माझी बोली भाषा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
27 Feb 2016 - 3:34 pm

मिसळपाव वर बोली भाषेत भाषेत साहित्य पाठविण्याचा संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते. एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो. शालेय शिक्षण हिंदीत आणि पुस्तके वाचून शिकलेली मराठी. या दोन्ही निश्चित माझ्या बोली भाषा नाही. कारण मला हिंदीतली कुठली हि बोली भाषा अवगत नाही. मराठीतील बोली भाषेचा प्रश्नच येत नाही.

आमचे आजोबा दिल्लीत स्थायिक झाले होते. वडिलांचे शिक्षण हि दिल्लीतलेच. आमच्या वडिलांची भाषा म्हणजे उर्दू, हिंदी, मराठीचे मिश्रण. जुन्या दिल्लीत ज्या वाड्यात आम्ही भाड्यावर राहायचो तिथे पंजाबी, गुजराती, बंगाली, हिंदी भाषी आणि मराठी भाषी असे ८-९ भाडेकरू होते. शेजार बनिया आणि मुसलमान. आमचे घरमालक कडक शिस्तीचे होते. वाड्यात राहणाऱ्या कुणा मुलाच्या तोंडून ‘साला’ शब्द जरी बाहेर पडला तर श्रीमुखात फडकावयाला कमी करत नसे. संध्याकाळी वडील घरी आल्यावर तोंड-हात धुवायचे आणि नंतर आई देवासमोर दिवा लावायची. रामरक्षा आणि शुभंकरोती म्हणायचो. (आंम्हाला तीच मराठी वाटायची, नंतर कळले रामरक्षा आणि स्त्रोते इत्यादी संस्कृत भाषेत असतात).

जुन्या दिल्लीत मराठी परिवार हि होते. रविवारच्या दिवशी सर्व मराठी मुले, महाराष्ट्र समाजात खेळायला जमत असू. आपसांत बोलताना सुरुवात मराठीतून व्हायची आणि नंतर केंव्हा हिंदीत बोलू लागू कळत नसे. कुणी मोठ्यानी टोकले ‘जरा मराठीच बोला’ तेंव्हा लक्ष्यात यायचे. अश्यारितीने अधकचरी मराठी बोलायला शिकलो. माझ्या बोली भाषेवर - उर्दूची अदब आणि तहजीब, शुद्ध हिंदी (शालेय शिक्षक) आणि घरची मराठी या सर्वांचा परिणाम झाला. वर्ष-दोन वर्षांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही नागपूरला जायचो. तिथे गेल्यावर वाटायचे इथली मुले किती असभ्य. यानां बोलण्याची तमीज सुद्धा नाही. मोठ्याशी हि अरे-तुरे करतात. तिथे आमची, “काका आपल्या साठी पाणी आणू का?(चाचाजी आपके लिये पानी लाऊं क्या).” काका वैतागून म्हणायचा हे काय आप, आपण लावून ठेवले आहे, अरे मला तू म्हणत जा. पण मला, आपल्यापेक्षा मोठ्यांना तर सोडा, लहान मुलांना हि, ‘तू’ म्हणणे आजगयात जमले नाही.

आई भंडार्याची होती. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यात एक दोन वेळा आजोळी गेलो होतो. तेही ८-१० वर्षाचा होतो तेंव्हा. एवढे आठवते, आम्हा भावंडांचे बोलणे ऐकून, तुम्ही मुसलमान आहात का? अशी विचारणा केल्या गेली. नंतर एकदा लहान मामाच्या मुलीच्या लग्नात गेलो होतो. नुसती मुंडी हलविण्याचे काम केले, कारण लोक काय बोलत आहे काहीच कळत नव्हते. असो.

पुन्हा प्रश्न आलाच, माझी बोली भाषा कुठली. मला आठवले, एकदा माझ्या भावाला एक शेजारच्या मुलाने शिवी दिली, दगड हातात उचलीत तो म्हणाला, “मनोजजी, इज्जत से बात कीजिएगा, आइन्दा बत्तमीजी की तो हमसे बुरा कोई नहीं होगा, हमारा निशाना सटीक है, तुम्हारा डोक फोड़ दूंगा. समझे.” बहुधा हीच माझी बोली भाषा. कारण भांडताना आपण आपली खरी भाषा लोकांसमोर उघडी करतो.

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

अजया's picture

27 Feb 2016 - 3:45 pm | अजया

:)
हीच तुमची हिंदी लहेजाची मराठी बोली.वाचायला नेहमीच छान वाटते.

शलभ's picture

27 Feb 2016 - 5:07 pm | शलभ

+1

एस's picture

1 Mar 2016 - 11:04 am | एस

+२

सस्नेह's picture

1 Mar 2016 - 12:20 pm | सस्नेह

+ ३

रमेश आठवले's picture

4 Mar 2016 - 5:41 am | रमेश आठवले

+४

बॅटमॅन's picture

1 Mar 2016 - 5:04 pm | बॅटमॅन

अगदी अस्सेच म्हणतो.

जेपी's picture

27 Feb 2016 - 4:41 pm | जेपी

मजा आली वाचायला.

बोका-ए-आझम's picture

27 Feb 2016 - 5:29 pm | बोका-ए-आझम

वेगळीच गंमत आहे. काही समानता नाही पण पु.लं.च्या तुझे आहे तुजपाशी मधली आणि मिपाकर भोचक यांच्या काही लेखांमधली मराठी आठवते.

विवेकपटाईत's picture

29 Feb 2016 - 8:14 pm | विवेकपटाईत

प्रतिसादाबाबत धन्यवाद

माझा एक रुममेट होता पटवर्धन, दोन-तीन पिढ्या राजस्थान मध्ये स्थायिक झालेल्या!! त्याचं मराठी असंच होतं. पण काही शब्द मराठीतले जसेच्या तसे...सांगायचंच झालं तर आपण पटकन "आज बूट खरेदी करायचेत" असं म्हणतो...आपल्या लक्षात येत नाही आपण इंग्रजी शब्द वापरलाय. तो मात्र 'आज जोडे घ्यायचे आहेत' म्हणणार. =))

मधुरा देशपांडे's picture

29 Feb 2016 - 9:02 pm | मधुरा देशपांडे

:) छान लिहिलंय.
माझी आजी मध्य प्रदेशातली आणि तिथेच वर्षानुवर्ष स्थायिक असलेले तिचे अनेक नातलग. तिच्या तोंडात असे बरेच हिंदी शब्द यायचे. माझी वैदर्भीय प्रभाव असलेली मराठी बोली जेव्हा इतर पुण्या मुंबईतल्या नातलगांना ग्रामीण वाटायची, तिथे इंदोरमधल्या माझ्या पिढीतल्या सगळ्यांना त्याच मराठीचं कौतुक वाटायचं . ;)

पैसा's picture

29 Feb 2016 - 9:33 pm | पैसा

मजा आली!

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 12:42 pm | पिलीयन रायडर

हा धागा आमच्या सारख्यांसाठी छान आहे ज्यांना एकच एक बोली येत नाही. मी राहिलेय पुण्यात पण घरात मराठवाडी संस्कार. त्यामुळे कधी मी हेल काढुन बोलते तर कधी अगदी पुणेरी.

काय करत आहेस - काय करायलीस?
कोण जाणे - काय की

असा बोलण्यात फरक होतोच.. समोरचा माणुस कसा बोलतोय त्यावर माझी बोली ठरते. परत च्या ऐवजी "वापस" मात्र मी वापरतेच. ते काही तोंडातुन जात नाही. आमची आज्जी तर "हमेशा" सारखे हिंदी शब्दही मध्येच टाकत असते.

असं मला लिहायला समजत नाहीये की कसं सांगावं.. पण मी बोलायला लागले की आपोआप मराठवाडी बोलते. पण माझ्या मराठवाड्यातल्या भावांना आणि नवर्‍याला मात्र माझी बोली पुणेरी वाटते!

काकांचा लेख वाचुन असा गोंधळ असणारे फक्त आपणच नाही हे बघुन बरं वाटलं.
काका, तुमची हिंदी मिश्रित मराठी खुप आवडते.

राही's picture

1 Mar 2016 - 1:39 pm | राही

पटाईतांची हिंदी वळणाची मराठी खूप आवडते.
मुंबईकर गुजराती वळणाची मराठी बोलतो आणि इथले गुजराती लोक मराठी वळणाची गुजराती बोलतात. एखादा मुंबईकर 'काय वार्ता करतोस' असे म्हणतो तेव्हा 'शुं वात करेश' आणि 'क्या बात करता है' या दोन्हीचं ते मिश्रण असतं. मी आलेलो म्हणजे हुं गयेलो. आपले कानफटात वाजवणे सगळीकडे कानपट्टी म्हणून पोचले आहे. शिवाय इथे नाहीच्या ऐवजी 'नाय' म्हणतात.

तुषार काळभोर's picture

4 Mar 2016 - 2:26 pm | तुषार काळभोर

मी जन्मापासून आतापर्यंत हडपसरमध्ये. गाव इथून १० किमीवर लोणीकाळभोर. सगळे नातेवाईक पचक्रोशीतल्या गावांमध्ये (सगळ्यात लांब म्हणजे माझं आजोळ.. सासवड). त्यामुळे बोलण्यावर पुण्याच्या पूर्व भागातील ग्रामीण भाषेचा थोडासा प्रभाव. इंजिनियरिंग व नंतर नोकरीमुळे मुंबै ते गडचिरोली अन् जळगाव ते कोल्हापूरापर्यंत सगळीकडचे उच्चार व बोली कानावर पडत गेल्या.

नवीन व्यक्तीशी बोलताना काहीजण मला आवर्जून विचारतात, "तुम्ही उस्मानाबादचे का?" :)

शित्रेउमेश's picture

1 Mar 2016 - 2:43 pm | शित्रेउमेश

तुम्हारा डोक फोड़ दूंगा....

;-)

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 2:50 pm | एक एकटा एकटाच

मस्तय

असंका's picture

1 Mar 2016 - 4:57 pm | असंका

फार मंजे फारच थोडक्यात लिहिलंयत...! पण मस्त लिहिलंयत!

धन्यवाद!

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2016 - 2:26 am | श्रीरंग_जोशी

पटाईतसाहेब - तुमचं स्वतःच्या बोलीभाषेबाबतचं मनोगत खूप भावलं.
जिथे लहानाचा मोठा झालो तिथे राहत नसल्याने आपलीच बोलीभाषा वापरायची संधी मिळत नाही याबाबत वाईट वाटते.

विजुभाऊ's picture

4 Mar 2016 - 12:05 pm | विजुभाऊ

माझे आडनाव कळेपर्यन्त मुम्बईकर माझ्याशी टिप्पीकल पार्ल्याची भाषा बोलत अस्तात. मात्र माझे आडनाव कळाल्यावर मात्र ते जरा बिचकतात.
मात्र सातारी मित्र मिळाले की मी एकद दांडपट्टा फिरवर अस्सल सातारी बोलतो.

इरसाल's picture

4 Mar 2016 - 2:33 pm | इरसाल

विजुभाउ बिच(क)वे दांडपट्टावाले....सातारकर !!!