राम राम मंडळी,
धाग्याच्या शिर्षकाबद्दल थोडं सांगतो,
'द सिक्रेट' हे नुकतच वाचनात आलेलं Rhonda Byrne या लेखकाचं पुस्तक.
बरं आता इथे मिपावर असणार्यांपैकी काही जणांनी ते पुस्तक वाचलय,नाही वाचलय ते मला माहित नाही.
तर सुरूवात लेखक कशी करतात पहा-
"A year ago,my life had collapsed around me.I'd worked myself into exhaustion,....... bla bla bla....
......आणि मला(लेखकाला) एक रहस्य कळालं."
ज्याने माझे आयुष्य सुखमय झालं.
तर अशी सुरूवात असली कि जरा मनात साशंकताच निर्माण होते,पुढे काय वाढून ठेवलं आहे याची.
पुढे लेखक म्हणतात कि असं एक रहस्य आहे,कि ते तुम्हाला आयुष्यात आनंद,आरोग्य,आणि संपत्ती मिळवून देईल.आणि म्हणतात"May The Secret bring you love and joy for your entire existence.
आणि प्रस्तावनेत सांगतात कि हे पुस्तक वाचून मला हजारो पत्रं आणि मेल्स आले,आणि त्या रहस्याचा लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसा फायदा झाला वगैरे.
मग मीही खुश झालो,रहस्य जाणून घेण्यासाठी.आधीच मी पैश्याला लै हावरा,त्यामुळे पुस्तक वाचायच्या आधीच करोडपती बनण्याची स्वप्ने पाहू लागलो.
पुढे वाचू लागलो तर रहस्याचा उलगढा काही केल्या होईच ना! वेगवेगळ्या तत्वज्ञांची/मानसोपचार तज्ञ/वैज्ञानिक यांची उदाहरणे दिलेली.ते काय म्हणतात या रहस्याबद्दल वगैरे वगैरे.
BOB PROCTOR: हे रहस्य तुम्हाला जे काही हवयं ते देईल. सुख,संपत्ती,आरोग्य.
DR.JOE VITALE:हे रहस्य जाणल्यावर तुम्हाला जे काही हवं आहे आयुष्यामध्ये ते मिळेल.
DR.JOHN DEMARTINI:हे जीवन जगण्याचे एक महान रहस्य आहे.
आणखीन बरीच उदा.दिलेली.
मला वैताग आला,थेट त्या रहस्याच्या पानावर जाऊन काय ते जाणून घेण्याची इच्छा झाली.
पण मग आणि कंट्रोलवर आलो.
आणि शेवटी एकदाचं त्या पानावर पोहचलो,
काय लिहलं होतं बघा.
ते रहस्य आहे,ते म्हणजे---
" आकर्षणाचा सिद्धांत"(law of attraction)
हे वाचून डोकं क्रॅकच झालं.म्हटलं यात आता काय नवीन?आकर्षणाचा सिद्धांत तर आपल्याला माहितच आहे.
पण पुढे वाचत गेलो तर वेगळच काहीतरी सांगितलं होतं,ते असं,
"विचारांना कंपने(vibration) असतात"
आणि आपण जसा विचार करू तसे त्या फ्रिक्वेन्सीची कंपने ब्रह्मांडात पसरतात आणि समान फ्रिक्वेन्सी असणार्या गोष्टींना,घटनांना,परिस्थितींना आकर्षित करतात.आणि तशाच प्रकारच्या व्यक्ती,घटना,परिस्थिती तुमच्या आयुष्यात साकार होतात.
"Everything that's coming into your life you are attracting into your life.And it's attracted to you by virtue of the images you're holding in your mind.IT'S WHAT YOU ARE THINKING.
whatever is going on your mind you are attracting to you."
"Thoughts become things" म्हणजे विचार वस्तू बनतात.
तर पुढे जाऊया आता,
मनामध्ये दिवसाला साठ हजार विचार येतात,असे संशोधक म्हणतात.
पुढे लेखक म्हणतात ज्या विचारावर तुम्हाला ठाम राहायचे आहे,ते आधी पक्कं करावं लागतं.आणि मग त्या विचारांची कंपने बाहेर पडतात आणि समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टींना आकर्षित करतात.
लेखक म्हणतात कि तुम्हाला ज्या गोष्टी आयुष्यात हव्या आहेत,त्याचाच विचार करा त्यामुळे त्या विचारांची कंपने विश्वात पसरायला काही अडचण येत नाही.पण विचार समिश्र झाले,आणि तुम्हाला त्याबद्दल शंका वाटली तर त्या विचारांची समिश्र कंपने तयार होतात आणि तसेच रिझल्ट आपल्याला मिळतात.
म्हणजे 'मला आजार नको','गरीबी नको','माझं शरीर निरोगी हवयं'
या हव्या असलेल्या गोष्टींचेच विचार मनात ठेवा.
थोडक्यात काय स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा,असे लेखकाचे म्हणणे आहे.
ते म्हणतात ना "power of positive thinking"
लेखक म्हणतात तुम्ही निसर्गाकडे ठाम मागणी करा,या वैश्विक शक्तीला समजू दे तुम्हाला काय हवं आहे.हे विश्व तुमच्या विचारांनुसार नक्कीच प्रतिक्रिया देईल आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळतील.ते पुढे असेही म्हणतात कि अवाजवी काही मागणी करू नका,कारण निसर्गाचेही काही नियम आहेत.
उदा- 1)उद्याच्या उद्या मला एक कोटी रूपये मिळू देते,
2) दिपिकासोबत माझं लग्न होऊ दे!
त्यामुळे हे शक्य नाही.
अणूपासून प्रत्येक गोष्ट बनलेली आहे,त्या अणूच्या हजारो/लाखो पट आत शिरल्यास "क्वार्क्स"नावाची गोष्ट दिसली,त्याच्याही हजारो पट आत शिरल्यावर एक गोष्ट सापडली ती म्हणजे फक्त "कंपन"
जगातील सजीव निर्जिव गोष्टी एक ठाराविक फ्रिक्वेन्सीला कंपन पावत आहे!
त्याचप्रमाणे क्वाॅन्टम फिजिक्सचे संशोधक असे सांगतात कि मानवी विचार,भावना या गोष्टींनाही एक प्रकारचे कंपन आहे.आणि चुंबकाप्रमाणे समान कंपनाच्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात.
लेखक म्हणतात तुमचे व्हिजन काय आहे हे निश्चित असले पाहिजे आणि सदैव अणि सदैव त्याच गोष्टींचा विचार करा,जेणेकरून तुमचे व्हिजन पूर्ण होईल,आणि त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करा./कृती करा.
"प्रयत्न करा" हा शब्द वाचल्यावर माझा थोडा मूडच खराब झाला,पण असो.
पुढे लेखकाने पैसा,नाती,आरोग्य,आनंदी जीवन या गोष्टींसाठी हे रहस्य वापरा असे सांगितले आहे.
वापनराव पै म्हणतात-"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार."
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात - "जो जे वांछिल तो ते लाहो"
तुकराम महाराज-"तुझे आहे तुजपाशी परि तूच जागा चुकलाशी"
विवेकानंद म्हणतात-"आता आपण जे आहोत ते आपल्या भूतकाळातील विचारांमुळेच.
तसेच पेरल्यानंतर शेकडोपटीने परत मिळणं हा निसर्गाचाच नियम आहे.तुम्ही कोणाहीपेक्षा कमी नाही,जी ऊर्जा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीकडे आहे,तीच तुमच्यात आहे,तुम्ही फक्त ऊर्जेला चांगलं स्वरूप द्या.
फक्त मनातले विचार मजबूत असले पाहिजेत,त्यांच्यात काही दम असला पाहिजे,नाहीतरी मला हे हवयं,ते हवयं म्हणून चालणार नाही.थोडक्यात काय हवयं ते प्राप्त करण्यासाठी झपाटून(वेडेपणा नव्हे) घ्यायला हवं.
या जगातल्या यशस्वी लोकांना ते रहस्य कळालं,म्हणून ते किर्तीच्या शिखरावर पोहचले,असे लेखक म्हणतात.
चार्ल्स हॅनेल म्हणतात:
"तुम्हाला विश्वाच्या आणि तुमच्या शक्तीची जाणीव येईल तेव्हा तुम्ही एक जिवंत विजेची तार बनलेला असता.ब्रह्मांडसुद्धा अशीच जिवंत विजेची तार आहे.जेव्हा वैयक्तिक मन वैश्विक मनाला स्पर्श करतं तेव्हा वैयक्तिक मनाला वैश्विक मनाच्या सर्व शक्ती प्राप्त होतात."
यामध्ये माझं काही नाही,फक्त मांडणी केली आहे,
तरीही काय म्हणता?
प्रतिक्रिया
12 Feb 2016 - 8:15 pm | विजय पुरोहित
झक्कासच विषय मांडलात...
वा.खु. साठवतोय...
आपले खूप खूप खूप धन्यवाद...
12 Feb 2016 - 8:20 pm | काकासाहेब केंजळे
rhonda Byrne ही लेखिका आहे ,लेखक नाही.the law of attraction तद्दन गाढवपणा आहे.याला स्युडोसायन्स म्हणतात.गरिब माणुस आयुष्यभर पैशाचा विचार करत असतो,तरीही बहुतांश गरिब दारिद्र्यातच आयुष्य संपवतात.गरिबाला लॉ ऑफ ॲट्रॅक्शन लागू होत नाही का?
12 Feb 2016 - 8:36 pm | चेक आणि मेट
गरीबांना पैश्याचे विचार येतात.
पण तुम्ही धागा आणखी एकदा वाचला तरी बरं होईल.
माणूस गरीब असणे यामध्ये थोडा मानशास्त्राचाही संबंध आहे."आपण गरीब आहोत"हे विचार असतातच.
आणि शेवटी स्ट्राँग विचार आणि त्याला दिलेली प्रयत्नपूर्वक कृतीची जोड हे महत्वाचे आहे. हे मी धाग्यातच सांगितले आहे.
12 Feb 2016 - 8:22 pm | काकासाहेब केंजळे
हे पुस्तक ,what the bleep do we know यानावे डॉक्युमेंटरीच्या स्वरुपात आले आहे,याचाच पुढचा भाग down the rabbit hole यानावे आला आहे.
12 Feb 2016 - 8:30 pm | चेक आणि मेट
rhonda Byrne ही लेखिका आहे
चूक दुरूस्त केल्याबद्दल धन्यवाद.
इंग्लिश नावावरून काहीच कळाले नाही.
लेखक ऐवजी लेखिका असे घ्यावे.
12 Feb 2016 - 8:36 pm | जेपी
"इतनी शिद्दत से मैनें तुमको पाने की कोशीश की है,
की हर जर्रे ने मुझे तुमसे मिलानेकी कोशीश की हे"
कहते हे किसी चिज को दिलसे चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलानेकी कोशीश करती है.
'इती शारुक
from 'om shanti om'
12 Feb 2016 - 8:39 pm | विजय पुरोहित
हा मूळ डायलाॅग बहुतेक अल्केमिस्ट-पाऊलो कोहेलो या पुस्तकात वाचल्याचे आठवतेय....
12 Feb 2016 - 8:46 pm | चेक आणि मेट
"agar tum kuch bhi haasil karna chahtey ho toh saari kaynat usey haasil karne mein lag jaati hain"
from the movie Om Shanti Om is copied from a book by Paul Coelho in his book The Alchemist has stated this
"When you desire something badly enough, the entire universe conspires to give it to you"
12 Feb 2016 - 8:48 pm | विजय पुरोहित
धन्यवाद...
रोज मनन करावं असं वाक्य आहे...
12 Feb 2016 - 9:06 pm | शब्दबम्बाळ
badly वगैरे शब्द त्या वाक्यात असल्याचे आठवत नाही.
“And, when you want something, all the universe conspires in helping you to achieve it.”
12 Feb 2016 - 8:46 pm | आदूबाळ
काहीही हां श्री!
एका माणसाच्या विचारांना कंपनं असती तर खूप लोकांच्या विचारांना खूप कंपनं असायला हवीत. स्टेडियमभर लोकांच्या विचारांना स्टेडियमभर कंपनं असायला हवीत. एक बिलियन लोकांच्या विचारांची कंपनं वीस मिलियन लोकांच्या विचारांच्या कंपनांपेक्षा ष्ट्राँग असली पाहिजेत. तरी भारताने २००३ मध्ये क्रिकेट विश्वचषकाच्या फैनलमध्ये माती खाल्लीच! हे कस्काय?
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी एक "ल्युमिनिफेरस ईथर" नावाचा पदार्थ असतो, आणि तो (इतर गुणधर्मांबरोबरच) घटना "घडवतो" अशी एक पुडी कोणीतरी सोडून दिली होती. आईनस्टाईनच्या स्पेशल थियरी ऑफ रिलेटिव्हिटीबरोबर ल्युमिनिफेरस ईथरचा अंत झाला. या विषयावर "द वॉचमेकर ऑफ फिलिग्री स्ट्रीट" ही रहस्य कादंबरी नुकतीच वाचली.
12 Feb 2016 - 8:56 pm | चेक आणि मेट
लेखिका किंवा तशी पुस्तके लिहलेले अनेकजण म्हणतात,
काही गोष्टींना निसर्गनियम आहेत,
मॅच जिंकण्याचा स्ट्राँग विचार खेळाडूंनी करावा लागतो साहेब.आपण विचार करून काय उपयोग,मॅच ते खेळतात ना?
आणि ऑस्ट्रेलियाबरोबर खेळताना(भारताबाहेर) आधीच आमचे खेळाडू निम्मे घाबरलेले असतात,मग समिश्र विचार तयार होतात,काय म्हणता?
12 Feb 2016 - 10:09 pm | आदूबाळ
म्हणजे इच्छित ते घडलं की "विचारांच्या कंपनांचा प्रभाव" आणि नाही घडलं की "निसर्गनियम" असं का?
12 Feb 2016 - 10:15 pm | तर्राट जोकर
खिक् ;-)
12 Feb 2016 - 10:22 pm | चेक आणि मेट
मी फक्त पुस्तक परिक्षण केलयं राव तटस्थपणे.मी ठामपणे माझं हे मत आहे म्हणलं नाही.
तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हीच शोधायची.
खिक्क =))
12 Feb 2016 - 11:40 pm | काळा पहाड
तुम्हाला कृष्णदर्व्या बद्दल माहितीये? आता पण जरा हे वाचा बरं: Dark Matter's Rival: Ether Theory Challenges "Invisible Mass"
हे सुद्धा वाचा:
http://www-history.mcs.st-and.ac.uk/Extras/Einstein_ether.html
बरं अवकाश स्वतः सुद्धा विचितर् वागतो हे तुम्हाला माहिती असेलच.
Empty space has more energy than everything in the Universe, combined
"No Empty Space in the Universe" --Dark Matter Discovered to Fill Intergalactic Space
बरं आजचीच बातमी घ्या. गुरुत्वीय लहरींचा शोध लागलेला आहे. लहरींच्या पर्सारणाला माध्यम लागतं हे तुम्हाला माहीत आहेच. इथे हे माध्यम अवकाश आहे. म्हणजे अवकाश स्वतःच एखाद्या दर्वापर्माणं काम करतं, त्याचं आकुंचन, पर्सरण होतं, ते ताणलं जातं हे आता सिद्ध झालेलं आहे.
तात्पर्य, इथरची कल्पना एका अर्थी खरीच आहे. ती ज्या लोकांनी मांडली त्यांच्या कल्पनेपलीकडे ती खरी ठरते आहे.
13 Feb 2016 - 12:26 am | आदूबाळ
धन्यवाद! NatGeo ची लिंक वाचली. बाकी सवडीने वाचतो.
12 Feb 2016 - 8:55 pm | जेपी
आमचा एक पेपर विकणारा आणी mlm बिजनेस करणारा मित्र" there is billion dollar roaming in world in world,to gain it you need attraction of it" असा संवाद कायम ऐकवतो.
मन वैगेरे काही नसत अस एक मिपाकर मित्र म्हणतात.
बाकी रहस्य सारखी self help पुस्तक फालतु असतात.
12 Feb 2016 - 8:57 pm | मयुरMK
आणि हे पुस्तक आपले ( वाचकाचे ) विचार मजबूत करण्याचा ''प्रयत्न'' करते.
मानसिक शांततेच्या बदल्यात तुम्हाला एखादे साम्राज्यही मिळाले तरी प्रत्यक्षात तुम्ही अपयशीच म्हणवले जाल.
बाकी पुस्तक परिचय इथे दिल्याबद्दल धन्यवाद घेईन म्हणतोय
12 Feb 2016 - 9:00 pm | चेक आणि मेट
अगदी खरयं,पुस्तकं खपवण्यासाठी काहीही प्रपंच करतात.
But overall आपण नेहमी positive thinking केली पाहीजे,असा एकंदरीत लेखिकेचा आशय आहे.
12 Feb 2016 - 9:10 pm | चेक आणि मेट
लेखिकेचे विचार मानसिक बळ देतात,आणि मन बलवान असेल तर असाध्य असं काहीच नाही,उदासपणा/भिती मनात ठेवून केलेले कार्य सिद्धीस जाण्यात अडचणी येतात.आणि बर्याच गोष्टीमध्ये मानसशास्त्र महत्वाचे असते.बरेच रोग/आजार यामध्ये मनस्थिती हे एक कारण असते. बाकि आम्हीही पूर्ण डोळे झाकून कशावर विश्वास ठेवत नाही.
12 Feb 2016 - 9:17 pm | प्रदीप साळुंखे
मानसशास्त्राचा मुद्दा पटला.
12 Feb 2016 - 9:19 pm | राजेश घासकडवी
कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. रहस्य वगैरे काही नाही - सतत सकारात्मक विचार करत राहाणं, आपल्या ध्येयाचा ध्यास ठेवून ते मिळेल अशी खात्री बाळगणं, आणि लहानसहान अडथळ्यांपोटी धीर न गमावता नेटाने चालत राहिलं तर यश मिळेल अशी खात्री बाळगणं - हे करणारे लोक अधिक प्रमाणात यशस्वी होतील. त्यात विशेष काय?
12 Feb 2016 - 9:23 pm | विजय पुरोहित
मग लेखक काय म्हणताहेत? उगीच भंपक वगैरे कशाला? जिथं तिथं पिचकार्या टाकल्याच पाहिजेत का?
12 Feb 2016 - 9:36 pm | मयुरMK
विजय भाऊ केव्हा पूर्ण करणार ?
पु.भा.प्र
12 Feb 2016 - 9:39 pm | विजय पुरोहित
मी पूर्ण करतो हो. तुम्ही काळजी करू नये.
12 Feb 2016 - 9:24 pm | मयुरMK
हेच म्हणतोय मी सर सहमत
12 Feb 2016 - 9:49 pm | चेक आणि मेट
मी ही हेच म्हणतोय,
बाकि आम्ही फक्त पुस्तक परिक्षण केलं.इतकच
पण quantum physics वाले विचारांना कंपन असतं म्हणतात कि घासकडवी साहेब?
12 Feb 2016 - 11:53 pm | काळा पहाड
सर, तुम्ही केलेल्या पदार्थविज्ञानातील + मनोविज्ञान + मानवी शरीरावरच्या संशोधनाची लिंक प्रसिद्ध करणार का प्लीज. बाकी तुम्ही कॉमनसेन्स वगैरे बोलणार असाल तर मी कॉमनसेन्स शी विसंगत एक बातमी देतो. आणि शिवाय ती बातमी कुठली तरीच सांगतोय हे म्हणू नये म्हणून चार लिंका देतो.
http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-3107996/Our-entire-lives-...
http://www.gizmag.com/quantum-theory-reality-anu/37866/
http://themindunleashed.org/2015/06/new-mind-blowing-experiment-confirms...
http://discovermagazine.com/2002/jun/featuniverse
या बातमी पूर्वी तुम्ही या थियरी ला (खरं तर ती थियरी नाहीये पण ऑब्झर्वेबल फॅक्ट ला थियरी मध्ये बसवायचा प्रयत्न चालू आहे) असंच म्हणाला असतात. तेव्हा सायन्स मध्ये भंपक वगैरे शब्द वापरले जात नाहीत हे नक्की समजा. जे आज विचित्र वाटतं ते खरं असू शकतं. खरा सायंटीस्ट हा शब्द सुद्धा वापरत नाही.
13 Feb 2016 - 12:00 am | जव्हेरगंज
मला असंच काहीसं मत मांडायच़ं होतं. राजेश घासकडवी यांनी योग्य प्रकारे लिहीलयं. त्यांनी लेखिकेची थेरी उलटी करुन लिहीली आहे. अगदी चपखल शब्दांत तिचे दात घशात घातले आहे.
अवांतर : 'सतत सकारात्मक विचार करत राहाणं' हे वाटते तितके सोपे काम नाही :)
12 Feb 2016 - 10:31 pm | उगा काहितरीच
याचे व्हिडीओ पाहिले होते. पॉझिटीव्ह विचार सांगितलं जे की चांगलंच आहे. थोडफार अवास्तव आहे. पण ठीक आहे की जेवढं पटते तेवढं घ्या बाकीच द्या सोडून .
12 Feb 2016 - 10:41 pm | विजय पुरोहित
सर्वोत्तम मत उ.का. काका...
:)
आता उका चिडतेत.... ;)
13 Feb 2016 - 9:04 am | उगा काहितरीच
धन्यवाद विपु आजोबा ! ;-)
12 Feb 2016 - 11:03 pm | सतिश गावडे
थोडंफार नव्हे, बरंच अवास्तव आहे. पण तरीही तुम्ही म्हणताय तसं. जेवढं पटते तेवढं घ्या बाकीच द्या सोडून.
12 Feb 2016 - 11:01 pm | सतिश गावडे
लोकांचे काय घेऊन बसलात हो, तुम्ही एखाद्या दगडाला शेंदूर फासलात आणि हा म्हसोबा पावतो म्हटलंत की लोक त्या दगडापुढे पैसे टाकायला आणि डोकं टेकायला तयारच असतात. "सिक्रेट" सारख्या अचाट कल्पना याच कारणामुळे लोकांना सत्य वाटायला लागतात.
आयुष्यात यश मिळणं किंवा न मिळणं, एखादी गोष्ट मनासारखी होणं किंवा न होणं हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. वर एका प्रतिसादात राजेश घासकडवींनी म्हटल्याप्रमाणे:
मात्र सकारात्मक विचार आणि ध्येयाच्या दिशेने नेटाने चालू असलेले प्रयत्न यापेक्षाही प्रभावी असा नकारात्मक घटक तुमच्या यशाच्या मार्गात खीळ घालू शकतो.
लोकांना यश मिळाले असेल वा नसेल हे पुस्तक लिहून लेखिका मात्र नक्कीच यशस्वी झाली असे तिच्या या पुस्तकानंतरच्या वाटचालीवरून वाटते.
12 Feb 2016 - 11:20 pm | चेक आणि मेट
सहमत
मराठीतही अशी पुस्तके यायला लागलीत हल्ली
चाळीस-पन्नास पाने असतात आणि किंमत दोनशे-तीनशे रूपये सांगतात.
13 Feb 2016 - 1:08 am | अर्धवटराव
सर्व चराचर केवळ एका निर्गुण निराकार कंपनांचं अविष्कार आहे हे जर मनात ठसलं तर त्या कंपनांत मिसळुन जाण्यापलिकडे काहि इच्छा शिल्लकच राहाणार नाहि. त्याचा वापर करुन भौतिक समृद्धी प्राप्त करण्याचा विचार तर फार लांब राहिला.
बाकि ज्ञानेश्वर, विवेकानंद वगैरेंनी जे काहि म्हटलय ते फार वेगळ्या कॉण्टेक्स्ट्ने... अर्थात, सकारात्मकता वाढवायला जर अशा थेअरीची मदत होत असेल तर त्यात काहि वाईट नाहि.
13 Feb 2016 - 3:50 am | अरुण मनोहर
कुछ तो दम है बॉस !
विश्वाचे आर्त माझ्यावरी प्रकटले !
13 Feb 2016 - 3:50 am | कवितानागेश
विचारांचा परिणाम पाण्यावर होत असल्याचा एक प्रयोग वाचला होता पूर्वी. करून पाहिला नाही. :)
13 Feb 2016 - 7:51 pm | उपयोजक
डॉ. राजेंद्र बर्वे या प्रसिध्द मानसोपचार तज्ञ आणि लेखकाचं 'टफ माईंड'ह्या पुस्तकात एखादी इच्छा मनापासून केली तर ती कशी फलद्रुप होते या बद्दल त्यांनी स्वत:चाच अनुभव सांगितला आहे.लेखक स्वत:च मानसोपचार तज्ञ असल्याने विश्वास ठेवायला हरकत नसावी.
13 Feb 2016 - 8:21 pm | लॉरी टांगटूंगकर
चेकमेट साहेब,
आपण शिक्रेटकडे पाहण्याआधी निर्णय प्रक्रिया नेमकी कशी असते आणि कशी विकसीत झालेली आहे हे पाहू.
सर्वसामान्यतः प्राण्यांकडे पाहीलं तर काही प्राण्यांची निर्णय प्रक्रिया जन्मतः पूर्णपणे तयार असते. या प्राण्यांमध्ये मादी अंडी घालून भलतीकडेच निघून घेलेली असते, पण ते प्राणी जन्म घेतात. जन्मतःच ते निर्णय घेण्यास सक्षम असतात. ते वंश टिकवतात आणि जगतात. त्यांचे मुलभूत प्रोग्रॅमिंग / विचार पद्धत बदलता येत नाही.
त्या विरुद्ध पाहीलं तर काही प्राण्यांना आईची किंवा आधाराची जन्मतः खूप गरज असते. उदाहरणार्थ पाहीलं तर कुत्रा किंवा वाघ इत्यादी. हे प्राणी अॅडप्टीव डीसीजन मेकिंग करू शकतात. थोडक्यात बोलायचं झालं तर निसर्गाने केलेल्या प्रोग्रॅमिंग मध्ये काही बदल करण्यास ते सक्षम असतात. त्यांना शिकवता येऊ शकते. माणसा मध्ये ही क्षमता सर्वात जास्त आहे. पण जन्मतः असलेलं प्रोग्रॅमिंग आणि नंतर शिकल्या गेलेल्या गोष्टी यात खणखणीत गल्लत होऊ शकते.
जन्मतः असलेल्या प्रोग्रॅमिंग मध्ये काही चुकीचं आहे का? नक्कीच नाही. शिकलेल्या गोष्टी आणि जन्मत: असलेल्या गोष्टी एकमेकांबरोबर बदलता येतात का हे बघण्यासाठी डार्विनने एक प्रयोग केला होता. त्याने काचे मागे साप ठेवून काचेपलीकडे चेहरा नेला. जेव्हा केव्हा साप दंश मारतो तेव्हा प्रतिक्षिप्त क्रियेने तो मागे सरकायचा. भरपूर प्रयत्न केल्या नंतर पण त्याला त्याची नैसर्गिक प्रक्षिप्त क्रिया बदलता आली नव्हती. खरं तर काच आहे हे त्याला माहीती होतं, पण त्याला त्या क्रियेवर नियंत्रण मिळवता येत नव्हते. भितीचे ट्रीगर्स त्याचे रॅशनल डीसीजन मेकींग बाजूला ठेवत त्याला भावनिक निर्णय घ्यायला लावत होते. आणि उत्क्रांती मध्ये ही पायरी नसती तर आपले पुर्वज शांतपणे अच्छा, सिंह येतोय ? बर्र्र!, तो माणसाला खाऊ शकतो बर्र्रच!, किंवा त्याला भूक नसली तर खाणार नाही. बघू की त्याला भूक आहे का, नसेल तर का फुकट पळून एनर्जी घालवा? अशा वेळखाऊ प्रक्रियेत अडकले असते. आणि नक्कीच टीकून राहीले नसते. (reflexive decision making)
उत्क्रांतीमध्ये असे बरेच बदल घडले आहेत. सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हिमोग्लोबिन असते. आपल्या रक्ता मध्ये असलेले हिमोग्लोबिन ऑक्सिजन फुफुसांतुन बाकी शरीराला पुरवतात. आणि जर का हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर प्राणी मरू शकतो. मरतोच. आपण कधी बर्फातले मासे पाहीले तर त्यांच रक्त पांढरे असते आणि त्यात हिमोग्लोबिन अजिबात नसते. त्यांच्या वावरण्याच्या वातावरणात रक्त गोठू शकते, ह्रूदयाला रक्त बाकी शरीरा पर्यंत पोहोचवणे न जमल्यास मृत्यू पक्का. पण बर्फाळ प्रदेशातील माशांनी हिमोग्लोबिन सोडून दिलं.
निसर्गतः अतिथंड असलेल्या पाण्यात ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो. वातावरणातील ऑक्सिजन ते थेट त्वचेद्वारे घेतात.
उत्क्रांती मध्ये झालेले बदल ! डार्विनचा नियम सर्वायव्हल ऑफ स्ट्राँगेस्ट बद्दल बोलत नाही.
उगाच भुक्कड गप्पा मारत मुद्द्यापासून दूर आलो. ते एकीकडे असोच. मुद्दा असा आहे की उत्क्रांती मध्ये मिळालेलं डीफॉल्ट प्रोग्रॅमिंग काहीसं या पद्धतीचं आहे. ते ओव्हर राईड करता येणं अजून फारसं कोणाला जमलेलं नाही. जर का तुमच्या दोन इंचावरून सव्वाशे किमी प्रतितास वेगाने गाडी गेली, तर हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे इत्यादी प्रतिक्रिया शरीर देतं. वास्तविक पहाता धोका टळलेला असला तरी पण तरीही ते होतंचं.
नैसर्गिक निर्णय प्रक्रियेमागचं तर्कशास्त्र नेम़कं कसं आहे. आपली डीफॉल्ट सेटींग्स नेमकी कशी आहेत? आणि त्यातली काही सेटींग्स हुकली आहेत काय?
वैयक्तिक आयुष्यातल्या अथवा कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये दैव आणि कौशल्य दोन्ही गोष्टीचा प्रभाव असतो. दैवाचा प्रभाव असतो म्ह्णण्याचे कारण असं की सर्व गोष्टी समजून घेता येत नाहीत. त्यांचे भाकीत करता येत नाही. आणि मानवी स्वभाव ही गोष्ट स्वीकारत नाही.(default progrmming!) we prefer wrong data over no data. काहीच माहीती न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळणारी चुकीची माहीती सुद्धा स्विकारण्याकडे आपला कल असतो.
काही प्रमाणात गोष्टी आकडेवारीवर उतरवता येतात, पण त्यातही चुका होउ शकतात.
उदाहरण देतो,
१)-
समजा तुम्हाला (किंवा मला :) ) एखादा शर्ट विकत घ्यायचा आहे. शर्टची किंम्मत हजार रुपये आहे. शर्टची निवड पूर्ण झालेली आहे. दुकानदार सांगतो की भाऊ, दहा मिनीटावर माझंच अजून एक दुकान आहे. तिथे हा शर्ट तुला शंभर रुपयात मिळेल. (९०% सवलत!), परफेक्ट हाच शर्ट, हीच क्वालीटी. दहा मिनीटे चालायचं, आणि नउशे रुपये वाचवायचे.
ही डील घेणार?
आता दुसरी केस-
२) समजा गाडी विकत घ्यायची आहे. गाडीची किंम्मत पंधरा लाख रुपये आहे. गाडीची निवड पूर्ण झालेली आहे. दुकानदार सांगतो की भाऊ, दहा मिनीटावर माझंच अजून एक दुकान आहे. तिथे हीच गाडी तुला चौदा लाख नव्व्याण्णव हजार शंभर रुपयात मिळेल. (९०० रुपये सवलत!), परफेक्ट हीच गाडी, हीच क्वालीटी.
ही डील घेणार?
समोरासमोर प्रश्न विचारला तर बहुतांश लोकं पहीली डील घेतात, दुसरी घेत नाहीत. टक्केवारी गंडवते. वास्तविक पहाता दोन्हीकडे दहा मिनीटे खर्च करून नऊशेच रुपये वाचणार आहेत. त्या नऊशे रुपयांची बाकी काही खरेदी करा. कोणही "पंधरा लाखावर वाचवलेले नऊशे ?" किंवा "हजारावर वाचवलेले नऊशे"? असं विचारणार नाहीये. तरी असं का होतं? (psychological maladjustments ?)
एखादी गोष्ट जर का नियंत्रणाचा चुकीचा फिल देत असेल तरीही ती "वर्थ ट्राईंग" वाटते.
खालच्या फोटोत काही लॉटरीची तिकीटं आहेत.
या तिकीटांच्या नंबर्स कडे नीट बघा,
या पैकी कोणत्या तिकीटाचा मालक " पुढच्या वेळेस साठी जास्त प्रयत्न करेन " असं म्हणेल?
एखादी गोष्ट जर का नियंत्रणाचा चुकीचा फिल देत असेल तरीही ती "वर्थ ट्राईंग" वाटते. पटतंय?
उगाच कोणी मला हॉगवॉर्ट्स मधून अॅडमिशनचे घुबड यावं असा विचार करत बसला तर ते होणार आहे काय? ही एक टोकाची केस झाली, इथे काळं-पांढरं वेगळं करणं सोपं आहे, मधल्या ग्रे शेड वेगळ्या करणं फारच अवघड असतं.
एखादी गोष्ट जर बिघडत चालली असेल, निर्णय चुकीच्या दिशेने जात असतील तर अशा प्रकारची विचार प्रक्रिया डीझास्ट्र्स रिझल्ट देउ शकते. योग्य निर्णय प्रक्रिया फक्त आपल्या हातात असते. बाकी बर्याच घटकांवर आपण काहीच करू शकत नाही.
लॉटरी/ जुगारा मधली अजून एक केस बघता येइल.
रौलेट चक्राला ३८ स्लॉट्स आहेत. १ ते ३६, ० आणि ००. तुमच्या आवडीच्या आकड्यावर १००० रुपये लावा. जिंकलात तर ३५००० रुपये जिंकाल, हरलात तर १००० रुपये जातील.
प्रोबॅब्लिटी पाहीली तर १/३८= २.६
३५००० पे ऑफ साठी वाजवी भाव = २.६*५५०००= ९४७.३ rs
इथे हजार रुपयांच्या कितीही पैजा लावल्या तरीही कॅसिनो बरोबर जिंकून पैसे कमावणे शक्य आहे काय?
आक्षेप पॉझीटीव असण्याला नाही, विशफुल असण्याला आहे. परत एकदा तेच वाक्य लिहीतोय, एखादी गोष्ट जर बिघडत चालली असेल, निर्णय चुकीच्या दिशेने जात असतील तर अशा प्रकारची विचार प्रक्रिया डीझास्ट्र्स रिझल्ट देउ शकते.
An optimist is a person who sees a green light everywhere, while a pessimist sees only the red stoplight... the truly wise person is colorblind.
13 Feb 2016 - 8:47 pm | आदूबाळ
जबरदस्त प्रतिसाद! धन्यवाद!
13 Feb 2016 - 9:20 pm | चेक आणि मेट
छान प्रतिसाद,
धाग्याच्या शेवटी मी असं म्हणलय कि
यात माझं काही नाही मी फक्त मांडणी केली आहे.
13 Feb 2016 - 10:25 pm | एस
अगदी, अगदी!
14 Feb 2016 - 12:32 am | सतिश गावडे
उत्तरार्धावर डॅन अॅरिलेच्या "प्रेडिक्टेबली ईरॅशनल"चा प्रभाव जाणवतो. नऊशे रुपयांच्या डीलचे उदाहरण त्या पुस्तकात वाचल्याचे आठवते.
14 Feb 2016 - 9:10 am | लॉरी टांगटूंगकर
आमचं ओरिजनल काहीच नाही. emotions revealed, learn or die , seeking wisdom from darwin to munger, fooled by randomness, psychology of human misjudgment- प्रो. बक्षी यांचे लेक्चर्स (लॉटरी तिकीटचं उदाहरण थेट घेतलेलं आहे) यातल्या संकल्पना आहेत.
14 Feb 2016 - 9:32 am | सतिश गावडे
The Drunkard's Walk, Fooled by Randomness, Predictably Irrational, Freakonomics आणि Chance ही सारीच पुस्तकं भारी आहेत.
14 Feb 2016 - 10:40 am | च्यायला
सुन्दर प्रतिक्रीया
15 Feb 2016 - 11:13 pm | पैसा
संपूर्ण प्रतिसाद आवडला.
13 Feb 2016 - 10:41 pm | मुक्त विहारि
मधल्या ग्रे शेड वेगळ्या करणं फारच अवघड असतं......"
प्रचंड टाळ्या...
सहमत...
13 Feb 2016 - 10:41 pm | मुक्त विहारि
मधल्या ग्रे शेड वेगळ्या करणं फारच अवघड असतं......"
प्रचंड टाळ्या...
सहमत...
14 Feb 2016 - 12:14 pm | विवेक ठाकूर
लेखक म्हणतात तुम्ही निसर्गाकडे ठाम मागणी करा,या वैश्विक शक्तीला समजू दे तुम्हाला काय हवं आहे.हे विश्व तुमच्या विचारांनुसार नक्कीच प्रतिक्रिया देईल आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळतील.ते पुढे असेही म्हणतात कि अवाजवी काही मागणी करू नका,कारण निसर्गाचेही काही नियम आहेत.
अस्तित्त्व इतकं अथांग आहे की तिथे एखाद्या व्यक्तीची खिजगणतीही नाही. अस्तित्त्वात इतकी अपरिमित उलाढाल चालू आहे की तिथे व्यक्तिगत विचाराची दखल घेतली जाणं असंभव आहे. त्यामुळे वैश्विक मन, व्यक्तिगत मनाची वांछा ऐकून घेईल आणि ती पुरवेल हा निव्वळ भ्रम आहे.
खरं तर इट इज जस्ट द अदर वे, अस्तित्त्व जे घडवू पाहातंय त्याच्याशी, आपली व्यक्तिगत इच्छा सोडून, आपण संलग्न झालो तर बेहद्द मजा येते. स्वतःचे विचार अस्तित्त्वावर लादणं म्हणजे चमच्यानं समुद्र उपसण्याचा मूढ प्रयत्न आहे. आपण अस्तित्त्वाचा एक अविभाज्य भाग आहोत आणि माणूस सोडून इतर सर्व सजीव, अनाहूतपणे त्या एकरुपतेत जगतात म्हणून निश्चिंत दिसतात. माणसाला स्वेछेनं, अस्तित्वाच्या इच्छेशी समरुप होऊन जगण्याचा मार्ग खुला आहे, पण माणूस इतका अज्ञानी आहे की तो संपूर्ण अस्तित्त्वाला आपल्यासाठी कामाला लावण्याचा विचार करतो. पुस्तकातल्या विचारात नेमकी हीच घोडचूक आहे. अशा विचारांच्या अनुसरणानी केवळ फ्रस्ट्रेशनशिवाय काही प्राप्त होणार नाही.
त्यात पुन्हा अंतर्गत द्वंद्व आहेच :
अवाजवी काही मागणी करू नका,कारण निसर्गाचेही काही नियम आहेत.
एकतर मागणी करणं हीच मूढता आहे, त्यात पुन्हा वाजवी आणि अवाजवी हा गुंता नक्की कसा सोडवणार ? आधीच चुकीच्या रस्त्यावर चालायला सुरुवात करायची आणि मग नक्की किती आणि काय हवंय त्याचा संभ्रम म्हणजे यथावकाश भ्रमिष्ट होण्याची खात्री !
14 Feb 2016 - 12:34 pm | स्पा
दणदणीत सहमती, अचुक मांडलेत
15 Feb 2016 - 7:19 pm | मराठी कथालेखक
"मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण."
हे वचन आपणाला माहित आहेच. एका वाक्यात तत्वज्ञान आहे.
मनात सकारात्मक विचार चालू असतील आणि धेय्यावर आपलं लक्ष केंद्रीत असेल तर आपल डोक नीट चालेल. लहानसहान गोष्टीतूनहि मदत मिळवता येईल. याउलट जर नकारात्मक विचार करत बसलो (एखाद वेळ , काही क्षण 'राग, दु:ख, मत्सर' ई भावना निर्माण होणे आणि आपण त्यांच्या आहारी जाणे यात फरक आहे).
बाकी 'द सिक्रेट' वगैरे भंपक आहे. नुसत्या विचारांनी चमत्कार घडणार नाहीये. मुळात चमत्कार घडणारच नाहीये.
15 Feb 2016 - 8:54 pm | बॅटमॅन
Always be positive- unless it's HIV.
15 Feb 2016 - 10:51 pm | राघव
माझ्या मते हे सकारात्मक/नकारात्मक बद्दल नाहीच्चे.
जी तुमची अगदी मनापासूनची ईच्छा, ती सकारात्मक असो वा नकारात्मक - योग्य असो वा अयोग्य.. , ती पूर्ण होण्यास संपूर्ण विश्व हातभार लावतं असा काहीसा थेरम आहे.
आता आपल्याला "होणारी" ईच्छा ही उत्स्फूर्तता वर्णन करतेय आणि आपण "केलेली" ईच्छा ठरवून केल्या जातेय.
उत्स्फूर्तता म्हणजे पुन्हा आपल्या सुप्त मनाचा खेळ म्हटल्या जाऊ शकतो.. पण त्यावर आपल्या जागृत मनाचा त्याक्षणी तरी काही कंट्रोल राहत नाही. म्हणजेच अगदी मुळातून होणारी अशी ती ईच्छा आहे. आणि ती सगळं विश्व पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतं असं ही थिअरी मांडते आहे.
हे सर्व आभासी किंवा नाही हे जो तो स्वानुभवावरूनच ठरवू शकेल, कारण दुसर्यांना आलेले अनुभव मलाही आलेच पाहिजेत असा हेका धरणे म्हणजे वेडेपणा ठरेल. पण त्यासाठी आधी माझी अगदी मुळातली अशी ईच्छा कोणती ते आधी मला समजावे लागणार.. इथेच मुळात खरी गोम आहे. मला मुळात काय हवंय हे मलाच अजुन उमजलेलं नाही. नाहीतर ध्येय सापडलं असं होईल नाही? ;-)
राघव
16 Feb 2016 - 1:28 am | कवितानागेश
बरोबर. ही थिअरी अशीच आहे. :)
आणि चर्चा सिक्रेट थिरीबद्दल आहे कि विचारांच्या मूर्त/ जड स्वरूपाबद्दल हे मात्र मला नक्की कळले नाहीये. ;)
16 Feb 2016 - 6:49 am | राघव
माऊ, ते जरा सुप्त मनात ईच्छा कशा पेरायच्या तेवढं सांग ना.. शिंची कामंधामं सोडून तेच करावं म्हणतो आता.. ;-)
16 Feb 2016 - 8:28 am | चेक आणि मेट
चर्चा नाही ओ.
विचारांच्या मूर्त/जड स्वरूपाचे लेखिकेने सिक्रेट थियरीमद्दे रूपांतर केलय जेणेकरून पुस्तकाचा खप वाढावा :)