भारतीय डावे आणि भारतीय उच्च मध्यमवर्ग

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जनातलं, मनातलं
3 Mar 2016 - 5:09 pm

कायप्पावर आमच्या एका ग्रुप मध्ये एका डाव्या काकांनी उच्च मध्यमवर्गीयांवर ताशेरे ओढले. ते उजवे असतात आणि आता खूप खूप बोलू लागले आहेत, निव्वळ जोक्स फॉर्‍वर्ड करतात हा त्यांच्या आक्षेप होता. त्यावर तिथे मी दिलेले उत्तर इथेही द्यावेसे वाटले. तिकडची धुणी इकडे धुवायची नसल्याने मी नामोल्लेख खोडले आहेत. मुद्दे स्वतंत्र आहेत, व्यक्तिगत काही नाही. तरी संपादक मंडळ धागा उडवायला स्वतंत्र आहे. >>>>>>

'अबक'च्या लेखातील एक बाब खटकली होती ती म्हणजे त्यांनी उच्च मध्यमवर्गीय म्हणजे सरसकट उजवे, मोदीसमर्थक, वाचनशून्य, उठवळ, फालतू जोक्स फॉरवर्ड करणारी, गुडी गुडी आयुष्य जगणारी जमात असे एक gross generalisation केले आहे. त्यात त्यांनी 'उच्च मध्यमवर्गीय उजवे' हा शब्द वापरलेला नाही तर 'उच्च मध्यमवर्गीय लोक' हा प्रयोग केला आहे. सरसकट generalisation कधीही चूकच! त्यांचा दुसरा आक्षेप आहे उच्च मध्यमवर्ग खूप खूप बोलतात('त्यांच्या त्यांच्या' व्हाट्सअप्प, फेसबुक खासगी कट्टे) ह्यावर! ह्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे कळत नाही! त्यांनी 'त्यांच्या त्यांच्या गटात' का बोलू नये? बाहेरसुद्धा का बोलू नये? त्यांना ते स्वातंत्र्य का नाही? किंवा त्यांनी प्रत्येक वेळी विद्वत्तापूर्ण चर्चाच करावी का? खासगी कट्टयांवर त्यांना हव्या त्या भाषेत हवे ते बोलायचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. सार्वजनिक नियम नक्कीच वेगळे असू शकतात.

मुळात आपण उच्च मध्यमवर्गीय म्हणजे 'नवश्रीमंत' म्हणजे 'इतरांचे शोषण करून वर आलेले' किंवा 'नवशोषक वर्ग' असा काहीसा समज करून घेतला आहे. त्यामुळे सतत त्यांना अपराधीपणाची जाणीव करुन देत असतो. they are less equal अशी आपली समजूत असते.त्यांची वैचारिक चर्चा करण्याची बौद्धिक क्षमता किंवा अभ्यास नसतो असा आपला समज असतो. याच गैरसमाजातून मग आपण सरसकट या वर्गाला 'उजव्या'चा शिक्का मारून मोकळे होतो. एकदा का आपण त्यांच्यावर आपल्याला सोयीस्कर असा शिक्का मारला की मग आपण आपल्या जबाबदारीतून मोकळे होतो! त्याने विरोध व्यक्त केला तर ' तू उजवा, तू शोषक, तुला काय कळणार गरिबांच्या व्यथा, तुझा अभ्यास काय? तुला बोलायचा अधिकार काय? तुझी लायकी काय? तू फक्त संता बंता जोक्स फॉरवर्ड करू शकतोस' असे म्हणून आपण मोकळे व्हायचे!! मग हा वर्ग, जो आधी उजवा नसेलही, पण तो निव्वळ उच्च मध्यमवर्गीय असल्याने अशी वागणूक मिळताना पाहून उजवीकडे वळला तर त्यात त्याची काय चूक?

अतिडाव्यांच्या 'आम्हालाच सर्वकाही कळते' ह्या अहंगंडाचाच ह्या वर्गाला जास्त राग आहे. इतकी वर्षे बोलायला व्यासपीठच मिळाले नाही या वर्गाला, कारण व्यासपीठावर बोलायची ह्यांची लायकी नाही, हे आपणच ठरवले होते. हे दाबले गेलेले आवाज आता उफाळून बाहेर पडत आहेत असे वाटते. त्यांना सार्वजनिक व्यासपीठ आधी मिळू दिले नाही, ते आता सोशल मीडियावर व्यक्त होताहेत. हे सर्व उजवे आहेत असा फार मोठ्ठा गैरसमज अबकचा झाला आहे. शिव्याशाप, फोटोशॉप मला सोशल मीडियावर सगळीकडून मिळताहेत. हे 'खूप खूप बोलणारे' सगळ्याच विचारधारांचे आहेत, कसलीही विचारधारा नसलेलेही आहेत. प्रत्येकाने व्यासंगी असावे, निश्चित विचारधारा असलेले असावे, उच्च अभिरुचीसंपन्न असावे वगैरे आपले गैरसमज आहेत, ते चूक आहेत. त्यांना चारचौघांसारखे, मौजमजेत जगावेसे वाटत असेल तर जगू द्यावे. ते त्यांचे आयुष्य आहे. डावी भूमिका जगणे म्हणजेच उत्तम आयुष्य असे का असावे? तसेच, उजवी राजकीय भूमिका वाईट्ट आणि डावी उत्तम असे का मनाशी गच्च बांधून ठेवावे? कारण जर हिटलर आणि मुसोलिनी उजवे असतील तर स्टालिन आणि पॉल पॉट डावे होते, अमेरिका भांडवलवादी क्रुरकर्मा असेल तर उत्तर कोरिया साम्यवादी क्रुरकर्मा आहे. म्हणजे कोणतीही विचारधारा, जर ताणून धरली तर वाईटच! अती तिथे माती. पण आपण, भारतात मात्र सातत्याने उजव्यांनाच vilify, victimize केले आहे असे नाही वाटत का?

मी स्वतः उच्च मध्यमवर्गीय आहे( नव्वदोत्तर उदारीकरणानंतर उदयाला आलेला) आणि तरीही मी डावीकडे झुकलेला आहे, माझा व्यासंग कदाचित एवढा नसेल, पण मी वाचनशून्य नक्कीच नाही, मी विचार करतो आणि भरपूर विचार करूनच मी extreme left आणि extreme right ह्या दोन्ही विचारधारा नाकारून किंचित डावीकडे झुकलेली centre leftist विचारधारा स्वीकारलेली आहे, right of the centre नाही. पण जेव्हा डावे माझ्या सांपत्तिक आणि सामाजिक स्थितीकडे पाहून माझ्यावर थेट उजवा, संघी असे शिक्के लावतात तेव्हा मला वेदना होतात. हे एकदाच झालेले नाही तर सातत्याने होत असते. मी कधीही संघसमर्थक नव्हतो, कधीही नरेंद्र मोदी as a PM candidate मी समर्थन केले नव्हते ,तरीही मला न पटलेल्या डाव्यांच्या एखाद्या गोष्टीविषयी बोललो तर लगेच लेबल लावले जाते. एवढ्या victimizationनंतरही मी अजूनही माझ्या centre leftist भूमिकेशी चिकटून आहे, कारण त्याला विचारांचे अधिष्ठान आहे, पण सगळेच चिकटून राहत नाहीत. ते अखेर उजवीकडे वळतात.

थोडक्यात काय तर डावे उजव्यांपेक्षा फार वेगळे नाहीत. डावेसुद्धा उजव्यांप्रमाणेच generalisation करतात, शिक्के मारून मोकळे होतात, इतरांना बोलू देत नाहीत, त्यांचा व्यक्त होण्याचा अधिकार नाकारतात, त्यांचे मनोबल खच्ची करतात; फरक हाच की डाव्यांची भाषा संयमित असते 'बरेचदा', 'well articulated rant' असे म्हणेन मी. उजव्यांची भाषा अनेकदा gross आणि आक्रमक असते. (पण उजव्यांची भाषा gross आणि आक्रमकच असते असे generalisation मी करणार नाही. अतिशय संयमित भाषेत, मुद्देसूद प्रतिवाद करणारे उजवे माझे मित्र आहेत.)

मुद्दा हाच की सातत्याने एकाच गटाला vilify करू नये, कमअस्सल म्हणून हिणवू नये. दुसरी बाजू ऐकून न घेणारा अतिडावा 'विचारवंत' आणि दुसरी बाजू ऐकूण न घेणारा अतिउजवा 'uncivilized raccoon' कसा?

समाजमाध्यमवेध

प्रतिक्रिया

नाना स्कॉच's picture

4 Mar 2016 - 5:54 pm | नाना स्कॉच

माझा अभ्यास खुपच कमी आहे (कारकुंड्याचा आयक्यु :D) तरीही मला जे पटणार नाही त्याचा मी जमेल तितका ऑब्जेक्टिव अन तर्कप्रमाणिक राहत विरोध करत राहीन म्हणतो, अर्थात तुम्ही तोड़ीसतोड़ लॉजिक दिल्यास मी खुल्यादिलाने ते आत्मसात करून घेईन , इतके मात्र मी ताजाकलम म्हणून नमूद करतो

-नाना

गॅरी ट्रुमन's picture

4 Mar 2016 - 6:03 pm | गॅरी ट्रुमन

तरीही मला जे पटणार नाही त्याचा मी जमेल तितका ऑब्जेक्टिव अन तर्कप्रमाणिक राहत विरोध करत राहीन म्हणतो

जरूर.अशा प्रक्रीयेचे स्वागतच आहे.

बोका-ए-आझम's picture

5 Mar 2016 - 9:56 am | बोका-ए-आझम

या शब्दाला काहीही अर्थ नाहीये नाना! प्रत्येकजण या जगाकडे आणि त्यातल्या घडामोडींकडे आपल्या दृष्टिकोनातून बघत असतो. ग्लास अर्धा रिकामा की अर्धा भरलेला हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर आणि माझ्या मते त्या वेळच्या मन:स्थितीवर अवलंबून असतं.

गुलाम's picture

4 Mar 2016 - 8:03 pm | गुलाम

हा हा हा. अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि डावे?

तुम्ही पुन्हा एकदा चीन, कोरिया इ. कम्युनिस्ट सरकार बघुन हे विधान करताय. पण मी आधिच म्हणल्याप्रमाणे भारतात ज्या अर्थाने डावे ही कल्पना वापरली जाते ती फक्त मार्क्सवादापुरती मर्यादित नाहिये. ती एकंदर अमेरिकेत ज्या अर्थाने लिबरल ही टर्म वापरतात तशी वापरली जाते. ज्यामध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचे तत्व आहे. किंबहुना भारतात 'डावे' पेक्षा 'लिबरल' हीच टर्म वापरली जावी असं आता वाटू लागलय.

शेवटी कम्युनिझम आणि कॅपिटॅलिझम या दोघांचेही उद्दिष्ट संपुर्ण समाजाची आर्थिक उन्नती आहे. दोघांमध्येही काही गंभीर दोष आहेत. कम्युनिझम मध्ये हुकुमशाहीचा आणि कॅपिटॅलिझम मध्ये मुठभर लोकांकडे संपत्ती एकवटण्याचा धोका असतो हे सर्वश्रुत आहे. आणि म्हणुनच जगभरात मिश्र अर्थव्यवस्था प्रेफर केली जाते. तरीही एखादी व्यवस्था जास्त वाईट आहे असे एखाद्याला वाटू शकते. पण म्हणुन त्या विचारसरणीच्या सर्वच लोकांचा घाउक द्वेष करणे केवळ चुकीचेच नाही तर धोकादायक ठरु शकते.

हो. एनी प्रॉब्लेम? भारतात कम्युनिस्टांचे राज्य येण्यापेक्षा ब्रिटिश राज्य राहिलेले मला कधीही चालले असते.

हे विधान तुम्ही फक्त आर्ग्युमेंट जिंकण्यासाठी करत असून ते तुमचे खरे मत नाही असे गृहीत धरतो आणि सोडून देतो.

गॅरी ट्रुमन's picture

4 Mar 2016 - 10:24 pm | गॅरी ट्रुमन

शेवटी कम्युनिझम आणि कॅपिटॅलिझम या दोघांचेही उद्दिष्ट संपुर्ण समाजाची आर्थिक उन्नती आहे.

याविषयी शंका असायचे काहीच कारण नाही. तरीही मी असे म्हणतो की डावे विचार हे स्वप्नाळू आहेत. म्हणजे समता वगैरे मूल्ये जर हृदयापासून अनुभवायला मिळत असतील तरच त्या मूल्यांचा समाजाला उपयोग होऊ शकतो.नुसती तोंडदेखल्या समता काय कामाची? आणि अशी समता खरोखरच हृदयापासून वाटणारे लोक फारच थोडे असतात हे तर सर्वांना दिसतेच.तेव्हा समता वगैरे मूल्ये ही बाहेरून लादता येणार नाहीत.त्यामुळे ही व्यवस्था मुळातच स्वप्नाळू विचारांवर आधारीत आहे. आणि त्यामुळेच ही व्यवस्था स्थिर करायची असेल तर दडपशाहीच्या वरवंटा लागतोच. त्यामुळे माझा दावा आहे की ही व्यवस्थाच मुळातच गंडलेल्या गृहितकांवर आधारीत आहे. त्यामुळे उत्तर कोरिया वगैरे उदाहरणे बाजूला ठेवली आणि अगदी मुळातले जे डावे विचार अभिप्रेत आहेत ते आणायचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. कारण ती अंमलात येणेच शक्य नाही (जगात सगळे लोक तुकाराम महाराज किंवा एकनाथ महाराजांसारखे असतील तर गोष्ट वेगळी. पण तसे लोक फारच थोडे असतात हाच प्रॉब्लेम आहे) आणि त्यामुळे ती टिकवायची असेल तर बळाचा वापर आलाच हा माझा मुद्दा आहे.

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 11:33 pm | बोका-ए-आझम

पण मी आधिच म्हणल्याप्रमाणे भारतात ज्या अर्थाने डावे ही कल्पना वापरली जाते ती फक्त मार्क्सवादापुरती मर्यादित नाहिये.

थोडं असहमत. डावे पक्ष किंवा डावी विचारसरणी असलेले पक्ष(याच्यात राजकीय/आर्थिक/सामाजिक या सगळ्यांचा समावेश आहे)हे चार आहेत - CPI (Marxist) किंवा CPM, CPI, Forward Bloc (याचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस होते) आणि Revolutionary Socialist Party किंवा RSP. यांच्यात कार्यकर्त्यांच्या संख्येनुसार आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येनुसार CPM हा सर्वात बलिष्ठ पक्ष आहे. प्रकाश करात आणि आता सीताराम येचुरी हे याच पक्षाचे सरचिटणीस आहेत. २००४ मध्ये युपीएला पाठिंबा द्यायचा, २००८ मध्ये तो काढायचा, १९९६ मध्ये ज्योती बासूंना पंतप्रधान न होऊ देण्याचा वगैरे सगळे निर्णय हे CPM च्या नेत्यांनी घेतले अाणि बाकी पक्षांनी हाताला हात लावून मम (किंवा दास कॅपिटलमध्ये जे काय असेल ते) म्हटलं. नंदीग्राम आणि सिंगुर इथल्या हिंसाचारात CPM कार्यकर्त्यांचा सहभाग इतर डाव्या पक्षांपेक्षा जास्त होता. त्यामुळे भारतातील डावे हे प्रामुख्याने मार्क्सवादी आहेत. नक्षलवादी चळवळीतही CPI ML (Communist Party of India - Marxist - Leninist) आणि Maoist Communist Center हे दोन पक्ष आहेत. त्यातल्या पहिल्या गटाला नक्षलवादी आणि दुस-या गटाला माओवादी असं म्हटलं जातं. आजकाल दोन्हीही शब्द एकमेकांचे प्रतिशब्द म्हणून वापरले जातात पण त्यांच्यात फरक आहे. सांगण्याचा मुद्दा हा की भारतातले डावे हे प्रामुख्याने मार्क्सवादीच आहेत.

पण मी आधिच म्हणल्याप्रमाणे भारतात ज्या अर्थाने डावे ही कल्पना वापरली जाते ती फक्त मार्क्सवादापुरती मर्यादित नाहिये. ती एकंदर अमेरिकेत ज्या अर्थाने लिबरल ही टर्म वापरतात तशी वापरली जाते. ज्यामध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचे तत्व आहे. किंबहुना भारतात 'डावे' पेक्षा 'लिबरल' हीच टर्म वापरली जावी असं आता वाटू लागलय.

भारतातले डावे लिबरल्स आहेत असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल. त्यासाठी आधी आपण अमेरीकन लिबरल्स आणि कॉन्झर्वेटीव्हज् मधला फरक आधी समजून घेऊयात.

धर्म:

  1. अमेरीकेत लिबरल्स म्हणवणार्‍यांना स्वतःला ख्रिश्चन अथवा ज्यू म्हणवून घेताना कमी पणा वाटत नाही. किंबहूना ते धर्म हे देखील जीवनाचे अंग मानतात. फक्त ते इतर धर्मांना आणि धर्मियांना कमी लेखत नाहीत. त्याच मुळे सगळे लिबरल्स यात येत नसले तरी, युनिव्हर्सल युनिटेरीयन चर्च हा जो प्रकार आहे तो लिबरल्स चे चर्च म्हणून ओळखला जातो. पण असे अनेक लिबरल्स आहेत जे इतर प्रकारच्या चर्चेस मधे (उदा रोमन कॅथलिक, मेथॉडीस्ट आदी) तसेच ज्यूंच्या सिनॅगॉगशी संलग्न असतात आणि स्वत:ला त्या समुदायाचा भाग समजतात.
  2. लिबरल्स चे स्थानिक पातळी पासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत राज्य आले तरी त्यांना त्या त्या ठिकाणच्या अधिकृत सभा/अधिवेशने चालू करायच्या आधी प्रार्थना म्हणायला कमी पणा वाटत नाही आणि तशा ते त्या करतात.

देश

  1. अमेरीकन लिबरल्स देखील देशाला कॉन्झर्वेटीव्हज इतकेच मानतात. त्याच्या सीमा राखण्यासाठी ते देखील कमी नसतात. म्हणूनच ९/११ नंतरच्या इराक युद्धाच्या वेळेस त्यांना (अमेरिकन काँग्रेसला) जी गोपनियतेत माहिती देण्यात आली होती ती खरी मानून अनेक लिबरल डेमोक्रॅट्स नी त्या युद्धाला पाठींबा दर्शवला होता. ९/११ च्या ९ महीने आधीच बुश-गोअर यांची निवडणूक गाजलेली होती. बुश वरती अविश्वास होता. तरी देखील ज्यावेळेस (लिबरल) गोअरना ९/११ नंतर प्रतिक्रीया विचारली तेंव्हा त्यांनी बुश हे त्यांचे सर्वोच्च सेनापती आहे असे म्हणून त्यांना जी काही मदत हवी असेल ती विनाशर्त करण्याची तयारी दाखवली.
  2. नंतरच्या काळात गाँटोनोमो बे क्युबामधील कैद्यांसंदर्भात इथल्या लिबरल्सनी योग्य तोच आवाज केला. पण परदेशात (टेक्निकली मित्रदेशात) जाऊन ओसामाला का मारले म्हणून एकानेही प्रश्न विचारला नाही. किंबहूना तसा निर्णय घेणार्‍यात लिबरल्सच होते. आणि हो त्यांचे कौतुक करण्यात रिपब्लीकन काँडोलिजा राईस पण पुढे होत्या.

सामाजीक प्रश्न

  1. धार्मिकतेचा संदर्भ देत विज्ञान अथवा वैद्यकीय ज्ञानाला बंदी घालण्यावर आहे - त्यात सगळ्यात तापलेला मुद्दा असतो तो गर्भपाताचा, नंतर दुसरा असतो तो समलिंगी लग्नाचा ("लग्नाचा" - नुसत्या राहण्याचा नाही).
  2. आर्थिक आघाडीवर लिबरल्स राष्ट्रीय पातळीवर नुसतेच दाखवताना आणि स्थानिक पातळीवर खरेच हे प्रोटेक्टीव्ह असतात. त्यामुळे, युनियन्स त्यांच्या बाजूच्या असतात. या देशात, काहीच क्षेत्रात असेल पण, युनियन्स ना जितके महत्व आहे तितके भारतात देखील नाही असे वाटते. पण मोठ्या प्रमाणावर विचार करताना ते देखील मुक्त अर्थव्यवस्थेचाच स्विकार करतात.
  3. बंदुकांच्या राजकारणात अधिक नियंत्रण असावे असे म्हणतात. पण बंदुकांवर बंदी आणायला तयारी नसते. किंबहुना यांच्याकडे देखील बंदुका असतात...

अजून पण बरेच असतील पण तुर्तास इतकेच.


आता भारतीय डावे कसे आहेत?

  1. माझ्या लेखी ते लिबरल्स नसून डाव्याविचारांचे काँझर्वेटीव्हज् आहेत! त्यांना धर्म मान्य नसतो. म्हणजे स्वतः निधर्मी असण्याबद्दल आक्षेप नाही. पण इतरांना आणि त्यातही बहुतांशी हिंदूंना, धर्मावरून कमी लेखणे अथवा पुर्वीच्या चुकीच्या प्रथा (उदा जातीयता) आणि त्यामुळे तयार झालेले प्रश्न सोडवण्याऐवजी ते पेटवत ठेवण्यात त्यांना इंटरेस्ट असतो.
  2. देशाबद्दल सगळ्याच डाव्यांना मी कमी समजणार नाही. पण स्वत:स विचारवंत म्हणवणारे जे असतात त्यांच्या बाबतीत मात्र देशाशी प्रामाणिक राहण्याबद्दल साशंकता आहे. हे स्वातंत्र्योत्तर चीनच्या युद्धापासून पहाता येईल जेंव्हा कम्युनिस्ट पक्षाचे दोन तट पडले. देशातली हिंसा थांबवण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो. म्हणूनच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नक्षलवाद्यांसारख्या चळवळी जागृत ठेवण्यात हे पुढे असतात. ह्यांना विकास (डेव्हलपमेंट) त्यांच्या मताप्रमाणेच हवा असतो. असे कुठलेच वर्तन अमेरीकन लिबरल्सच्या बाबतीत दिसणार नाही...
  3. बाकी सामाजीक प्रश्नात वर आणलेले दोन प्रमुख प्रश्नः गर्भपातावर आपल्याकडे बंदी नाही असे मला वाटते आणि त्याला बहुसंख्य असलेल्या हिंदू धर्माचा विरोध देखील नाही. त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. दुसरा मुद्दा समलिंगी लग्नाचा आहे. त्यासाठी सगळ्या लिबरल्सची पण मानसिकता तयार झाली असेल असे वाटत नाही. आणि भले असली तरी केवळ त्या एका मुद्या मुळे भारतीय डावे काही अमेरीकन लिबरल्सशी समान दिसणारे ठरत नाहीत...
बोका-ए-आझम's picture

5 Mar 2016 - 10:01 am | बोका-ए-आझम

च्या दोन लागोपाठच्या अंकांत एकाच अमेरिकेला आणि अमेरिकन सरकारच्या त्याच धोरणांना Neoliberal आणि Neoconservative अशा दोन परस्परविरोधी संज्ञा वापरल्या गेल्या होत्या. हा काय प्रकार आहे हे कोणी स्पष्ट करु शकेल का? एकच धोरण liberal आणि conservative कसं काय असू शकेल? हे दोन परस्परविरोधी शब्द आहेत असा समज होता.

बोकाजी आणि विकासजी दोघांना एकत्र प्रतिसाद देतोय.

बोकाजी, जेएनयु प्रकरणात किंवा एरव्हीदेखील आपल्याकडे 'डावे' ही टर्म खुपच लूझली वापरली जाते. त्यामुळे युक्रांद, अंनिस सारख्या सामाजिक संघटना आणि रिपब्लिकन पार्टी, आप, काँग्रेस सारख्या राजकीय संघटना देखील डाव्या मानल्या जातात. अनिल अवचट, कुमार सप्तर्षी, प्रकाश आमटे किंवा अगदी नारायण मुर्ती सुध्दा स्वतःला डावे म्हणवून घेतात. ते चुक की बरोबर तो भाग वेगळा. पण हे सगळे मार्क्सवादी नक्कीच नाहित. आणि म्हणूनच सगळ्या डाव्यांना सरसकट देशद्रोही, हिंदूविरोधी किंवा व्यवस्था तोडणारे ठरवलं जाऊ नये एव्हढंच माझं म्हणणं आहे.

विकासजी, आपण जो अमेरिकन लिबरल्स आणि भारतीय डाव्यांमधला फरक सांगितला आहे तो बहुतांशी मान्यच आहे. पण तो फरक एकंदरच अमेरिकन आणि भारतीय राजकारणातील मॅच्युरिटी आणि समज यांमध्ये आहे. किबहुना त्याचमुळे आपल्याकडे कन्हैयाला ताबडतोब देशद्रोही ठरवलं जातं तर अमेरिकेत अ‍ॅपलने दहशतवाद्याचा फोन क्रॅक करुन दिला नाही तरी त्याचं कौतुक होतं. शेवटी आपले आणि तिथले सामाजिक प्रश्न पण वेगळे आहेत. तुम्ही वर गर्भपाताचा मुद्दा मांडला आहे. तो प्रश्न जरी आपल्याकडे नसला तरी व्यापक अर्थाने धार्मिकतेला विज्ञानापेक्षा महत्व देणे आहेच. अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर शनी शिंगणापूर किंवा शबरीमला प्रकरण, गोहत्याबंदी वगैरे घेता येईल. त्यांना विरोध करणारे बहुतांशी लोक स्वतःला डावे म्हणवून घेणारेच असतात.

विचारांचा पराभव त्याच्या अनुयायांकडुनच होतो याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतात स्वतःला डावे म्हणवून घेणारे "काही" लोक. अशा लोकांनी धर्मनिरपेक्षता जेवढी बदनाम केली आहे तेवढी तर संघानेही केली नसेल असं मी नेहमी म्हणतो. या लोकांमुळेच सामान्य हिंदूधर्माभिमानी त्यांच्यापासून फटकून राहतो आणि संपुर्ण चळवळीचंच नुकसान होतं. त्यासाठी त्यांच्यावर टीका करणं ठीकच. परंतु, आपण एखादी विचारसरणी मान्य करताना किंवा ती त्याज्य ठरवताना अशा स्वार्थी लो़कांकडे बघुन करु नये. संपुर्ण विचारसरणीवर टिका करण्याऐवजी त्यातल्या निवडक स्वार्थी प्रवृत्तींवर टिका करावी आणि जे शेवटी संपुर्ण समाजाच्या हिताचे आहे ते घ्यावे.

विकास's picture

5 Mar 2016 - 6:54 pm | विकास

सर्वप्रथम माझे उत्तर हे भारतातले डावे हे अमेरीकतल्या लिबरल्स सारखे कसे नाहीत या एका विषयासंदर्भात होते. कोणतीच बाजू पूर्ण बरोबर अथवा चूक आहे असे मी कधी म्हणणार नाही. मात्र डावा नसल्याने, एखादी डावी भुमिका योग्य वाटली अथवा व्यक्ती आदर्श वाटली तर तसे म्हणताना कमीपणा वाटणार नाही. मात्र असे मोकळेपण हे डाव्यांकडून कधी दिसू शकणार नाही. समोरचा उजवा असेल तर तो कसा अडाणी, मोदी भक्त वगैरे सहज चालू होऊ शकेल... त्यामुळे सगळ वातावरण गढूळ झाले आहे असे माझे म्हणणे आहे.

वास्तवीक ही उपचर्चा वेगळा विषय होऊ शकेल.

पण येथेच काही उत्तरे देतो - मते मांडतो...

अनिल अवचट, कुमार सप्तर्षी, प्रकाश आमटे किंवा अगदी नारायण मुर्ती सुध्दा स्वतःला डावे म्हणवून घेतात.

यातील अनिल अवचट आणि प्रकाश आमटे हे अमेरीकन लिबरल शब्दासाठी योग्य आहेत. नारायण मुर्ती कधीकाळी (कुठेतरी वाचल्याप्रमाणे) कम्युनिस्ट विचारसरणीशी जवळ होते फक्त रशियातील एका प्रसंगानंतर ते बदलले. सप्तर्षी आणि त्यांची युक्रांद हे मला वाटते भारतीय डाव्या विचारसरणीतलेच एक फळ आहे. ते रशिया-चीन कडे बघणारे कम्युनिस्ट नसतील पण ते अमेरीकन पद्धतीचे लिबरल आहेत असे देखील वाटत नाही...

आणि म्हणूनच सगळ्या डाव्यांना सरसकट देशद्रोही, हिंदूविरोधी किंवा व्यवस्था तोडणारे ठरवलं जाऊ नये एव्हढंच माझं म्हणणं आहे.

पूर्ण सहमत. मी कधी म्हणलेले देखील नाही. विशेष करून आधीच्या काळातल्या डाव्यांच्या बाबतीत मी ते नक्कीच म्हणेन. तरी देखील आज जी काही डावी नामक पिलावळ तयार झाली आहे त्यांच्या बद्दल मला असे म्हणावेसे वाटणार नाही...

त्याचे विश्लेषणच करायचे झाले तर - सर्वप्रथम यांना असलेला धर्माचा तिटकारा. धर्म संकल्पना मान्य नसली तर काहीच हरकत नाही. अयोग्य रुढी-परंपरांबद्दल आवाज पण उठवणे, जागृती करणे देखील महत्वाचे. पण व्यक्ती आणि व्यक्तींनी बनलेला समाज पोकळ राहू शकत नाही. काही तरी व्यवस्था लागतेच, विचार लागतो, परंपरा देखील लागते. इथे (अमेरीकेत) अनेकदा भारतीय मुलांचे पाहीले आहे. कारणे काही असली तरी भारताबद्दल काही माहिती नसते. मग अचानक कॉलेजात गेल्यावर इतर सर्व मुले आपापल्या "रूट्स" बद्दल / परंपरांबद्दल बोलू लागली की मग लागतात शोधायला....

दुसरा भाग म्हणजे आपलीच एक पद्धती बरोबर आणि इतरांचे चूक... ते स्वत:साठी मार्केटींग म्हणून केले ठिक आहे. पण तसे देखील करत असताना समाजात स्वत:बद्दल वैषम्य आणि दुही निर्माण होऊ शकेल असे वागण्याची काय गरज आहे? केवळ उदाहरण म्हणून असे बरेच प्रसंग आहेत - टोकाचे आहे, पण जे काही महीषासूर प्रकरण सध्या चालू आहे त्या बाबतीत. एखाद्या समुदायाच्या दृष्टीने महीषासूर हिरो असेल आणि तसा असला म्हणून देखील काही हरकत नाही. पण त्याला समजून घेऊन "दुर्गा पूजक" न करता देखील बरेच काही करता येऊ शकेल. त्यासाठी दुर्गेला आणि दुर्गापुजकांना वाईट करण्याची आणि समाजात नसलेली दुही तयार करण्याची काय गरज? दक्षिणेत रावणाला मानणारे आहेत, त्यावर सिरिअल्स देखील काढल्या गेल्या... तुम्ही करा तसे काही. उगाच असंतोष कशाला तयार करता? त्या मागचा उद्देश काय? तेच नक्षलवादा बद्दल आणि अर्थातच काश्मीर बद्दल...

तो प्रश्न जरी आपल्याकडे नसला तरी व्यापक अर्थाने धार्मिकतेला विज्ञानापेक्षा महत्व देणे आहेच.

पूर्ण सहमत आणि त्यातील अंधश्रद्धा दूर करण्याला पण सहमतीच आहे. पण परत एक अमेरीका -भारतातील फरक सांगतो. अमेरीकेत धर्मासाठी कायद्याने चुकीचे संरक्षण देऊन विज्ञानाला कमी लेखणे महत्वाचे करणे झाले आहे. सुदैवाने तसे भारतात झालेले नाही... जे झाले आहे ते विशेष करून ७० ते ९० च्या दशकातल्या राजकारणामुळे झालेले आहे. आज जे आपण बघत आहोत ती त्याची फळे आहेत....

बोका-ए-आझम's picture

15 Mar 2016 - 1:15 am | बोका-ए-आझम

ती सामाजिक संघटना आहे. तिचा राजकीय अजेंडा असल्याचं ऐकलेलं तर नाही. युक्रांदबद्दल फक्त ऐकलंय. मी काॅलेजमध्ये असताना युक्रांदचा प्रभाव ओसरला होता. प्रकाश आमटे किंवा नारायणमूर्ती या माणसांविषयी निरपेक्ष आदर आहे, मग त्यांची राजकीय विचारसरणी काहीही असो.

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 9:39 pm | बोका-ए-आझम

या दिवशी जेव्हा भगतसिंग शहीद झाले तेव्हा ते जेमतेम २३-२४ वर्षांचे (कम्युनिझमने प्रभावित होण्याच्या वयाचे)होते. त्यांचे सहकारी पंडित सुखदेव आणि शिवराम हरी राजगुरू हेही साधारण त्याच वयाचे होते. जर हे तिघेही १९३१ नंतर राहिले असते आणि सोविएत रशियाने पूर्व युरोपातल्या राष्ट्रांवर लादलेली कम्युनिस्ट हुकूमशाही त्यांनी पाहिली असती आणि नंतर क्रुश्चेवने केलेलं स्टॅलिनविरोधी भाषण ऐकलं असतं तर त्यांचं मत तेच राहिलं असतं का हा रोचक आणि वादाचा विषय आहे. ज्या काळात भगतसिंग मार्क्सवादाने प्रभावित झाले तो काळ भांडवलशाहीला पर्याय देणारी एक राज्यव्यवस्था उभी राहते आहे या कल्पनेने भारलेला होता. गुलाग, दडपशाही, केजीबीचं दमनसत्र या सगळ्या गोष्टी नंतर आल्या. भगतसिंग अतिशय हुषार आणि स्वतंत्र विचारांचे होते. त्यामुळे ते अजून २५-३० वर्षांनीही कम्युनिस्ट राहिले असते असं वाटत नाही. अर्थात हे मतच आहे. त्याला वस्तुस्थितीचा आधार नाहीये.

नाना स्कॉच's picture

4 Mar 2016 - 10:31 pm | नाना स्कॉच

मला वाटते सुखदेव ह्यांचे पुर्ण नाव सुखदेव थापर होते अन पंडित सुखदेव म्हणजे पंडित सुखदेव राज (अल्फ्रेड पार्क मधे शेवटच्या गन फाइटच्या आधी चंद्रशेखर आझाद ज्यांना भेटले होते अन राजगुरु च्या मातुश्रीस निकड़ भागवायला पैसे पाठवले होते त्यांच्या मार्फ़त, पंडित सुखदेव राज ह्यांच्या नावे पुण्यात मॉडर्न कॉलेज ऑफ़ इंजीनियरिंग समोरून जो रस्ता जंगली महाराज रस्त्याला मिळतो त्या तिठ्याला त्यांचे नाव दिले गेले आहे)

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 10:59 pm | बोका-ए-आझम

पुणे जिल्ह्यातील खेडला राजगुरुनगर हे नाव राजगुरूंच्या स्मरणार्थ दिलेलं आहे. ते त्यांचं मूळ गाव (बहुतेक.)

गॅरी ट्रुमन's picture

4 Mar 2016 - 10:55 pm | गॅरी ट्रुमन

भगतसिंग अतिशय हुषार आणि स्वतंत्र विचारांचे होते. त्यामुळे ते अजून २५-३० वर्षांनीही कम्युनिस्ट राहिले असते असं वाटत नाही. अर्थात हे मतच आहे. त्याला वस्तुस्थितीचा आधार नाहीये.

शक्य आहे.

अनेकदा होते असे की उजव्या गटाचे लोक अनेकदा त्यांच्या विचारांशी अजिबात साधर्म्य नसलेल्या नेत्यांनाही आपल्यात ओढतात. भारतीय संदर्भात हे अनेकदा कुरूंदकरांनी म्हटल्याप्रमाणे "गांधीविरोधी ते सगळे हिंदुत्ववादी आणि सगळे हिंदुत्ववादी ते आपले" असा अनेकांचा दृष्टीकोन असतो. अनेकदा फेसबुक किंवा व्हॉट्सऍपवर अशा मंडळींकडून ’गांधीजींनी काय केले’ असा प्रश्न विचारतच खाली दिलेल्या चित्रांप्रमाणे चित्रे शेअर केली जातात. मुद्दा नुसती चित्रे शेअर करण्याचा नाही.तर सुभाषचंद्र बोस, भगतसिंग इत्यादींना आपल्या मार्गाविषयी काडीचेही ममत्व नव्हते (किंबहुना विरोधच होता) हे जाणूनच घेतले जात नाही. अनेकदा उजव्या गटाच्या लोकांना "मग भगतसिंगविषयी काय" हा प्रश्न तुम्ही हा विचार केला आहे का हे जाणून घ्यायला विचारला जातो. वर गुलाम यांनी भगतसिंगांचा उल्लेख केला त्यामागे त्यांचा उद्देश मला माहित नाही. कदाचित हा उद्देशही असेल.त्याला उत्तर हे-- "हो".

picture

इन जनरल मला एक व्यवस्था ती वाईट म्हणून तोडायची हा दृष्टीकोन पटत नाही.ही व्यवस्था गेल्यावर नक्की कोणती पर्यायी व्यवस्था उभी करायची आहे याची कल्पना असल्याशिवाय--किमान सध्याची व्यवस्था गेल्यावर आणखी वाईट व्यवस्था येणार नाही एवढी पूर्तता केल्याशिवाय सध्याची व्यवस्था तोडू नये अन्यथा आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे होईल . मान्य आहे की स्वातंत्र्यलढ्यात सुरवातीला सगळ्या गोष्टी स्पष्ट असणे शक्य नाही. मला वाटते की गांधीजींची चळवळ आणि विविध कॉंग्रेसमध्ये पास होणारे ठराव लोकांना स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय, ते कशाकरता, त्याबरोबर नक्की जबाबदारी कोणती वगैरे गोष्टींची जाणीव करून ती स्पष्टता आणण्यासाठीचा एक प्रयत्न होता. आणि त्याच कारणासाठी ’अमुकअमुक कॉंग्रेसमध्ये तमुकतमुक ठराव पास झाला’ अशा पध्दतीचे वरकरणी निरर्थक वाटणारे पण आपल्या स्वातंत्र्यलढ्यातले महत्वाचे टप्पे होते. नाहीतर ब्रिटिश घालवायचे म्हणून जोशात लढायचे आणि त्यानंतर ब्रिटिश परवडले अशी अनागोंदी यायची. म्हणूनच "ब्रिटिशांना हाकलायचे आणि कम्युनिस्ट राज्य आणायचे" हे कोणाही क्रांतिकारकाचे ध्येय असेल तर माझा तरी त्याला पाठिंबा नाही.

अर्थातच भगतसिंग आणखी जगले असते तर कम्युनिस्ट असते की नाही या जरतरच्या गोष्टी झाल्या.त्याविषयी स्पष्टपणे काहीच सांगता येणार नाही.

अरे कुंभमेळ्यात बिछडलेल्या भाईप्रमाणे मला द्यायचा होता तो प्रतिसाद भलतीकडेच गेला आहे. बोकोबांना द्यायचा प्रतिसाद चुकून http://www.misalpav.com/comment/812804#comment-812804 वर पोस्ट झाला आहे.

भंकस बाबा's picture

4 Mar 2016 - 10:58 pm | भंकस बाबा

कम्युनिझमचा सगळ्या दुनियेत बोर्या वाजलेला असताना भारतात आजही काही कम्युनिस्ट मॉस्कोला पाऊस पडला की इथे छत्री उघड़तात. (हुकुमशाही परवडली पण कम्युनिझम नको या मताचा)

गणामास्तर's picture

4 Mar 2016 - 12:23 pm | गणामास्तर

असाच विचार डाव्यांकडून उजव्यांप्रती अंमलात आणला जातो.

हेचं म्हणायचे होते म्हणून उपहासाने तसे लिहिले होते.

आनन्दा's picture

4 Mar 2016 - 11:09 am | आनन्दा

वैयक्तिक मत : कम्युनिस्ट दिसला कि त्याला पोत्यात घालून बुडवला पाहिजे ;)

म्हणूनच तुम्ही विचारवंत होऊ शकत नाही.. विचारवंत असे मत व्यक्तकरतील - कम्युनिस्ट दिसला कि त्याला डोक्यावर घेऊन बुडवला पाहिजे..

ह. घ्या,

सुबोध खरे's picture

4 Mar 2016 - 11:27 pm | सुबोध खरे

असहमत
पोते का फुकट घालवायचे?

वगिश's picture

4 Mar 2016 - 10:53 am | वगिश

अवांतर : किती उत्पन्न असलेल्या कुटुंबास उच्च मध्यमवर्गीय म्हणतात?

मुंबईतला उच्च मध्यमवर्गीय भुवनेश्वरमध्ये कदाचित अतिश्रीमंत वगैरे समजला जाईल. बंगालमधील निम्न मध्यमवर्गीय महाराष्ट्रात गरीब समजला जाईल. जशी दारिद्र्यरेषेची संकल्पना आहे, तशी ऐश्वर्यरेषेची संकल्पना नाहीये.

हल्ली सरकारनेच व्याख्या ठरवून दिलेली आहे - तुम्हाला शिलेंडर सबसिडी मिळते का? तर तुम्ही उच्च नाही.

म्हणूनच मी अजूनपण सबसिडी सोडलेली नाही.

ऋषिकेश's picture

4 Mar 2016 - 11:05 am | ऋषिकेश

लेखन आवडले

निशांत_खाडे's picture

4 Mar 2016 - 11:36 am | निशांत_खाडे

संयत व स्पष्ट लिखाण..

...तरीही मला न पटलेल्या डाव्यांच्या एखाद्या गोष्टीविषयी बोललो तर लगेच लेबल लावले जाते

+1

सुनील's picture

4 Mar 2016 - 11:58 am | सुनील

डावे आणि उजवे एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतात.

विख्यात अर्थतज्ञ केन गाल्ब्रेथ म्हणतात, "भांडवलशाहीत माणूस माणसाचे शोषण करतो, साम्यवादात ह्याच्या अगदी उलट घडते" ;)

आनन्दा's picture

4 Mar 2016 - 12:04 pm | आनन्दा

____/\_____ अगदी कोपरापासून. अगदी लाखात एक बोललात

मित्रहो's picture

4 Mar 2016 - 12:44 pm | मित्रहो

जर तुम्ही अमेरीकेत आहात, रशियात आहात, उत्तर कोरीयात आहात कुठे आहे जास्त भाषण स्वातंत्र्य.
तरुणपणी डावा असतो आणि स्वार्थ कळायला लागल्यावर तो उजवा होतो हे पटत नाही. लादलेली समानता हीच मुळात चुकीची आहे. भांडवलशाहीत सारच उत्तम आहे असे नाही.

अवांतर : काही दिवसांपूर्वी हा लेख वाचला होता. तसे हे भांडवलशाहीचे लमर्थक आहे.
http://www.livemint.com/Opinion/K7BtzvPYmyO0KlDn21iixH/How-to-break-the-...

नाखु's picture

4 Mar 2016 - 12:48 pm | नाखु

निम्न मध्यमवर्गीय रोजच्या व्यवधान आणि समस्यांनी मेटाकुटाला आलेला असल्याने त्याला आपण डावे का उजवे हेच माहीत नसते आणि जाणून घेण्यासाठी वेळ-निकड नसते.

ज्या क्षणी स्थैर्य्,सुबत्ता (तुलनात्मक) आणि अनुभवाची शिदोरी (अगदी ४-५ वर्षांचीही पुरेशी) तेव्हां तो हा शोध घ्यायचा प्र्यत्न करतो.

संधीसाधूपणा (वेळ येताच आपल्या पोळीवर तूप ओढणे) आणि ढोंगीपणा (मी स्माजहिताचाच विचार+कृती करतो असे दाखविणे) हा यासाठी उच्च मध्यमवर्गीय,निम्न मध्यमवर्गीय,गरीब, शहरी,खेड्यातला असणे अनिवार्य नाही. तस्मात हे दावे पोकळ आहेत.

सुमीत भातखंडे's picture

4 Mar 2016 - 2:31 pm | सुमीत भातखंडे

आवडला.

चेक आणि मेट's picture

4 Mar 2016 - 2:55 pm | चेक आणि मेट

उजवे असो वा डावे,काही फरक पडत नाही,
फक्त राष्ट्रविरोधी काही करू नये म्हणजे मिळवलं.

दोघांच्या "राष्ट्र" या संकल्पनेत फरक असेल तर..?

चेक आणि मेट's picture

4 Mar 2016 - 3:28 pm | चेक आणि मेट

फरक आहेच,म्हणूनच खटके उडत आहेत.
आणि हेच मोठं दुर्दैव आहे.
निदान संविधानाचा तरी मान ठेवावा,असे वाटते.
कन्हैयाला जामिन दिल्यावर कोर्टाने छान स्टेटमेंट दिलय.
इन्फेक्शन जास्त होऊन शरीराचा एखाद्या भागाला गँगरींन झालं तर तो भाग छाटून टाकणे अनिवार्य आहे.

निदान संविधानाचा तरी मान ठेवावा,असे वाटते.

ज्यांना देश ही संकल्पनाच मान्य नाही ते संविधानाचा काय मान ठेवणार?

कन्हैयाला जामिन दिल्यावर कोर्टाने छान स्टेटमेंट दिलय.

येथे देता येईल का?

चेक आणि मेट's picture

4 Mar 2016 - 4:30 pm | चेक आणि मेट

ज्यांना देश ही संकल्पनाच मान्य नाही ते संविधानाचा काय मान ठेवणार?

मग शरीराच्या त्या भागाचं ऑपरेशन केलेलंच बरं.
.
.
कोर्टाने कायतरी तेवीस पानी स्टेटमेंट दिलय,पूर्ण सापडत नाहीये,तोपर्यंत हे दुवे चालवून घ्या.
JNU row: Kanhaiya Kumar gets bail and a lesson on thoughts that ‘infect… (like) gangrene’

गॅरी ट्रुमन's picture

4 Mar 2016 - 4:16 pm | गॅरी ट्रुमन

इन्फेक्शन जास्त होऊन शरीराचा एखाद्या भागाला गँगरींन झालं तर तो भाग छाटून टाकणे अनिवार्य आहे.

आणि तरीही हे पुरोगामी विचारवंत कन्हय्याला जामीन मिळाला म्हणून 'जितं मया' म्हणत जल्लोष करत आहेत.

अनुप ढेरे's picture

4 Mar 2016 - 3:27 pm | अनुप ढेरे

जेएनयूमध्ये लाल सलामच्या घोषणा चालू असताना,
http://indianexpress.com/article/india/india-news-india/16-villagers-kil...

हे पोस्टरपण JNU मधलं आहे. :(
a

गुलाम's picture

4 Mar 2016 - 4:06 pm | गुलाम

उत्तम संतुलित लेख!!! सरसकटीकरण (gross generalisation), उथळ शिक्के मारु प्रवृत्ती आणि त्यातून होणारे राजकीय-सामाजिक ध्रुवीकरण हेच सध्याचे दुर्दैवी सत्य आहे. आणि त्याला डावे आणि उजवे दोघेही तितकेच जबाबदार आहेत.

गामा पैलवान's picture

4 Mar 2016 - 7:54 pm | गामा पैलवान

लोकहो,

Capitalism is the unequal distribution of wealth. Socialism is the equal distribution of poverty. असं विन्स्टन चर्चिल म्हणून गेलेत. यावरून डावे उजवे म्हणजे काय ते ध्यानात यावं ! ;-)

जोक्स अपार्ट, डावलले गेलेले ते डावे आणि उजवी वागणूक मिळणारे ते उजवे असं लहानपणी ठरवून टाकलं होतं. मात्र अगदी ऐन तारुण्यातही मी हिंदुत्ववादीच होतो. डावा विचार कधीच 'आपला' वाटला नाही. परंतु वडील मात्र कट्टर डावे होते. कोणे एके काळी युक्रांदचे कार्यकर्तेही होते. नंतर त्यांनी शिवसेना आपलीशी केली. पण वैचारिक फाटाफूट म्हणून दोनचार वर्षांतच सोडली. (अस्सल डावेगिरी यालाच म्हणावं का?)

पुढे १९९१ साली सोव्हियेत साम्राज्य विलयास गेल्याने थोडे नाराज झाले. त्याच सुमारास भुजबळांनी शिवसेना सोडली. या दोहोंचा जणू परिणाम की काय, त्यांचा राजकीय चर्चांचा उत्साह मंदावला.

आ.न.,
-गा.पै.

अवांतर : त्या वेळेपावेतो अस्मादिकांना पंख फुटून स्वत: विचार करायची खाज सुटली होती. दत्ता सामंतांच्या संपाने गिरणी कामगारांची केलेली हालत दिसंत होती. डाव्या विचारांत काहीतरी जबरदस्त खोट आहे, असा संशय बळावला. त्यामानाने संघाची विचारसरणी बऱ्यापैकी गोटीबंद होती. पुढे गोळवलकरांचं 'राष्ट्र' नावाचं एक पुस्तकं हाती लागलं. त्यात आंतरराष्ट्रीय परिस्थितीचं केलेलं विश्लेषण पाहून चकित झालो. हे विश्लेषण युगोस्लाव्हियाच्या तत्कालीन परिस्थितीस चपखलपणे लागू पडंत होतं. १९९५ च्या परिस्थितीवर १९७५ पूर्वी अचूक भाष्य करणारा लेखक खरोखरंच महान असला पाहिजे, अशी धारणा झाली. तेव्हापासनं मी हिंदुत्ववादी आहे.

चेक आणि मेट's picture

4 Mar 2016 - 8:05 pm | चेक आणि मेट

. Socialism is the equal distribution of poverty.
→No Doubts

तर्राट जोकर's picture

4 Mar 2016 - 9:13 pm | तर्राट जोकर

संघाची विचारसरणी बऱ्यापैकी गोटीबंद होती.>> झापडबंद असा एक शब्द आहे. तो चपखल बसतो.

गामा पैलवान's picture

4 Mar 2016 - 10:03 pm | गामा पैलवान

तजो,

झापडबंदही असू शकेल. म्हणूनच मी गोळ्वलकरांचा चाहता आहे. त्याव्यतिरिक्त संघाचं साहित्य फारसं वाचलं नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 11:07 pm | बोका-ए-आझम

झापडबंदच आहे. रशिया आणि माओच्या चीनचे संबंध बिघडायचं एक कारण हे माओने शेतकऱ्यांना बरोबर घेऊन चीनमध्ये क्रांती केली हे आहे. अस्सल मार्क्सवाद शेतकऱ्यांना संपत्तीचा साठा करणारे म्हणून प्रतिगामी मानतो हे तुम्हाला माहित आहे का? १९७४ मध्ये माओने थोड्या प्रमाणात खाजगी शेतीला परवानगी दिल्यावर रशियन कम्युनिस्ट पक्षाने ' ही कम्युनिस्ट तत्वज्ञानाशी प्रतारणा असल्याचा ' ठराव वगैरे पास केला होता. डेंगने आर्थिक सुधारणा केल्यावर काय केलं होतं त्याची कल्पना नाही ;)

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 12:45 am | तर्राट जोकर

सगळे पोथीबाज झापडबंदच असतात. आपल्या विचाराबाहेरचे विचार मान्य करणे, विरोधी विचारास आदर देणे ज्या विचारसरनीला जमत नाही ते सगळे झापडबंदच. मग कम्युनिस्ट काय झियोनिस्ट काय फॅसिस्ट काय संघिष्ट काय इस्लामिस्ट काय, सब एक जैसे. आम्ही अशा झापडबंदांच्या विरोधात त्यांच्याच भाषेत बोलतो म्हणुन अतिरेकी दिसतो एवढंच.

सुबोध खरे's picture

5 Mar 2016 - 11:22 am | सुबोध खरे

कम्युनिस्ट मूळ विचारसरणी कितीही आदर्शवादी वाटली तरी ती निसर्गाच्या विरुद्ध आहे म्हणून ती कालबाह्य फार पटकन(१०० वर्षात) झाली . कम्युनिस्ट राजवटीत उच्च तंत्रज्ञान असलेल्या इंजिनियरला सामान्य कामगाराच्या दीड पट पगार मिळत असे. त्याच्या बुद्धिमत्तेची कदर केली जात नसे.कलाकार गायक वादक यांना तर कुणीच विचारत नसे. मुक्त विचार करणारे लेखक फक्त सैबेरियात किंवा चीनच्या भिंतीच्या तळघरात सापडत असत. शेवटी आपण करीत असलेल्या प्रत्येक वेगळ्या गोष्टीचे चीज व्हावे हि माणसाची आंतरिक इच्छा पूर्णपणे दडपली जात असे. कपडे एकाच रंगाचे खाकी किंवा निळा. घरे ठोकळेबाज, कोणतेही घरगुती उत्पादन सर्वात स्वस्त आणि रंगहीन. अशा परिस्थितीत सरासरीकरणामुळे माणसाची निर्माणेच्छा मारली जाते. ८० च्या दशकात आमच्या वडिलांनी एक कम्युनिस्ट जोडपं दाखवलं होतं.. मुलं आणि स्त्रिया हि राष्ट्राची संपत्ती मानणारे पोथीनिष्ठ कम्युनिस्ट स्वप्नाळू विचारधारेत वाहून गेल्यामुळे मुलं होऊ दिली नव्हती. स्वतःची मालमत्ता पण फारशी नव्हती.पैसा कमावणे हे पाप आहे अशा मनोवृत्तीचे आणि आयुष्याच्या संध्यकाळी भकास चेहरा आणि भग्न स्वप्ने उराशी धरून रखडत जगत असलेलं.
जीवशास्त्र आणि निसर्ग हा आदर्शवादी नसतो तर वास्तववादी असतो.निसर्गात सर्व समान मुळीच नसतात. त्यानंतर कम्युनिस्ट साहित्य वाचून त्यातील फोलपणा सहज लक्षात आला.
असो

प्रकाश घाटपांडे's picture

5 Mar 2016 - 12:05 pm | प्रकाश घाटपांडे

डाव्यांमधे कुणी श्रद्धा वगैरे असे काही म्हटले की त्याला बूर्झ्वा बूर्झ्वा असे म्हणुन उजवीकडे फेकतात म्हणे!

सध्याच्या गदारोळाच्या दिवसात........
सुंदर व संयमित लेख वाचायला मिळाला. प्रतिक्रियाही संयत व वाचनिय.

एकंदरीतच लेख व प्रतिक्रियांना अभ्यासाबरोबर मनन
चिंतन व अनुभवाची जोड असल्याचे जाणवत होते.

दुसऱ्यांचे मुद्दे खोडून काढण्यापेक्षाही आपल्याला जे पटलेय ते कारणासहित मांडायची इच्छा जास्त बलवत्तर वाटली.

भगतसिंग उल्लेखानंतरही धागा भरकटला नाही हे विशेष.
मिपा वाचक असल्याचा फायदा झाला.