कल्लरी. अरे वा... छानच आहे नाव... आणि वेगळं सुद्धा. पण अर्थ काय नावाचा?
हे नाव ठेवायचं ठरलं, तेव्हा मी सुद्धा अर्थ शोधू लागले. दोन अर्थ सापडले मला. कल्लरी हे शिवशंकराच्या एका नृत्यशैलीचे नाव आणि कल्लरी हे एका प्राचीन दाक्षिणात्य युद्धविद्येचं नाव.
बरोबर. आणखी एक गंमत सांगतो. कल्ल म्हणजे दगड. अश्मयुगात दगडाची हत्यारं वापरली जात. दगडाच्या या शस्त्रांनी केलं जाणारं युद्ध म्हणजे कल्लरी.
मग, तुमची कल्लरी कशी आहे...
नावाला जागते सर... भूक लागली, लहर फिरली की तांडव करते आणि एरवी आम्हाला युद्धकलेची प्रात्यक्षिकं देते...
माझं उत्तर ऐकून सर हसू लागले.
सात महिन्यांची झाली ना.. निवळेल हळू-हळू...
.... आकाशवाणीतले एक वरीष्ठ, इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि मी, आमच्यातला हा संवाद. त्यांना इतिहासाचे अभ्यासक म्हणण्यापेक्षा इतिहासप्रेमी म्हणणं जास्त संयुक्तिक. इतिहास, संस्कृती, धर्म अशा अनेक बाबतीत त्यांचा अभ्यास खरोखर दांडगा आहे. माझ्या लेकीच्या नावाबद्दल आमचं बोलणं सुरू होतं...
तर... कल्लरी...
आमचं दुसरं कन्यारत्नं.
----------------------------------------------------------------------------------------
कल्लरीला तिची दिदी फार आवडते. पूर्वा. ती वय वर्ष सातच्या आसपास तर ही वय महिने सातच्या आतबाहेर... खूप प्रेम आहे दोघींमध्ये. सकाळी या प्रेमाचा अविष्कार बघण्यासारखा असतो. पूर्वा गाढ झोपलेली असते. मी स्वैपाकघरात. बाबा झोपलेला. अशात कल्लरीला जाग येते. ती चाहूल घेते. स्वैपाकघरात डोकावते. गोड हासून दाखवते. तिला कणकेच्या डब्यात हात घालून बघायचा असतो. केर काढतानाची केरसुणीची हालचाल लक्षात राहिल्यामुळे आता केरसुणी दिसताच ती खेचून घेण्याचे अनेक असफल प्रयत्न होतात. मग अचानक काही आठवून माझ्याकडे टक लावून पाहते. चिमुकल्या मुठींची उघडझाप करत अद्या.. अद्या.. अद्या.. अद्या... चा घोष सुरू होतो. हातातलं काम क्षणभर थांबवून माझी बोटं साखरेच्या डब्याकडे वळतात. माझ्याकडून चिमूटभर साखर वसूल करून मग ती बाबाकडे वळते. त्याच्या पोटाला धरून उभी राहते. त्यालाही हासून दाखवते. बाबा झोपेतच तिला कुशीत घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हात ती झटकून टाकते आणि बहिणीकडे झेपावते.
पूर्वा चेहऱ्याभोवती चादर घट्ट लपेटून गाढ झोपलेली असते. कल्लरी तिलाही छान हासून दाखवते. पण दिदी अर्थात झोपलेली. मग कल्लरी प्रेमाने दिदीचे डोक्यावरचे केस उपटू लागते. अर्धवट झोपेत पूर्वा तिचे हात धरण्याचा प्रयत्न करते. पण कल्लरीची पकड खूप मजबूत आहे. दिदी दाद देत नाही, हे बघून कल्लरी तिला हाका मारते. तरी प्रतिसाद नाही... मग कल्लरी लगबगीने रांगत दिदीच्या पुढ्यात येते. तिच्या पोटासमोर आपले पाय येतील अशी स्थिती घेते आणि लाडक्या दिदीच्या पोटात दाण-दाण लाथा घालते... बिचारी दिदी तरी तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करते. पण छे... लाथा मारून कंटाळा आला की कल्लरीला तीन खणांचा स्टॅंड खुणावू लागतो आणि त्यावरचं सामान उपसण्याकडे ती मोर्चा वळवते.
----------------------------------------------------------------------------------------
... झोप पूर्ण झाली नाही तर माझी चिडचिड होते. कल्लरीच्या जन्मानंतर तीन महिने रात्रीच्या वेळी ती शांत झोपल्यामुळे मलाही बरी झोप मिळायची. पुढच्या महिन्यापासून माझं ऑफीस आणि कल्लरीची रात्रपाळी एकत्र सुरू झाली. आता रात्री तिला झोपवायची जबाबदारी बाबाने घेतली. काही रात्री ती शांत झोपली आणि बाबा सुखावला. त्याचाही आत्मविश्वास वाढला. पण कल्लरी ती...
पाळणाघरात झोप बऱ्यापैकी पूर्ण करून घेऊ लागली आणि मग आमच्या रात्रीच्या झोपेचं खोबरं ठरलेलं. हल्ली आम्ही दोघंही आळीपाळीने तिला झोपवण्याचा प्रयत्न करतो. तिला झोपवता येतं, याबद्दलच्या आमच्या आत्मविश्वासाच्या चिंध्या उडाल्या आहेत... रात्री दीड वाजेपर्यंत आम्ही तिला झोपवण्याचा प्रयत्न करतो आणि ती गोड हासून आम्हाला नवे नवे खेळ सुचवत राहते. मग आम्ही गादीवर पडून राहतो. (बेडवर झोपण्यापेक्षा गाद्या घालून खालीच झोपणं सध्या तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं) तर, लख्ख जागे राहण्याच्या प्रयत्नात आम्ही पेंगुळतो, मध्ये मध्ये तिची चाहूल घेत राहतो आणि ती... फक्त एसी तून येणाऱ्या अपुऱ्या उजेडात घरभर फिरत राहते. आमच्या अंगावरून चढ-उतर करते. हाताला लागेल ते सामान उपसते. (उपशी असं आणखी एक नाव तिला पूर्वाने बहाल केलंय) कधीतरी तिला झोप येते, मग ती लहरीनुसार कधी आई तर कधी बाबाच्या कुशीत ढुशा देते आणि आमच्या लक्षात येण्यापूर्वी झोपी जाते सुद्धा...
----------------------------------------------------------------------------------------
मी पक्की मुंबईकर. पण थिएटरमध्ये जाऊन सिनेमे बघणं नाही झालं फारसं. तशी आवड नव्हती. बहिणीने बिनधास्त या चित्रपटाची तिकीटं आणूनच दिली, तेव्हा आई-बाबांसोबत तो पहिला चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला. लग्नानंतर काही वर्षांनी पुन्हा ताईनेच लय भारी चित्रपटाची तिकीटं आणली. अर्थात, मुलांना पाहायचा होता चित्रपट. तो थिएटरमध्ये जाऊन पाहिलेला दुसरा चित्रपट.
नाटकं पाहायला आवर्जून जायचो. पण पहिल्या लेकीला थोडी समज आल्यानंतर एका नाटकाला गेलो. तर तिथला अनुभव घेतल्यावर मग नाटक-सिनेमांवर काटच मारावी लागली. झालं काय, तर लेकीला नाटक आवडलं, पण स्टेजवर बोलणारी माणसं आपल्याशी बोलताहेत आणि आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, असा समज झाला तिचा. आणि मग ती मोठ्याने स्टेजवरच्या कलाकारांशी बोलूच लागली.. सुरूवातीला मजा वाटली पण नंतर इतर प्रेक्षकांचा आणि आमचाही रसभंग होऊ लागला. काहीसे नाराज होत आम्ही तिथून बाहेर पडलो...
त्यानंतर इतक्या वर्षांनी... ताईनेच तिसऱ्यांदा चित्रपटाची तिकीटं काढलेली परस्पर आणि मी वैतागलेच... मुलं जरा मोठी झालेली... चित्रपट... कट्यार काळजात घुसली... मला पाहायचाच होता, पण... कल्लरी खूपच लहान आहे. तिला न घेता जाणं अशक्यच आणि घेऊन जावं, तर कोणालाच पूर्ण चित्रपट पाहता आला नसता... हो-ना करता करता जायचं ठरलंच.
कल्लरी म्हणजे मावशी आणि कुटुंबियांचाही जीव की प्राण. सगळे मजेत होते. चित्रपट सुरू झाला आणि कल्लरीला मांडीवर घेऊन मनात धाकधूक बाळगत मी चित्रपट बघू लागले. सगळ्यांनाच चित्रपट आवडला आणि आश्चर्य म्हणजे कल्लरीने अजिबात कुरकूर न करता संपूर्ण चित्रपट पाहिला. तिच्या हुंकाराला प्रतिसाद देण्याचं काम फक्त मला करावं लागलं. म्हणजे काय तर.. चित्रपटात पॉज आला, कोणतेही संवाद, संगीत नाही, असे क्षण आले की ती हुंकार द्यायची... आता पुढे बोला, असं बहुतेक सुचवत असेल.. तेवढं मला सांभाळावं लागलं. चित्रपट संपल्यानंतर सोबतच्या सगळ्यांनीच तिचे आभार मानले, हे वेगळं सांगायला नको नं....
प्रतिक्रिया
7 Jan 2016 - 5:01 pm | नीलमोहर
:)
7 Jan 2016 - 5:03 pm | उगा काहितरीच
गोग्गोड लेख !
7 Jan 2016 - 5:07 pm | वेल्लाभट
कित्तीतरी गोष्टींशी संबंध जोडता आला. अगदी असंच बरंचसं अनुभवत आहे. लिखाण आवडलं... सुरेख. नावही वेगळंच एकदम.
7 Jan 2016 - 5:26 pm | कलंत्री
लेख आवडला आणि विशेषतः लहान मुलीचे बालपण डोळ्यासमोरुन तरळून गेले, लिहित रहा.
7 Jan 2016 - 5:32 pm | अजया
:)
7 Jan 2016 - 5:33 pm | शान्तिप्रिय
तुम्ही ज्याप्रकारे कल्लरीचा निरागसपणा या लेखातुन व्यक्त केला आहे त्याला तोड नाही.
अतिशय गोड आणि सुन्दर लेख. वाखु साठवल्या आहेत.
7 Jan 2016 - 5:41 pm | प्रचेतस
छान लिहिलंय. कल्लरीपट्ट नावाचे एक केरळी युद्धतंत्र आहे हे माहीत होतेच. पण शिवाच्या ह्या नामक नृत्यशैलीबद्दल कधी ऐकले नाही. हं शिवाला 'कालारी' हे नामाधिमान मात्र आहे. प्रत्यक्ष काल हाच ज्याचा शत्रू आहे असा तो कालारी.
7 Jan 2016 - 8:49 pm | बोका-ए-आझम
फार सुदैवाची गोष्ट आहे! छान लिहिलंय!
8 Jan 2016 - 8:59 am | नाखु
सुखाचे क्षण...
8 Jan 2016 - 12:32 pm | स्वच्छंदी_मनोज
हेच म्हणतो.
7 Jan 2016 - 8:57 pm | यशोधरा
खूप गोड लिहिलं आहे.
7 Jan 2016 - 9:54 pm | पद्मावति
खूप छान लिहिलंय.
8 Jan 2016 - 12:41 am | रातराणी
मस्त! गोड लिहिलं आहे!
8 Jan 2016 - 1:08 am | एस
गोड!
8 Jan 2016 - 2:18 am | स्वाती२
लेख आवडला!
8 Jan 2016 - 10:25 am | सस्नेह
गोड लेख
8 Jan 2016 - 11:36 am | असंका
छानच गोष्टी लिहिल्यात. जमल्यास अजून अशा गमतीजमती सांगा ना!!
8 Jan 2016 - 11:55 am | विजुभाऊ
छान लिहीलय.
तोत्तोचान आठवली.
संदर्भः तोत्तोचानः लेखीका- चेतना गोसावी सरदेसाई.
8 Jan 2016 - 1:56 pm | पिलीयन रायडर
छान..!!
मुलांना खर तर नाटक चित्रपटांना नेणं पाप आहे! त्यांनाही काही इंटरेस्ट नसतो.. म्हणुन ते आपल्याला पाहु देत नाहीत आणि बाकी लोक जे आपल्या पोरांना कुठे तरी मॅनेज करुन सुखाने आलेले असतात, त्यांना इथे येऊनही पोरांचाच गोंधळ सहन करावा लागतो..
त्यामानाने तुमच्या पिल्लुने छानच एन्जॉय केला की पिक्चर!
8 Jan 2016 - 1:57 pm | पिलीयन रायडर
आणि हो...
ते झोप वगैरे विसराच काही दिवस अजुन.. कधी तरी आपोआप मुलं रात्री झोपायला लागतात. तेव्हा कुठे आयुष्य सुरु झाल्या सारखं वाटतं. तोवर मी तरी सतत झोपेतच वावरत असायचे असं वाटायचं!
8 Jan 2016 - 5:07 pm | जातवेद
मस्त!
8 Jan 2016 - 6:02 pm | पैसा
खूप छान!
12 Jan 2016 - 3:31 pm | माधुरी विनायक
धन्यवाद मंडळी.
प्रचेतस यांस – कालारी हे नाव माहिती होते. इतिहास आणि विशेषत: शिल्पकलेबद्दलच्या तुमच्या अभ्यासाबद्दलही आदर आहे.
बोका-ए-आझम यांस – मुलगा-मुलगी हे भेद नाही येत मनात, कारण एकंदरच मुलांची मनापासून आवड आहे. पण सध्या दोन मुलींचं आई’पण अनुभवणं खरंच खूप छान आहे.
विजुभाऊ यांस – जापानी तोत्तोचान, मराठीतला लंपन हे माझेही खास लाडके.
पिलीयन रायडर यांस – झोपेबाबतचं मत एकदम मान्य. पहिल्या लेकीच्या वेळचा दांडगा अनुभव आहेच मलाही...