किती सुंदर विचार

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
15 Sep 2008 - 2:21 am

आज मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.त्याना जरा बरं नव्हतं.मला म्हणाले,
"तुमच्या सहवासात राहून मला पण काही विचारांची प्रेरणा येते."
मी म्हणालो,
"भाऊसाहेब,जे सुचतं ते निर्मिती होण्यासाठीच असतं.तुम्हाला जे सुचेल तेच मला सुचणार नाही.आणि हीच तर गम्मत आहे.निसर्गातच बघा,किती विवीधता आहे.एका सारखं दुसरं नाही.मी वाचलंय समुद्रात असंख्य जीवजंतू,वनस्पती आहेत की पुढली हजार वर्ष जरी माणसाने त्याची डेटाबेस करायची ठरवली तरी प्रयत्न पुरा होणार नाही.बरं ते राहूदे तुम्हाला काय सुचतं ते सांगा"
मला म्हणाले,
"निसर्गाकडून खूप काही शिकता येतं.दुसऱ्याला काही देताना गर्वाने अथवा घमेंड करून देऊ नये.उलट आदराने व प्रेमाने द्यावं.
सूर्य सर्वांना प्रकाश आणि जीवन देतो.असं देताना कोलाहाल आणि गर्मी देतो.
चंद्र थंड प्रकाश देताना प्रेम आणि सद्भावनेची आठवण करून देतो.
हा फरक का आहे?
कारण सूर्याला अहंकार आहे ,घमेंड आहे की
"मी सर्वांना जीवन देतो"
परन्तु चंद्र, प्रकाश विनम्रपणे आणि प्रेमाने देतो.कारण त्याला ठाऊक आहे की
"हा प्रकाश आपला नाही"
हा प्रकाश त्याला सूर्याकडून मिळाला आहे.हा विचार जर माणसाने स्विकारला तर? जे काही आपल्या जवळ आहे
ते "त्याने"
दिलेलं आहे.म्हणून आज जे काही आपण दुसऱ्याला देऊ,ते अहंकार आणि घमेंड ठेऊन न देता,चंद्रासारखं प्रेम आणि सद्भावनेनं द्यावं."
हे ऐकून मी म्हणालो,
"वा! भाऊसाहेब,किती सुंदर तुमचा विचार आहे."
मला म्हणाले,
"कसचं,कसचं"

श्रीकृष्ण सामंत

कथाविचार