तिचा चेहरा तसा सुंदर होता. उंचापुरा अजित प्रधान या बुटक्या बाहुलीवर भाळला ते तिच्या कामसू स्वभावामुळे. ती सतत काही ना काहीतरी काम करीत असायची. तिच्याकडे बघताना असे वाटायचे की हिला देवाने जणू काम करण्यासाठीच जन्माला घातले आहे. अजित प्रधान जेवढा शांत तेवढीच ही अस्वस्थ असायची. तिचे सतत काहीतरी चाललेले असायचे. पण नशिबाने ही दोन टोके त्यांच्या संसारात छान जुळली होती. वीणाने साहित्याला लगेचच वाहून घेतले. तिला त्यात रस होता म्हणून नव्हे तर तिला वाटले की अजित प्रधानला साहित्यात रस आहे म्हणून्. तिने वाचनाचा सपाटा लावला व काहीच काळात ती कुठल्याही साहित्यकृतीवर बोलू लागली. अजित प्रधानला तिचे कौतुक वाटे ते ती एवढे वाचते म्हणून नव्हे तर त्याला आता काहीही वाचायची गरज उरली नाही म्हणून्. वीणा त्याला वाचून इतकी माहिती पुरवत असे की त्याने वाचणे सोडून दिल्यातच जमा होते. भाषेतील अलंकार, नवनवीन प्रवाह, शोध इ इ ची माहिती देऊन ती त्याला काळाचे भान आणून देई. उदा. ‘‘तो किंवा ती लबाड व बदमाश आहे असे न म्हणता तो लबाड किंवा बदमाश असल्याचे भासवतो असे म्हणावे....’’ या दोन्हीमधे फरक होता आणि तो महत्वाचा होता. शरद शिरसाठला यावर पुढे वाद घालायचा असे पण वीणाने एक दिवस ‘हा फरक मुलभूत स्वरुपाचा असल्यामुळे यावर चर्चा होऊ शकत नाही असा निर्णय देऊन तो विषय निकालात काढल्यावर अजित प्रधानने तातडीने त्या चर्चेतून सन्मानाने माघार घेतली, ‘‘वीणा, तू म्हणशील तसं !’’ यावेळी मात्र त्याला त्याच्या नशिबाची आठवण झाली नाही हे सत्य आहे.

अजित प्रधानला खरा रस चित्रकलेत आहे हे उमगल्यावर वीणाने प्रथम काय केले असेल तर तिने साहित्याला "दूर हो जा मेरी नजरोसे'' केले. तिने चित्रकलेच्या अभ्यासाची कास धरली. तिने परत एकदा विविध आर्ट गॅलरींना भेटी देण्याचा सपाटा लावला. ती जाताना बरोबर अजित प्रधानला घेऊन जायची. दुर्दैवाने अजित प्रधानला त्याचे समकालिन चित्रकार काय रंगवत आहेत याचा काहीच गंध नव्हता आणि ना त्याला त्यांची चित्रकला समजे. त्याच्या साध्या, सुमार बुद्धीला ते झेपतच नसे. पण वीणा जी माहिती त्याला देत असे त्याने त्याला आनंदच होत असे. त्या अनंदाच्या भरात काल पाहिलेल्या चित्रकाराचे नाव ही त्याच्या लक्षात रहात नसे. पण वीणा त्याची समजूत काढायची, ‘‘ अजित, मी वाचले आहे, एकदा माणसाने एखादी गोष्ट पाहिली की ती तो कधीच विसरत नाही. त्याच्या मनाच्या कोणच्या तरी कप्प्यात त्याची स्मृती राहतेच.’’ तिच्या या वाक्याने त्याला लक्षात ठेवणे आणि विसरणे या दोन मुलभूत गरजांची सांगड घालता येऊ लागली. त्याला अर्थातच विसरण्यामधेच जास्त आनंद व्हायचा ही गोष्ट वेगळी. त्याच्या नशिबातच तसे होते त्याला तो तरी काय करणार ?

पण वीणाच्या पत्नीव्रताने त्याला चांगलेच तारले होते. एखाद्या आदर्श भारतीय पत्नीसारखी ती त्याला सांभाळत होती. त्याला बूट विकत घेण्यासाठी दुकानात जावे लागत नव्हते ना बनियन आणण्यासाठी. सामान्य पुरुषांच्या आयुष्यातील कितीतरी वेळ असल्या तापदायक गोष्टींनी व्यापलेला असतो. अगोदरच छोटे असलेले आयुष्य या असल्या निरर्थक अजूनच छोटे होते असे नाही वाटत तुम्हाला ? वेळ जाणारी सगळी कामे तिने स्वत:च्या अंगावर घेतली होती. ‘‘पण नशीब ती तुझ्या ऐवजी दाताच्या डोंक्टरकडे जाऊ शकत नाही’’ तिचे कौतुक ऐकून हसत शरद शिरसाठ म्हणाला. अर्थात ते शक्य असेल तर तिने तेही केले असते, पण नवऱ्यासाठी ती डॉक्टरांना दूरध्वनी करणे त्यांची वेळ मागणे या गोष्टी तीच करत असे. गाडीतील तेल बदलणे, गावाला गेल्यावर हॉटेलमधे खोल्यांचे आरक्षण करणे इ. इ. कामे तिच करीत असे. अजित प्रधानला जर कोणाला भेटवस्तू द्यायची असेल तर तीही जबाबदारी ती आनंदाने पार पाडत असे. एवढेच नाही तर कधीकधी ती त्याच्या घरावरुन जाताना आत डोकावत असे व तो नसला तर, त्याला त्रास नको म्हणून त्याच्या अंथरुणाच्या घड्याही घाले.

ज्या उत्साहाने व प्रेमाने ती या गोष्टी करे त्याच भावनेने ती त्याच्या बरोबर त्याच्या अंथरुणातही शिरत असे. दोन वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या आर्ट गॅलरीमधे तिनेच त्याला नेले व तेथेच त्याच्या प्रतिभेचा जगाला शोध लागला. लग्नानंतर मधुचंद्रासाठी तिनेच जागेची निवड केली अर्थात त्या शहरात आर्ट गॅलरी असेल याची तिने खबरदारी घेतलीच होती. लग्नाआधी तिने एक तीन खोल्यांचे घरही बघून ठेवले होते ज्यात त्यांनी आल्याआल्या त्यांचा संसार थाटला. त्यानंतर तिने दोन मुलांना जन्म दिला. एक मुलगा व एक मुलगी. तिची तिसऱ्या अपत्याची इच्छा पूर्ण झाली तेव्हा अजित प्रधानने त्याची नोकरी सोडून पूर्णवेळ चित्रकलेला वाहून घेतले होते.

मातृत्वानंतर एक सांगितलेच पाहिजे की तिने आता आपल्या मुलांसाठी आपले आयुष्य वाहून घेतले. ती तिच्या नवऱ्याला जमेल तशी मदत करीत होती पण तिला बिचारीला वेळच मिळायचा नाही. अजित प्रधानची हेळसांड होत आहे याबद्दल तिला फारच खेद वाटे पण तो व्यक्त करण्यासाठीसुद्धा आता तिच्याकडे वेळ नव्हता. ‘‘ सगळ्यांनाच आपापली कामे आहेत. हे आता असच चालायच.’’ ती म्हणे. या वाक्याचा त्याला बिलकुल राग आला नाही. इतर कलाकारांप्रमाणेच अजित प्रधानला कोणीतरी आपली काळजी घ्यावी आणि आपण फक्त चित्रे काढण्यात, रंगविण्यात वेळ घालवावा असे फार वाटे. त्याला हे दुकानात जाणे, खरेदी करणे हे जरा अवघड वाटू लागले. पण लग्न झालेल्या पुरुषांना शांततेची किती आवश्यकता भासते हे कोणाला सांगायला नकोच. बाहेर गेल्यावर तीच शांतता त्याला घटका दोन घटके मिळे त्यामुळे त्याने याबद्दलही फारशी कुरकुर केली नाही.

हे सगळे खरे असले तरीही जागेची अडचण भासत होती. वेळ आणि जागा झपाट्याने कमी होत होत्या. खाणारी तोंडे वाढल्यामुळे, नवीन व्यवसाय व महिन्याचा तुटपुंजा पगार या सगळयामुळे नवीन मोठे घर घेणे अवघड होते. या लहान जागेत वीणाच्या सतत होणाऱ्या हालचाली व अजित प्रधानचे रंगकाम या दोन्हींना जागा मिळेना. त्यांची ही जागा शहराच्या जुन्या भागात, एका जुनाट पण प्रचंड ब्रिटिशकालीन वाड्यात होती. असे म्हणतात कधी काळी एक ब्रिटिश अधिकारी तेथे रहात असे. अनेक कलाकार शहराच्या त्याच भागात रहात होते. (कारण अशा जुनाट वातावरणातच नवीन कल्पना स्फुरतात यावर त्यांचा दृढ विश्वास होता...म्हणजे सगळ्याच चित्रकारांचा तसा असतो असे म्हणतात) अजित प्रधानचाही यावर विश्र्वास असल्यामुळे तोही त्याच जागेला एखादी जळू चिकटावी तसा चिकटला होता.

ती जागा जुनी होती त्याचे काही दु:ख नव्हते पण त्यात जमिनीपेक्षा हवेला जास्त जागा होती. खोल्यांची उंची भिंतीतील उंच खिडक्यांना साजेशी होती जणू काही एखादे सभागृहच. त्या इमारतीचे मालक बदलत होते आणि नवीन नवीन मालकांनी फायद्यासाठी त्या जागेचे भिंती बाधून तुकडे पाडले होते. त्याच काळात एखाद्या कुटुंबाला किती घनफूट जागा लागते हा वाक्प्रचार उपयोगात आणला गेला असावा. त्या उंच छताच्या खोल्यांचे आडवे तुकडे पाडता आले असते तर मालकांनी अजून काही कुटुंबांची सोय करण्यासाठी तेवढा त्याग निश्चितच केला असता. उन्हाळ्यात त्या खिडक्यांमधून असह्य्य उजेड आत यायचा कारण पडद्याचे कापड कोणालाच परवडण्यासारखे नव्हते. मालकांना त्याची चिंता नव्हती कारण खिडक्यांना हवे तसे पडदे लावण्याची जबाबदारी बिऱ्हाडकरुंची होती. आजवर तरी पडदे लावणारा बिऱ्हाडकरु तेथे राहण्यास आला नव्हता. शिवाय मालक बिऱ्हाडकरुना बिलकुल मदत करीत नसत. खरे तर त्यांना त्यांच्या ओळखीच्या दुकानदाराकडून त्यांना स्वतात कापड मिळवून देणे सहज शक्य होते. पण मालक मंडळींचा दानशूरपणा हा फक्त एक दिखावा असतो म्हणा. फोटोपुरता !

अजित प्रधानने त्या घराला त्याच्या फायदातोट्यासहीत स्वीकारले होते. नेहमीप्रमाणे तसे करण्यात त्याला कुठलीच अडचण आली नाही. जेव्हा त्याच्या घराच्या मालकांनी घराच्या दुरुस्तीला नकार दिला तेव्हा तो म्हणाला, ‘‘ठीक आहे ! तुम्ही म्हणाल तसे.’’ पडद्याबाबत म्हणाल तर, ती बिचारी म्हणाली, ‘‘आपल्याकडे लपविण्यासारखे काय आहे? तेव्हा पडदे लावायचे ? एक पुरे !’’ वीणाचे ऐकून त्याने त्यांच्या शयनगृहाला फक्त एकच पडदा लावला. छताची उंची एवाढी भयानक होती की त्यावरचे दिवे बदलणे शक्यच नव्हते. घरचेप्रवेश द्वार त्याच खोलीत उघडत असे. ही खोली एक अरुंद खोलीने उर्वरीत दोन खोल्यांशी जोडलेली होती. या हॉलच्या शेवटी एक स्वयंपाकघर, स्नागृह इ. होते. स्नानगृहात शॉवर होता पण त्याला पाणी नव्हते. त्या खोल्यांच्या उंच छतांमुळे व काचेच्या तावदानांमुळे त्या खोल्यांना भुमितीतील आकृत्यांचे स्वरुप आले होते. घरातील इनमिन माणसे बुचबंद बाटली ज्या प्रमाणे पाण्यावर तरंगते त्याप्रमाणे त्या घरात तरंगत असल्याचा भास होई. शिवाय या खिडक्यांची तावदाने एका बोळात उघडत व त्यातून समोरच्या खिडक्यांना हात लावता येईल असे कोणालाही वाटेल. या सगळ्या तावदानांमुळे एक वेगळाच आभास तयार होई. ‘‘हे तर काचेच घर आहे !’’ अजित प्रधान म्हणाला. शरद शिरसाठच्या सल्ल्यानुसार दोन खोल्यांपैकी एका छोट्या खोलीचे त्यांनी शयनगृह केले तर दुसरी त्यांनी त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी रिकामी सोडली. मोठ्या खोलीत अजित प्रधानने त्याची रंगशाळा थाटली व तीच खोली संध्याकाळी बैठकीची खोली व रात्री जेवण्यासाठी म्हणून ते वापरु लागले. अगदीच वेळ पडल्यावर ते स्वयंपाकघरातही उभे राहून जेवत. शरद शिरसाठनेही त्यांना जमेल तशी मदत केली. उदा. घड्या घालता येणारे फर्निचर बनवून त्याने त्या विचित्र घरामधे मोलाची भर घातली.
पण जशी खोली चित्रांनी व मुलांनी भरली, त्यांना अखेरीस घराच्या फेरअमांडणीचा विचार करावाच लागला. तिसरे मूल जन्माला येण्याआधी अजित प्रधान त्या मोठ्या खोलीत रंगकाम करायचा व वीणा शयनगृहात विणकाम करायची. दोन मुले शेवटच्या खोलीत गोंधळ घालायची व तेथे कंटाळा आल्यावर इतर खोल्यात धुडघुस घालायची. त्यातून अजित प्रधानची कामाची जागाही सुटायची नाही. शेवटी येणाऱ्या बाळाचा पाळणा अजित प्रधानच्या चित्रशाळेच्या एका कोपऱ्यात ठेवण्याच्या बाबतीत त्यांचे एकमत झाले. त्यानेही आपला एक कॅनव्हास तेथे ताणून बसविला व मस्त पैकी एका खोलीचा आभास तयार केला. याने दोन फायदे झाले. एक तर बाळ रडले तर त्याला लगेच ऐकू येऊ लागले व त्याला त्याचे दूरध्वनीही पटकन घेता येऊ लागले. अर्थात अजित प्रधानला कामातून कधीच उठावे लागले नाही कारण वीणा पटकन बाळापाशी पोहोचायची. खरे तर ती बाळ रडण्याआधीच चोरपावलांनी बाळापाशी पोहोचलेली असायची. तिचे हे चालणे पाहून एक दिवस अजित प्रधानलाच तिची किव आली व तो तिला म्हणाला,

‘‘वीणा मला तुझ्या पावलांच्या आवाजाचा एवढा काही त्रास होत नाही बरं का ! मी करु शकतो काम !’’

‘‘मी बाळाला जाग येऊ नये म्हणून तसे करते....’’ वीणाने उत्तर दिले.

अजित प्रधान ते ऐकून ओशाळला पण त्यातही त्याला ती बाळाची किती काळजी घेते याचे कौतुक वाटले. खरे तर तिच्या अशा चोरपावलांनी येजा करण्याच्या पद्धतीने त्याला जास्त त्रास होई पण तसे तिला सांगण्याचे त्याचे धाडस झाले नाही हे खरे. ती आत येई व बराच वेळ त्या खोलीत थांबे. शिवाय बाळाला खेळवताना तिच्या लोभस हालचालींकडे त्याचे तिच्याकडे आपोआप लक्ष जायचेच. तिच्या हालचालींनी ती एखादा कॅनव्हास जमिनीवर पाडेल की काय याची त्याला सतत भिती वाटे ते वेगळेच. एखादा कॅनव्हास पडल्यावर त्याच्या आवाजाने बाळ उठे व त्याची त्रासिक प्रतिक्रिया त्याच्या चेहऱ्यावर उठे. कधी मोठा मुलगा त्याच्या खोलीत येई व त्याला हातात ब्रश तसाच धरुन त्याचे म्हणणे ऐकायला लागे.

याच काळात अजित प्रधानला त्याच्या यशामुळे बरेच मित्र व चाहतेही मिळाले. या चाहत्यांचे सतत दूरध्वनी येत व काही वेळा ते अचानक घरी टपकत. हा दूरध्वनी त्यांनी मुद्दाम त्याच्या चित्रशाळेच्या खोलीत ठेवला होता पण तो वाजला की बाळ हमखास किंचाळून त्याच्या सुरात सूर मिळवायचे. बिचारी वीणा तो दूरध्वनी घेण्यासाठी धावपळ करे पण ती तेथे पोहोचेपर्यंत तिला अजित प्रधान एका हातात बाळाला घेऊन, कुंचला सांभाळत त्या दूरध्वनीवर बोलताना दिसे. हा दूरध्वनी बहुतेक वेळा दुपारच्या जेवणाच्या निमंत्रणासाठी कुठल्यातरी मित्राकडून आलेला असायचा. त्याच्या बरोबर जेवण्याचा हट्टहास हे मित्र व चाहते का करीत याचे अजित प्रधानला नेहमीच आश्चर्य वाटे कारण त्याचे बोलणे कंटाळवाणे असे. त्यात नाविण्य अभावानेच असे. पण त्याला संध्याकाळी असली आमंत्रणे स्वीकरण्यास आवडे. संध्याकाळी बाहेर गेल्यावर त्याचे कामही अर्धवट पडत नसे. पण दुर्दैवाने त्याच्या या मित्रांना फक्त दुपारीच वेळ मिळायचा व त्याच दिवशी. थोडासा आग्रह झाल्यावर अजित प्रधान ते निमंत्रण त्याच्या नेहमीच्या वाक्याने स्वीकारायचा, ‘‘आपण म्हणाल तसे !’’ बाळाला घेण्यासाठी पुढे आलेल्या वीणाला तो पुटपुटत म्हणायचा, ‘‘ हंऽऽ आज रात्री जेवायला जावे लागेल बहुदा !’’ बाळाला तिच्याकडे सोपवून मग तो परत कामाला लागायचा पण तेवढ्यात त्याची जेवायची वेळ व्हायची. मग कॅनव्हास नीट बाजूला सारुन तो मुलांबरोबर जेवायला बसे. जेवतानाही त्याची एक नजर त्याच्या तैलचित्रावर असे. त्या चित्राकडे पाहताना त्याला मुले किती हळुहळु जेवताएत, कधी एकदा त्यांचे जेवण संपतय असे व्हायचे त्याला. कुठल्याही भारतीय मुलाला तो आऊट झाल्यावर सगळे कधी एकदा उरलेली आख्खी टीम आऊट होऊन तो गोलंदाजीला लागतोय जसे होते तसेच ! म्हणजे सुरवातीला तरी त्याला असे वाटायचे. पण त्याने कुठल्यातरी वर्तमानपत्रात एका लेखात घास चावून चावून जेवण्याचे फायदे वाचले असल्यामुळे त्यांची जेवणे लांबली तरी त्याबद्दल त्याची विशेष तक्रार नव्हती.

कधी कधी त्याचे मित्रही टपकत. पण शरद शिरसाठ मात्र रात्रीच्या जेवणानंतरच हजेरी लावायचा. त्याला त्याच्या कार्यालयात काम असे आणि त्याला हे माहीत होते की चित्रकार शक्यतो दिवसाच चित्रे रंगवीत. पण अजित प्रधानच्या नवीन मित्रांची जातकुळी वेगळी होती. ते अजित प्रधानच्याच कुळातील होते. कलाकार आणि कलाटिकाकार. काहींनी तैलचित्रे रंगविली होती तर काहींना सुरुवात करायची होती. उरलेल्यांना काय रंगविले जात होते किंवा काय रंगविले जाणार आहे याबद्दल नितांत उत्सुकता असायची. या नवीन मित्रांना एखादे तैलचित्र किंवा कलाकृती जन्माला येण्यासाठी कलाकाराला कुठल्या अवस्थेमधून्, वेदनेमधून जावे लागते यात जास्त रस असायचा. चित्र काढण्यापूर्वे ते कसा विचार करतात, डोळे मिटून कसे ध्यान लावतात आणि मग ते चित्र कसे त्या कॅनव्हासवर अवतारायला लागते हे सगळे पाहण्यात त्यांना मोठी मजा येई. ते अजित प्रधानच्या मागे लागत, ‘‘आम्ही येथे नाही असे समजून तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. आमच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करा. कलाकाराच्या वेळेची किंमत आम्हाला कळते !’’ असे चाहते मित्र दिल्याबद्दल नशीबाचे आभार मानत मग त्यांच्या आग्रहाने खुष होत अजित प्रधान परत आपल्या तैलचित्राकडे वळे. अर्थात रंगवताना तो त्याच्या या नवीन मित्रांचा एकही प्रश्न अनुत्तरीत राहणार नाही याची काळजी घेत असे. कधी कधी त्याला या नवीन मित्रांच्या बोलण्यास दादही द्यावी लागे ते वेगळेच.
त्याच्या या साधेपणामुळे त्याच्या चाहत्यांना तेथे अगदी घरच्यासारखे वाटे. ते त्याच्या कुंचल्याकडे भान हरपून पाहताना जेवणाची वेळ विसरुन जात. पण मुलांना जेवण्याची वेळ पक्की लक्षात असे. ती तेथे येऊन मित्रांच्या अंगा खांद्यावर बागडत. तेही त्यांचे कोडकौतुक करीत. अखेरीस खिडक्याबाहेरील उजेड काळवंडला की अजित प्रधान आपले ब्रश खाली ठेवे. त्यानंतर गप्पा मारण्याशिवाय दुसरा काही उद्योग उरत नसे. मित्रांना बोलावून त्यांच्याशी काव्य शास्त्र विनोद व तैलचित्रांवर गप्पा मारत रात्र कधी उलटायची ते समजतही नसे. गप्पांमधे अर्थातच सामान्य कलाकार, बनावट चित्रे तयार करणारे चित्रकार किंवा तेथे उपस्थित नसलेल्या कलाकारांची उणीदुणी काढली जायची. दिसाच्या पहिल्या उजेडाचा फायदा उचलण्यासाठी अजित प्रधानला खरे तर पहाटे उठण्यास आवडे. हे असे रात्री जागून पहाटे उठणे अवघड जाणार आहे हे त्याला कळत होतं. पण त्याला संध्याकळच्या चर्चांमधून बरीच माहिती मिळायची जी त्याच्या चित्रकलेसाठी अप्रत्यक्ष मदतच करायची..‘कलेमधे काहीच वाया जात नाही...... अगदी निसर्गाप्रमाणे !’’ तो म्हणायचा. याचे ही श्रेय तो नशिबालाच देऊन मोकळा व्हायचा.

या जमणाऱ्या मित्रांमधे आता अजून एक जमात येऊ लागली. त्याचे शिष्यगण. हो ! आता अजित प्रधानला गुरुस्थानी मानणारेही बरेच झाले होते. प्रथम त्याला कळेना की हे लोक त्याच्याकडून काय शिकणार ? त्याच्यातील चित्रकारच अजून अंधारात चाचपडत होता. तो काय यांना मार्गदर्शन करणार ? पण लवकरच त्याला कळून चुकले की शिष्य म्हणजे त्याला काहीतरी शिकायचे असते असे मुळीच नसते. किंबहुना बहुतेक जण मास्तरला शिकविण्याची संधी मिळते म्हणून शिष्यत्व पत्करतात. त्याला त्याच्या मर्यादांची चांगलीच जाणीव असल्यामुळे त्याने हा मान सहजतेने स्वीकारला. चर्चेदरम्यान अजित प्रधानचे शिष्य त्याने काय रंगविले आहे त्याचे सवीस्तर स्पष्टिकरण द्यायचे. एवढेच नाही तर त्याने ते तसे का रंगविले असावे यावरुन त्यांच्यात वादही व्हायचे. या चर्चेदरम्यानच अजित प्रधानला त्यानेच रेखाटलेल्या चित्रांमधील अनेक नवीन गोष्टी कळू लागल्या. एखाद्या ठिपक्यामागील कारण त्याला उमजू लागले. कित्येक रंगछटा तर त्याने तेथे चुकून वापरल्या होत्या, त्याचेही महत्व त्याला कळू लागले. तैलचित्राच्या बाबतीत तो स्वत:ला दरिद्री समजायचा पण त्याच्या या शिष्यगणांनी त्याला एकदम श्रीमंतच करुन टाकले. चेहऱ्यावर शक्य तितका तत्ववेत्त्याचा भाव आणत तो आता सहज बोलू लागला,

‘‘तो मागे दिसतोय तो चेहरा पार्श्वभूमीतून थोडासा उठावदार झालेला दिसतो खरा. आता या आकाराला अव्यक्त चेहरा ते का म्हणतात हे समजून घ्या.... पण त्या होणाऱ्या भासामधून मी मला जे साध्य करायचे आहे त्याच्या थोडंफार जवळ पोहोचलोय असे मला वाटते....’’

पण काहीच क्षणात तो त्या गुढार्थाला नशिबावर सोडून द्यायचा.

या शिष्यगणाचा अजून एक फायदा होताच. त्यांनी अजित प्रधानला इतक्या उंचीवर नेऊन ठेवले होते की अजित प्रधानला त्यांच्यासाठी तरी खूपच धडपड करावी लागत होती. आता त्याला थोडेही इकडे तिकडे करुन चालणार नव्हते. किंवा बावळटासारखे वागून चालणार नव्हते. त्यामुळे एक झाले की एखादा कुंचल्याचा अवघड फटकारा मारल्यावर त्याला चॉकलेट चघळायची जी सवय होती ती पूर्णपणे सुटली. अर्थात तो एकटा असताना त्याच्या त्या सवयीला बळी पडायचा पण ते त्याला चालत होते. त्याच्या सुदैवाने त्याचे शिष्यगण व मित्र त्याच्यावर असे प्रसंग क्वचितच येऊ देत. त्यांच्यासमोर असे पोरकटपणे वागणे अर्थातच त्याला शोभले नसते...

शिवाय त्याचे हे विद्यार्थी त्याला त्याच्या कलेशी प्रामाणिक राहण्यासाठी नेहमीच आग्रह धरायचे हाही एक फायदा होताच. अजित प्रधानला मात्र त्याच्या धडपडण्याने त्याच्या कलेचा काय अर्थ समजला हे अजून समजत नव्हते. कलात्मकता म्हणजे काय याचा रोज नवीन अर्थ त्याला लावायला लागायचा. पण त्याच्या विद्यार्थ्यांना याबाबतीत रोज नवीन कल्पना सुचायच्या व त्या कल्पनांची कुचेष्टा केलेली त्यांना मुळीच खपत नसे.

कधीकधी अजित प्रधानला कलाकारांचा सगळ्यात जवळचा मित्र ‘विक्षिप्तपणा’चा आसरा घ्यावासा वाटे पण शिष्यगणांची नाराजी ओढवेल म्हणून तो असला विक्षिप्तपणा कसोशीने पाळे. अर्थात या सगळ्याचा त्याला फायदाच होत असे.
शेवटचा फायदा म्हणजे त्याचे शिष्य त्यांनी काढलेल्या चित्रांवर त्याचे मत मागायचे हा ! एकही दिवस असा जात नसे की एखादा त्याने काढलेले चित्र घेऊन त्याच्या व कॅनव्हासच्यामधे उभे रहायचा व त्याचे मत मागायचा. आजवर अजित प्रधानने एखाद्या चित्राचे परिक्षण केले नव्हते व त्याबद्दल त्याला स्वत:ची शरमही वाटे. काही चित्रे सोडल्यास त्याला सर्व चित्रे सारखीच भासत. कधी चांगली तर कधी वाईट. पण आता तसे चालणार नव्हते. त्याने परिक्षणांचे संकलनच करुन ठेवले. प्रत्येक परिक्षणात थोडाफार फरक त्याने जाणीवपूर्वक फरक ठेवला होता कारण त्याला सर्वच शिष्यांना खुष ठेवावे लागत असे. हे कर्तव्य पार पडत असताना त्याचा अजून एक फायदा झाला तो म्हणजे त्याच्याकडे त्याच्याच चित्रांबद्दल अबोध अशा शब्दांचा साठा तयार झाला. असो. चर्चेदरम्यान हे अबोध शब्दांचे दगड तो श्रोत्यांना फेकून मारत असे, ज्याने ते घायाळ होत असत. पण एक लक्षात घेतले पाहिजे की या त्याच्या प्रयत्नात त्याचा साधेपणा व प्रेमळपण किंचितही कमी झाला नव्हता. दुर्दैवाने लवकरच त्याच्या लक्षात एक गोष्ट आली आणि ती म्हणजे त्याच्या या नवशिष्यांना त्याची टिका नको होती तर फक्त थोडेसे उत्तेजन व भरपूर कौतुक पाहिजे होते. फक्त ते वेगवेगळ्या शब्दात पाहिजे होते. अर्थात अजित प्रधान सगळ्यांच्या अपेक्षा पुऱ्या करायचा. एवढेच नव्हे तर त्याने त्यासाठी नवनवीन मार्ग शोधून काढले. चित्रात त्याने नवीन मार्ग चोखाळले नसतीलही कदाचित पण तो कमीपणा त्याने या कामाने भरुन काढला.

लवकरच त्याच्या कॅनव्हासच्या इझलभोवती मित्रांच्या व चाहत्यांच्या खुर्च्यांचा गराडा पडला. त्यांच्या त्या गराड्यात अजित प्रधान त्याचा कॅनव्हास रंगवत असे. कधी कधी या चाहत्यांबरोबर खिडक्यांमधे शेजारीही अवतरत व गर्दीत भर टाकत. अजित प्रधान चर्चा करे, चित्रांबद्दल मत देई, मुलांकडे लक्ष देई, मधेच आलेल्या दूरध्वनीवर बोलत वीणाकडे प्रेमाचा कटाक्ष टाके आणि हे सगळे करताना तो हातातील कुंचले खाली ठेवत नसे. मधेच समोरच्या कॅनव्हासवर कुंचल्याचे फटकारे ओढे. या सगळ्याने त्याला त्याचे जीवन अगदी कृतार्थ झाल्याचे समाधान मिळत असे. अर्थात आयुष्य असे गजबजलेले असताना त्याला कंटाळा यायचे कारणच नव्हते. या सगळ्याचे श्रेय तो अर्थातच त्याच्या नशिबाला देई. पण कंटाळ्याचा एक गुण लक्षात घेतला पाहिजे. सतत काम करुन कंटाळ्यावर मात करता येते. पण जसा अजित प्रधानचा चाहत्यांबरोबरचा संवाद वाढला तसा त्याच्या चित्रांना पूर्ण होण्यास उशीर होऊ लागला. बरे मित्रांमुळे असे होत असावे असे म्हणावे तर तो एकटा असतानाही त्याला काही सुचत नसे. अशा वेळी तो मैत्री आणि कंटाळा याचा मेळ घालत बसे, अर्थात मनातल्या मनात.
अजित प्रधानने हा विषय वीणापाशी काढण्याचा प्रयत्न केला पण आता तिच्या डोक्यात तिची वाढणारी मुले आणि कमी पडणारी जागा या शिवाय दुसरे काही शिरत नव्हते.

‘‘आपण मुलांना मोठ्या खोलीमधे ठेऊया का ? वाटलेच तर त्यांचा बिछाना आपण एका पडद्याने झाकून टाकू. बाळाला छोट्या खोलीत हलवूया म्हणजे तो दूरध्वनीच्या आवाजाने उठणार नाही. बाळाला जास्त जागा लागणार नाही, तू त्याच खोलीत तुझे इझेल हालव.’’ वीणा एक दिवस म्हणाली.

असे झाल्यावर ते मोठी खोली ते आल्यागेल्यांसाठी वापरु शकणार होते. अजित प्रधान त्याच्या खोलीतून तेथे गप्पांसाठी येजा करु शकत होता. त्यालाही कामासाठी थोडासा एकांत पाहिजेच असल्यामुळे ही कल्पना त्याने मान्य केली. याचा अजून एक फायदा होता तो म्हणज मुलांना झोपवायचे या कारणाखाली ते गप्पा आटोपत्या घेऊ शकत होते.

‘‘काहीच हरकत नाही ’’ अजित प्रधान म्हणाला.

आता तो हे खरेच पटले म्हणून म्हणाला असेल का वीणाला खुष करण्यासाठी हे मी वाचकांवर सोडतो.

‘‘तुझे मित्र जरा लवकर गेले तर आपलीही जरा जास्त वेळ गाठ पडेल ’’ वीणा म्हणाली.

अजित प्रधानने तिच्याकडे चमकून पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक उदास भाव उमटून गेला. तिचा चेहरा पाहून त्याच्या ह्रदयात कालवा कालव झाली.. त्याने वीणाला एकदम कवेत घेऊन तिचे आवेगाने चुंबन घेतले. तिनेही स्वत:ला त्याच्या स्वाधीन केले आणि परत एकदा लग्नानंतर ते दोघे प्रथमच एवढ्या सुखात डुंबले. पण तिने पटकन स्वत:ची सुटका करुन घेतली. बहुदा ही खोली अजित प्राधानला लहान पडत असावी असे वाटून तिने एक फुटपट्टी आणली. मोजमाप केल्यावर त्यांच्या लक्षात आले की येणाऱ्या पाहुण्यांमुळे व अजित प्रधान सध्या जेवढ्या जागेत काम करीत होता तेवढीच जागा या नवीन मांडणीतही त्याच्या वाट्याला येते होती. अजित प्रधानने घाईघाईने खोलीतील फर्निचरची हालवाहालव सुरु केली.
नशिबाने तो जेवढे कमी काम करायचा तेवढी त्याची प्रसिद्धी वाढत होती. त्याच्या प्रत्येक चित्रकृतीची आतुरतेने वाट पाहणारे त्याचे चाहते तोंड फाटेपर्यंत त्याची स्तुती करु लागले. काही टिकाकारांच्या टिकेत जरा वेगळे सूर उमटू लागले पण या दुर्दैवावर त्याच्या शिष्यांच्या रागाने मात केली. यात तेथे नियमीत हजेरी लावणारे दोन अभ्यासक आघाडीवर असत. ते म्हणत की जरी गायतोंड्यांच्या चित्रात त्यांचे विचार व अभिजात कला दिसत असे तरी पण येथे चाललेले नवनवीन प्रयोग हे बंडखोर असावेत. काहीतरी वेगळेच चालले आहे या येथे. पण त्यांनी ‘‘ असावेत’’ असा शब्द वापरला होता. याचा अर्थ मी सांगण्याची गरज नाही. त्याच्या प्रत्येक चित्रानंतर होणाऱ्या प्रचंड स्तुतीने तो थोडासा त्रस्त व्हायचा...पण ते कसे हवेहवेसे वाटेच. फक्त शरद शिरसाठ मात्र म्हणायचा,

‘‘हे दोघे विचित्र आणि आगाऊ आहेत. त्यांना तूझी सर्जनशिलता पहावत नाही हेच खरे !’’

‘‘तुला समजणार नाही ! कारण मी करतो ते सगळेच तुला आवडते.’’

‘‘मला तुझी चित्रे आवडत नाहीत हे खरे. मला खरे तर तुझे रंगविणे आवडते.’’ शरद शिरसाठ म्हणे.

अजित प्रधानच्या चित्रांचा आता कुठलेही प्रदर्शन असो त्यात गाजावाजा होऊ लागला. चित्रांच्या दलालाने स्वत:हून त्याचा मोबदला वाढविण्याचे सुतोवाच केले. अजित प्रधानने अर्थातच होकार दिला व त्याचे आभार मानले.

" कोणी तुझे आत्तचे बोलणे ऐकले तर त्याला वाटेल तुला पैशाचे महत्व आहे...’’ दलाल म्हणाला.

दलालाच्या या चांगुलपणाने अजित प्रधान भारावून गेला पण जेव्हा त्याने त्याचे एक चित्र एका संस्थेला देणगी म्हणून देण्याची परवानगी मागितली तेव्हा त्याने त्याला स्पष्टच त्यांच्यातील करारांतील कलमांची आठवण करुन दिली.

‘‘शेवटी करार म्हणजे करार आहे त्यात दानधर्म, देणगी, बक्षिस या संबंधीत एकही कलम नाही’’ दलाल म्हणाला.
‘‘ आपण म्हणाल तसे !’’ अजित प्रधान.

वाढलेल्या उत्पन्नामुळे अजित प्रधानला खूपच मदत झाली. एक तर त्याला आलेल्या पत्रांना उत्तरे देताना वेळ फुकट घालवतोय असे अपराधी वाटायचे ते वाटेनासे झाले. तो कामातून वेळ काढून पत्रांना उत्तरे देऊ लागला. काही अजित प्रधानच्या कलाकृतींबद्दल असायची तर काहींना त्याचा सल्ला हवा असायचा किंवा आर्थिक मदत. पत्रकारांच्या पत्रात त्याची वाहव्वा असायची किंवा त्यांनाही आर्थिक मदत हवी असायची. जसे जसे अजित प्रधानचे नाव वर्तमानपत्रातून झळकू लागले तसे सामाजिक अन्यायाविरुद्धच्या लढाईत त्याची मदतीची अपेक्षा होऊ लागली. अजित प्रधान पत्रांना उत्तरे देऊ लागला, कलेबद्द्ल लिहू लागला, खादीच्या कपड्यात सामाजिक संस्थांना बेटी देऊ लागला, प्रसंगी छोटीशी देणगीही देत असे व कधीतरी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एखाद्या पत्रकावर सहीही करु लागला. सल्ले देणे हा तर त्याचा आवडता उद्योग झाला. कुठल्याही भारतीय माणसाला एखाद्या क्षेत्रात थोडेफार यश मिळाले की त्याला सर्व विषयातील सगळे काही कळते असा जो भ्रम होतो, तसेच अजित प्रधानच्या बाबतीत होते की काय असे वाटून शरद शिरसाठने त्याला विचारले,

‘‘तू काय आता राजकारणात पडतोस की काय ? ते लेखकांवर राजकरण्यांवर सोड !’’

पण तो फक्त सामाजिक कारणांसाठी निघालेल्या पत्रकांना पाठिंबा देत असे. एखाद्या पक्षाच्या पत्रकावर नाही. जी पत्रे तातडीची नसत ती पत्रे तो बाजूला ठेवत असे. बहुदा ही त्याच्या चाहत्यांचीच असत म्हणा. या असल्या नेक कामांना उशीर झालेला त्याला खपत नसे. आपण कामात मागे पडतोय अशी भावना आजकाल त्याच्या मनात डोकावू लागली होती. अर्थात जेव्हा तो काम करीत असे तेव्हा.

वीणा मात्र एकीकडे मुलांच्यात पूर्णपणे गुंतली होती. त्यांचे करता करताच तिची दमछाक व्हायची. तिला किती काम पडते याची जाणीव अजित प्रधानला ती बाहेर गेल्यावर कळायचे. ‘‘ बाबा फोन !’’ चिरंजीव ओरडायचे. ते ऐकल्यावर हातातील चित्र तसेच टाकून त्याला तेथे पळावे लागे. ‘‘मिटर रिडर !’’ तेवढ्यात दरवाजातून आरोळी येई. हातातील फोन टाकून दरवाजात पोहोचावे तर तेथे काही मंडळी दत्त म्हणून हजर असायची. त्यांना कालची अर्धवट पडलेली चर्चा पुढे न्यायची असायची. शेवटी ते त्या अरुंद बोळात उभी राहून अजित प्रधानला शंका विचारायची किंवा मग त्याच्या लहान खोलीत दाटीवाटीने उभी राहायची.

"येथून तुम्ही आम्हाला दिसता तरी आणि तुम्हालाही काम करताना त्रास होत नाही.’’ कोणी तरी म्हटले आणि अजित प्रधानला अगदी गहिवरुन आले.

‘‘नाहीतरी आजकाल आपली गाठ पडत नाही !’’ अजित प्रधान म्हणे.

सगळ्यांना तो भेटू शकत नव्हता त्यासाठी त्याला मनापासून विषाद वाटे. विशेषत: ते चाहते असतील तर फारच ! पण त्याच्याकडे वेळच नव्हता. सगळ्यांसाठी वेळ न काढता आल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत थोडी घरण झालीच. लोक म्हणत,

‘‘त्याला आता गर्व चढलाय. आता स्वत्:शिवाय तो कोणावरच प्रेम करत नाही हेच खरे !’’

पण त्याचे वीणावर प्रेम होते. त्याला शरद शिरसाठ आवडायचा. खरे तर त्याला सगळेजणच आवडायचे. पण काळ कोणासाठी थांबत नाही व दिवसात फक्त चोवीस तासच असतात. त्याच्या शारिरीक क्षमतेला मर्यादा होत्याच की. जगात असलेल्या वस्तूंची चित्रं काढणे आणि त्याच वेळी त्या जगात राहणे त्याला अवघड वाटू लागले. बरं या बाबतीत तो तक्रारही करु शकत नव्हता कारण असा तक्रारीचा सूर त्याने लावला की लगेचच लोक म्हणत, ‘‘प्रसिद्धीची किंमत शेवटी मोजावीच लागते बाबा....’’
परिणाम म्हणून त्याच्या अनुत्तरीत पत्रांचे गठ्ठे साचू लागले. चाहत्यांची आवक वाढली आणि इतरांची गर्दीही वाढू लागली. अजित प्रधान या सगळ्यांचे मनापासून आभार मानायचा. राजकारण, खाद्यपदार्थ व सुंदर स्त्रिया यापलिकडे जाऊन त्यांना कलेत रस होता याबद्दल त्याला त्यांचे कौतुकही वाटायचे. ही मंडळी स्वत: चित्रे विकत घेत नसत पण संभाव्य खरेदीकारांची मात्र अजित प्रधानची गाठ घालून देत. बऱ्याच वेळा ते वीणाचीही मदत करायचे. आलेल्या पाहुण्यांना चहा नेऊन देणे इ.इ. अशी कामे ते करायचे. अजित प्रधानही एखाद्या सुंदर स्त्रीच्या हातातून चहाचा कप घेईपर्यंत कॅनव्हासवर कुंचला फिरवायचा व खुष व्हायचा.

तो चहाचे घोट घेत मोठ्या ऐटीने कॅनव्हासवरील चित्राकडे पहायचा, मित्रांबरोबर हास्य विनोद करायचा व त्यांच्यापैकी एकाला त्याने रात्री लिहिलेली पत्रे पोस्टात टाकण्याची विनंती करायचा. पायात घुटमळणाऱ्या चिमुरड्याला उचलून घेत छायाचित्रासाठी उभा रहायचा. तेवढ्यात फोन आला तर हातातील चहाचा कप उंचवत गर्दीतून वाट काढत फोन घ्यायचा. परत आल्यावर एखाद्या सुंदर स्त्रीच्या प्रश्र्नांना उत्तरे देताना, ‘‘मला तुझे तैलचित्र रंगविण्यास आवडेल’’ असे सांगून खुष करायचा. या सगळ्या गर्दीत अजित प्रधानचे कधीतरी लक्ष वीणाकडे जायचे. तिच्या डोळ्यातील उदास भाव त्याला जखमी करायचे. अखेरीस दिवस संपुष्टात यायचा. पाहुणे मंडळी निरोप घ्यायची. काही जे उरायचे, त्यांच्या डोळ्यात वीणाला मुलांना झोपवताना पाहून पाणी यायचे. एक आजी मात्र तिला मुलांना झोपविण्यास मदत करायची. तिच्या दोन मजली श्रीमंत घराला घरपणच नव्हते अशी तीची तक्रार होती म्हणे.

कपडे वाळत घालायच्या दांड्या ठोकण्यासाठी वीणाला मदत करण्यासाठी एका शनिवारी दुपारी शरद शिरसाठ घरी आला तेव्हा घरात बरीच गर्दी जमलेली दिसली. कलाप्रेमींच्या गराड्यात अजित प्रधान त्या सुंदर स्त्रीचे तैलचित्र रंगवत होता तर थोड्याच अंतरावर एक चित्रकार अजित प्रधानचे चित्र रंगवत असतानाचे चित्र रंगवत होता. शिवाय या सगळ्याचे चित्रिकरण चालले होते ते वेगळेच. वीणाने तो सरकारचा अधिकृत चित्रकार आहे ही माहिती दिल्यावर शरद शिरसाठला सगळा उलगडा झाला. या चित्राचे नाव असणार होते ‘‘ चित्रकाराच्या आयुष्यातील एक दिवस.’’ शरद शिरसाठने गुपचुपपणे खोलीचा कोपरा गाठला व आपल्या मग्न मित्राच्या हालचाली पाहू लागला.

तेथेच एका अनोळखी चित्रकाराने पुढे झुकुन शरद शिरसाठला विचारले,

‘‘ तुम्ही पण चित्रकार आहात का ? मी पण चित्रे काढतो.’’ पुढे तो कुजबुजला,

‘‘ मी सांगतो या माणसाची कला अस्तास जात आहे. ?

‘‘इतक्यातच ?’’ शरद शिरसाठ.

‘‘हो ! यश ! ते डोक्यात जाते ! त्याचा विरोध करणे फार अवघड आहे ! ज्या कलाकाराचा अस्त होत चालला आहे तो संपला असे म्हणायला काही हरकत नाही. बघाना त्याच्याकडे रंगविण्यासारखे काही उरले नाही म्हणून तो त्याचेच चित्र काढून घेतोय, एखाद्या कलासंग्रहात टांगण्यासाठी.’’

त्या दिवशी झोपण्याआधी, मध्यरात्री अजित प्रधान, शरद शिरसाठ व वीणा गप्पा मारत बसले होते. मुले झोपली होती. वीणाचे नुकतेच आवरुन झाली होते व अजित प्रधानने व शरद शिरसाठने तिला भांडी इ. धुवून मदत केली. तिघेही चांगलेच दमले होते. त्या ताटांच्या ढिगाकडे एक नजर टाकून शरद शिरसाठने विचारले,

‘‘ तुम्ही एखादा नोकर का नाही ठेवत ?’’

‘‘आणि तिला ठेऊ कुठे ?’’ यावर उत्तर नसल्यामुळे तेथे क्षणभर शांतता पसरली.

‘‘तू सुखी अहेस का ?’’ शरद शिरसाठने अचानक विचारले. दमलेल्या अजित प्रधानने क्षणभर विचार केला.

‘‘हो ! त्या सगळ्यांचे माझ्यावर प्रेम आहे ! सगळे चांगलेच आहेत’’

‘‘नाही रे बाबा सगळेच चांगले कसे असतील ? उदा. तुझे ते चित्रकर्मी मित्र !’’

‘‘हंऽऽ मला माहीत आहे. पण बरेच कलाकार तसे असतात. त्यांना त्यांच्याच अस्तित्वाबद्दल शंका असते. एगदी थोर कलाकारांबाबतही हे खरे आहे. मग ते त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे गोळा करतात. ते टिका करतात व परिक्षणे करतात. क्वचित प्रसंगी कडवट टिकाही करतात. त्यात त्यांना स्वत:चे अस्तित्व सापडू लागते. पण खरे पाहत ते किती एकाकी असतात हे मलाच माहीत.’’

हे ऐकताच शरद शिरसाठने नकारार्थी मान हलविली.

‘‘ अरे मी म्हणतोय ते खरेच आहे ! विश्वास ठेव ! मी त्यांना ओळखतो. त्यांच्यावर प्रेम करणे हा एकमेव मार्ग आहे.’’ अजित प्रधान म्हणाला.

‘‘ आणि तुझे काय? तुला सापडले आहे का तुझे अस्तित्व ? शरद शिरसाठने विचारले.

‘‘तू तर कधीच कोणाबद्दल वाईट बोलत नाहीस. किंवा टिकाही करत नाहीस.’’

‘‘ अस्ं काही नाहीए मलाही त्यांच्या बऱ्याच गोष्टी आवडत नाहीत आणि मला त्यांच्यावर टिकाही करायची असते पण मी लवकरच ते सगळे विसरुन जातो.’’

‘‘माझे अस्तित्व आहे का नाही हे मला माहीत नाही परंतू माझा त्या दिशेने प्रवास चालू आहे हे निश्चित. एक ना एक दिवस मला माझे या क्षेत्रातील अढळ स्थान सापडेलच.’’

हे न पटून शरद शिरसाठने वीणचे मत मागितले. ती आधीच दमली होती. तिने अजित प्रधानचे बरोबर आहे असे मत दिले.

‘‘त्यांच्याकडे गोळा होणाऱ्यांच्या मतांना किती किंमत द्यायची ? ती म्हणाली.

तिच्या दृष्टीने फक्त अजित प्रधानच्या कामालाच किंमत होती. तिला अजित प्रधानच्या कामात मुलांची अडचण होत होते याची मात्र जाणीव होती. शिवाय आता थोडा मोठा सोफा आल्यावर परत बरीच जागा आडणार होतीच. पण मोठी जागा मिळेपर्यंत ती काय करु शकत होती ? अजित प्रधानने आपल्या मोठ्या शयनगृहावरुन एक नजर फिरवली. पलंगाने बरीच जागा अडवली होती पण ती दिवसभर रिकामीच असे. त्याने वीणाच्या लक्षात ही गोष्ट आणून दिल्यावर तीचेही तेच मत पडले.

‘‘निदान त्याला कामात त्रास देण्यास तरी त्या शयनगृहात कोणी येणार नाही’’ ती म्हणाली.

‘‘तुला काय वाटते ?’’ वीणाने शरद शिरसाठला विचारले. त्याने अजित प्रधानकडे पाहिले. त्याने खिडकीबाहेर नजर लावली होती. प्रश्न ऐकताच त्याने त्या काळ्याकुट्ट आकाशाकडे एक नजर टाकली व खिडकीपाशी जाऊन तो एकुलता एक पडदा ओढून घेतला व एकही शब्द न बोलता शरद शिरसाठच्या शेजारी पलंगावर बसला. वीणाने ती हात पाय धुण्यास चालली आहे असे जाहीर केले व ती गेली. जेव्हा ते दोन मित्र एकटेच राहिले तेव्हा अजित प्रधानच्या खांद्याचा स्पर्ष शरद शिरसाठच्या खांद्याला झाला. शरद शिरसाठने त्याच्या कडे प्रश्नार्थक पण प्रेमळ नजरेने पाहिले.

‘‘मला तैल चित्र रंगवायला आवडते. मी आयुष्यभर रंगविण्यास आवडेल. शक्य झाल्यास दिवस रात्र. मग मी नशीबवान नाही का ?’’

‘‘हंऽऽऽऽ आहेस खरा नशीबवान.’’ शरद शिरसाठ म्हणाला.

मुले वाढत होती आणि इतर बापांसारखा ती वाढताना पाहताना त्यालाही आनंद होत होता. ती आता शाळेत जाऊ लागली होती व दुपारी घरी येत. अर्थात शनिवारी, रविवारी व सुट्ट्यांमधे ते एकत्र दिवस काढत असत. त्यांचा थोडाफर गोंधळ होत असे पण ते ठीक होते.... कधी कधी जास्तच गोंधळ घातल्यावर त्यांना तो ओरडे तर कधी कधी त्यांच्यावर नाटकी हातही उगारे. घरातील चिक्कार कामात आता तो वीणाला मदत करु लागला. तिला एकटीला ते उरकणे शक्यच नव्हते. एखादी मोलकरीण ठेवायची म्हटल तर तिच्यासाठी जागा नव्हती म्हणून अजित प्रधानने वीणाला तिच्या बहिणीस मदतीला बोलाविण्याचे सुचविले. वीणाची मंगल नावाची ही बहीण विधवा होती व तिला एक लग्न झालेली मुलगी होती, म्हणजे आता तशी ती विनापाशच होती.

‘‘काहीच हरकत नाही. तिला वेगळी खोलीही द्यावी लागणार नाही.’’

या कल्पनेवर अजित प्रधान खुष झाला. असे झाल्यास वीणावरचा कामाचा बोज कमी होईल व तिचे हाल बघून त्याच्या मनाला लागलेली बोचही. मंगल कधीकधी जरुर पडल्यास तिच्या मुलीलाही घेऊन येई त्यामुळे कामे उरकण्यास तिचा हातभारच लागे. त्या दोघीही अत्यंत प्रामाणिक व कामसू होत्या. त्या शक्यतो सर्व कामे कसलीही कटकट न करता उरकून टाकत. शिवाय वीणाला त्यांची सोबत व्हायची ते वेगळेच. काहीच दिवसात त्या दोघी घराच्या सदस्यच झाल्या. ज्या छोट्या खोलीत अजित प्रधानची चित्रे ठेवली जात त्याच खोलीत तिला पडण्यासाठी एक छोटा पलंगही टाकण्यात आला.

अजित प्रधानने त्याच्या शयनगृहातील खिडकी आणि पलंगामधील जागा पटकावली आणि त्याचे इझल तेथे हलवले. एकदा का ती खोली आवरुन झाली की तेथे कोणी त्याला त्रास देण्यास येत नसे. आलेच कोणी तर काही क्षणापुरते, काही कामापुरते. भेट देणारे चाहते मात्र (तशी त्यांची संख्या आता कमीच झाली होती) त्या शयनगृहात आरामात त्यांच्या शय्येवर लवंडून अजित प्रधानशी गप्पा मारत. ही एक गोष्ट वीणाला तितकीशी आवडत नसे पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मुलेही त्या खोलीत पर्वचेनंतर पाया पडण्यास येत. त्यांना तो एखादे चित्र दाखवीत असे व मायेने त्यांच्या गालावर ओठ टेकत असे. ते गेल्यावर त्यांच्यावरील प्रेमाने त्याचे उर भरुन येई. ते गेल्यावर मात्र त्याला ती खोली खायला उठे. त्याच्या चित्रांइतकेच त्याचे त्यांच्यावर प्रेम होते कारण त्याच्या जीवनात या दोनच गोष्टी त्याच्या दृष्टीने जिवंत होत्या.

पण कुठल्याही हिशेबाने अजित प्रधानचे काम कमी होत होते हे खरे. आणि ते का ? हे त्याला कळत नव्हते. तो कामाशी प्रामाणिक होता पण त्याला चित्रे रंगाविशीच वाटत नव्हती. अगदी एकटा असतानाही नाही. तो जेव्हा एकटा असे तेव्हा तो आभाळाकडे डोळे लाऊन बसे. तसा तो स्वप्नाळू होता पण आता तो जाणीवपूर्वक दिवसा ढवळ्या स्वप्ने पाहू लागला. तो रंगविण्याऐवजी रंगविण्याचा विचार जास्त करु लागला. ‘‘मला रंगवायला आवडतेच ‘‘ तो मनाशी म्हणे पण हे म्हणताना त्याचा ब्रश धरलेला हात बाजूला लोंबकळत असे व कान दूरवर वाजणाऱ्या संगिताकडे लागलेले असायचे.

याच काळात त्याच्या प्रसिद्धीला ओहोटी लागली. त्याच्या चित्रांवरची जहरी टिका वर्तमानपत्रांतून छापून येऊ लागली. त्याची कात्रणे त्याचे मित्र त्याला आणून दाखवत. काही टीकेत तर टिंगलटवाळीचा भासही होत होता. पण या टिकेतूनही काहीतरी चांगले निर्माण होईल अशी त्याला आशा वाटत असे. जे चाहते अजूनही येत होते ते त्याच्याशी अगदी जुन्या मित्रांसारखे वागत. त्यांच्यातील औपचारिकता नष्ट झाली पण जेव्हा अजित प्रधानला परत त्याच्या चित्राकडे वळायचे असे तेव्हा ते म्हणत,

‘‘ जा ! जा! कर पुरे ते ! आता काय भरपूर वेळ आहे.’’ अजित प्रधानला समजत होते की ते त्यांचे अपयश आता त्याच्यात बघत होते.

पण या नवीन प्रकारच्या उपहासाने त्याला वाटत होते त्याचा फायदाच होईल.

‘‘तू वेडा आहेस ! त्यांना तुझी बिलकूल काळजी वाटत नाही हे लक्षात घे.’’

‘‘माझ्याबद्दल काहीतरी वाटत असल्याशिवाय का ते माझ्यावर टिका करतात ?’’

‘‘रस्त्यावरील अनोळखी माणसावर कोणी टिका करते का ?’’ असे म्हणून त्याने त्याचा नेहमीचा दिनक्रम चालू ठेवला. त्याने पत्रांना उत्तरे दिली व जमेल तेवढे रंगकाम केले. जमेल तसे तो रंगवतच होता. विशेषत: रविवारी जेव्हा वीणा व मंगल मुलांना घेऊन बाहेर जात असत तेव्हा. संध्याकाळी तो स्वत:वरच खुष होत असे. त्यावेळी तो आकाश रंगवत होता.
एक दिवस त्याच्या दलालाने खप कमी झाल्यामुळे त्याचे मानधनही कमी करावे लागेल असे सांगितले. त्याने अजित प्रधानची माफीही मागितली. त्याला त्याचे काही वाटले नाही पण वीणाला मात्र काळजी वाटू लागली. मे महिना होता आणि मुलांच्या शाळेचा खर्च समोर ‘ आ ’ वासून उभा होता. तिने शांतपणे कपडे शिऊन देण्याचा व्यवसाय सुरु केला. तिच्या बहिणीला बटने लावणे अशी किरकोळ कामे यायची पण कपडे बेतणे इ. इ. तिला जमत नसे. ही अडवचण सोडवली अजित प्रधानच्या चुलत बहिणीने. ती वीणाच्या मदतीला धाऊन आली. बऱ्याच वेळा ती अजित प्रधानच्या खोलीत एका आरामखुर्चीत स्तब्ध बसायची. जणू एखादा पुतळाच. वीणाने अजित प्रधानला सुचवले, ‘‘हिचे एक ‘स्तब्ध’ या नावाने तैलचित्र बनव बरं’’ अजित प्रधानने त्वरित होकार भरला. पण त्याच्या हातून दोन कॅनव्हास वाया घालविण्याखेरीज पुढे काहीच झाले नाही. तो परत त्या अर्धवट टाकलेल्या आकाशाच्या कॅनव्हासकडे वळला. दुसऱ्या दिवशी विचार करत त्याने त्याच्या आख्ख्या जागेत येरझारा मारल्या. तेवढ्यात त्याचा एक तथाकथित शिष्य उत्तेजित होत त्याच्याकडे धावत आला आणि त्याने त्याला वर्तमानपत्रातील एक कात्रण दाखवले. त्याने ते दाखवले म्हणून अजित प्रधानला पहायला तरी मिळाले. त्यात एका लेखात अजित प्रधानच्या चित्रांना उगिचच भाव दिला जातो....खरे तर ती जुनाट व कल्पनाशून्य आहेत असे सिद्ध करुन दाखवले होते. त्याच दिवशी त्याच्या दलालाने दूरध्वनीवर घसरत्या विक्रीबद्दल काळजी व्यक्त केली. अजित प्रधानने त्याच्या शिष्याला सांगितले की त्या लेखात थोडे तथ्य आहे पण त्याच्याकडे अजून बरीच वर्षे शिल्लक आहेत आणि त्यात तो निश्चितच अजून चांगली चित्रे रंगवू शकतो. दलालाला मात्र तो म्हणाला,

‘‘तुमची काळजी मी समजू शकतो. मी आता एक मोठे, नवीन विषयाला हात घालणारे चित्र करणार आहे. हे असे चित्र कोणीच आत्तापर्यंत पाहिले नसेल. ही नवीन सुरवात असेल्.’’

हे तो अत्यंत प्रामाणिकपणे सांगत होता. नशीब अजून त्याच्या बाजूने होते. त्याला फक्त वातावरण तसे पाहिजे होते. योग्य, कल्पना स्फुरण्यासारखे...

मग त्याने प्रथम काही दिवस मोठ्या खोलीत काम केले. दोन दिवसांनी स्वयंपाकघरात, मग दोन दिवस त्याने त्या ब्रिटिशकालीन न्हाणीघरातही काम करुन पाहिले. प्रथमच त्याला लोकांची अडचण जाणवू लागली. जेथे जाईल तेथे त्याला कोणी ना कोणीतरी आडवे येऊ लागले. काही लोक तर चक्क अनोळखी होते. अगदीच कोणी नसेल तर घरातील माणसे...त्यांच्याबद्दल तर तक्रार करुन चालणारच नव्हते. शेवटी त्याने हातातील कुंचला खाली ठेवला व विचार केला. जर बाहेर ढग नसते तर तो निसर्गचित्रे रंगविण्यास बाहेर तरी गेला असता... पण निसर्गचित्रासाठी अनुकुल असा ऋतूही नव्हता. त्याने तरीही प्रयत्न केला पण कडक उन्हामुळे त्याला आत यावे लागले. पुढचे अनेक दिवस त्याने कॅनव्हासच्या पुढे बसून काढले. त्याने जवळजवळ चित्रे रंगविणे थांबवलेच. त्यानंतर मात्र त्याने पहाटेच बाहेर जाण्याची सवय लाऊन घेतली. त्यावेळी तो झाडे, एखादे तळ्याकाठी असलेले घर, डोलणारी शेते यांची तपशिलवार रेखाटने करावीत असा त्याचा विचार असे. पण दिवसाच्या शेवटी त्याने काहीच केलेले नसे.

वर्तमानपत्रे, कोणीतरी ओळखीचे भेटले की त्याच्याबरोबर कॉफीपान, येताना दुकानातील खिडक्यांमधे ठेवलेल्या वस्तू बघणे या गोष्टींनी त्याचे लक्ष भरकटले. दररोज संध्याकाळी न चुकता त्याच्या या वागण्याची कारणे देत स्वत:चेच समाधान करण्याचा त्याला जणू छंदच लागला. तो रंगविणार होता आणि आत्तापेक्षा चांगले रंगवणार होता ही काळ्या दगडावरची रेष होती. सध्या तो स्वत:च्या कोषात गेला होता हे खरे होते पण लवकरच तो परत बाहेर येणार होता आणि त्यावेळेस नेहमीप्रमाणे त्याचे नशीब चमकणार होते. त्याच्या हातून काहीतरी भव्यदिव्य कलाकृती जन्माला येणार हे विधिलिखीत होते. पण त्याने त्याचा दिनक्रम काही बदलला नाही. त्याला नुकतेच हेही उमगले होते की मद्याने त्याला एखादे चित्र पूर्ण केल्यावर जेवढा आनंद व्हायचा तेवढाच आनंद होतोय. मद्याच्या दुसऱ्या चषकानंतर त्याला एकाच वेळी तो जगाचा मालक आणि नोकर असल्याचा भास होऊ लागे. चित्र पूर्ण करताना होणाऱ्या आनंदात आणि या आनंदात फक्त एकच फरक होता. तो आनंद त्याच्या चित्रात दिसायचा पण येथे मात्र तो एखाद्या पोकळीत बंदीस्त असे. पण हे मान्य करावेच लागेल की त्याला असे वाटत होते की मद्यप्राशनानंतर होणारा आनंद त्या आनंदापेक्षा काही कमी नव्हता. त्याला आता धुराने भरलेल्या, गोंधळाच्या जागेत जास्त बरे वाटू लागले. पण ज्या ठिकाणी कलाकार जमत अशा ठिकाणांहून तो पळ काढे किंवा असली ठिकाणे तो टाळू लागला. अशा ठिकाणांहून निघून गेल्यावर त्याच्या मागे ते काय म्हणत असतील याचा त्याला अंदाज होता. ‘‘हा स्वत:ला गायतोंडे समजतो की काय !’’ हा विचार मनात आल्यावर तो अस्वस्थ व्हायचा. त्याच्या चेहऱ्यावरसे हास्य निमाले. त्याचे मित्र त्यातूनही वेगळा अर्थ काढत. ‘‘तो हल्ली हसत नाही याचा अर्थ तो समाधानी असावा’’ हे कानावर आल्यावर तो अधिकच भेदरट दिसू लागला. कुठल्याही हॉतेलमधे तो बिचकत प्रवेश करु लागला. तेथे कोणी ओळखले तर काय...कोणी बोलायला आले तर काय...अशी भीती त्याला सतत वाटू लागली. अशा ठिकाणी प्रवेश केल्यावर तो एकदोन क्षण तसाच उभा रहात असे. शक्तिपात झाल्यासारखा...त्याच्या मनात त्यावेळेस एक विचित्र उदासपणा भरलेला असे. त्याचा चेहरा त्यावेळेस अत्यंत केविलवाणा व्हायचा. खरे तर त्याला आता एखाद्या मित्राची नितांत गरज होती. शरद शिरसाठची आठवण झाल्यावर तो त्या ठिकाणाहून लगेच बाहेर पडे. ‘‘तो माणूस बघ....’’ कोणीतरी त्याला तेथून बाहेर पडताना बघून शेरा मारलेला त्याला ऐकू आला.

तो आता अशा हॉटेलच्या बाहेर रेंगाळू लागला जेथे त्याला कोणी ओळखणार नाही अशा ठिकाणी. तेथे अनोळखी लोकांशी गप्पा मारताना त्याचा मुळ प्रेमळ स्वभाव परत उफाळून वर येत असे कारण तेथे त्याच्याकडून कोणालाच कसलीच अपेक्षा नव्हती. तेथेही त्याने थोडे मित्र जोडले आणि त्यांना खुष ठेवणे एवढे अवघड नव्हते. त्यातील एकाशी त्याची थोडी जास्त दोस्ती जमली.

एक दिवस त्याने याला विचारले, ‘‘आपला व्यवसाय काय ?’’

‘‘मी रंगवतो !’’

‘‘घरे का चित्र ?’’

‘‘चित्र’’

या संभाषणानंतर परत हा विषय निघाला नाही. हे सगळे अवघड होते पण अजित प्रधानला चित्रे रंगवायला लागल्यावर सगळे ठीक होईल याची आशा वाटत होती.

दिवसा मागून दिवस उलटत होते. चषकांमागून चषक रिकामे होत होते आणि मदिरेनंतर मदिराक्षीही त्याच्या जिवनात आल्या. या स्त्रियांची संगत त्याला आवडे. एकतर त्यांना चित्रकलेतील काही कळत नव्हते. त्याला त्यांच्याशी गप्पा मारता येत आणि मुख्य म्हणजे त्यांना पटले नाही तरी त्या त्याला समजून घेत. विशेषत: रात्र एकत्र बिछान्यात काढल्यावर. त्याला त्याची कल्पनाशक्ती परत येती आहे असे वाटू लागले. एक दिवस एका मैत्रिणीने त्याला घरी परत जाण्यास सांगितल्यावर, त्याने मन घट्ट केले व तो घरी परतला. त्याने परत एकदा त्याच्या शयनगृहात चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला. पण तासाभरातच त्याने कॅनव्हास बाजूला सारला. त्याने वीणाकडे न बघता एक स्मितहास्य केले व बाहेर गेला. त्या दिवशी दिवसभर तो पीत होता. रात्री तो त्याच्या मैत्रिणीकडे झोपायला गेला पण त्याच्या मनात तिची अभिलाषाही नव्हती. एवढे प्यायल्यावर त्याला कशाची शुद्धच नव्हती. सकाळी वीणाने त्याला स्पष्टच विचारले की तो त्या स्त्रीबरोबर झोपला होता का? अजित प्रधानने प्रामाणिकपणे सांगितले,

‘‘मी धुंदीत होतो. त्यामुळे माझ्या मनात तसला काही विचारही आला नाही. पण पूर्वी मी तिच्याबरोबर व इतर स्त्रियांबरोबर झोपलोय’’.

हे सांगताना त्याची नजर वीणाच्या चेहऱ्याकडे गेली आणि त्याच्या पोटात खड्डा पडला. एखाद्या बुडणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरील भाव तिच्या चेहऱ्यावर अवतरले होते. आश्चर्य आणि वेदना असह्य्य झाल्यावर जसे भाव उमटतात तसे. त्याच्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे त्याने आजवर वीणाचा विचारच केला नव्ह्ता. हे उमगल्यावर त्याला स्वत:ची शरम वाटली. त्याने तिची क्षमायाचना केली.

‘‘वीणा जे झाले ते झाले. उद्यापासून सगळे बदलणार आहे. परत सगळे पल्यासारखे होणार आहे. जे झाले त्यासाठी लाडके मला क्षमा कर.’’ असे म्हणून त्याने तिच्यासमोर गुडघे टेकले. त्याचे पाण्याने डबडबलेले डोळे पाहून वीणा काही बोलली नाही पण तिने मान फिरवली. तिचे अश्रू लपविण्यासाठी.

दुसऱ्या दिवशी अजित प्रधान सकाळी लवकरच बाहेर पडला. बाहेर वळवाचा पाऊस पडत होता. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याच्या मागे लाकडांनी व फळ्यांनी भरलेली गाडीही आली. घरी त्याचे दोन जुने मित्र त्याच्या खोलीमधे कॉफीचे घोट घेत बसले होते. त्या फळ्यांकडे पहात त्यातील एकजण म्हणाला,

‘‘अजित प्रधानने बहुदा माध्यम बदलायचे ठरवलेले दिसते. आता तो लाकडावर काम करणार असे दिसते.’’

‘‘तुम्ही समजता तसे काही नाही.’’ अजित प्रधान स्मीत करुन म्हणाला.

तो सरळ जेथे दोन खोल्या मिळत होत्या तेथे गेला. तेथील सरळसोट उंच भींतीची त्याने मनोमन मोजमापे घेतली. वर छताकडे अंधार पसरला होता पण त्याला आता शिडी लागणार होती. त्याने खाली जाऊन सोसायटीच्या कार्यालयातून ती आणली.

जेव्हा तो वर आला तेव्हा तेथे चाहत्यांची अजून गर्दी जमली होती. त्यांच्यापासून (प्रेमापासून) सुटका करुन घेऊन तो कसाबसा त्या खोलीच्या टोकाला पोहोचला. त्याच वेळी वीणा तेथे आल्यावर त्याने हातातली शिडी खाली ठऊन तिला मिठीत घेतले.

‘‘परत हे नाटक नको !’’ ती तुटकपणे म्हणाली.

‘‘नाही! नाही! मी रंगवणार आहे. परत रंगवणार आहे ! मला रंगवायलाच लागेल!’’ तो स्वत:शीच बडबडत होता. त्याची नजर दुसरीकडेच कुठेतरी लागली होती. मग त्याने कामाला सुरवात केली. त्या उंच भिंतीवर त्याने अर्ध्यावर एक बऱ्यापैकी खोली असलेला माळा बांधायला घेतला. दुपारपर्यंत त्याचे काम संपले. त्या शिडीने मग अजित प्रधान त्या माळ्यावर चढला. त्यानंतर तो त्या माळ्याच्या फळीला लटकला व त्याने दोन तीन पुश-अप मारले. त्याला तो मजबूत झाला आहे की नाही याची खात्री करायची होती. ती झाल्यावर तो परत त्याच्या चाहत्यांमधे मिसळला. तो परत माणसात आलेला पाहून सर्वांना आनंद झाला. गप्पा गोष्टीमधे, हास्यविनोदात कसा वेळ गेला हे कोणालाच कळले नाही. संध्याकाळी गर्दी कमी झाल्यावर त्याने एक दिवा, एक खुर्ची, एक चौरंग व एक फ्रेम जमा केल्या. त्याने एकएक करुन सगळ्या वस्तू माळ्यावर नेऊन टाकल्या. खाली त्याच्याकडे आश्चर्याने पाहणाऱ्या त्या तीन बायका व मुलांकडे पहात तो म्हणाला,

‘‘ हंऽऽऽऽऽ¸आता मला कोणाच्याही अध्यातमध्यात न येता माझे काम करता येईल....’’

‘‘खात्री अहे का तुमची अजित प्रधान ?’’ वीणाने खवचटपणाने विचारले.

‘‘ मला काही जास्त जागा लागत नाही. पण येथे मला स्वातंत्र्य आहे. इतिहासात कितीतरी चित्रकार मेणबत्तीच्या प्रकाशात रंगवत असत..माहिती आहे ना तुला ?’’

‘‘ती फळी मजबूत आहे ना ?’’

‘‘हो ! हो ! अजिबात काळजी करु नकोस ! मला वाटते हाच मार्ग योग्य आहे ’’ असे म्हणून तो खाली उतरला.

दुसऱ्या दिवशी तो एकटाच पहाटे उठला आणि माळ्यावर चढला. त्याने चौरंगावर एक चित्राची चौकट ठेवली आणि भिंतीला टेकवली. दिवा न पेटवता तो काही वेळ तसाच बसून राहिला. सगळीकडे शांतता पसरली होती. दुरवरुन काही कुजबुजण्याचे आवाज येत होते तर रस्त्यावरुन कोणीतरी धावत असल्याचा आवाज येत अस्पष्ट झाला..... थोड्याच वेळात दिवस उजाडला व खिडक्यातून सूर्याची किरणे आत घुसली पण येथे मात्र शांत अंधारे वातावरण होते. कोणीतरी त्या माळ्याखाली उभे राहून त्याला प्रश्न करीत,

‘‘अजित प्रधान वर काय करताय ?’’

‘‘मी काम करतोय !’’

‘‘ अंधारात ?’’

‘‘हो तेवढाच जरा बदल !’’ अजित प्रधान खरेतर रंगवत नव्हता पण विचार मात्र करीत होता.

या अंधाऱ्या माळ्यावर ही शांतता त्याला एखाद्या वाळवंटातील किंवा कब्रस्तानातील शांततेसारखी वाटल्यास नवल ते काय ! त्याला स्वत:च्या ह्रदयाचे ठोकेही ऐकू येऊ लागले. आता खालून येणाऱ्या आवाजांशी त्याचे नाते तुटल्यात जमा होते. जे घरी एकटेच मरणाची वाट पहात मरतात त्या माणसांसारखी अवस्था झाली. ते नाही का, मेल्यानंतर त्यांच्या घरातील दूरध्वनी सारखा वाजत राहतो...? तसे. पण तो जिवंत होता आणि मनातील शांततेची खोली मोजत नशिबाला जागण्यासाठी आवाहन करीत होता. त्याचे नशीब जागणार होते याबद्दल त्याला तिळमात्र शंका नव्हती. पण त्याला अजून थोडे चिंतन करायचे होते. तो स्वत:ला नशिबवान समजत होता कारण त्याला कुटुंबापाशी राहुन एवढा एकांत मिळत होता. जे त्याला समजले नव्हते त्याचा त्याला शोध घ्यायचा होता. असे रहस्य जे केवळ चित्रकलेतील रहस्य नव्हते आणि म्हणूनच त्याला दिव्याची गरज भासली नव्हती.

रोज अजित प्रधान त्याच्या माळ्यावर चढे. इकडे त्याच्या चाहत्यांची संख्या कमी होत चालली कारण वीणा त्यांच्या संभाषणांकडे व चर्चेकडे बिलकुल लक्ष देत नसे. अजित प्रधान जेवणापुरता दुपारी खाली येत असे व परत माळ्यावर चढत असे. रात्री तो शयनगृहात जात असे पण वीणा झोपल्यावर. काही दिवसांनंतर अजित प्रधानने वीणाला त्याचे ताट वरच देण्यास सांगितले. ते देताना तिची जी तारंबळ उडाली त्याने परत एकदा त्याच्या ह्रदयात कालवाकालव झाली. ती होऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने काही खाण्याचे सामान वरच ठेऊया असे सुचवले. हळुहळु तो दिवसा खाली येण्याचा बंदच झाला पण तो माळ्यावर ठेवलेल्या पदार्थांना स्पर्षही करीत नसे.

एका दिवशी संध्याकाळी त्याने वीणाला हाक मारली आणि काही पांघरुणे मागितली.

‘‘मी आजची रात्र वरच झोपेन म्हणतो’’

वीणाने चमकून त्याच्याकडे पाहिले पण ती काही बोलली नाही. ती शांतपणे अजित प्रधानकडे काळजीने पहात होती. अचानक ती किती वयस्कर दिसू लागली आहे याची त्याला जाणीव झाली. आयुष्यात बिचारीची त्याच्याबरोबर फरफटच झाली होती. तो काहीतरी बोलणार तेवढ्यात तिने त्याच्याकडे प्रेमाने पाहिले व म्हणाली,

‘‘ठीक आहे तू म्हणशील तसे !’’

त्यानंतर अजित प्रधानने एकही रात्र खाली काढली नाही. अजित प्रधान दिवसा आणि रात्री दृष्टीस न पडल्यामुळे ती जागा आता ओस पडली. काही जणांना तो गावाला गेला आहे असे सांगण्यात आले तर ज्यांना ही थाप पचणार नाही असे वाटत होते त्यांना त्याने नवीन स्टुडिओ घेतलाय असे सांगण्यात आले. शरद शिरसाठ मात्र पूर्वीसारखाच येत होता. तो बिचारा ती शिडी चढून त्या माळ्यावर डोके काढून विचारे,

‘‘ कसे काय चाललय चित्राचे?’’

‘‘मस्त’’

‘‘अरे पण तुझ्याकडे क्कॅनव्हास नाही मग कस्ंकाय ?’’

‘‘ तसेच !’’ अजित प्रधान उत्तर देई.

त्या शिडीवर अवघडलेल्या अवस्थेत उभे राहून अधिक चौकशा करणे त्याला शक्यही नव्हते. मान हलवून तो खाली उतरुन वीणाला कुठल्यातरी दुरुस्तीच्या कामात मदत करीत असे. मग शिडीवर न चढता तो खालूनच अजित प्रधानचा निरोप घेत असे. हा कार्यक्रम नेहमीचाच झाला. एकदा मात्र अजित प्रधानने निरोप घेताना शरद शिरसाठचे आभार मानले.

‘‘आभार ? आभार कसले ?’’

‘‘कारण तू माझा खरा मित्र आहेस.’’

‘‘ अरे व्वा या नवीन माहितीबद्दल धन्यवाद !’’ शरद शिरसाठ हसून म्हणाला आणि गेला.

एक दिवस संध्याकाळी अजित प्रधानने शरद शिरसाठला बोलावणे पाठविले. तो बिचारा धवतपळत हजर झाला. माळ्यावरुन डोके बाहेर काढून अजित प्रधान म्हणाला,

‘‘ मला जरा कॅनव्हास दे रे !’’

‘‘अरे पण काय झालंय काय तुला ? तू एवढा अशक्त का दिसतोय? अरे एखाद्या हाडाच्या सापळ्यासारखा दिसतो आहेस !’’

‘‘हंऽऽऽऽऽऽ मी गेले दोन दिवस काही खाल्लेले नाही ना म्हणून ! पण त्याकडे लक्ष देऊ नकोस. मला काम करायला हवे’’

‘‘अगोदर काहीतरी खा !’’

‘‘पण मला भुकच नाही !’’ ते ऐकल्यावर शरद शिरसाठने त्याला एक कॅनव्हास आणून दिला. त्या माळ्यावर अदृष्य होताना त्याने विचारले,

‘‘ते कसे आहेत ?’’

‘‘कोण ?’’

‘‘वीणा आणि मुले !’’

‘‘ते ठीक आहेत पण तू त्यांच्या बरोबर राहिला असतातर त्यांना जास्त बरे वाटले असते’’

‘‘ मी अजूनही त्यांच्या बरोबरच आहे ! त्यांना सांग मी त्यांच्या बरोबरच आहे !’’

एवढे बोलून तो परत माळ्यात अदृष्य झाला. शरद शिरसाठाने वीणाला त्याला वाटणाऱ्या काळजीबद्दल सांगितले. ती म्हणाली की तिलाच गेले कित्येक दिवस त्याची काळजी वाटत आहे.

‘‘काय करावे बरे ?’’

‘‘मी त्याच्याशिवाय राहुच शकत नाही’’ वीणा म्हणाली. शरद शिरसाठला बरेच दिवसाने पूर्वीची वीणा दिसली. ती थोडीशी लाजल्याचाही त्याला भास झाला.

त्या दिवशी माळ्यावर दिवा जळत होता तो पार दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. शरद शिरसाठ व वीणा आल्यावर त्यांना तेच उत्तर मिळे,

‘‘ मी काम करतोय. काळजी करु नका !’’

दुपारी अजित प्रधानने थोडे रॉकेल मागितले व त्या दिव्यात घातले. तेल मिळाल्यावर त्यातून येणार धूर बंद झाला व तो अधिकच प्रकाश फेकू लागला. शरद शिरसाठ रात्रीच्या जेवणासाठी थांबला. जेवणे झाल्यावर तो निरोप घेण्यासाठी माळ्याखाली गेला. माळ्यावरुन अजूनही उजेड येत होता व त्याच्या आक्राळविक्राळ सावल्या भिंतीवर नाचत होत्या. तो थबकला. नंतर तो अजित प्रधानचा निरोप न घेताच निघून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा वीणा उठली तेव्हाही माळ्यावरुन उजेड येतच होता.
एक सुंदर दिवस उजाडत होता पण अजित प्रधानला ते कळतच नव्हते. त्याने तो कॅनव्हास भिंतीला टेकवून ठेवला होता. दमून भागून तो निश्चल बसला होता. कशाची तरी वाट पहात. त्याने गुडघ्याला हाताची मिठी घातली होती.

‘‘आता मला जे मिळवायचे आहे ते मिळाले आहे. मला आता काम करण्याची आवश्यकता नाही. आत्ता नाही, या पुढे कधीच नाही !’’ तो स्वत:शी पुटपुटला.

त्याला खालून त्याच्या मुलांचे, खेळण्याचे आवाज ऐकू येत होते. मधेच वीणाचाही हसण्याचा आवाज ऐकू आला भांडी एकमेकांवर आपटून त्यांचा मजूळ आवाजही त्याला ऐकू आला. तेवढ्या रस्त्यावरुन एखादे जड वाहन गेले आणि सगळ्या खिडक्यांची तावदाने नाजुकपणे थरारली. त्याचाही आवज त्याल ऐकू आला. त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला,

‘‘चला अजुनही जग अस्तित्वात आहे म्हणायचे. तसेच उत्साही, चिरतरुण व खळाळत्या पाण्यासारखे...’’हवे हवेसे वाटणारे....''

त्या जगातून उठणाऱ्या लहरी त्याचे स्वागत करीत होत्या. त्यांचाही आवाज त्याला ऐकू आला. इतक्या दुरुन त्या लहरी त्याच्या अमर्याद उत्साहाला, त्याच्या कलेला, त्याच्या गुढ विचारांना कवेत घेऊ पहात होत्या... तो त्याचे वर्णन कदाचित करु शकत नसेल पण त्याला एक वेगळीच अनुभुती मिळत होती..तो आता विचारांपासून स्वतंत्र होता....मुक्ती... त्याने दिव्यावर फुंकर घातली आणि त्याच क्षणी तेथे अंध:कार पसरला. हेच तर त्याचे नशीब नव्हते....हा विचार त्याच्या मनात आला आणि तो कोसळला....

‘‘काळजी करण्याचे काही कारण नाही. त्याला कामाचा जरा जास्त ताण पडलाय. काही दिवसात अगदी टुणटुणीत होईल तो !
’’ डॉक्टरांनी वीणाची समजूत काढली.

‘‘बरा होईल ना तो ?’’ वीणाने केविलवाण्या चेहऱ्याने विचारले.

‘‘थोड्याशा आरामाने तो हिंडूफिरु लागेल !’’

दुसऱ्या खोलीत शरद शिरसाठ, अजित प्रधानच्या कामाकडे म्हणजे कॅनव्हासकडे बारकाईने बघत होता. त्याने तो वरपासून खालपर्यंत बारकाईने न्याहाळला. कुठे काही रंगाची छटा दिसते आहे का ते न्याहाळले.... पण छे !.

फक्त त्याच्या मध्यभागी अगदी वाचता येतील न येतील एवढ्या बारीक अक्षरात त्याला काहीतरी लिहिलेले अढळले. पण ते नक्की काय होता हे मात्र कळत नव्हते.

पण ‘‘एकाकी’’ या शब्दाच्या जवळपास काहीतरी होते हे निश्चित.......

मुळ लेखक : अल्बेर्त काम्यु.
मुळ कथेचे नाव : आर्टिस्ट ॲट वर्क
स्वैर भाषांतर : जयंत कुलकर्णी.
या भाषांतराचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन्.
या कथेतील सर्व पात्रे व त्यांची नावे काल्पनिक आहेत. कुठेही कसलेही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

31 Mar 2016 - 11:56 am | मराठी कथालेखक

मी कथा अजून वाचत आहे, पण न राहवून मध्येच हा प्रतिसाद द्यावासा वाटतो की

अजित प्रधानला खरा रस चित्रकलेत आहे हे उमगल्यावर वीणाने प्रथम काय केले असेल तर तिने साहित्याला "दूर हो जा मेरी नजरोसे'' केले. तिने चित्रकलेच्या अभ्यासाची कास धरली. तिने परत एकदा विविध आर्ट गॅलरींना भेटी देण्याचा सपाटा लावला. ती जाताना बरोबर अजित प्रधानला घेऊन जायची. दुर्दैवाने अजित प्रधानला त्याचे समकालिन चित्रकार काय रंगवत आहेत याचा काहीच गंध नव्हता आणि ना त्याला त्यांची चित्रकला समजे.

पुर्ण कथेमध्ये सततच नायकाचा उल्लेख पुर्ण नावानिशी केल्याने (नाव आडनाव) नायक अगदीच तिर्‍हाईत वाटत राहतो आहे. वाचक नायकाच्या जवळ पोहोचूच शकत नाही. कदाचित तुम्ही विशिष्ट हेतूने मुद्दामच असे लिहिले असेल. पण वाचताना ते थोडे विचित्र (माफ करा , तुम्हाला नाउमेद करायचे नाही) वाटत आहे
असो. आता पुर्ण कथा वाचतो.

विजुभाऊ's picture

31 Mar 2016 - 12:28 pm | विजुभाऊ

ती कामु ची स्टाईल आहे.
त्याचे "अ‍ॅन आउटसाईडर " वाचुन बघा एकदा.

सस्नेह's picture

31 Mar 2016 - 2:32 pm | सस्नेह

कला, भीषण वास्तव आणि कलाकारातील सामान्य माणूस यांचे यथोचित चित्रण.

कपिलमुनी's picture

31 Mar 2016 - 3:27 pm | कपिलमुनी

सुंदर चित्रण

पैसा's picture

31 Mar 2016 - 3:40 pm | पैसा

भावानुवाद छान जमला आहे. कलाकार नायक, त्याचे असले/नसलेले मोठेपण, यशस्वी संसारासाठी त्याची सामान्य पण कामसू बायको आणि लोकप्रियतेला ओहोटी लागल्यावर त्याचे बदललेले जग अतिशय सुरेख मार्मिक वर्णन आले आहे. स्वतःला सगळ्या झगमगाटापासून दूर केल्यावर त्याच्याकडून कोणतीही तथाकथित कलाकृती निर्माण होत नाही तर जग सुंदर असल्याची जाणीव होते, कदाचित आपण सामान्य असल्याचीही. हे सगळे फार सुरेख आले आहे.

जयंत कुलकर्णी's picture

31 Mar 2016 - 9:20 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

खटपट्या's picture

1 Apr 2016 - 1:54 am | खटपट्या

चित्र दीसत नाहीये

रातराणी's picture

1 Apr 2016 - 11:03 am | रातराणी

कथा खुप आवडली!

सविता००१'s picture

1 Apr 2016 - 11:26 am | सविता००१

सुरेख भावानुवाद.
खूप आवडली कथा

जव्हेरगंज's picture

1 Apr 2016 - 11:36 pm | जव्हेरगंज

_________/\__________

अतिशय पकावु कथा.

कपिलमुनी's picture

3 Apr 2016 - 9:16 pm | कपिलमुनी

फक्त ११ प्रतिसाद ?

प्रतिसादावरुन लेखनाचा दर्जा ठरत नाही वाचकांचा ठरतो

lgodbole's picture

3 Apr 2016 - 10:57 pm | lgodbole

छान्च

ब़जरबट्टू's picture

4 Apr 2016 - 4:15 pm | ब़जरबट्टू

वाचायची म्हणून वाचली असे झाले बघा.. कथा मला पण टाकावू वाटली.. :(

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2016 - 2:47 pm | मराठी कथालेखक

+१

आवडली.. हे थोड्या फार फरकाने सगळ्याच व्यवसायांना लागू होते.. अगदी मला माझ्यातला प्रोग्रॅमर पण याच मार्गाने जाताना दिसला.
त्या अर्थाने ती खूपच रिलेट झाली.

यशोधरा's picture

5 Apr 2016 - 6:50 am | यशोधरा

कथा आवडली.

एक एकटा एकटाच's picture

5 Apr 2016 - 8:51 am | एक एकटा एकटाच

मस्तच