आबा... सुपेकर आबा ( भाग १/२/३ )

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
15 Feb 2016 - 1:30 pm

Supekar Aba

आबा, सुपेकर आबा (भाग-१)

त्यांना 'आबा' म्हणालो कारण त्यांना पाहिले पहिल्यांदा तेव्हा अन्वया (माझी माझी साडे तीन वर्षाची मुलगी) होती कडेवर, मला म्हणाले अरे तुझ्याबद्दल खूप ऐकले आई कडून, आज भेट झाली… आनंद झाला :) ३ महिन्यापुर्वीच आलेत आमच्या '११२ श्रीयोग' मध्ये भाडेकरू म्हणून, घरी मुलगा, मुलगी आणि बायको, मुळचे परभणीचे! त्यामुळे भाषेला मस्त तिखट फोडणी, मजाच त्यांच्याची गप्पा मारायच्या म्हणजे!

जुनी गाणी, हिंदुस्तानी क्लासिकल, अध्यात्म… आणि त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी… बास! मस्त खरपूस खमंग थालीपीठच जणू हातात आणि साथीला त्यांच्या हावभावांची सोलकढी! त्यांचं बोलून पोट भरायचं नाही आणि माझं ऐकून! मोजून एकवीस दिवस असेन, त्यात मधले २-३ दिवस सोडले तर रोज सकाळी / दुपारी / संध्याकाळी भेट व्हायचीच.

ह्या २१ दिवसांत माझा सकाळचा ठरलेला पोग्राम होता ह्यावेळी घरी, आई आणि मी चालायला जायचो आल्यावर मस्त चहा पोहे झाले की हातात लांब हिरवा पाइप घेऊन झाडांना पाणी घालणे, वरच्या मजल्यावरून आबा हाक माराणे, चहा झाला का? विचारणे वगैरे… मग मी त्यांना खाली यायला सांगायचो, त्यांची पूजा वगैरे आटपेपर्यंत दहा वाजायचे, मग आमच्या गप्पा सुरु… मग सेकंड राउंड चहा!

मी सुट्टीवर म्हणजे तात्पूर्ता रिटायर्ड म्हणायला हरकत नाही आणि आबा खरोखरच रिटायर्ड, त्यात त्यांचा पाय सहा महिन्यापूर्वीच घुडग्या पासून अलग केलेला! हो… त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हाच त्यांनी सांगीतलं, म्हणाले अरे एके रात्री पायाला खूप वेदना मग दिवस भर 'ओके' दुसर्या दिवशी परत त्रास…

क्रमश:

#सशुश्रीके । १० फेब्रुवारी २०१६

-----------------------------------------

आबा, सुपेकर आबा (भाग २)

डॉक्टरांनी आबांचा पाय तपासला, रक्तपुरवठा होत नाही त्यामुळे त्यांना घुडग्याच्या पुढून पाय कापण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, गैंगरीन होण्याची शक्यता हे पण एक कारण...मग शस्त्रक्रिया करून खोटा पाय लावलाय हे ऐकल्यावर मन धस्स झाले! पण हे सांगताना जणू 'आत्ताच जेऊन आलो' अश्या भावनेने मला सांगितले! परत शेवटी 'आमच्या हीला फार वाईट वाटले/वाटते पण आहे ते आहे!' हे सांगून फोडणी वर दही ओतून आबा मोकळे.
असो... आबा रोज सकाळी आमच्या गल्लीतल्या शनी मंदिरापर्यंत चालत जातात, पूजा वगैरे आणि सकाळचा चहा झाला की, जाताना आणि येताना दोन्ही वेळेला मी किंवा अन्वया दिसली की नक्की हाक मारतात, आम्ही कोणीच नसलो की आईला विचारायचं, हे असेच संध्याकाळी ही, दिसलो पण मी गडबडीत असलो की 'शुभंभवतू'नी निरोप घ्यायचे, अन्वया मात्र दुडूदुडू त्यांच्याजवळ जायची, मग त्यांची 'कॉन्ट्रास्ट' सभा भरायची, 'माउली, अंघोळ झाली का / नीनि(झोप) येत्ये का' वगैरे संभाषण ऐकू यायचे! पण अन्वयाला 'माउली'ची पदवी ऐकून कागद मस्त वाटायचं सांगू... एकदम 'डीव्हाइन' साला...एकदम 'डीव्हाइन'

त्यांची विनोदबुद्धीपण काय औरच, आम्ही गप्पा मारत होतो नेहमी प्रमाणे, संध्याकाळ ची वेळ, आबा आपला फेर फटका मारायला चालले असताना मी म्हणालो आबा या चहा प्यायला, त्यांच्या साठी खुर्ची ठेवली अंगणात, चहा दिला आईने आणून , चहा चा कप आणि आतला चहा पाहताच म्हणाले 'काय ताई, आठवडा भराचा चा देऊ राहिले का!?' हे बोलताना जो काय गंभीर चेहरा केलाय! कोणाला वाटेल आबा चिडले वगैरे की काय! पण नाही नही... अहो 'सेन्स ऑफ ह्युमर' ची ही जात वेगळीच! चिली-चॉकोलेट म्हणायला हरकत नाही.

अजून एक सांगण्या सारखी बाब म्हणजे त्यांना अध्यात्म आणि देव-धर्मची एक खास ओढ, सकाळी सोवळ्या-ओवळ्यातली पूजा, कपाळाला गंध, सकाळी खाली ऐकू येतील इतके धार्मिक चॅनेल्सचे आवाज. आणि त्यात त्यांची बायकोची त्यांना तेव्हढीच साथ... माझी आई पौरोहित्य शिकवते त्यामुळे दुपारी ३-५मध्ये सुपेकर काकू पण येतात. एकूणच छत्तीस गुण जमलेत केतकर-सुपेकरांचे म्हणायला हरकत नाही.
'बरं, आमचं आडनाव सुपेकर नाही बरं का... हां! आम्ही जोशी, पण मग गावात प्रत्येकला पदवी द्यायचे, तेव्हा पासून आम्ही झालो सुपेकर!' हे सांगून परभणी, तिथले लोक, त्यांची घरं... तिथे काय काय होते, आता काय राहिलय ह्याचा सर्व हिशोब मांडायचे, आणि मी तो हिशोब न चुकता लिहित गेलो मनात. खूप सांगितले त्यांनी, मला वेळ मिळेल तसा मी लिहित गेलो, कधी कधी तर रेकॉर्ड ही केले!

एकूणच अश्या मनमिळाऊ व्यक्तींकडे आयुष्याचा हिशोबाची वही कुठे कुलूप लावलेल्या कपाटात बंद नसते, ती ते नेहमी घेऊनच फिरतात... त्या वहितल्या पानांना प्रकाशाची सवय असते, त्या वहीत आकडे नसतात, अशी वही वाचायला मिळणे म्हणजे खुद्द डिरेक्टरने आपल्या सिनेमाचे तिकिट तुमच्या घरी आणून दिल्यासारखे, मग हा सिनेमा नक्की 'डिरेक्टर्स कट' पाहायला मिळतो!

क्रमशः

#सशुश्रीके | १२ फेब्रुवारी २०१६

-----------------------------------

आबा... सुपेकर आबा ( भाग ३ )

त्या दिवशी आबांना घेऊन चिंचवड देवस्थानाला भेट द्यायचा मुहूर्त लागला, तसं पाहिलं तर आदल्या दोन दिवसात जायचं ठरलेले पण काहीना काही कारणांनी जमायचंच नाही, सुपेकर काकु, आई मी आणि आबा निघालो कार मधून, जाताना त्यांच्या आवडीची गाणी लावायचा प्रयत्न केला... तो सफल ही झाला, त्यांच्या चेहर्यावर स्वर्गाचं दार पहिल्यासारखा आनंद क्षणोक्षणी जाणवत होता, भीमसेन जोशींचे कर्नाटकी भजन... मग अभिषेकींचा 'श्री राम जय राम जय जय राम' जप. त्यांच्या पत्नींना तो इतका आवडला की मंदिरातून घरी जातानाही ह्या जपाची मागणी केली, आणि 'लूप' वर ठेवण्याची विनंती केली... आबा मजेनी "असं सारख सारख नाही लावता येत हं" असा टोला देत होते.

असो, मंदिर आल्यावर त्यांना कमीत कमी चालावे लागेल अशी गाडी पार्क केली, मंदिराला जेमतेम चार पायऱ्या असतील, मी त्यांना साथ देत होतो, आबा हळू हळू गणपती गाभाऱ्या जवळ जात होते, बाजूला मी... मनात माझ्या एकाच विचार... विचार नाही म्हणता येणार, एक प्रकारची खंत! माणसाला एखादा अवयव नसणे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे हे काय असते!? पण त्या खंतेचं रूपांतर समाधानात झालेलं, मला त्यांना हात देताना प्रचंड समाधान लाभत होतं, एका अर्थानी त्यांचा अवयवच तर झालेलो ना मी! असो... गणपती दर्शन झाल्यावर काही चुकलं असेल तर माफ कर रे बाबा असं काहितरी म्हणत आबा तृप्त नजरेने माझ्याकडे पाहात मला म्हणाले "राजा.. तुझ्यामुळे छान योग जुळुन आला रे, खूप खूप धन्यवाद!" मी म्हणालो "अहो माझे कसले धन्यवाद... गणपतीने बोलावलं, मी आणलं!"

आता अंधार पडू लागला, आम्ही सर्व मंदिराच्या बाहेरच्या एका लांब बाकड्यावर बसलेलो, मी हळूच फोटो काढत होतो मंदिराचे, कारण धार्मिक स्थळांचे फोटो काढू नयेत असा नियम असतो ना आजकाल! पण नियम तोडण्यासाठीच तर जन्म झालाय पुणेकरांचा, त्यात मी ही!

बरं झालं आठवलं, नेमका त्याच दिवशी मी एका माणसाचा फोटो काढला... दाढी वाढलेली, धार्मिक व्यक्तिमत्व, येणारे जाणारे त्यांना आदराने नमस्कार करत होते, त्यांना जाऊन नमस्कार करण्याची इच्छा ही झाली! पण राहुन गेले, दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमान पत्रात एक बातमी, मोरया गोसावी चिंचवड देवस्थान येथील मुख्य व्यवस्थापक 'देव' ह्यांचे निधन... हे गृहस्थ तेच होते ज्यांचा मी फोटो काढला ह्यात शंका नाही! विश्वासच बसेना!!!

असो... आबांना घेऊन मंदिरातून निघालो ते मोरया गोसावी समाधी मंदिरात, तिथे मात्र २०-३०पायऱ्या आबांना चढायला उतरायला लावणं! त्यापेक्षा "आई तू आणि काकू जाऊन दर्शन घेऊन या असा" असा सल्ला दिला मी, आबांनाही तो मान्य झाला, मग त्या वेळेत करायचं काय, मंदिरा बाजूलाच खाऊ गल्ली होती, तिथे एका भेळवाल्याला सांगितलं, एक सुकी भेळ करा मस्त तिखट, मुद्दामून तिखट सांगितले कारण आबा परभणीच्या तिखट मातीतले ना! आणि मला ही तिखटाची खाज, घरी जाऊन जेवायचे पण होते म्हणून एकच भेळ सांगितली आणि करून झाल्यावर दोन भाग करून कागदातुन द्यायला सांगितली, त्या भेळवल्यानी डोके लावून तिखट ठेचा वेगळा दिला! नशीब... मिक्स नाही केला! मी चवीने पाहिजे तसा खाल्ला... पण आबांनी जेव्हढा दिलेला तेव्हढा सर्व संपवला ही! आणि जो काही 'स्माइल' दिलाय... तोड नाही ब्वा. त्या भेळवल्याला मी पैसे देत असताना आबा अस्वस्थ! त्यांना पैसे द्यायचे होते.. तेवढ्यात आई काकू आल्या... जाताना 'जय राम श्रीराम जय जय राम' च्या तालावर घर कधी आले कळाले पण नाही. घर आल्यावर आबांचे परत एकदा आभार प्रकटन सुरु झाले, मी मग बैकफूटवर जाऊन त्याच्या गोलंदाजीला रिस्पेक्टफुली प्लेड करत गेलो.

अश्या प्रकारे तो सामना दोघांनी जिंकला, आबांची धार्मिक, संगीत आणि प्रात्यक्षिक 'भुक' मिटवत एक अष्टपैलू 'मॅन ऑफ द मॅच'चे पारितोषिक स्वतः लाच देत जी काही झोप लागली आहे मित्रांनो! काय सांगू... भाग ४ मध्ये भेटतो परत, तब तक 'जय जय राम कृष्ण हरी'

#सशुश्रीके | १५ फेब. २०१६

राहणीप्रकटन

प्रतिक्रिया

ब्लॉग वाचल्यासारखे वाटले..

तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ कळला नाही असे दिसतेय..
हाच धागा तुम्हाला व्यक्तिचित्र स्वरूपात खूप छान फुलवता आला असता. मग मजा आली असती. आत्ता तेव्हढी मजा नाही आली.

असा सगळा प्रकार झाला तर