हे अशक्य नाही!

उल्का's picture
उल्का in जनातलं, मनातलं
15 Mar 2016 - 3:13 pm

साधारण पंधरा वर्षांपूर्वी तारापूर येथे माझे वास्तव्य होते. मुले लहान असल्यामुळे त्यांना शाळेत सोडायला मी जात असे. त्यांच्या शाळेच्या नोटीस बोर्डवर एक ‘बोलके’ चित्र लावले होते. जेव्हा एक चित्र अनेक शब्दांचे काम करते तेव्हा त्या चित्राला बोलकेच म्हणावे लागते.

‘एका पोलीथिन पिशवीने आपला ‘आ’ वासला आहे आणि ती संपूर्ण पृथ्वी गिळंकृत करते आहे’ असे ते चित्र होते. कदाचित अजुनहि असेल. कारण परिस्थितीत चांगला स्वागतार्ह काहीही बदल झालाच नाही आहे उलटपक्षी ती हाताबहेरच गेली आहे की काय अशी शंका यावी. मधूनच जाग आल्यावर काही कडक नियम लागू केल्याचा फक्त आव आणला जातो. जणू मी ओरडल्यासारखे करतो तू घाबरल्याचे दाखव. बस्स! मोजके काही दिवस हे नियम वरवर पाळले जातात परत ये रे माझ्या मागल्या!

दोन वर्षांपूर्वी माझी लेक साताऱ्याला कास पठारला गेली होती. सातारा म्हंटले म्हणजे कंदी पेढे आणणे ओघाने आलेच. तेव्हा पेढ्यांसाठी तिला साताऱ्याला चक्क कापडी पिशवी दिली गेली होती. मी हाताळलेली ती पहिली वहिली कापडी पिशवी. छोटूली, सुबक, लाल रंगाची पिशवी आणि तिने साताऱ्यात जन्म घ्यावा? मला हेवा वाटला त्यांचा. खरच!

एक वर्षापूर्वी आम्ही कोल्हापूरला जाताना वाटेत जेवणासाठी नेमके साताऱ्याला थांबलो. त्या प्रशस्त हॉटेल मध्ये Mapro ची उत्पादने विकायला ठेवली होती. माझ्यासारखा मासा अशा गळाला लगेच फसतो. मग काय? मी नवऱ्याच्या नापसंती दर्शक अविर्भावाकडे पूर्ण दुर्लक्ष करत काही घेतली विकत. मी त्या दुकानदाराला माझ्या कडची पिशवी देणार इतक्यात त्यानेच मला कापडी पिशवीत माझी खरेदी घालून मला ती दिली. पुन्हा धन्य तो सातारकर असे म्हणावेसे वाटले.

आमची मुंबई इतकी सुधारलेली राजधानी! तरीही आम्ही मात्र अजूनही त्या निकृष्ट दर्जाच्या टाकाऊ प्रतीच्या पिशव्याच वपरतो आहोत. हे काम दोन स्तरांवर होणे आवश्यक आहे. एक ग्राहक तर एक विक्रेता. दोघांनी हातमिळवणी केल्याशिवाय हे होणे नाही. ग्राहकांनी आपली पिशवी सोबत ठेवली तर हा प्रश्न उद्भवणार नाही. परंतु कधीतरी चुकून त्याच्याकडे नसली तर त्याला मिळणारी पिशवी ही पण कापडीच असावी ह्याकडे विक्रेत्यांनी लक्ष द्यायला हवे.

मागे मी ह्या संदर्भात माझ्या फेसबुक पेज वर लिहिले तेव्हा एक प्रतिक्रिया आली की आपण आपली पिशवी घेऊन जावी. इतरांना आपण सांगू अथवा सुधरवू शकत नाही. असे आपण आपल्याच पुरते बघत बसलो तर कशी सुधारणा होणार? आणि तसे बघितले तर ह्याचा फायदा आपल्याया आणि आपल्या पुढील पिढीला होणार आहेच.

माझा नेहमीचा फळ विक्रेता अगदी खुल्या मनाने मी माझीच पिशवी वापरते म्हणून कौतुक करतो. मी त्याला म्हंटले की “तू ह्या पिशव्या का देतोस? इतक्या पातळ पिशव्या हानिकारक असतात.” तर तो म्हणाला की “मी पिशवी दिली नाही तर ग्राहक परत जातात. दुसरा विक्रेता शोधतात. महाग पिशव्या मला परवडत नाहीत. कधी कधी काही ग्राहक दोन दोन पिशव्या मागतात. विकत आणलेला माल वेळेत नाही खपला तर खराब होऊन तोटा होणार म्हणून ग्राहक हा राजा समजून मी देतो त्यांना पिशव्या. काय करू? म्हणूनच तुमचे कौतुक वाटते ना?”

आता अशा वेळी नागरिकांनीच पुढाकार नको का घ्यायला? गरीब विक्रेत्यांना भुर्दंड भरायला लावून वर पर्यावरणाची हानी करायची. कहॉं का इन्साफ है? चांगल्या दुकानात, जिथे आपल्या कडून पिशवीचे पैसे आकारतात तिथेही प्लास्टिकच्याच पिशव्या मिळतात. मागच्या वर्षी ‘शब्द’ पुस्तक मेळाव्याला गेले होते. तिथे ५ रुपयांना मोठी कापडी पिशवी देत होते. ‘सहकारी भांडार’ या दुकानात पण कापडीच पिशव्या मिळतात. असे सगळ्या दुकानांमध्ये होणे गरजेचे आहे. एकत्रित येउन हा निर्णय घेणे गरजेचे आहे.

सरकारने निकृष्ट पिशव्यांची निर्मिती थांबवून त्या ऐवजी कापडी पिशवीच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले पाहिजे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हे होणे निकडीचे आहे.

हे अशक्य नाही!

-उल्का कडले

समाजविचार

प्रतिक्रिया

जेपी's picture

15 Mar 2016 - 3:55 pm | जेपी

लेख आवडला..

जय हिंद,जय महाराष्ट्र..

बहुगुणी's picture

15 Mar 2016 - 5:14 pm | बहुगुणी

लेखातील भावनांशी सहमत. तयार आकर्षक कापडी पिशव्या तर मिळतातच, पण घरीच उपलब्ध असलेल्या बिन-वापराच्या हव्या त्या कापडातुनही ८-१० पिशव्या स्वतःच शिवणं (किंवा शिवून घेणं) अवघड नाही. हा एक दुवा.

जाता जाता: सध्या चीन मध्ये उत्पादित स्वस्त रंगीत (बहुधा हिरव्या) पिशव्या मिळतात, या कापडी नसून spun Polypropylene च्या केलेल्या असतात. त्यांवर can be recycled असं लिहिलेलं असतं, made from recycled material असं नाही.

हो. आजकाल ज्युट बॅग म्हणून स्पन पॉलिप्रॉपलीन बॅग्ज खपवल्या जातात. त्या बिल्कुल कापडी बॅग्ज नसून पातळ कॅरीबॅग्ज्पेक्षा घातक आहेत. त्या विघटन होत नाहीत लवकर शिवाय जाळल्यास अतिशय उग्र वास देऊन अर्धवट जळल्या जातात.

आजकाल ज्युट बॅग म्हणून स्पन पॉलिप्रॉपलीन बॅग्ज खपवल्या जातात

ज्यूट आणि पॉलिप्रॉपलीन मधला फरक कसा ओळखायचा?

अभ्या..'s picture

17 Mar 2016 - 10:54 am | अभ्या..

जळती काडी जवळ न्यायची. पॉलीप्रॉपलीन आकसायला सुरुवात होते. जास्त जवळ नेली घाणेड्रा वास येतो. (ह्या शिंपल माझ्या आयडीया हैत. शास्त्रीय टेस्ट्स माहीत नैत. ह्या बॅग्ज आधी माझ्याकडे प्रिंटिंगला यायच्या. नॉनवोव्हन पॉलीमटेरिअल असते हे शुअर)

मी जी कापडी पिशवी म्हणते आहे ती नक्की कापडी आहे का? की वेगळ्या घातक घटकापासून (spun Polypropylene) बनवलेली असते? जर तसे असेल तर हे आणखी भयावह आहे.
ह्या माहितीसाठी धन्यवाद!

शान्तिप्रिय's picture

15 Mar 2016 - 6:01 pm | शान्तिप्रिय

उल्काजी,
अतिशय थोडक्या शब्दात प्लास्टिक चा महाराक्षस कशी प्रुथ्वी गिळंक्रुत करु पाहातोय हे अतिशय मार्मिक रीतिने इथे
सांगितल्याबद्दल धन्यवाद. तसेच हा लेख कापडी पिशव्यांच्या सोप्या पर्यायाचे महत्त्व सुंदरपणे अधोरेखित करतो.

मीही कापडी पिशव्या वापरते.

श्रीरंग_जोशी's picture

15 Mar 2016 - 11:42 pm | श्रीरंग_जोशी

या विषयावर लिहिण्यासाठी धन्यवाद. लेख आवडला. लेखामध्ये उल्लेखलेल्या कापडी पिशव्यांचे फोटो टाकावे ही विनंती.

सध्या माझ्याकडे ती पिशवी नाही. कधीतरी विकत घेईन आणि मग पोस्ट करेन.

सही रे सई's picture

16 Mar 2016 - 12:01 am | सही रे सई

कापडी पिशव्या बरोबर ठेवणे कधिही चांगलेच. मागे एकदा मी मला मिळालेल्या ब्लाऊज पिसच्या पिशव्या शिवून घेतल्या होत्या. काहीजणांकडे कोणी नवीन बाईमाणूस घरी आल की पहिल्यादा आले म्हणून ओटी भरली जाते ब्लाऊज पीसने. अश्यावेळी याच पिशव्या दिल्या की ती व्यक्ती पण या कापडी पिशव्या वापरायला सुरूवात करते.

उल्का's picture

16 Mar 2016 - 2:47 pm | उल्का

कल्पना छान आहे.

रुपी's picture

16 Mar 2016 - 12:31 am | रुपी

खरे आहे तुमचे. त्या फळे देण्यासाठी वापरात येणार्‍या पिशव्या अतिशय हानीकारक असतात. मुळात त्या फारच पातळ असल्यामुळे अगदी लवकर फाटतात, त्यामुळे पुन्हा एकदासुद्धा वापरण्यायोग्य राहत नाहीत. पर्यावरणासाठी तर फार हानीकारक आहेत. १२-१३ वर्षांपूर्वी मनालीला खरेदी केली तिथेही दुकानदार असाच सुंदर कापडी पिशव्या द्यायचे. बाकी काही ठिकाणीसुद्धा हा अनुभव आला आहे, पण एकंदरीत प्लॅस्टीकचा वापर खेद करायला लावण्याइतका वाढला आहे. मागच्या एक-दोन वर्षांत कॅलिफोर्निया मध्ये बे एरियात प्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी आली आहे, त्यामुळे आता निदान खरेदीला जाताना तरी सगळ्यांच्या हातात कापडी पिशव्या आल्यात, त्याचा थोडा फायदा आहेच. पण एकंदरीत लोकांना प्लॅस्टीकच्या वापराची इतकी सवय झालीये, की खरंच पृथ्वी गिळंकृत व्हायला फार वेळ लागणार असंच वाटतं! :(

खरं तर या विषयावर काही करायला, लिहायला इतके हात शिवशिवतात, पण उगीच धाग्यापेक्षा प्रतिसाद जड असे व्हायला नको म्हणून माझ्यापुरते एक उदाहरण देते. माझ्या ऑफिसमध्ये एका मजल्यावर शंभर क्युबिकल्स आहेत. प्रत्येक क्युबमध्ये एक कचर्‍यासाठी बादली असते. शिवाय, ब्रेकरूम, लॉबी अशा ठिकाणी मिळून मोठ्या पंधरा तरी बादल्या असतील. या सगळ्यांना प्लॅस्टीक बॅग लावलेल्या असतात. मोठ्या बादल्यांच्या बॅग्स दिवसातून दोन-तीन वेळा आणि क्युबमधल्या रोज सकाळी बदलल्या जातात. म्हणजे माझ्या क्युबमधल्या बादलीत मी एक टिश्युपेपर जरी टाकला तर दुसर्‍या दिवशी बॅग बदलली जाते. प्रत्येकाने टाकला तर दुसर्‍या दिवशी शंभर बॅग्सचा कचरा! माझ्यापुरते मी उठून कचरा मोठ्या बादलीत टाकून येते. तेवढेच रोजची एक प्लॅस्टीकची पिशवी कचर्‍यात जाण्यापासून वाचते (रिकामी बॅग रोज बदलली जात नसेल असे गृहीत धरुन!).

मिपावर बहुगुणी यांची "वन फिश अ‍ॅट अ टाईम" ही कथा आहे.. मी रोज स्वतःला "सेव्हींग द प्लॅनेट वन प्लॅस्टीक बॅग अ‍ॅट अ टाईम" म्हणून असे म्हणून स्वतःचे दु:ख कमी करायचा प्रयत्न करते.

उल्का's picture

16 Mar 2016 - 2:48 pm | उल्का

प्रशंसनीय!

बोका-ए-आझम's picture

16 Mar 2016 - 1:13 am | बोका-ए-आझम

१२ जुलै २००० आणि २६ जुलै २००५ हे मुंबईत पावसामुळे झालेल्या वाताहतीचे अगदी आठवणारे प्रसंग. दोन्हीमध्ये प्लॅस्टिक पिशव्या हा प्रमुख खलनायक. त्यांच्यामुळे तुंबणारी गटारं आणि त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा न होणारा निचरा, साठून राहणारं पाणी, त्यामुळे होणारे आजार - अशी मोठी चेन आहे. प्लॅस्टिक पिशव्या न वापरणं हा एकमेव उपाय आहे ही चेन तोडायचा.

उल्का's picture

16 Mar 2016 - 2:51 pm | उल्का

अगदी खरे आहे.

लेखनाशी सहमत आहे. मीही कापडी पिशव्या वापरते किंवा पूर्वी कधीतरी मिळालेल्या कागदी/प्लास्टीक पिशव्या पुन्हा फाटेस्तोवर वापरते.

नाखु's picture

16 Mar 2016 - 9:45 am | नाखु

राजगड येथेही प्लास्टीक (अगदी पात पिशव्या) आणि पाण्याच्या बाटल्यांचा बेसुमार कचरा पाहिला आहे.आणि आम्ही स्वतःच्या (वॉटर बॉटलेने) पाणी पित असताना सो कूल हेटाळणी नजरां अनुभवल्या आहेत. चॉकलेट्/बिस्कीट रॅपर रस्त्यात/बागेत्/रेल्वेत्/बसमध्ये/गडावरच्/सिनेमा बघताना/दुकानाबाहेरच फेकणे हे मॉर्डन असल्याचा अलिखित नियम असावा काय असे वाटते.

कापडी पिशवी बाळगण्याची अजिबात लाज न वाटणारा नाखु

पिलीयन रायडर's picture

16 Mar 2016 - 11:49 am | पिलीयन रायडर

माझ्या आईने आत्ता संक्रातीला पिशव्याच लुटल्या. पण त्या कापडी नाहीत. पातळ प्लास्टीक सारखेच मटेरियल आहे. त्या पिशवीच्या एका कोपर्‍याला स्ट्रॉबेरी सारखे डिझाईन केले आहे, आणि पिशवीची लहानशी घडी होऊन ती ह्या स्ट्रॉबेरीत कोंबायची आणि वर छोटी दोरी दिली आहे, तिने बटव्या सारखी बंद करायची. मुठी एवढी स्ट्रॉबेरी कुठेही नेता येते!

लेख आवडलाच. सर्वांनीच जाणीवपुर्वक पिशव्या बाळगल्या पाहिजेत आणि वापरल्या पाहिजेत. माझ्या ऑफिस बॅगेत आणि गाडीत कायम एक पिशवी असते.

उल्का's picture

16 Mar 2016 - 2:53 pm | उल्का

कुठे मिळते अशी पिशवी ?

पिलीयन रायडर's picture

16 Mar 2016 - 3:33 pm | पिलीयन रायडर

आईने औरंगाबादहुन आणल्या. पुण्यात कुठे मिळतात ते माहित नाही. मी जमल्यास फोटो टाकेन.

पुण्यामधे तुळशी बाग मधे नक्की मिळेल.हल्ली तशा पिशव्या खूप बघायला मिळतात. पण मी जु.सा.पि. म्हणजे जुन्या साडीची पिशवी वापरते त्याला आतून अस्तर लावलेलं असतं त्यामुळे लवकर फाटत नाही आणि मशिनमधे पण धुता येते :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Mar 2016 - 3:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

सध्या प्लास्टिक ला पर्याय नाही असेच चित्र सगळी कडे उभे केले गेले आहे.

मला वाटते हा प्रश्न केवळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करुन सुटणारा नाही. आपण दिवसाची सुरुवात करतो तेच मुळी दुधाची पिशवी फोडून. जुन्या पिढीतल्या लोकांना आठवत असेल की पूर्वी दुध पिशवीतून नाही तर बाटली मधुन मिळत असे. ते दुध पिशवी मधून कसे आणि कधी मिळायला लागले हे समजलेच नाही. तिचा गोष्ट शीत पेयांची. काचेच्या बाटली मधुन मिळणारी शीतपेये आता सर्रास प्लास्टिक किंवा टीन मध्ये मिळतात.

टेट्रापेक हे तर प्लास्टिक पिशवी पेक्षा घातक आहे असे कुठे तरी वाचण्यात आले आहे

"पारले जी" कागदावरुन प्लास्टिकच्या वेश्टनावर गेले. पूर्वी किराणामालाच्या दुकानात, बेकरीत गेले की हमखास कागदी पिशवितुन मिळणारी उत्पादने हळुच प्लास्टिक पिशवीत शिरली. आयोडेक्स व्हिक्स अमृतांजन तसेच इतर औषधांच्या बाटल्या प्लास्टिकच्या झाल्या. तर पेराशुट तेल टीन च्या डब्यातुन प्लास्टिकच्या बाटलीत मिळायला लागले. लिमलेटच्या गोळ्या, शांपूचे सेशे, साबण आणि साबण पावडर, आणि आता होटेल मधले जेवणाचे पार्सल सगळे आपल्याला प्लास्टिक मधुन मिळते. (परवाच सुकांता मधुन थाळी घरी पार्सल आणली होती तर बादली भर प्लास्टिकचा कचरा जमा झाला ) चहाचे कप, पाण्याचे ग्लास, जेवणाच्या पत्रावळी यांनी तर उच्छाद आणला आहे , आतातर आपण पाणी सुध्दा प्लास्टिकच्या बाटली मधुन पितो.

आपण काहीही खरेदी केली तरी त्या मध्ये थोड्याफार प्रमाणात प्लास्टिकचा कचरा तयार होतोच मग ती भाजी असो किंवा कार.

आणि हे सर्व प्लास्टिक आपण सरासरी १ ते २ वेळा वापरुन फेकून देतो आणि नवे प्लास्टिक विकत घेण्यासाठी सज्ज होतो. आपण चुकवत असलेल्या अप्रत्यक्ष किमतीची पर्वा न करता. कारण वरकरणी ते आपल्याला फुकट मिळत असते.

ह्या राक्षसाला कसे आणि कुठे कुठे आवरायचे तेच समजत नाही.

अजून एका गोष्ट जी मला नक्की माहित नाही ते म्हणजे हे जे प्लास्टिक आपण वापरतो ते म्हणजे पेट्रोलियम पदार्थांचे बायप्रोड्क्ट आहे. म्हणजे आपण प्लास्टिक वापरणे बंद केले तरी सुध्दा मागणी घटली म्हणून प्लास्टिकचे उत्पादन कमी होईल का? की फक्त आपण वापरले नाही तरी पृथ्वीवर प्लास्टिक पडतच राहील?

पैजारबुवा,

अजून एका गोष्ट जी मला नक्की माहित नाही ते म्हणजे हे जे प्लास्टिक आपण वापरतो ते म्हणजे पेट्रोलियम पदार्थांचे बायप्रोड्क्ट आहे. म्हणजे आपण प्लास्टिक वापरणे बंद केले तरी सुध्दा मागणी घटली म्हणून प्लास्टिकचे उत्पादन कमी होईल का? की फक्त आपण वापरले नाही तरी पृथ्वीवर प्लास्टिक पडतच राहील?

ह्म्म. मुद्दा हाच आहे.
मला वाटते वस्तूंचे स्वस्तकरण (काही पर्यायी शब्द अस्ल्यास क्षमस्व) जास्त कारणीभूत होतय. सुविधा हा दुसरा मुद्दा झाला.
पूर्वी स्टीलच्या ताट वाट्या ग्लास कार्यात असायच्या, आता कार्यालयाच्या बाहेर प्लास्टीक ग्लास, युजनथ्रो द्रोण पत्रावळींचा ढीग साठलेला असतो. त्यामागे भांडी घासणार्यांचे कश्ट वाचतात आणि मंगल भांडाराचे भांडी भाडे वाचते. पुढच्या कचर्‍याच्या विल्हेवाटीची कोण जबाबदारी घेणार? छोट्या कॅन्टीनवर आता सर्रास प्लास्टीक ग्लास दिले जातात. पूर्वी सर्फ रिनचे कागदी खोके असायचे. आता प्लास्टीक सॅशेने वाट लावली. शांपूचे, साबणाचे, कॅन्डीचे, वेफर्सचे पॅकेजिंग पातळ कॅरीबॅग पेक्षा हानीकारक आहे. (दुधाच्या, साड्यांच्या दुकानच्या कॅरीबॅग रिसायकल होतात, मेटल, प्लास्टीक सॅन्डविच पॅकेजिंग रिसायकल होत नाही) पातळ कॅरीबॅगवर आक्षेप घेणारे कधी ह्या गोष्टींवर आक्षेप घेणार? लहान व स्वस्त पॅक्स घेणारे ह्या गोश्टींचा कधी विचार करणार? पीव्हीसी जेवढे उपयोगी आहे तेवढेच हानीकारक. त्याबद्दल अवेअरनेस अवश्य वाढला पाहिजे.
जरा विचार करुन मी फ्लेक्सचा धंदा सोडून दिला. आता फक्त कमर्शिअल टिकाउ आणि महाग अ‍ॅड साइन्सची कामे करतो. फ्लेक्स १५ वर्शापूर्वी १२० रु स्क्वेअर फूट होते. आज ७ रु पर्यंत खाली आलेय. लोकांनी लगेच त्याला चीप मिडीया करुन टाकला. दोन चार दिवसासाठी कुणीही रस्त्यावर झळकतो. पण ते कापड विघटन होत नाही लवकर. स्वस्त ते उचलायचे ही वृत्तीही लवकर विघटन होणारी नाही.

तुमचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन!

अनुप ढेरे's picture

16 Mar 2016 - 3:42 pm | अनुप ढेरे

हा प्रतिसाद वाचनीय आहे.

उत्तम धागा व प्रतिसाद. सवडीने सविस्तर लिहितो.

मितान's picture

16 Mar 2016 - 4:22 pm | मितान

उत्तम धागा !
आम्ही घरी सगळे जुसापि ( जुन्या साडीची पिशवी) वापरतो. सासूबाई दरवर्षी 50 पिशव्या शिवून घेतात. आणि वाटतात. नेहमीचे भाजी फळ किरणावालेही प्लास्टिक नको म्हटल्यावर हसून दाद देतात :)
खरं आहे. हे एवढं तरी सहज शक्य आहे.

निशांत_खाडे's picture

16 Mar 2016 - 5:48 pm | निशांत_खाडे

हे ठीक आहे. पण काही गोष्टी मला निव्वळ मूर्खपणाच्या वाटतात. आपण 'पृथ्वी वाचवू शकतो', 'पर्यावरण वाचवू शकतो' हा आत्मकेंद्रित मानवजातीचा निसर्गावरील ताबा दाखवण्याचा एक अत्यंत उद्धट प्रयत्न आहे.
"एका पोलीथिन पिशवीने आपला ‘आ’ वासला आहे आणि ती संपूर्ण पृथ्वी गिळंकृत करते आहे" हेही त्याच मानसिकतेचे एक उदाहरण आहे. आपल्याला असे वाटते कि, प्लास्टिक किंवा टीन चा वापर केल्याने पृथ्वी किंवा पर्यावरण नष्ट होईल. खरे पाहता, सत्य हे आहे, की काही जर नष्ट होणारच असेल ती मानवजात असेल. पृथ्वी आणि निसर्ग जश्यास तसे राहणार आहेत, प्लास्टिकमुळे झालेले थोडेफार नुकसान पृथ्वी आपोआप भरून काढेल आणि परत एकदा पृथ्वी जश्यास तशी होईल. निसर्ग जश्यास तसा होईल. पृथ्वी काही एखादी मोटार नाही जी खराब होऊन बंद पडेल, ती एक स्वतंत्र यंत्रणा आहे. पृथ्वी एका सजीव प्राण्याप्रमाणे आहे, झालेल्या जखमा भरून काढायला ती समर्थ आहे.
पोलिथिन मुळे पृथ्वीला खूप मोठा तोटा होईल ही समज चुकीची आहे, मानवजातीला तोटा आहे हे सत्य, तेव्हा ती पोलिथिन ची पिशवी पृथ्वीला नव्हे तर माणसाला गिळंकृत करत आहे असे चित्र हवे होते.

जेपी's picture

16 Mar 2016 - 7:21 pm | जेपी

प्रतिसाद आवडला..
जो तोटा होईल तो सजीवाला होईल..
निसर्ग इतरांना डोईजोड होऊ देणार नाही..

निशांत_खाडे's picture

16 Mar 2016 - 10:54 pm | निशांत_खाडे

हुश्श.. एकजण तरी सापडले, धन्यवाद!

काळा पहाड's picture

16 Mar 2016 - 11:40 pm | काळा पहाड

थँक्यू, जॉर्ज कार्लिन साहेब!!
https://www.youtube.com/watch?v=7W33HRc1A6c

अद्द्या's picture

17 Mar 2016 - 1:08 pm | अद्द्या

"इन्फरनो" आठवलं उगाचच

कापडी पिशव्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा प्रसार at source थांबवण्यासाठी खालील दोन उपाय शक्य आहेत असं मनात आलं:

१. औद्योगिक प्रायोजक मिळवून, तसेच सर्वसामान्य नागरिकांनीदेखील (वाढदिवस, षष्ठ्यब्दि आदिंच्या निमित्ताने)भाजीबाजारात जावून कापडी पिशव्यांचे वाटप करावे.

२. [हा दुसरा उपाय थोडा आतबट्ट्याचा वाटू शकेल, पण सामाजिक भान असलेल्या दुकानदारांना थोडीशीच झळ सोसून हे शक्य होईल असं वाटतं.] दुकानांमध्ये ग्राहकांना सामानाबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या मोफत व कापडी पिशव्या विकत देण्यापेक्षा उलटं करावं;प्लास्टिकच्या पिशव्या विकत व कापडी पिशव्या मोफत द्याव्यात. फुकट मिळालेल्या प्लास्टिकच्या पिशव्या सहज कचर्‍यात फेकल्या जातात, पैसे मोजून घेतलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या फेकण्याची प्रवृत्ती कमी होईल अशी शक्यता आहे. दुकानदारांनी कापडी पिशव्यांवर आपली जाहिरात करून आपला खर्च भरून काढायला हरकत नाही. शिवाय जाहिरातीशिवाय प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संदेशही कापडी पिशवीवर छापला तर व्यवसाय समाजाभिमुख असल्याचा संदेश जाईल हा आणखी एक फायदा.

प्लास्टिक पिशव्यांचा रस्तेबांधणीत वापर

गेली काही वर्षे भारतात आणि इतरत्रही रस्तेबांधणीत वापरलेल्या प्लास्टिकच्या तुकड्यांचा वापर सातत्याने केला जातो आहे, ही चांगली गोष्ट आहे. अधिक तांत्रिक माहिती इथे आणि इथे मिळेल. अर्थात, यातल्या काही संभाव्य धोक्यांचीही माहिती हवी (यासाठी खालील दुव्यातील स्लाईड १९ पहा.)

PLASTIC ROADSMore presentations from sravan

दुकानदारांनी कापडी पिशव्यांवर आपली जाहिरात करून आपला खर्च भरून काढायला हरकत नाही. शिवाय जाहिरातीशिवाय प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संदेशही कापडी पिशवीवर छापला तर व्यवसाय समाजाभिमुख असल्याचा संदेश जाईल

ह्यात थोडे क्रियेटिव्ह काम करायची इच्छा आहे. चालू आहे. यावर्षी व्यवसायात पण होईल.

रस्तेबांधणीत वापर हा एक उत्तम पर्याय आहे. असे अनेक शोधले पाहिजेत आणि अंमलात आणले पाहिजेत.
प्रत्येकाने कापडी पिशवी वापरणे हा काही प्लास्टिक टाळण्याचा उपाय होत नाही. कारण वरती पैजारबुवांनी म्हटल्याप्रमाणे अगणित खाद्यवस्तू उत्पादकाकडूनच येतानाच प्लास्टिक पॅकिंग मध्ये येतात. आपण कापडी पिशव्या वापरल्या तरी औद्योगिक स्तरावर वापरल्या जाणार्या प्रचंड प्लास्टिकचे काय करणार ?
तेव्हा, प्लास्टिक न वापरणे यापेक्षा त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे हेच अधिक सयुक्तिक आणि प्रॅक्टिकल वाटते. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन असे स्वस्त आणि सहज उपलब्ध असणारे प्रक्प्ल्प सुरु केले पाहिजेत. तरच हा अक्राळविक्राळ राक्षस आटोक्यात राहील.

उगा काहितरीच's picture

16 Mar 2016 - 7:01 pm | उगा काहितरीच

लेख आवडला... खरा प्रॉब्लेम असा आहे की, आपल्याला घरून पिशवी घेऊन जाण्याची लाज वाटते. शिवाय भरपूर वेळेस घरून काही खरेदी करायच्या उद्देशाने बाहेर जात नसतो. व वस्तू चांगली दिसली म्हणून आणल्या जाते. मग याच्यावर मी माझ्यापुरता उपाय शोधला आहे. बाहेर जाताना सॕक वापरणे...आता इतकी सवय आहे की कुठेही अगदी कुठेही जाताना सॕक पाठीवर असणार म्हणजे असणारच. हात मोकळे राहातात आणी लाजही वाटत नाही. दुसरा उपाय म्हणजे गाडीच्या डिक्कीत/ सिटखाली एखादी चांगली कॕरीबॕग ठेवलेली असते (उदा. डी-मार्टची वगैरे कॕरीबॕग.)0

रातराणी's picture

17 Mar 2016 - 10:19 am | रातराणी

लेख आवडला. एवढं तरी करायलाच हवं!

टाकाऊ प्लॅस्टीकचा वापर करणारी इंडस्ट्री तयार होत पर्यंत या समस्येला उपाय नाहि. प्लॅस्टीकच्या कृत्रीम खडकांद्वारे समुद्रात जमीन तयार करणे, इंधन निर्मीती, कॉम्प्रेस्ड प्लॅस्टीकच्या स्लॅब, असले उपाय घाऊक प्रमाणात केले तरच हि समस्या निस्तरेल. एरवी प्लॅस्टीक कचर्‍याचं व्यवस्थापन करण्यापलिकडे फार काहि करता येणार नाहि.

अवांतरः
लाव्हा रसाच्या प्रवाहात प्लॅस्टीक डंप केलं तर त्याची विल्हेवाट लावणं सर्वात सोपं होईल काय? :)

अभ्या..'s picture

17 Mar 2016 - 12:39 pm | अभ्या..

लाव्हा रसाच्या प्रवाहात प्लॅस्टीक डंप केलं तर त्याची विल्हेवाट लावणं सर्वात सोपं होईल काय? :)

माउंट पीव्हीसी तयार होईल.

अर्धवटराव's picture

19 Mar 2016 - 2:15 am | अर्धवटराव

तो जर पुरेस टणक असेल तर त्यात ड्रीलींग करुन उर्वरीत जैवीक कचरा टाकता येईल, त्यापासुन उत्तम जंगल निर्माण होईल.
प्लास्टीकचा उपयोग पाषाणासारखा करणं चांगलं

लेख छान आहे. तुम्हाला कुणीतरी सांगितले तसे ते खरं आहे की सुरवात स्वतापासुन करणे. प्रत्येकानी असा विचार केला तर कापडी पिशविचा वापर नक्कीच वाढेल. आपसुकच प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर कमी होइल. मी स्वतः हा विचार करुन शक्य असेल तेव्हा तेव्हा आठ्वणीने कापडी पिशवी वापरण्याचा प्रयत्न करते."भरपूर वेळेस घरून काही खरेदी करायच्या उद्देशाने बाहेर जात नसतो. व वस्तू चांगली दिसली म्हणून आणल्या जाते." वर उल्लेखित वाक्य मी ब-याचदा बाहेर पड्ताना लक्षात ठेवते. आपण खरेदीच्या उद्देशाने जावो अथवा न जावो एक घडी होणारी पिशवी बरोबर घेउन जायचे.
जर कधी पिशवी विसरलि आणि खरेदी केलेल सामन जास्त नसेल, ते विना पिशवी गाडीच्या डिक्कित बसत असेल तर मी त्या साठी पिशवी घेत नाही. हं सामान घरात नेताना थोडी पंचाईत होते. मग घरात कोणी असेल तर पिशवी मागवुन घ्यायची, किंवा स्वतः पिशवी घेउन यायची मग त्यात सामन भरुन घ्यायचे. थोडा त्रास वाटतो ,पण आपण कुठ्तरी पर्यावरणाचे रक्षण करतो आहोत याचा आनंद होतो.
मला असे वाटते की भाजीवाल्यांनी कापडी पिशवी ठेवावी,ज्यावर त्यांचे नाव लिहिलेले असेल. ज्यांनी पिशवी आणली नाही त्यांना ती पिशवी द्यावी, त्या पिशवीचे काही पैसे अनामत रक्कम म्हणुन घ्यावे. ती पिशवी परत करताना ते पैसे भाजित वळते करुन घ्यावे.

आजच एका ग्रुपवर याविषयी चर्चा झाली.
इथल्या मिपाकरांपैकी अनेकांच्या लहानपणी प्लास्टिक आणि प्लास्टिक पिशव्यांचा इतका धुमाकुळ नव्हता.
पर्लपेट च्या फ्रिज बॉटल्स ही प्लॅस्टिकच्या दर्जाची आणि वापराची परमावधी होती.

फेरीवाल्यांकडून फळे भाज्या घेणे हे नेहमीचे होते. बाजारात जाऊन किराणा आणि इतर सामान आणणेही नित्याचे होते.
यातल्या बर्‍याच गोष्टी आता सोप्या झाल्या आहेत, मोठ्या शहरांत मोठी मोठी किराणा / डिपार्टमेंटल स्टोअर्स आली आहेत. विविध व्यावसायिक सर्वकाही घरपोच आणून देत आहेत.
पूर्वी सगळं स्वतः आणत असूनही या कॅरी बॅग्स शिवाय आपलं काही अडलं नव्हतं तर आता हा प्लॅस्टिकचा अट्टाहास कशासाठी होतो? पूर्वी फळवाले एका ठराविक पद्धतीच्या कागदी बॅग्स देत होते.
भाजी बरेचदा आठवड्याची मंडईतून आणली जात होती आणि त्याच्या मोठ्या पिशव्या असायच्या.
आईच्या वयाच्या सर्व गृहिणी कापडी पिशव्या वापरत असत - नायलॉन सारख्या सहज घडी होऊन पर्स मध्ये बसणार्‍या पॉप्युलर होत्या.

आता किमान किंमतीची खरेदी केली तरी पॉलिथिन कॅरी बॅग दिली जाते. घरी येऊन फळे फ्रीजमध्ये किंवा वस्तु कपाटात गेली की पातळ कॅरी बॅग कचर्‍यात जाते.

गेली १०-१५ वर्षे मी शक्यतोवर - ९९% कॅरीबॅग घेत नाही. साधारण ९९-२००२ च्या दरम्यान सकाळने ज्यूट बॅग दिल्या होत्या. त्या काळाच्या मानाने जरा महाग होत्या. तरी त्या घेऊन घरात सर्वांना अट्टाहासाने वापरायला लावल्या.
पुढे आपोआप सवय झाली. मग नात्यात ज्यांना पटल्या त्यांनी संक्रातीला वाण म्हणून या मध्यम आकाराच्या पिशव्या वाटल्या. दहा घरात गेल्या आणि थोडा तरी प्लॅस्टिक चा वापर कमी झाला.

अतिशय मोठ्या दुकानात - उदा. सेंट्रल / शॉपर्स स्टॉप वगैरे मध्ये सुद्धा कॅरीबॅग घेत नाही. त्याचा पुनर्वापरही आता कमी झाला आहे. अनेक दिवस गादीखाली पडून राहतात आणि तुकडे पडायला लागले की फेकल्या जातात.
बिनधास्त कपडे हातात घेउन येतो. एकदा कारपर्यंत गेलं की थेट घरीच जातात ना? फक्त पार्किंग मधला भाग ओपन असतो. मग त्यासाठी पिशवी कशाला? बाईकवर असेल तर आपली पिशवी नेल्यास काहीही अडचण येत नाही.
खूप खरेदी असेल तेव्हा चक्क तीन चार कापडी पिशव्या घरून नेतो.

एका गोष्टीला पर्याय सापडला नाहीये - मोठ्या दुकानांमध्ये भाज्या घ्यायला गेलं की तिथे एक पिशव्यांचा रोल असतो. प्रत्येक भाजीसाठी एक वेगळी पिशवी घ्यावी लागते. आणि याला उपाय नाही. त्यांची विकण्याची / बिलिंग / चोरी विरोधातली ती पद्धत आहे. पकडायची सोय नसलेल्या या पिशव्या पूर्ण निरुपयोगी आणि वाईट कचरा आहेत.
कॅरीबॅग कधीतरी परत वापरली जाईल. या पिशव्या युसलेस आहेत.

तसंच आता युज अँड थ्रो कटलरी अति प्रमाणात आहे. लहानपणी एखाद दुसर्‍या भारी आईस्क्रीम दुकानात प्लॅस्टीक चमचे मिळायचे (गो कुल आठवतंय - अनेक घरात ते चमचे मीठ वगैरे साठी पुनर्वापर होताना पाहिले आहेत) आता सर्वत्र प्लॅस्टिक चमचे असतात. घरगुती कार्यक्रमात सुद्धा प्लॅस्टीक कोटेड डिश / पेपर किंवा प्लॅस्टीक प्लेट्स, तसेच द्रोण, चमचे यांचा सुळसुळाट असतो.

वर कोणी म्हटलं आहे की पृथ्वीला काही होणार नाही - एका अर्थाने खरे आहे. पण हे उदाहरण पहा आणि अजून गुगलून पहा - पॅसिफिक गार्बेज पॅच , अजून दुवे - ग्रीनपीस

टेक्सास किंवा तुर्कस्तान च्या आकाराचा प्लॅस्टिक आणि गार्बेज पॅच आहे पॅसिफिक मध्ये - याचा निसर्गावर किती परिणाम होत असेल?

अशी उदाहरणे आहेत ज्याचा वापर आणि प्रसार व्हायला हवा - या मनुष्याने खाता येतील असे चमचे बनवले आहेत. म्हणजे चमच्याने खायचे आणि नंतर चमचाच खाऊन टाकायचा ! हे रागी (नाचणी), ज्वारी अशा पौष्टीक धान्यांपासून बनवले आहेत आणि अनेक स्वादांंमध्ये उपलब्ध आहेत.

अनेक ऑफिसेस मध्ये एकदा वापरण्याचे कागदी किंवा प्लॅस्टिकचे ग्लास / कप्स असतात. प्लॅस्टिकचे अतिशय पातळ असतात आणि नक्कीच घातक आहेत. पेपर कप्स सुद्धा प्लॅस्टिक कोटेड असतात. एकदा तो पुर्ण भिजवून लेयर्स वेगळे करून पहा. आपापली बाटली / चिनी मातीचे मग वापरले तर हे नक्कीच टाळता येईल.

अनेकदा आणि मोठ्या प्रमाणात - प्लॅस्टिकचा पर्याय सहज / स्वस्त उपलब्ध आहे म्हणून परंपरागत पुनर्वापराचे पर्याय टाळले जातात. कटाक्षाने आणि निग्रहाने प्रयत्न केल्यास आपण जुन्या सवयीकडे नक्की वळू शकतो.

खूप सविस्तर प्रतिसाद आणि माहितीपूर्णही आहे. खास करून खायचे चमचे. मस्त कल्पना आहे. ह्या नाविन्यपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद!

पैसा's picture

18 Mar 2016 - 4:48 pm | पैसा

लेख आवडला. प्लॅस्टिक पिशव्यांमुळे भटक्या गुरांनाही प्रचंड त्रास होतो. कचर्‍यासोबत ते अनेकदा प्लॅस्टिक पिशव्याही खातात.