नमस्कार मंडळी,
यंदाच्या छायाचित्रणकला स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद. ज्या निकालाच्या धाग्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो प्रकाशित करताना आम्हाला आनंद होत आहे.
निकाल जाणून घेऊया, स्पर्धेचे परीक्षक श्री सर्वसाक्षी यांच्या शब्दांत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सप्रेम नमस्कार,
मी तांत्रिक बाबींपेक्षा चित्राच्या एकंदर परिणामाला, नैसर्गिक दिसण्याला आणि आपण फूल जसे प्रत्यक्ष पाहिल्यावर दिसेल तसे दिसण्याला अधिक प्राधान्य दिले आहे. फुलाचे चित्र हे चांगलेच असते आणि इथेही तशीच आहेत. अर्थात तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. डिजीटल चित्रण जमान्यात टिपण्याइतके महत्त्व चित्र सादर करण्याला आहे. अगदी नामांकित स्पर्धांमध्येही संस्करणाला प्रत्यवाय नाही, मात्र संस्करण हे सुधारणांसाठी मर्यादित ठेवलेले असते. मूळ चित्रात मोठे फेरफार म्हणजे मूळ रंग बदलणे, पार्श्वभूमी बदलणे - काढून टाकणे - निर्माण करणे - कृत्रिम प्रकाश निर्माण करणे हे संमत नसते. चित्र अधिक उठावदार होण्यासाठी आवश्यक ते बदल म्हणजे एक्सपोजर, कॉन्ट्रास्ट, सॅच्युरेशन हे संमत आहे.
चित्र टिपताना आपला विषय त्या चौकटीत उठून दिसेल/ प्रामुख्याने असेल हे पाहणे आवश्यक आहे. चौकटीच्या मानाने अगदी लहान असलेले चित्र कधी कधी चांगले असूनही हरवून जाते, प्रभावी ठरत नाही. तसेच चित्र टिपताना पार्श्वभूमीवर नजर ठेवणे अगत्याचे आहे. असंबद्ध वा अनभिप्रेत पार्श्वभूमी विषयाला वा चित्राला मारक ठरू शकते. फुला सारखा विषय टिपताना सुस्पष्टता अत्यंत महत्त्वाची. रंग, गंध, पोत, आकार, रचना यापैकी गंध तर टिपता येत नाही; रंग टिपण्याचे काम कॅमेरा बर्यापैकी स्वतःहून करतो. पोत दाखविणे सर्वस्वी चित्रकाराच्या हाती. फुलाच्या पाकळीची तलमता, नाजूकपणा, पोत, सूक्ष्म रेषा, फुलाचा गाभा, परागकण, बिया हे सर्व जितके सुस्पष्ट टिपले जाईल तितके चित्र अधिक प्रभावी. फुलाची चित्रे टिपताना विशेषतः पांढरी वा फिक्या रंगाची फुले टिपताना प्रकाश नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे. प्रकाश योजताना सर्व लक्ष्य फुलाच्या पाकळीवर केंद्रित असावे. संपूर्ण चित्र प्रकाशमान ठेवण्याच्या नादात अनेकदा उजळ भाग म्हणजे पाकळ्या थोड्या भगभगीत वा अतिप्रकाशित टिपल्या जातात आणि तपशील लुप्त होतो. तलम फूल टिपताना पाकळी मागून येणारा प्रकाश विलक्षण उठाव देतो. अनेकदा अर्धा विषय प्रकाशमान आणि अर्धा सावलीत असे चित्र टिपताना फसगत होते, विशेषतः पांढरे फूल टिपताना. शक्यतो विषमप्रकाशित चित्र घेऊ नये. फुलेच कशाला, अनेकदा माणसांची समूहचित्रे टिपताना माणसे उन्हात उभी केली जातात आणि मग चित्र पाहताना डोळ्यांचा तपशील दिसत नाही तर कपाळाखाली काळे दिसते, टोपी घातली असेल तर टोपीच्या झापाच्या सावलीतला सर्व तपशील नष्ट झालेला दिसतो.
सर्व स्पर्धकांचे आणि प्रदर्शकांचे आभार आणि अभिनंदन.
माझ्या पसंतीस आलेली चित्रे
३) हिरवळीवर पडलेले चाफ्याचे फूल. रचना, रंगसंगती चांगली आहे आणि साधे असूनही हे चित्र आकर्षक आहे. या चित्रात जर थोडे बदल केले असते तर ते अधिक प्रभावी ठरले असते - मी माझा आवडीनुसार अल्पसे बदल केल्यावर हे चित्र असे दिसते.
२) उटी येथे टिपलेले गुलाबाचे फूल. या फुलाची रचना टिपताना शोधलेला कोन चांगला आहे. तपशील चांगला आला आहे आणि रंग फिका असूनही प्रकाशाची हाताळणी चांगली आहे व त्यामुळे तपशील हरवला नाही. प्रदर्शनात बहुधा अनेक दिवस राहिल्याने फुल थोडे उतरणीला लागले आहे पण चित्रण छान आहे. योग्य एक्स्पोजर या चित्राला अधिक आकर्षक करू शकले असते. माझा सुधारणेचा एक प्रयत्न
१) सर्वाधिक पसंतीस आलेले लेक जिनेवा येथे टिपलेले पिवळे फूल. किंबहुना अत्यंत साधेपणा पण अत्यंत प्रभावी चित्रण यामुळेच हे चित्र मला आवडले. टिपण्याची दृष्टी, सुस्पष्टता, उत्तम प्रकाशयोजना हे तर आहेच पण या चित्रात विलक्षण जिवंतपणा आहे. केंद्रकापासून दूर जाणार्या पाकळ्या, पाकळ्या व गाभा यातील विरोधी रंगसंगती आणि मुख्य म्हणजे चित्रातला प्रसन्न भाव मला भावला. पाकळ्यांच्या रेषा, पोत अतिशय सुरेख उमटला आहे आणि पाकळ्यांची रचना प्रभावीपणे टिपल्याने त्याला एक लय आलेली आहे. चित्राचा विषय पार्श्वभूमी पासून पूर्णपणे अलग केलेला आहे.
अनेक चित्रे थोड्या संस्करणामुळे अधिक प्रभावी झाली असती हे प्रकर्षाने जाणवून देणारे चित्र जंगलात टिपलेल्या पांढर्या फुलाचे. थोड्या सुधारणांनंतर हे चित्र निश्चितच अधिक प्रभावी झाले असते.
अबोली हे चित्र तांत्रिक दृष्ट्या उत्कृष्ट आहे यात वादच नाही. रचना, सुस्पष्टता, प्रकाश योजना सर्वच बाबतीत उत्तम आहे परंतु हे चित्र पाहताना मला फुलापेक्षा फुलाचे चित्र असलेल्या भेटपत्राचा वा पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा भास झाला. काळ्या पार्श्वभूमीच्या केलेल्या समावेशामुळे चित्राला कृत्रिमता आली आहे असे मला वाटते, मुळात सुरेख टिपलेली प्रतिमा काळ्या पार्श्वभूमीमुळे सपाट झाल्यासारखी वाटते. अर्थात हे माझे मत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विजेत्या स्पर्धकांची नावे
- तृतीय क्रमांक - कोवळा संन्यास - संदीप डांगे
- द्वितीय क्रमांक - उटीच्या रोझ गार्डन मधल्या २८०० प्रकारच्या गुलाबांपैकी एक - मृत्युन्जय
- प्रथम क्रमांक - लेक जिनिवा येथील एक फूल - श्रीरंग_जोशी
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्व स्पर्धकांचे, अवांतर छायाचित्रे प्रकाशित करणार्यांचे व या दोहोंचा उत्साह वाढवणार्या प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.
यापुढील स्पर्धांसाठी आपल्या सुचवण्यांचे स्वागत आहे. यासाठी कृपया साहित्य संपादकांना संदेश पाठवावा.
प्रतिक्रिया
14 Feb 2016 - 12:25 am | साहित्य संपादक
~ मुन्नार येथील एका बागेतले हे फूल ~ - राजकुमार१२३४५६
~ काश्मिरी गुलाब ~ - मोहन
स्थळः पहेलगामचा एक बगीचा. नुकतीच एक पावसाची सर येवुन गेली होती आणि सूर्योदय झाला होता....
~ प्राजक्त ~ - अजिंक्य विश्वास
~ अबोली ~ - निशिकान्त
~ लिली ~ - नन्दादीप
~ फिर छिडी रात, बात फूलों की ~ - मंदार भालेराव
~ लक्षवेधी ~ - मयुरMK
~ कुर्ग बागेतील कंमळ ~ - इशा१२३
~ जंगलात भटकंती करताना सापडलेले एक फुल ~ - आ युष्कामी
~ बोगन वेलीचे कागदी फ़ुल ~ - इन कम
~ पिंक पॅशन ~ - वेल्लाभट
EXIF: एफ २.८; १/६०; आयएसओ २००; ५० एम एम
~ दो फूल एक माली ~ - उदय
~ अलिबाग येथील खासगी बागेतले हे एक फूल ~ - माम्लेदारचा पन्खा
~ कमळ ~ - chandanesandeep
~ बोगनवेल ~ - मीता
~ रक्ता़ङ्गं रक्तवर्णम् ~ - पैसा
14 Feb 2016 - 12:36 am | माम्लेदारचा पन्खा
आणि विजेत्यांचे आभार !!
14 Feb 2016 - 12:55 am | मृत्युन्जय
वा. सर्व छायाचित्रे सुंदरच. पण या स्पर्धेत बहुधा पॉइंट ब्लँक आणी स्पा ने भाग घेतलेला दिसत नाही, त्यांची छायाचित्रे नक्कीच सरस होती.
14 Feb 2016 - 8:06 am | पॉइंट ब्लँक
विजेत्यांचे अभिनंदन. कमळ म्हणून ज्या फुलांचे फोटो आले आहेत ते कमळ नाही. त्याला वॉटर लिलि म्हणतात.
इथे फरक छान सांगितले आहेत
http://www.pondplantgirl.com/lily-lotus.html
15 Feb 2016 - 3:32 pm | चांदणे संदीप
कमळ आणि वॉटर लिलि यामधला फरक समजावल्याबद्दल....नाहीतर अजून कितीक वर्षे वॉटर लिलिलाच कमळ समाजात राहिलो असतो.
(स्वगत: चित्रातलं लक्ष्मीच्या पायाखालच कमळच भारी दिसत!)
Sandy
14 Feb 2016 - 8:55 am | पीके
विजेत्यांचे अभिनंदन !!!
14 Feb 2016 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचे अभिनंदन !!!
14 Feb 2016 - 9:20 pm | पैसा
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे अभिनंदन! सर्वसाक्षीं यांनी केलेले विश्लेषण आणि सुधारित चित्रे खूप आवडली.
14 Feb 2016 - 10:35 pm | जुइ
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे अभिनंदन! सगळेच फोटो खूप मनमोहक आहेत.
14 Feb 2016 - 10:56 pm | एस
सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन!
15 Feb 2016 - 12:43 am | भिंगरी
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे अभिनंदन!
15 Feb 2016 - 6:51 am | मदनबाण
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ignoring India's protest, US government justifies decision on F-16s
With an eye on China, India sends aircraft carrier INS Vikramaditya to Male
15 Feb 2016 - 9:47 am | स्पा
विजेत्यांचे अभिनंदन :)
15 Feb 2016 - 9:47 am | स्पा
विजेत्यांचे अभिनंदन :)
15 Feb 2016 - 10:18 am | पियुशा
विजेत्यांचे अभिनंदन :)
15 Feb 2016 - 3:33 pm | चांदणे संदीप
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मिपाचे आभार!
Sandy
15 Feb 2016 - 4:55 pm | नाखु
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे अभिनंदन!
अम्ही चलत आणि अचल गोष्टींचे फोटो काढण्याचे धाडस करीत नाही कारण ज्याचा फोटो काढायचाय तेच उत्तरतात !
मिपा वाचक नाखु
15 Feb 2016 - 5:23 pm | वेल्लाभट
सुरेख माहिती, सगळे फोटो एक से एक.
विजेत्यांचे अभिनंदन, आयोजकांचे आभार.
पु.स्प.प्र.
15 Feb 2016 - 6:42 pm | सूड
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार.
15 Feb 2016 - 10:58 pm | श्रीरंग_जोशी
सर्वप्रथम मृत्युन्जय व संदीप डांगे यांचे अभिनंदन.
स्पर्धेच्या धाग्यात अन निकालाच्या धाग्यात सर्वसाक्षी यांनी मांडलेले विचार हे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन देणारे आहेत. तसेच स्पर्धेच्या धाग्यातली त्यांची छायाचित्रेही खूप काही शिकवणारी आहेत.
इतर प्रवेशिकांमधली छायाचित्रे तसेच स्पर्धेच्या धाग्यावरची अवांतर छायाचित्रे एकाहून एक आहेत. प्रवेशिकांपैकी संदीप चांदणे यांचं वॉटर लिलीचं चित्र तर भिंतीवर फ्रेम करून लावावंस वाटलं त्या चित्रात फुलाचा गाभा अजून स्पष्ट असायला हवा होता. या स्पर्धेच्या निमित्ताने पॉइंट ब्लँक यांनी काढलेले फुलांचे फोटोज पाहायला मिळाले ही आणखी एक पर्वणी होती.
आजवर मला कलेशी संबंधीत कुठल्याही स्पर्धेत मिळालेले हे पहिलेच बक्षीस आहे. माझ्या भावना मला शब्दांत मांडता येणे अवघड आहे. वेळोवेळी प्रोत्साहन देणार्यांचे अन सुधारणा सुचवणार्यांचे मनःपूर्वक आभार.
या छायाचित्राविषयी थोडेसे -
अडीच वर्षांपूर्वी एका सहलीदरम्यान (स्थळः लेक जिनिव्हा, विस्कॉन्सिन, अमेरिका) एका बागेत हे फूल दृष्टीस पडले. त्याकडे पाहताच त्याचा फोटो काढावासा वाटला. लगेच मी माझा कॅमेरा त्यावर केंद्रीत करू लागलो. परंतु तेव्हा खूप वारे सुटले होते. एक - दोन मिनिट वाट पाहिल्यावर अचानक वारे थांबले अन मी फोटो क्लिक केला. जरा घाईनेच केला कारण पुन्हा वारे येतील असे वाटत होते. घरी आल्यावर जेव्हा मोठ्या स्क्रीनवर पाहिले तेव्हा लक्षात आले की खालच्या दोन पाकळ्यांचा थोडासा भाग फोटोत येऊ शकलेला नाही.
याच कारणाने माझा आवडता फोटो असुनही स्पर्धेसाठी द्यावासा वाटत नव्हता. पण मुदत संपण्यापूर्वीपर्यंत मी काढलेला याहून चांगला फुलाचा फोटो मला सापडला नाही अन सध्या इथे बर्फाचे साम्राज्य असल्याने नवा फोटो काढण्याची संधी खूपच कमी होती. कुठे इनडोअर फुलांची रोपे शोधता आली असती पण शक्य झाले नाही.
या फोटोसाठी मी सोनी नेक्स ५ एन हा कॅमेरा व १८-५५ मिमि लेन्स वापरली.
एवढा मोठ्ठा प्रतिसाद वाचल्याबद्दल धन्यवाद :-) .
पुढील स्पर्धेच्या प्रतिक्षेत.
स्वगत : आता तरी ऑटो मोडच्या पलिकडे पाऊल टाक...
16 Feb 2016 - 1:31 pm | चांदणे संदीप
भरून पावलो!
भारीच! कीप इट अप! चला....आता पार्टी द्या! ;)
Sandy