पेट्रोल

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
26 Mar 2016 - 8:29 pm

"सत्तू भिजवे, आपलं नाव, का इचारलं? काय काम हाय?" मी त्या हवालदाराच्या डोळ्यात राग ओततच बोललो. तो शुंभासारखा माझ्याकडे बघतच राहिला. मग जरा जवळ येऊन त्यानं तोंडाचा वास घेतला.
"ये चल रे, येडं दिसतय कोणतर" किक मारत फटफटीवरचा खाकीतला दुसरा माणूस म्हणाला.
"मुस्काड फोडीन, कुठं गेलता येवढ्या रात्रीचं?" आता मात्र यानं हातंच उगारला होता. मी छाताड उघडं टाकून त्याच्यापुढं ताठ उभा होतो.
" पिच्चर बघायला गेलतो " यावेळी मी ठरलेलं उत्तर दिलं, तेही खालच्या आवाजात. या धटींगण हवालदाराशी जास्त हुज्जत घालणं परवडणारं नव्हतं.
"अरे तुज्यासारखी येडझवी पिच्चर कधीपासनं बघायला लागली ?" आता मात्र त्यानं फटफटीला अडकवलेली लोखंडी टोक असलेली काठीच बाहेर काढली. हातानं गरागरा फिरवत माजलेल्या रेड्यासारखा माझ्याकडं डोळं वटारुन बघायला लागला.
"कामावरनं यायला उशीर झाला साहेब, हितंच घर हाय आपलं" मी चेहरा शक्य तितका निर्विकार ठेवत अखेर शरणागती पत्करली.
"पुन्हा इथं दिसलातर टिरीवर फटकं टाकीन, अंगात जीव न्हाय साल्या मला उफारटं बोलतो? " तो चिरकूट हवालदार मला भलंबुरं सुनावून जरा धुसमुसळेपणानंच फटफटीवर बसून पसार झाला.

खरंतर मी जाम घाबरलो होतो. घाम फुटला होता.
एकतर रस्ता सामसूम. त्यात भयाण काळोख. अचानक पुढे यमदुतासारखे उगवलेले ते खाकीतले राक्षस. आणि त्यांच्या हातातल्या रायफली. हे एवढं अनपेक्षितपणे घडलं की मला माझाच संताप आला. त्या संतापातच मी त्या हवालदाराशी बोललो होतो. खरंतर माझ्या पहिल्याच वाक्यात एवढी जरब होती की त्या हवालदाराला माझं मुस्काट फोडू वाटलं होतं. त्याची काठी टिरीवर बसली असती तर आज धडगत नव्हती. मी सुरुवातीपासूनच गरीबड्यासारखं बोललो असतो तर एवढही झालं नसतं. पण हा अनपेक्षित धक्का मला वर्मी बसला होता.

काळीज अजूनही धडधडत होतं. रक्त चिंधड्या उडवत शरीरभर पळत होतं. डाव्या डोळ्यावरची जखम मीठ टाकल्यासारखी चुरचुरत होती. हातापायाला कंप सुटला होता. गल्लीबोळात कुत्र्यांनी भुंकून काव आणला होती. लक्ष्मण पेठ आता डोक्याभोवती फिरत होती.

धडपडत जाऊन मी एका दुकानासमोरचा कोपरा पकडला. मग सरकत सरकत पायरीवर जाऊन बसलो. अंगरख्यातून दारुची बाटली काढली. अन घटाघटा पिऊन रिकामी केली. मग तसाच बराच वेळ बसून राहिलो. हळूहळू सगळं मूळपदावर येत चाललं. मी डोळे मिटून एखाद्या मंतरलेल्या ऋषीसारखा शुन्यात पोहोचलो. निरव शांतता वातावरणात भरुन राहिली. बायपासवर वसलेल्या लक्ष्मण पेठेत आता वाऱ्याचा घोंघारव सोडल्यास बाकी सामसूम होती. रात्र गडत होत झिंगरी झाली होती.

लक्ष्मण पेठेच्या बाजूस भलेमोठे कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड होते. शहराचा हा भाग ओसाड, मागास, वैरान राहिला होता. याच कचऱ्याच्या डंपिंग ग्राउंडात मी माझे घर बनवले होते. समोरच्या पुलावरुन खाली उतरुन ओढ्याच्या काठाकाठानं पुढं चालत गेल्यास एका दलदलीत पत्र्याचं शेड होतं. प्लास्टिकच्या बाटल्यांचा तिथे खच पडला होता. जो महिनों महिने उचलला जाणार नव्हता. त्यातच थोडी जागा करुन मी घर तयार केलं आहे. पूर्वी तेथे म्हणे कत्तलखाना होता. दिवसभर शहरात भटकून मला झोपायला इकडेच यावे लागते. तसा आजही चाललो होतो. पण मध्येच हे पोलिसांच प्रकरण घडलं.

गुडघ्यावर हात ठेवून मी सावकाश उठलो. कुत्र्यांचा कानोसा घेत घेत मग चपळाईनं रस्ता तुडवायला लागलो. आतून शहरातून सायरनचे आवाज घुमत होते. पोलिस गल्लीबोळातून गस्त घालत फिरत होते. ते का घालत होते हे मला समजलं नाही. पण गेल्या महिनाभरापासून त्यांचा हा सुळसुळाट सुरुच होता.

वारा सुसाट सुटला होता. पाऊस यायचा संभव होता. एका वीजेच्या डांबाखाली थोडा उजेड होता. तेथे कोणीतरी ऊभं होतं. ते पाहिलं आणि मी दचकलो. अंगावर शिरशीरी धावून गेली. हे असं मध्यरात्रीला मान खाली घालून तिथं कोण ऊभं असेल. आता मात्र मी जरा सावध झालो. पाउलांचा आवाज न करता जवळ जात राहिलो. सुटकेस घेऊन कोणी स्त्री नवविवाहतेच्या थाटात तिथे उभी होती. मग सरळ तिच्या पुढेच जाऊन ऊभा ठाकलो. पण तिनं खाली घातलेली मान काय वर काढली नाही. लाल रंगाची नवीकोरी साडी तिच्या अंगावर होती. पदर थोडा ढळला होता. गळ्यातलं सोनं बघून चांगल्या घराण्यातली वाटत होती. बहुतेक पळून आली असावी. किंवा लफड्याची तरी भानगड असावी. नाहीतर एवढ्या रात्री अशी स्त्री भररस्त्यात अशीकशी ऊभी राहिली असती.

"कुठं जायचंय?" मी नरमाईनं बोललो. पण तिच्या तोंडून एक शब्द फुटला नाही.
"काय तरास हाय का? काय आडलय का?" तिला बोलतं करायला मी अजून एकदोन प्रश्न विचारले. पण तिची मान खालीच राहिली.
नसतं झेंगाट नको म्हणून मी पुढं चालायला लागलो तर पाठीमागनं तिची मुसमुस ऐकू आली. वळून बघितलं तर रुमालानं डोळ्यातलं पाणी टिपत होती. मग मात्र मला राहवलं नाही.
"चल चल, चल पोरे चल, आजची रात माझ्या गरिबाच्या खोपट्यात ऱ्हा, सकाळ उठून तुला कुठं जायचयं तिकडं जा, पण आशी आंधारात उभी राहू नकू " हे मात्र तिला पटलं असावं. कारण पावलावर पाउल टाकत ती मागे मागे येत राहिली. पुलाच्या खाली उतरुन मग ओढ्याच्या काठानं मी दलदलीत घुसलो. पाठीमागं ती पोर सुटकेस सांभाळत वाट काढत राहिली.

पत्र्याच्या शेडचा दरवाजा करकरत उघडला. आत जाऊन मी मेनबत्ती पेटवली. ती पोर मग आत येऊन सुटकेस खाली ठेऊन एका कोपऱ्यात बसून राहिली. मीपण तिच्या समोर पत्र्याला टेकून खाली बसलो. बोलण्यासारखं काहिच नव्हतं. मग मेनबत्तीच्या उजेडात तिला नीट न्याहाळत बघतच राहिलो. बराच वेळ गेला. त्या पोरीनं साधी मान सुध्दा वर केली नाही. साधं एक वाक्य पण बोलली नाही. दूरुन कुठूनतरी येणारे सायरनचे आवाज सोडल्यास खोपट्यात शांतताच भरुन राहिली होती. मी अंगरख्यात हात घालून दारुची बाटली बाहेर काढली. तिच्यासमोरच घटाघटा पिऊन रिकामी केली. रक्त चिंधड्या उडवत शरीरभर पळत सुटलं. मी उठून झोकांड्या खातच बाहेर आलो. पत्र्याच्या शेडमागं जरा दूर जाऊन प्लास्टिकच्या बाटल्या उचकटल्या. तिथं माझी पुरलेली ट्रंक बाहेर काढली. आतून सत्तूर, गुप्ती, रामपूरी, कोयता, विळा अशी बरीच हत्यारे चापचल्यावर शेवटी अणकुचीदार कुऱ्हाड निवडली. दोन्ही हातात घट्ट धरुन मग झपाझप पावले टाकत खोपट्याकडे निघालो.

झिंगरी रात्र आपले रंग दाखवत आता तुटून पडणार होती. खऱ्या खेळाला आता कुठे सुरुवात झाली होती.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

भरत्_पलुसकर's picture

26 Mar 2016 - 8:35 pm | भरत्_पलुसकर

खतरनाक भौ. पुढं हाय का?

स्पा's picture

26 Mar 2016 - 8:38 pm | स्पा

पटली नाय

श्री गावसेना प्रमुख's picture

26 Mar 2016 - 8:45 pm | श्री गावसेना प्रमुख

लाल साडीवाल बाय व्हती कि बाप्या

प्रचेतस's picture

26 Mar 2016 - 8:51 pm | प्रचेतस

विकृत खुन्याची गोष्ट. थोड़ी अधिक खुलवता आली असती.
ती स्त्री विकृत किंवा भूत वैगरे निघेल असं आधी वाचताना वाटलं होतं.

तुषार काळभोर's picture

26 Mar 2016 - 10:21 pm | तुषार काळभोर

पण त्यातच तर खरी मज्जा आहे.

रातराणी's picture

27 Mar 2016 - 7:20 am | रातराणी

बापरे! जबरा लिहिलंय.

भाऊंचे भाऊ's picture

27 Mar 2016 - 7:53 am | भाऊंचे भाऊ

भट्टी जमी नय
...

जव्हेरगंज's picture

27 Mar 2016 - 6:38 pm | जव्हेरगंज

बहुतेक पहिल्या पोलिसाच्या प्रसंगात गडबड उडाली असं दिसतंय. सुधरवायला चान्स आहे म्हणा. बाकी अजून काय काय प्रश्न पडलेत विचारा की राव. म्हणजे निदान कळेल तरी कुठे कुठे रिपेअरींग करायचंय ते..

चांदणे संदीप's picture

27 Mar 2016 - 11:52 pm | चांदणे संदीप

सॉलिड जमलीये.... डरना मना है वगैरे चित्रपटातील एक प्रसंगच जणू!

और आन्दो!

Sandy

आनंद कांबीकर's picture

27 Mar 2016 - 11:39 pm | आनंद कांबीकर

ति सोनं घातलेली पोर लगेच त्या दारुड्याच्या मागे का निघाली?
कदाचित पुढे लिहिल्यावर स्पष्ट होईल.

चांदणे संदीप's picture

27 Mar 2016 - 11:52 pm | चांदणे संदीप

सॉलिड जमलीये.... डरना मना है वगैरे चित्रपटातील एक प्रसंगच जणू!

और आन्दो!

Sandy

अभ्या..'s picture

28 Mar 2016 - 12:07 am | अभ्या..

आज सॅण्डीबाबा इकोबाबा का झालाय? सगले प्रतिसाद दोन्दोन्दा?
बायवनगेटवन चालूय का आजचा दिवस?

चांदणे संदीप's picture

28 Mar 2016 - 7:15 am | चांदणे संदीप

:/

उगा काहितरीच's picture

28 Mar 2016 - 1:14 am | उगा काहितरीच

आपण तर बुवा फॕन झालोय जव्हेरभाऊंचा ... कथा नेहमीप्रमाणेच झक्कास.

नाखु's picture

28 Mar 2016 - 8:46 am | नाखु

हाये पण जव्हेरभाऊंचा छापबी नायं.

वाचाल तरच वाचाल मिपा वाचक चळ्वळीच्या संघांचा एक चिल्लर सभासद

नाखु

ब़जरबट्टू's picture

28 Mar 2016 - 9:24 am | ब़जरबट्टू

बाई जाग्गेवर उडवली असती कु-हाडीने तर पटली असती गोष्ट .. :) .. ते घरी घेऊन जाणे, तिने येणे ये कुछ पट्या नाय.

पीशिम्पी's picture

30 Mar 2016 - 10:46 pm | पीशिम्पी

ही कथा नाही जमली. माबोवर बहुधा अर्धवट व्हर्जन होते. इथे वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. पण जव्हेरगंज टच नाहिये

पिलीयन रायडर's picture

31 Mar 2016 - 2:22 pm | पिलीयन रायडर

ही कथाही कळली नाही.. त्याहुन पटली नाही.

म्हणजे अशी बाई जाईलच कशी दारुड्याच्या मागे त्याच्या खोपटात? हां आता बाईच दारुड्याचा गेम करणार असेल तर गोष्ट वेगळी ;)

अजया's picture

1 Apr 2016 - 4:33 pm | अजया

+१००

विजय पुरोहित's picture

31 Mar 2016 - 9:39 pm | विजय पुरोहित

जव्हेरगंज...
कथा अतिशय आवडली. आद्यंत जरी स्पष्ट नसला तरी भाषासौंदर्याच्या दृष्टीने अफलातून लिहीता हे सांगतो.
अप्रतिम लिहीतोस रे...
सुंदर सुंदर सुंदर...
फक्त थोडंसं सादरीकरणावर लक्ष दे म्हणतो कारण पब्लीकला सुरूवात आणि शेवट धक्कादायक लागतो.
लिहायची घाई करू नकोस...
You can do better than that!!!
:)

विजय पुरोहित's picture

31 Mar 2016 - 9:40 pm | विजय पुरोहित

खरं सांगतो...
माणूस टरकतो वाचताना...
:)

जव्हेरगंज's picture

1 Apr 2016 - 4:25 pm | जव्हेरगंज

धन्यवाद !
धन्यवाद !
धन्यवाद !
धन्यवाद !
धन्यवाद !
धन्यवाद !

आदिजोशी's picture

1 Apr 2016 - 6:29 pm | आदिजोशी

च्यायला असलं काही तरी लिहून अर्धवट सोडून का त्रास देताय. इ नॉय चॉलबे. पटापट लिहा पुढे :)