देहभार

विवेक ठाकूर's picture
विवेक ठाकूर in जनातलं, मनातलं
8 Jan 2016 - 12:24 am

सर्व प्रथम, मी वजनावरचे कुठलेही लेख अजून तरी वाचलेले नाहीत, तस्मात हा लेख कोणत्याही लेखाला प्रत्युत्तर नाही. दुसरी गोष्ट, माझा शरीरशास्त्राचा आभ्यास नाही. ‘मी शरीर नसून मला शरीराची जाणीव आहे’ या स्वानुभवातून आणि रोजच्या जगण्यातून केलेलं हे लेखन आहे. माझ्या मते, वजन घटवण्याचे इतर उपाय कष्टदायक वाटले तरी काहीशा निश्चयानं ते पार पाडता येतील. या लेखातले अनुभव वरकरणी सोपे वाटले तरी जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला तर त्यांची प्रचिती निश्चित येईल.

______________________________

पहिली गोष्ट, आपण शरीर नाही; आपल्याला शरीराची जाणीव आहे. तस्मात, वजन शरीराला आहे, आपल्याला नाही. हा शरीराशी डील करण्याचा फंडा आहे. या एका उलगड्यासरशी ‘मी आणि वजन’ ही मनाला बसलेली गाठ सुटते. तुम्ही प्रश्नापासनं वेगळे होता आणि कोणताही प्रश्न सोडवायला मजा येण्यासाठी हे वेगळं होणं प्रार्थमिक आहे.

दुसरी गोष्ट, शरीराचं वजन किती हा दुय्यम प्रश्न आहे. मुख्य प्रश्न तुम्हाला रोजचं जगायला उत्साह वाटतो की नाही हा आहे. जर तुम्ही पुरेसे उत्साही असाल तर शरीराचं वजन योग्य आहे. त्यासाठी इतर कोणत्याही गुणोत्तराची आवश्यकता नाही. तस्मात, मनाचा उत्साह हा मूळ निदर्शक आहे, वजन नाही. तुम्ही सहजतेनं आणि उत्साहानं रोजची कामं करू शकत असाल तर वजन पाहाण्याची गरज नाही, ते आटोक्यातच आहे.

उत्साहाला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक, कडाडून लागणारी भूक आणि दुसरी, शांत झोप. जर तुमच्या भूक आणि झोप या गोष्टी समाधानकारक असतील तर उत्साह परिणामस्वरुप आहे.

याबाबतीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय काहीही असो, तुमची कामप्रेरणा सलामत हवी. याचा अर्थ व्यक्ती कामुक असायला हवी असा नाही तर प्रणय-सक्षम असायला हवी. याचं एक खास कारण आहे. निसर्गाचा मूळ हेतू प्रोलिफरेशन (सातत्य टिकवणं) आहे. तुमचा व्यक्तिगत हेतू कितीही उदात्त किंवा सामान्य असला तरी निसर्गाला त्याची काहीच कल्पना नसते. तस्मात, व्यक्ती जितकी कामविन्मुख तितकी ती निसर्गाच्या दृष्टीनं निरुपयोगी. इन फॅक्ट, सक्षम कामप्रेरणा हे शरीराची इंडोक्राईन सिस्टम (अंत:स्त्रावी ग्रंथींचं काम) सुयोग्य चालल्याचं लक्षण आहे.

तिसरी गोष्ट, शरीर हे अन्नाचं रूपांतरण आहे. त्यामुळे भोजनाचा नुसता नित्यक्रम असून उपयोग नाही, तो सोहळा झाला पाहिजे. भोजनाची मजा न येण्याची दोनच कारणं आहेत. एक, भूकेनं जेवण्याऐवजी ‘वेळेनं’ जेवणं आणि दोन, चवीनं जेवण्याऐवजी ‘अन्नाचा अ‍ॅनॅलिसिस करणं’, म्हणजे कॅलरीज, फॅट्स, प्रोटीन्स, फायबर्स असले प्रकार मनात घेऊन जेवणं. भोजन हा भूक आणि अन्न यांचा समागम आहे आणि तृप्ती ही भोजनाची परिणिती आहे. तस्मात, जेवण केवळ भूक लागल्यावर आणि निव्वळ स्वादानं केल्यानं ते शरीराला उपकारक ठरतं. इतर प्रत्येक सजीव याच पद्धतीनं भोजन करुन निरामय जगतो.

शेवटची गोष्ट, व्यायाम कष्टदायक आणि बराचसा निरुपयोगी आहे कारण त्यात केवळ अन्नमयकोषावर काम होतं. प्राणायाम महत्त्वाचा आहे कारण तो प्राणयमकोषावर काम करतो आणि परिणामत: अन्नमयकोषावर काम करतो. प्राण हे शरीराचं इंधन आहे, त्यामुळे जेवढा श्वासाचा जोम उत्तम तेवढ्या शरीराच्या प्रक्रिया सक्षम. कपालभाती आणि भस्त्रिका हे दोन प्राणायाम आणि जोडीला अनुलोम-विलोम केल्यास श्वासाचा जोम कायम राहातो.

शरीराचं आरोग्य तीन प्रक्रियांवर अवलंबून आहे : श्वसन, अभिसरण आणि उत्सर्जन. श्वसन व्यवस्थित असेल तर अभिसरण आणि उत्सर्जन या प्रक्रिया आपसूक सुधारतात.

शरीराची लवचिकता हा आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे पाच आसनं करणं फायद्याचं ठरतं. १) फूट रोटेशन, २) टोरसो रोटेशन, ३) शोल्डर रोटेशन, ४) वज्रासनात केलेला नाभी ते हृदय असा मसाज, आणि ५) सर्वांगासन. शरीराच्या लवचिकतेमुळे अभिसरण आणि उत्सर्जन या क्रिया सहज होतात.

आणि सरते शेवटी, खेळ हा व्यायामापेक्षा केंव्हाही श्रेष्ठ आहे. तस्मात, वयानुरुप टेबल-टेनीस, बॅडमिंटन किंवा त्यासारखा कोणताही खेळ दिनक्रमात सामील करणं हे आरोग्य आणि उत्साहाला अत्यंत पूरक आहे. अर्थात, खेळ योग्य ते ट्रेनींग घेऊन खेळायला हवा तरच त्याची मजा आहे. एकदा मजा यायला लागली की खेळाचं सातत्य टिकून राहातं आणि आपण तनामनानं कायम उत्साही राहातो.

राहणीप्रकटन

प्रतिक्रिया

कंजूस's picture

8 Jan 2016 - 6:57 am | कंजूस

आवडला लेख.
"शरीराचं वजन किती हा दुय्यम प्रश्न आहे. मुख्य प्रश्न तुम्हाला रोजचं जगायला उत्साह वाटतो की नाही हा आहे. जर तुम्ही पुरेसे उत्साही असाल तर शरीराचं वजन योग्य आहे."- -खरं आहे.
'कामप्रेरणा' म्हणजेच आयुर्वेदात वर्णन केलेल्या रक्त ,मास,अस्थि,वगैरेतील शुक्र धातु.अगोदरचे सर्व ठीक तर शेवटचा शुक्र ठीक.थोडक्यात शुक्र उत्तम तर बाकीचे उत्तमच असणार.
असुरक्षिततेची भावना वजन वाढवते.आपल्याला उद्या /हिवाळ्यात अन्न मिळणार नाही याची तरतुद म्हणून थंड प्रदेशातील प्राण्यांचे वजन वाढते.

संदीप डांगे's picture

8 Jan 2016 - 10:15 am | संदीप डांगे

+१

विवेक ठाकूर's picture

8 Jan 2016 - 10:33 am | विवेक ठाकूर

असुरक्षिततेची भावना वजन वाढवते.

शरीर म्हणजेच आपण आणि शरीराला काही होणे म्हणजे आपल्यालाच काही तरी झाले, ही मनातली खूणगाठ आणि त्यामुळे मृत्यूची खोलवर रुजलेली भीती हे असुरक्षिततेचं मूळ कारण आहे.

थोडक्यात शुक्र उत्तम तर बाकीचे उत्तमच असणार.

निसर्गानं पुरुष देहाची निर्मिती सिमेन आणि स्त्री देहाची निर्मिती फॉलिकल्ससाठी केली आहे. शरीरसंवर्धानाचा मूळ हेतू तो आहे. तस्मात, रजोनिवृत्तीनंतर सुद्धा उत्साह टिकवण्यासाठी स्त्री देहाला कामभावना जागृत असणं आणि पुरुषाला कामसक्षम असणं देहाच्या आरोग्यासाठी फलदायी आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Jan 2016 - 10:27 am | प्रकाश घाटपांडे

शेवटची गोष्ट, व्यायाम कष्टदायक आणि बराचसा निरुपयोगी आहे कारण त्यात केवळ अन्नमयकोषावर काम होतं.

हे काही कळल नाही

विवेक ठाकूर's picture

8 Jan 2016 - 10:49 am | विवेक ठाकूर

अन्नमय, प्राणमय, मनोमय, ज्ञानमय आणि आनंदमय असे ते कोष आहेत. शेवटचे दोन कोष आध्यात्माचा विषय आहेत.

व्यायामानं केवळ अन्नमयकोषावर सरळ काम होतं, शरीरातल्या प्राणमय कोषावर श्वसनाचा वेग वाढल्यानं थोडंफार काम होतं. प्राणायमानं प्राणमयकोषावर काम होतं. तुम्ही कपालभाती प्राणायाम केल्यास श्वास, डायफ्रॅम ते नसिकाग्र असा जोमानं सुरु होतो, तो पॅसेज क्लिअर होतो. अनुलोमविलोमनं श्वसनाची दोन्ही चॅनेल्स को-ऑर्डिनेशननं काम करायला लागतात आणि त्यानं शरीराच्या तापमानाचं संतुलन होतं. श्वसनाचा जोम सुधारला की त्याचा परिणाम मनोमय आणि अन्नमय कोषावर होतो. म्हणजे भूक आणि पचन सुधारणं आणि विचारांचा कोलाहल कमी होऊन मन शांत आणि सृजनशील होणं असा परिणाम दिसायला लागतो.

sagarpdy's picture

8 Jan 2016 - 10:52 am | sagarpdy

+१

पिलीयन रायडर's picture

8 Jan 2016 - 11:23 am | पिलीयन रायडर

प्रार्थमिक हा शब्द म्हणताना रफार आल्यासारखा म्हणला जात असला तरीही लिहीताना मात्र - प्राथमिक असाच लिहीतात ना?

आणि प्राण"यम"कोष नाही तर.. प्राण"मय"कोष ना?

काय जी उत्तरे असतील ती हुषार लोकांना कळवावीत..

बाकी लेख पटला. जास्त क्लिष्ट भाषेत लिहीलेला नसल्याने आणि वाचकाला मुर्खात काढुन स्वतःला सर्वज्ञ डिक्लेअर केलेले नसल्याने सुद्धा.. आवडला..

खरं सांगायचं तर उत्तम भुक, शांत झोप, योग्य व्यायाम / प्राणायाम आणि खेळ जीवनात असतील तर वजन आणि एकंदरीत आरोग्य नीट रहाणार हा काही नवा शोध नाही. तेव्हा ते मुद्दे ठिकच.

फक्त माणसाची कामप्रेरणा आणि त्याचा आरोग्याशी संबंध हा पैलु कधी फारसा वाचलेला नाही. तो मुद्दा चिंतनीय आहे. (अर्थात भुक, झोप, व्यायाम इ नीट असेल तर एकंदरितच सगळीकडेच उत्साह राहील, म्हणजे निरोगी कामेच्छा हे ऑटपुट आहे.. समतोल वजनासारखं..)

विवेक ठाकूर's picture

8 Jan 2016 - 11:45 am | विवेक ठाकूर

प्राथमिक बरोबर आहे आणि प्राणमयकोषच लिहीलं आहे.

खरं सांगायचं तर उत्तम भुक, शांत झोप, योग्य व्यायाम / प्राणायाम आणि खेळ जीवनात असतील तर वजन आणि एकंदरीत आरोग्य नीट रहाणार हा काही नवा शोध नाही. तेव्हा ते मुद्दे ठिकच

उलट आहे, `उत्तम भूक आणि शांत झोप' ही प्राणायाम, लेखातली आसनं आणि खेळ यांचा परिणाम आहेत.

व्यायाम आणि खेळ यात प्राथमिक फरक आहे. व्यायामात तुम्ही एकटे असता आणि ते काम नेटानं पार पाडावं लागतं, खेळात शारीरिक हालचाली आपसूक होतात आणि मजा येते. शिवाय ती ग्रुप अ‍ॅक्टीविटी असल्यानं सातत्य टिकण्याची शक्यता अनेक पटीनं वाढते.

फक्त माणसाची कामप्रेरणा आणि त्याचा आरोग्याशी संबंध हा पैलु कधी फारसा वाचलेला नाही. तो मुद्दा चिंतनीय आहे

धन्यवाद !

पिलीयन रायडर's picture

8 Jan 2016 - 11:51 am | पिलीयन रायडर

प्राणायाम महत्त्वाचा आहे कारण तो प्राणयमकोषावर काम करतो

एकट्याने केलेल्या व्यायामापेक्षा खेळ कधीही जास्त आनंददायी पर्याय आहे. पण मुळात खेळ / व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारची "Physical Activity" ही महत्वाची.

विवेक ठाकूर's picture

8 Jan 2016 - 12:14 pm | विवेक ठाकूर

पण मुळात खेळ / व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारची "Physical Activity" ही महत्वाची.

ते उघड आहे, पण व्यायाम करणार्‍यांच्या तुलनेत खेळणार्‍यांची संख्या नगण्य आहे. आणि फिजिकल अ‍ॅक्टीविटीपेक्षाही प्राणायाम प्रथम आहे.

खरं सांगायचं तर उत्तम भुक, शांत झोप, योग्य व्यायाम / प्राणायाम आणि खेळ जीवनात असतील तर वजन आणि एकंदरीत आरोग्य नीट रहाणार हा काही नवा शोध नाही.

अगदी हेच म्हणणार होतो. हे सगळ निट असेल पण वजन वाढलेले असेल हे खूप कमी कमी प्रमाण असते .

उलट काही रोग किंवा व्यायामाचा अभाव असल्यानेच वजन वाढणे किंवा पचनसंस्था ढासळणे होते, नुसता प्राणायम करून काही फरक पडेल असे वाटत नाही , योग्य व्यायाम आणि आहार हवाच , अर्थात इथली डॉक्टर मंडळी सांगतीलच

नुसता प्राणायम करून काही फरक पडेल असे वाटत नाही , योग्य व्यायाम आणि आहार हवाच

प्राणायम करून पाहिला की फरक कळेल. तो पहिल्या चार-पाच दिवसातच जाणवायला लागतो. व्यायमाला खेळ हा जास्त आनंददायी पर्याय आहे. आहाराबद्दल मी माझे विचार मांडले आहेतच.

स्पा's picture

8 Jan 2016 - 12:08 pm | स्पा

ओके

मानस्'s picture

8 Jan 2016 - 12:16 pm | मानस्

विवेक ठाकूर मस्त लेख्..तुमच लेखन आवडतय्..प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा एक वेगळाच द्रुष्टिकोन विषेश आवडला.

विवेक ठाकूर's picture

8 Jan 2016 - 2:26 pm | विवेक ठाकूर

प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा एक वेगळाच द्रुष्टिकोन विषेश आवडला.

तुम्ही पूर्वग्रह न ठेवता वाचला त्यामुळे तुम्हाला तो जाणवला, आभार. लेख व्यायम करा आणि निरोगी राहा इतका साधा नाही. तो प्रथम विदेहत्त्व, मग > प्राणायाम, योगासनं आणि खेळ, नंतर > भोजनाचा रसपरिपोष, आणि शेवटी > कामप्रेरणा आणि उत्साह अशा अंगानं जातो. ज्यांनी लेख मनःपूर्वक वाचलायं आणि तो अनुभवण्याची तयारी आहे त्यांच्या अन्नमय, प्राणमय आणि मनोमय कोषांवर तो विधायक बदल घडवू शकेल.

छान लेख. उत्साह व आत्मविश्वास वाढला.

हीच तर खरी अत्यंत योग्य सुरुवात आहे!

छान लेख. उत्साह व आत्मविश्वास वाढला.

उगा काहितरीच's picture

8 Jan 2016 - 4:30 pm | उगा काहितरीच

छान लेख आवडला .